विशाखापट्टणमला नुकत्याच पार पडलेल्या आयएफआर म्हणजेच आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाच्या माध्यमातून आपण जगाला दाखवून दिले आहे की भारत ही आशियातील तसंच प्रशांत महासागरातील चीनवर मात करू शकणारी प्रबळ शक्ती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय नौदलाच्या ७१ युद्धनौका, त्यातही भारतीय बनावटीच्या अतिअद्ययावत युद्धनौकांचे असलेले प्राबल्य, पाणबुडय़ांचा छोटेखानी मात्र भेदकशक्ती असलेला ताफा, पूर्णपणे भारतीय बनावटीच्या जैवइंधनावर चालणाऱ्या अतिवेगवान गस्ती व अटकाव नौका, आयएनएस विराट व आयएनएस विक्रमादित्य या महाकाय अशा दोन विमानवाहू युद्धनौका, स्वनातीत वेगाने येणारी मिग २९ के आणि छातीत धडकी भरवणारी हॉक असे आपले सारे सामथ्र्य भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाच्या (आयएफआर) निमित्ताने बंगाल उपसागरात जगभरातील विविध देशांच्या नौदलांसमोर सादर केले.

भारतीय नौदलाच्या या आयएफआरमध्ये ५० देश सहभागी झाले होते. काही देशांनी त्यांचा वरिष्ठ नौदल अधिकारी प्रतिनिधी म्हणून पाठविला होता तर काही देशांनी प्रत्यक्ष युद्धनौका पाठविल्या होत्या. आयएफआरमध्ये २४ विदेशी युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. अशा सुमारे १०० हून अधिक युद्धनौकांचा ताफा संचलनात सहभागी होता. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बंगालच्या उपसागरामध्ये आयोजित या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाची मानवंदना स्वीकारली. तर दुसऱ्याच दिवशी, रविवारी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यांचे शक्तिप्रदर्शन विशाखापट्टणमवासीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. काहीशे किलोमीटर्सच्या वेगात रोंरावत येऊन अचूक लक्ष्यभेद करणारी मिग २९ के व हॉक या लढाऊ  विमानांच्या अंगावर काटा उभा करणाऱ्या चित्तथरारक कसरती विशाखापट्टणमवासीयांची मने जिंकून गेल्या.

याचे निमित्त होता, तो जगातील सर्व नौदलांसमोर आयएफआरच्या माध्यमातून भारताने पुढे केलेला मैत्रीचा हात. आयएफआरच्या यशापयशाची चर्चा करताना ते कोणत्या पाश्र्वभूमीवर पार पडले, तेही समजून घ्यावे लागते. तरच त्याचे खरे मूल्यमापन करता येईल. यापूर्वी भारतीय नौदलाने आयोजित केलेले पहिले आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन पार पडले ते मुंबईमध्ये २००१ साली. त्यात २३ देश सहभागी झाले होते. यंदा ही संख्या दुपटीहून अधिक होती. अर्थात त्याला कारणही तसेच होते. भारतीय नौदलाचे सामथ्र्य या मधल्या १५ वर्षांमध्ये अनेक पटींनी वाढले आहे. मुळात या सामर्थ्यांला धार आहे ती भारतीय नौदलाच्या यशस्वी स्वयंपूर्णतेची. आयएफआरमध्ये आलेल्या सर्व विदेशी संरक्षणतज्ज्ञांनी कौतुक केले ते याच स्वयंपूर्ण बनावटीचे. विविध देशांचा सहभाग वाढण्यामागेही हे सामथ्र्यच कारणीभूत आहे. कारण मैत्री करताना आपण, कोणाशीही मैत्री करायला जात नाही. प्रबळ असलेल्या व्यक्तीशी मैत्री राखतो, कारण ती आपल्या हिताची असते. देशाच्या बाबतीतही धोरणात्मक बाबींमध्ये हे तत्त्व तेवढेच लागू होते. सामथ्र्यशाली व्यक्ती किंवा राष्ट्रासोबतची मैत्री मिरवता येते, हाही त्यातील एक महत्त्वाचा भाग असतो.

अलीकडच्या काळात भारतीय नौदलातील नवे पर्व सुरू झाले ते तलवार वर्गातील स्टेल्थ फ्रिगेटस्च्या माध्यमातून. या युद्धनौकांची बांधणी रशियन गोदीत झालेली असली तरी त्यावरील सॉफ्टवेअर प्रणाली मात्र भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केली आहे. त्यानंतर मात्र शिवालिक वर्गातील स्टेल्थ फ्रिगेटस् आणि कोलकाता वर्गातील स्टेल्थ विनाशिका नौदलात दाखल झाल्या. या दोन्ही स्वयंपूर्ण बनावटीच्या आणि जगभरातील अतिअद्ययावत युद्धनौका होत्या. या दोन्ही युद्धनौकांनी जगभरातील नौदल आणि सरंक्षणतज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले.

राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख अर्थात सरसेनापती असतात. त्यांची पाच वर्षांची कारकीर्द संपत असताना त्यांच्या सन्मानार्थ अशा प्रकारे नौदल ताफा संचलन आयोजित करण्याची भारतीय नौदलाची परंपरा आहे. आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कारकीर्दही संपत आली असून त्यानिमित्ताने हे नौदल ताफा संचलन आयोजिण्यात आले. फरक इतकाच की, हे आंतरराष्ट्रीय होते. पण यातील आंतरराष्ट्रीय या एकाच शब्दाने जागतिक पटलावरील संदर्भ आणि परिमाणे सारेच बदलून जाते.

हे सारे प्रत्यक्षात चार पातळ्यांवर होत असते. त्यातील पहिली पातळी ही आयएफआरच्या आयोजनाची असते. म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती- व्यवस्था आणि मनुष्यबळाचे नियोजन. गेल्या आठवडय़ापासून विदेशी नौदलांच्या युद्धनौका विशाखापट्टणम बंदरात येण्यास सुरुवात झाली तेव्हापासून भारतीय नौदलाचे हजारो नौसैनिक व शेकडो अधिकारी त्यांच्या व्यवस्थेमध्ये रुजू झाले होते. हे सारे मंगळवारी पार पडलेल्या पॅसेक्स या निरोप समारंभानंतर थंडावले. एकटय़ा आयएनएस जलाश्व या लँडिंग युद्धनौकेवर सुमारे हजार नौसैनिकांची सोय करण्यात आली होती. विदेशी नौसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या आतिथ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण त्यांच्या मनातील देशाची प्रतिमा उंचावणे हे आपले महत्त्वाचे लक्ष्य असते. शिवाय आतिथ्यात कसूर राहून गेल्यास त्याचा फटकाही बसतो. प्रतिमा उंचावेल व वाईट प्रसिद्धीचा फटका बसणार नाही, हे पाहण्यात नौदलाला यश आले.

व्यवस्थापनाची दुसरी पातळी असते ती, प्रत्यक्ष समुद्रामध्ये आणि समुद्राबाहेरच्या सुरक्षेची. विदेशी युद्धनौका आपल्या बंदरात येतात तेव्हा त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून आपल्या बंदराची, युद्धनौका, पाणबुडय़ा आदींची गुप्त माहिती मिळणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. त्याचवेळेस त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही आपल्यावर असते. या सोहळ्यावर दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार होती. त्यामुळे पोलीस, गुप्तचर यंत्रणा या सोहळ्यावर बारीक नजर ठेवून होत्या. नौदलप्रमुख अडमिरल रॉबिन धोवन या संदर्भात ‘लोकप्रभा’शी संवाद साधताना म्हणाले, ‘लहान बोटींची मदत विदेशी युद्धनौकांवरून नौसैनिकांची व वस्तूंची ने-आण करण्यासाठी घ्यावी लागणार होती. त्याच वेळेस कोणतीही लहान बोटदेखील धोका ठरू शकते हेही लक्षात ठेवले होते. लहान बोट हेही दहशतवाद्यांसाठी माध्यम असू शकते, हे लक्षात ठेवूनच आखणी करण्यात आली. या दोन्ही पातळ्यांवरून काम करत नौदलाने अगत्य आणि सुरक्षा या दोन्ही पातळ्या यशस्वीपणे हाताळल्या याचा अभिमान वाटतो.’’

तिसरी पातळी होती ती, सागरतटावर असलेल्या विशाखापट्टणमच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम न होता, तेथील स्थानिकांना सामावून घेऊन सारे काही पार पाडण्याची. तीन-चार दिवस मासेमारी करता येणार नाही म्हणून मच्छीमार नाराज होते. त्यांच्या दैनंदिन मासेमारीची सरासरी काढून त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली. नौदलाचे सामथ्र्य दाखविणाऱ्या नौदल व हवाई कसरती त्यांच्यासाठी पार पडल्या. यामध्ये किती बारकाईने लक्ष घालावे लागते, याचा अंदाज येण्यासाठी एक लहानसा मुद्दा समजून घेणे महत्त्वाचे ठरावे. हवाई कसरतींसाठी आलेली काही लढाऊ  विमाने चेन्नई, भुवनेश्वर, गोवा तर काही दोन विमानवाहू युद्धनौकांवरून उड्डाण करून आली होती. ती प्रचंड वेगात येतात, त्यांचा ताळमेळ जुळला नाही तर पंचाईत होऊ  शकते. ती होऊ  नये म्हणूनच पूर्व विभागाचे नौदल ताफाप्रमुख रिअर अडमिरल सुनील भोकरे हवाई कसरतींच्या वेळेस नियंत्रण कक्षात तळ ठोकून होते. त्यांच्या वेगामध्ये पाच सेकंदांचा फरक पडला तरी अनवस्था प्रसंग निर्माण होऊ  शकतो. ते टाळण्यासाठी नौदलाने पुरेपूर काळजी घेतली. अशीच काळजी प्रत्यक्ष समुद्रात संचलनादरम्यानही घ्यावी लागते. त्यातही भारत यशस्वी ठरला, असे संपूर्ण सोहळ्यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येते.

चौथी पातळी होती ती या आयोजनामागे असलेली देशाची सर्व जाहीर व छुपी अशी दोन्ही प्रकारची उद्दिष्टे सफल होतील हे काटेकोरपणे पाहण्याची. ‘महासागरातून एकात्मता’ हे या आयएफआरचे बोधवाक्य होते. यात जागतिक शांती आणि सागरी सुरक्षेसाठी विविध नौदलांमधील सहकार्य हा प्रमुख उद्देश तर होताच. पण या निमित्ताने आपले सामथ्र्य तेही स्वबळावर प्राप्त केलेले जगासमोर दाखविणे हाही छुपा उद्देश होताच. या सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या जगभरातील विविध देशांच्या प्रमुख नौदल अधिकाऱ्यांनी आणि संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवरून ही उद्दिष्टे पार पाडण्यात यश आल्याचे लक्षात येते.

अमेरिकन नौदलाचे मोहीमप्रमुख अ‍ॅडमिरल जॉन रिचर्डसन ‘लोकप्रभा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणतात, ‘‘खुद्द अमेरिकेत किंवा इतरत्रही मी आजवर अनेक आयएफआरमध्ये सहभागी झालो आहे, पण एवढी प्रचंड व्याप्ती असलेले आयएफआर अनुभवण्याची संधी यानिमित्ताने प्रथमच मिळाली. भारताने स्वयंपूर्णतेच्या बळावर प्राप्त केलेले सामथ्र्य तर यातून दिसतेच पण त्याचबरोबर हे आयएफआर जगातील सागरी सुरक्षेचे महत्त्वही तेवढच अधोरेखित करते. आशियाई आणि प्रशांत महासागरातील सागरी सुरक्षेसाठी अमेरिका, भारत व जपान कटिबद्ध असून या तिन्ही नौदलांमध्ये अतिशय उत्तम समन्वय आहे.’’

जपान व भारत पूर्वापार मित्र असून सागरी सुरक्षा व स्थैर्य यामध्ये या दोन्ही नौदलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करतानाच जपानी स्वसंरक्षक नौदलाचे प्रमुख, अ‍ॅडमिरल तोमोहिसा ताकेई म्हणतात, ‘प्रस्तुत आयएफआरच्या आयोजनातून भारताने त्यांच्या स्वयंसिद्धतेचे दर्शन घडविले आहे. त्यांची ही स्वयंसिद्धता स्वयंपूर्णतेच्या माध्यमातून आली आहे. भविष्यातही सागरी सुरक्षेसाठी जपान भारत व अमेरिका एकत्र असतील. येत्या काही काळात आमच्या संयुक्त कवायतीही अपेक्षित आहेत. भारताने स्वबळावर प्राप्त केलेल्या सामर्थ्यांला तोड नाही. भारताला सर्व प्रकारची मदत जपान करील.’’

जर्मन संरक्षणतज्ज्ञ मायकेल नीट्झ म्हणाले, ‘गेल्या १५ वर्षांत भारताने प्रचंड मजल मारली आहे. ‘आयएनएस तलवार’ ही भारतीय युद्धनौका रशियन गोदीत तयार झाल्यानंतर जर्मनीमार्गेच भारतात आली. तेव्हा प्रथम ती पाहिली. आयएनएस तलवारपासून आत्ताच्या कोलकाता वर्गातील स्टेल्थ विनाशिकांपर्यंतचा भारताचा प्रवास केवळ अचंबित करणारा आहे. शिवालिक वर्गातील युद्धनौका तर जगातील अद्ययावत युद्धनौकांमध्ये अग्रणी आहेत. भारताच्या या सामर्थ्यांचा रास्त उपयोग दक्षिण चिनी समुद्रातील (साऊ थ चायना सी) आव्हानांना सामोरे जाण्यासाठी होईल. तेथील सागरी सुरक्षेचे आव्हान हाताळण्याची पूर्ण क्षमता आणि सामथ्र्य भारताकडे आहे हेच या आयएफआरने दाखवून दिले.’

अमेरिकेतील कॉम्बॅट फ्लीट्स ऑफ द वर्ल्डमधील संरक्षणतज्ज्ञ निकोला मुजूमदार या १५ वर्षांपूर्वी पार पडलेल्या मुंबईतील आयएफआरलाही हजर होत्या. ‘लोकप्रभा’शी संवाद साधत त्या म्हणाल्या, ‘जागतिक सुरक्षेला सागरी चाचे, दहशतवादी यांच्याकडून असलेल्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी जागतिक पातळीवर नौदलांचे सहकार्य अधोरेखित करणारे असे हे आयएफआर होते. या आयएफआरच्या आयोजनातील सर्व पातळ्यांपासून ते सामर्थ्यांच्या प्रदर्शनापर्यंत सर्वच पातळ्यांवर भारताने आपली यशस्वी मोहोर उमटवली. तब्बल शंभरहून अधिक युद्धनौकांच्या संचलनाचे आयोजन ही अतिशय जिकिरीची गोष्ट असून ते पार पाडण्याची यशस्वी क्षमता भारताने सिद्ध केली आहे. जगातील बडय़ा राष्ट्रांनाही जिकिरीची ठरणारी बाब भारताने सिद्ध करून दाखवली. २००१ ते २०१६ या १५ वर्षांत भारताने स्वयंपूर्णतेच्या बळावर जागतिक मजल मारल्याचे यानिमित्ताने जगासमोर आले.’

जपानी नौदलातील संरक्षणतज्ज्ञ तेत्सुया काकीतानी यांनी कोलकाता, शिवालिक व अगदी अलीकडे दाखल झालेल्या कमोता युद्धनौकांचे कौतुक करत स्वयंपूर्णतेच्या बळावर जगातील प्रबळ नौदल म्हणून भारताने प्राप्त केलेल्या नव्या परिचयाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आजवर अमेरिका, ब्रिटन, चीन, जपान, सिंगापूर आदी ठिकाणी पार पडलेल्या आयएफआरला उपस्थित राहण्याची संधी मिळाली असे सांगून काकीतानी म्हणाले की, हे आजवरचे सवरेत्कृष्ट व सर्वात शक्तिशाली आयएफआर होते. आशियाई सत्तासमतोलाच्या दृष्टिकोनातून या आयएफआरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरेतर पाकिस्तानने या आयएफआरमध्ये सहभागी व्हायला हवे होते, असेही त्यांनी सांगितले.

या आयएफआरला पाश्र्वभूमी आहे ती दक्षिण चिनी समुद्रामध्ये सुरू असलेल्या चीनच्या आक्रमक कारवायांची. तिथे चीन कुणालाच जुमानत नाही, अशी अवस्था आहे. जपान आणि अमेरिका या दोन देशांनी त्या संदर्भात जाहीर भूमिकाही घेतली आहे. या टापूमध्ये चीनच्या नौदलाला टक्कर देण्याची क्षमता भारतीय नौदलामध्ये आहे. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून हे दाखवून देणे आणि त्याच वेळेस आयोजनातील सहभागी देशांची संख्या वाढवून जग आपल्यासोबत आहे, हेही चीनला दाखवून देणे त्याच वेळेस या वादग्रस्त मुद्दय़ांवर चर्चा घडवून आणणे हाही छुपा हेतूही या मागे होताच. या आयएफआरमध्ये आयोजित सागरी सुरक्षा व सहकार्य परिषदेमध्ये या मुद्दय़ांवर चर्चा झालीच. खरे तर या चर्चेला सुरुवात झाली ती, चीनच्या वतीने वाचण्यात आलेल्या पहिल्या शोधप्रबंधाने. बीजिंग येथील चायनीज अकादमी ऑफ सोशल सायन्सेसमधील प्रा. ये हैलीन यांच्या माध्यमातून इथे चीनची भूमिका मांडण्यात आली. प्रा. ये आजारपणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी पाठविलेला शोधनिबंध वाचून दाखविण्यात आला. या शोध प्रबंधामध्ये चीनच्या वतीने अतिशय आक्रमक भूमिका घेत गेल्या काही वर्षांत वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण चिनी समुद्राच्या टापूतील आपल्या कारवायांचे जोरदार समर्थन करताना व्हिएतनाम, फिलिपाइन्स यांना आपण मानतच नाही असे चीनने सांगितले. त्याच वेळेस दक्षिण चिनी समुद्रामध्ये आगळीक करण्याचा प्रयत्न केलात तर पूर्वेकडील भागात आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, अशा शब्दांत जपानला धमकीवजा इशाराच दिला.

दक्षिण चिनी समुद्र हा आपल्याच अखत्यारीतील भाग असल्याचा मुद्दा चीनच्या वतीने पुन्हा एकदा जोरदार रेटण्यात आला. येथे असेलेले फिलिपाइन्स आणि व्हिएतनामसारखे लहान देश आपल्याशी टक्कर देण्याची क्षमता राखत नाहीत. असे सांगतानाच फिलिपाइन्सच्या हद्दीत आतपर्यंत जाऊन आल्यानंतरही ते काहीच करू शकले नाहीत, त्यांना तर स्वत:चा किनाराही राखता येत नाही, ते आम्हाला काय करणार? व्हिएतनाम आणि फिलिपाइन्ससारखे देश त्यांची तक्रार भारत किंवा जपानकडे मांडण्याशिवाय दुसरे काहीच करूच शकत नाही, असे ही भूमिका मांडताना सांगण्यात आले. आम्हाला टक्कर देण्याची क्षमता एकटय़ा अमेरिकेकडे आहे. मात्र आमच्या क्षेत्रात त्यांचे फारसे काही चालणार नाही, अशी दपरेक्ती करण्यात आली. व्हिएतनाम, फिलिपाइन्स आणि जपानचे प्रतिनिधीही या परिषदेस हजर होते. ही परिषद जागतिक सहकार्यासाठी असल्याचे सांगून चीनच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्या सर्वानीच नकार दिला.

चीनने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळेच नंतर परिषदेचा नूरही पालटला. बहुतांश चर्चा चीन व भारत संघर्ष आणि दक्षिण चिनी समुद्रातील वादाभोवतीच फिरत राहिली. युद्ध कुणालाच परवडणारे नसले तरी चीन आणि भारत यांच्यात संघर्षांची ठिणगी पडू शकते, तशी सर्वाधिक शक्यता दिसते आहे, अशी भीती दक्षिण आफ्रिकेतील संरक्षणतज्ज्ञ प्रा. रेनर्फ्यू ख्रिस्ती यांनी व्यक्त केली. संपूर्ण परिषदेमध्ये दक्षिण चिनी समुद्रातील वादावरच चर्चा झडत राहिली.

या पाश्र्वभूमीवर पार पडलेल्या या आयएफआरकडे पाहिले की, भारताने साधलेला निशाणा नेमका लागला आहे, हेही लक्षात येते. कारण या परिषदेत दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या कारवायांचा विषय निघणार याची पूर्ण कल्पना असल्यानेच चीनच्या वतीने हा आक्रमक शोध निबंध सादर करण्यात आला. त्याला कोणतेही तोंडी उत्तर दिले गेले नसले तरी तब्बल ५० देशांचा सहभाग बरेच काही सांगून जातो. चीनचे नौदल प्रतिनिधी तर नंतर या परिषदेत थांबलेही नाहीत. कारण कदाचित मग त्यांना उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बसावे लागले असते. ते त्यांनी शहाजोगपणे टाळले.

भारतालाही या आयएफआरच्या माध्यमातून जग तुमच्याविरोधात आणि आमच्यासोबत आहे, हे दाखवून द्यायचे होते. चीनने सादर केलेला आक्रमक प्रबंध भारताचे या आयोजनामागचे यश आणि चीनची झालेली कोंडी पुरती स्पष्ट करणारा होता. गेल्या अनेक वर्षांत चीनच्या या दांडगाईला उत्तर देणारा पर्याय जग शोधत होते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शोधाला आयएफआरच्या माध्यमातून उत्तर दिले. विशाखापट्टणमला पार पडलेल्या परिषदेतील सर्वच वक्त्यांनी भारताचा उल्लेख आशियाई आणि प्रशांत महासागरातील प्रबळ नौदल म्हणून करणे ही भारताने चीनवर शिष्टाईच्या माध्यमातून केलेली मात पुरती स्पष्ट करणारे होते. पूर्वी भारताकडे केवळ एक आशियाई शक्ती म्हणून पाहिले जात होते. मात्र संपूर्ण आयएफआरमध्ये लक्षात आलेली बाब म्हणजे आता भारताकडे आशिया व प्रशांत महासागरातील शक्ती म्हणून पाहिले जाते आहे. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासह सर्वानीच असा उल्लेख करणे हे भारताचे खूप महत्त्वाचे यश आहे. या अर्थाने पाहायचे तर विशाखापट्टणमचे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन (आयएफआर) भारताच्या शिरपेचातील मानाचा तुराच ठरते!

असे पार पडले आयएफआर..

‘आयएनएस सुमित्रा’, ‘आयएनएस सुमेधा’ व ‘आयएनएस सुनयना’ यांचा समावेश राष्ट्रपतींच्या युद्धनौकांच्या ताफ्यात करण्यात आल्याने या सर्व युद्धनौकांना अशोकस्तंभावरील तीन सिंह असलेली देशाची राजमुद्रा मिरवण्याचा मान मिळाला होता. यातील ‘आयएनएस सुमित्रा’ ही राष्ट्रपतींची युद्धनौका होती. आयएफआरच्या वेळापत्रकानुसार बरोबर नऊ वाजता राष्ट्रपतींचे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल रॉबिन धोवन त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत असलेल्या उपस्थितांमध्ये लष्कर आणि हवाई दल प्रमुखांचाही समावेश होता. सरसेनापती असलेल्या राष्ट्रपतींसमोर त्यांच्या सन्मानार्थ नौदल ध्वज झुकलेला पाहण्याची दुर्मीळ संधी उपस्थितांना मिळाली. राष्ट्रगीत, मानवंदना आणि २१ तोफांची सलामी झाल्यानंतर राष्ट्रपती बंगालच्या उपसागराच्या दिशेने रवाना झाले. कमांडर मिलिंद मोकाशी या मराठी अधिकाऱ्याच्या हाती राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचे सारथ्य होते.

त्यानंतर खोल समुद्रात दुतर्फा तीन अशा एकूण सहा युद्धनौकांच्या रांगांमधून राष्ट्रपतींचा ताफा पुढे सरकत होता. प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या नौका व्यवस्थित पाहण्याची संधी राष्ट्रपतींची युद्धनौका वळल्यानंतर पुन्हा मिळत होती. ‘आयएनएस तरंगिणी’ या प्रशिक्षण शीडनौकेपासून संचलनाची सुरुवात झाली, दोनदा विश्वपरिक्रमा करणाऱ्या ‘म्हादेई’लाही उपस्थितांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. येत्या काही दिवसांत नौदलातील चार महिलांचा चमू याच म्हादेईवरून विश्वपरिक्रमेस निघणार असून हा चमू मुंबईहून म्हादेईतून प्रवास करीत विशाखापट्टणमला दाखल झाला होता. देशी-विदेशी युद्धनौका आल्यानंतर त्यांची माहिती ध्वनिक्षेपकावरून दिली जात होती. राष्ट्रपतींची युद्धनौका समोर आल्यानंतर समोरच्या युद्धनौकेवरील अधिकारी व नौसैनिक त्यांच्या हातातील टोपी समोर धरून त्यांना मानवंदना देत होते. भारतीय युद्धनौकांवरील नौसैनिकांनी राष्ट्रपती की जय असा जयघोषही केला.

किलो व सिंधुघोष वर्गातील पाणबुडय़ांनी दिलेल्या सलामीनंतर या संचलन सोहळ्याचे समापन झाले. पण त्या अगोदर काही मिनिटे नौदलातील हेलिकॉप्टर्स आणि मिग-२९ के व हॉक या लढाऊ  विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. स्वदेशी जैवइंधनावर चालणाऱ्या अतिवेगवान गस्ती व अटकाव नौकांनी तर राष्ट्रध्वजातील तिन्ही रंगांचा वापर धुराच्या माध्यमातून करीत सोहळ्याला एक आगळी दृश्य किनार प्राप्त करून दिली.

राष्ट्रपतींकडूनही शिक्कामोर्तब

जगभरातील एकूणच राजकारण व अर्थकारण पाहता नव्याने उभ्या ठाकलेल्या अपारंपरिक सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वच नौदलांनी त्यांचा मोहरा ‘सहकार्याच्या माध्यमातून सागरी सुरक्षेकडे’ वळविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन करून राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ‘महासागरातून एकात्मता’ या भारताच्या बदललेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करीत त्याचे समर्थन केले. ते म्हणाले की, एकूणच बदललेल्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी भारतीय नौदलानेही त्यांच्या धोरणात्मक भूमिकेमध्ये बदल केला आहे, एवढेच नव्हे तर सागरी स्थैर्यासाठी भारत निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असा विश्वास आपल्या कृतीतून जगाला दिला आहे. हिंदी महासागरातील सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे आणि हिंदी महासागरातील भारताचे महत्त्वही अनन्यसाधारणच आहे.
विनायक परब
response.lokprabha@expressindia.com, twitter – @vinayakparab