विजय दिवाण – response.lokprabha@expressindia.com
पर्यटन विशेष – भव्य दिव्य वास्तू

रोममधील कोलोशियमची प्राचीन वास्तू जगभरच्या पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. क्रीडागृह म्हणून इसवी सनाच्या पहिल्या शतकात बांधल्या गेलेल्या या वास्तूने आजवर अनेक स्थित्यंतरं पाहिली.

या जगात इसवी सनाची सुरुवात झाली, तेव्हा त्याच्या पहिल्याच शतकात इटलीच्या रोम शहरात विराट असे एक क्रीडागृह बांधले गेले. लंबवर्तुळाकार अशा या अतिप्रचंड क्रीडागृहात एकाच वेळी सुमारे ८० हजार प्रेक्षकांना बसण्याची सोय होती. इसवी सनाच्या ७२ व्या साली तत्कालीन रोमन सम्राट व्हेसपॅशियन याने या क्रीडागृहाचे बांधकाम सुरू केले. हे काम सलग आठ वष्रे चालले. नंतर व्हेसपॅशियनचा पुत्र टायटस् हा सम्राट बनला. त्याने इ.स. ८० मध्ये हे बांधकाम पूर्णत्वास नेले. पुढे इ.स. ९० ते ९६ या काळात टायटस् याचा पुत्र डोमिशियन् हा सत्तेवर आला. त्याने या विराट क्रीडागृहाच्या रचनेत अनेक सुधारणा केल्या. तत्कालीन रोममधील हे तीनही सम्राट तिथल्या फ्लेव्हियन् घराण्याचे वारस होते. त्यामुळे या विराट क्रीडागृहाला लोक ‘‘फ्लेव्हियन् अ‍ॅम्फिथिएटर’’असे म्हणू लागले. पुढे त्याचे नामकरण ‘कोलोशियम’ असेही झाले. या प्रचंड मोठय़ा क्रीडागृहाच्या आत मध्यभागी एक विस्तीर्ण असे लंबवर्तुळाकार िरगण होते. त्या आखाडय़ात रोमन सन्याने भूतकाळांत लढलेल्या निरनिराळ्या युद्धांची प्रात्यक्षिके आम प्रजेला दाखवली जात. रोमनांनी ख्रिस्तपूर्व काळापासून लढलेल्या व्हिएण्टाईन, आलिया, सॅमनाईट, पायऱ्हिक, प्यूनिकया युद्धांतील चित्तथरारक लढाया त्या िरगणात लोकांसमोर पुन्हा लढून दाखवल्या जात. त्याशिवाय त्या िरगणात शक्तिमान तलवारबहाद्दर योद्धय़ांची (ग्लॅडिएटर्स) द्वंद्वयुद्धे, अश्वरथांच्या शर्यती, िहस्र प्राण्यांच्या शिकारी, सिंह आणि माणूस यांचे सामने, गुन्हेगारांना दिलेल्या मृत्युदंडांची सार्वजनिक अंमलबजावणी, राजद्रोह्यंचे शिरच्छेद अशा थरारक गोष्टी आम जनतेसमोर घडवून आणल्या जात. रोमन साम्राज्य अस्ताला गेल्यानंतरही इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत उपरोक्त कारणांसाठीच या प्रेक्षागृहाचा वापर केला जात असे. त्यानंतरच्या काळात मात्र या ऐतिहासिक इमारतीचा उपयोग केवळ सभा-संमेलनांसाठी, धार्मिक कार्यक्रमांसाठी, तात्पुरत्या निवासासाठी केला जाऊ लागला.

रोममधील फ्लेव्हियन घराण्याच्या तीन सम्राटांनी बांधलेली क्रीडागृहाची ही जुनी इमारत प्राचीन काळात ‘फ्लेव्हियन् अ‍ॅम्फिथिएटर’ म्हणवली जात असताना आजच्या जगात तिला ‘कोलोशियम’ हे नाव का पडले, हा प्रश्न साहजिकच मनात येतो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात इ. स. ३७ ते ६८ या काळात ‘नीरो’ नावाचा राजा रोममध्ये राज्य करीत असे. त्याचा राज्यकारभार अत्यंत बेजबाबदार आणि भोंगळपणे चालत असे. त्याने स्वत:चा ९८ फूट उंचीचा एक भव्य पुतळा रोम शहरात राजवाडय़ाच्या विशाल प्रांगणात उभा केला होता. नीरोला सूर्यदेवाचा अवतार मानणाऱ्या त्याच्या मोजक्या अनुयायांनी पुढे चालून त्या पुतळ्याच्या माथ्यावर सूर्यकिरणांच्या आकाराचा एक मुकुट चढवला. ते लोक आपल्या राजाच्या त्या भव्य पुतळ्याला ‘कोलोसस्’ म्हणत. कोलोसस् म्हणजे ‘अतिभव्य असा, अगाध सामर्थ्यांचा’ पुतळा होय. काही काळानंतर हा नीरोचा ‘कोलोसस्’ पुतळा त्याच्या मूळच्या जागेवरून हलवून फ्लेव्हियन् अ‍ॅम्फिथिएटरनजीक उभा केला गेला. महाकाय अशा त्या पुतळ्याच्या सान्निध्यामुळे शेजारच्या फ्लेव्हियन् अ‍ॅम्फिथिएटरला रोमन लोक ‘कोलोशियम’ असे म्हणू लागले. नीरोचा पुतळा अविनाशी आहे अशी समजूत त्या काळी रोममध्ये प्रचलित होती. इसवी सनाच्या आठव्या शतकात सेंट बेड्नामक एका ख्रिस्ती धर्मगुरूने असे भाकीत केलेले होते, की ‘सम्राट नीरोचा पुतळा जोवर उभा आहे, तोवर रोम शहर उभे असेल; पुतळा पडेल तेव्हा रोम शहरही आपोआप नष्ट होईल, आणि मग तो साऱ्या जगाचाच नाश ठरेल.’’ नंतर काही वर्षांनी नीरोचा तो पुतळा खरोखरच पडला. म्हणजे त्यातील धातूंचा पुनर्वापर करण्यासाठी तो खाली पाडला गेला. पण त्या धर्मगुरूने केलेले भाकीत खोटे ठरले. पुतळा पाडल्यामुळे रोम शहरावर कोणतेही गंडांतर ओढवले नाही. मात्र तेव्हापासून फ्लेव्हियन् अ‍ॅम्फिथिएटरचे नामांतर होऊन लोकांनी त्यास ‘कोलोशियम’ असे संबोधण्यास सुरुवात केली.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात ७० आणि ८० साली रोममध्ये ज्यू लोकांनी रोमन सत्तेविरुद्ध बंड करून रोमनांशी दोन मोठी युद्धे केली. त्या युद्धांत हजारो रोमन सनिकांचा बळी गेला. त्यानंतर रोमन सन्याने ज्यू लोकांच्या जेरुसलेम शहरावर हल्ला केला. अनेक रोमन सरदारांनी त्या शहरातील संस्था, मंदिरे आणि वसाहतींमधून बरीचशी संपत्ती लुटून आपल्यासोबत नेली. तेव्हा रोमन सम्राट व्हेसपॅशियन याने असा आदेश दिला, की त्याच्या सर्व सरदारांनी लुटून आणलेल्या संपत्तीचा विनियोग युद्धस्थळी ‘कोलोशियम’ क्रीडागृहाचे बांधकाम करण्यासाठी केला जावा. युद्धात पकडलेल्या लाखो ज्यू सनिकांना गुलाम बनवून रोम शहरात आणले गेले, आणि त्यांना कामाला जुंपून ‘कोलोशियम’चे बांधकाम सुरू केले गेले. इटलीतील तिव्होली शहरानजीक असणाऱ्या खाणीतून दगड काढून, ते ढकलगाडीवरून २० मल वाहून रोम शहरात नेले गेले. तिथे ते दगड तासले गेले, आणि मग अभियंते, वास्तूशास्त्रज्ञ, गवंडी, कारागीर, सुतार, रंगारी इत्यादींना कामाला लावून कोलोशियमचे बांधकाम सुरू केले गेले. सम्राट व्हेसपॅशियन् याने इ.स. ७२-७३ मध्ये सुरू करवलेले हे बांधकाम त्याच्या मृत्यूपर्यंत तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. इ.स. ७९ मध्ये व्हेसपॅशियन् मरण पावला. त्यानंतर इ.स. ७९-८० मध्ये त्याचा मुलगा सम्राट टायटस् याने कोलोशियमचे बांधकाम पूर्ण केले. या भव्य इमारतीला ८० अर्धवर्तुळाकार कमानी आणि १६० विशिष्ट महिरपींचे खांब असणारे तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यागणिक खांबांचे आकार आणि सजावट वेगवेगळी आहे. खालच्या मजल्यावर डोरिक पद्धतीचे खांब आहेत, दुसऱ्या मजल्यावर आयोनिक पद्धतीचे खांब आहेत, तर तिसऱ्या मजल्यावरील खांब हे कॉरिन्थियन धर्तीचे आहेत. क्रीडागृहाच्या उद्घाटनानिमित्त झालेली पहिली खेळस्पर्धा इ.स. ८०-८१ मध्ये पार पडली. ग्रीको-रोमन इतिहासाचा अभ्यासक दिओकॅशियस् याने असे नमूद केलेले आहे की त्या पहिल्या खेळस्पध्रेत शिकारीच्या खेळांसाठी िरगणात आणल्या गेलेल्या िहस्र प्राण्यांपकी सुमारे नऊ हजार प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागले होते! पहिल्या खेळस्पर्धाच्या निमित्ताने रोममध्ये नवी चलनी नाणीही प्रसृत केली गेली होती. त्यानंतरच्या काळात सम्राट व्हेसपॅशियन् याचा नातू डोमिशियन् याने या क्रीडागृहाच्या खाली कप्प्या-कप्प्यांचे एक मोठे तळघर बांधून गुलामांच्या, आणि खेळांसाठी आणलेल्या िहस्र प्राण्यांच्या निवासाची सोय केली. नाना प्रकारचे क्रीडासाहित्य ठेवण्याची व्यवस्थाही त्या तळघरात होती. पुढे इ.स. २१७ मध्ये या कोलोशियम इमारतीला आग लागून त्यांतील लाकडी भाग जळून नष्ट झाले. त्यानंतरच्या काळातही वीज पडणे, िभत कोसळणे, इत्यादी कारणांमुळे इमारतीचे नुकसान होऊन दुरुस्तीची कामे अनेक वेळा करावी लागली. या क्रीडागृहात तलवारबहाद्दर ग्लॅडिएटर्सची युद्धे इ.स. ४३५ पर्यंत होत असत. नंतर ती बंद झाली. इ.स. ४४३ मध्ये एका मोठय़ा भूकंपामुळे या क्रीडागृहाची प्रचंड पडझड झाली होती. त्याची दुरुस्ती थिओडोसियस् (दुसरा) आणि व्हॅलेंटीनियन् (तिसरा) या रोमन सम्राटांच्या काळात केली गेली. या क्रीडांगणात प्राण्यांच्या शिकारींचे खेळ इ.स. ५२३ पर्यंत सुरू होते. नंतर सम्राट थिओडोरिक याच्या काळात ते खेळ आíथकदृष्टय़ा महाग म्हणून बंद केले गेले!

आधुनिक युगात १६ आणि १७ व्या शतकात या कोलोशियम इमारतीवर रोममधील ख्रिश्चन चर्चने अधिकार सांगितला. इ.स.१५८० च्या सुमारास पोप सिक्स्टस् याने रोममधील वेश्यांच्या पुनर्वसनासाठी ही जागा मागितली. पण ती मागणी मान्य झाली नाही. नंतर १६७१ मध्ये ख्रिस्ती धर्मगुरू काíडनल अल्टायरियांनी कोलोशियम िरगणाचा उपयोग माजलेल्या बलांशी झुंज खेळण्यासाठी करावा असे सुचवले. पण लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे ती सूचनाही नाकारली गेली. पुढे १७४९ मध्ये पोप बेनेडिक्ट (चौदावे) यांनी असे मत व्यक्त केले, की कोलोशियमच्या भूमीवर इतिहासात हजारो ख्रिश्चनांचा बळी गेलेला असल्याने ती एक पवित्र ख्रिश्चन भूमी मानली जावी. नंतर १८०७ सालापासून १९३० सालापर्यंत अनेक राज्यप्रमुखांनी त्या इमारतीची आणि आतील िरगणाची डागडुजी-दुरुस्ती सुरू ठेवली होती.

आज रोममधील कोलोशियमची ही प्राचीन वास्तू जगभरच्या पर्यटकांसाठी एक आकर्षण बनलेली आहे. दरवर्षी लक्षावधी पर्यटक तिथे भेटी देतात. पर्यटनासोबतच या कोलोशियमला लोकशिक्षणाच्या क्षेत्रातही आता महत्त्व प्राप्त झालेले आहे. इटलीमध्ये मनुष्यहत्येचा आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा देणे १९४८ साली बंद करण्यात आले. त्यानंतर त्या देशाने देहदंडाच्या शिक्षेविरुद्ध एक मोहीम जगभर सुरू केली. आता कोलोशियम हे त्या मोहिमेचे मध्यवर्ती केंद्र झालेले आहे. कोलोशियमच्या इमारतीसमोर देहदंडाविरुद्ध अनेक तीव्र निदर्शने झालेली आहेत. जगभरात कुठेही एखाद्या कैद्याला दिली गेलेली देहदंडाची शिक्षा रद्द केली गेली, तर त्या दिवशी रोममधील या कोलोशियमच्या इमारतीवर रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या रोषणाईत पांढऱ्या प्रकाशाऐवजी सोनेरी प्रकाश टाकला जातो. या पुरातन क्रीडागृहाच्या मूळ बांधकामाची कालपरत्वे झालेली दुर्दशा लक्षात घेऊन अलीकडे या इमारतीचा वापर सभा-संमेलने, क्रीडा स्पर्धा वगरेंसाठी केला जात नाही. केवळ एक संस्मरणीय वास्तू म्हणून पर्यटकांना बाहेरून दाखवली जाते. इमारतीच्या बाहेरच्या िभतीजवळ ‘इरॉस’ नावाचे एक संग्रहालय स्थापन झालेले आहे. पूर्वी मज्जाव असणारे कोलोशियमचे तळघरही आता पर्यटकांसाठी खुले केले गेलेले आहे. आज रोम शहरातील कोलोशियमची ही इमारत अतिप्राचीन अशा रोमन साम्राज्याचे एक संस्मरणीय प्रतीक म्हणून जगभरच्या पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेली आहे.

कसे जावे? केव्हा जावे?

पश्चिम युरोपच्या भटकंतीत इटलीला भेट देणे योग्य ठरेल. नजीकचा विमानतळ रोम. येथे जाण्यासाठी योग्य कालावधी एप्रिल-मे.

Story img Loader