क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांनी मुसंडी मारणे यात तसे नवीन काहीच नाही. पण गेली काही दशके केवळ पुरुषांचाच आणि पुरुषी खेळ म्हणून मानल्या गेलेल्या क्रीडा प्रकारात उतरून पुरुषांच्या संघात खेळून स्वत: ठसा उमटवणे मात्र क्रीडा क्षेत्रातील िलगसमानता अधोरेखित करते. अलीकडच्या दोन घटना त्याचेच प्रतीक आहेत. यातील एक घटना इंग्लंडमधील तर दुसरी भारतातील आहे. या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील या िलगसमानतेचा ‘टीम लोकप्रभा’ने घेतलेला हा आढावा…
आजची भारतीय स्त्री सरकारी कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत सगळीकडे काम करताना दिसते. पण अजूनही काही क्षेत्रं अशी आहेत, की जिथे महिला जाताना दिसत नाहीत. त्या क्षेत्रात जाणे हे त्यांच्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहणेच ठरते. असेच एक महिलांसाठी ‘नो एन्ट्री’ समजले जाणारे क्षेत्र म्हणजे शरीरसौष्ठव. शरीरसौष्ठव म्हणजे फक्त अंगप्रदर्शन, अशी काही जणांची मानसिकता आहे. त्यामुळे या क्षेत्रात महिलांचा सहभाग तुरळक दिसतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी शरीरसौष्ठव संघटना तयार आहेतच. पण या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलींना घरातून विरोध असेल तर संघटना तरी काय करणार? अर्थात ज्यांचा स्वत:वर, स्वत:च्या गुणवत्तेवर विश्वास असतो, अथक मेहनत करायची तयारी असते, लोकांच्या विरोधात जाऊन अढळ स्थान निर्माण करण्याची जिद्द असते, त्याच महिला अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये जाताना दिसतात, पण त्यांची संख्या फारच कमी. अशांपैकीच एक पण महाराष्ट्रातली एक आहे, श्वेता राठोर. ती चक्क शरीरसौष्ठव या क्षेत्रात उतरली आणि आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत थेट रौप्यपदक पटकावून मायदेशी परतली. त्यामुळेच यापुढच्या काळात लोकांचा या खेळाकडे, खासकरून महिला खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आयकॉन ठरणार आहे श्वेता राठोर.
श्वेता सांगते, मी जेव्हा शरीसौष्ठव स्पर्धासाठी तयारीला सुरुवात केली तेव्हा माझ्या बाबांचा मला विरोध होता, पण आई आणि भावाने मला पाठिंबा दिला. त्यानंतर जेव्हा बाबांनी माझी कामगिरी पाहिली त्यानंतर त्यांनीही मला पाठिंबा दिला.
या चाकोरीबाहेरील क्षेत्रात येण्यामागची भूमिका काहीशी वेगळी असल्याचं जाणवते. ती सांगते की, मी काही शरीरसौष्ठवपटू नाही. माझा या क्षेत्रात येण्याचा उद्देश वेगळाच आहे. मी इंजिनीअर असून माझा व्यवसाय बऱ्यापैकी सुरू आहे. पण भारतामध्ये महिला जिममध्ये फारशा येत नाहीत. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्यायला हवी, त्यासाठी लक्ष द्यायला हवे, हा माझा या क्षेत्रात येण्यामागचा मुख्य उद्देश होता.
शरीरसौष्ठव स्पर्धाचे वेड जसे जगभरात आहे, तसे आपल्या देशातही. त्यामुळे शरीरसौष्ठव स्पर्धाना प्रचंड गर्दी होते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. काही प्रमाणात महिलाही या क्षेत्रात उतरल्या आहेत. पण एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्यांचा या क्षेत्रात महिलांना पाहून पुरुषी अहंकार दुखावतोच. तोच महिला शरीरसौष्ठवपटूंसाठी सध्याच्या घडीला मोठा अडथळा ठरत आहे. पण या क्षेत्रात चॅम्पियन होण्यासाठी जसे शरीर घडवावे लागते, तशीच तुमची मानसिकताही, असं सांगणाऱ्या श्वेताने उझबेकिस्तान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत फिटनेस आणि फिजिक गटामध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली. अशी नेत्रदीपक कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली.
या क्षेत्रातील इतर देशांमधील मानसिकता मांडताना श्वेता सांगते की, सुंदर चेहरा आणि चांगली शरीरसंपदा असलेली प्रत्येक व्यक्ती हिरो किंवा हिरोईन होऊ शकत नाही. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की, परदेशामध्ये जेवढा मान हिरो किंवा हिरोईन यांना मिळत नाही, त्यापेक्षा अधिक मान आणि ग्लॅमर फिटनेस सेलिब्रेटींना मिळते. भारतामध्ये याची फार जणांना कल्पना नाही. त्यामुळे ही गोष्ट मला भारतामध्ये रुजवायची आहे आणि नविन पिढीला मार्गदर्शनही करायचे आहे. फिटनेस सेलिब्रेटीदेखील या समाजासाठी आदर्श असू शकतात, हे मला दाखवून द्यायचे आहे. त्यासाठीच माझी ही धडपड सुरू आहे आणि त्यामध्ये मी यशस्वी होईनच.’
श्वेताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा आलेख उंचावत असून तिला आता विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक खुणावते आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिला कांस्यपदक मिळाले होते, पण यावेळी दमदार तयारीसह ती मैदानात उतरणार असून यावेळी सुवर्णपदक पटकावण्याचा तिचा निर्धार आहे.
एकीकडे आपल्याकडे स्त्री म्हणजे शक्ती, असे म्हटलेही जाते. पण जेव्हा हीच स्त्री आपल्यामधील शक्ती, फिटनेस आणि सुंदरता यांचा मिलाप करून शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरते, तेव्हा मात्र काही जणांकडून नाकं मुरडली जातात. एकीकडे फक्त शब्दांमधून महिलांबद्दल आदर व्यक्त करायचा, पण वागणूक देताना मात्र दुटप्पी धोरण अवलंबले जाते. विचार आणि कृती यांच्यामध्ये मात्र सुसूत्रता दिसत नाही आणि त्यामुळेच शरीरसौष्ठव स्पर्धामध्ये महिलांची संख्या कमी दिसते. यामध्ये पहिला बदल मानसिकतेत घडायला हवा. महिलांना या क्षेत्रात यायचे असेल तर त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्याची गरज आहे.
प्रत्येक वेळी शरीरसौष्ठव स्पर्धेत सादरीकरण करताना श्वेता एखादी भूमिका निवडते. आशियाई स्पर्धेत तीने व्हॅॅम्पायरचा ‘लुक’ केला होता. यावेळी साऱ्यांच्याच नजरा तिच्या कामगिरीवर खिळल्या होत्या.
प्रत्येक वेळी नवीन पात्रांसह स्पर्धेत उतरणे ही श्वेताची खासियत आहे. या स्पर्धेत ती एक एकमेव भारतीय महिला शरीरसौष्ठवपटू होती. पण यापुढे ही संख्या वाढायला हवी, असे श्वेताचे अपेक्षा आहे.
जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. विकसित देशांमध्ये काय होते, ते आपल्याला कळते. त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसतो, पण त्यांचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र आपण घेत नाही. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी तर प्रत्येक देशामध्ये राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा होते. त्यामधून काही ठरावीक महिला शरीरसौष्ठवपटू स्पर्धेसाठी निवडल्या जातात. भारतात निवड चाचणी स्पर्धेसाठी येणाऱ्या महिला शरीरसौष्ठवपटूंची संख्याच कमी असते. त्यामुळे जेवढय़ा महिला शरीरसौष्ठवपटू असतात त्यांची थेट निवड केली जाते. जेव्हा या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढेल तेव्हाच सशक्त स्पर्धाही वाढेल. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिनिधित्वाचा दर्जाही वाढेल.
फिटनेसच्या बाबतीत आपल्याकडे जागरुकता नसल्याचे नमूद करताना ती सांगते ‘‘आपल्याकडे स्पोर्ट्स फिटनेसमध्ये चेहराच नाही. प्रत्येक खेळामध्ये आपली कामगिरी उंचावत चालली आहे. तशीच कामगिरी माझ्याकडूनही व्हावी आणि देशाचे नाव उंचवावे, अशीच माझी इच्छा आहे. त्यासाठी सराव आणि मेहनतीमध्ये कुठेही कसर ठेवलेली नाही. ’’
भारतामध्ये सध्याच्या घडीला महिला शरीरसौष्ठवपटूंची संख्या फारच तुरळक आहे. शरीरसौष्ठव म्हणजे फक्त अंगप्रदर्शन असा काही जणांचा समज आहे. पण याकडे खेळ म्हणून पाहायला हवे. श्वेताने पुढाकार घेऊन लोकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
फिटनेस आणि फिजिक ही स्पर्धा कशी असते?
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुख्यत्वेकरून ही स्पर्धा भरवण्यात येते. या विभागात दोन फेऱ्या असतात. पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला ९० सेकंदांचा अवधी दिला जातो. तुम्ही कशा आहात आणि तुम्ही स्वत:ला सादर कसे करता याची कसोटी यामध्ये लागते. त्यामध्ये तुमचे शरीर किती लवचीक आहे, तुमच्यामध्ये ताकद, लय, फिटनेस किती आहे, हे पाहिले जाते. त्याचबरोबर तुम्ही कशा दिसता, तुमचा वावर, तुमचे नृत्य, तुमची नृत्य संरचना, नृत्य कल्पना कशी आहे हेदेखील पाहिले जाते.
दुसऱ्या फेरीमध्ये तुमच्या शरीराचे मूल्यमापन केले जाते. शरीराची घडवणूक कशी केली आहे, त्यामध्ये किती लवचीकता आहे, हे पाहिले जाते. त्याचबरोबर तुमच्या फिटनेसचीही इथे कसोटी लागते. तुमचे शरीर किती फिट आणि टोन आहे, हे पाहिले जाते. शरीर फक्त कमावून चालत नाही, त्याला चांगला आकार द्यावा लागतो. तुमचे शरीर हे यांत्रिक वाटू नये, याचीही काळजी घ्यावी लागते.
श्वेताचा अकादमीचा निर्धार
या क्षेत्रामध्ये नवीन पिढीने यावे, यासाठी श्वेता अकादमीची उभारणी करणार आहे. यामध्ये खेळाडूंना ‘बॉडी सायन्स’ विषयी माहिती देण्यात येईल. काय केल्यावर तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते, त्यानुसार काय करायला हवे आणि काय नाही, याबाबत मार्गदर्शन केले जाईल. फिटनेस चांगला राखण्यासाठी आहारही महत्त्वाचा असतो. त्यामुळे आहारविषयक माहितीही या अकादमीमध्ये देण्यात येणार आहे. शरीराबरोबरच मानसिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या क्षेत्रात नेमके काय करायला हवे, स्पर्धेदरम्यान स्वत:चे शरीर आणि मानसिकता कशी जपायला हवी, याचबरोबर कोणत्या प्रोटीन पावडर्स घ्यायला हव्यात, याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रसाद लाड – response.lokprabha@expressindia.com