क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांनी मुसंडी मारणे यात तसे नवीन काहीच नाही. पण गेली काही दशके केवळ पुरुषांचाच आणि पुरुषी  खेळ म्हणून  मानल्या गेलेल्या क्रीडा प्रकारात उतरून पुरुषांच्या संघात खेळून स्वत: ठसा उमटवणे मात्र क्रीडा क्षेत्रातील िलगसमानता अधोरेखित करते. अलीकडच्या दोन घटना त्याचेच प्रतीक आहेत. यातील एक घटना इंग्लंडमधील तर दुसरी भारतातील आहे. या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील या िलगसमानतेचा ‘टीम लोकप्रभा’ने घेतलेला हा आढावा…

बॉक्सिंग हा मुळातच रांगडा क्रीडा प्रकार. त्यात भारतात पुरुष गटातच बॉक्सिंग खेळाडूंची संख्या अल्प आहे, तर महिला कुठून असणार. पण आता भारताची सुपरमॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरी कोमने या गैरसमजांना छेद देत बॉक्सिंगमध्ये महिला करिअर करू शकतात हे दाखवून दिले आहे.  सलग पाच वेळा विश्वविजेतेपद व ऑलिम्पिक कांस्यपदक ही तिची कामगिरी जगातील सर्वच महिला क्रीडापटूंसाठी आदर्श ठरली आहे.

पूर्वाचल या परिसरात मेरीची कारकीर्द घडली. आईवडिलांबरोबर शेतात काम करणाऱ्या मेरीच्या मनात  आपल्या राज्यातील अनेक जण बॉक्सिंगमध्ये चमक दाखवितात हे पाहून बॉक्सिंगबद्दल कुतुहल जागे झाले. सुरुवातीला तिला घरातून या खेळासाठी विरोध झाला. मात्र मेरी ही अतिशय जिद्दी होती. त्यातच तिच्या परिसरातील दिंग्कोसिंगने जागतिक स्तरावर बॉक्सिंगमध्ये चमकदार यश मिळविल्यानंतर सतत तिला बॉक्सिंग क्षेत्र खुणावतच होते. तिने घरचा विरोध पत्करून नरजितसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली २००० मध्ये या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी या खेळात फारशा भारतीय महिला नसल्यामुळे तिला अन्य पुरुष खेळाडूंसमवेतच सराव करावा लागत असे. किंबहुना अजूनही ती पुरुष खेळाडूंसमवेतच सराव करते. २००० मध्ये या खेळात करिअर सुरू केल्यानंतर अवघ्या एक वर्षांतच तिने हौशी गटाच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. पहिलेच जागतिक विजेतेपद हे नशिबाच्या जोरावर मिळालेले यश नाही हे सिद्ध करीत पुन्हा २००२ मध्ये तिने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.

एकीकडे तिची कारकीर्द सुरू असतानाच तिचा मित्र कारुंग ऑनखोलर याने लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. सुरुवातीला हा प्रस्ताव नाकारणाऱ्या मेरीने नंतर त्याच्याशी लग्न केले.  विवाहानंतर लगेच तिला जुळी मुले झाली. संसारात पडल्यानंतरही बॉक्सिंगची रिंग तिला खुणावत होती. २००३ ते २००५ या कालावधीत बॉक्सिंगमधून ब्रेक घेतल्यानंतर तिने पुन्हा सरावास सुरुवात केली. २००५ मध्ये तिने पुन्हा आशियाई स्पर्धेत अव्वल यश मिळविले व पाठोपाठ जागतिक विजेतेपदावरही आपले नाव कोरले. ते आणखी तीन वर्षे टिकविले.

मेरीने २००१ पासून जागतिक स्तरावर आपली हुकमत गाजविली असली तरी २०१२ पर्यंत ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या बॉक्सिंगचा समावेश नव्हता. अन्यथा आतापर्यंत तीन ऑलिम्पिक पदके तिच्या नावावर झाली असती. २०१२ मध्ये महिला बॉक्सरकरिता ऑलिम्पिकची दारे खुली झाली. मेरीच्या आनंदास पारावार उरला नाही. या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे स्वप्न तिला दिसत होते. एरवी ती ४८ किलो गटात भाग घेत असे. ऑलिम्पिकमध्ये ४८ किलो गटच नव्हता. त्याऐवजी ५१ किलो गटात तिला खेळावे लागणार होते. या गटात जागतिक स्तरावर हुकमत गाजविणाऱ्या अनेक परदेशी खेळाडूंचे आव्हान तिच्यासमोर होते. कितीही कष्ट पडले तरी हे पदक मिळवायचेच या दृष्टीने तिने सराव सुरू केला. छोटय़ा मुलांजवळ राहिले तर आपल्या सरावात अनेक अडचणी येतील म्हणून तिने इंफाळऐवजी तेथून हजारो मैल दूर असलेल्या पुणे शहराची सरावाकरिता निवड केली. चार्ल्स अ‍ॅटकिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज दहा तास ती सराव करीत असे. सरावापासून आपले लक्ष विचलित होऊ नये म्हणून ती पंधरा दिवसांतून एकदाच आपल्या मुलांशी फोनवरून बोलत असे. घरची आघाडी तिचा पती ऑनखोलर सांभाळत असल्यामुळे तिला कशाचीच काळजी वाटत नसे. तिच्या मुलांकरिता तोच आईबाप अशी दोन्ही भूमिका यशस्वीरित्या पार पाडत होता आणि अजूनही पार पाडत असतो. काळजावर दगड ठेवून मन घट्ट करीत मेरी हिने ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आणि त्यामुळेच भारतास बॉक्सिंगमधील पहिली पदक विजेती महिला खेळाडू लाभली.

ऑलिम्पिक पदक मिळविल्यानंतर मेरीवर बक्षिसांची खैरात झाली. अकादमीसाठी तिला जागा व पैसा मिळाला. तिच्या जीवनावर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला. तिच्या जागी अन्य कोणी असते तर त्या व्यक्तीने खेळातून निवृत्ती घेतली असती. पण मेरीने आपली ऑलिम्पिक पदकाची भूक संपलेली नाही हे सांगत तिने पुन्हा सरावास प्रारंभ केला आहे. आपल्या घरापासून व बछडय़ांपासून हजारो मैल दूर ती सराव करीत आहे. आता ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न तिला आव्हान देत आहे.

मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader