प्रत्येक घराचा ठरलेला सोनार आणि त्याच्याकडेच होणारी सोन्याची खरेदी ही परिस्थिती केव्हाच बदलली आणि सोन्याच्या ब्रॅण्डेड दागिन्यांना महत्त्व आलं. आता या ट्रेण्डवर ऑनलाइन सोने खरेदीने कुरघोडी केली आहे.
काही गोष्टी प्रत्येक समाजात अत्यंत पारंपरिक पद्धतीने केल्या जातात; मग त्या धार्मिक असोत, खासगी असोत, सार्वजनिक असोत की अन्य कोणत्याही. त्यात बराचसा भाग सामाजिक व्यवहाराचा असतो, पण बाजाराधारित व्यवहारात पारंपरिकतेपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य असते. सोनेखरेदी हादेखील बाजार व्यवहाराचा भाग. पैसे द्यायचे आणि माल खरेदी करायचा, पण येथे त्याबरोबरच एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे विश्वास आणि या विश्वासावरच अनेक पिढय़ा आणि पेढय़ा वाढल्या, नावारूपाला आल्या. फॅमिली डॉक्टर असायचा अगदी तसेच सोनारदेखील असायचा, पण नोकरी-व्यवसायाच्या संधी बदलत, वाढत गेल्या, स्थलांतर वाढले, नवनवी शहरे विकसित होत गेली तसतसे या एकूणच पारंपरिकतेपेक्षा बाजाराधारित व्यवस्थेत अनेक घटक येत गेले. जागतिकीकरणामुळे नवश्रीमंतांचा वर्ग वाढत गेला. खरेदी क्षमता वाढू लागली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वामध्ये तरुणाईचा सहभाग वाढला. (आज आपल्या देशात १८ ते २५ वयोगटाची संख्या ११.७८ टक्के आहे.) लोक खरेदीला नाही तर शॉपिंगला जाऊ लागले. या वर्गाच्या खरेदीमध्ये पारंपरिक व्यापाऱ्यापेक्षा ब्रॅण्डला महत्त्व मिळू लागले.
सोने-चांदी-हिऱ्याच्या दागिने खरेदीमध्ये इतकी वर्षे पारंपरिकतेची एक प्रकारची मक्तेदारी मोडली जाण्याच्या बदलाची खरी नांदी म्हणावी लागेल. पेढीवरचा व्यवहार चकाचक शोरूममध्ये आला आणि पुढे जात साखळी शोरूममध्ये परावर्तित झाला. आज राज्याच्याच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वच पिढीजात पेढय़ांनी हे ब्रॅण्डिंगचे सूत्र यशस्वीपणे हाताळायला सुरुवात केली आहे. कधी एखाद्या सेलेब्रिटीच्या माध्यमातून, तर कधी आपल्या दागिन्यांच्या गुणवत्तेनुसार ब्रॅण्डिंगची गणिते मांडली जातात, पण एक मात्र निश्चित की, गिऱ्हाईकाने आपणहून आपल्या दुकानापर्यंत यावे यापेक्षा आपणच गिऱ्हाईकांपर्यंत कसे जाता येईल याची जाणीव या क्षेत्राला ब्रॅण्डिंग आणि जाहिरातींनी करून दिली. यामध्ये अर्थातच लहान सोने व्यापाऱ्यांना नाही म्हटले तरी काही प्रमाणात फटका बसला, पण ज्यांनी बाजाराची ही नीती स्वीकारली त्यांना त्याचा नक्कीच फायदा झाल्याचे दिसून येते.
याच अनुषंगाने पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ सांगतात की, हा बदल आज सर्वच क्षेत्रांत होताना दिसतो आहे. अगदी बेकरीसारख्या खाद्यपदार्थामध्येदेखील बॅ्रण्डिंग, जाहिरातींचा प्रभाव आहे. सोन्याच्या बाबतीत सांगायचे, तर पूर्वी प्रमाणीकरणाचा अभाव होता. आज हॉलमार्कसारख्या अनेक बाबींमुळे हा सारा व्यवहार पारदर्शक झाला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे डिझाईन चांगले असेल, दर योग्य असेल, त्याकडे दागिने घेण्याची आपली तयारी असते आणि आमच्याकडे हे सर्व आहे हे सांगण्यासाठी, जे ग्राहक आम्हाला ओळखत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जाहिराती, स्कीम या अपरिहार्य असल्याचे ते प्रतिपादन करतात. पु. ना. गाडगीळ ते पीएनजीच्या बदलामागे हाच विचार असल्याचे दिसून येते.
अनेक वेळा बॅ्रण्डिंगसाठी कधी कधी सेलेब्रिटींचा आधारदेखील घेतला जातोय. या संदर्भात लागू बंधू ज्वेलर्सचे दिलीप लागू सांगतात की, साधारण पंधरा वर्षांपूर्वी आम्हाला ब्रॅण्डिंगची गरज भासली, पण त्यासाठी आम्ही सेलेब्रिटी वगैरेचा वापर करण्यापेक्षा दागिन्यांवरच लक्ष केंद्रित केले. आजही बराच व्यवसाय हा कम्युनिटी आधारित आहे, पण ब्रॅण्डिंगचा फायदा आम्हाला निश्चितच होत असल्याचे ते नमूद करतात. शीर्षक प्रायोजकत्वासारखे प्रयोग हे फारसे फायदेशीर नसतात, पण त्यामुळे चर्चा नक्कीच होते, हे ते आवर्जून नमूद करतात.
ब्रॅण्डिंगची गरज आणि अपरिहार्यता मांडताना वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आदित्य पेठे सांगतात की, पूर्वी ग्राहक आणि व्यापारी यांच्यामधला जो थेट संपर्क होता तसा आज कायम राहणे अशक्य आहे. आमचे आजोब गिरगावातल्या पेढीवर बसायचे. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाशी त्यांचा संपर्क असायचा. आज वाढत्या शाखांचा विचार केला, तर हे शक्य नाही. अशा ठिकाणी ब्रॅण्डिंग कामाला येते. प्रमाणीकरणाचा लाभ होतो. आज जाहिरातींचा परिणाम सर्वच क्षेत्रांत दिसून येतो. माणूस शूज घ्यायला बाहेर पडतानादेखील मनात काहीएक ठरवूनच जातो. दागिन्यांच्या बाबतीतदेखील हेच लागू होते. अर्थात ब्रॅण्डिंग आणि जाहिरातींना जोडूनच विविध स्कीम्स हादेखील महत्त्वाचा पैलू असल्याचे चिंतामणी ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मुरुडकर सांगतात. त्या माध्यमातून तुमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वर्दळ वाढते. तुम्ही जर प्रमाणीकरणाबाबत दक्ष असाल, तर मग ग्राहक पुढेदेखील तुमच्याकडे यामुळे येण्यास मदत होते.
थोडक्यात काय, एके काळच्या पिढीजात विश्वासाची जागा आज या बॅ्रण्डिंग नामक बाजारपेठीय घटकाने घेतली आहे आणि हीच आज प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या ऑनलाइन शॉपिंगची मजबूत पायाभरणीच म्हणावी लागेल, कारण ज्याचे ब्रॅण्डिंग त्याचीच ओळख आणि ज्याची ओळख त्यावरच विश्वास आणि ज्याच्यावर विश्वास त्यालाच कोणत्याही मार्केटमध्ये लाभ मिळणार. ऑनलाइन मार्केटदेखील त्याला अपवाद नाही.
गेली अनेक वर्षे ऑनलाइन दागिने खरेदीची सुविधा पीएनजी ज्वेलर्स देत आहे. यासंदर्भात सौरभ गाडगीळ सांगतात की, आज आम्हाला त्यातून खूपच सकारात्मक प्रतिसाद आहे. ऑनलाइन हे एकप्रकारे मार्केटिंगसारखंच आहे. पोर्टलवरून दागिने पाहून निवडून खरेदीसाठी येणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय असल्याचे ते नमूद करतात.
ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेण्ड लोकप्रिय आहे का, त्याला प्रतिसाद कसा आहे याबद्दल लागू बंधू ज्वेलर्सचे दीलिप लागू सांगतात की आज ऑनलाइन मार्केटमध्ये दागिन्यांचा शिरकाव झाला आहे. आम्हीदेखील अॅमेझॉनशी टाय-अप केलं आहे. आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण सध्या तरी ऑनलाइन शॉपिंगमध्ये पंचवीस तीस हजार रुपयांच्या दागिन्यांना अधिक उठाव असल्याचे आणि सोने खरेदीचा हा प्रकार लोकप्रिय व्हायला मात्र अजून वेळ लागेल असे ते नमूद करतात. वामन हरी पेठे यांनी स्वत:च्या पोर्टलवरून खरेदीची सुविधा तर दिली आहेच, पण त्यांनी अॅमेझॉनशीदेखील टाय-अप केलं आहे. सोन्याच्या दागिन्यांबाबतीत टच आणि फिलचा प्रभाव असला तरीदेखील ऑनलाइन मार्केटला चांगला प्रतिसाद असल्याचे आदित्य पेठे नमूद करतात. आज जरी ही सुविधा आम्ही देत नसलो तरी नव्या पिढीचा ऑनलाइनकडे वाढता कल पाहता भविष्यात दागिन्यांसाठी हा ट्रेंड जोर पकडण्याची शक्यता असल्याची शक्यता चिंतामणी ज्वेलर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक मुरुडकर सांगतात.
थोडक्यात काय तर आज दागिन्यांच्या बाजारात ऑनलाइनने चंचुप्रवेश नक्कीच केला आहे. एकंदरीत देशातील दागिन्यांच्या बाजारपेठेतील या बदलावर प्रकाश टाकताना जेम्स अॅण्ड ज्वेलरी फेडरेशनचे संचालक, अशोक मीनावाला सांगतात, ‘‘ऑनलाइन बाजारपेठ आता चांगलीच खुली होत आहे. काही ब्रॅण्ड चांगला व्यवसाय करत आहेत. जसे कॉर्पोरेट हाऊसचे दागिन्यांतील पदार्पण स्वीकारलं तसेच लोक ऑनलाइन दागिने खरेदीला स्वीकारत आहेत. आणि ऑनलाइन दागिने खरेदी हे या व्यवसायचं भविष्य असणार आहे.’’
एकेकाळच्या पिढीजात विश्वासावर ब्रॅण्डिंगने कुरघोडी केल्याचे बाजारपेठेने सिद्ध केलेच आहे. आज त्याच ब्रॅण्डिंगच्या जोरावर ऑनलाइन बाजारपेठेचे हे नवे क्षितिज सर्वानाच खुणावत आहे. तर दुसरीकडे अनेक कॉर्पोरेट हाऊसेस सोन्याच्या दागिन्यांच्या क्षेत्रात उतरताना थेटपणे ब्रॅण्डिंगचा आधार घेताना दिसतात. तनिष्क, रिलायन्स ही काही उदाहरणं देता येतील. त्यांच्या व्यवस्थेत ऑनलाइन सुरुवातीपासूनच आहे. तर ऑनलाईन फंडा जोपासलेल्या पिढीजात व्यापाऱ्यांनादेखील याचा लाभ होत आहे. पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ सांगतात, ‘‘आमची ऑनलाईनची उलाढाल वर्षांला दहा कोटी आहे. त्यामध्ये ७० टक्के चोख सोनं तर ३० टक्के दागिन्यांचा समावेश आहे.’’
दुसरीकडे कॅरटलेन संपूर्ण विक्री ऑनलाईन पद्धतीने करते. २००८ मध्ये सुरू झालेल्या या पोर्टलचे आज दहा हजारांहून अधिक ग्राहक असल्याचा दावा आहे. या पोर्टलचा नोंद घेण्याजोगा पैलू म्हणजे त्याचे यूथ सेंट्रिक असणे. आजच्या पिढीला दागिन्यांची आवड आहेच. पण त्यांचा भर कमी वजनाचे, आकर्षक आणि रोजच्या वापरात कार्यालयीन कामकाजात सहजपणे सूट होतील असे दागिने वापरण्याकडे आहे. आणि या पोर्टलवरून अशाच दागिन्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होताना दिसते.
येथेच भविष्यातील बाजारपेठेचे संकेत मिळतात. एका सर्वेक्षणानुसार देशात तब्बल २०५ दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यापैकी महिलांची संख्या ३९ टक्के इतकी आहे. आणि एकूणच इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये २५ पेक्षा कमी वयोगटाची संख्या ५० टक्क्य़ांहून अधिक आहे. आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये ५० टक्के वापरकर्ते हे २५-३५ या वयोगटातील आहेत. उद्या हीच पिढी जेव्हा खरेदीक्षम होईल त्यांची खरेदी क्षमता वाढेल तेव्हा त्यांचा ओढा ऑनलाइन पोर्टल्सकडे असणार आहे. तेव्हा या मार्केटमध्ये उपस्थिती नसणं हे कोणालाच परवडणार नाही.
हिऱ्यांना वाढता प्रतिसाद
आपल्याकडे सोन्याला पूर्वीपासूनच प्रचंड महत्त्व मिळाले असल्यामुळे, दागिन्यांचे इतर पर्याय वापरण्याचे प्रमाण तुलनेने कमीच राहिले आहे, तर दुसरीकडे हिऱ्यांच्या जागतिक बाजारपेठेत भारतीय बाजारपेठेचे महत्त्व खूप मोठे आहे. हिऱ्यांना पैलू पाडणे आणि त्यांची निर्यात करणे या व्यवसायात आपण सर्वात पुढे आहोत; पण या हिऱ्यांना म्हणावा इतका चांगला प्रतिसाद आपल्या बाजारात नसायचा. त्याचे कारण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची आपली मानसिकता; पण आजच्या पिढीत केवळ सोने हाच घटक गुंतवणूक म्हणून पाहिला जात नाही. परिणामी दागिने घेताना या पिढीकडून अन्य पर्याय अवलंबले जातात. कमी वजनाची, पण उंची आणि किमती वस्तू घेण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे सध्या हिऱ्यालादेखील वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हिऱ्यांचा वापर केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मागणीबाबत लागू बंधू ज्वेलर्सचे दिलीप लागू सांगतात, ‘‘कमी वजनाचे आणि किमती दागिने म्हणून हिऱ्याच्या दागिन्यांना सध्या मागणी वाढते आहे. तसेच या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे छोटय़ा छोटय़ा आकारांतील हिऱ्यांची उपलब्धता सुकर झाली आहे. त्याचबरोबर छोटे दागिने घडविणेदेखील तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे.’’ अर्थात या सर्व घटकांमुळे आजकाल विवाहप्रसंगीदेखील सोन्याबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रमाण वाढल्याचे ते नमूद करतात.
डिझायनर्स स्टुडिओ
दागिना आपल्या मनातल्या डिझाइननुसार घडविला जावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. जेव्हा हा पेढीवरचा व्यापार होता तेव्हा हे होतदेखील होते; पण गेल्या काही वर्षांतील प्रमाणीकरण, साखळी दुकाने आणि ब्रॅण्डिंगच्या प्रभावामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. एकच एक ऐवज तयार करण्यासाठी लागणारा वेळ, खर्च करायची कोणाची तयारी नसते. हीच उणीव भरून काढणारे डिझायनर्स स्टुडिओ सध्या या क्षेत्रात प्रभाव टाकत आहेत. अशा प्रकारची सुविधा देणारे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आदित्य पेठे सांगतात की, ‘‘प्रत्येकाला काही तरी वेगळे हवे असते. मनातली कल्पना दागिन्यात उतरावी इतकीच इच्छा असते. खूप मोठी किंमत देऊन आपल्या दागिन्यासारखा अन्य कोणताही दागिना नसावा, अशी भावनादेखील नसते. तेव्हा असे स्टुडिओ महत्त्वाची भूमिका करतात. त्यामुळे आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये दहा हजारांपासून पंचवीस लाखांपर्यंतचे दागिने तयार केले आहेत.’’
टच अॅण्ड फीलला पर्याय
एक रुपयाची कोथिंबीर खरेदी करतानादेखील आपण स्वत: प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय घेत नसतो. मग अशा वेळी सोन्याचे दागिने थेट ऑनलाइन पोर्टलवरून कोण खरेदी करणार, असा एक प्रश्न आपल्याकडे हमखास विचारला जातो; पण आज त्याला काही प्रमाणात तरी छेद मिळाला आहे. दागिना प्रत्यक्ष घालून पाहायला मिळण्याची उणीव ऑनलाइन शॉपिंगमध्ये असते. त्यावर पर्याय म्हणून गेल्या वर्षभरात काही सुविधा आल्या आहेत. आपल्या छायाचित्रावर दागिना लेवून पाहण्याची व्हच्र्युअल सुविधा पीएनजी ज्वेलर्स, कॅरटलेन अशा अनेक वेबसाइट्सवर देण्यात आली आहे. तुम्हाला आवडणारा दागिना नेमका तुम्हाला कसा दिसतो याची साधारण कल्पना या सुविधेमुळे मिळते. त्यामुळेच ही शक्कल खूपच परिणामकारक ठरल्याचे सर्वच व्यावसायिक सांगतात. कॅरटलेनने तर आता मोबाइल अॅपच्या माध्यमातूनदेखील ही सुविधा दिल्यामुळे या प्रतिसादात आणखीन वाढ झाली आहे. त्याच जोडीला अनेक व्यावसायिक कॅश ऑन डिलिव्हरी आणि आवडला नाही तर दागिना परत करण्याची सुविधादेखील देत आहेत.
मॉडर्न ट्रेण्डी दागिन्यांकडे वाढता कल
सध्याच्या काळात सोन्यापेक्षादेखील मॉडर्न ट्रेंण्डी दागिन्यांकडे सर्वाचाच कल वाढताना दिसून येत आहे. त्यामध्येदेखील हिरे आणि कमी वजनाचे दागिने घेण्याकडे अधिक कल असल्याचे चिंतामणी ज्वेलर्सचे विनायक मुरुडकर सांगतात. प्लॅटिनमचे प्रमाण तुलनेने दोन-तीन टक्केच असून गुंतवणूक म्हणून सोने घेणे कमी झाले आहे; पण मुहूर्ताला होणारा सोनेखरेदीचा ट्रेंड अजूनही टिकून असल्याचे ते सांगतात, तर फॅन्सी ज्वेलरी, खडे, कुंदन, माणिक, पाचू आणि जडावू वापरण्याकडे आजचा कल असल्याचे सौरभ गाडगीळ सांगतात. आदित्य पेठे सांगतात की, एकच एक दागिना आयुष्यभर वापरण्याची आजच्या पिढीची मानसिकता नाही. आजचे युथ मार्केट हे बदल मागणारे आहे. त्यामुळे विवाह दागिन्यांबरोबरच ही बाजारपेठदेखील तेजीत असल्याचे ते सांगतात आणि त्यांच्यासाठी रोजच्या वापरता कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर वापरता येतील अशा दागिन्यांची मागणी अधिक असल्याचे ते नमूद करतात. अशा दागिन्यांत सेमी प्रेशिअस स्टोन आणि चांदीचादेखील वापर केला जातो. अर्थात हे सर्व घटक असले तरी सोने हेच सध्या तरी या सर्वात वरचढ असल्याचे जेम्स आणि ज्वेलरी फेडरेशनचे संचालक अशोक मीनावाला प्रतिपादन करतात.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com