गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. बदलतं आर्थिक, सामाजिक वास्तव त्यामागे असलं तरी संपूर्ण कुटुंबव्यवस्थाच नव्हे तर समाजरचनाच बदलण्याची ही नांदी तर नव्हे? मानसोपचारतज्ज्ञ, वकील, समुपदेशक, समाजशास्त्राचे अभ्यासक यांच्याशी संवाद साधून वाढत्या घटस्फोटांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१ :
रश्मी आणि प्रकाश दोघं नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत होते. दोघांचा संसार आणि करिअर सुरळीत सुरू होतं. तितक्यात प्रकाशला सिंगापूरमध्ये सेटल होण्याची उत्तम संधी चालून आली. त्याला तिथे जायचंही होतं. पण रश्मीला भारत सोडून कुठेही जायचं नव्हतं. कारण तिला तिच्या करिअरमधली प्रगती भारतात राहूनच होणार होती. दोघांचे निर्णय परस्परविरुद्ध असल्यामुळे दोघांनीही सामंजस्यातून घटस्फोटाचा निर्णय घेतला.
२ :
अनया व्यवसायाने डॉक्टर. तिचं लग्न मनीष या उत्तर भारतीय मुलाशी झालं. तोही कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम पदावर कार्यरत होता. हे सगळं चांगलं असूनही त्यांच्यात एक गोष्ट मात्र काहीशी विचित्रच होती. मनीष त्याच्या आईला घरात कोणीतरी सोबत हवी म्हणून तिला अधेमधे सुट्टी घ्यायला लावायचा. तीसुद्धा सुट्टी घ्यायची. पण कालांतराने तिला त्याचा त्रास होऊ लागला. हळूहळू शारीरिक छळही वाढू लागला. म्हणून तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला.
३ :
सुमित आणि स्नेहलचं लग्न झाल्यानंतरही त्याला तिचं वागणं काहीसं खटकतं होतं. त्याला नेमकं कारण कळेना. कालांतराने त्याला कळलं की, स्नेहलचं लग्नाआधी अफेअर होतं. ते आता लग्नानंतरही तसंच टिकून आहे. ती अजूनही तिच्या प्रियकरासोबत फिरते, बोलते. अर्थातच हे सुमितला मान्य नव्हतं. त्याने तातडीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.
४ :
सायलीचं कलकत्त्यात एका डॉक्टर मुलाशी लग्न झालं. तो मुलगा अमेरिकेत राहायचा. लग्न झाल्यानंतर आधी तो अमेरिकेत गेला. त्यानंतर काही दिवसांनी ती तिथे गेली. तिथे त्यांचा संसार सुरू झाला, पण काही दिवसांनी त्याचं विचित्र वागणं सुरू झालं. रोज रात्री तो घरी आला की तिला घेऊन क्लबमध्ये जायचा. दारू, पब हे सगळं करायला तो तिला भाग पाडायचा. तिला त्याची सवय नव्हती. शारीरिक छळही सुरू झाला होता. एकदा तिने त्याचा फोन तपासला. त्याचं एका मुलासोबत अफेअर म्हणजे त्याचे समलैंगिक संबंध सुरू असल्याचं तिला कळलं. तिने त्याला घटस्फोट द्यायला सांगितला तर तो त्यासाठीही सुरुवातीला तयार नव्हता. तिला तिथून भारतात येऊही देत नव्हता. पण ती तिथून कशीबशी निघाली आणि मुंबईत येऊन तिने घटस्फोटाची याचिका दाखल केली.
५ :
तन्वी आणि सुधीर दोघे बडय़ा कंपनीत नोकरी करत होते. एकमेकांशी लग्न तर त्यांनी केलं होतं. पण दोघांचेही विवाहबाह्य़ संबंध होते. दोघांनाही ते माहीतही होतं. पण ते एकमेकांवर आरोप करायचे. अखेर त्यांनी घटस्फोट घेतला.
६ :
दीपिका आणि सागर दोघे व्यवसायाने सीए. दीपिकाला वाचनाची आवड होती. मासिकं वाचण्याची तिची नेहमीची सवय. एक स्त्रीकेंद्रित मासिक ती नेहमी वाचायची. हेच नेमकं तिच्या सासरच्या लोकांना आवडत नसे. सागरचा याबाबत काही आक्षेप नव्हता. पण त्याच्या घरच्यांमुळे त्याला तिला बोलावं लागे. ही गोष्ट हळूहळू फार ताणली जाऊ लागली. प्रचंड वादावादी व्हायची. शेवटी सागर घटस्फोटापर्यंत गेला. त्यांना तेव्हा एक वर्षांचा मुलगा होता. पण सुदैवाने या जोडप्याचं पॅच अप झालं.
७ :
रिया आणि राज दोघे तसे उच्च मध्यम वर्गातील जोडपं. पण रियाला पार्टी, शॉपिंग या सगळ्यात खूूप रस असायचा. ती अनेकदा गर्ल्स नाइट आऊटला जायची. ड्रिंक्स, डान्स, गप्पा-टप्पा हे सगळं तिला आवडायचं. पण यातून तिला नवनवीन गोष्टींचं आकर्षण वाटू लागलं. नवनवीन गोष्टींमध्ये रस निर्माण होऊ लागला. मग तो मुलांबद्दल असेल किंवा व्यसनांबद्दल असेल. प्रकरण हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर राजने घटस्फोटाचा अर्ज केला.
८ :
प्रीती आणि परेश या जोडप्यात चांगल्या प्रकारे समजूतदारपणा होता. प्रीतीला नोकरीनिमित्ताने परदेशात सेटल व्हायचं होतं. तशी तिला संधीही मिळाली होती. पण परेशला भारत सोडून जायचं नव्हतं. काही र्वष ती परदेशात आणि तो भारतात असं त्यांनी करूनही बघितलं. पण एकमेकांपासून लांब राहात असल्यामुळे त्यांच्यात वैवाहिक आयुष्य असं काहीच नव्हतं. सुखी वैवाहिक आयुष्य ते दोघेही जगतच नव्हते. त्यामुळे त्यांनी सामंजस्यातून घटस्फोट घेतला.
या घटना वाचून एखाद्या सिनेमा किंवा मालिकेची कथा वाचल्यासारखं वाटत असेल, पण यातली नावं बदलून मांडलेली ही उदाहरणं खरी आहेत. या विषयाशी संबंधित वकील, समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या काही प्रातिनिधीक उदाहरणांचा उल्लेख केला. या उदाहरणांवरून लक्षात आलंय की, घटस्फोटाची कारणं आता पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. या नव्या कारणांमध्ये विशेष बदल दिसून येतोय तो मुलींच्या बाबतीत. आजची तरुणी सुशिक्षित आहे. ती पूर्वी एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाला की तिला माहेरी राहण्याशिवाय पर्याय नसायचा. तसंच ती तिच्या पालकांवर आर्थिकदृष्टय़ा अवलंबून असायची. यात महत्त्वाचा बदल झाला आहे. आज एखाद्या स्त्रीचा घटस्फोट झाला तरी घटस्फोटानंतर मी कुठे राहू, नोकरी कुठे करू, एकटी कशी राहू असे प्रश्न पडत नाहीत. कारण ती नोकरी करणारी आहे. ती स्वतंत्र विचारांची आहे. सगळीच कारणं मुलींच्या बाबतीच आहेत असं नाही. पण, मुली देत असलेली कारणं आणि त्यांचं स्वावलंबी असणं हे मात्र अधोरेखित होताना दिसतंय.
वर मांडलेल्या प्रसंगांमध्ये मुलींच्या सुशिक्षित, स्वावलंबी आणि करिअरला प्राधान्य देण्याच्या वृत्तीचा प्रत्यय येतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जान्हवी केदारे मुलींच्या बदलत्या मानसिकतेबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात, ‘लग्नसंस्थेत नवरा-बायकोच्या एकमेकांकडून वेगवेगळ्या स्वरूपाच्या अपेक्षा असतात. विशेषत: शिक्षण, आर्थिक स्तर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या तीन गोष्टींमध्ये अपेक्षा असतात. आता मुली खूप शिकतात. त्यामुळे आपला नवरा आपल्यापेक्षा कमी शिकलेला आहे याचा त्रास त्या बायकोलाही होत असतो. नवऱ्याचं स्टेट्स चांगलं हवं, त्याचं विशिष्ट स्वरूपाचं घर असावं, भविष्याबद्दल त्याने नियोजन करावं, असं त्या बायकोला वाटत असतं. तिने तिच्या नवऱ्याबद्दल काही कल्पना मनात रंगवलेल्या असतात. पण त्या प्रत्यक्षात उतरत नाहीत हे कळल्यावर त्यांचे नातेसंबंध बिघडतात. आजच्या तरुणींच्या अपेक्षा खूूप महत्त्वाच्या बनल्या आहेत.’ हाच मुद्दा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर थोडा पुढे नेतात, ‘आजची स्त्री नोकरी करते. घर, नोकरी यात तिची धावपळ होत असते. तिच्यावर कामाचा भरपूर ताण असतो. त्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या म्हणजे सासू-सासऱ्यांचा सांभाळ, नातेवाईकांशी नातेसंबंध टिकवून ठेवणे यांमध्ये तिला भागीदार हवा असतो. हा भागीदार ती तिच्या नवऱ्यातच शोधत असते. तोच नेमका तिला मिळाला नाही की तिला त्रास होतो, वाद होतात. मग कधी कधी हे वाद, भांडण घटस्फोटापर्यंत जातात.’
घटस्फोटाचा अर्ज करण्यामध्ये मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा किंचित जास्त आहे, असं कुटुंब न्यायलयाचा कानोसा घेतला असता लक्षात येतं. लग्न ठरवतानाच मुलींच्या मागण्या बदललेल्या जाणवतात. मुलाचं स्वतंत्र घर, पगार, गाडी, राहण्याचं ठिकाण, भविष्यातील नियोजन अशा सगळ्या अपेक्षा विचारात घेऊनच मुली लग्नासाठी मुलं बघतात. हे सकारात्मक आणि नकारात्मकही आहे. मुली शिकून मोठय़ा पगाराची नोकरी करतात. त्यांचं त्यांच्या भविष्याबद्दल नियोजन ठरलेलं असतं. यामुळे त्यांचा जोडीदारही तसाच हवा अशी मुलींनी अपेक्षा करणं चुकीचं नाही. सुशिक्षित आणि सुजाण असल्यामुळे आता मुली मुलांचं वर्चस्व सहन करत नाहीत. अस्तित्वावर घाला घातला जातोय, अन्याय होतोय, मुस्कटदाबी होतेय हे त्यांच्या लक्षात आलं की त्या घटस्फोटाचा निर्णय घेतात. घटस्फोट झाला आता समाज काय म्हणेल असा विचार करणाऱ्या मुलींचं प्रमाणही आता कमी होतंय. मुलींनी घटस्फोटाचा निर्णय घेतला की त्या त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. मुलं मात्र काहीशी डगमगतात. शिवाय घटस्फोटानंतर मुली एकटय़ा राहू शकतात. पण मुलांना भावनिकदृष्टय़ा भागीदार हवा असतो म्हणून ते दुसरं लग्न करण्याबाबत स्पष्ट सांगतात.
अॅड. मृदुला कदम मुलींच्या करिअरविषयीचा मुद्दा मांडतात. त्या सांगतात, ‘आजच्या तरुणी करिअरला प्राधान्य देणाऱ्या आहेत. करिअर की संसार यामध्ये करिअरची निवड करून घटस्फोट घेणारी जोडपी मी बघितली आहेत. हा बदल सध्या प्रकर्षांने जाणवतोय. स्त्रियांनाही नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळते. करिअरला प्राधान्य असल्यामुळे ती संधी स्वीकारून घटस्फोट घेणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलंय. अर्थात करिअरचा हा मुद्दा दोन्ही बाजूंनी असतो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये सामंजस्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो.’ सामंजस्याने घटस्फोट घेण्याचं प्रमाण सध्या वाढताना दिसतंय. यामागे आधुनिक जीवनशैली, करिअरला प्राधान्य देणं, पर्याय नसणं ही प्रमुख कारणं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. पूर्वीच्या काळात पुरुष स्त्रीला घटस्फोट द्यायचा. तिला हवा असल्यास तो घेणं तिला सहज शक्य नसे. तिला तिचा नवरा घटस्फोट देतोय म्हणजे तिच्यात काहीतरी कमी आहे वगैरे चर्चा व्हायची. शिवाय घटस्फोट म्हणजे कुटुंबाला लागलेला कलंक असंही काही वर्षांपूर्वी समजलं जायचं. पुरुषालाही घटस्फोट हवा असल्यास त्यालाही बोललं जायचं. बायकोला सासरी नांदवण्यात तो असमर्थ आहे असं त्यावेळी बोल लावलं जायचं. पण, आता ही सगळी परिस्थिती बदलत आहे. आता बायको नवऱ्याला घटस्फोट देऊ लागली आहे. काहीवेळा बायकोला हवा आहे म्हणून घटस्फोटासाठी नवऱ्याला राजी व्हावं लागत असल्याचं चित्र दिसून येत असल्यांची तज्ज्ञांकडून माहिती मिळते. आता दोघेही नोकरी-व्यवसाय करणारे असतात. आजची आधुनिक जीवनशैली बघता दोघांची विचारसरणी, मानसिकता बदलली आहे. नवऱ्याला बायकोसोबत किंवा बायकोला नवऱ्यासोबत राहायचं नसेल तर ते आपापसात ठरवून घटस्फोट घेतात. आजची पिढी करिअरला प्राधान्य देणारी असल्यामुळे नोकरी आणि संसार यामध्ये नोकरीची निवड केली जाते. आणि याच कारणामुळे सामंजस्याने घटस्फोट घेतला जातो. काही जोडप्यांमध्ये दुसऱ्याला हवा म्हणून नाईलाजाने घटस्फोट द्यावा लागतो.
तरुण पिढीमध्ये म्हणजे साधारण २५ ते ३५ या वयोगटातील तरुणांचं घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. मुली आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या आहेत हे घटस्फोटाचं एकमेव कारण नाही. त्यांचं स्वावलंबी होणं चांगलंच आहे. या कारणामुळे घटस्फोट होतात यामध्ये काही अंशी तथ्य असलं तरी मुलींमध्ये झालेला हा सकारात्मक बदल स्वीकारायला हवा. स्वत:च्या पायावर उभी राहण्याची जिद्द त्यांच्यात आहे. या सगळ्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता येते आणि त्यामुळे त्या करिअरला अधिकाधिक प्राधान्य देऊ लागल्या आहेत. करिअरला प्राधान्य देत असल्यामुळे आताची जोडपी लग्न झाल्यानंतर किमान दोन र्वष तरी मूल होऊ न देण्याचा विचार करतात. अनेकांच्या बाबतीत हे पथ्यावर पडलेले दिसते. कारण दोन वर्षे मूल नाही आणि याच दोन वर्षांत घटस्फोट झाल्याने होणारी संभाव्य कुतरओढ टळते, असे अनेक समुपदेशकांच्या बोलण्यातून लक्षात आले.
एकुलतं एक अपत्य हा घटकही या विषयात महत्त्वाचा ठरतो. याविषयी कुटुंब न्यायलयातील ज्येष्ठ वकील संजय आंबेडकर सांगतात, ‘एकुलतं एक अपत्य असलं की लहानपणापासून हवं ते मिळण्याची सवय असते. हाच हेकेखोरपणा ते अपत्य मोठं झाल्यावर मोठा होतो. पूर्वी जमवून घेण्याची वृत्ती होती. आता ती कमी झाली आहे. माझे आई-वडील हवेत तुझे नको हे काही मुलींमध्ये दिसतं. यामुळे माझा मुलगा आता मला विचारणार नाही, ही असुरक्षितता मुलाच्या पालकांमध्ये दिसून येते. एकुलत्या एका अपत्याबाबत हे बऱ्याच अंशी बघायला मिळतं. आजची पिढी हुशार आहे पण त्यात अहंकार दडलाय. पुढील दहा वर्षांत परिस्थिती आणखी बिकट होईल.’ अशा प्रकरणांमध्ये पालकांचा हस्तक्षेप वाढतो. या हस्तक्षेपाबद्दल डॉ. पारकर म्हणतात, ‘आधीची पिढी नव्या पिढीला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन करत असते. मार्गदर्शन करणं ही सकारात्मक गोष्ट आहे. पण हे मार्गदर्शन हस्तक्षेपात रूपांतरित होता कामा नये. ते झालं की गोष्टी घटस्फोटाकडे वळतात. पालकांचा हस्तक्षेप विघातक आहे.’ पालकांचा हस्तक्षेप हा केवळ एकुलत्या एक अपत्याच्या बाबतीत नसून तो इतर ठिकाणीही असतो. पण एकुलतं एक अपत्य असलेल्या कुटुंबात हस्तक्षेपाचं प्रमाण थोडं जास्त आहे. एकुलती एक मुलगी असली तर तिला तिच्या पालकांकडे लग्नानंतरही लक्ष द्यायचं असतं. अनेकदा तिचे पालक तिच्यावर भावनिक-आर्थिक कारणांनी अवलंबून असतात. त्यामुळे त्या मुलीने तिच्या पालकांचा विचार केला तर त्यात गैर काही नसतं. पण ही गोष्ट अजूनही पूर्णपणे समजून घेतली जात नाही. यातही त्या मुलीला फक्त आई किंवा बाबा असतील तर तिची जबाबदारी आणखी वाढते. पण याचा गंभीरपणे विचार होत नाही.
लोक काय म्हणतील, समाजाला काय वाटेल हा विचार आता अपवादाने होताना दिसतोय. काही वर्षांपूर्वी घटस्फोट होणार असेल तर समाजाचं दडपण असायचं. घटस्फोट हा कलंक वाटायचा. तो झाला की समाजात वावरायचं कसं, लोकांना काय उत्तरं द्यायची असा प्रश्न असायचा. त्यातही मुलीला हे दडपण अधिक वाटे. तिच्या घरच्यांच्या खांद्यावरही या दडपणाचं ओझं असायचंच. हे ओझं नको म्हणून मुलीचे पालक तिला सासरी जमवून घे असं सुचवायचे. समाजाच्या भीतीपायी ते त्यांच्याच मुलीला तडजोड करायला लावायचे. पण आता हे चित्र बदलतंय. एखाद्या मुलीला घटस्फोट हवा असेल तर ती तिच्या पालकांना स्पष्ट सांगते. शिवाय पालकही आता सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले आहेत. आपल्याकडे ‘मुलीची बाजू’ म्हणून अनेक गोष्टींचा त्याग, तडजोड केली जाते. पण आता यातही लक्षणीय बदल होताना दिसतोय. विशेष म्हणजे बदलाचं हे पाऊल मुलीचे पालकच घेताना दिसताहेत.
रुपालीचा घटस्फोट गेल्या वर्षी झाला. लग्न होऊन फक्त चारेक महिने झाले असतील आणि त्या दरम्यान तिला हा निर्णय घ्यावा लागला. ती तिच्या अनुभवाबद्दल सांगते, ‘त्याच्यात लैंगिक संबंधांशी संबंधित अडचण होती. हे मला आणि माझ्या कुटुंबाला लग्नाआधी सांगितलं नव्हतं. लग्नानंतर आमच्यात एकदाही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याला इच्छाच व्हायची नाही. शिवाय तो छोटय़ा छोटय़ा कारणांनी चिडायचा, त्रागा करायचा. त्यामुळे त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे न्यावं लागलं होतं. तो बरा होईल असा दिलासा डॉक्टर द्यायचे. पण तशी काहीच चिन्हं दिसेना. त्याच्या अशा वागण्याने नंतर मलाही त्याच्याबद्दल काहीच वाटेनासं झालं. सगळ्या गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मला होत असलेल्या त्रासाबद्दल मी माझ्या पालकांना पहिल्यापासून सांगत होते. त्यांनीही मला खूप आधार दिला. घटस्फोटाची प्रक्रिया त्रासदायक होतीच. पण त्यांच्या मुलीच्या बाबतीत असं घडत असतानाही ते डगमगले नाही. निर्णय घेताना मी समाजाचा विचार अजिबात केला नाही. कारण मी स्वत:च्या पायावर उभी होते. चांगली नोकरी करत होते. त्यामुळे समाजाचं दडपण मीही घेतलं नाही आणि आईबाबांनाही घेऊ दिलं नाही. मंगळसूत्र घालायचं बंद केलं तेव्हा ऑफिसमध्येही माझ्यामागे खूप चर्चा व्हायची. पण मला कोणालाही कुठंलच स्पष्टीकरण देणं गरजेचं वाटलं नाही.’ रुपालीसारख्या मुली आज समाजात ताठ मानेने वावरतात.
मुली आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत तरी सगळ्याच समजूतदार आहेत असं नाही. आर्थिक स्वावलंबनाचा जसा फायदा आहे तसाच तोटाही आहे. सुकेशच्या उदाहरणावरून हा मुद्दा लक्षात येईल. सुकेशचं लग्नाआधी सहा र्वष अफेअर होतं. त्याच मुलीशी लग्न झाल्यामुळे दोघेही खूश होते. पण लग्नानंतर काही महिन्यांनी त्याची बायको विचित्र वागायला लागली. ‘लग्नानंतर काही महिन्यांनी तिच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तिला नेमकं काय हवं ते कळेना. माझी आर्थिक परिस्थिती सुदैवाने चांगली आहे. त्यामुळे तिला हवं ते सगळं दिलं. सगळ्या सुखसोयी तिला मिळवून दिल्या. तरी तिला माझ्यासोबत राहायचं नाही असं तिने ठरवून टाकलं. मी कारण विचारल्यावर ती ठाम असं कोणतंही कारण देऊ शकली नाही. मी आमचं नातं टिकवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते जमून आलं नाही. तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. मला त्याला दुजोरा द्यावाच लागला. एकाक्षणी समाज, नातेवाईक या सगळ्यांचा विचार मी केला. पण जिच्याशी लग्न केलं तिलाच माझ्यासोबत राहायचं नाही तर मी लोकांचा इतका विचार का करू असं मला वाटलं. त्याक्षणी मी इतरांचा विचार करणं बंद केलं’, सुकेश त्याचा अनुभव सांगत होता. मुलींच्या आर्थिक स्वावलंबनामुळे त्या कधी कधी अशा प्रकारेही वागू लागल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत आल्याची अनेक उदाहरणं आहेत, अशी माहिती कुटुंब न्यायलयातील काही समुपदेशकांकडून मिळते.
मुलींच्या आर्थिक स्वावलंबनाच्या मुद्दय़ाखेरीज घटस्फोटाची इतर अनेक कारणं आहेत. सासरच्या मंडळीशी न पटणं, सासरी मान न मिळणं, सुनेच्या शब्दाला किंमत नसणं, तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य न देणं अशा भावना मुलींच्या मनात येत असतात. घटस्फोटाची सोय आहे याबाबत मुली आता जागरूक आहेत. जुळवून घेण्याची वृत्ती कमी झाल्यामुळे गोष्टी घटस्फोटापर्यंत जायला वेळ लागत नाही. काही जोडपी एकमेकांना अनुरूप नसतात हे त्यांच्या उशिरा लक्षात येतं. एकमेकांचे स्वभाव, मूल्य, तत्त्व, विचार संकल्पना हे नेहमी जुळतंच असं नाही. जोडीदारांच्या अपेक्षांमध्ये स्पष्टता नसली की अशा अडचणी उद्भवतात. अनुरूप होण्यासाठी आवश्यक असणारी तडजोड करण्याची सवय आता कमी झाली आहे. ‘माझी विचारसरणी, राहणीमान, नोकरी यात मीच का तडजोड करू’ यामुळे अहंकार आड येतो. विवाहबाह्य़ संबंधांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक प्रकरणांत हेच प्रमुख कारण असल्याचे दिसत, असं समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.
नोकरीमुळे एकमेकांना वेळ देणं कमी झाल्यामुळे भावनिक गोष्टींमध्ये भागीदार शोधला जातो आणि पुढे हे संबंध वाढतात. जोडीदाराशी बांधिलकी असलीच पाहिजे हा विचार तरुणांमध्ये बदलताना दिसतोय. त्याच्यात किंवा तिच्यात आता तितकासा रस नाही, समाधान, आनंद देणारं दुसरं कोणीतरी आहे, हा आता तरुणांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. लग्न झाल्यानंतरच दुसऱ्या स्त्रीशी किंवा पुरुषाशी संबंध असतात असं नाही. तर काहीवेळा लग्नआधीपासून असे संबंध असतात. लग्नानंतर ते सुरुच राहतात. हे लक्षात आल्यानंतर जोडीदार घटस्फोटासाठी अर्ज करतो. काहीवेळा नवरा-बायको दोघांचेही विवाहबाह्य संबंध असतात. अनेकदा एकमेकांना याबाबत माहीतही असतं. पण, ते फक्त एकमेकांवर आरोप करत राहतात. गोष्टी टोकाला गेल्या की मग घटस्फोटाचा निर्णय घेतात. लग्नाआधीचे संबंध लग्नानंतर सुरु राहणे, लग्नानंतर जोडीदाराकडून प्रेम, वेळ मिळाला नाही की दुसरं कोणीतरी शोधणं आणि दोघांचेही जोडीदाराव्यतिरिक्त संबंध असणं असे विविध प्रकार विवाहबाह्य़ संबंधामध्ये आढळून येत असल्याचं मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचंही त्यांचं मत आहे.
दुसरं आणखी एक कारण म्हणजे व्यसनाधीनता. ‘ऑकेजनली ड्रिंकिंग’चा ट्रेंड वाढतोय. पण या ‘ऑकेजनली ड्रिकिंग’मध्ये ऑकेजन्स खूप असल्यामुळे गोष्टी व्यसनाधीनतेपर्यंत जातात. हे टोकाला गेलं की त्याचं रूपांतर मानसिक आणि शारीरिक छळात होतं. जोडीदाराला मानसिक विकार असण्याचं कारणही आता पुढे केलं जातं. विशेषत: स्क्रिझोफेनियासारख्या आजारात रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेमुळे जोडीदारासोबत राहणं कठीण होतं. लग्नाआधी जोडीदाराच्या आजाराबाबत सांगितलं नाही असं सांगून घटस्फोटाकडे वळतात. लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित होत नाहीत. अशा वेळी जोडीदाराची नेमकी काय अडचण आहे हे जाणून घेण्यापेक्षा घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे सासरी अडचणी, मानसिक विकार, अनुरूप नसणं, लैंगिक संबंध प्रस्थापित न होणं, विवाहबाह्य संबंध अशी अनेक कारणं दिसून येताहेत.
कौन्सिलिंगनंतर घटस्फोटाचा निर्णय बदलणारी जोडपीही आहेत. मुंबईत पुन्हा एकत्र राहायला येणाऱ्या जोडप्याचं प्रमाण सात ते दहा टक्के आहे तर हेच प्रमाण पुण्यात १५ ते १७ टक्के आहे. औरंगाबादमध्ये ३० ते ३५ टक्के इतकं असून नागपूरमध्ये २० टक्के आहे, असं कुटुंब न्यायालयातील काही समुपदेशकांकडून समजतं. ठिकाणांनुसार तिथलं प्रमाण कमी-जास्त होत असतं. आजची परिस्थिती बदलली आहे. कायदेही बदलले आहेत. ज्येष्ठ वकील संजय आंबेडकर सांगतात, ‘स्त्रीच्या बाजूने ८० टक्के तर पुरुषाच्या बाजूने २० टक्के अशी कायद्यांची विभागणी झाली आहे. स्त्रीच्या बाजूने जास्त कायदे असल्यामुळे कधी कधी त्याचा गैरफायदा घेतला जातो.’ आंबेडकर यांच्या या मुद्दय़ात तथ्य असल्याचं दिसतं. गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातील घटनांचा आढावा घेतला तर स्त्रियांनी ४९८ अ या कलमाचा गैरफायदा घेतल्याचं आढळून येतं. महिलांचा मानसिक-शारीरिक छळ याविरोधात त्यांना आधार देण्यासाठी अनेक नव्या कायद्यांची तरतूद करण्यात आली. हुंडाबळीचे प्रमाण मध्यंतरीच्या काळात वाढले होते. या सगळ्याला शिक्षा म्हणून कलम ४९८ अ ची तरतूद केली. पण, गेल्या काही वर्षांमध्ये या कलमाचा महिलांकडूनच घटस्फोटासाठी व एरव्हीही गैरवापर होत असल्याच्या घटना देशात वाढत असल्याचे विविध न्यायलयांच्या लक्षात आले. महिलांनी केलेल्या गैरवापरामुळे अनेक कुटुंबं उद्धवस्त झाली. काही निर्दोषांचे उगाचच बळी गेले. अशा घटना घडत असल्याचं सर्वोच्च न्यायलयाच्या लक्षात आले. कलम ४९८ अ चा गैरवापर टाळण्यासाठी कलम ४९८ ब ची तरतूद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
आंबेडकर असेही सांगतात, ‘एका दिवसात एका जिल्ह्य़ात घटस्फोटाच्या किमान ३५ याचिका दाखल होतात. या हिशोबाने दोन्हीकडची घरं असं मिळून ७० घरं यात भरडली जातात. कुटुंब न्यायालयांमध्ये कामाचा ताण आता वाढला आहे. एका वकिलाला दररोज साधारण वीस ते बावीस प्रकरणे असतात. वकिलांकडे आता सहकारी असले तरी कामाचा ताण वाढलाय हे खरं आहे.’
एखाद्या स्त्रीला तिच्या जोडीदारासोबत राहणं अशक्यच असेल म्हणजे तिचा शारीरिक, मानसिक छळ होत असेल तर तिने तिच्या आर्थिक स्वावलंबनाचा मुद्दा लक्षात घेत वेगळं झालेलं केव्हाही योग्यच, असं तज्ज्ञ इथे सुचवतात. पण जोडीदारासोबत थोडंसं काहीतरी बिनसलं आणि या स्वावलंबनाची ढाल बनवत तिने जमवून न घेता घटस्फोटाचा पर्याय निवडला तर ते चुकीचंच आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.
सासरकडून शारीरिक छळ, हुंडय़ासाठी अवाजवी पैशांसाठी मागणी, नवऱ्याचे विवाहबाह्य़ संबंध, बायकोचे विवाहबाह्य़ संबंध आणि फसवणूक ही घटस्फोटाची साधारण दहाएक वर्षांपूर्वीची कारणं. ही कारणं आजही अस्तित्वात आहेत. पण आता यात वेगवेगळ्या कारणांची भर पडतेय. कायद्यांमध्ये ज्याप्रमाणे बदल होताहेत तसेच घटस्फोटाच्या कारणांमध्येही बदल होताहेत. मुलींचं आर्थिक स्वावलंबन हा मुद्दा प्रामुख्याने नमूद करावा लागेल. आजच्या मुली शिकून नोकरी करतात. त्यांना फक्त घर-संसार यापुरतंच जगायचं नाही. त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणी घाला घालत असेल तर त्या वेगळं होण्याचं पाऊल उचलत आहेत. हे धाडस त्या स्वत:च्या पायावर उभ्या असल्यामुळेच करत आहेत. समाज, नातेवाईक यांचा विचार न करता घटस्फोटाचा निर्णय घेण्याचं बळ त्यांना मिळतंय ते त्यांच्या आर्थिक स्वावलंबनमुळेच आणि त्याला बळकटी मिळते बदलत्या मानसिकतेची!
घटस्फोट का होतो ?
आताच्या मुली आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी आहेत. शिवाय त्या आता घटस्फोट हा कलंक समजत नाहीत. त्यांचं नवऱ्याशी पटेनासं झालं की, त्या घटस्फोटाचा निर्णय घेतात.
मुलाकडून मुलीच्या असलेल्या अपेक्षा हेही एक प्रमुख कारण आहे. मुलाने कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. शिवाय तिच्या संकल्पनेतल्या गोष्टी तो मुलगा प्रत्यक्षात उतरवण्यास असमर्थ ठरत असेल तर असं प्रकरण टोकाला जातं.
दोघांमध्ये सुसंवाद नसल्यामुळे एकमेकांबद्दलचा विश्वास, आदर, प्रेम हरवून जातं. सोशल साइट्समुळे चॅटिंग, नवनवीन ओळखी, तासन्तास तिथे बोलणं अशा अनेक गोष्टी वाढत असल्यामुळे एकमेकांवर संशय घेऊन वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात.
विवाहबाह्य़ संबंध हेही आजचं महत्त्वाचं कारण आहे. नोकरीच्या निमित्ताने जास्तीत जास्त वेळ बाहेर असल्याने विवाहबाह्य संबंधांचं प्रमाणही वाढलंय.
नवऱ्याची व्यसनाधीनता अनेकदा मानसिक, शारीरिक छळापर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळे व्यसनाधीनता हे घटस्फोटाचं आणखी एक प्रमुख कारण आहे.
लैंगिक संबंध प्रस्थापित करू न शकल्यामुळेही जोडपी घटस्फोटाकडे वळतात.
विवाह समुपदेशन असे होते :
घटस्फोटाची याचिका कुटुंब न्यायालयात दाखल झाल्यावर विवाह समुपदेशन सक्तीचं आहे. कुटुंब न्यायालयात दाखल झालेल्या याचिका मुंबईतील सात न्यायालयांमध्ये विभागल्या जातात. पतीने याचिका दाखल केली असेल तर पत्नीला आणि पत्नीने याचिका दाखल केली असेल तर पतीला नोटीस पाठवली जाते. विशिष्ट तारखेला हजर राहण्याची ही नोटीस असते. ही याचिकेची पहिली तारीख असते. त्या दिवशी ‘समुपदेशन करा’ हे एवढंच न्यायाधीश सांगतात. समुपदेशनाच्या पहिल्याच दिवशी जोडप्याच्या वागणुकीवरून ते पुन्हा एकत्र येतील की घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवतील याचा अंदाज येतो, असे समुपदेशक सांगतात. समुपदेशन करताना दोघांचीही त्या वेळची परिस्थिती समजून घेतली जाते. दोघांची बाजू लक्षात घेतली जाते. त्यानुसार समुपदेशन विभाग अहवाल न्यायालयात सादर करतं. समुपदेशनाचे आवश्यकतेनुसार असे सेशन्स होत असतात. प्रत्येक सेशननंतर न्यायालयात अहवाल सादर केला जातो. सगळ्यात शेवटी न्यायालय संपूर्ण याचिकेचा तपशीलवार अभ्यास करून योग्य तो निर्णय घेते. एकत्र राहण्याबद्दल, मुलांच्या ताब्याबद्दल, मुलांच्या किंवा बायकोच्या पोटगीबद्दल अशा काही मुद्दय़ांशी संबंधित तो निर्णय असतो. साधारण सहा ते सात महिन्यांमध्ये न्यायालयात अंतिम अहवाल द्यावा लागतो. या दरम्यान न्यायालयाच्या साधारण दोन ते तीन तारखा होतात.
हे लक्षात ठेवा :
प्रत्येक जोडप्याने सुसंवाद साधायला हवा. यामुळे एकमेकांचे विचार, तत्त्व, मतं कळतात. याचा वैवाहिक आयुष्यात नक्कीच फायदा होतो.
आज नोकरीचे भरपूर तास आणि वेगवेगळी वेळ यामुळे एका घरात राहूनही नवरा-बायको एकमेकांना भेटत नाहीत. पण यातून मार्ग काढणं प्रत्येक जोडप्याच्या हातात आहे. व्यग्र वेळापत्रकातूनही त्यांनी ठरावीक वेळ एकमेकांना द्यायलाच हवा. या वेळेत दिवसभर काय झालं, कामाचा ताण, चांगल्या-वाईट घटना, किस्से, प्रवासातील गमतीजमती असं सगळं शेअर करा.
एकमेकांमध्ये पारदर्शकता हवी. ऑफिसमध्ये असताना फोन किंवा मेसेज करून गप्पा मारता येत नसल्या तरी कुठे आहात, कुठे जाणार आहात, कोणासोबत आहात, काय करताय याची खरी माहिती जोडीदाराला द्या. यामुळे तुमच्या नात्यात पारदर्शकता राहील.
घटस्फोटाच्या निर्णयाच्या वेळी त्यामागच्या कारणाचा पुनर्विचार करावा. रागाच्या भरात चुकीच्या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे शांतपणे निर्णय घ्या.
घटस्फोटाची प्रक्रिया अतिशय वेदना देणारी असते. घटस्फोटाचा निर्णय घेण्याची वेदना अधिक वेदनात्मक असते. याचे परिणाम म्हणून डिप्रेशन, अॅन्झायटी असे आजार उद्भवू शकतात. असे निदर्शनास आल्यास तातडीने उपचार घ्या.
परिणामांचा विचार करावा
घटस्फोटाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम आहेत. घटस्फोट घेतल्यानंतर मुलींना आता त्याबाबत कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. हा सकारात्मक परिणाम आहे. पूर्वीच्या काळी त्या स्वत:ला अपराधी मानत असत. आर्थिकदृष्टय़ा आता त्या कोणावरही अवलंबून नाहीत. घटस्फोटित स्त्रीला एक अपत्य असेल तर तिच्यासोबत त्या मुलाचीही फरफट होत असते. पण, एखादीचा नवरा व्यसनाधीन असेल तर त्याच्यासोबत तिच्या मुलाला ती वाढवू शकत नाही असा विचार करून घटस्फोट घेते. तसेच काही वेळा बायको मानसिक रुग्ण असेल तर नवरा घटस्फोट घेतो. मुलासाठी घटस्फोट घेण्याचा हा चांगला परिणाम दिसून येतो. आजही मुलीच्या स्वातंत्र्याचा विचार होत नाही पण मुलाच्या भल्या-वाईटाचा विचार होतो. आजच्या पिढीला कुटुंबसंस्थेची गरज आहे पण त्याला ते कमी महत्त्व देतात. सासू-सासरे सोबत नकोत. पण मूल झालं की सासूने येऊन राहणं ही अपेक्षा मात्र असते. या पिढीला नातेसंबंध, कुटुंबसंस्थेच्या पुढच्या गरजा दिसत नाहीत. आजची तरुणी एकटी राहू शकते, असं म्हणते ते तिच्याकडे असलेल्या पैशांमुळे. पण, आजच्या जगात खूप एकटेपणा आहे. ऑफीसमधला कामाचा ताण हा ज्याचा-त्याचा एकटय़ाचाच असतो. त्याअर्थी ते एकटे असतात. घटस्फोटित स्त्री किंवा पुरुषाला मुलांना वाढवताना प्रचंड एकटेपणा जाणवतो. या एकटेपणाचा विचार न होणं हा वाईट परिणाम आहे. घटस्फोटानंतर मुलाची कस्टडी असलेल्या पालकाला अनेक गोष्टी त्रासदायक वाटू लागतात. घटस्फोट घेऊन काही मिळवलंच नाही, असं वाटू लागतं. नातं टिकवण्यात अपयशी ठरल्याची सल निर्माण होते. नातेसंबंध टिकवण्याबाबत न्यूनगंड निर्माण होतो. लहान मुलांना शाळा, सभोवतालच्या परिसरातून प्रश्न विचारले जातात. याचा मुलावर परिणाम होतो. स्वत:चं दु:ख विसरायला पालक करिअरच्या नादात जास्तीत जास्त वेळ बाहेर राहतात. घटस्फोट झाल्यानंतर जास्तीत जास्त वेळ मुलासोबत घालवायला हवा हे त्यांना जाणवत नाही. त्यातून ते मूल दुर्लक्षित होत असल्याची भावना त्याच्या मनात येते. आई मुलाला घेऊन वेगळी होते तेव्हा ते मूल एका पालकाला आणि घराला सोडत असतं. घर ही संकल्पना खूप खास असते. घराची त्याच्या मनातली ओळखच पुसली जाते. आई करिअरमध्ये किंवा नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्यात इतकी गर्क असते की त्याच्या मनात काय सुरू आहे याची तिला जाणीवही होत नाही. जेवढं घटस्फोटांचं प्रमाण आहे त्याच्या दुप्पट प्रमाण कुटुंब हवं असलेल्या लोकांचं आहे. त्यामुळे कुटुंबसंस्थेची ओढ ही स्त्रीइतकीच पुरुषालाही आहे. भविष्यातल्या कुटुंबसंस्थेच्या विचारापेक्षा आताच्या कुटुंबसंस्थेचा विचार होणं गरजेचं आहे. आजची कुटुंबसंस्था लहान मुलांसाठी पोषक असायला हवी. जी नाती निर्माण करू ती सकस असावी. लहान मुलांच्या वाढीसाठी, तरुण आणि वयस्कर माणसांसाठी उपयुक्त अशी हवी.
– वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर
चैताली जोशी
response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11