चेन्नई. १ डिसेंबर २०१५. सकाळपासूनच पावसाची संततधार लागली होती. मुंबईमध्ये जून-जुलैमध्ये पडतो तसा मुसळधार पाऊस पडत होता. आज दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. दोन मीटिंग्ज संपवून रात्री साडेदहाच्या विमानाने पुण्याला परतायचं होतं. हॉटेलच्या बाहेर पाणी साचायला सुरुवात झाली होती. हॉटेलच्या जवळच ‘मध्य कैलाश’ नावाचं एक देऊळ आहे. तिकडे रस्ता खचून मोठं भगदाड पडलं होतं. अजून दोन-तीन ठिकाणी अशीच अवस्था झाल्याचं ड्रायव्हरकडून कळलं. पण तरीही परिस्थितीचं गांभीर्य उमजलं नव्हतं. मी आपला वेळेत पहिल्या ठिकाणी पोहोचल्याच्या समाधानात होतो. मीटिंगलासुद्धा लोक बऱ्यापैकी हजर होते. पण पाच तासांनी बाहेर पडलो तोपर्यंत रस्त्यांवर चांगलंच पाणी साचू लागलं होतं. दुसरी मीटिंग रद्द झाल्याचा निरोप मिळाला. तेव्हा आता शहरात थांबण्यात काही हशील नाही, हे लक्षात आलं. सहकारी एलिओट बीचच्या भागात होता. त्याला विमानतळावर जायला टॅक्सी-रिक्षा काहीच मिळत नव्हती. तेव्हा त्याला घेऊन मग आम्ही विमानतळावर जायला निघालो.

एव्हाना चेन्नईमधील बरेच रस्ते पाण्याखाली जायला सुरुवात झाली होती. विमानतळ फक्त दहा किमीवर होतं, पण पहिले सहा किमी कापायलाच तीन तास लागले. पुढे एके ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. बरेच गाडीवाले त्यातूनच गाडी दामटत होते. कधी कधी आपण संभाव्य धोक्याची चाहूल लागली तरीसुद्धा वेडय़ा आशेने धोक्याकडे दुर्लक्ष करतो ना, तसंच आमच्या बाबतीत झालं. आमच्या ड्रायव्हरनेसुद्धा गाडी पाण्यात घातली. हा निर्णय बरोबर नाही हे माहीत असूनसुद्धा आम्ही त्याला थांबवलं नाही. कसंही करून विमानतळावर पोहोचायला हवं, हेच डोक्यात. शेवटी व्हायचं तेच झालं. दाराच्या फटीतून आमच्या गाडीत पाणी शिरू लागलं. पाय पाण्यात बुडलेले. मागून गाडीच्या ट्रंकमधून पाणी आमच्या सीटवर यायला लागलं. तरीही यातून पार पडू असं उगाच वाटत होतं. पण अखेरीस गाडीनं शेवटचा श्वास घेतला. गाडी भर पाण्यात बंद पडली. विमानतळ अजून चार किमी दूर. आम्ही गाडीतून उतरलो आणि बॅगा घेऊन रस्त्यावरच्या डिव्हायडरवर चढलो. पलीकडच्या बाजूच्या रस्त्यावर पाणी नव्हतं. मग तिकडून शंभर मीटर चालत पुढे गेलो. पुढे पाणी नव्हतं. इकडे हवालदार भेटला. त्याला आमची परिस्थिती सांगितली आणि विमानतळावर पोहोचायची सोय करायची विनंती केली. खरं तर पोलिसाकडून मदतीची विशेष अपेक्षा नव्हती. कारण एक तर भाषेची अडचण आणि दुसरं म्हणजे पोलिसाकडून फुकट मदतीची अपेक्षा म्हणजे भलतंच; अशी मध्यमवर्गीय विचारसरणी. पण पोलिसाने सुखद धक्का दिला. दिसेल ती गाडी थांबवून आम्हाला विमानतळावर सोडायची तो विनंती करू लागला. बरेच जण तयार नव्हते. पण एक भला माणूस कुरकुर न करता तयार झाला. त्याच्या कृपेने अवघ्या दहा मिनिटांत आम्ही विमानतळावर पोहोचलो.

आमची अटकळ अशी होती की, पावसाचा जोर कमी झालाय तर विमानं उडायला काही अडचण नसावी, फार तर उशिरा सुटतील. चेकइनच्या वेळीही विमान वेळेत आहे असं सांगितलं गेलं. बाकीच्या एअरलाइन कंपन्या विमान रद्द किंवा लेट झाल्याच्या सूचना देत होत्या. पण आपलं विमान वेळेत असल्याचा दिलासा होता. सुरक्षा तपासणीनंतर आत गेलो तेव्हा विमान कंपनीचा मेसेज आला की, विमान दोन तास उशिरा सुटेल. तेव्हा कुठे लक्षात आलं की, काही तरी गडबड आहे. नंतर मात्र सर्व विमानं रद्द झाल्याचीच घोषणा झाली. रनवेवर पाणी साचलं आहे असं कळलं. आता परत हॉटेलवर जाणं तर शक्यच नव्हतं. तेव्हा विमानतळावर रात्र काढणं क्रमप्राप्त होतं. शहरात एव्हाना वीज बंद झाली होती. रस्ते तुंबले होते.. त्यामानाने विमानतळ खूपच सुरक्षित होता. पाण्याच्या बाटल्या व थोडंफार खाणं विकत घेतलं आणि विमानतळावर बाकीचे प्रवासी काय करतायत ते पाहायला फेरफटका मारायला निघालो.

अशा आपत्कालीन परिस्थितीत लोक कसे वागतात याचे निरिक्षण करणे हा माझ्या अभ्यासाचा विषय. काही गरम डोक्याचे प्रवासी दिसेल त्या कर्मचाऱ्याला घेराव घालून उगाच हुज्जत घालत बसले होते. जणू काही त्या विमान कंपनीने आपणहूनच पाऊस पाडून रनवेवर पाणी आणलंय. आमची हॉटेलमध्ये सोय का नाही, आम्हाला खायला-प्यायला का दिले नाही, आमचे विमान रद्द केलेत, आता आम्हाला परत महागडे तिकीट घ्यायला लावणार काय, एक ना दोन प्रश्न. आलेल्या परिस्थितीमुळे आधीच तो कर्मचारी भांबावलेला. त्यात प्रवाशांच्या प्रश्नाची सरबत्ती. पण मला या सर्व कर्मचाऱ्यांचं खूप कौतुक वाटत होतं. थंड डोक्याने, मोठय़ा विनयाने ते उत्तरं देत होते. तसे हे सर्व कर्मचारी वयाने व अनुभवानेपण लहानच. पण त्यांची समज वाखाणण्यायोग्य होती. तेवढय़ात एअर इंडियाने त्यांच्या प्रवाशांना खाण्याच्या पाकिटांची सोय केल्याची घोषणा केली. झालं. लोकांना चर्चेला नवीन खाद्य. मोदींनी कसं एअर इंडियाला वठणीवर आणलंय आणि हे प्रायव्हेटवाले कसे माजलेत याची चवीचवीने चर्चा सुरू झाली. तेवढय़ात  बाकीच्या एअरलाइन्सनीदेखील जेवणाची सोय केली आणि चर्चा करणारी तोंडं खाण्यात गुंग झाली.

एव्हाना रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. क्षुधाशांती झाल्याने डोकीही शांत होऊ  लागली. आता लोक पाय पसरायला जागा शोधू लागले. आडवं व्हायला मोक्याच्या जागा पटकावणं चालू झालं. चार्जिग पॉइंटजवळची जागा म्हणजे प्राइम लोकेशन. त्याच्या खालोखाल कार्पेट असलेला भाग. आणि त्यानंतर जनता क्लास म्हणजे चक्क लादी. आमच्या सुदैवाने आम्हाला कार्पेटवाली जागा मिळाली होती. त्यातही एका बाजूला वरून पाणी गळत होतं. तेवढा भाग टाळून आम्ही वर्तमानपत्राची पथारी पसरली. रात्रभर मुसळधार पावसाचा आवाज येत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘आज तरी विमानं सोडतील का’ या विचारानेच जाग आली. नुकतंच उजाडत होतं आणि बाहेर रनवेचं दृश्य पाहतो तर काय, रनवे म्हणजे भली मोठी प्रवाही नदी झाली होती. बसेसची चाकं पूर्ण पाण्यात बुडलेली होती. विमानांच्या टर्बाइनच्या खालच्या भागाला पाणी लागत होतं. पाण्याबरोबर गवत, पालापाचोळा वाहत होता. हे पाहिल्यावर मात्र आपला मुक्काम वाढणार याची मनोमन खात्री पटली. प्रातर्विधी उरकून कॉफी घेतली. हे एक बरं होतं. अजून खाण्यापिण्याची टंचाई नव्हती. विमान कंपन्यांनी न्याहारीची सोय केली होती.

न्याहारी होते न् होते तोच झालेल्या घोषणेने आज सुरू होणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन गोंधळाची’ नांदी केली. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने घोषणा केली की ‘‘आता विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केला आहे. तेव्हा प्रवाशांनी आपापल्या सोयीनुसार विमानतळ सोडावं.’’ सलग तीन-चार वेळा तीच घोषणा द्यायला लागले. म्हणजे विमानं तर सुटणार नाहीत आणि आता विमानतळ सोडायचं आणि जायचं कुठे? विमानतळाचा परिसर तर सर्व बाजूंनी पाण्याने वेढला गेला होता. विमानतळ म्हणजे जणू एक बेटच झालं होतं. जवळपासची सर्व हॉटेलं भरलेली. आता करायचं तरी काय? काही लोक लागलीच माघारी फिरायला लागले. काही प्रवाशांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितलं की बाहेर गंभीर परिस्थिती आहे. वीज नाही. प्यायला पाणी नाही. विमानतळ सर्वात सुरक्षित जागा आहे. एकदा बाहेर पडलात तर आम्ही आत घेऊ  शकणार नाही. तेव्हा उगाच बाहेर पडू नका. एअरलाइन कर्मचारीही म्हणू लागले की आम्ही विमानतळ सोडायला सांगितलेलं नाही, अशी घोषणा का होतेय ते आम्हाला पण कळत नाहीये.  तेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत विमानतळ सोडावं असं आम्ही सुचवणार नाही. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीच्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर त्यांचा वेगळाच सूर की विमानतळ बंद आहे तर तुम्ही बंगलोरला जा. पण कसे? काही लोक वाटेल ती किंमत देऊन टॅक्सीने बंगलोरला जायला तयार होते. पण शहरातून एकही टॅक्सी येत नव्हती. शिवाय चेन्नई-बंगलोर हायवेवर पण पाणी तुंबल्याची बातमी येत होती. मग करावे काय? आम्ही मग शांतपणे विमानतळावरच बसून राहायचं ठरवलं. जेव्हा हाकलतील तेव्हा पाहू असा पवित्रा घेतला.

काही तासांनी नवीन घोषणा झाली. सर्वाना बसने बंगलोरला न्यायची व्यवस्था केलेली आहे. तेव्हा सर्वांनी डिपार्चर एरियामध्ये जमावं. आता हे नवीनच. पण आश्वासक घोषणा होती. पहिल्यांदा होता तसा आम्हाला वाऱ्यावर सोडल्याचा सूर नव्हता.

मग चेकइन केलेल्या बॅगा ताब्यात घेऊन आमची वरात निघाली डिपार्चर एरियाकडे. एकूण चारपाचशे प्रवासी होते. नेहमीप्रमाणे लोकांनी रांगेचे संकेत धुडकावून लावून दरवाजासमोर तोबा गर्दी केली. अजून बसचा पत्ता नव्हता तरीही ढकलाढकली, घुसखोरी वगैरे नित्यनेमाच्या गोष्टी चालू होत्या. अर्धा तास वाट पाहूनसुद्धा बस येण्याची काही चिन्हं दिसेना. एव्हाना तीन वाजून गेले होते. म्हणजे बंगलोरला दिवसाउजेडी पोचणं अशक्यच आणि रात्री हमखास पाऊस पडतो हे माहीत होतं. त्यामुळे मी व माझ्या सहकाऱ्याने तिकडून काढता पाय घेतला व गर्दीपासून दूर जाऊन बसलो. म्हटलं पाहू नक्की किती बसेस येतायत आणि गर्दी ओसरली की जाऊ. अजून तासाभराने शेवटी एक बस आली. लोकांनी साहजिकच धक्काबुक्की करून बसकडे कूच केलं. चारशेपैकी चाळीस भाग्यवान बसमध्ये शिरू शकले. मग नवीन घोषणा. अजून बस अडकल्यात उर्वरित लोकांनी शांत बसून राहावं. झालं.. परत लोकांमध्ये चलबिचल. पण यावेळी आम्ही मात्र नुसती बघ्याची भूमिका घेतली. कारण त्या सर्कसमध्ये भाग घ्यायची आमची मुळीच इच्छा नव्हती.

रात्री दहापर्यंत जवळपास नऊ  बसेस गेल्या. आता नवीन बातमी अशी होती की विमानतळावरून बस जवळच्या मेट्रो स्टेशनपर्यंत जात होती. तिकडून मग मेट्रोने कोएमबेडू नावाच्या स्टेशनला जायचे. कोएमबेडूला मोठा बस डेपो असून तिकडून बंगलोरला बसेस जाणार. या बातमीने थोडे फार आशेचे किरण दिसू लागले. शेवटी सकाळी काय ते पाहू हे ठरवून आम्ही परत पथारी पसरली. यावेळी आम्हाला अरायवल एरियामध्ये बॅगांच्या पट्टय़ावर छान जागा मिळाली.

सकाळी उठतो तर आता विमानतळावरचे दिवे गेलेले होते. आता विमानतळावर थांबण्यात काही अर्थ नव्हता. तेवढय़ात एक बस येताना दिसली. मग आम्ही तडकाफडकी निघालो आणि बस गाठली. बसने मेट्रो स्टेशनवर सोडलं. मेट्रोला तिकिटालाच तुडुंब गर्दी होती. आदल्या दिवशी नऊ बसेसच्या गर्दीत कसा काय निभाव लागला असता असा विचार मनात येऊन गेला. मेट्रोने जाताना शहराचं जे काय दृश्य दिसलं ते विदारक होतं. रस्त्यात अजून बरंच पाणी होतं. चेन्नईमध्ये सध्या मेट्रोचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पुलांचंही बांधकाम सुरू आहे. त्यावर साचलेलं पाणी रस्त्यावर एकाच ठिकाणी येतंय. याला जोडून दुसरी गोष्ट. रस्त्यावर असणारा कचरा. विशेषत: प्लास्टिकचा कचरा. या साचलेल्या कचऱ्यामुळे पाण्याला कुठेही जायला वाव नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं. या महत्त्वाच्या गोष्टी मेट्रोमधून प्रवास करताना लक्षात आल्या.

रस्त्यावरील गाडय़ा पाण्यात बुडलेल्या. तळमजले पाण्यात आणि लोक गच्चीवर बसलेले. पण अशा परिस्थितीतसुद्धा गच्चीतले ते लोक हसतमुख होते. मेट्रोतल्या आम्हाला अच्छा करत होते. त्यांची परिस्थिती पाहून आम्ही किती नशीबवान होतो याची जाणीव झाली.

रस्त्यावर पाणी साचण्याचं आणखी एक कारण वाटलं, ते म्हणजे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी तिथे गटारं फारशी दिसली नाहीत. खरं तर रस्त्याच्या कडेला पाणी जाण्यासाठी जागा असायला हवी. पण, त्याचा अभाव असल्यामुळे रस्त्यावरील पाणी कुठे जात असेल हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. रस्त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचं तंत्र वापरले तर त्याचा फायदा होईल, असं सहज वाटलं.

मुंबईत अंडरग्राऊंड विजेच्या तारा आहेत. चेन्नईत मात्र ओव्हरहेड विजेच्या तारा आहेत. या ओव्हरहेड विजेच्या तारांमुळे पाणी साचलेल्या जागी वीजप्रवाह थांबवावा लागला. पण, सदोष यंत्रणेमुळेअशा ओव्हरहेड वायर्स व ट्रान्सफॉर्मर्सचा फटका काही स्थानिकांना बसून मृत्यूच्या घटनाही घडल्या.

मेट्रोमुळे पुराचा भाग ओलांडता आला. बस स्टेशनवर बंगलोरसाठी सतत बसेस सुटत होत्या. पुढचा प्रवास मात्र विनासायास पार पडला. एकूण ३६ तास विमानतळावर काढले. खरं तर आम्ही अजिबात संकटात नव्हतो. फक्त घरी पोचायची अनिश्चितता होती. पण चेन्नई शहरातल्या लोकांची बिकट परिस्थिती पाहून खूपच वाईट वाटलं. आम्हाला जायला सुरक्षित जागा तरी होती. त्यांना तर अजून किती तरी दिवस जीवनावश्यक गोष्टींसाठी तगमग करायला लागणार होती.

आता हे लिहिताना संकटातून सुटल्याची जरी भावना असली तरी आपल्याला फसलेल्या शहर नियोजनाचे अजून कितीतरी फटके बसायचे आहेत याची बोचरी जाणीव मनात आहे. जे काय अनुभवलं ती तर नुसती झलक आहे. पिक्चर तो अभी बाकी है ! ही मनात आलेली भावना छातीत धडकी भरवणारी आहे.

निरंजन कऱ्हाडे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader