नाशिक इथल्या भुजबळांच्या महालाची किंमतच शंभर कोटींच्या आसपास आहे. त्यावरून त्यांच्या बाकीच्या मालमत्तेची नुसती कल्पना केली तरी सामान्य माणसाचे डोळे फिरतील.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी सिन्नरच्या इंडिया बुल्स (आताची रतन इंडिया) कंपनीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भूसंपादनातील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास नेण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा शर्थीने प्रयत्न करत होते. वास्तविक, या रेल्वे मार्गासाठी जमीन देण्यास बहुतांश शेतकऱ्यांचा सुरुवातीपासून विरोध होता; परंतु तो झुगारत शासकीय यंत्रणा इंडिया बुल्सच्या दावणीला बांधल्याप्रमाणे कार्यरत होती. जमिनीचे मोजमाप करताना शेतकरी एकत्र येणार नाहीत, यावर शेकडो पोलीस नजर ठेवून होते. शेतकरी त्यावर आक्षेप घेत होते, पण त्यांचे म्हणणे ऐकण्यास यंत्रणा वा लोकप्रतिनिधी तयार नव्हते.
साधारणत: अडीच वर्षांपूर्वी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात घडलेली ही घटना. त्या वेळी नाशिकचे पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांच्याकडे होते. भुजबळ फाऊंडेशनला कोटय़वधींची देणगी याच इंडिया बुल्सने दिली होती. या वीज प्रकल्पासमोरील अडचणींवर तोडगा काढण्यासाठी शासकीय यंत्रणा जिवाचे रान करत होती. भुजबळ पालकमंत्री आणि शासकीय यंत्रणांची कार्यप्रवणता हा विलक्षण योगायोग तेव्हा जुळून आल्याचे पाहावयास मिळाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तास्थानी असताना बहुतांश वर्षे उपमुख्यमंत्री राहिलेल्या भुजबळ यांच्या काळात नाशिकमध्ये असे अनेक प्रकार घडले. काहींनी आवाज उठविण्याचाही प्रयत्न केला. त्यातील अनेकांना ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ याची अनुभूती घ्यावी लागली.
मुंबईहून मूळ गाव नाशिक गाठल्यावर भुजबळ यांनी २००४ च्या निवडणुकीत येवला मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अन् नाशिकचे पालकमंत्रीपद भूषविताना त्यांनी आपले बळ वापरून मोठा निधी नाशिककडे वळविला. त्यातून अनेक भव्यदिव्य प्रकल्प साकारले. येवल्याचे रंगरूप तर असे पालटले की, आधीचे गाव पाहिलेल्यांना नवीन येवला पाहिल्यास आश्चर्याचा धक्का बसेल. मुंबई-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण, त्याअंतर्गत नाशिक शहरात लांबलचक उड्डाणपूल, ओझर विमानतळावर टर्मिनल इमारत, असे नानाविध प्रकल्प त्यांनी मार्गी लावले. कामांचा धडाका सुरू असल्याने जिल्हावासीयांमध्ये विकासाची आशा पल्लवित झाली. त्याची फलश्रुती जिल्हय़ातील बहुतेक सत्ताकेंद्र राष्ट्रवादी नव्हे, तर भुजबळ व कुटुंबीयांच्या हाती एकवटण्यात झाली.
काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात नाशिकमध्ये विकासगंगा वाहत असताना भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्या व संस्थांचे प्रस्थ त्याहून अधिक वेगाने दौडत होते. भुजबळ समर्थकांची एका तपातील प्रगती लक्षवेधी ठरली. भुजबळ म्हणतील ती पूर्व इतके त्यांच्या शब्दाला महत्त्व होते. पक्षांतर्गत व त्रासदायक विरोधक यांना शह देण्यासाठी बाहुबली समर्थक पुरेसे होते. त्याची अनुभूती अनेकांनी घेतली. स्थानिक पातळीवरील काँग्रेसजनही त्यास अपवाद राहिले नाहीत. शुल्कवाढीच्या मुद्दय़ावरून आंदोलन करणाऱ्या भुजबळ नॉलेज सिटीतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘समजाविल्यानंतर’ ते कसे शांत होतात याच्या सुरस कथा चर्चिल्या जातात.
तपभरात भुजबळ कुटुंबीयांनी साधलेल्या अफाट उत्कर्षांचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते साक्षीदार म्हणता येतील. कोणतेही काम भव्यदिव्य आणि आकर्षक ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. नाशिक येथे राष्ट्रवादीच्या अधिवेशनात खुद्द शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांना त्याचा प्रत्यय आला. व्यासपीठाची रचना, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि अधिवेशन काळात पक्षाच्या नेत्यांचा जो काही राजेशाही थाट ठेवला गेला, त्यावर सारेच बेहद्द खूश झाले. पवार यांनी समीर भुजबळ यांच्या नियोजनाचे जाहीर सभेत कौतुक केले. इतकेच नव्हे तर, राष्ट्रवादीने २००९ च्या लोकसभा निवडणुकीत समीरला उमेदवारी देऊन कामाचे फळ दिले.
मुंबई-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण आणि त्याअंतर्गत शहरातून जाणाऱ्या सुमारे सहा किलोमीटरच्या उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा शहरवासीयांचे डोळे दिपवणारा ठरला. संपूर्ण उड्डाणपूल आकर्षक रोषणाईने प्रकाशमान करण्यात आला. फटाक्यांची इतकी आतषबाजी झाली की, जणू दिवाळी साजरी झाली. ओझर विमानतळ इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात त्याची पुनरावृत्ती झाली. सुखोई विमानांचे उत्पादन करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अखत्यारीत हे विमानतळ आहे. फटाक्यांच्या आतषबाजीत कारखाना परिसरातील गवताला आग लागली होती. ‘एचएएल’च्या अग्निशमन दलाने ती तातडीने धाव घेऊन नियंत्रणात आणल्याने अनर्थ टळला; परंतु एचएएल व्यवस्थापनाने तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम असल्याने मौन बाळगणे हिताचे मानले.
जिल्हय़ातील सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात ठेवणाऱ्या भुजबळांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. सत्ताकेंद्र हाती असल्याने कोणतेही काम चुटकीसरशी मार्गी लावले जाई. नाशिक शहरातील आडगाव येथे उभारलेल्या भुजबळ नॉलेज सिटीचे सौंदर्य खुलविण्यासाठी परदेशातून सामग्री मागवली गेली. या महाविद्यालयापर्यंत महामार्गावरून पोहोचण्यासाठी रस्त्याची अडचण महापालिकेने रातोरात दूर केली. स्थानिक द्राक्ष उत्पादकांचा विरोध डावलून हे काम केले गेले. या नॉलेज सिटीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. या महाविद्यालयात शहरातील सर्व भागांतून विद्यार्थ्यांना सहजपणे पोहोचता यावे म्हणून एसटी महामंडळाने कित्येक बस दिमतीला ठेवल्या आहेत. असे भाग्य अन्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कधी लाभले नाही.
सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आर्मस्ट्राँग एनर्जीचा वीजनिर्मिती प्रकल्प नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर दृष्टिपथास पडतो. त्याचे उद्घाटन खुद्द शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. याच काळात गंगापूर धरणालगतची मोठी शासकीय जागा अल्प दरात ‘एमईटी’च्या पदरात सहजपणे पडली. मालेगावचा अवसायनात निघालेला गिरणा सहकारी कारखाना भुजबळ कुटुंबीयांशी संबंधित कंपनीने अल्प दरात खरेदी केला. या कारखान्याची २५० एकर जागा कोटय़वधींची आहे, पण राज्य बँकेकडून तो अल्प दरात दिला गेला. कारखान्यांच्या सभासदांचा रोष कमी करण्यासाठी सध्या युती शासनात मंत्री असणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने भुजबळांना अप्रत्यक्षपणे रसद पुरवली होती. दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदनाचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविण्यासाठी भुजबळ कुटुंबीयांनी बरेच प्रयत्न केले. स्थानिक पातळीवरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना दिल्लीची हवाई सफर घडवून आणली. भुजबळ फाऊंडेशनच्या ‘नाशिक फेस्टिव्हल’द्वारे सलग चार ते पाच वर्षे हिंदी-मराठीतील तारे-तारकांना जिल्हय़ात आणून आपले त्यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध दाखवून दिले.
मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावर त्यांनी पुन्हा येवल्याकडेच लक्ष देणे इष्ट मानले. मुलगा पंकजला शेजारील नांदगाव मतदारसंघातून आमदारकी मिळवून दिली. विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून भुजबळ कुटुंबीयांची ऐश्वर्यसंपन्नता पुढे आली. त्यात अलीकडच्या काळात भुजबळ फार्म येथे उभारलेल्या आलिशान महालाची भर पडली. जुन्या काळातील राजेशाही महालाची छोटी आवृत्ती शोभावी, अशी या आलिशान महालाची रचना आहे. भुजबळ कुटुंबीयांशी संबंधित मोजक्याच व्यक्तींना या वास्तूचे दरवाजे खुले आहेत. भुजबळ फार्मचा परिसर सात ते आठ फूट संरक्षक भिंत आणि त्यालगत उंच उंच झाडांनी वेढलेला असल्याने नव्याने बांधलेला हा भुजबळ महाल दृष्टीस पडत नाही. सुमारे ३० हजार चौरस फूट आकाराच्या दुमजली वास्तूचे बांधकाम पुरातन काळातील वाडे-महालांची प्रचीती देणारे आहे. त्यास जलतरण तलाव, टेनिस मैदान, विस्तीर्ण हिरवळ असा आधुनिक स्पर्श देण्यात आला आहे. १५ ते १८ विस्तीर्ण दालने सामावणाऱ्या या महालात स्तंभांना विशिष्ट अशी कलाकुसर करण्यात आली आहे. वारली चित्रांचाही कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. खिडक्यांसाठी उच्च प्रतीचे लाकूड, नक्षीदार फर्निचर, विविध कलाकृतींच्या इटालियन मार्बलने सजलेले ‘फ्लोअरिंग’ आणि डोईवर कौलारू छताचा ताज वास्तूच्या श्रीमंतीत भर टाकते. राजमहालाशी साधम्र्य साधणाऱ्या या वास्तूतील फर्निचरही तितक्याच उच्च दर्जाचे असल्याचे पाहणारे सांगतात. तपास यंत्रणेने या महालाची किंमत जवळपास १०० कोटी रुपये गृहीत धरली, ती उगाच नव्हे ! काही वर्षांत अफाट वेगाने झालेली ही प्रगती तपास यंत्रणांच्या नजरेत भरणे स्वाभाविक होते.
response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा