पावलस मुगुटमल response.lokprabha@expressindia.com
महाराष्ट्रासह निम्म्याहून अधिक भारतात जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात कडाक्याची थंडी अवतरली असली, तरी यंदाच्या हंगामातही तिला अनेक संकटांवर मात करावी लागली. अनेकदा ती हवामान बदलातील संकटांमुळे लोपलीही. थंडीसाठी हक्काचा कालावधी असलेल्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ती फारशी आणि दीर्घकाळ जाणवली नाही. अमुक एका ऋतूमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहतात किंवा वाहतील, यावर प्रामुख्याने त्या-त्या ऋतूमधील हवामानासंबंधी आडाखे लावले जातात. महाराष्ट्रातील थंडीसाठी मुख्यत: उत्तरेकडील राज्यांतून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह कारणीभूत असतात. हिमालयाच्या परिसरात बर्फवृष्टी होते. त्याच वेळेस उत्तरेकडील राज्यात कोरडे हवामान राहिल्यास ही राज्ये गारठतात. या कालावधीत उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वारे वाहू लागल्यास थंड वाऱ्यांचे प्रवाह थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात आणि आपल्याकडेही कडाक्याची थंडी अवतरते. जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात हवामानाची ही सर्व गणिते जुळून आल्याने राज्याच्या किनारपट्टीच्या भागापासून विदर्भापर्यंतच्या नागरिकांना कडाक्याच्या थंडीची अनुभूती मिळाली. पण त्यासाठी थंडीला या हंगामात अनेक अडथळे पार करावे लागले.
भारतीय ऋतुचक्रानुसार सप्टेंबरअखेर मोसमी पावसाचा हंगाम संपतो आणि ऑक्टोबरला थंडीचा हंगाम सुरू होतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात थंडीला पोषक वातावरण निर्माण होत असते. याच महिन्यात थंडीच्या लाटा आणि गोठवून टाकणारी थंडी पडते असे जुनी—जाणती माणसे सांगतात. मात्र, गेल्या काही वर्षांत आणि यंदाही याच महिन्यांत हवामान बदलांच्या परिणामांनी थंडीला डोके वर काढू दिले नाही. नोव्हेंबर, डिसेंबर या ऐन थंडीच्या हंगामात कुठे बाहेरगावी जायचे ठरल्यास कुणीही हमखास गरम कपडे सोबत घेईल. तसे न करता कुणी रेनकोट घेऊन निघाला, तर तो निश्चितच वेंधळा ठरवला जाईल. मात्र, यंदाही या कालावधीत रेनकोट किंवा छत्रीजवळ बाळगणारा शहाणा ठरला.
हिंदी महासागराचे वाढत जाणारे तापमान आणि हवामानात झपाटय़ाने होणाऱ्या बदलांची झळ गेल्या काही वर्षांत वाढली आहे. तिची प्रखरता यंदाही दिसून आली. एकापाठोपाठ एक निर्माण होणारे पश्चिमी प्रक्षोभ, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे आणि कमी दाबाचे पट्टे, हे पावसासाठी कारणीभूत असलेले घटक आता सातत्याने निर्माण होत आहेत. मूळ हंगामातील कालावधी वाढवून थंडीच्या कालावधीवर पाऊस अतिक्रमण करतो आहे आणि इतर कोणत्याही ऋतूमध्ये त्याची हजेरी असते. जानेवारी महिन्यातही अगदी थंडी अवतरण्याच्या तोंडावर यंदा पाऊस झाला. पावसाचा हा सलग पंचविसावा महिना ठरला.
यंदाच्या हंगामात १४ ऑक्टोबरला मोसमी पावसाने राज्याचा निरोप घेतला. थंडीच्या हंगामातील निम्मा महिना मोसमी पावसानेच घेतला. पावसाळा संपल्याने थंडीची प्रतीक्षा सुरू झाली. पण, पावसाच्या लांबलेल्या कालावधीमुळे थंडी लांबणीवर पडली. सुरुवातीला थंडीसाठी दिवाळीचा मुहूर्त मिळाला, मात्र ती हवी तशी पडलीच नाही. उलट दिवाळीच्या कालावधीत पावसाळी वातावरण तयार होऊन थंडी पळाली. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ऐन दिवाळीच्या दिवसांत राज्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र असल्याने या काळात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली भागांतही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होण्यापूर्वी सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन हलकी थंडी अवतरली होती. मात्र वातावरण ढगाळ होताच तापमानात वाढ होऊन थंडी गायब झाली. नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत हवामानात सातत्याने बदल होत होते. कधी हलकी थंडी, कधी पाऊस, तर कधी तापमानवाढीचा सामना नागरिकांना करावा लागला.
थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
५ डिसेंबरनंतर मात्र हवामानात बदल होऊन पावसाळी वातावरण दूर झाले. ८, ९ डिसेंबरला काही प्रमाणात गारवा आला, पण थंडीच्या वाटेतील अडथळे सुरूच होते. १६ डिसेंबरला उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्याने राज्यात कडाक्याची थंडी अवतरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. निम्मा डिसेंबर कडाक्याच्या थंडीविना गेलेला असताना अखेर १८ डिसेंबरला राज्यात थंडीची प्रतीक्षा संपली. किमान तापमान सरासरीजवळ येऊन रात्रीचा गारवा वाढला. मात्र ही थंडीही अल्पच ठरली. डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा पावसाळी वातावरण तयार झाले. नव्या वर्षांच्या स्वागताला केवळ हलकी थंडीच अनुभवता आली.
उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, चंडीगड, उत्तर प्रदेश, बिहार त्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही या काळात कधी थंडी, तर कधी पावसाळी वातावरण होते. तेथून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाले, की महाराष्ट्रात अनेकदा समुद्रावरून उष्ण वारे वाहू लागत त्यामुळे थंडी पळाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी, वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि महाराष्ट्रातही कोरडे हवामान अशी स्थिती या हंगामात प्रथमच दीर्घकाळ आली, ती म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात. तिसऱ्या आठवडय़ाच्या शेवटी मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला. याच कालावधीत धूळ वाढवणारे वारे उत्तरेकडून आले. त्यातच आद्र्रता मोठय़ा प्रमाणावर कमी होऊन धुके अवतरले. मुंबई परिसरासह निम्म्या महाराष्ट्रावर धुके आणि धुळीचे मळभ निर्माण झाले. दोनच दिवसांत पुन्हा वातावरण कोरडे झाले. याच वेळेला उत्तर भारतातील अनेक राज्यांसह थेट गुजरात आणि मध्य प्रदेशपर्यंत थंडीची लाट सुरू झाली. परिणामी महाराष्ट्र गारठला.
राज्यात २३ जानेवारीपासूनच रात्रीच्या किमान तापमानात घट सुरू होऊन ते सरासरीच्या तुलनेत कमी होऊ लागले होते. मध्य प्रदेशातील थंडीच्या तीव्र लाटेमुळे सुरुवातीला त्या लगत असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आदी भागातही थंडीची लाट आली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर आणि मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी आदी जिल्ह्यांचा पाराही चांगलाच घसरला. मुंबई परिसरासह संपूर्ण कोकण किनारपट्टीनेही थंडीचा कडाका अनुभवला. पूर्व—मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही थंडीची लाट तीव्र झाली. त्यामुळे विदर्भही चांगलाच गारठला. १९८१ ते २०१० या कालावधीत प्रत्येक दिवशी प्रत्येक विभागात तापमान किती होते, त्यानुसार तापमानाची सरासरी काढली जाते.
हवामान विभागाच्या निकषांनुसार रात्रीचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत आल्यास आणि ते सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी उणे असल्यास त्या भागात थंडीची लाट आल्याचे जाहीर केले जाते. सरासरीपेक्षा ६.५ अंशांपेक्षा तापमान कमी झाल्यास ती तीव्र लाट असते. मुंबईसह कोकण विभागासारख्या किनारपट्टीच्या भागात हा निकष तापमान १५ अंश आणि सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांनी कमी असल्यास थंडीची लाट समजली जाते. या निकषांनुसार प्रजासत्ताक दिनाला मुंबईसह रत्नगिरी थंडीच्या लाटेच्या अगदी जवळ होती. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी थंडीची लाट होती. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हंगामातील नीचांकी तापमान आणि थंडीचा तीव्र कडाका अनुभवला.
हवामानातील विविध बदलांच्या अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून अवतरलेली थंडी जानेवारीच्या शेवटी दीर्घकाळ टिकली. कोरडय़ा हवामानाची स्थिती महिनाअखेरपर्यंत कायम राहणार असल्याने ती कमी—अधिक प्रमाणात कायम राहिली. पावसाळ्याने थंडीच्या पहिल्या महिन्यावर अतिक्रमण केले, त्यानुसार थंडीही उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात काही दिवस हलक्या स्वरूपात का होईना, कायम राहण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा हवामानाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग देईलच, पण हवामानाचा लहरीपणा नेमके काय घडवून आणील, याचा काही नेम नाही. त्यामुळे या लहरीपणाचा अंदाज बांधणे सध्या तरी कुणालाही शक्य नाही.