पीरियड फिल्मच आव्हान पेलणं कठीण असतेच, पण त्यावरुन उद्भवणारे वादविवाद देखील अपरिहार्यपणे झेलावे लागतात. अशा वादविवादांना जर अस्मितेची झिंग असेल तर मात्र केवळ चर्चेची राळच अधिक उडते.

थिएटरचे दिवे मंद होत जातात, प्रोजेक्टर सुरू होतो, श्रेयनामावली संपते. भारताचा नकाशा संपूर्ण पडदा व्यापून टाकतो. धीरगंभीर आवाजात सुरू झालेलं निवेदन. कट टू किल्ल्याचा भाग, कट टू वाळवंटातून चाललेला अकबर, त्याच्यामागे रिकाम्या अंबारीसह चालणारा हत्ती. काही घोडे, बैलगाडय़ा, काही अन्य वाहने. कट टू अकबराचा क्लोजअप, निवेदन सुरूच असते, कट टू कॅमेरा झूम आऊट होत टॉप अँगलाला. वाळवंटातला अनवाणी एकटा अकबर, कट टू छोटय़ा टेकडीवर उभा असलेला अकबर आता कॅमेरा वाळवंटातून टेकडीकडे, मध्ये फक्त तो हत्ती अंबारीसह. कट टू दग्र्यातला प्रसंग, कट टू थेट अभेद्य अशा भव्य किल्ल्याचा शॉट, सर्वत्र झगमगाट, शाही वातावरण, कट टू अकबराचे तटबंदीवर उभ राहणं. या सर्व प्रसंगांत दग्र्यातले मौलवी आणि अकबर यांचा केवळ चार वाक्यांचा संवाद आणि निवेदन. पण प्रत्येक फ्रेम तुम्हाला एका काळात नेणारी असते. सारं काही वेशभूषा, रंगभूषा, सेट आणि प्रॉपर्टी यातून साकारलेलं. दृश्य प्रतिमातून एका विवक्षित काळात घेऊन जाणारं. कथा, संवाद, कलाकार, संगीत महत्त्वाचंच पण काळाचा पट निर्माण करण्यासाठी ही त्रिसूत्री गरजेची.

चित्रपट हे दृश्यमाध्यम आहे, याचा सर्वाधिक कस लागतो तो पीरियड फिल्ममध्ये. कारण तेथे तुम्हाला केवळ कथा, संवाद कलाकारांच्या प्रभावाआधी त्या काळाचा प्रभाव निर्माण करायचा असतो आणि त्यासाठी दृश्यप्रतिमाच महत्त्वाच्या असतात. अर्थातच वेश, रंग आणि सेट या तीन माध्यमांचा सर्वाधिक वापर होणारं हा जॉनर आणि अर्थातच स्मरणरंजनास वाव देणारा असल्यामुळे समस्त भारतवर्षांतील प्रेक्षकांना सुखावणारा जॉनर. आपला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्रदेखील याच जॉनरचा आधार घेऊन आला. तर पहिला बोलपट आलम आरा आणि पहिला मराठी चित्रपट अयोध्येचा राजा हेदेखील याच जॉनरचे. सुरुवातीची अनेक पावलं याच जॉनरवर पडली आहेत. म्हणूनच की काय एकंदरीतच सर्वाच्या अत्यंत आवडीचा असा हा विषय. हे सारं आज सांगायचं कारण इतकच की अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत अगदी सुखेनैवपणे नांदणाऱ्या या जॉनरमध्ये आता अस्मितेचा शिरकाव झाला आहे. आणि त्याच भरात चित्रपट राहतो बाजूला आणि अस्मितेच्या भुंग्याची झिंग चढत जाते.

पीरियड फिल्म म्हटल्या की आपल्या डोळ्यांसमोर घोडे, हत्ती, राजवाडे, लढाई, असंच चित्र येत. असे चष्मे घालायची आपल्याला सवय अगदी लहानपणापासूनच लागलेली असते. असो. पण तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा भूतकाळ दाखवायचा असेल तरीदेखील काळ उभा करावा लागतो आणि ते देखील पीरियड फिल्मच असते, हे लगेच पचनी पडत नाही.

एकंदरीतच पीरियड फिल्म आपल्याकडे यशस्वी झाल्याची उदाहरणे बरीच आहेत. पण त्याचबरोबर हे सारं उभं करणं किती कठीण असू शकतं, यावर थोडा प्रकाश टाकणं महत्त्वाचं वाटते. मुळातच आपण दस्तऐवजीकरणात कर्मदरिद्री आहोत. काळ उभा करणाऱ्या कादंबऱ्यांच्या आधारे खूप गप्पा मारता येतील, अगदी वर्षांनुर्वष व्याख्यानंदेखील झोडता येतील. पण जनजीवनाशी निगडित अगदी साध्या साध्या गोष्टीवर मात्र ऐतिहासिक वास्तव मांडता येणार नाही, असा आपला लौकिक आहे. मुळातच चित्रपट हे दृश्य माध्यम असल्यामुळे त्यात तुम्हाला संपूर्ण पट उभा करायचा असतो. त्यात अगदी सामान्य घरांपासून ते राजेराजवाडय़ांपर्यंत सर्व गोष्टी येतात. दैनंदिन जनजीवनातले बारकावे येतात. अशा वेळी केवळी ऐतिहासिक कागदपत्रे, पत्रे, बखरीतून सर्व माहिती मिळतेच असे नाही. मग सुरू होते एक लढाई. ऐतिहासिक घटना आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य, सिनेमॅटिक लिबर्टी यांच्यात. गेल्या दोन महिन्यांत क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक लिबर्टीची इतकी चर्चा झाली आहे की विचारस्वातंत्र्य नसते तर लोक घुसमटून गेले असते की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे.

असो. तर साधारण इंग्रज अमदानीतल्या अनेक नोंदी, पुस्तकं, छायाचित्रे आपल्याकडे आहेत. पण त्यापूर्वीचा विशेषत: शिवकाल आणि पेशवे काळाचा विचार करताना मात्र अनेक अडचणींचे डोंगर उभे राहू शकतात. जरी अनेक देशांशी आपला व्यवहार असला, व्यापार उदीम होता असे म्हटले तरी आपल्याकडे काळ उभी करणारे दस्तऐवज कमीच म्हणावे लागतील. प्राचीन काळाचे अनेक संदर्भ लेणींमध्ये मिळतात. पण तुकाराम नेमके कसे दिसायचे, त्यांचं घर कसे असेल, चारशे वर्षांपूर्वीची बाजारपेठ कशी असेल, लोकांचे आहार कसा असेल, कपडे कसे असतील असा चित्रपटाचा व्यापक कॅनव्हास भरणारा तपशील पूर्णाशाने मिळतोच असे नाही. बखर हा ललित अंगाने जाणारा संदर्भ सोडला तर राजे-महाराजांच्या बाबतीतदेखील आपल्याकडे अशा माहितीची वानवा आहे. मग बाकी जनजीवनाचं तर सोडूनच द्या. दृश्य माध्यमातून हा काळ उभा करायचा तर नाणी, चित्र, वीरगळासारखी शिल्पे आणि जनजीवनाचं वर्णन करणारी काही मोजकी कागदपत्रे सोडली तर आनंदच आहे.

मग असा चित्रपट करताना नेमकं काय होतं आणि काय नाही याचा थोडा ऊहापोह करावा लागेल. त्यासाठी मराठीतीलच काही उदाहरणं उपयोगी पडतील. चार वर्षांपूर्वी आलेला ‘तुकाराम’ हा चित्रपट शिवकालाशी समकालीन. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी त्या अनुषंगाने मार्मिक भाष्य करतात की, पीरियड फिल्म करताना काय करावे यापेक्षा काय करू नये हे माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. संपूर्ण टीमच्या संशोधनातून अनेक निष्कर्ष समोर येतात. त्यानुसार संपूर्ण काळ उभा करावा लागतो. १०० टक्के जसंच्या तसं उभं करणं अवघडचं असतं. पण काळाचा परिणाम साधण्याइतपत आभास नक्कीच निर्माण करता येऊ शकतो. अनेक निष्कर्षांचे एकत्रिकरण करावे लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची अनुभूती, अनुभव महत्त्वाचा असतो. कारण सिनेमाचं शास्त्र तुम्ही नंतर शिकता, पण तुम्ही अनुभवलेला भवताल तुम्हाला बरंच काही सांगत असतो. त्याचा वापर नक्कीच होतो.

हाच मुद्दा ‘लोकमान्य टिळक एक युगपुरुष’च्या अनुषंगाने ओम राऊत सांगतात की, त्या काळच्या दस्तऐवजाबाबत आपणास केवळ १० टक्केच माहिती मिळते. छायाचित्र हा त्याकाळी चन या सदरात मोडणारा भाग असल्यामुळे तुम्हाला नेमके सुस्पष्ट बारकावे मिळतीलच असे नाही. अशा वेळेस इतर कागदपत्रांच्या आधारे पुढे जावं लागतं. चित्रपटांच्याबाबतीत संशोधनाचा अर्थ केवळ माहिती गोळा करणं इतका मर्यादित नसून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्वयार्थ लावणे हा असतो. टिळकांचं व्यक्तिमत्त्व त्यांची वृत्ती, त्यांची शरीरयष्टी, नेतृत्वाची धारणा अशा अनेक गोष्टींचा विचार केल्यावर त्यांच्या पेहरावाचा विचार करता येतो. त्यांचं धोतर हा इतकाच घटक घेतला तर ते ब्राह्मणी पद्धतीचं करवती होतं, पण टिळक ते पैलवानी पद्धतीने दुटांगी वापरत. त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा आणि नेतृत्वगुणाचा तो भाग होता. पण मग अशा वेळी तर्काधारीत निर्णय घ्यावा लागतो.

हाच प्रकार आपल्या वस्त्रप्रावरणाबाबतदेखील दिसून येतो. मुळात आपल्याकडे संग्रहालय कमी आहेत. आहेत त्यात वस्त्रप्रावरणाचा समावेश कमी आहे. असे वेषभूषाकार नचिकेत बर्वे नमूद करतात. ते सांगतात, ब्रिटनच्या व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझिअममध्ये टेक्सटाइल म्युझिअम आहे. कोणत्या कालखंडात काय वापरलं गेलं, काय नाही याची मर्यादित का होईना माहिती तेथे नमुन्यांसह उपलब्ध आहे.

इतकं सजवल्यानंतर जेव्हा रंगवायची वेळ येते तेव्हा एक चूक होण्याची शक्यता हमखास असते ती म्हणजे चकचकीतपणा. त्यातूनच बाहुबलीच्या पुरातन कथानकात लिपस्टिक लावून मेकअपचा थर केलेल्या महिला कलाकार पाहायला मिळतात.

मान्य आहे की संदर्भ कमी असतात. तेव्हा मग आहे त्यातच लॉजिक वापरावं लागतं. ‘‘औरंगजेबाचा विचार करताना त्याला शत्रू मानणारे कसे पाहतात आणि त्याला हिरो मानणारे कसे पाहतात, या दोन्हींचा अभ्यास करावा लागतो’’ असे ज्येष्ठ रंगभूषाकार विक्रम गायकवाड सांगतात. त्यातील विसंगतीवर बोट ठेवताना ते सांगतात की, आपल्याकडे प्रतिमांचं ओझं खूप असतं. त्यामुळे अनेक वेळा गोंधळ होतो. जुन्या कॅलेंडर्सनी देवदेवतांना इतकं गुळगुळीत करून टाकलंय की त्यांना दाढी येतच नाही की काय, असा प्रश्न पडावा आणि त्या प्रतिमांतून आपण लोकांना बाहेर काढू शकत नाही. मग पुरुषोत्तम राम जर १४ र्वष वनवासात असेल तर त्यांच्या दाढी-मिश्या वाढू शकतात, पण तसे दाखवायचे ठरवल्यास कोणताही निर्माता तयार होत नाही. हाच प्रकार ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांसाठीदेखील लागू होतो. घोडदळासह आलेल्या महाराजांचे मावळे जर धुळीने माखलेले असतील तर महाराजांच्या चेहऱ्यावर धूळ असू शकते. पण तेथेदेखील आपले हात कचरतात. सखोल असा अभ्यास आपल्याकडे अभावानेच आढळतो, असे त्यांचे मत आहे. त्यातच जर मोठय़ा हिंदूी सिनेतारका असतील तर त्यांना आपला लुक सोडायचा नसतो. मग वेशभूषा-रंगभूषेशी तडजोड होण्याची शक्यता अधिक असते असे ते नमूद करतात.

प्रॉपर्टी आणि सेटच्या बाबतीत तर सध्या आपल्याकडे भलं मोठं ऐतिहासिक काही तरी दाखवलं की झालं, असादेखील एक मोठा गैरसमज होऊन बसला आहे. पण नेमकं येथेच काय दाखवायचं नाही हे कळणंच अनेक वेळा महत्त्वाचं असते. त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या मोहेंजदारो या चित्रपटांत दिसू शकेल. आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटात मोहेंजदारोचा काळ आहे. त्या वेळच्या उपलब्ध साधनांनुसार अमुक अमुक रंग नव्हते. मग ते रंग प्रॉपर्टीमध्ये, सेटवर यायला नकोत ही पहिली खबरदारी घेतली गेली आहे. त्यानंतर मग कोणते रंग वापरायचे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तर मातीपासून तयार होणारे रंग वापरले गेले. अर्थात, अशा मुद्दय़ांवर वाद-विवाद चर्चा होऊ शकते, पण जे मांडलं गेलंय त्याला एक आधार असणं हा त्यामागचा मुद्दा आहे आणि नेमका हा आधारच अनेक वेळा घ्यायचा नसतो.

कपडेपटाच्या बाबतीत पीरियड फिल्मच काय पण वर्तमानकाळावरील चित्रपटातदेखील अगदी गाढवचुका दिसून येतात. वर्तमानापासून दूरच काही तरी दाखवायचं आणि ते फॅशन म्हणून रूढ करायचा प्रयत्न हा त्यातूनच बोकाळला. फार मोठा काळ मागे जायचे नसेल म्हणजेच तीस-चाळीस वर्षांचा फरक असेल तर मग बिनदिक्कत अनेक गोष्टी केल्या जातात. खरं तर आपल्याकडे भानू अथ्थयासारख्या ज्येष्ठांनी यावर प्रचंड मेहनत घेतलेली आहे. विक्रम गायकवाड सांगतात की भानू अथ्थयांनी अनेक जुन्या मिलच्या गोडाऊनना भेट देऊन मूळ तागे वापरले होते. अनेकवेळा चालू स्थितीतील जुन्या हातमागावर कापड तयार करून घेतलं होतं. या प्रयोगातून त्या वास्तवाच्या अधिक जवळ जात असत.

नजीकच्या कालखंडावर बेतलेला चित्रपट करतानादेखील आग्रही राहून कशा प्रकारे वास्तवता जोपासता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्योमकेश बक्षी. ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण प्रॉपर्टी आणि सेट वापरले आहेत त्याला तोड नाही. कोलकात्याची बाजारपेठच मुंबईत उभी केली होती. दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जीनी एका मुलाखतीत याबद्दल जे सांगतात, ते खूप महत्त्वाचं आहे. बॉलीवूडमध्ये तुम्ही असा काळ सहज उभा करू शकता. कारण येथे तसे कारागीर आहेत. फक्त गरज असते ती त्या कारागिरांना मोकळीक देण्याची. त्यांना तुमचा मुद्दा समजावून सांगायची. ते तुम्हाला हव्या त्या काळात घेऊन जातील. याच चित्रपटातील रेडिओच्या वापराचे उदाहरण खूप काही सांगणारं आहे. एका प्रसंगासाठी १९४३चा रेडिओ हवा होता, पण काही कारणास्तव मिळाला नाही. त्याऐवजी १९५०चा रेडिओ आणला होता. आता हे काही प्रेक्षकांना पडद्यावर कळलं नसतं. पण दिग्दर्शकाने तो रेडिओ वापरण्यास नकार दिला. आपण योग्य ती प्रॉपर्टी वापरत नाही हे आपल्याला माहीत आहे मग ती का वापरायची, हाच त्यातला भाव. म्हणजेच सारा भर येतो तो आशयावर. तुम्हाला काय दाखवायचं. तुमचा उद्देश काय आणि येथेच अनेक गोष्टींचा कस लागतो. ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि समीक्षक सुधीर नांदगावकर सांगतात की, कालखंडावर आधारित चित्रपट असेल तर या तीन बाबतीत तुम्हाला तडजोड करता येणार नाही. मुघल-ए-आझम या भव्यदिव्य चित्रपटाचं उदाहरण देताना ते सांगतात, ‘‘चित्रीकरण दहा वर्षे सुरू होतं. अशा वेळी अनेक बदल घडू शकतात. पण अकबराच्या एकाही फ्रेममध्ये तुम्हाला त्याच्या मिशीत बदल दिसणार नाही. त्याकाळी तब्बल २० हजार रुपये खर्चून ही मिशी अमेरिकेतून आणण्यात आल्याचे ते नमूद करतात.’’

अर्थातच अशा जुन्या कालखंडावरील चित्रपट करायचा तर खर्चाची थैली सैल सोडावी लागतेच. आपल्याकडे सुरुवातीच्या काळात हा खर्चाचा भाग आखडलेला असायचा. तेव्हा साधनसामग्री कमी असेल, पण कलेचा वापर पूर्णपणे झालेला असायचा. त्यातून काळ उभा राहिला आहे, असं विक्रम गायकवाड सांगतात. आज सारं काही तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याचा ट्रेण्ड वाढल्यामुळे, डोक्याला चालना कमी देण्याचा भाग दिसून येतो, असे ते आवर्जून नमूद करतात.

कथानकातील बारकाव्यांची कमतरता आणि त्याच वेळी काळ उभा करताना येणाऱ्या अडचणीतून अनेक वेळा तर्काधारीत निर्णय घेतानाच कधी कधी क्रिएटिव्ह लिबर्टीचा जन्म होतो. अर्थात पीरियड फिल्मसमध्ये दृश्य प्रतिमांचा पुरेपूर परिणाम साधणाऱ्या या अविभाज्य घटकांचा एक भला मोठा कॅनव्हास कायम महत्त्वाचा ठरतो. तो काही वेळा जुळवावा लागतो, काही वेळा उपलब्ध असतो. आणि हेच गणित काही प्रमाणात वर्तमानावर आधारित चित्रपटांसाठीदेखील लागू होते. अर्थातच अंतिमत: सारं न्यायचं असतं ते मायबाप प्रेक्षकांच्या समोर. आणि तेथे मग सुरू होते ती..

चित्रपट ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरचा असेल तर अस्मितेची भली मोठी भिंतच उभी राहते. सामाजिक जाणिवांवर, प्रश्नांवर बेतलेला असेल तर अनेक घटकांचा समावेश वाढतो. मग तर पक्षीय जाणिवादेखील उफाळून येतात. प्रत्येकाच्या विचारांच्या भुंग्यावर एक प्रकारची झिंग स्वार होते. मग चित्रपट राहतो बाजूलाच आणि गल्लीतल्या शेंबडय़ा पोरापासून कोणीही विचार स्वातंत्र्याच्या नावाने मतांची पिंक टाकू लागतो. मग एखादा बहाद्दर आणखीनच काही तरी मांडतो, ज्याचा चित्रपटाशी संदर्भच नसतो आणि मूळ मुद्दा, त्यातली कण्टेण्ट याच्याऐवजी सुरू होते ती केवळ वेगवेगळ्या अस्मितांच्या भुंग्यांची लढाई. अशी गेल्या वर्षभरात थोडी फार ऐकू यायची. पण ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘बाजीराव मस्तानी’च्या निमित्ताने सर्वच प्रकारच्या अस्मिता उफाळून वर आल्या. आणि फेसबुकसारख्या समाज माध्यमाने तर चर्चेचे इतके फड रंगवले की, झुकरबर्गला वर्षांतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणून पिंगाला पहिला नंबर द्यावा लागेल.

एलिझाबेथ एकादशी, लोकमान्य, कोर्ट, फँड्री, कटय़ार काळजात घुसली, ख्वाडा आणि ट्रेलरमधून दिसणारा बाजीराव मस्तानी या गेल्या वर्षभरातील निरनिराळ्या कारणांनी गाजलेल्या चित्रपटांच्या अनुषंगाने क्रिएटिव्ह लिबर्टी, सिनेमॅटिक लिबर्टीचा थोडासा विचार करावा लागेल. फँड्री, एलिझाबेथ आणि कोर्ट हे वर्तमानावर भाष्य करणारे चित्रपट. इतिहास असो की वर्तमान, तुम्ही वास्तवाच्या किती जवळ जाता ते महत्त्वाचं अशा पठडीतले हे चित्रपट आहेत. या चित्रपटांमध्ये वर्तमान दाखवताना सिनेमॅटिक लिबर्टीपेक्षा वास्तवावर भर दिला होता. आपला प्रेक्षक ज्या चित्रपटीय संस्कृतीवर पोसला आहे, त्यामध्ये क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक लिबर्टीचा इतका पगडा आहे की हे साधं-सरळ वर्तमान वास्तवदेखील आपल्याला झेपलं नाही. त्यामुळे एलिझाबेथ सोडलं तर फँड्री आणि कोर्ट या दोहोंना सर्वसामान्यांनी आर्ट फिल्ममध्ये लोटून दिलं. कोर्टच्या बाबतीत मांडणी कदाचित सर्वच प्रेक्षकांना झेपली नसेल एखाद्या वेळी, पण त्यातलं न्यायालय मात्र लोकांना धक्का देणारं वाटलं होतं. अगदी सेटपासून ते त्यातील कामकाज पद्धतीपर्यंत. आजवरच्या टिपिकल सिनेमातून दाखवलेल्या न्यायालयाची इतकी सवय झालेली होती की ते तशाच प्रकारे असते, या कोर्ट चित्रपटाप्रमाणे नसतंच असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्याचं अगदी साधं-सरळ कारण म्हणजे आजवर आपल्या चित्रपटांनी घेतलेली टिपिकल सोईस्कर लिबर्टी. चकाचक दाखवण्याची लिबर्टी. हीच लिबर्टी मग जेव्हा पीरियड फिल्म्समध्ये घेतली जाते तेव्हा मात्र गदारोळ होतो.

एलिझाबेथ तर थेट लोकेशनवरच चित्रित केलेला. तेथेदेखील परत हा विषय तर आलाच पण धार्मिक अस्मितांच्या भिंतीमागून. फँड्रीच्या वेळी वाद उद्भवला तो मुख्यत: विषयावरून. दिग्दर्शकाने हा विषय ज्या वास्तव पद्धतीने सिनेमात बसवला होता, त्यामुळे लोकांना असं कधी होऊच शकत नाही असा सूर लावला. त्यात काही पत्रकारदेखील होते. या दोन्ही चित्रपटांमध्ये थेट अभिव्यक्तीलाच धक्का लावला होता.

चित्रपट पाहताना वास्तव जगाचं भान सोडून जे पडद्यावर दिसते ते स्वप्न पाहायचं असं म्हणणारा एक खूप मोठा वर्ग आपल्याकडे आहे. सिनेमॅटिक लिबर्टीने त्याला इतकं गुंतवून ठेवलंय की त्याला वास्तवदेखील खटकू लागतं आणि मग चित्रपट बाजूला राहतो आणि केवळा वादाचा धुरळा उडत राहतो.

ख्वाडा हा अलीकडे आलेला चित्रपट. वरील तिन्ही चित्रपटांप्रमाणे राष्ट्रीय पारितोषकप्राप्त. चित्रपट आला, पाहिला, चालला, आवडला, काहींना नाही आवडला. पीरियड फिल्म नाही पण खुल्या अवकाशातल्या कॅनव्हासवर घडणारी कथा. त्याला जातीय संघर्षांची जोड. एका कार्यकर्त्यांचं त्यावरील खुलं पत्र छापून आलं आणि पुन्हा एकदा भुंगा घोंगावू लागला. कार्यकर्त्यांच्या पत्राला वास्तवातलं उत्तर न देता दिग्दर्शकाने तिसरीच वाट पकडून फेसबुकवरून उत्तरांचा धुरळा उडवला. त्यातून झालं इतकंच की चित्रपट राहिला बाजूला..

गेल्या पंधरा दिवसांत चित्रपटाच्या बाबतीत मराठी प्रेक्षक , विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते यांच्यात एक प्रचंड घमासान तुंबळ म्हणावं असं युद्धच सुरू आहे. अर्थातच समाजमाध्यमांवर. त्याला निमित्त आहेत ते ‘कटय़ार काळजात घुसली आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन पीरियड फिल्म्स. दोन्ही चित्रपटांना कथानकाचं संचित आहे. कटय़ार काल्पनिक तर बाजीराव मस्तानी इतिहासाचा आधार. अर्थातच पदोपदी तुलना होणारच. पण एकंदरीतच सर्व चर्चाचा रोख पाहिला तर लक्षात येणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीरियड फिल्मच्या दृष्टिकोनातून वर उल्लेखलेल्या मुद्दय़ांचा उल्लेख अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. त्यामुळे एकंदरीतच चर्चाचा सूर पाहिला तर चित्रपट गेला उडत, राहिला तो केवळ दोन्ही बाजूंच्या अस्मितेचा भुंगा.

कटय़ारच्या बाबतीत चर्चेला आवडणं न आवडणं, नाटकाची तुलना वगैरे मुद्दय़ांवरून सुरुवात झाली. त्यात काही प्रमाणात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चर्चेला वाव होता. पण हा मुद्दाच सर्वव्यापी झाला तो अवधूत गुप्तेंच्या प्रतिक्रियेनंतर. त्यातील पुणे, भावे आणि संस्कार या उल्लेखानंतर चित्रपट राहिला बाजूला आणि उरला तो केवळ सावळा गोंधळ. जो कोणी यायचा तो निषेध करायचा नाही तर सपोर्ट करायचा. मग एकदा का असे चष्मे लावले की जे होतं तेच येथेदेखील झालं.

बाजीराव मस्तानीच्या बाबतीत अगदी स्पष्टच सांगायचं तर ‘बाजारात तुरी..’ सारखा प्रकार सध्या सुरू आहे. चित्रपटाचं गाणं प्रसिद्ध झालं आणि दुसऱ्याच दिवशी ‘बॅन द बाजीराव मस्तानी’ नावाचं फेसबुक पेज सुरू झालं. तर दुसरीकडे काशीबाई नाचल्या तर एवढय़ा काय मिरच्या झोंबल्या, तुम्ही तर आमचा सगळा इतिहासच नाचवून ठेवलाय, म्हणत एक फळी तयार झाली. नंतर चार दिवसांनी ट्रेलरदेखील आला. पण सर्वच्या सर्व चर्चा आजही त्या एका गाण्याच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. चित्रपट न पाहता, पण या चर्चेने काही चांगल्या वाईट गोष्टी दाखवून दिल्या. आपल्याकडे चर्चा होऊ शकते. कोणीही कसंही मत मांडू शकतं, वाद- प्रतिवाद करू शकतात, हा एक चांगला भाग. पण त्याच वेळी द्वेष, मत्सर, क्रोध, अशी सारी रूपं इतक्या हर तऱ्हेने उफाळून आली की नेमका रोष कशावर आहे, कलाकृतीवर की जातींवर असा प्रश्न निर्माण झाला.

अर्धवट माहितीवर केलेले दावे-प्रतिदावे, अगदी एकमेकांच्या घराण्याला हात घालणारी चर्चा, तुम्ही तेव्हा तसं केलं म्हणून आता फळं भोगा अशा रीतीने चर्चेने अनेक वळणं घेतली. ब्राह्मण समाजातल्या अभिनेत्रींच्या कामावर का टीका नाही करीत असे म्हणत त्या अभिनेत्रींच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप करणारी टीका झाली. ज्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उदो उदो केला त्यालाच पायदळी तुडवत जाणाऱ्या अशा प्रतिक्रियांनी गेली काही दिवस हे फेसबुकीय अवकाश व्यापून गेलं. तर काशीबाईंच्या नाचण्याच्या दृश्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी केवळ उच्च वर्गाचं कौतुक  करीत बाजीरावांच्या कर्तृत्वाची माहिती देण्यात धन्यता मानली. त्यातच बाबासाहेब पुरंदरेंच्या पुरस्काराला पाठिंबा दिलात मग आता का मिरच्या झोंबल्या, असा प्रश्न केला जाऊ लागला. पेशवाईतल्या मोजक्याच घटना माहीत असणाऱ्यांनी बाजीरावाला थेट त्यानंतरच्या भीमा कोरेगावच्या लढाईपर्यंत जिवंत ठेवलं. चित्रपटच आहे, दाखवलं तर काय झालं म्हणणारे जसे इतिहासाचे अभ्यासक नव्हते तसेच प्रतिवाद करणारेदेखील नव्हते. मग एकाच्या भिंतीवरून आवडलेली पोस्ट, प्रतिक्रिया दुसऱ्याच्या भिंतीवर डकव किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड कर यापलीकडे जाणारं सध्या तरी काहीच नाही. हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ानीच मुद्देसूद चर्चेचा बाज कायम ठेवला. त्यातदेखील काळाचा पट उभ्या करणाऱ्या घटकांना वाव मोजकाच होता.

एक मात्र नक्की की लाखो रुपये जनसंपर्क कंपन्यांवर खर्चून जे साध्य झालं नव्हतं ते सिनेमाकर्त्यांला या सर्व वादामुळे अगदी सहजपणे साधता आलं. एकंदरीत या प्रकाराला त्याने सिनेअभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नाव देऊन टाकलं आहे. अर्थातच आता हे गाणं उद्या एखाद्या पात्राच्या स्वप्नात होतं असं म्हणायला मोकळा झाला आणि तसाही चित्रपट येण्याआधीच इतकं झाल्यानंतर, असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि संबंधित दिग्दर्शकाची कारकीर्द पाहता असे सर्व काही होऊ शकतं. या सर्वाला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणायचं की वावदूकपणा हे मात्र सध्या तरी अधांतरीच आहे. कारण अजून चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे, वास्तव काय हे तेव्हाच कळू शकेल.

अर्थातच पीरियड फिल्म्सना असणारा अस्मितेचा तिढा असा वारंवार उसळला आहे आणि तो उसळत राहण्यासारखा आपला समाज आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. चित्रपटाने समाज बदलत नाही, मात्र त्या झिंगेत भुंगा मात्र कायम पिंगा घालत राहतो हेच यातून दिसून आलं इतकंच..

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
Twitter : @joshisuhas2