तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com
नटणं, सजणं ही माणसाची प्राचीन काळापासूनची आवड आहे. त्या आवडीतूनच वेगवेगळ्या धातूंचे, डिझाईनचे दागिने विकसित होत गेले आणि आता तर हे दागिने ही मोठी बाजारपेठच झाली आहे. या बाजारपेठेत सध्या काय ट्रेण्डिंग आहे?
आपण सुंदर, प्रेझेंटेबल दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. मी फॅशन करत नाही, असं म्हणणारा माणूस थोडी फार फॅशन करतोच. खरं तर स्वत:ला सजवायची कला अगदी प्राचीन काळापासून दिसून येते. स्वत:ला सजवण्यासाठी तेव्हा काय काय केलं जात होतं याचे वेगवेगळे पुरावे आज उपलब्ध आहेत. प्राचीन काळात माणूस नटण्या-सजण्यासाठी फुलं, लाकूड, शिंपले, हाडं, दगड यांसारख्या वस्तूंचा वापर करत असे. कालांतराने हस्तिदंत, तांबं, वेगवेगळे चमकदार खडे आणि नंतर चांदी, सोन्याचा वापर दागिने म्हणून होऊ लागला. भारतामध्ये या सगळ्या प्रकारच्या दागिन्यांची संस्कृती फार जुनी आहे. सोनं-चांदी या धातूंचा दागिन्यांसाठी वापर व्हायला लागल्यानंतर भारतीय लोकांच्या दागिन्यांसाठीच्या प्राधान्यामध्ये हे दोन धातू कायमच प्रथम क्रमांकावर आहेत आणि महागाई कितीही वाढली तरी भारतीय माणूस आपल्या आवडीच्या गोष्टी हमखास घेतोच. साहजिकच सणासुदीच्या वेळी सोन्याचांदीचे दागिने घालणं हे आलंच.
श्रावण महिना अनेक सण सोबत घेऊन येतो. बाकीच्या दिवशी लोक तयार होतील न होतील; परंतु सणासुदीला मात्र आवर्जून छान, पारंपरिक पद्धतीने तयार होतात. त्यासाठी पेहराव काय करायचा हे नक्की झालं की पुढच्या गोष्टी ठरवल्या जातात. केशरचना, मेकअप, चप्पल, पर्स या सगळ्या गोष्टीच्या पहिल्या क्रमांकावर असतात दागिने! जे कपडे घालणार आहोत त्यानुसार दागिन्यांची निवड होते. दरवर्षी भारतीय परंपरेनुसार दसऱ्याला सोन्या-चांदीच्या विशेष दागिन्यांची खरेदी होते. दरवर्षी नित्यनियमाने या दिवशी खरेदी करणारेही असतात. अशा ग्राहकांना नेहमीच काहीतरी नवीन हवं असतं. काही तरी नवीन घ्यायचं म्हणजे बाजारात नवीन काय आहे, कोणत्या डिझाईनला जास्त मागणी आहे, असे अनेक प्रश्न सतावू लागतात. सोने-चांदीच्या मौल्यवान वस्तू घ्यायच्या असतील तर आपण जास्तच बारकाईने विचार करतो. म्हणूनच यंदा सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये नवीन काय आहे याबद्दल जाणून घेऊयात.
काळानुसार सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्येही बदल होत असतात. नवीन पिढीनुसार, त्यांच्या आवडीनुसार दागिन्यांचा ट्रेण्ड बदलताना दिसून येतो, तर काही दागिन्यांचे प्रकार मात्र वर्षांनुवष्रे तसेच क्लासिक राहतात.
’ केसाचे ब्रोच : चमकदार रत्नांनी सुशोभित केलेले ब्रोचेस फॅशनमध्ये परत आले आहेत. मनोरंजन विश्वात सातत्याने येणारे इतिहासकालीन सिनेमे, मालिका याला कदाचित कारणीभूत असतील. साडीसारखा पारंपरिक पेहराव केल्यावर अगदी टिपिकल केशरचना केली जाते. अशा वेळी शक्यतो अंबाडा घातला जातो. त्यावर गजराही माळला जातो. त्यातून खुलणारं रूपडं आणखी सुंदर करण्यासाठी केसांमध्ये ब्रोच घातला जातो. पूर्वी फॅशनमध्ये असणारा ब्रोच आता परत आलाय. आकाराने जाड आणि नाजूक असे दोन्ही प्रकारचे ब्रोच तुम्हाला यंदा बाजारात मिळतील. प्लेन ब्रोचेसपेक्षा खडय़ांच्या ब्रोचेसमध्ये तुम्हाला जास्त पर्याय मिळतील.
’ कंबरपट्टा : केसांच्या ब्रोचप्रमाणे कंबरपट्टाची फॅशनदेखील पुन्हा एकदा आली आहे. तो पुन्हा ट्रेण्डमध्ये येण्यासाठीदेखील इतिहासकालीन घटनांवर आधारित अलीकडे आलेले सिनेमे आणि मालिका कारणीभूत आहेत असं म्हणता येईल. साडी, लेहेंगा अशा प्रकारच्या कपडय़ांवर नाजूकसा कंबरपट्टा काही औरच शान आणतो. त्यामुळे बारीक साखळी असलेले, खडे असलेले सोने आणि चांदी अशा दोन्ही धातूंचे कंबरपट्टे बाजारात आहेत. तरुणाईलाही वेस्टर्न स्कर्ट आणि क्रॉप टॉप, गाऊन, वनपीस यावर नाजूक कंबरपट्टा घालायला आवडतोच. मात्र लग्नसमारंभासाठी जाड आकाराच्या कंबरपट्टय़ांना मागणी आहे.
’ ब्रेसलेट्स : मोती, सोनं किंवा चांदीची ब्रेसलेट्स सध्या तुम्हाला सगळ्याच सोनारांच्या दुकानांत मिळतील. एक क्लासिक दागिना म्हणून याकडे पाहिलं जातं. डबल चेन ब्रेसलेटमध्येही तुम्हाला भरपूर वैविध्य बघायला मिळेल. चेन ब्रेसलेट सोने आणि चांदी अशा दोन्ही धातूंमध्ये उपलब्ध आहे. याखेरीज साधी प्लेन डिझाईनची रोजच्या वापरात चालतील अशी ब्रेसलेटही आहेत. ही सगळी ब्रेसलेट्स अॅडजेस्टेबल असल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरतात.
’ स्टेटमेंट ज्वेलरी : स्टेटमेंट ज्वेलरीकडे तरुणाईचा कल आहे. तरुण पिढीला एका वेळी जास्त आणि भरगच्च दागिने घालायला आवडत नाही. त्यामुळे एखादं पेंडंट, बाजूबंद, ब्रेसलेट असं घातलं जातं. टिपिकल डिझाईन असलेले दागिने खरं तर मोठय़ा प्रमाणावर विकले जात नाहीत, त्यामुळे दुकानात आता स्टेटमेंट ज्वेलरीही उपलब्ध आहे. छोटय़ा डिझायनर अंगठय़ा, नोज पिन्स, िबदी अशा रोज वापरता येतील. पार्टी वगैरेसारख्या कार्यक्रमांतही घालता येतील अशा गोष्टी नेहमीच ट्रेण्डमध्ये असतात आणि त्यामुळे त्यात तुम्हाला काही महिन्यांतच नवनवीन डिझाईन बघायला मिळतात.
’ मिक्स अॅण्ड मॅच : आताच्या तरुणाईला दागिने घालायला आवडतं. पण त्यातही त्यांना काहीतरी नवीन हवं असतं. आताची पिढी सगळ्यामध्ये मिक्स अॅण्ड मॅच, फ्यूजन काय करता येईल, घालता येईल हे बघते. एरव्ही पैंजण दोन्ही पायात घालतात, पण आताचे अँकलेट एकाच पायात घालतात. सध्या चांदीचे अँकलेट ट्रेण्डमध्ये आहेत. कारण सोन्याचे अँकलेट आपल्याकडे वापरात नाहीत. बाजूबंद पारंपरिक पेहरावावर घातला जात होता, पण आताची तरुण पिढी तो वेस्टर्न कपडय़ांवरही घालते, फक्त तिला डिझाइन मात्र नाजूक हवी असते. एखाद्या ज्वेलरीच्या डिझाइनमध्ये तुम्हाला वेगवेगळी कलाकुसर एकत्रित सापडेल.
’ वजनाने हलके दागिने : गेल्या एक-दोन वर्षांपासून लोकांचा कल लाइट वेट अर्थात वजनाने हलक्या दागिन्यांकडे आहे. फक्त सणांना आणि लग्नसमारंभातच सोनं-चांदीची खरेदी करायची असं मानण्याचा काळ आता गेला. आजकाल लोक आयुष्यातील छोटे छोटे क्षणही साजरे करतात, प्रत्येकासाठी आयुष्यातील काही महत्त्वाचे दिवस, आठवणी, क्षण हे सणासारखेच असतात. उदाहरणार्थ लग्नाचा ५० वा वाढदिवस, कोणी दुसऱ्या देशात शिकायला चाललं आहे म्हणून तर कुणाचा लग्नानंतरचा पहिलाच सण आहे म्हणून सोन्या-चांदीची खरेदी होते. आजकाल त्यासाठी वजनाने हलक्या दागिन्यांच्या खरेदीला प्राधान्य दिलं जातं. वजनाने हलक्या दागिन्यांची किंमतही कमी असते. हे दागिने आपण रोज घालू शकतो. त्यात पेंडंट, ब्रेसलेट्स, अंगठय़ा, कानातले अशा गोष्टी खूप ट्रेण्डमध्ये आहेत. नेकपीसमध्ये फिलीगिरी वर्क, ओरीगामी वर्क, टेम्पल ज्वेलरी या दागिन्यांना जास्त मागणी आहे. तर स्टड कानातले जास्त ट्रेण्डमध्ये आहेत. सोने किंवा चांदीसोबत रंगीबेरंगी खडय़ांचे हे कानातले रोज वापरता येतात.
’ हिऱ्यांचे दागिने : सोन्या-चांदीइतकंच आता हिऱ्यांनाही महत्त्व आलं आहे. खरंतर हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये स्त्रीपुरुष दोघेही वापरू शकतात अशी युनिसेक्स डिझाइन्स उपलब्ध असतात. लोकांचा या दागिन्यांकडे असलेला कल बघून अनेक मोठे ज्वेलर्सही हिऱ्यांचे दागिने तयार करायला प्राधान्य देऊ लागले आहेत. यंदाच्या सणासुदीला नैसर्गिक लूककडे लोकांचा कल आहे. जुन्या आणि नव्या दागिन्यांच्या डिझाइनच्या मिलाफातून उत्तमोत्तम कारागिरीचा नमुना असतील असे दागिने बाजारात आले आहेत. पारंपरिक डिझाइन उदारणार्थ रेड स्टोन किंवा डायमंड, टेम्पल डिझाइन, वेगवेगळ्या हेरिटेज वास्तूंच्या डिझाइनचे कानातले, हे बांगडय़ा आणि नेकपीसमध्ये ट्रेण्डिंग आहेत. हे दागिने साडी, लेहेंगा, पतियाला अशा कोणत्याही कपडय़ांवर सुंदर दिसतात. आताच्या स्त्रीला पारंपरिक आणि आधुनिक असं फ्यूजन असलेले पण भारतीय संस्कृतीला साजेसे दागिने आवडतात. या वर्षी फ्लोरल डिझाइनलाही मागणी आहे. फ्लोरल डिझाइन असलेल्या बांगडय़ा, कानातले, अंगठय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. रोजच्या वापरातील दागिन्यांसाठीच याचा वापर होतो, नववधूच्या दागिन्यांमध्ये हिरे वापरले जात नाहीत. पार्टीवेअर, इव्हििनग वेअरवरती घालण्यासाठी डिझायनर अंगठय़ा, नाजूक कानातले, पेंडट यांना जास्त मागणी आहे. हिरे आणि व्हाइट गोल्ड, माणिक, पाचू याचं कॉम्बिनेशनही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. मंगळसूत्राच्या वाटय़ाही लोक आता हिऱ्यांमध्ये करून घेऊ लागले आहेत. पूर्वी नवग्रहांची नथ असायची, पण आता तिथेही लोक हिऱ्यांना पसंती देत आहेत. एकंदरीत आपली बदललेल्या जीवनशैलीनुसार सोनं-चांदीसारखे मौल्यवान धातूही आपला लूक बदलत आहेत.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आवड भारतीय लोकांमध्ये कधीच कमी होणार नाही. पण या सोबतच इतर धातूंच्या दागिन्यांनाही लोक पसंती देतात. यामध्ये मुखत्वे प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे. तरुणाइमध्ये सध्या प्लॅटिनम ट्रेण्डमध्ये आहे. प्लॅटिनम दागिन्यांमध्ये वेिडग बॅण्डस, कडं, अंगठय़ा, नेकपीस, बांगडय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. ग्राहक भेटवस्तू देण्याकरिता, प्री वेिडग गिफ्ट्स म्हणून प्लॅटिनमची खरेदी करतात. प्लॅटिनम, पाचू आणि माणिक, असं प्लॅटिनम आणि वेगवेगळ्या रंगांचे हिरे हे कॉम्बिनेशन खूप प्रमाणात वापरलं जाताना दिसून येतं आहे. प्लॅटिनमप्रमाणे मोत्यांचे, वुडन बीड्सचे, मानवी आकाराचे पॅचेस असलेले, ऑक्सिडाइज्ड, वेगवेगळ्या नैसर्गिक खडय़ांचे दागिनेही बाजारात आहेत. असे दागिनेही वेगवेगळ्या सणांना, पार्टीत घातले जातात. रोज वापरले जातात. यामध्ये मुखत्वे स्टेटमेंट नेकपीस, कानातले, जोडप्यांसाठीच्या अंगठय़ा, अँकलेट्स, ब्रेसलेट ट्रेण्डिंग आहेत. प्लॅटिनम गिल्ड इंटरनॅशनल (पीजीआय) च्या वतीने २०१७ मध्ये प्लॅटिनमच्या दागिन्यांविषयी निरीक्षणे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यापुढील काळात तरुण ग्राहक तसंच विवाहित वर्ग प्लॅटिनमच्या दागिन्यांकडे मोठय़ा प्रमाणात वळेल आणि त्यामुळे प्लॅटिनमच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.