दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा एक अपरिहार्य भाग म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे चविष्ट पदार्थ करणं, आपल्या माणसांना खायला घालणं. अशा पदार्थाच्या तुमच्या यादीत या आणखी काही रेसिपींचाही समावेश करा..

कलाकंद

ruchkar-46साहित्य :

१ लिटर दूध

एका लिंबाचा रस

दीडशे ग्राम खवा

१ वाटी साखर (साधारण १५० ते १७५ ग्राम)

१/२ चमचा वेलची पूड

पिस्त्याचे पातळ काप

कृती:

१)    दूध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दूध गरम झाले की त्यात लिंबाचा रस घालावा. दूध फाटले की सुती कपडय़ावर पनीर गाळून घ्यावे.

२)    गाळलेले पनीर फडक्यातच असताना गार पाण्याने थोडे धुऊन घ्यावे म्हणजे लिंबाची आंबट चव आणि वास निघून जाईल. गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.

४)    खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांडय़ात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. साखर वितळली की मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. पाच मिनिटांनी पनीर आणि वेलची पूड घालावी.

५)    पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली की लगेच टीनच्या ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे. वरून पिस्त्याचे काप घालावे. गार झाल्यावर वडय़ा पाडाव्यात.

वडय़ा उरल्या तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

टिपा:

१)    आवडीनुसार खवा किंवा पनीरचे प्रमाण कमी-जास्त करावे.

२)    पनीर ताजेच बनवावे. तसेच दूध फाटल्यावर गाळून, घट्ट पिळून लगेच पनीर वापरावा. पाणी निथळण्यासाठी खूप वेळ टांगून ठेवू नये.

३)    वेलची-केशर यांचे रेडीमेड सिरप मिळते ते चमचाभर वापरल्याने रंगही पिवळसर येतो आणि केशर वेलचीचा स्वादही छान येतो.

४)    एक वाटी साखरेमुळे बेताचे गोड होते. अजून गोड हवे असेल तर दोन ते तीन चमचे साखर वाढवावी.

६)    मिश्रण ट्रेमध्ये थापल्यानंतर वरून चांदीचा वर्खही लावू शकतो. त्यामुळे कलाकंद अधिक आकर्षक दिसेल.

बिटाच्या वडय़ा

ruchkar-50साहित्य :

दीड वाटी उकडून किसलेला बीट

२ वाटय़ा साखर

३/४ वाटी खवलेला ताजा नारळ

१/२ चमचा वेलची पूड

२ चमचे तूप

१/२ चमचा लिंबाचा रस

कृती :

१)    बीट कुकरमध्ये एक ते दोन शिट्टय़ा करून उकडून घ्यावा. गार झाल्यावर साल काढून टाकावे. मध्यम भोकाच्या किसणीवर किसून घ्यावे.

२)    स्टीलच्या ताटाला मागच्या बाजूला तूप लावून ठेवावे. तसेच वडय़ा थापायला जाड प्लास्टिकचा कागद तूप लावून तयार ठेवावा.

३)    पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात साखर, नारळ आणि किसलेले बीट एकत्र करून मध्यम आचेवर गॅस ठेवावा.

४)    सारखे ढवळत राहून आटवावे. मिश्रण आधी एकदम पातळ होईल मग हळूहळू घट्टसर होईल. संपूर्ण साधारण सात-आठ मिनिटे लागतील. मिश्रण कालथ्याने पॅनच्या मध्यभागी जमा करून निरीक्षण करावे. जर मिश्रण पसरत नसेल तर लगेच गॅसवरून खाली उतरवावे आणि ताटलीवर ओतावे किंवा मिश्रणाचा छोटासा थेंब घेऊन थोडा गार झाला की गोळा करून बघावा. जर तो कोरडा घट्ट झाला की मिश्रण तयार आहे असे समजावे.

५)    मिश्रण तयार होत आले की लिंबाचा रस, वेलची पूड घालावी. मिश्रण ताटावर घालून थापावे. सुरीला तूप लावून सुरीने चौकोनी आकारात खुणा करून घ्याव्यात. मिश्रण सुकले की वडय़ा मोकळ्या कराव्यात.

पनीर खीर

ruchkar-47साहित्य :

दीड वाटी किसलेले पनीर (मोठय़ा भोकाची किसणी वापरावी)

७ वाटय़ा दूध

पाऊण वाटी साखर (जास्त गोड आवडत असल्यास जास्त घालावी)

१/२ चमचा वेलची पूड

३ चमचे बदाम-पिस्त्याचे पातळ काप

कृती :

१)    दूध निम्मे होईस्तोवर आटवावे. नंतर त्यात पनीर आणि बदाम-पिस्त्याचे काप घालावे. काही मिनिटे उकळी काढावी.

३)    पनीर थोडे शिजले की त्यात साखर घालून मंद आचेवर ढवळावे. तीन-चार मिनिटांनी आच बंद करून वेलची पूड घालावी.

खीर निवाली की फ्रीजमध्ये ठेवावे.

थंड सव्‍‌र्ह करावे.

जाड पोह्यंचा चिवडा

ruchkar-48साहित्य :

५ वाटय़ा जाडे पोहे

पाऊण वाटी शेंगदाणे

१/२ वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप

१/४ वाटी काजूचे तुकडे

१/४ वाटी चणाडाळ

५ ते ६ सुक्या मिरच्या किंवा एक चमचा लाल तिखट

५ ते ६ कढीपत्ता पाने

१/२ चमचा हळद

३ चमचे पिठी साखर

१/४ चमचे जिरेपूड

तेल

कृती :

१)    कढईत तेल गरम करा. तेलात शेंगदाणे, काजू, सुके खोबरे, कढीपत्ता आणि चण्याचं डाळं वेगवेगळं तळून घ्या. एका परातीत हे सर्व काढून ठेवा.

२)    उरलेल्या तेलात जाडे पोहे तळून घ्या. पोहे चांगले फुलले पाहिजेत पण रंग पांढराशुभ्रच राहिला पाहिजे.

३)    तळलेले पोहे परातीमध्ये काढावे. यामध्ये हळद, तिखट, जिरेपूड, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. तळलेले शेंगदाणे, काजू, खोबरे आणि डाळंही मिक्स करावं.

तळलेल्या पोह्यचा चिवडा तयार!

टीप्स :

पोहे शेवटीच तळावेत. कारण पोह्यतील बारीक कण जळून तेलाच्या तळाशी राळ बसतो.

पोह्यतील बारीक कण तेलात जळतात आणि तळाला बसतात. म्हणून कढईत एक लहान मेटलची चाळणी किंवा मेटलचे गाळणे घेऊन त्यात पोहे ठेवावे आणि ही चाळणी गरम तेलात बुडवून पोहे फुलेस्तोवर तळावे. पोहे फुलले की लगेच चाळणी वर काढावी. म्हणजे पोहे तेलात सर्वत्र पसरणार नाहीत. तसेच तेलात जळलेले पोह्यतील कण तळाशीच राहतात.

चवीनुसार हळद, साखर, जिरेपूड, मीठ आणि लाल तिखट यांचे प्रमाण अ‍ॅडजस्ट करावे. जर सुक्या लाल मिरच्या वापरणार असाल तर लाल तिखट घालू नये.

चण्याची डाळ म्हणजे फुटाण्याचं डाळं जे आपण साध्या चिवडय़ात वापरतो.

केक फ्रुट कस्टर्ड
साहित्य :

८ तुकडे स्पाँज केक

२ चमचे कस्टर्ड पाउडर

पाऊण लिटर दूध

३ ते ४ चमचे साखर

१/२ वाटी संत्र (सोलून आतला गर)

१/२ वाटी डाळिंब दाणे

१/२ वाटी सफरचंद तुकडे

१ मध्यम केळं

४-५ चमचे स्ट्रॉबेरी क्रश

ड्राय फ्रुट्सचे तुकडे (बदाम, पिस्ता, बेदाणे)

कृती :

१)    पाऊण लिटर दुधातून एक वाटी दूध बाजूला काढावे. बाकीचे दूध साखर घालून उकळवून घ्यावे.

२)    एक वाटी गार दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करावी. दूध उकळायला लागले की त्यात कस्टर्ड पावडर मिक्स केलेले दूध घालून मंद आचेवर ढवळावे. दूध दोन मिनिटे उकळवावे. ढवळत राहावे.

३)    चार काचेच्या बाऊलमध्ये एकेक केकचा तुकडा ठेवावा. त्यावर कोमट कस्टर्ड घालावे.

४)    वर सर्व फळांचे तुकडे, ड्रायफ्रुटचे तुकडे, स्ट्रॉबेरी क्रश घालून गार्निश करावे. थंड करून सव्‍‌र्ह करावे.

टीप : साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त घालावे.

चुर्मा लाडू

ruchkar-51साहित्य :

दीड वाटी बेसन

एक वाटी साखर

अर्धा वाटी पाणी

१/४ किलो तूप

१/२ चमचा वेलचीपूड

१ चमचा बेदाणे

कृती :

१)    बेसन एका वाडग्यात घालावे. दोन चमचे कडकडीत गरम तुपाचे मोहन बेसनात घालावे. मिक्स करून दोन-चार चमचे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.

२)    १५ मिनिटांनी परत एकदा मळून घ्यावे. खूप घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून मळावे. (पुरी लाटता येईल इतपतच मऊ  करावे)

३)    कढईत तूप गरम करावे. मळलेल्या बेसनाच्या पातळसर पुऱ्या लाटाव्यात. या पुऱ्या गरम तुपात तळून घ्याव्यात. आच मध्यम आणि मंद यांच्यामध्ये ठेवावी.

४)    पुऱ्या तळल्यावर खुसखुशीत झाल्या पाहिजेत. पुऱ्या कोमट झाल्या की हाताने चुरून घ्याव्यात. चाळणीवर चाळून चाळणीत उरलेला जाडसर भाग लाटण्याने लाटून बारीक करावे किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावे. (शॉर्टकट – पुऱ्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड करावी)

५)    साखर आणि पाणी एकत्र करून दोन तारी पाक करावा. साखर विरघळून उकळी फुटली की तीन-चार मिनिटांनी पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकावा. दोन चिमटीत घेऊन उघडझाप करावी. दोन तारा दिसल्या तर पाक तयार झाला असे समजावे नाही तर अजून थोडा वेळ उकळावे. फक्त मध्ये मध्ये तार चेक करीत राहावी. गरम दोनतारी पाक कुटलेल्या बेसनात घालावा. वेलचीपूड आणि बेदाणे घालावे. मिक्स करून मिश्रण आळू द्यावे.

६)    मिश्रण आळले की लाडू वळावेत.

टिपा :

  • लाडूचे मिश्रण आळायला लागणारा वेळ बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.

पाक जर दोनतारीपेक्षा थोडा जास्त झाला तर लाडूचे मिश्रण लवकर आळेल. पाक जर दोनतारीपेक्षा कमी आटला असेल तर वेळ जास्त लागेल.

  • पुऱ्या खूप डार्क रंग येईपर्यंत तळू नयेत. गडद रंग आल्यास लाडूसुद्धा काळपट रंगाचे होतील.
  • या लाडवांची चव थोडी बुंदी लाडूसारखी लागते.
  • वरील पाककृतीत बेसनाऐवजी गव्हाचे पीठ आणि थोडा रवा वापरूनसुद्धा चुरमा लाडू बनवता येतात. गव्हाची कणिक (७० टक्के)  आणि रवा (३० टक्के).
  •  ६ कप बेसन आणि ४ कप साखर वापरून केलेला पाक यापासून साधारण ४५ ते ५० लाडू होतील.

टाको कोन्स

ruchkar-49साहित्य :

टाको कोन्ससाठी

१ वाटी मक्याचे पीठ

१/२ वाटी मैदा

१ चमचा तेल

मीठ

तेल

स्टफिंगसाठी

१ वाटी वाफवलेला राजमा

४ चमचे टोमॅटो केचप

१ चमचा रेड चिली पेस्ट

मीठ

चीज

लेटय़ुस

१/२ वाटी टोमॅटो साल्सा

कृती :

१)    मक्याचे पीठ, मैदा, एक चमचा कडकडीत गरम तेल आणि मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून मध्यम मळावे.

२)    मळलेले पिठाचे लिंबापेक्षा थोडे मोठे गोळे करावे. कोरडा मैदा लावून पोळी लाटावी.

३)    ८ ते १० इंची डब्याने लाटलेल्या पोळीचा गोल कापून घ्यावा. काटय़ाने टोचे मारावेत. चार चतकोरात कापून घ्याव्यात. चतकोराला कोनाचा आकार द्यवा. हे कोन वाऱ्यावरच सुकू द्यावे.

४)    तेल तापवून आच मध्यम करावी. कोण तळून घ्यावेत.

५)    तळलेले कोन्स पेपरवर काढून ठेवावे.

६)    स्टफिंगसाठी राजमा सुरीने थोडा मोडून घ्यावा. त्यात साल्सा, टॉमेटो केचप, रेड चिली पेस्ट आणि मीठ घालून मिकस करावे. किंचित साखर घालावी. हे सर्व स्टफिंग कोनमध्ये भरावे. वर थोडेसे चीज आणि लेटय़ुस घालून सजवावे. लगेच सव्‍‌र्ह करावे.

टीप :
जर कोन बनवायचे नसतील तर पुरीएवढय़ा पोळ्या कराव्यात. तळून त्या गरम असतानाच व आकारात शेप द्यावा. वर तयार केलेले स्टफिंग भरून सव्‍‌र्ह करावे.

चुरमुऱ्याचे लाडू

ruchkar-54साहित्य :

५ ते साडेपाच वाटय़ा चुरमुरे

१ वाटी चिक्कीचा गूळ

कृती :

१)    पातेल्यात चिक्कीच्या गूळ घालावा. गुळाचा पाक होऊन उकळायला लागला की लगेच त्यात चुरमुरे घालून ढवळावे.

२)    मिश्रण गरम असतानाच लाडू वळावेत.

टीप :

साध्या गुळाचेसुद्धा लाडू चांगले होतात, पण चिक्कीच्या गुळाचा खमंगपणा त्यांना येत नाही.

साध्या गुळाचे जर लाडू बनवले तर एक वाटी गुळाला तीन ते साडेतीन वाटय़ा चुरमुरे घ्यावे.

साध्या किंवा भडंगच्या चुरमुऱ्याचे लाडू चवीला सारखेच लागतात, पण साध्या चुरमुऱ्यापेक्षा भडंगाच्या चुरमुऱ्याचे लाडू दिसायला आकर्षक असतो.

आवडत असल्यास भाजलेल्या शेंगदाण्याचे तुकडे, थोडी डाळ घालू शकतो.

स्ट्रॉबेरी पाइनॅपल फिझ

साहित्य :

१ कप स्ट्रॉबेरी ज्यूस

१ कप पाइनॅपल ज्यूस

३ कप क्लब सोडा

१०-१५ पुदिन्याची पाने

बर्फ

कृती :

१)    स्ट्रॉबेरी ज्यूस आणि पाइनॅपल ज्यूस थंड असावे. एकत्र करून घ्यावे.

२)    त्यात पुदिन्याची पाने क्रश करून घालावी. थंड क्लब सोडा घालून मिक्स करावे.

३)    बर्फ घालून मॉकटेल ग्लासमध्ये सव्‍‌र्ह करावे.

बदामाच्या वडय़ा

ruchkar-53साहित्य :

सव्वा वाटी बदामाची बारीक पूड

३/४ वाटी पिठी साखर

१/२ वाटी मिल्क पावडर

१/४ वाटी दूध

१ चमचा तूप

१/४ चमचा वेलचीपूड

कृती :

१)    सव्वा वाटीपैकी एक वाटी बदाम पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दूध आणि वेलची पावडर एका काचेच्या बोलमध्ये एकत्र करावे. नीट मिक्स करावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

२)    मिश्रण दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. दर ३०-४० सेकंदानी ढवळा. मिश्रण चांगले उकळले की बाहेर काढावे. आळेस्तोवर मध्ये मध्ये ढवळावे.

३)    मिश्रण जरा आळले की त्यात लागल्यास थोडी बदाम पावडर घालावी. नीट मिक्स करून कणिक जेवढी घट्ट असते तसा गोळा तयार करावा.

४)    पोळपाटाला किंवा फ्लॅट सरफेसला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटावी. असल्यास चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वडय़ा कापाव्यात.

टिपा :

बदामची पूड एकदम बारीक असावी. वाटल्यास बारीक केलेली पूड बारीक चाळणीने चाळून जाडसर पूड परत बारीक करावी.

वरील मिश्रणात थोडे केशर घातले तरी रंग आणि चव खूप छान येते. गरम दुधामध्ये दोन-तीन चिमटी केशर भिजवून चिमटीने कुस्करून घ्यावे आणि हे दूध मिश्रणात घालावे.

मिल्क पावडरऐवजी हलकासा भाजलेला खवा वापरला तरीही चालेल.

मसाला कॅश्यूनट्स

ruchkar-56साहित्य :

२०० ग्राम काजू

१ चमचा तूप

मसाला :

१/२ चमचा धणेपूड

१/४ चमचा जिरेपूड

१/४ चमचा आमचूर पावडर

१ चमचा लाल तिखट

१/४ चमचा मिरपूड

किंचित साखर

थोडं मीठ

कृती :

१)    काजू तुपावर मंद आचेवर परतून घ्यावे.

२)    मसाल्याचे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. काजू जरा कोमट झाले की त्यावर हा मसाला पेरून हलके मिक्स करावे.

अंजीर ड्राय फ्रूट रोल
ruchkar-57साहित्य :

एक वाटी अंजीर

अर्धा वाटी खजूर

अर्धी वाटी पिस्ता

अर्धी वाटी काजू

पाव वाटी बदाम

पाव वाटी अक्रोड

पाव चमचा वेलचीपूड

कृती :

१)    अंजीर कोमट पाण्यात भिजत घालावे. मऊ  झाले की सुती कपडय़ावर काढून अधिकचे पाणी टिपून घ्यावे. बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.

२)    खजूर मऊ  असावेत. बारीक चिरून घ्यावे. पिस्ता, काजू, बदाम, अक्रोड बारीक चिरून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये भरडसर फिरवून घ्यावे.

३)    कढईत तूप गरम करून त्यात अंजीर पेस्ट घालून परतावे. यात ड्रायफ्रूटचे आणि खजुराचे  तुकडे घालून मिक्स करावे.

४)    तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण सेट करावे. त्यावर असल्यास चांदीचा वर्ख लावावा. चौकोनी तुकडे करून घ्यावे.

चॉकलेट फज

ruchkar-55साहित्य :

एक वाटी चॉकलेटचे तुकडे (कूकिंग चॉकलेट)

३/४ वाटी कंडेन्स मिल्क

१ चमचा लोणी

१/४ वाटी अक्रोडचे तुकडे

पाव चमचा वॅनिला इसेन्स

कृती :

१)    मोठय़ा पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यावर बसेल असे दुसरे स्टीलचे भांडे किंवा वाडगे घ्यावे. त्यात चॉकलेट, कंडेन्स मिल्क आणि लोणी घालून मिक्स करावे.

२)    सतत ढवळावे. चॉकलेट पूर्ण वितळले की त्यात अक्रोडाचे तुकडे आणि वॅनिला इसेन्स घालावा. टीन ट्रेला हलकासा बटरचा हात लावावा. त्यात हे मिश्रण ओतावे.

३)    गार होऊ द्यावे. थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करावे. सुरीने कापून फज तयार करावे.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com