गणपती म्हणजे मराठी लोकांचं लाडकं दैवत! त्यामुळे गणेश उत्सव म्हणजे सर्वासाठी मोठय़ा उत्साहाचा काळ! असं म्हणतात की, मराठी माणूस ओळखायचा कसा? या प्रश्नाचं अगदी साधं उत्तर देता येतं. ‘गणपती बाप्पा’ असं ओरडल्यावर ‘मोरया’ असा जो प्रतिसाद देतो तो नक्की मराठी! मग तो भला महाराष्ट्राबाहेर का राहत असो. त्याच्या तोंडून हे शब्द आपोआप बाहेर पडतात. आम्ही पोटा-पाण्यासाठी बॉस्टनमध्ये राहणारे मराठी लोकदेखील गणेश उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करतो.
आमच्या बॉस्टनच्या मराठी मंडळाचे नाव आहे न्यू इंग्लंड मराठी मंडळ. या मंडळामार्फत आम्ही वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. पण गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाचा मान अन् रुबाबच वेगळा! दर वर्षी या उत्सवानिमित्त आम्ही ३००पेक्षा जास्त कुटुंब मिळून-मिसळून हा सण साजरा करतो. उत्सव साजरा करण्याच्या आनंदाबरोबर सातसमुद्रापलीकडे जन्मलेल्या नव्या पिढीला आपल्या मराठी संस्कृतीची ओळख करून देण्यात एक वेगळा आनंद असतो.
गणेशोत्सव कार्यक्रमासाठी आम्ही एक शाळा भाडय़ाने घेतो. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच जाऊन मंडळाचे उत्साही कार्यकर्ते गणेशोत्सवासाठीची सजावट आणि तयारी करून ठेवतात. कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या मिरवणुकीने होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि झांज-लेझीमच्या तालावर गणपतीची स्वारी हळूहळू पुढे जाते आणि मोठय़ा उत्साहात स्थानापन्न होते. ही अस्सल मराठी वाद्ये अमेरिकेत सहज उपलब्ध नसल्याने या मिरवणुकीसाठी आमच्या काही हौशी मंडळींनी ही वाद्ये भारतातून आणली आहेत. मिरवणुकीनंतर गणपतीची साग्रसंगीत पूजा आणि महाआरती असते. या निमित्ताने अनेक आरत्या गायल्या जातात. या वेळी पर्यावरणाचा विचार करून आरतीच्या कागदांचा अपव्यय टाळला जातो. सर्व लोकांना आरत्या (क्रमासह) इमेलद्वारा आधीच कळवल्या जातात. त्यामुळे सर्वाना एकत्र आरत्या म्हणणं एकदम सोपं होऊन जातं!
गणेश प्रतिष्ठापना झाल्यानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमास सुरुवात होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपाने सर्वाना एकत्र आणून चांगला कार्यक्रम करायचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. यामध्ये सुमारे १०० लहान-मोठे कलाकार सहभागी होतात आणि त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. अर्थात एवढा मोठा कार्यक्रम करायचे म्हणजे भरपूर तयारी लागणारच! अनेक लोक एकमेकांपासून अगदी ५० मैल लांब राहत असल्याने आम्ही मे महिन्यापासूनच कामाला लागतो. त्यानंतर विकेंड आणि सवड मिळेल त्याप्रमाणे प्रॅक्टिस सुरू होतात आणि सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव कार्यक्रमात ते श्रम फळास येतात. गेल्या काही वर्षांमध्ये मंडळाने मराठी सण, संस्कृती, भारतातील विविध नृत्यप्रकार असे थीम असलेले अनेक कार्यक्रम लोकांसमोर सादर केले आहेत. या वर्षी पण मराठी सिनेमा या विषयावरचा ‘लख लख चंदेरी’ हा कार्यक्रम २६ सप्टेंबरला होणार आहे!
कार्यक्रमाची सांगता खास मराठमोळ्या भोजनाने होते आणि गणपती बाप्पांसह सर्व भक्तगण आनंदाने आपापल्या घरी परत जातात!!!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा