परदेशात घुमणारा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आता नवा राहिलेला नाही. गेल्या तीन दशकांत उच्चशिक्षणासाठी आणि अर्थार्जनासाठी सातासमुद्रापार गेलेल्या भारतीयांची आणि त्यातही मराठीजनांची संख्या प्रचंड वाढली आहे. मराठी माणूस संस्कृतिप्रिय वगैरे असल्यामुळे तो आपल्याबरोबर आपले सण- उत्सवही घेऊन जातो. गणेशोत्सव तर मराठी मनाचा मानबिंदू. त्यामुळे कुटुंबासह परदेशी स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली तसा घरचा गणपतीही समुद्र उल्लंघून पलीकडे पोहोचला. ‘आमचे येथे पेणचे सर्वागसुंदर गणपती मिळतील’ ही पाटी इंग्लंड आणि अमेरिकेतील भारतीयबहुल शहराच्या एखाद्या दुकानात दिसली तर आश्चर्य वाटायला नको. गणेशोत्सवादरम्यान दोन वर्षे ब्रिटनमध्ये राहण्याची संधी मिळाली तेव्हा परदेशातला, सातासमुद्रापारचा गणेशोत्सव जवळून बघता आला. चार-पाच वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वीपासूनच लंडनमध्ये कसे झकास देवगड हापूस मिळतात, आपले लोणची-पापड अगदी चितळ्यांच्या बाकरवडय़ाही मिळतात हे ऐकून होतेच. मराठी वृत्तपत्रांमधून तिकडच्या गणेशोत्सवाच्या बातम्या येणेही एव्हाना सरावाचे झाले होते. त्यामुळे लंडनमध्ये गणेशोत्सव हा तसा नवलाईचा विषय तेव्हाही नव्हताच. तरीही त्या थंड इंग्लिश वातावरणात आपला मराठमोळा गणराय कसा येतो, कसा सजतो आणि कसा दिसतो याची उत्सुकता होतीच.
आधी म्हटल्याप्रमाणे घरगुती गणपती-गौरी हा विषय फारसा नवा नव्हता. तिथे गेल्यानंतर ‘आपल्या’ मंडळींच्यात ऊठबस सुरू झाली, तशी कुठल्या दुकानात किती दिवस आधी गणेशमूर्ती मिळतात, थेट पेणच्या मूर्ती कुठे मिळतात, बुकिंग ऑनलाइन होते की कसे वगैरे गोष्टी आपोआप कळत गेल्या. लंडनधील मराठी जनांसाठी ‘मित्र-युके’ नावाचा एक ऑनलाइन गट या कामी खूप मदतीचा ठरतो. खुद्द लंडनच्या मध्यवस्तीत म्हणजे वेस्टमिन्सटर वगैरे बरोमध्ये (उपनगर) फारसे मराठीजन राहण्यास नाहीत. खरे तर कुठलेच परप्रांतीय येथे एकगठ्ठा वस्तीला नाहीत. भारतीयांची (खरे तर आशियायी लोकांची परदेशात आपली खरी ओळख असते, एशियन अशी. गोऱ्या मंडळींच्या लेखी भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन असा भेदाभेद अमंगळ!) एकगठ्ठा वस्ती लंडनच्या पश्चिमेकडच्या उपनगरांमध्ये हल्ली मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. हॅरो, हाऊन्सलो, ब्रेण्ट, इलिंग या लंडनच्या बरोजमध्ये भारतीय लोकवस्ती मोठय़ा प्रमाणावर आहे. यातील हौन्सलो, हॅरो, वेम्बली या भागांत मराठीजन आहेत. खरे तर या भागात मराठीजनांचे येणे-जाणे आहे, असे म्हणता येईल. कारण गुजराती, तमिळ किंवा पंजाबी लोकांप्रमाणे मराठी समाज कुठल्या एका उपनगरात वस्तीला नाही. नोकरी, व्यवसायाच्या गरजांप्रमाणे जागोजागी विखुरला आहे, तर लंडनमधला गणेशोत्सव बघण्यासाठी कुठल्या एका उपनगरात जाता येणार नाही; पण घरगुती गणेशोत्सवापेक्षा उत्सवाचे सार्वजनिक रूप बघणे उत्सुकतेचा विषय होता.
सार्वजनिक गणेशोत्सव
ब्रिटनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊनही खरे तर बरीच वर्षे झाली आहेत. पण आता होते आहे, तेवढी चर्चा तेव्हा नव्हती. लंडनच्या परिघाबाहेर याचा विस्तार आता वाढतोय. ब्रिटनमध्ये वाढणारा मराठी मंडळींचा ओघ बघता आणि त्यांची विखुरलेली वस्ती लक्षात घेता लंडनच्या बाहेर ब्रिटनच्या इतर शहरांमध्येही हल्ली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. रीतसर प्रायोजक शोधून, नव्या ऑनलाइन माध्यमांचा पुरेपूर वापर करत आता आपसातले नेटवर्किंग वाढले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढते आहे. डॉलिस हिलचे महाराष्ट्र मंडळ शिवाय इलफर्ड मित्र मंडळ आणि पश्चिमेकडचे हौन्सलो मित्र मंडळ यांचे सार्वजनिक उत्सव लंडनमध्ये असतात. लंडनच्या पश्चिमेकडे हीथ्रो विमानतळ आहे. या विमानतळाच्या अगदी जवळ हौन्सलो नावाचे उपनगर आहे. या भागात भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन लोकांची वस्ती सर्वाधिक आहे. या भागातील मराठी टक्काही वाढतो आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणारी मराठी मंडळी या भागात स्थायिक आहेत. विमानतळाजवळ असणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि इतर सेवाक्षेत्रांत या मंडळींच्या नोकऱ्या आहेत. काहींनी येथे व्यवसायही सुरू केले आहेत. गेल्या दशकभरात आसपासच्या मराठी मंडळींचे एकत्र येण्याचे प्रमाण वाढले आणि त्यातूनच गणपतीचीही सुरुवात झाली. हौन्सलो मित्र मंडळाच्या दोन दिवसांच्या गणेशोत्सवाला आता पश्चिम उपनगरांमधून मोठा प्रतिसाद मिळतो. उपनगरातील हिंदू मंदिरात षोडशोपचार पूजेने मूर्तीची प्रतिष्ठापना होते आणि नदीत रीतसर विसर्जनही केले जाते. काही वर्षांपूर्वी स्थानिक प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती थेम्स नदीत विसर्जन करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता ढोल-ताशे, लेझीमसह विसर्जन मिरवणूक निघते आणि थेम्स नदीत बाप्पाचे विसर्जनही होते.
लंडनचा आद्य गणेश
लंडनमधले महाराष्ट्र मंडळ हे तिथल्या मराठीजनांचे सगळ्यात जुने आणि मोठे असे मंडळ. या मंडळाचा इतिहास मोठा आहे. भारताबाहेरचे हेच सगळ्यात जुने मराठी मंडळ असावे. लंडनमधील डॉलिस हिल भागात मंडळाची स्वतच्या नावाने वास्तू आहे. तिथे अनेक वर्षे गणपती बसतो आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची लंडनमधील सुरुवात अर्थातच या मंडळापासून झाली. हे मंडळाचे पंचविसावे वर्ष आहे. गणपतीच्या निमित्ताने होणारे गेट-टुगेदर हे एक निमित्त. पण या मंडळाच्या वतीने संपूर्ण दहा दिवस गणेशोत्सव साजरा होतो. दहा दिवस गणपती बसणारे हे ब्रिटनमधील एकमेव मंडळ असावे.
लंडनबाहेरची मंडळे
बर्मिगहॅम, स्लाव, बेझिंग्सस्टोक, रीडिंग अशा लंडनबाहेरच्या भागातही मराठी मंडळे सुरू झाली आहेत. त्यातील स्लाव मित्र मंडळ, रीडिंग गणेशोत्सव मंडळ, मराठी मित्र मंडळ- मिडलँड्स, बेझिंग्सस्टोक गणेशोत्सव मंडळ गेली अनेक वर्षे गणपती उत्सव साजरा करीत आहेत. गणेश चतुर्थीच्या जवळ येणारा शनिवार-रविवार बघून उत्सवाचा मुख्य कार्यक्रम आखला जातो. कारण अर्थातच सुट्टी हे असते. गणेश चतुर्थीला सुट्टी नसल्याने बहुतेकांचा सार्वजनिक गणेशोत्सव वीकएण्डला साजरा होतो. पूजा, आरती याखेरीज वेगवेगळ्या स्पर्धा, अथर्वशीर्ष सहस्रावर्तन, अंताक्षरीसारखे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतीय खाद्योत्सव हेदेखील काही ठिकाणचे आकर्षण असते. पुढच्या पिढीपर्यंत आपले सण-उत्सव न्यावेत या भावनेने आणि गणेशोत्सवाच्या आपल्या देशातील आठवणी जागवण्याच्या उद्देशाने हे उत्सव सुरू झाले. त्यामुळे अर्थातच लहान मुलांचा सहभाग बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमधून असतो. विविध गुणदर्शन किंवा चित्रकला, रांगोळीसारख्या स्पर्धा मुद्दाम आयोजित केल्या जातात. ब्रिटनमधील सार्वजनिक गणेशोत्सव बघून सातासमुद्रापारचा गणेश बघण्याची उत्सुकता शमलीच. पण एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात आली. देशापासून, आपल्या माणसांपासून, संस्कृतीपासून जितके लांब जाऊ, तितकी तिची ओढ लागते. त्या ओढीमुळेच मग उत्सवाचे मर्म कायम ठेवून तो साजरे करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जातात. धार्मिकता, प्रादेशिकता याच्या पलीकडे जाणारा हा सीमेपारचा इंग्लिश गणेश म्हणूनच भावला आणि खूप काही सांगून गेला.छायाचित्र सौजन्य : अजय मुरुडकर, स्लाव मित्रमंडळ