गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांचाच लाडका सण. गणपती बाप्पा येण्याचा आनंद गणपतीप्रमाणेच दशदिशा व्यापून अष्टांगुळे उरतो. हल्ली जग छोटे झाले आहे आणि बाप्पांची कीर्ती मोठी होत होत सातासमुद्रापार पोचली आहे. म्हणूनच मुंबई, पुणे आणि नागपूरप्रमाणे आज अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि दुबईसारख्या देशांतही गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. अमेरिकेत जसजशी भारतीय माणसे येऊन स्थायिक होऊ लागली तसतसे भारतीय सण साजरे करण्याचे प्रमाण वाढत गेले. अमेरिकेतला मराठी माणूस इतर प्रांतांच्या आणि देशांच्या लोकांबरोबर मिळून मिसळून राहतो. सणांच्या दिवशी मात्र अमेरिकेतल्या प्रत्येक शहरात मराठी माणसे एकत्र येतात आणि आपल्या मायभूमीच्या, घरच्या आठवणींना उजाळा देत आपले मराठी सण साजरे करतात.
आमचे लॉस एंजिलिस महाराष्ट्र मंडळ जगाच्या एका सुंदर कोपऱ्यात, कॅलिफॉर्नियात पाम ट्रीजच्या छायेत वसलेले आहे. अवघ्या काही कुटुंबांनी एकत्र येऊन सुरू केलेले महाराष्ट्र मंडळ आज हजारो मराठी लोकांना एकत्र आणणारे त्यांचे माहेरघर झाले आहे. आजच्या तारखेस, महाराष्ट्र मंडळात २५० ते ३०० कुटुंबे सहभागी आहेत. दरवर्षी ह्या सभासदांमधून ११ ते १३ सदस्यांची कार्यकारिणी निवडली जाते. कार्यकारिणी दरवर्षी महाराष्ट्र मंडळातर्फे सगळे मराठी सण-गणेशोत्सव, दिवाळी, होळी, गुढीपाडवा आणि संक्रांत पारंपरिक पद्धतीने आयोजित करते. लॉस एंजिलिससारख्या मोठय़ा शहरात विखुरलेल्या मराठी कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी ह्य सणांसारखे दुसरे निमित्त नाही. ह्यशिवाय, स्थानिक कलाकारांना आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी एक मंच उपलब्ध होतो.
आमचा गणपती म्हणजे अगदी खास! महाराष्ट्र मंडळाच्या नवीन वर्षांची आणि कार्यकारिणीची सुरुवात गणेशोत्सवापासून होते. दोन महिने आधीपासूनच मंडळाची कार्यकारिणी उत्साहाने कामाला लागते आणि मूर्ती, आरास, पूजा आणि विसर्जनाचे नियोजन सुरू होते. लोकांना येणे सोयीचे जावे म्हणून गणेश चतुर्थीनंतरच्या पहिल्या शनिवारी आमचा एक दिवसाचा गणपती बसतो. लॉस एंजिलिस येथील एका शाळेच्या भव्य सभागृहात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. भल्या पहाटे गणपतीची मूर्ती वाजत गाजत येते आणि त्याची स्थापना नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हस्ते होते. विधिवत पूजा पार पडल्यानंतर हजारो मुखांनी म्हटलेली आरती आणि अथर्वशीर्ष यांनी गणपतीचे खरे स्वागत होते. यानंतरचे काही तास गणपतीचे दर्शन, महाप्रसाद आणी गप्पांसाठी राखून ठेवलेले असतात. लॉस एंजिलिस शहरात दूर दूर रहाणारे आणि म्हणूनच नेहमी न भेटू शकणारे मित्र-मैत्रिणी भेटतात. स्त्रियांना भरजरी साडय़ा, दागदागिने घालण्याची तसेच पुरुषांना सिल्कचे कुडते, धोतर आणि फेटे घालण्याची संधी मिळते. हे वातावरण पाहून भारतात असल्याची जाणीव होते. पारंपरिक वेशात नटलेली लहान मुले सर्वाच्याच कौतुकाचा विषय होतात. पहिल्यांदाच महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला आलेली नवोदित मंडळीं हे वातावरण बघून आपल्या मायभूमीपासून दूर असण्याची खंत विसरून जातात आणि ह्य नव्या कुटुंबात रममाण होतात.
गणेशोत्सवाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे खास मराठी पद्धतीने बनवलेले जेवण! मोदक, वालाचे बिरडे, श्रीखंड पुरी, मसाले भात अशा अप्रतिम मराठी थाटावर समस्त लॉस एंजेलिसकर खूश होऊन जातात! महाप्रसादानंतर करमणुकीचे कार्यRम होतात. यात स्थानिक कलाकारांना मुख्यत्वे वाव दिला जातो. गणेशोत्सवात मराठी शाळांमधले बाल कलाकार गणपतीची नृत्ये आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करतात. त्याचबरोबर, स्थानिक आणि इतर संस्थांनी आयोजित केलेल्या एकांकिका, गाणी आणि विनोदाचे कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करतात. कधी रांगोळी स्पर्धा, एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यांना स्थानिक लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
दिवस संध्याकाळकडे झुकायला लागताना बाप्पांना निरोप द्यायची वेळ जवळ येते. बाप्पांची मूर्ती निसर्गाचा समतोल न बिघडवणारी म्हणजेच मातीची किंवा शाडूची असेल याची मंडळ विशेष काळजी घेते. ढोलताशे आणि लेझीमाच्या गजरात पारंपारिक पद्धतीने बाप्पांची मिरवणूक पश्चिम किनाऱ्यावरच्या रिडोंडो बीचवर पोचते. समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी खास लॉस एंजिलिसच्या ‘किनारे आणि बंदर’ विभागाची परवानगी काढली जाते. तिथे आरती करून समुद्रात विसर्जन करताना आपल्या घरचा हा पाहुणा लवकर यावा अशी इच्छा सगळ्यांच्याच मनी असते. जसा मुंबईचा लालबागचा राजा, तसाच आमचा लॉस एंजिलिसचा राजा दरवर्षी प्रेमाने वाजात-गाजत येतो आणि निघताना हूरहूर लावतो. घरी परतल्यावर भारतात आई-वडिलांशी बोलताना मग कसबा पेठेतल्या गणपतीच्या विसर्जनास नसल्याची खंत थोडीशी कमी होते!
लॉस एंजिलिसचे महाराष्ट्र मंडळ मागील ४० वर्षांपासून दक्षिण कॅलिफॉर्नियातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्थांसह मंडळ दरवर्षी आपली व्याप्ती वाढवीत आहे. आपल्या आई-वडिलांचा उत्साह पाहून आज इथली अनिवासी मराठी मुले मोठय़ा संख्येने मंडळात सामील होत आहेत. मंडळाचे काही विशेष उपक्रम म्हणजे फिरते पुस्तकालय, वृत्तपत्र भरारी, दिवाळी अंक ‘उत्सव’, मराठी शाळा आणि समाजोपयोगी उपक्रम मार्ग यांचा येथील मराठी वर्ग मोठय़ा संख्येने लाभ घेतो. मराठी वाचनाची आवड असणाऱ्यांना फिरते पुस्तकालय मराठी पुस्तकांचा संग्रह क्षुल्लक किमतीत उपलब्ध करून देते. तसेच, मंडळाच्या चालू घडामोडी आणि भविष्यातील उपक्रम यांची समस्त माहिती त्रमासिक वृत्तपत्र ‘भरारी’मधून मिळते. दिवाळी अंकात कथा कविता आणि लेखांच्या माध्यमातून स्थानिक लोकांना आपले कलागुण दाखवायची संधी मिळते. ‘मार्ग’ हा उपक्रम नवीन आलेल्या मराठी बांधवांना येथे स्थिरावण्यास मदत करण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेला आहे. लोकांचे राहत्या घराचे, वाहतुकीचे प्रश्न किंवा व्हिसा, नागरिकत्व याबाबतीतल्या अडचणीत महाराष्ट्र मंडळ मदत करण्याचा प्रयत्न करते. येथील अनिवासी मराठी मुलांना आपल्या मायबोलीची ओळख व्हावी ह्य उद्देशाने महाराष्ट्र मंडळ शाळा चालवते. ह्य शाळा लॉस एंजिलिसमध्ये चार ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो. सर्व वयोगटांच्या लहान-थोरांना मंडळाच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी मंडळातर्फे विविध करमणुकीचे कार्यक्रम राबवले जातात. मंडळाच्या नव्या उपक्रमांपैकी एक म्हणजे मराठी उद्योजकांसाठी सुरू केलेला ‘नेम एलए’ हा उपक्रम. औद्योगिक जगतात येण्यासाठी मराठी लोकांना प्रवृत्त करणे आणि त्यांना आर्थिक, शैक्षणिक वा सामाजिक मदत करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
असे हे लोकांनी लोकांसाठी चालवलेले महाराष्ट्र मंडळ आज एलेकरांचे भारताबाहेरचे माहेर झाले आहे. दरवर्षी येणारे नवीन सदस्य आणि मंडळाच्या उपक्रमांना मिळताना वाढता प्रतिसाद हे ह्य मंडळाच्या यशाचे प्रतीक आहे. आता या वर्षीच्या गणपतीची सगळे आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आमच्या लॉस एंजिलिसच्या राजाला बघायला नक्की यायचं हं!
रसिका कुलकर्णी
लॉस एंजिलिस (अमेरिका) – ‘एलए’चा राजा!
गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांचाच लाडका सण.
Written by दीपक मराठे
First published on: 18-09-2015 at 01:23 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav celebration in los angeles america