‘गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी’.. आणि त्या महाराष्ट्रातल्या ‘गणेशोत्सवाच्या आठवणी’ नुसत्याच आठवणी न राहता त्यांना खऱ्या अर्थाने उजाळा देता यावा अन् त्याचबरोबर येथे जन्मलेल्या/ वाढणाऱ्या मराठी कुटुंबांतील बाल-गोपाळांना गणेशोत्सवाची माहिती अन् महती पटवून त्यांना त्याची मज्जा चाखता यावी, म्हणून येथे मेलबर्नमध्ये काही ठिकाणी ‘गणेशोत्सव’ साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राप्रमाणेच येथे देखील दीड दिवसाचा, पाच दिवसांचा आणि अनंत चतुर्दशीपर्यंतचा गणपती असतो.
येथील ऊंल्लीिल्लल्लॠ (डंडेनाँग) परिसरातील जवळपास ५० मराठी कुटुंबे जी गेल्या सात-दहा वर्षांत स्थलांतरित झालेली आहेत, येथे मराठी सणवार साजरे करतो. त्यातील गणपती उत्सव हा सर्वात जास्त आनंददायी महोत्सव!

lp55
येथील गणेश किरवे यांच्या ऊंल्लीिल्लल्लॠ (डंडेनाँग) येथील राहत्या घरी मागील तीन वर्षांपासून हा सण साजरा करतो. जरी हा गणपती घरगुती असला तरी त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप देण्यात गणेश किरवे आणि रुपाली किरवे सफल झाले आहेत. अगदी मखर- सजावटीपासून यांच्या घरी मराठी समुदायाचा राबता असतो. प्रत्येकाच्या डोक्यातील सुपीक कल्पनांनी, अनेक जर-तरवर विचार करून एकदाचे कशी सजावट करायची याचा निर्णय होतो. गणेश चतुर्थीच्या आदल्या साप्ताहिक सुटय़ांमध्ये ही सर्व तयारी करून ठेवली जाते. कारण एकदा का सोमवारी आठवडा सुरू झाला की जो-तो आपापल्या उद्योगधंद्यात गुंतून जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. ज्यांना शक्य होईल तेवढी कुटुंबे स्थापनेच्या वेळी उपस्थित असतात. पण खरी मज्जा येते ती शुक्रवार-शनिवार आणि रविवारच्या आरत्यांना. दोन दिवस असलेल्या साप्ताहिक सुट्टय़ांमध्ये खरी धमाल येते. हा गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत असल्याने दोन वेळा साप्ताहिक सुट्टय़ा येतात. सदर दिवशी सांज-आरत्यांना मोठय़ा आवाजात शक्य तेवढय़ा वाद्य वाजनात, मोठय़ा उपस्थितीत आम्ही महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो.
त्याचप्रमाणे अभय कांबळे यांच्या हॅम्पटन पार्क येथील घरी गौरी-गणपती असतात. याव्यतिरिक्त सचिन कडवे आणि नरहरी कुलकर्णी यांच्या घरीसुद्धा गणेशाचे आगमन होते. सदर उत्सवाचे निमित्त साधून काही ठिकाणी ‘सत्यनारायणा’ची पूजासुद्धा आयोजित केलेली असते. तसेच आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. कोणाच्या घरी कोणत्या दिवशी कार्यक्रम हे आधीच ठरवून घेतलेले असल्याने सर्वाकडे जवळजवळ सर्व समुदाय उपस्थित असतो.
भारतातून आणून ठेवलेले खास पारंपरिक पोशाख या दिवशी कपाटातून बाहेर पडतात. लहान-थोर सर्वच मोठय़ा उत्साहाने पारंपरिक पोशाखात सदर कार्यक्रमांना उपस्थित राहतो. बऱ्याचदा आयोजकांनी/ यजमानांनी तसे बजावून सांगितलेले असते. आरती, महाप्रसादानंतर करमणुकीचे कार्यक्रम होतात. प्रत्येकातील सुप्त गुण-दर्शन होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे येथे वाढणाऱ्या आमच्या चिमुकल्यांना ‘गणेशोत्सव’ समजावण्याचा प्रयत्न होतो.