अवघ्या महाराष्ट्रातील समस्त जनेतला आता गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. घराघरांमध्ये आणि मंडळामंडळांमध्ये ‘श्रीं’च्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळतेय. गणपतीच्या इकोफ्रेंडली मूर्ती आणण्याची चांगली प्रथाही रूढ होऊ पाहतेय.
गणेशोत्सव आला की बाजारांमध्ये त्यासाठी लागणाऱ्या अनेकविध वस्तू, मखर सजावटीसाठी लागणाऱ्या चीजवस्तूंची रेलचेल बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते. एक वैशिष्टय़पूर्ण अर्थकारण आपल्या प्रत्येकच उत्सवाशी निगडित वर्षभर सुरू असते. याच अर्थकारणाचाच एक भाग म्हणजे गणपतीच्या आरतीसंग्रहांच्या सीडीची बाजारपेठ आणि ओघानेच गणेशोत्सवादरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचीही बाजारपेठ असते.
हिंदी आणि मराठी चित्रपटांतील बाप्पांची गाणी ही आबालवृद्धांच्या तोंडी रुळलेली असतात. त्यामुळे दरवर्षी नवनवीन गाणी आणि संगीताच्या सीडी बाजारात उपलब्ध होत असतात. मराठी चित्रपटांबाबत मात्र परिस्थिती तशी नसते.
गणपती उत्सवादरम्यान सहसा मराठी चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत. कारण घरोघर लोक गणपती पूजनात व्यग्र असतात. त्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षक जात नाहीत. परंतु यंदा मात्र गणेशोत्सवादरम्यान ‘वक्रतुंड महाकाय’ हा मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रपटाच्या शीर्षकानुसारच यात गणपतीचा बाहुला आणि हा बाहुला आवडणारा अल्ताफ हा छोटा मुलगा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे हिंदीतील अनेक बडे बॅनर यानिमित्ताने मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर एकत्र आगमन करीत आहेत. अनुराग कश्यप, गुनित मोंगा (सिख्या एण्टरटेन्मेंट), बोहरा ब्रदर्स, अॅल्युम्ब्रा एण्टरटेन्मेंट मीडिया आणि सॅबाकॉम या कंपन्या ई-सेन्स मोशन पिक्चर्ससोबत एकत्र आल्या आहेत.
पुनर्वसू नाईक यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट नाटय़-थरारपट या प्रकारातील आहे. योगेश विनायक जोशी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून ‘चिल्लर पार्टी’ चित्रपटामुळे गाजलेला बालकलाकार नमन जैन, राष्ट्रीय पारितोषिक विजेता लेखक विजय मौर्य हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय प्रार्थना बेहरे, जयंत सावरकर, उषा नाडकर्णी, ऋषी देशपांडे, नचिकेत पूर्णपात्रे, राहुल पेठे, विनायक भावे, शशांक देशपांडे अशी कलावंत मंडळी यात आहेत.
अल्ताफ हा लहानगा गणपतीचा बाहुला एके ठिकाणाहून उचलतो. या बाहुलारूपी खेळण्यामध्ये बॉम्ब लपवलेला असतो. मुंबई महानगरावर यामार्फत दहशतवादी हल्ला करण्याची योजना असते. हे कथानक दाखविताना आजघडीला मानवी वास्तवता आणि मुंबई महानगराची वास्तविक जीवनशैली कशी आहे याची झलक चित्रपटातून घडविण्यात आली आहे.
ट्रेलरवरून अतिशय उत्कंठावर्धक घटनांचा हा चित्रपट असेल असा अंदाज करायला हरकत नाही. २५ सप्टेंबर रोजी म्हणजे गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर आठ दिवसांनी हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये ‘वक्रतुंड महाकाय’ हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com @suneel2020
आगामी : हिंदी आणि मराठीत बाप्पा…
अवघ्या महाराष्ट्रातील समस्त जनेतला आता गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत.
Written by दीपक मराठे
First published on: 11-09-2015 at 01:08 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh vishesh ganapati bappa in hindi and marathi