हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इथे श्रावणसरींची
रोज होते बरसात
त्याच आणतात वार्ता
आणि येती गणगोत
भाद्रपदाची चाहूल,
गणरायाचे पूजन
सण वरसाचा करी
सुखाचीही बरसात..!
कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. इतर प्रांतात गणरायाच्या आगमनाबरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणसाच्या मनात तसा पावसाळ्याबरोबरच सुरू होतो. आपल्या घरात यंदा येणारी गणपतीची मूर्ती कशी असावी यावर खल केला जातो. कॅलेंडरवरचं उत्तम चित्रं अगदी जपून ठेवलेलं असतं आणि या वेळी गणपतीच्या शाळेत अशी हुबेहूब मूर्ती बनवायला सांगायची असा गुप्त बेत घरची वरिष्ठ मंडळी आखतात, तेव्हाच पोरासोरांना येणाऱ्या गणेशोत्सवाचे वेघ लागलेले असतात. या आराध्य दैवताचा कोकणातला रुबाबच काही और असतो. आता कोकणी माणूस पूर्वीसारखा चाकरमान्यावर अवलंबून नसला तरी फार पूर्वीपासून चाकरमानी आणि गावचा त्याचा परिवार गणपतीसाठी काय वाट्टेल ते, अशाच मन:स्थितीत असायचा. आजही हा गणपतीच सर्वाना एकमेकांजवळ आणतो. कोकणातली गणेश चतुर्थी हा आबालवृद्धांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो.
गणपतीच्या शाळेत घराघरांतून नागपंचमीपर्यंत गणपतीची मूर्ती ठेवायचे पाट पोहोचलेले असतात आणि मग शाडूच्या मातीला आकार येऊ लागतो. कारागिराचे कसलेले हात लीलया फिरू लागतात आणि शाळेत एक एक मूर्ती अवतरायला लागते. गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ही निर्मिती प्रक्रिया न्याहाळण्यात शाळकरी मुलांना खूपच आनंद मिळतो आणि त्यांच्यावर मूर्तीकलेचे संस्कार नकळत होत जातात. शाडूचा मूर्तीवर शेड आणि मग होणारं रंगकाम एवढं सफाईदारपणे केलं जातं की त्या मनोहारी मूर्तीसमोरून पायच निघत नाही. कोकणातल्या या गणपतीच्या शाळा ही खरी तर कलामंदिरं आहेत. मुंबईसारख्या शहरात चिनी गणेश मूर्तीची आवक झालेली दिसते, पण कोकणात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात.
इकडे गणपतीसाठी घराघरांतही भिंती रंगवल्या जातात. मातीच्या भिंतींना कोकणच्या लाल मातीचा मुलामा चढवला जातो तर गणपतीच्या खोलीतली भिंत रंगवणं हा बालगोपालांचा आवडता कार्यक्रम असतो. देखण्या देखाव्यांनी भिंती सजतात. नक्षीदार वेलबुट्टीने त्यावर अखेरचा हात फिरवला जातो. आता चतुर्थी अगदी जवळ आलेली असते. माटवीला सजवण्यासाठी रानफुलं, वेली, नारळ, सुपारीपासून काकडी अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या जातात आणि माटवी सजते. मखराच्या कलाकुसरीचं काम करण्यात येतं. गणपतीला विराजमान होण्यासाठी चौरंगाची जागा, दारातून थेट दर्शन होईल अशी निवडली जाते. आता गणपतीचं स्वागत करायला मन अगदी अधीर झालेलं असतं.
श्रावणातली सोनपिवळी उन्हं रंगांचा उत्सव साजरा करायला लागतात तेव्हा कोकणातला निसर्गही नेत्रसुखाची उधळण करायला ठेवणीतले रंग घेऊन आधीच तयार असतो. पावसाचा जोर जरा ओसरलेला असतो आणि आकाशात काळ्या ढगांची जागा इंद्रधनूने घेतलेली असते. शेतीची कामं आता थोडी कमी झालेली असतात, कापणीच्या हंगामाला अजून अवकाश असतो. रंगीबेरंगी रानफुलांनी धरणी सजलेली असते. वाऱ्याच्या झोक्यावर डुलणारी हिरवी शेतं मखमलीचा भास निर्माण करीत असतात, पण हे सर्व थोडं नजरेआड कतरच मंडळी शेतीच्या बांधावरून लगबगीने गणपतीच्या शाळेकडे निघालेली असतात. नारळ आणि बोलीचे पैसे मूíतकाराच्या हातावर ठेवून मूर्ती उचलली जाते. बाहेरच्या अंगणात अगरबत्ती लावून झपझप पावलं टाकत तरणा गडी गणपती घेऊन वाडीकडे निघतो, घराच्या अंगणात येताच त्याच्या पायावर पाणी ओतून मूर्तीला आत घेतलं जातं. सुतळी बॉम्बचा बार उडवला जातो. तुळशीजवळ उदबत्तीचा सुगंध दरवळायला लागतो. तिथेच अंगणात शेजारचा माणूस त्या मूर्ती आणणाऱ्याला आपल्या गणपतीची मूर्ती आणण्यासाठी आपल्याबरोबर न्यायला आलेला असतो. सगळ्या अवाठातल्या (वाडीतल्या) मूर्ती आणण्याचं काम करणाराही तसा कसबीच म्हणायचा, पावसाळ्यात निसरडय़ा वाटेवरून मूर्ती आणणं हे फार जोखमीचं काम असतं.
हरितालिका पूजनात गृहिणी व्यस्त असतानाच शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून शहाळं-केळं भेट म्हणून आलेलं असतं. मनातल्या मनात त्याची परतफेड ठरवत असतानाच अनेक कामांचा उरक कसा करावा असा प्रश्न तिला पडलेला असतो, पण गणपतीच सगळं यथासांग पार पाडणार हा आत्मविश्वासच तिला बळ देत असतो. त्यातच चाकरमान्यांचं आगमन होतं. सकाळपासून त्यांच्या वाटेकडे डोळे लागलेले असतात. पण ते घरी पोहोचल्याशिवाय काही खरं नसतं. गेल्या वर्षी आदल्या दिवशी पोहोचणारा तो चतुर्थी दिवशीही आला नाही हा अनुभव तिच्या गाठीशी असतो. कोकण रेल्वे आणि परिवहन महामंडळाच्या गाडय़ा अव्याहत धावत असल्या तरी काही वेळा दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो आणि मग चतुर्थीची आरती मंडळीना वाटेतच जिथे असतील तिथे करण्यावाचून गत्यंतर नसतं. असा सगळा व्याप झाला तरी त्याचा उत्साह काही कमी झालेला नसतो. उलट पुढे वर्षांनुवर्षे सांगण्यासाठीचा एक किस्सा त्याला मनोमन सुखावून टाकतो.
घरोघरी गणपतीच्या मूर्ती आलेल्या असतात. मुलाबाळांचा जल्लोश सुरू असतो. उद्यापासून ‘भजनाक जावक व्हया’ म्हणून काही लोक पेटी, तबला, मृदुंग, टाळ, झांज यांची जुळवाजुळव करीत असतात. या वर्षी कुणाकडे किती दिवस गणपती राहाणार याचा अंदाज देवळात जमलेली मंडळी घेत असतात. त्याप्रमाणे रोज करण्याच्या भजनांचं आणि आरतीचं नियोजन त्यांना करायचं असतं. इथे पेटी वाजवणारा आणि ती उचलून घरोघरी नेणारा यांची विशेष खबर काढली जाते. तो पूर्ण दिवसांसाठी उपलब्ध आहे ना याची खातरजमा केली जाते. तबल्यावरची शाई या वर्षीही तशीच उडालेली आहे म्हणून कटाक्ष टाकले जातात. ‘जावदे पुढच्या वर्षांक काय तरी व्हयाच नाय?’ असं म्हणून तो विषय संपवण्यात येतो. शेवटी वाडीतल्या घरांचा क्रम ठरतो, वेळेवर हजर राहण्याची तंबी दिली जाते. ‘सकाळी भटजी लवकर इले पुरे’ म्हणत त्या बैठकीची सांगता होते.
भल्या पहाटे उठून आंघोळ करून फुलं, तुळशी, दुर्वा काढल्या जातात. सगळीकडे अमाप उत्साहाचं वातावरण असतं. गणपतीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते. पूजा आटोपल्यावर सजावटीकडे विशेष लक्ष पुरवलं जातं. उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा दरवळ सगळ्याच घराघरांतून येत असतो. अख्खं कोकण खऱ्या अर्थाने हा सण साजरा करीत असतं. महाराष्ट्रात इतरत्र दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी कोकणात मात्र गणेश चतुर्थीलाच होते. त्या अर्थाने इथे चतुर्थीतच दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी गणरायाला षोडशोपचारे पुजलं जातं. विजेच्या तोरणांची आरास मांडली जाते. सत्यनारायणाची महापूजा केली जाते. पाहुणे, मित्र-मंडळी यांची सतत ये-जा सुरू असते. याच दिवसांत करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळ्या घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात. भजनाला येणाऱ्यांत मंडळींसाठी खास उसळीचा बेत आखला जातो. जिकडे बघावं तिकडे उत्सव सुरू असतो. प्रत्येक माणूस चैतन्याने भरून गेलेला दिसतो.
अनेक रूढी आणि परंपरा यांचं पालन करण्यात कोकणातला देवभोळा माणूस चुकत नाही. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये हे माहिती असलं तरी चुकून वर नजर गेली आणि चंद्र दृष्टीस पडलाच तर मात्र तो बेचैन होतो. मग कुणाच्या तरी परडय़ातली भाजी गुपचूप तोडून तो त्या दोषाचं परिमार्जन करू पाहतो. या उत्सवात दिवस आणि रात्रही कमी पडते. बाजारपेठा उशिरापर्यंत उघडय़ा असतात. अनेकानेक वस्तूंनी दुकानं खचाखच भरलेली असतात. नव्या कपडय़ांची खरेदी केली जाते. मुलाबाळांची चंगळ होते. या दिवसात शाळेलाही सुट्टी असते.
गणेशोत्सवाच्या दिवसात कोकणात अशा प्रकारे मंगलमय वातावरण असतं. जगात अनेक उत्सव साजरे केले जातात, पण कोकणात साजरा होणारा हा उत्सव अगदी आगळावेगळा असाच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याला बराच काळ होऊन गेला, असं असलं तरी पर्यटनाच्या दृष्टीने या उत्सवाकडे म्हणावं तसं लक्ष पुरवलं गेलं नाही. पर्यटनाच्या दृष्टीने या सणाचा विचार केल्यास या उत्सवाला जागतिक महत्त्व प्राप्त होऊ शकतं. प्रत्येक घरात आरास केलेले देखावे, पारंपरिक भजनं, मेळे, फुगडय़ा, खेळ, संगीतबारी, कोकणी पदार्थाची रेलचेल, देखण्या मूर्ती, जुन्या पद्धतीची घरं यामुळे या दिवसात इथे येणाऱ्याला वेगळ्याच वातावरणाची अनुभूती घेता येईल.
हरितालिकेपासून गणपती विसर्जनापर्यंतच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं आणि त्या त्या दिवशी ते ते सर्व सोपस्कार अगदी मनोभावे पूर्ण केले जातात. पंचमी दिवशी दीड दिवसाचे गणपती जातात. त्याच दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाते. अळू, कंदमुळं आदी पाच भाज्यांची चविष्ट भाजी त्या दिवशी बनवली जाते. उंदरबी असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसात गौरींचं आगमन होतं. गौरी पूजन आणि विसर्जनाचा सोहळा यथासांग पार पाडला जातो. काही गणपतींचं विसर्जन गौरीसोबतच केलं जातं. अकराव्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच गणपतींचं विसर्जन होतं. विसर्जनाच्या वेळी आरती केल्यावर गणपतीला गाऱ्हाणं घातलं जातं. नवस बोलले जातात. गाऱ्हाणं, ते घालण्याची पद्धत हा खरा तर कोकणातला सांकृतिक ठेवाच आहे. एवढं सगळं झालं की गणपतीच्या हातावर दही ठेवलं जातं. एका माणसाने गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन जाण्याएवढं त्या मूर्तीचं वजन असतं. वाजतगाजत गणपतीची मिरवणूक काढली जाते. फटाक्यांची आतषबाजी होते. गावातल्या तलावाजवळ किंवा विहीर, ओढय़ाजवळ वाडीतले गणपती विसर्जनासाठी एकत्र आणले जातात. अनेक देखण्या गणेश मूर्ती, धूप, अगरबत्तीचा घमघमाट, संधिप्रकाशातला उजेड, निरांजनांचा मूर्ती उजळून टाकणारा प्रकाश आणि भावनांचा कल्लोळ अशा वेगळ्याच वातावरणात पुन्हा एकदा मनोभावे आरती केली जाते. पंचखाद्यं, नारळ, फळं यांनी युक्त असा प्रसाद वाटला जातो. खूप जड अंत:करणाने गणरायला निरोप दिला जातो. जिवलगाने दूरदेशी निघून जावं तशी माणसं हेलावतात. पण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ म्हणणारा चाकरमानी पुन्हा एकदा गावाला राम राम करून मुंबयकडे वळतो तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच. वर्षभरात गणपतीच्या दिवसात वाडीमधली, गावातली सर्व घरं सदोदीत सगळ्यांसाठी उघडीच असतात. या दिवसात कुणाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. सगळ्या गावाचं एक मोठ्ठं कुटुंबच एकत्र नांदत असतं. मंगलमय सुरांच्या साथीने, मोहक सुगंधात न्हाऊन निघालेली घरं, वाडय़ा, गावं अपार श्रद्धा आणि आनंदाने ओतप्रोत भरलेली दिसतात. घराघरांत दिमाखात साजरा होणारा हा सण प्रत्येक कोकणवासीयांचा सांकृतिक ठेवाच आहे.
नरेंद्र प्रभू – response.lokprabha@expressindia.com