हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नारळाच्या पोळ्या
साहित्य:
२ वाटय़ा ताजा खवलेला नारळ
१ वाटी किसलेला गूळ
१/२ चमचा वेलचीपूड
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी मैदा
चिमूटभर मीठ
२ चमचे तेल
२ चमचे तूप
१) नारळ आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर घट्टसर होईस्तोवर (साधारण १० ते १५ मिनिटे) ढवळावे, वेलचीपूड घालावी. गार झाले की बंद डब्यात ठेवून २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवावे (टीप १).
२) मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करावे. २ टिस्पून कडकडीत गरम तेलाचे मोहन घालावे. १ चिमूटभर मीठ घालून ढवळावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे. १/२ तास झाकून ठेवावे.
३) नारळाच्या मिश्रणाचे दीड इंचाचे गोळे करावे. साधारण ५ ते ६ गोळे होतील. तेवढेच भिजवलेल्या कणकेचे गोळे करावे.
४) कणकेच्या लाटीची पुरी लाटावी. मध्ये नारळाचा गोळा ठेवून पुरीच्या सर्व बाजू एकत्र आणून बंद करावे. थोडा मैदा भुरभुरवून पोळी लाटावी.
५) तवा गरम करून तुपावर खरपूस भाजून घ्याव्यात. गॅस मध्यम ठेवावा.
जरा कोमट झाल्या की खाव्यात. गार झाल्यावरही छान लागतात तसेच ३-४ दिवस टिकतात.
टीप:
१) मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्याने घट्ट बनते, पोळी लाटताना सोपे पडते.
२) जर कधी उकडीच्या मोदकाचे सारण उरले असेल तर त्याच्याही पोळ्या बनवता येतात.
साहित्य:
१ वाटी किसलेले सुके खोबरे (सुक्या खोबऱ्याची १/२ वाटी)
१ चमचा खसखस १५० ग्राम खडीसाखर
४ वेलचींची पूड ६ ते ७ खारका
८ ते १० बदाम
कृती:
१) खारकांच्या बिया काढून टाकाव्यात आणि खारकांची पूड करून घ्यावी. बदामाची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी.
२) किसलेले सुके खोबरे मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे परातीत काढावे.
३) मंद आचेवर खसखस भाजून घ्यावी. खलबत्त्यात कुटून घ्यावी.
४) बदामाची पूड आणि खारकांची पूड मध्यम आचेवर भाजून घ्यावी. खूप जास्त भाजू नये नाहीतर करपू शकते.
५) खडीसाखर खलबत्त्यात थोडी कुटून घ्यावी. भाजलेले खोबरे, भाजलेले खसखस, भाजलेली बदाम-खारकांची पूड, खडीसाखर आणि वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये भरडसर खिरापत तयार करून घ्यावी.
टीप:
१) खिरापतीची पावडर नको असेल तर त्यात बेदाणे, खारका यांचे छोटे छोटे तुकडे करून घालावेत.
साहित्य :
२ वाटय़ा स्वीट कॉर्न १ लिटर दूध १ चमचा तूप
१ वाटी साखर (किंवा आवडीनुसार) १ चिमटी केशर
१/४ चमचा वेलची पूड ६-७ बदाम, ६-७ पिस्ते (४-५ तास भिजवून)
कृती :
१) भिजवलेले बदाम-पिस्ते सोलून त्यांच्या कापटय़ा कराव्यात. स्वीट कॉर्न कुकरमध्ये ३ शिटय़ा करून शिजवून घ्यावे. उकडलेल्या कॉर्नपैकी थोडे कॉर्न बाजूला काढावे आणि बाकीचे मिक्सरमध्ये वाटावे (एकदम बारीक पेस्टसुद्धा करू शकता किंवा किंचित भरड ठेवले तरी चालते.)
२) दूध पातेल्यात आटवण्यास ठेवावे. साय धरली कीचमचा फिरवावा.
३) दूध आटत असतानाच दुसऱ्या एका कढईत तूप गरम करून त्यात अख्खे कॉर्न आणि कॉर्नपेस्ट सुकेस्तोवर परतावी. किंचित गुलाबी होऊ द्यावी.
४) दूध साधारण निम्मे होऊ द्यावे. त्यात परतलेली पेस्ट, साखर, केशर, बदाम-पिस्त्याचे काप आणि वेलची पूड घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे उकळवावे.
५) बासुंदी रूम टेम्परेचरला आली कीफ्रिजमध्ये ठेवावी. गार सव्र्ह करावी.
टीप :
१) बासुंदी गार केल्यावर दाट होते. त्यामुळे दूध आटवून १ लिटरचे अर्धा लिटर झाले की आटवायचे थांबावे. जर रबडीसारखी एकदम घट्ट हवी असल्यास अजून आटवले तरी चालेल.
साहित्य:
२ वाटय़ा रवा (बारीक)
दीड वाटी खवा, कुस्करून
दीड वाटी साखर
१ वाटी पाणी
१/४ वाटी तूप
१/२ चमचा वेलचीपूड
कृती:
१) कढईत तूप गरम करावे. त्यात रवा मध्यम आचेवर भाजून घ्यावा. खूप खमंग भाजू नये. रवा बाजूला काढून ठेवावा.
२) त्याच कढईत कुस्करलेला खवा घ्यावा. मंद आचेवर रंग बदलेस्तोवर भाजावा. खवा पटकन जळतो म्हणून सतत तळापासून ढवळावे.
३) रवा आणि खवा कोमट झाला की हलकेच मिक्स करून घ्यावे.
४) साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. त्यासाठी, साखर आणि पाणी एकत्र करून घ्यावे. उकळी आली की ३-४ मिनिटे उकळू द्यावे. पाकचा थेंब ताटात घेऊन चिमटीत पकडावा. आणि चिमटीची उघडझाप करावी. एक तार आली की पाक तयार झाला, असे समजावे. आच बंद करावी.
५) या पाकात रवा-खव्याचे मिश्रण घालावे आणि नीट मिक्स करावे. मिश्रण थोडे पातळ वाटेल, पण काही वेळाने आळेल. वेलची पावडर घालावी आणि मिक्स करावे. मिश्रण थोडे घट्टसर झाले की लाडू वळावेत.
टीप:
१) काही तासांनीसुद्धा मिश्रण आळले नाही तर मिनिटभर मायक्रोवेव्ह करावे. यामुळे मिश्रण थोडे आळेल.
पुरणाची खीर
साहित्य:
१/२ वाटी चणा डाळ एक नारळाचे दूध
१/२ वाटी गूळ बदाम, पिस्ता, काजूचे तुकडे
१/२ चमचा वेलचीपूड १/२ चमचा तूप
कृती :
१) चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. पाणी निथळून टाकावे. शिजलेली चणा डाळ पातेल्यात घेऊन त्यात गूळ घालावा.
२) मध्यम आचेवर मिश्रण आटवावे. मिश्रण आळले की त्यात वेलचीपूड घालावी.
३) मिश्रण जरा कोमट झाले की त्यात नारळाचे दूध घालून मिक्स करावे.
४) बदाम, काजू, पिस्त्याचे तुकडे तुपात तळून खिरीत घालावे. मिक्स करून वाढावी.
टीप :
१) साधं दूध वापरूनसुद्धा ही खीर बनवता येईल. त्यासाठी दूध वेगळे आटवून घ्यावे. आटवलेल्या दुधात पुरण घालावे.
साहित्य:
१/२ वाटी खवा १/२ वाटी पिठी साखर १/२ चमचा कॉफी पावडर
कृती:
१) पिठी साखर आणि कॉफी पावडर एकत्र करून घ्यावी.
२) खवा ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावा. बाहेर काढून ढवळावे आणि परत १५ सेकंद मायक्रोवेव्ह करावे.
३) पुन्हा ढवळून २० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. जोवर खवा हलकासा ब्राऊन होत नाही तोवर २०-२० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (एकूण साधारण दीड मिनिट लागेल.) खवा २ मिनिटे व्यवस्थित ढवळावा. थोडे निवळले की पिठी साखर घालून मिक्स करावे.
४) मिश्रण घट्ट झाले की मोदकाच्या साच्यात मिश्रण घालून मोदक करावेत.
टीप :
जर फ्रोजन खवा वापरला असेल तर मोदक बनवायच्या आधी तासभर बाहेर काढून ठेवावे. आणि मग खवा वापरावा.
साहित्य:
१ वाटी नारळाचा चव
पाऊण ते एक वाटी साखर
१/४ चमचा वेलची पावडर
स्ट्रॉबेरी क्रश
तुपात हलकीशी तळलेली ड्राय फ्रुट्स – काजू तुकडा, बदाम, बेदाणा, काळ्या मनुका, पिस्ता इत्यादी.
कृती :
१) बेदाणा आणि मनुका सोडून बाकी ड्राय फ्रुटस बारीक चिरून घ्यावी.
२) साखर आणि नारळाचा चव एकत्र करून कढईत मंद आचेवर शिजत ठेवावे.
३) मिश्रण छान आले की खाली उतरवून त्यात वेलची पावडर घालावी, घोटावे.
४) एकदम लहान मूद पडायचा साचा वापरून मुदी पाडाव्यात. सत्यनारायणाच्या प्रसादाला वापरतात तसे द्रोण घेऊन त्यात एक मूद ठेवावी. वरून थोडासा स्ट्रॉबेरी क्रश घालावा. त्यावर ड्राय फ्रुटसनी सजवावे.
कॉफी वडी
साहित्य:
१ वाटी खवा ३/४ वाटी साखर १/४ वाटी पिठी साखर
१/२ चमचा इंस्टंट कॉफी पावडर मिल्क चॉकलेट
कृती :
१) खवा हाताने मोकळा करून ठेवावा. अगदी १/२ चमचा पाणी घेऊन त्यात कॉफी पावडर मिक्स करून ठेवावी.
२) साखर जाड कढईत घेऊन त्यात अगदी थोडे म्हणजे साखर भिजेल इतकेच पाणी घालावे.
३) साखरेचा गोळीबंद पाक करावा. त्यासाठी पाक जरा दाट झाला की आच मंद करावी. एका वाटीत पाणी घ्यावे. त्यात पाकाचा थेंब टाकून त्याची मऊ गोळी होतेय का ते पाहावे. झाली की त्यात कॉफी पावडरचे पाणी घालून काही सेकंद आटवावे. नंतर खवा घालून मिक्स करावे.
३) मिश्रण दाटसर होईस्तोवर मध्यम आचेवर ढवळत राहावे.
४) तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण ओतून वडय़ा पाडाव्यात.
साहित्य:
१ वाटी चक्का
दीड वाटी साखर
१/४ वाटी पिठी साखर
१/४ चमचा जायफळ किंवा वेलचीपूड
कृती :
१) चक्का आणि साखर एकत्र करून ठेवावे. साधारण तासाभराने एकत्र पातेल्यात शिजत ठेवावे. सतत ढवळावे
२) मिश्रण कडेने सुटायला लागले की पातेलं खाली उतरवून त्यात पिठी साखर आणि जायफळपूड घालून खूप घोटावे.
३) मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये घालून जरा गार झाले की थापावे.
कोमट झाले की वडय़ा पाडाव्यात.
साहित्य:
१ वाटी सफरचंदाचा किस (साल काढून टाकावे.)
१ वाटी ओल्या नारळाचा चव
१ वाटी साखर
२ चमचे पिठी साखर
१/२ चमचा वेलची पूड
कृती:
१) सफरचंदाचा किस, ओलं खोबरं आणि साखर एकत्र करून जाड बुडाच्या पातेल्यात शिजत ठेवावे.
२) मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे. मिश्रण आळले थोडासा लिंबाचा रस घालावा आणि काही सेकंद ढवळावे.
३) आच बंद करून मिश्रणात पिठी साखर घालावी आणि घोटावे. नंतर तूप लावलेल्या टीन ट्रेमध्ये किंवा ताटात काढून थापावे.
गार झाल्यावर वडय़ा पाडाव्यात.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com