बाप्पा, ही प्रार्थना नाही, विनंती नाही आणि गाऱ्हाणं, रडगाणं तर त्याहून नाही. एखाद्या होतकरू मित्राने त्याच्याहून थोडं सीनिअर असलेल्या, मुरलेल्या मित्राकडे काही मागावं तसंच काहीसं समज..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समोरचा पांढरा कोरा कॅनव्हास बघता बघता रंगीत होऊन गेला होता. सपासप रंगांचे आडवेतिडवे फटके बसत होते. पण त्यात एक प्रकारची अस्वस्थता होती. अधीरपणा होता. काही तरी शोधायचंय, काही तरी म्हणायचंय मला. पण ते बाहेर येत नाहीये नेमकं. ते फटकारेच बोलत होते. अथर्वचा हात रंगाने माखला होता. नजर कॅनव्हासवर खिळलेली होती. त्या रंगांच्या फटकाऱ्यातून त्याला जे म्हणायचंय ते उमटेल या आशेने..
‘का.. का सापडत नाहीयेस तू मला आज.. आजच का रागावलायंस माझ्यावर.. मी कधीपासून प्रयत्न करतोय तुझं ‘श्री’रूप साकारण्याचा. काही केल्या दाद देत नाहीयेस पण तू आज. किती किती बोलायचंय अरे तुझ्याशी. तू येण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपलीए. पण तू त्या तुझ्या भक्तांच्या गराडय़ात (की कचाटय़ात?) जाण्याआधीच मला गाठायचंय तुला. सगळ्यांनी गाऱ्हाणी मांडून तुला हैराण करण्याआधीच मला सांगायचंय तुला काही तरी. कारण नंतर त्या कर्कश्श लाऊडस्पीकरच्या आवाजात जिथे माणसाला स्वत:च स्वत:चं ऐकू येणं मुश्कील आहे, तिकडे तुझ्याशी कसं रे बोलणार..?
बाप्पा, ही प्रार्थना नाही, विनंती नाही आणि गाऱ्हाणं, रडगाणं तर त्याहून नाही. एखाद्या होतकरू मित्राने त्याच्याहून थोडं सीनिअर असलेल्या, मुरलेल्या मित्राकडे काही मागावं तसंच काहीसं समज ना. याहून जास्त उशीर होण्याच्या आत आम्हाला तुझी मदत हवीये. हो, मी आम्हाला असं म्हणतोय, कारण आमच्या संपूर्ण पिढीलाच तुझ्या मदतीची गरज आहे. हां, अगदी जगबुडी येऊन नाही ठेपलेली तशी. पण तेवढी वेळ येईपर्यंत थांबायचंच कशाला? घाबरू नकोस. ही एवढी सगळी प्रस्तावना परीक्षेत पास कर, नोकरी, जोडीदार, पैसा-अडका, हे संकट दूर कर, एवढं काम करून दे म्हणून नाहीये. तर आमच्या नित्य नव्या उगवणाऱ्या आयुष्याला प्रामाणिकपणे सामोरं जाण्यासाठीचा आशीर्वाद मागतोय मी तुझ्याकडे. पण तो नुसता हात वर करून दिलेला ‘तथास्तु’ नकोय बाप्पा. तुझ्यातलं, तुझ्या रूपातलं जे संचित, तुझ्या असण्याचा जो ‘अर्थ’ आहे ते सारं आमच्या पिढीत यावं म्हणून आटापिटा आहे हा.’
फार कोडय़ात बोलतोय का मी. एक एक करतच सांगतो मग. आमची सगळी सुरुवातच मुळात प्रार्थनेपासून होते. तिकडूनच गोष्टी बिघडायला सुरुवात होते की काय न कळे. फक्त देवळात जाऊन किंवा आम्हाला गरज पडेल तेव्हा हाका मारून मारून, हे दे ते दे, तू अमुक केलंस तर मी अमुक देईन असं करून केलेली ती प्रार्थना नसते हे कधी शिकवणार तू आम्हाला. असं इन्स्टंट मागून काही मिळत नसतं आणि मिळालंच तर ते फार काळ टिकणारं नसतं हे समजावून देशील? आपल्या आवडीच्या कामात म्हणा किंवा आपल्या वाटय़ाला आलेल्या कामात म्हणा तल्लीनता साधणं हीसुद्धा खूप उत्कट प्रार्थनाच असते, सहज साधलेला ‘कर्मयोग’ असतो हे कधी समजेल आम्हाला?
बाप्पा, खूप माणसांत असतो रे आम्ही रोज. अगदी प्रत्येक ठिकाणचे ग्रुपही वेगळे. झालंच तर व्हाट्सअॅप, फेसबुकवरचेही निरनिराळे. अशी माणसांची कमी नाहीच आहे. कमी आहे ती सच्च्या आधाराची. ‘लव्ह यू, मिस यू’च्या या कोरडय़ा वाक्यांपलीकडे जाऊन जो आधार लागतो तो स्वत:तच शोधण्याची ऊर्मी देशील प्लीज? सतत, सतत कोणी तरी आधाराला हवं असण्याची आमची ही गरजच कमी करशील का रे.. त्यापायी सतत जवळ, एकमेकांना धरून राहण्याच्या नादात आम्ही नकळत बंधनात घालतो समोरच्याला हे लक्षातच येत नाही रे आमच्या.
काय होतंय ना, आजकाल जरा कोणी ‘हूं’ म्हटलेलं खपत नाही आम्हाला. त्यापुढचं ऐकण्याच्या आधीच मन प्रतिक्रिया देऊन मोकळं होतं चटकन् आणि मग तिथेच संवादाची एक जुळू पाहात असलेली तार तुटून जाते. हे सारं ऐकायचं जे राहून गेलंय ते ऐकण्याचा संयम देशील का रे.. तुझे सुपासारखे कान हेच प्रतीत करत असतात हे जाणून घ्यायची बुद्धी देशील?
असं वाटतं, आजकाल खूपच बैलोबा झालोय आम्ही. कोणी काही म्हणेल, काही ट्रेंड काढेल तो आंधळेपणाने फॉलो करायला. सगळे करतायत म्हणून मी पण मग.. हे पालुपद कधी संपणार.. मला शोभतंय का.. मला तसं वाटतंय का.. हा विचार करायचाय बाप्पा आता. ‘योग्य वाटतंय ते’ निवडण्याची आणि नको ते टाकून देणाऱ्या नीरक्षीरविवेकाची सगळ्यात जास्त गरज आहे आम्हाला बाप्पा. इतकी नाती, इतकी माणसं असतात आजूबाजूला आणि म्हणूनच समोरचा माणूस कितीही चांगला मित्र, जिवलग असला तरीही, त्याच्या चूकला चूक म्हणण्याचं धाडस हवंय आम्हाला.
एकविसाव्या शतकातले लोक रे आम्ही. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या गमजाही मारतो, पण तरीही रोजच्या आयुष्यात ते राबवताना कमी पडतो रे. म्हणूनच तर यशासारखी जी गोष्ट परिश्रमाने मिळवायची ती गोष्ट ‘मागायची’ बुद्धी होते आम्हाला. मानवनिर्मित दगडाची तुझी मूर्ती दूध पितेय म्हटल्यावर पाहायला धावतो आम्ही. पण त्यामागचं नैसर्गिक विज्ञान समजून घ्यायचं राहूनच जातं. ‘त्वं ज्ञानमयोऽ विज्ञानमयोऽसि’ हे वाक्यच विसरून जातो.
एवढय़ा जगभराच्या उलाढाली करतो आम्ही. पण कित्येक दिवस झाले रियाझाला बसलोच नाही आपण. शेल्फमधली, हौशीनं आणलेली नवी पुस्तकं रुसून त्यांचा नवलाईचा रंगही उडून गेला. रंगांचे सगळे ब्रश कित्येक दिवस वाट पाहतायत. कॅमेराचा क्लिकक्लिकाट तर बरेच महिने झाले ऐकलाच नाहीये. चौसष्ट कलांचा अधिपती तू.. पण तरी तुझ्याकडे हात पसरून काही मागताना आमच्याकडे असलेल्या या कला आम्हाला जाणवत असूनही ‘वेळ नाही’च्या नावाखाली दुर्लक्ष करतोच आम्ही. मग का ऐकावंस तू तरी आमचं.
खूप फिरतो आम्ही.. निरनिराळ्या अनुभवातून सतत जात असतो. अगदी रोज क्षणाक्षणाला अनपेक्षित गोष्टी फेस कराव्या लागतात. कधी कसोटी.. तर कधी झिम्माड आनंदाचे क्षण.. ते सारे क्षण कधी एकदा क्लिक करून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर टाकतोय असं होऊन जातं. नाटक पाहण्याच्या आधीच आमचं तिकडे अपडेट होणारं स्टेट्स वाटतं छान.. नाटक संपायच्या आतच लाइक्सही येतात ढीगभर. आम्ही ते पाहण्यात मग्न, मग.. या सगळ्यात समोरचं नाटक निसटून जातं रे हातातून.. तो क्षण मनसोक्त एन्जॉय करायचा राहूनच जातो. त्या क्षणी त्या क्षणात विरघळून जाण्याची. पूर्णपणे आनंद घेण्याची क्षमता हवीये बाप्पा.
आणखीन एक सांगायचं होतं. आम्हाला कधीही, कोणतीही गोष्ट परिपूर्ण, तयार देऊ नकोस. आम्हालाही करू देत प्रयत्न. आमची बुद्धी वापरू दे. तरच आम्ही नशिबावर भरवसा ठेवून हातावर हात ठेवून न बसता काही तरी करू. स्वत:च मेहनत करण्याची आणि न करण्याची जबाबदारी घ्यायला शिकू. तेव्हाच कुठे तरी पुढे जाऊन आम्हाला मिळणाऱ्या अपयशाचं खापर तुझ्यावर फुटायचं थांबेल बाप्पा..
तुझ्यासमोर हात जोडून सतत काही काही मागतच राहायचं असतं हेच पाहात आलोय रे आजपर्यंत. म्हणजे तुझी मूर्ती ही एक तर पुढय़ात हात जोडून उभं राहण्यासाठी, नाहीतर संकटात पाण्यात ठेवण्यासाठीच असते असं वाटावं इतकं. म्हणूनच आज ते सगळं सोडून आम्ही जसे आहोत तसे, आमच्या गुणदोषांसकट तुझ्यासमोर उभे आहोत. आतापर्यंत आम्ही मागितलं आणि तू देत आलास भरभरून. पण आता मात्र तुला स्वत:हून आम्हाला काय द्यायचंय, काय द्यावंसं वाटतंय, आम्हाला काय देण्याची गरज आहे हे अनुभवायचंय आम्हाला. तुला आम्हाला जे सांगू पाहायचंय, शिकवू पाहायचंय ते कळण्याची बुद्धी दे आम्हाला बाप्पा. आमच्या सतत काही ना काही मागत राहण्याची ही हाव मिटवून टाक. आता यापुढे ‘तू’ आहेस.. जे जे चांगलं, मंगल आहे त्यातून.. माणुसकीतून जिवंत आहेस.. हे नम्रपणे फक्त मान्य करण्यासाठी यायचंय रे देवळात. तुझं काही तरी सांगू पाहणं हे आम्हाला कळतंय हे समाधान द्यायचंय तुला.
आणि सगळ्यात शेवटी, एकच.. ‘विश्वात्मक शांती’ वगैरे मोठे शब्द नाही कळणार आम्हाला कदाचित.. पण समोरच्या माणसाशी एक माणूस म्हणून वागण्याची बुद्धी मात्र नक्की दे बाप्पा..
बोलता बोलता अथर्व भानावर आला. हात रंगाने माखलेले आणि समोरच्या कॅनव्हासवर त्याच्या हातातून साकारलेलं ते रक्तवर्णी ‘श्री’रूप.. आता केलेली सगळी प्रार्थना खरंच तिथपर्यंत पोहोचल्याचं ते प्रतीक होतं. तो त्याच्याकडे पाहून पुटपुटला. ‘एवढं करशील ना प्लीज? करच..!!!’
चित्रकार: सुरेश गोसावी
रश्मी जोशी – response.lokprabha@expressindia.com