पुणे जिल्ह्य़ात शिरूर तालुक्यात पाबळ या गावी मस्तानीने चिरविश्रांती घेतली. या गावातल्या तरुणांनी सरकारी पातळीवर जोरदार पाठपुरावा करून मस्तानीच्या समाधीचे पुनरुज्जीवन करायला घेतले आहे.
पुणे शहरापासून जवळपास ६० किमी अंतरावर शिरूर तालुक्यात पाबळ नावाचं एक गाव आहे. हे गाव जरी इतर चार गावांप्रमाणे दिसणारं असलं तरी ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचं आहे. बाजीराव पेशव्याची द्वितीय पत्नी असलेल्या मस्तानीची समाधी या गावात आहे. झालं आहे असं की सरकारदरबारी असलेल्या पारंपरिक अनास्थेमुळे या गावात असा ऐतिहासिक ठेवा आहे याची खबर आजही बऱ्याच जणांना नाही. काही वर्षांपूर्वी दागिन्यांच्या लालसेपोटी दरोडेखोरांनी मस्तानीची समाधी फोडली आणि प्रसारमाध्यमांनी केलेल्या मोठय़ा गदारोळानंतर शासन कुंभकर्णी झोपेतून तात्पुरतं जागं झालं. फोडलेल्या समाधीची युद्धपातळीवर डागडुजी करण्यात आली. काही तत्कालीन नेते मंडळींनी येऊन समाधीच्या आणखी डागडुजीबद्दल घोषणांचा रतीब घातला, पण रतीबच तो शेवटी, जास्त दिवस पुरला नाही.
सरकारदरबारी उपेक्षाच वाटय़ाला येत असताना शेवटी गावातल्या तरुणांनीच या परिस्थितीवर मार्ग काढण्याचं ठरवलं. चर्चेतून बाजीराव-मस्तानी सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना करण्याचे ठरलं. संजय डहाळे, महम्मद इनामदार, संदीप चौधरी, राज गायकवाड, प्रा. डॉ संजय घोडेकर, चंद्रशेखर वारघुडे, जयसिंघ नव्र्हे, बाजीराव पिंगळे इत्यादी गावातल्या जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेऊन प्रतिष्ठानची स्थापनासुद्धा केली. मात्र या प्रतिष्ठानची स्थापना करणं आणि त्यामार्फत मस्तानीच्या समाधीच्या संवर्धनाचं काम करणं हे या मंडळींसाठी भलतंच आव्हानात्मक काम ठरलं.
प्रतिष्ठानचे संस्थापक-खजिनदार राज गायकवाड म्हणाले, ‘प्रतिष्ठानची स्थापना करायचं ठरलं खरं, पण बऱ्याचशा गावकऱ्यांत आमच्या हेतूबद्दल साशंकता होती. हे तरुण गावकऱ्यांकडून देणग्या मागतील का? मागितल्या तर त्या पैशाचा योग्य विनियोग करतील का? कामात भ्रष्टाचार तर नाही ना होणार? अशा अनेक प्रश्नांवर गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र आजच्या घडीला आम्ही मस्तानीच्या समाधीच्या पुनर्जीवनाचे काम जवळपास पूर्णत्वास आणलंय आणि त्यामुळे गावकऱ्यांचाही आमच्या प्रामाणिक हेतूवर विश्वास बसू लागलाय.’
तहसील कार्यालय, पुरातत्त्व विभाग पुणे व मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय अशा अनेक ठिकाणी काही वर्षांचा पाठपुरावा केल्यावर समाधी स्थळाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू झालं. पुरातत्त्व खात्याकडून जवळपास ४३ लाखाचा निधी याकरिता उपलब्ध झालाय.
पाबळच्याच एका गावकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘मस्तानीच्या समाधीच्या वाईट अवस्थेला आम्ही गावकरी सगळ्यात जास्त जबाबदार आहोत. आम्ही आमची गुरे समाधीच्या आवारात चरायला न्यायचो. गावची काही पोरं तर तिथं लपूनछपून दारूच्या पाटर्य़ाही करायची. आम्हाला माहिती असूनही आम्ही त्याची कधी दखल नाही घेतली. एक दगडाची वास्तू यापलीकडे आमच्या लेखी समाधीचं काही महत्त्वच नव्हतं. आजही गावात असे कितीतरी सापडतील ज्यांनी कित्येक वर्ष समाधी आवारात पाऊल ठेवलं नसेल. आता सुधारणा सुरू आहेत. कौतुक आहे यासाठी पुढाकार घेणाऱ्या गावच्या मंडळींचं.’
कोणे एके काळी गावात मस्तानी राहत असलेली गढीसुद्धा होती. तिचे आज नामोनिशाणही नाही. मधल्या काळात तर गढीच्या जागेवर शौचालये बांधण्यापर्यंत काही जणांची मजल गेली होती. अर्थात जिथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जीर्णावस्थेत असतात तिथे आडवळणावरच्या मस्तानीच्या समाधीची आणि गढीची कुणाला काय फिकीर? मंत्र्यांच्या दालनाच्या सुशोभीकरणावर करोडो रुपये उधळणाऱ्या शासनाला महाराष्ट्राच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान असणाऱ्या मस्तानीची यादही नसावी?
मस्तानीचा आत्मा जिथे कुठे असेल आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत असेल तर जरूर म्हणेल,
‘मोहब्बत न सही, नफरत ही कर ले
कमसे कम हमें याद तो कर ले’
अशी आहे पाबळ येथील मस्तानीची समाधी
मस्तानीच्या समाधीच्या रस्त्याकडच्या बाजूने तीन दरवाजे असून उजव्या-डाव्या बाजूलाही एक एक दरवाजा आहे. समाधीच्या चारी बाजूच्या भिंती (अंदाजे) चार फुटापर्यंत घडीव चिऱ्यांच्या असून बाहेरच्या बाजूंनीही फरसबंदीचा पथ, मार्ग आहे. तीन दरवाजांच्या बरोबर विरुद्ध बाजूला नमाज पढण्यासाठी जी तीन बाजूंनी बंदिस्त वास्तू आहे, तिच्या तीनही भिंतींना कलाकुसर केलेल्या नक्षीदार कमानी आहेत. (अगदी समाधीच्या चारही भिंतीना कमानदार कोनाडे आहेत.) नमाज पढण्यासाठी बांधलेल्या वास्तूला वर चढून जाण्यासाठी पायऱ्या असून ह्या घडीवर चिऱ्यांच्या आहेत. त्यावर पूर्वी नक्षीदार लाकडी खांब असावेतच. कारण पायऱ्या चढून जातानाच डाव्या-उजव्या बाजूला लाकडांचे सुरेख खांब, (वर नक्षीदार कमानींनी जोडलेले) आजही लक्ष वेधून घेतात. तसेच खांब पायऱ्या असलेल्या फरसबंदीवर उभारले जावेत ही प्रतिष्ठानाची मागणी पुरातत्त्व खात्याने मान्य केली आहे. बंदिस्त वास्तूवर अंदाजे दोन फूट उंचीची नक्षीदार कमानींची भिंत आहे. सुशोभीकरणानंतर मस्तानीची समाधी आणि एकूण परिसर अतिशय देखणा दिसणार यात शंकाच नाही.
– डॉ. माधुरी मुनशी (मस्तानीच्या अभ्यासक)
सचिन जगदाळे – response.lokprabha@expressindia.com