आपल्याकडे सर्वसाधारण निवडणुकीत मतदान वाढले की सत्ताविरोधी कौल आहे असे मानले जाते. आता हिमाचलसारख्या छोटय़ा राज्यात विधानसभा निवडणुकीत ७५ टक्क्यांवर मतदान झाले आहे. निकालासाठी अजून महिनाभर वाट पहावी लागणार आहे. गुजरातबरोबरच १८ डिसेंबरला मतमोजणी आहे. मात्र गुजरातचे राजकीय महत्त्व पाहता हिमाचलची निवडणूक राष्ट्रीय स्तरावर थोडी दुर्लक्षितच झाली. राज्यातील ६८ जागांसाठी सत्तारूढ काँग्रेस विरुद्ध भाजपा असा थेट सामना याही वेळी होता. मतदार दर पाच वर्षांनी सरकार बदलतात असा गेल्या दोन-अडीच दशकांचा अनुभव आहे. तोच न्याय लावला तर आता भाजपासाठी संधी आहे असे म्हणता येईल. जनमत चाचण्यांमध्येही भाजपा ४५ जागांच्या आसपास जाईल असाच अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या नावावरच निवडणूक लढवली. ८३ वर्षीय वीरभद्र यांनी ही शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले. तपास संस्थांनी चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. तसेच खातीही गोठविल्याने प्रचाराला पैसेही नाहीत, असे आवाहन संस्थानिक असलेल्या वीरभद्र यांनी केले होते. काँग्रेसकडे भाजपाच्या तुलनेत प्रचारात साधनांची कमतरता होती. सबकुछ वीरभद्र हेच चित्र होते. भाजपाने त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी ठेवला होता. काँग्रेसने दिल्लीतून प्रचाराची फारशी कुमक त्यांच्या दिमतीला दिली नाही. उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जेमतेम दोन सभा झाल्या. त्यांनी आपले लक्ष गुजरातवर केंद्रित केले आहे. त्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सात सभा घेतल्या. ७३ वर्षीय प्रेमकुमार धुमळ यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करून भाजपाने यंदा रणनीती बदलली. भाजपा शक्यतो निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री ठरवतो असा अलीकडचा अनुभव आहे. मात्र काँग्रेसने वारंवार नेतृत्वाबाबत विचारणा केल्यानंतर भाजपाला धुमळ यांच्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी खासदार शांताकुमार व केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी फारशी खळखळ केली नाही. पक्षनेतृत्वाच्या निर्णयापुढे मान तुकवण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते. अर्थात काँग्रेसमध्ये वीरभद्र व प्रदेशाध्यक्षांचे फारसे पटत नव्हते. पण श्रेष्ठींना वीरभद्र यांना दुखावून चालणार नव्हते. मतदानाचा विक्रमी टक्का पाहता भाजपा नेत्यांचे हात आभाळाला लागल्यासारखी स्थिती आहे. आम्ही ६० जागा जिंकू तर काँग्रेसला दोन आकडी जागाही मिळणार नाहीत असा त्यांचा अविर्भाव आहे. समाजमाध्यमांवरही तसाच सूर भाजपा समर्थकांकडून आळवण्यात आला.
वीरभद्र लक्ष्य
संपूर्ण प्रचारात भाजपाने वीरभद्र व त्यांच्या कुटुंबीयांवरच टीका केली. त्यांचे पुत्र विक्रमादित्य हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सरकारकडे सांगण्यासारखे काय आहे असा भाजपाचा सवाल होता. सिमल्यात एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. प्रचारात हा मुद्दा प्रमुख होता. सरकारने हे प्रकरण नीट हाताळले नाही याबाबत रोष होता. सरकारची या मुद्दय़ावर कोंडी झाली होती. अगदी वीरभद्र यांनाही मतदारसंघ बदलावा लागल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात. वस्तू व सेवा कराने छोटय़ा व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती मात्र त्याचा भाजपाला मोठा फटका बसेल इतपत तो संताप नव्हता. ही भाजपाची मतपेढी मानली जाते. पर्यटनावर आधारित रोजगार निर्मितीचे आश्वासन भाजपाने जाहीरनाम्यात दिले होते. त्याशिवाय राज्यात जे विविध माफिया आहेत त्यांच्या तावडीतून सोडवू, असे आश्वासन पंतप्रधानांनी प्रचारात दिले होते.
वीरभद्र की धुमळ?
वीरभद्र व धुमळ या नेत्यांभोवती प्रचार केंद्रित होता. दोघेही राज्याच्या राजकारणात धुरंधर मानले जातात. काँग्रेसच्या हातात सहा ते सात राज्येच राहिली आहेत. कर्नाटक व पंजाब ही दोन मोठी राज्ये सोडली त्यांच्याकडे फारसे काही नाही. त्यामुळे आणखी एक राज्य गमावणे त्यांच्यासाठी धक्कादायक ठरेल. त्यांनी गुजरातमध्ये सारी ताकद लावली आहे. आता वीरभद्र की धुमळ यापैकी कोणाला मुख्यमंत्रीपद मिळते हे पाहण्यासाठी थोडे दिवस वाट पहावे लागणार. सध्या तरी वाढीव मतांचा टक्का कोणाला फायदेशीर याचीच चर्चा सुरू राहणार.
हृषीकेश देशपांडे – response.lokprabha@expressindia.com