चहा विशेष
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
जागतिकीकरण हा गेल्या काही वर्षांमधला परवलीचा शब्द असला तरी चहा या पेयाने मात्र हे जागतिकीकरण फार पूर्वीच घडवून आणलं आहे. चहाबाबत चीनची मक्तेदारी आणि इतर देशांचे तिला तोंड द्यायचा प्रयत्न हा इतिहास रंजक आहे.
आपल्याकडेच नाही, तर जगभरात सगळीकडेच चहा हे पेय नाही तर ती एक संस्कृती आहे. माणसामाणसांना जोडून घेणारी, गरम पाण्याच्या त्या एका उबदार पेल्यात जीवनाचा प्रवाह वाहता ठेवणारी संस्कृती. संवाद सुरू करून देणारी, अडलेला संवाद पुढे नेणारी, असलेला संवाद आणखी पुढे नेणारी संस्कृती. एका अर्थानं त्या एका लहानशा पेल्याने जग व्यापलंय, जग जोडलंय, कधी काळी तोडलंयसुद्धा. अशा या चहाला आपल्याकडे दोनतीनशे वर्षांचा इतिहास असला तरी प्रत्यक्षात मात्र चहा हे प्राचीन वगैरे म्हणता येईल असं पेय. शेजारी चीन आणि भारतादरम्यान प्राचीन काळापासून व्यापार होत असला तरी त्यांचं हे आवडतं पेय आपल्यापर्यंत पोहोचायला १७-१८ वं शतक उजाडावं लागलं आणि ते घडलं तेही ब्रिटिशांनी बरंच राजकारण केल्यामुळे. त्यानंतर मात्र चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे. एक घोटभर चहाचा भलामोठा इतिहास समजून घेणं मनोरंजक आहे.
चहाचा शोध
चहा हे ब्रिटिशांचं पेय मानलं जात असलं तरी तसं नाही. त्याचं मूळ प्राचीन चीनशी जोडलं जातं. असं सांगितलं जातं की ख्रिस्तपूर्व ३० वं शतक ते ख्रिस्तपूर्व २१ वं शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागला. ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये शेन नुंग हा तेव्हाचा सम्राट सत्तेवरून हाकलला गेला. त्याला दक्षिण चीनच्या दुर्गम भागात एकांतवासात ठेवलं गेलं. तो अतिशय कफल्लक अवस्थेत होता. एकदा तो एका झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पानं पडली. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला, चवही बदलली. सम्राटाला त्या पाण्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चवही इतकी आवडली की त्या काळात त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी प्यायचा सपाटाच लावला. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या त्या परिसरात चहाच्या रोपांचा शोध घेतला. सातत्याने चहा प्यायल्याने त्याचा पोटदुखीचा आजार बरा झाला असा प्रचार करत तो देशभर फिरू लागला. त्यातून आजच्या चहाचा जन्म झाला असं मानलं जातं.
दुसऱ्या एका कथेनुसार चहाचा शोध साधारण ख्रिस्तपूर्व १५०० ते १०४६ लागला. चीनमध्ये शेंग राजघराण्याने औषधी पेय म्हणून चहा वापरायला सुरुवात केली आणि चहाचा शोध लागला. तर आणखी एका कथेनुसार चेन बुद्धीझमचा संस्थापक बोधीधर्म चुकून नऊ वर्षे झोपी गेला. त्याला जाग आली तेव्हा त्याने आपल्या पापण्या कापून टाकल्या. त्या जिथे पडल्या तिथून जी रोपं उगवली. ती चहाची रोपं म्हणून जगप्रसिद्ध झाली. चीनमधून चहाची लोकप्रियता जगभर पसरत गेली.
ख्रिस्तपूर्व ७२२ ते २२१ या काळात चीनमध्ये चहाची लागवड सुरू झाली. चहाची पानं वाळवून ती दळणं, त्यात आलं आणि इतर मसाले घालणं हे सगळं याच काळात सुरू झालं. चहा हा त्यांच्या आहाराचादेखील भाग झाला. तू जिआ या जातीचा चहा त्यांच्याकडे पेय म्हणून न वापरता तो भातात घालून खाल्ला जातो. अर्थात या सगळ्या काळात चहा हे तरतरी आणणारं पेयं म्हणून राजघराण्यात प्यायलं जाई. सरदार, उमराव ते पीत. नंतर हळूहळू ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. या दरम्यान चहाच्या विविध जाती शोधल्या गेल्या. त्यातल्या दुर्मीळ जाती राजाला नजर करून त्याची मर्जी संपादन केली जात असे. यातूनच हळूहळू चहाला व्यापारी महत्त्व येत गेलं. यातूनच चहाच्या लागवडीचे वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले. ख्रिस्तपूर्व ६१८ ते ५८९ या काळात टँग या राजघराण्याने देशभर चहाच्या लागवडीला खूप महत्त्व दिलं. ख्रिस्तपूर्व ९६० ते १२७९ या काळात चीनमध्ये फ्युजीन परगण्यात वू सी या ठिकाणी चहाच्या आणखी जाती सापडल्या. ख्रिस्तपूर्व १२७१ ते १३६८ या काळात चहाच्या प्रक्रियेमध्ये लक्षणीय बदल झाले. टी केक्स आणि तुओ चा हे त्या काळात चहाचे सर्वोत्तम प्रकार होते. सर्वसामान्य लोक मात्र सुटा चहा पीत असतं. चीनच्या शाही घराण्यांना मानवंदना म्हणून आजही टी केक्स आणि तुओ चा वापरले जातात.
मिग घराण्याच्या काळात चहाची पानं भाजायला सुरुवात झाली. १३६८ ते १६४४ या काळात चहाच्या लागवडीत आणखी वैविध्य आलं. टी केकऐवजी सुट्टय़ा पानांचा वापर वाढला. १६३६ ते १९११ या काळात चीनमध्ये क्विंग घराण्याचं राज्य होतं. तोपर्यंत चहाचं महत्त्व अतोनात वाढलं होतं. चहाचे यलो टी, ओलांग टी, ग्रीन टी, व्हाइट टी, डार्क टी, फुलांचा चहा, काळा चहा, असे अनेक प्रकार लोकप्रिय झाले. चहाची मोठय़ा प्रमाणात निर्यात होऊ लागली. त्या व्यापारातून चीनला भरपूर पैसा मिळायला लागला. चहाच्या व्यापारात चीनची मक्तेदारी झाली.
चहा आणि जपान
चीनबाहेर चहा सगळ्यात पहिल्यांदा पोहोचला तो जपानमध्ये. येईसेई नावाच्या जापानी भिख्खूने चीनमधून जपानमध्ये चहाच्या बिया नेल्या. ध्यानधारणा करताना चहाचा चांगला उपयोग होतो, आपली तरतरी टिकून राहते असा त्याचा अनुभव होता. त्याच्यामुळे जपानी चहा सुरुवातीच्या काळात झेन बौद्धीझमशी जोडला गेला. पण तिथून तो जपानी राजघराण्यात तसंच सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात वेगाने पोहोचला आणि तितकाच लोकप्रिय झाला. तिकडे चहाची दोन वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. ती म्हणजे टी सेरेमनीमधून समारंभपूर्वक प्यायला जाणारा शाही प्रकार आणि दुसरीकडे बौद्ध भिख्खूंच्या समारंभांत प्यायला जाणारा धार्मिक वलय असलेला चहा. जपानी लोकांना चहा इतका आवडला की त्यांनी चहा पिण्याचंच सौंदर्यशास्त्रच निर्माण केलं. त्यामुळे चहा कसा करायचा, कसा प्यायला द्यायचा करायचा, या सगळ्याची एक संस्कृती निर्माण करणारा जपानी टी सेरेमनी जगप्रसिद्ध आहे. या टी सेरेमनीमध्ये यजमान म्हणून सहभागी होण्यासाठी संबंधितांना तगडं प्रशिक्षण घ्यावं लागतं. १७३८ मध्ये सोएन नागाताकी याने चहाचा सांचा किंवा रोस्टेड टी हा एक प्रकार शोधला. तो ग्रीन टीपासून विकसित करण्यात आला असून तो जपानमधला सगळ्यात लोकप्रिय चहा आहे.
तिसऱ्या शतकापर्यंत चहा हे फक्त चीनमध्येच लोकप्रिय असलेले पेय होते. त्यानंतर आठव्या शतकापर्यंत चीनमधून तिबेट, तुर्कस्तान, अरब राष्टांमध्ये चहाची निर्यात सुरू झाली होती. रेशीम मार्गाने हिमालयातल्या भटक्या जमातींमध्येही चहा पोहोचला होता. पण तो त्यांच्यापुरताच सीमित होता. १७ व्या शतकात ब्रिटिशांची चहाशी ओळख झाली. या सगळ्या प्रवासात चहात अनेक बदल होत गेले. चीन ते युरोप या प्रवासात चहाच्या नाजूक पानांची हानी होत असे. त्याचा परिणाम चहाच्या चवीवर होत असे. त्यामुळे चहातून होणाऱ्या नफ्याबाबत जागरूक असणाऱ्या चहा उत्पादकांनी युरोपपर्यंतच्या प्रवासात चहाची चव आणि ताजेपणा टिकून राहील असे उत्पादन करण्यावर भर दिला. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. संशोधन झालं. फक्त उत्पादनच नाही तर पॅकिंग, वाहतूक या सगळ्याचा अभ्यास होऊ लागला. त्यात असं लक्षात आलं की ग्रीन टीची नाजूक पानं या सगळ्या प्रवासात तग धरू शकत नाहीत. त्यातून मग ब्लॅक टीचा जन्म झाला. वास्तविक ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाइट टी, यलो टी, यलो टी हे सगळे चहा कॅमेलिया सिनेसिस एकाच झुडुपापासून तयार होतात. त्याच्या लागवडीच्या विविध पद्धती आणि पानांवरच्या विविध प्रक्रिया यातून चहाचे विविध प्रकार जन्माला आले. ग्रीन टी आपल्यापर्यंत आहे तसा पोहोचत नाही हे लक्षात आल्यावर त्याचा ताजेपणा टिकून राहावा यासाठी चहाची पानं वाळवण्यापूर्वी ऑक्सिडाइझ करायला सुरुवात केली. त्यातून चहाला गडद रंग यायचा, त्यातून ब्लॅक टीचा जन्म झाला. नंतर तोच जगभर लोकप्रिय झाला. चीनमध्ये मात्र आजही ग्रीन टीच लोकप्रिय आहे.
एक मांडणी अशीही केली जाते की चहाचा युरोपात प्रवेश इंग्लंडमधून नाही तर हॉलंडमधून झाला. १७ व्या शतकात चहा हॉलंडमध्ये पोहोचला. तिथे तो लोकप्रिय झाला आणि मग पन्नासेक वर्षांनी इंग्लंडमध्ये पोहोचला. अॅना या पोर्तुगीज राजकन्येचं ब्रिटिश राजपुत्राशी लग्न झालं होते. दुपारच्या भुकेच्या वेळी तिने चहा पिणं आणि त्याबरोबर बेकरी पदार्थ खाणं हे सुरू केलं. त्याची हळूहळू प्रथा पडत गेली आणि त्यातून ब्रिटिश हाय टीचा जन्म झाला असं मानलं जातं. चार्ल्स दुसरा याच्या काळात ब्रिटनमध्ये चहाच्या आयातीला तसंच विक्रीला विरोध होता. त्यामुळे चहावर मोठा कर लावला गेला. त्यामुळे चहाचं स्मगलिंग सुरू झालं. त्या सगळ्या काळात जवळपास १०० वर्षे चहा अर्थव्यवस्था, व्यापार यांचा कणा होता. त्यातूनच चीनची मक्तेदारी निर्माण झाली होती.
अमेरिकेत चहा सर्वप्रथम पोहोचला तो १६५० मध्ये. पीटर स्टुवेसंट नावाच्या डच माणसामुळे. आज सर्वपरिचित असलेलं न्यूयॉर्क तेव्हा न्यू अॅमस्टरडॅम नावाची डच वसाहत होती. ब्रिटिशांनी ही वसाहत ताब्यात घेतली तेव्हा तिथे राहणाऱ्या स्त्रियांमध्ये लोकप्रिय असलेलं चहा हे पेय बघून ते आश्चर्यचकित झाले होते. १७२० पर्यंत अमेरिकेतील चहाचा व्यापार न्यूयॉर्क, बोस्टन आणि फिलाडेल्फियामध्ये चहाचा व्यापार अमेरिकेत केंद्रित झालेला होता. या काळात इंग्लंड आणि अमेरिकेच्या वसाहतींमध्ये चहाचा व्यापार नियमित होत असे. चीनमधून चहा आणून ब्रिटिश तो इथे विकत. पण चहावरचे कर जबरदस्त असल्यामुळे इंग्लंडप्रमाणे इथेही चहाचे स्मगलिंग होत असे. १७७३ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या एका करारामुळे या वसाहतींमध्ये संताप पसारला. ब्रिटिशांना स्थानिक व्यापाऱ्यांना वगळून थेट सामान्य लोकांना चहा विकता येईल, असं त्यात म्हटलं होतं. यामुळे ब्रिटिशांचा फायदा होणार होता, पण स्थानिक व्यापाऱ्यांचं नुकसान होणार होतं. स्थानिकांच्या मनात याविषयी खदखद होती. सॅम्युअल अॅडम्सने चालवलेल्या ‘सन्स ऑफ लिबर्टी’ नावाच्या ग्रुपने १६ डिसेंबर १७७३ ला बोस्टन बंदरात एक चहा घेऊन जहाज येणार होतं त्याच्यावरील सगळा चहा बंदरात फेकून द्यायचं ठरवलं. त्यासाठी त्या रात्री ते स्थानिक जमातीच्या लोकांसारखा पोशाख घालून बंदरात शिरले. तीन तासांत त्यांनी चहाचे ३४० कंटेनर समुद्राच्या पाण्यात फेकून दिले. ही घटना इतिहासात ‘बोस्टन टी पार्टी’ म्हणून नोंदली गेली आणि तिनेच अमेरिकन क्रांतीची पाळंमुळं रोवली गेली. त्यानंतरच्या कालावधीत हळूहळू अमेरिकन लोकांनी ब्रिटिशांची अरेरावी झुगारून दिली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन लोकांनी आईस टी आवडीने प्यायला सुरुवात केली. आता ते तिथे उन्हाळ्यातलं पेय म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर कधीतरी थॉमस सुलीव्हॉन या न्यूयॉर्कमधल्या माणसाने टी बॅग्जची कल्पना आणली. आज अमेरिकेमध्ये चहा आरोग्याच्या कारणासाठी लोकप्रिय असला तरी कॉफी हेच अमेरिकेचं प्रथम क्रमांकाचं आवडतं पेय आहे.
चहा आणि भारत
चहाच्या क्षेत्रातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली आणि भारतीयांना खऱ्या अर्थाने चहाचा परिचय झाला. असं असलं तरी भारतात चहा अगदीच माहीत नव्हता असं नाही. काही भागात त्याचा फक्त औषधी वापर होत होता इतकंच. ब्रिटिशांनी आसामच्या खोऱ्यात आणि दार्जिलिंगच्या डोंगरांमध्ये चहाची लागवड सुरू केली. १४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर भारतात चहाचं उत्पादन जोर धरू लागलं. हळूहळू चीन इतकाच चहा भारतात तयार होऊ लागला. आज भारत चीननंतरचा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे.
भारतात आसाममध्ये कॅमेलिया सिनेसिस जातीच्या चिनी प्रकारच्या चहासारखं उत्पादन होऊ शकतं याचा शोध सर्वप्रथम रॉबर्ट ब्रूस याला १८२३ मध्ये लागला. मणीराम दिवाण या स्थानिक व्यापाऱ्याने ब्रूसची गाठ सिंगफो या जमातीशी घालून दिली. या जमातीतले लोक चहाशी साधम्र्य असणारे एक पेय पीत. ते एका विशिष्ट जंगली झुडपाची कोवळी पानं उन्हात वाळवत. तीन दिवस या पानांवर दव पडेल अशी ती ठेवली जात. त्यानंतर ती पोकळ बांबूत ठेवून दिली जात. त्यांचा चांगला वास येईपर्यंत त्यांना धुरी दिली जात असे. ब्रूसने त्या पेयाची चव घेतली तर ती चहाशी मिळतीजुळती आहे असं त्याच्या लक्षात आलं. त्याने या पानांचे नमुने गोळा केले. पण त्याच दरम्यान १८३० मध्ये त्याचा मृत्यू झाला. मग त्याच्या भावाने, चार्ल्सने पाठपुरावा करत हे नमुने कोलकात्याला पाठवले. त्यात असं आढळलं की ती चहाचीच पानं होती, पण ती चिनी चहापेक्षा वेगळी होती. त्यांचं नाव असामिका ठेवण्यात आलं. यााच दरम्यान चहाच्या क्षेत्रातली चीनची जागतिक मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इस्ट इंडिया कंपनीचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये चहाची लागवड करता येईल का याची चाचपणी सुरू होती. त्यासाठी चीनमधून चहाच्या बिया चोरून भारत, श्रीलंका या वसाहतींमध्ये आणल्या जात. त्यांच्यावर प्रयोग केले जात. या चिनी बिया इथल्या मातीत नीट रुजत नव्हत्या. याच दरम्यान ब्रूसला सापडलेली ही नवी जात सगळ्यांपुढे आली. त्यावरच्या अथक प्रयोगांनंतर ब्रिटिशांनी अप्पर आसाममधल्या चबुआ इथं चहाची व्यावसायिक लागवड सुरू केली १८४० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात चहाच्या व्यवसायाने पाय रोवायला सुरुवात केली. चिनरी ही जात आधी आसाममध्ये आणि नंतर दार्जिलिंग तसंच कांगरामध्ये लावली गेली. ती तिथे चांगलीच रुजली. दार्जििलगचा पहिला सुपरिटेंडंट आर्चिबाल्ड कॅम्पबेल याने दार्जिलिंगमध्ये १८४१ मध्ये त्याच्या घराजवळ चिनारीची रोपं लावली. त्याचं बघून इतरांनीही रोपं लावायला सुरुवात केली. १८४७ मध्ये अधिकृतरीत्या चहाच्या रोपांची नर्सरी सुरू झाली. त्यानंतर लौकरच तुकवर टी इस्टेटमध्ये १८५० मध्ये चहाची व्यावसायिक लागवड सुरू झाली.
भारतात चहा लोकप्रिय करण्यासाठी ब्रिटिशांनी खूप प्रयत्न केले. ठिकठिकाणी चहाचे स्टॉल उभे केले गेले. वेगवेगळ्या कारखान्यांमधून चहाची सुट्टी ठेवली जाई. घरोघरी जाऊन चहा कसा करायचा याची प्रात्यक्षिकं दाखवली जात. रेल्वेचं आगमन झाल्यावर रेल्वे स्टेशनवर चहाचे ठेले उभारले गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात चहा लक्षणीय रीत्या लोकप्रिय झाला. १९०० शतकाच्या शेवटी भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण चहापैकी ७१ टक्के चहा भारतातच विकला जात होता. आज भारतात चहाचे दोन हजार उत्पादक आहेत. त्यात महत्त्वाच्या बागा आसाम, पश्चिम बंगाल, तमीळनाडू आणि केरळमध्ये आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो आणि या चहा उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. आज भारतात चहाच्या उद्यागातून २० लाख लोकांना रोजगार मिळतो आहे.
टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार आज संपूर्ण आसाममध्ये मिळून ४३ हजार २९२ चहाच्या बागा आहेत. ६२ हजार २१३ चहाच्या बागा निलगिरीमध्ये आहेत. तर दार्जिलिंगमध्ये फक्त ८५ चहाच्या बागा आहेत. दार्जिलिंग, आसाम आणि निलगिरी चहाच्या अधिकृत पुरवठय़ासाठी १९५३ मध्ये टी अॅक्ट तयार करण्यात आला असून त्यामार्फत या चहाची अधिकृततेची तपासणी होऊन तसं प्रमाणपत्र दिलं जातं.
भारतात चहाची लागवड करण्यासाठी ब्रिटिशांनी जो खटाटोप केला त्याला आणखी एक बाजू होती. ती होती चीनबरोबरच्या संबंधांची. चीनकडून चहा विकत घेऊन तो इंग्लंडमध्ये तसंच इतर ठिकाणी नेऊन विकला जाई. आपल्या चहाच्या मक्तेदारीची जाणीव असलेला चीन चहाचे दर सतत चढे ठेवत असे. दुसरीकडे चहाची मागणीही वाढती होती. इंग्लंडमधला साधा कामगारदेखील त्याच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम चहावर खर्च करत असे. ब्रिटिश भारतातून कापूस नेत, त्याचं कापड विणणं वगैरे व्यापारातून जो पैसा मिळत असे तो चहा खरेदीसाठी वापरला जात असे. या दरम्यान चीनच्या उत्तरेतल्या व्यापाऱ्यांनी चीनच्या ग्रामीण भागातून दक्षिणेला मोठय़ा प्रमाणात कापूस पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे ब्रिटिशांच्या कापसाचे, कापडाचे भाव पडायला सुरुवात झाली. त्यांना ब्रिटिशांच्या भारतातल्या कापसाच्या व्यापाराशी स्पर्धा करायची होती. यातून निर्माण झालेला व्यापाराला असमतोल कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्याकडची वुलनसारखी काही उत्पादनं विकायचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भारतातली उत्पादनं वाढवणं हा एकच उपाय त्यांच्यापुढे होता. १७ तसंच १८ व्या शतकात ब्रिटिशांनी चीनला पुरवलेलं असं उत्पादन होतं, अफू. चिनी राज्यकर्ते तसंच अधिकाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता ब्रिटिशांनी अफूचा पुरवठा वाढवला तसं चीनमध्ये अफूचा वापर आणि मागणीही वाढली. चीनमध्ये अफूचा व्यापार वाढवण्यासाठी ब्रिटिशांनी चोखाळता येतील ते सगळे मार्ग चोखाळले. त्यांनी अधिकाऱ्यांना लाच दिली. चीनच्या ग्रामीण भागात अफूची तस्करी वाढावी यासाठी चिनी लोकांना मदत केली. अफूबद्दल काहीच माहीत नसलेल्या लोकांना सुरुवातीच्या काळात फुकट अफू वाटून तिची सवय लावली. याचा चीनच्या सगळ्याच व्यवस्थांवर खूप मोठा परिणाम झाला. खूप मोठी लोकसंख्या अफूच्या अधीन झाली. अफू विकत घेण्यासाठी चांदीचा वापर होऊ लागला. अर्थव्यवस्थेचा पाया असलेली चांदी मोठय़ा प्रमाणात देशाबाहेर जाऊ लागली. या अफूच्या व्यापारामुळे तेव्हा आणि नंतरही चीनला बऱ्याच आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागलं. मिठावर होती तशीच अफूवरही सरकारची मक्तेदारी निर्माण करून अफूचा वापर कायदेशीर करावा का या मुद्दय़ावरही चीन विचार करू लागला. १८३८ मध्ये तेव्हाच्या सम्राटाने त्याचा सगळ्यात विश्वासू सहकारी लिन त्से हू याला अफूची तस्करी रोखण्यासाठी आवश्यक ते सगळं करण्यासाठी कॅटॉन इथं पाठवलं.
तिकडे इंग्लंडमध्ये अफूच्या व्यापारावरून दोन तट पडले होते. काही ब्रिटिश लोकांना अशा पद्धतीने अफूचा व्यापार करणं अजिबात मान्य नव्हतं. पण अशा पद्धतीनेच अफूचा व्यापार करून उद्धट चिनी लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे, हे मत असलेल्यांनी कुरघोडी केली आणि चीनमध्ये ब्रिटिशांचा अफूचा व्यापार बराच काळ सुरू राहिला. शेवटी चिनी सम्राटाने ब्रिटिशांच्या मागण्या मान्य केल्या आणि शांतता करारावर सही केली. या कराराने पाश्चात्त्यांना चीनची दारं उघडी झाली आणि पाश्चात्त्यांकडून चीनचं पद्धतशीर शोषण सुरू झालं. १९०८ पर्यंत चीनमध्ये अफूचा व्यापार कायदेशीर राहील असं ब्रिटिशांनी बघितलं. तरतरी आणणारा चहा आणि गुंगी आणणारी अफू या दोन्ही घटकांनी चीनच्या अर्थव्यवस्थेवर बराच काळ राज्य केलं.
इतर देश
चिनी सम्राटाने १६१८ मध्ये रशियन झारला दिलेल्या चहाभेटीमुळे रशियाला चहाची ओळख झाली. १७ व्या शतकात चीन आणि रशियात व्यापारी संबंध वाढले. पण दोन्ही देशांमधलं अंतर, ते पार करण्यातले त्या काळातले धोके आणि चहाच्या किमती यामुळे रशियात त्या शतकात तरी चहा राजघराण्यापुरताच राहिला. त्यानंतर शतकभराने चहाच्या किमती कमी झाल्या तेव्हा रशियात चहा सर्वसामान्यांच्या घरात पोहोचला. आता चहा आणि वोडका ही रशियातली दोन लोकप्रिय पेयं आहेत. चहा करण्यासाठी रशियात समोवार नावाचं वैशिष्टय़पूर्ण भांडं वापरलं जातं. व्हिएतनामने जगाला चहाचे जस्मीन टी आणि लोटस टी हे दोन प्रकार दिले. हे त्यांचे चहाचे शाही प्रकार जगभर लोकप्रिय आहेत. त्याशिवाय ओलांग टी आणि ब्लॅक टीचं तिथे मोठय़ा प्रमाणात उत्पादन आणि वापर होतो. याशिवाय कोरिया, इराण, तैवान, तुर्कस्तान या देशांमध्येही चहाचे वैशिष्टय़पूर्ण प्रकार आहेत. चीन आणि भारत यांच्यानंतर सगळ्यात जास्त चहाचं उत्पादन करणारा देश म्हणजे श्रीलंका. तिथले सिलोन टी आणि इतर प्रकार जगभर लोकप्रिय आहेत. हाँगकाँगमध्ये चहा हे पारंपरिक पेय आहे. तिथे युम चहा लोकप्रिय आहेच शिवाय ब्रिटिशांनी लोकप्रिय केलेला चहा आणि स्थानिक चहा असे दोन्ही प्रकारचे चहा प्यायले जातात.
तर असा हा चहा. जागतिकीकरण ही संकल्पनासुद्धा माहीत नव्हती तेव्हापासून चहाचा जगभर व्यापार करत चीनने आपली मक्तेदारी सिद्ध केली होती. तिला उत्तर देण्याच्या प्रयत्नात ब्रिटिशांनी भारत आणि श्रीलंकेत चहाच्या उद्योगाची पायाभरणी केली. त्यातून आज भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश ठरला आहे.
(इंटरनेटवरील विविध साईट्सवरून)