ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार १ जानेवारीला सुरू होणाऱ्या नव्या वर्षांचं आता सर्रास स्वागत केलं जात असलं तरी ही काही कालगणनेची एकमेव पद्धत नाही. सूर्यभ्रमण आणि चंद्रभ्रमणानुसार कालगणनेच्या विविध पद्धती आहेत. त्या कोणत्या, त्यांची कालगणना कशी केली जाते? याविषयीची ही तपशीलवार माहिती..
‘हॅपी न्यू इअर’ असे म्हणून शुभेच्छा देण्याची पद्धत भारतीयांना शिकायला मिळाली ती पाश्चात्त्यांकडून. भारतीय परंपरेत मुळात जानेवारी ते डिसेंबर अशी कालगणनाही नव्हती आणि मध्यरात्री नव्या वर्षांच्या शुभेच्छा देण्याची पद्धतही नव्हती. त्यामुळेच अशा वेळी पारंपरिक दृष्टिकोन ठेवणारी आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारी मंडळी सांगतील, ‘आमचा वर्षांरंभ वेगळा आहे.’ भारतीय परंपरेस सुपरिचित असणारे नवे वर्ष चत्र प्रतिपदेला (मार्च-एप्रिल महिन्यात) सुरू होते. त्या पारंपरिक नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी शुभेच्छा द्या, असे ही मंडळी सुचवितात. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर गुढी पाडव्याला, म्हणजेच चत्र प्रतिपदेला नवे वर्ष सुरू होते. पण भारताच्या अन्य भागांमध्ये कालगणनेच्या आणि वर्षांरंभ नेमका कधी मानावयाचा याबद्दलच्या, अनेक भिन्न भिन्न परंपरा होत्या. कोणी सूर्यभ्रमणानुसार तर कोणी चंद्रभ्रमणानुसार वर्ष मानतात. काही ठिकाणी नक्षत्रांचा उपयोग वर्षांचे मोजमाप करण्याकरिता केला जातो. वर्षांचा पहिला महिना काहींच्या मते चत्र, तर काहींच्या मते काíतक असतो. शिवाय काही प्रांतांत पौर्णिमा झाली की महिना बदलतो, तर अन्यत्र अमावास्या झाली की. या विविध नववर्षांशी संबंधित विविध परंपरांपकी काहींचा परिचय आपण करून घेणार आहोत.
कालगणनेच्या नऊ पद्धती
आधुनिक युगात पाश्चात्त्यांनी परिचित करून दिलेली ग्रेगॅरिअन कॅलेंडरप्रमाणे चालणारी दिवस-महिना-वर्ष अशी कालगणनेची पद्धत सध्या आपण दैनंदिन आयुष्यात वापरतो. त्याचप्रमाणे प्राचीन काळी तिथी-मास-ऋतू-अयन-संवत्सर अशा प्रकारे कालगणना केली जात असे. वर्ष हे जरी कालगणनेचे सर्वात मोठे मान असले, तरी किती दिवसांचे वर्ष होते, हे निरनिराळ्या पद्धतींमध्ये निरनिराळे मानले जात असे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमधून आपल्याला ब्राह्म, दिव्य, पित्र्य, प्राजापत्य, बाहस्र्पत्य, सौर, सावन, चान्द्र आणि नक्षत्र अशा नऊ पद्धती अगर मान सांगितल्याचे आढळते.
ब्रह्मदेवाच्या आयुष्यावरून मोजले जाते ते ब्राह्म मान होय. पुराणांमध्ये आपल्याला ब्रह्मदेवाच्या आयुर्मानाबद्दलची वर्णने सापडतात. याचा चार युगांच्या कल्पनेशी घनिष्ट संबंध आहे. भारतीय परंपरेत कालचक्र फिरून पुन्हा पहिल्यापासून सुरू होते, ही कल्पना सापडते (उदा. नेमेचि येतो मग पावसाळा). पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी भविष्यात पुन्हा घडणार आहेत आणि हे कालचक्र अव्याहतपणे चालूच राहणार आहे.
चार युगे आणि मन्वन्तर
सत्य अथवा कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युगे होत. प्राचीन भारतीयांची धारणा होती की, या चार युगांमध्ये धर्माचा एकेक पाय कमी होत जाणार आहे आणि अधर्माची चलती होत जाणार आहे. कृतयुगात धर्म चारही पायांवर उभा असतो. सर्व लोक सदाचरणी, सत्यवचनी असतात. मात्र हळूहळू दुराचरण, असत्याची कास धरणे वाढत जाते. त्यामुळेच पुढे धर्म त्रेतायुगात तीन आणि द्वापरयुगात दोन पायांवर, तर कलियुगात फक्त एका पायावर उभा असतो. कलियुगाच्या अंती प्रलय होतो, वाईटाचा नाश होतो आणि पुन्हा सत्ययुग अवतरते. ४,३२,००० या संख्येला क्रमश: ४, ३, २ आणि १ या संख्यांनी गुणले, म्हणजे प्रत्येक युगाची वष्रे किती हे समजते. हा गुणाकार केल्यास कृतयुगाची वष्रे १७२८०००, त्रेतायुगाची वष्रे १२९६०००, द्वापरयुगाची वष्रे ८६४००० आणि कलियुगाची वष्रे ४३२००० आहेत, हे ध्यानात येईल. कृत-त्रेता-द्वापर-कली असे चार युगांचे एक चक्र पूर्ण झाले की एक महायुग होते. अशी ७१ महायुगे झाली म्हणजे एक मनु होतो. मनु म्हणजे प्रलयांती तगून पुढच्या कालचक्रात जाणारा मनुष्य होय. एका मनुपासून दुसऱ्या मनुपर्यंतच्या, म्हणजेच ७१ महायुगांच्या काळाला मन्वन्तर असे म्हणतात. दोन मन्वंतरांमधल्या संधिकाळी जो जलप्रलय होतो, तो एका कृतयुगाच्या काळाइतका (१७२८००० वष्रे) चालतो, असे मानले जाते. पुराणातील ही कालगणना एवढय़ावरच थांबत नाही तर ती अजूनही पुढे जाते. एकूण मनुंची संख्या आहे चौदा. म्हणजेच मन्वंतरेही झाली चौदा. स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, देवसावर्णि आणि इन्द्रसावर्णि अशा चौदा मनुंची मन्वंतरे होऊन गेली की, ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. मन्वंतरे आणि त्यांच्यामधले संधिसमय अशी मोजदाद केल्यास हा काळ १००० महायुगांइतका भरतो. पुढे तेवढीच लांब ब्रह्मदेवाची रात्र असते. अशा ३६० दिवस-रात्रींचे एक वर्ष होते. अशा १०० वर्षांचे आयुष्य ब्रह्मदेवाला प्राप्त झाले आहे!
आत्तापावेतो ब्रह्मदेवाच्या आयुष्याची पन्नास वष्रे पूर्ण झाली असून एक्कावन्नावे वर्ष चालू आहे. या वर्षांतील सध्याचे मन्वंतर वैवस्वत नावाच्या मनुचे असून त्याचा प्रारंभ झाल्यापासून (७१ पकी) सत्तावीस महायुगे होऊन गेली आहेत आणि अठ्ठाविसावे महायुग चालू आहे, अशी धारणा आहे. या परंपरेस अनुसरूनच वैवस्वत मन्वंतराच्या प्रारंभापासून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत पंढरीत अवस्थित झालेल्या विठ्ठलास संत नामदेवांनी ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ असे म्हटल्याचे दिसते.
सहा शककत्रे
सध्या चालू असलेल्या कलियुगात एकूण सहा शककत्रे होणार आहेत, असे पुराणे सांगतात. त्यापकी काही होऊन गेले आहेत तर काही व्हायचे आहेत. शककत्रे म्हणजे ते प्रसिद्ध राजे होत, ज्यांनी आपल्या नावाने स्वतंत्र कालगणना सुरू केली. पुराणकारांच्या मते धर्मराज युधिष्ठिराच्या राज्यारोहणापासून युधिष्ठिर शक सुरू झाला, जो ३०४४ वष्रे चालू होता. त्यानंतर उज्जयिनी नगरीत विक्रम राजाने विक्रमसंवत् सुरू केला, जो १३५ वष्रे चालला. मग पठणच्या शालिवाहनाने शालिवाहन शकास सुरुवात केली. हा शक १८००० वष्रे चालणार आहे. नंतर वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन नामक राजा होईल, ज्याचा शक १०००० वष्रे चालेल. तसेच त्यानंतर धारानामक तीर्थावर नागार्जुनाचा शकप्रारंभ होईल जो ४००००० वष्रे चालेल आणि शेवटी करवीर नगरीत कल्की (विष्णूचा दहावा अवतार) होईल, ज्याचा शक ८२१ वष्रे चालेल. अशा प्रकारे कलियुगाची ४३२००० वष्रे पूर्ण होतील. वाचकांना या कालगणनेवरून हे लक्षात आलेच असेल की, सध्या शालिवाहन शक चालू असून त्याची केवळ १०३७ वष्रेच पार पडली आहेत. या कालगणनेनुसार प्रलय होऊन जग नष्ट व्हायला अजून बराच अवकाश आहे!
आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती ब्राह्म मानाच्या संदर्भात. दिव्य मानामध्ये देवांच्या वर्षांनुसार कालगणना केली जाते. आपल्या एका वर्षांइतका देवांचा एक दिवस असतो आणि अशा ३६० दिवसांचे त्यांचे एक वर्ष होते, हे दिव्य वर्ष होय. एका चांद्र मासाइतके पितरांचे एक वर्ष असते, आणि अशा ३६० वर्षांचे एक पित्र्य वर्ष बनते. याच प्रकारे मन्वंतराइतके प्राजापत्य वर्ष असते, आणि गुरू ग्रहाच्या राशिसंक्रमणावरून गौरव अथवा बार्हस्पत्य वर्ष ठरते. सूर्याच्या परिभ्रमणावरून सौरवर्ष, एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक दिवस धरून अशा ३६० दिवसांचे सावन वर्ष, तिथींनुसार महिने मोजल्यास चान्द्र वर्ष आणि चंद्र २७ नक्षत्रे फिरल्यावर एक महिना मानल्यास अशा १२ महिन्यांचे नाक्षत्र वर्ष बनते. अशा या वर्षगणनेच्या विविध पद्धती जरी प्राचीन ग्रंथांमध्ये सापडत असल्या तरी सगळ्या व्यवहार्य नाहीत. मानवाचे दैनंदिन व्यवहार उपरोक्त नऊपकी प्रामुख्याने सौर, सावन, चान्द्र आणि नाक्षत्र या चारच पद्धतींनी चालत असते. या सर्व पद्धतींमध्ये जे वर्ष मानले जाते त्यात महिने असतात बारा. म्हणजेच १२ सौर महिन्यांचे एक सौर वर्ष होते, १२ सावन महिन्यांचे एक सावन वर्ष होते, १२ चान्द्र महिन्यांचे एक चान्द्र वर्ष होते आणि १२ नाक्षत्र महिन्यांचे एक नाक्षत्र वर्ष होते. आता हे सौर, सावन, चान्द्र आणि नाक्षत्र महिने कसे ठरतात हे पाहू या.
सौर आणि सावन मास
सौर मास आणि सौर वर्ष ही नावांप्रमाणेच सूर्याशी संबंधित आहेत. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो ते एक सौर वर्ष होय. आकाश म्हणजे ३६० अंशात पसरलेले एक वर्तुळ आणि त्यात मध्यभागी पृथ्वी आहे, असे मानल्यास आपल्याला सूर्य या संपूर्ण आकाशात पसरलेल्या नक्षत्रचक्रातून भ्रमण करतो आहे असे दिसेल. रोज सूर्य एक अंश इतके अंतर पार करतो. प्रत्येक सौर मासात १२ अंश या गतीने १२ सौर मासांत (एका सौर वर्षांत) हे ३६० अंशांचे वर्तुळ सूर्य पूर्ण करतो. अश्विनी नक्षत्रापासून प्रारंभ करून पुन्हा अश्विनी नक्षत्रापर्यंत सूर्य आला, म्हणजे एक वर्ष पूर्ण झाले आणि नवे वर्ष सुरू झाले असे मानण्यात येते. हा काळ ३६५ दिवसांपेक्षा किंचित अधिक असतो.
एकदा सूर्य उगवल्यापासून तो (दुसऱ्या दिवशी) पुन्हा उगवेपर्यंतचा काळ म्हणजे सावन दिवस होय. अशा ३० सावन दिवसांचा एक सावन मास आणि १२ सावन मासांचे एक सावन वर्ष होते. थोडक्यात, सावन वर्षांत ३६० दिवस असतात. ही कालगणना एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत केली जात असल्याने समजायला अगदी सोपी आहे.
चान्द्र आणि नाक्षत्र मास
चान्द्र मास हा तिथींवर अवलंबून असतो. पृथ्वीस सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला लागणाऱ्या काळापेक्षा चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी मारायला लागणारा काळ खूप कमी असतो. मात्र आपण पृथ्वीस मध्यभागी ठेवून आकाशात पाहिले तर सूर्य आणि चंद्र नक्षत्रचक्रातून फिरत आहेत असे दिसेल. अर्थातच सूर्यापेक्षा खूपच वेगाने चंद्र त्याची फेरी पूर्ण करेल. ज्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच जागी असतील, त्या दिवशी सूर्यप्रकाशामुळे चंद्रदर्शन होत नाही. हा दिवस अमावास्येचा होय. सूर्य-चंद्र एकत्र आहेत त्या ठिकाणी शून्य अंश धरायचे आणि तिथून पुढे त्यांच्यातील अंतर वाढत जाईल तसे मोजायचे. त्यांच्यातील अंतर १२ अंशांचे झाले की एक तिथी झाली असे मानतात. तसेच पुढे २४, ३६, ४८, ६० असे अंश वाढत जातील तसतशा पुढच्या तिथी मानल्या जातात. अशा प्रकारे सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध आले, म्हणजेच त्यांच्यात १८० अंशांचे अंतर पडले, की १५ तिथी पूर्ण होतील. हा दिवस पौर्णिमेचा होय. इथून पुढचे उर्वरित १८० अंश पार केले की (अजून १५ तिथी झाल्या की), पुन्हा अमावास्या होईल. थोडक्यात ३० तिथी पूर्ण झाल्या की एक चान्द्र मास झाला. हा मास सुमारे २० दिवसांचा असतो. अशा १२ चान्द्र मासांचे एक चान्द्र वर्ष होते.
चंद्राला नक्षत्रचक्रामध्ये (प्रत्यक्षात पृथ्वीभोवती) एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा वेळ म्हणजे एक नाक्षत्र मास होय. हा काळ साधारणपणे २७ दिवसांचा असतो. अशा बारा फेऱ्या पूर्ण झाल्या की एक नाक्षत्र वर्ष होते. वरवर पाहता चान्द्र आणि नाक्षत्र मास सारखेच वाटू शकतात, कारण दोन्हीत चंद्राला फेरी मारण्याकरिता लागणारा वेळ गृहीत धरलेला दिसतो; परंतु हे लक्षात घ्यावे लागेल की, चान्द्र मासात आपण सूर्यापासून चंद्राचे अंतर मोजतो. आपण कल्पना केलेल्या वर्तुळाकृती आकाशात सूर्यही स्थिर न राहता, संथ गतीने का होईना, फिरत असतोच. त्यामुळे चंद्र फिरून जेव्हा सूर्यापर्यंत परत येतो, तेव्हा सूर्यही त्याच्या मूळ ठिकाणापासून साधारणपणे १२ अंशांइतके अंतर पुढे आलेला असतो. त्यामुळे या प्रकारात चंद्राला सूर्यापर्यंत परत पोहोचण्याकरिता प्रत्यक्षात ३६० पेक्षा अधिक अंशांचे अंतर कापावे लागते. त्याउलट नाक्षत्र मासामध्ये चंद्र अश्विनी नक्षत्रापासून निघून पुन्हा त्या नक्षत्रात परत येईपर्यंतचा काळ, म्हणजे बरोबर ३६० अंश अंतर पार करण्यास लागणारा वेळ धरला जातो. त्यामुळे चान्द्र मास आणि वर्ष क्रमश: नाक्षत्र मास आणि वर्षांपेक्षा मोठे असतात. ढोबळमानाने पाहायचे झाल्यास चान्द्र वर्ष ३५४ दिवसांचे, तर नाक्षत्र वर्ष ३२८ दिवसांचे असते.
सूर्याची अयने
भारतीयांनी या वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्राचीन काळीच वापरायला प्रारंभ केला होता. निरनिराळ्या महिन्यांचे आणि वर्षांचे आपसात गणित जुळविताना काय करावे लागेल याचाही विचार त्यांनी करून ठेवला होता. सूर्याची दैनंदिन गती चंद्राइतकी स्पष्टपणे कळून येणारी नसली, तरी त्याच्या रोजच्या उदयास्ताच्या वेळची बदलती स्थिती आणि बदलती नक्षत्रे यांचा अंदाज येत होता. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यास रोजचा सूर्य एकाच ठिकाणी मध्यभागी न उगवता थोडा डावी-उजवीकडे उगवत असतो हे ध्यानात येत असे. ज्या दिवशी सूर्य जास्तीत जास्त डावीकडे (उत्तरेकडे) उगवतो, त्या दिवसापासून पुढे दररोज तो हळूहळू उजवीकडे (दक्षिणेकडे) उगवू लागतो. हे सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे म्हणजे दक्षिणायन होय. असे करता करता एका दिवशी तो जास्तीत जास्त उजवीकडे (दक्षिणेकडे) उगवतो, आणि तिथून परत मागे फिरून डावीकडे (उत्तरेकडे) उगवू लागतो. हे सूर्याचे उत्तरेकडे सरकणे म्हणजेच उदगयन किंवा उत्तरायण होय. हा काळ साधारणपणे प्रत्येकी सहा महिन्यांचा असतो. एका वर्षांत दोन अयने होतात.
अधिक आणि क्षय मास
आकाशातील २७ नक्षत्रांपासून १२ राशींची कल्पना केली जाते. आकाशातील तारकांच्या विशिष्ट स्थानामुळे मेंढा, बल, खेकडा इत्यादी प्राण्यांच्या ज्या आकृत्या भासतात, त्यावरून त्यांना मेष, वृषभ, कर्क इत्यादी नावे देण्यात आली आहेत. चंद्राचे परिभ्रमण वेगाने होत असल्याने तो रोज एक नक्षत्र पार करीत महिन्याभरात संपूर्ण नक्षत्रचक्र अथवा राशिचक्र पार करतो. सूर्य मात्र या चक्रातून एका महिन्यात सुमारे ३० अंश म्हणजे एका राशीइतकेच अंतर पुढे सरकतो. म्हणजेच प्राचीन भारतीयांच्या दृष्टीने प्रत्येक चान्द्र मासात एकदा तरी सूर्याचे राशिसंक्रमण होतेच. त्यामुळे चंद्राच्या नेमक्या किती फेऱ्या झाल्या (किती महिने झाले), हे सूर्य कोणत्या राशीत आहे ते पाहिल्यास चटकन ध्यानात येईल. कारण १२ चान्द्र महिन्यात सूर्य १२ राशी पार करतो.
आपण वर पाहिले, त्याप्रमाणे सौर मासापेक्षा चान्द्र मास लहान असतो. याचा परिणाम असा होतो की, एखाद्या चान्द्र महिन्याच्या अगदी शेवटी सूर्याचे राशिसंक्रमण झाल्यास पुढील चान्द्र महिना पूर्ण झाला तरी सूर्य मात्र पुढील राशीत गेलेला नसतो. तर पूर्वी होता, त्याच राशीच्या शेवटी पोहोचलेला असतो. अशा वेळी मग पंचाईत होते. सूर्याने रास बदलली नाही, आणि चान्द्र पद्धतीचा महिना मात्र पूर्ण झाला. मग अशा महिन्याचे करायचे काय? नेहमीच्या मांडणीपेक्षा हा महिना जास्तीचा आला, म्हणून त्याला अधिक मास किंवा अधिक महिना असे म्हटले जाते. अशा महिन्याला मुळात त्या ठिकाणी जो महिना असतो, त्याच महिन्याच्या नावाने ओळखले जाते. उदा. एखाद्या वेळेस नेहमीचा माघ महिना पूर्ण झाला. पुढील महिन्याचे नाव फाल्गुन. पण या फाल्गुन महिन्यात सूर्याचे राशिसंक्रमण झाले नाही, तर त्याला म्हणायचे अधिक फाल्गुन. त्यानंतर जो महिना सुरू होईल, त्याला म्हणायचे निज फाल्गुन.
अशा प्रकारचे आकाश निरीक्षण आणि महिन्यांची मोजदाद वेदकाळापासून चालू होती. ऋग्वेदातही आपल्याला अधिक महिन्याचा उल्लेख सापडतो. गणिताच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास अधिक महिना म्हणजे सौर आणि चान्द्र वर्षांमधील फरक जुळविण्याकरिता उपयोगी पडणारे साधन आहे. दर तिसऱ्या चान्द्र वर्षांत असा एक अधिक महिना धरला तर ते चान्द्र कॅलेंडर सौर कॅलेंडरशी परत जुळेल आणि दोन्ही कालगणनांमध्ये फरक पडणार नाही. या दृष्टीने हा अधिक मास अत्यंत उपयुक्त आहे. अन्यथा काळाच्या ओघात चान्द्र कालगणना सौर गणनेपेक्षा मागे पडत गेली असती. वेगवेगळ्या गणनांमध्ये गणिताच्या बाजूने समानता राहावी याकरिता केलेली ही युक्ती वाखाणण्याजोगी आहे. गणिताकरिता अशी मोजदाद फायदेशीर असली तरी महिन्याभराच्या जीवनावश्यक वस्तू कशाबशा मिळवणाऱ्या गरीब लोकांच्या मनात अधिक महिन्यामुळे चिंताच उत्पन्न होत असे. बारा महिन्यांची व्यवस्थाच कशी तरी होते, त्यात आता या अधिकच्या आलेल्या महिन्याची भर पडल्याने निर्वाह कसा करावा, अशी शंका सर्वसामान्यांना येई. ‘दुष्काळात तेरावा महिना’ यासारख्या म्हणी यातूनच तयार झाल्या आहेत.
क्वचित प्रसंगी अधिक मासाप्रमाणे क्षय मासही येतो. एखाद्या वेळी एका चान्द्र मासात सूर्याची दोन राशिसंक्रमणे झाली तर अशा महिन्याचे काय करायचे, असा प्रश्न उद्भवतो. दोन राशिसंक्रमणे म्हणजे वास्तविक दोन महिने. पण आपल्याला तर एकच महिना झालेला दिसतो आहे. याचाच अर्थ असा की, दुसरा महिना गायब झाला किंवा त्या महिन्याचा क्षय झाला. अशी स्थिती फारच दुर्मीळ असते. एकाच महिन्यात सूर्याची दोन राशिसंक्रमणे झाल्यास साहजिकच त्याच्या मागील आणि पुढील महिन्यात राशिसंक्रमण होत नाही. म्हणजेच ते दोन महिने अधिक असतात. अशा प्रकारे ज्या वर्षी क्षय मास येतो, त्या वर्षी एकूण महिने (एक कमी आणि दोन अधिक धरून) तेराच असतात. अधिक आणि क्षय महिना येणे हे सूर्याच्या आकाशातील विशिष्ट स्थानाशी आणि राशिसंक्रमणाशी संबंधित असल्याने बाराही महिने अधिक किंवा क्षय येऊ शकत नाहीत. फाल्गुन, चत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हेच महिने अधिक येऊ शकतात आणि काíतक, मार्गशीर्ष आणि पौष यांच्यातीलच एखाद्या महिन्याचा क्षय होऊ शकतो. माघ महिना कधी अधिकही येत नाही आणि त्याचा कधी क्षयही होत नाही.
महिन्यांची नामनिश्चिती
सर्वसामान्यपणे असे म्हणता येईल की, पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचे नाव पडते. जसे चित्रा नक्षत्रात पौर्णिमेचा चंद्र असेल तर तो चत्र महिना, श्रवण नक्षत्रात असेल तर श्रावण महिना किंवा कृत्तिका नक्षत्रात असेल तर काíतक महिना, इत्यादी. प्रत्येक महिन्यात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंतची तिथींची नावे दोन वेळेस येतात. पंधरावी तिथी मात्र पौर्णिमा आणि अमावास्या अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. अमावास्या झाली की तिथून पुढे शुक्ल पक्ष सुरू होतो, ज्यात चंद्राच्या कला वाढत जातात आणि पौर्णिमेला पूर्णचंद्राचे दर्शन घडते. यानंतर कृष्ण पक्ष सुरू होतो, ज्यात चंद्रकला घटत जातात आणि शेवटी अमावास्येला चंद्र अजिबात दिसत नाही. नर्मदेच्या दक्षिणेकडे अमान्त महिने मानायची पद्धत आहे. म्हणजेच प्रथम शुक्ल आणि नंतर कृष्ण पक्ष मानायचा आणि अमावास्या झाली की महिन्याचे नाव बदलायचे. याउलट उत्तर भारतात मात्र पौर्णिमान्त महिने प्रचारात आहेत. तिथे आधी कृष्ण पक्ष आणि नंतर शुक्ल पक्ष मानून पौर्णिमा झाली की महिन्याचे नाव बदलतात. चत्राऐवजी काíतक अगर मार्गशीर्ष मासातही वर्षांरंभ करण्याची पद्धत प्राचीन भारतात रूढ होती. तसेच नक्षत्रावरून महिन्याला ओळखण्याची पद्धत रूढ होण्यापूर्वी चत्रादी १२ महिने मधु, माधव, शुक्र, शुचि, नभस्, नभस्य, इष, ऊर्ज, सहस्, सहस्य, तपस् आणि तपस्य या नावांनी ओळखले जात असत. अधिक महिन्याला अंहसस्पति असे नाव होते. वैदिकसाहित्यात अरुण, अरुणरजस्, पुण्डरीक, विश्वजित्, अभिजित्, आद्र्र, पिन्वमत्, उन्नमत्, रसवत्, इरावत्, सवरषध आणि संभर अशी बारा नावे आणि अधिक महिन्याकरिता महस्वत् असेही नाव वापरल्याचे सापडते.
भारतातील वर्षांरंभ
आपण आतापर्यंत भारतातील विविध कालगणनांच्या पद्धती पाहिल्या. या सर्व वैविध्यातूनच निरनिराळी वष्रे आणि त्यांचे आरंभ कोणत्या दिवशी होतात याबद्दलची निरनिराळी मते प्रचलित झाली. जेव्हा वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपापल्या राज्यारोहण वर्षांपासून नवी कालगणना सुरू केली, तेव्हा साहजिकच आणखी काही वर्षगणना उदयाला आल्या. त्यातल्या सगळ्या टिकून राहिल्या, असेही नाही. अनेक कालगणनांच्या पद्धती कालौघात नष्टही झाल्या आहेत.
प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी आपण पौराणिक शककर्त्यांची माहिती पाहिली. त्यापकी विक्रम हा राजा उज्जयिनी नगरीत होऊन गेल्याचे मानले जाते. त्याने सुरू केलेल्या वर्षगणनेस ‘संवत्’ असे नाव आहे. याकरिता चान्द्र महिने वापरले जातात. बंगाल वगळता नर्मदेच्या उत्तरेस आणि गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणावर हा संवत् आजही वापरात आहे. उत्तर भारतात पौर्णामान्त चत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेस त्या गणनेचे नवे वर्ष सुरू होते. गुजरातचा काही भाग आणि महाराष्ट्रात मात्र अमान्त काíतक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून (बलिप्रतिपदेपासून) याचे नवे वर्ष सुरू केले जाते. याशिवाय कच्छ आणि काठेवाडच्या काही भागात अमान्त आषाढ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेस नवे वर्ष सुरू केले जाते. चत्रादी महिन्यांकरिता काही जैन परंपरांमध्ये वेगळी नावे सापडतात. ती वसंत, कुसुमसम्भव, निदाघ, दानविरोधी, अभिनन्द, सुप्रतिष्ठ, विजय, प्रतिवर्धन, श्रीयान्, शिव, शिशिर आणि हैमवान् अशी आहेत.
शालिवाहन नामक पौराणिक राजाने विक्रम संवतानंतर १३५ वर्षांनी नवी कालगणना सुरू केल्याचे मानले जाते. वास्तविक या कालगणनेस ‘शक’ असे विशेषनाम असून हेच नाव अन्य कालगणनांनाही सामान्यनाम म्हणून लागू केले जाते. केरळचा काही भाग वगळता संपूर्ण दक्षिण भारतात हीच कालगणना प्रचलित आहे. याचे वर्ष अमान्त चत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. महिने चान्द्र असतात. बौद्ध धर्म आणि साहित्यात याच कालगणनेचा वापर केला गेल्याने प्राचीन काळी भारतासोबतच ब्रह्मदेश, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादी दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांमध्येही या कालगणनेचा प्रचार झाल्याचे असंख्य दाखले उपलब्ध आहेत.
पारशी लोकांची वेगळी कालगणना प्रचारात आहे. प्राचीन पारसीक (इराण) देशातही नवा राजा गादीवर आल्यावर नवी कालगणना सुरू करण्याची प्रथा होती. त्यांचे मास सावन असल्याने ३६० दिवसांचेच वर्ष भरत असे. सौरमानाशी मेळ बसण्याकरिता पाच दिवस ‘गाथा’ म्हणून अधिकचे मानण्यात येऊ लागले. तरीही काही वर्षांनी पुन्हा फरक पडतोच आहे, असे ध्यानात आले असावे (कारण सौर वर्ष ३६५ दिवसांपेक्षाही थोडे मोठे असते). मग ३३ वष्रे झाली की ८ दिवस अधिक धरावेत, अशी एक पद्धत सुरू झाली. काहींनी १२० वर्षांनंतर एक महिना अधिकचा मानावा (कबीस) असे मत प्रचारात आणले. इराणवर झालेल्या इस्लामी आक्रमणांनंतर ज्या वेळी पारशी लोक इतस्तत: विखुरले, तेव्हा त्यातील काहींना १२० वर्षांनी अधिक महिना मोजण्याचे स्मरण ठेवणे अशक्य झाले असावे. त्यामुळे अधिक महिना मानणारे आणि न मानणारे या दोन गटांची निर्मिती होऊन त्यांची वर्षगणना आता भिन्न असल्याचे आढळते. या कालगणनेतील महिन्यांची नावे फरवर्दी, आर्दबेिहस्त, खुर्दाद, तीर, अमरदाद, शहरेवार, मेहर, आबान, आजूर, दय, बहमन आणि इिस्पदर अशी आहेत.
मूळची अरेबियातील असणारी कालगणना म्हणजे ‘हिजरी’ होय. प्रेषित पगंबराने मक्केहून मदिनेला प्रयाण केले त्या दिवशी म्हणजे १५ जुल ६२२ रोजी (श्रावण शु. १, शके ५४४) रात्री या कालगणनेचा प्रारंभ झाल्याचे मानले जाते. त्यामुळे यातील दिवस (वार) संध्याकाळी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालतो. म्हणजेच आपल्या गुरुवारच्या संध्याकाळपासून शुक्रवारच्या संध्याकाळपर्यंत या कालगणनेतील शुक्रवार असतो. इस्लामचा भारतात प्रचार झाल्यापासून भारतात ही कालगणना परिचयाची झाली. शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा अगर द्वितीयेला चंद्रदर्शन झाले की या कालगणनेतील महिना सुरू होतो. या पद्धतीतील महिने चान्द्र असून त्यांचा कधीही सौरमानाशी मेळ घातला जात नाही. मोहरम, सप्फर, रबिलावल, रबिलाखर, जमादिलावल, जमादिलाखर, रज्जब, साबान, रमजान, सव्वाल, जिल्काद आणि जिल्हेज अशी यातील महिन्यांची १२ नावे आहेत.
बंगालमध्ये रूढ असलेली बंगाली कालगणना ५९३ मध्ये सुरू झाली. यात मेष संक्रांतीला नववर्षांचा प्रारंभ होतो, आणि पहिल्या महिन्यास वैशाख म्हटले जाते. असेच सववर्ष तामिळनाडूत सुरू होते, मात्र त्या महिन्यास चत्र असे संबोधले जाते.
सध्या दैनंदिन व्यवहारांकरिता वापरले जाणारे आणि आपल्याला सुपरिचित असणारे इंग्रजी कॅलेंडर सौर मानाचे असल्याने त्यातील वर्ष ३६५ दिवसांचे असते. याचा प्रारंभ मूलत: इसवीसनापूर्वी ४५ व्या वर्षी ज्युलिअस सीझर राजाच्या कारकीर्दीत झाल्याचे मानले जाते. सौर कालगणनेत ३६५ दिवसांपेक्षा जो किंचित अधिकचा काळ प्रत्यक्षात लागतो तो हिशोबात बसवण्याकरिता तीन वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिकचा (२८ ऐवजी २९) धरण्यास प्रारंभ झाला. त्या वर्षांस लीप इअर असे संबोधले जाते. मात्र असा एक दिवस वाढविल्याने १०० वर्षांनी एका दिवसाचा फरक पडत असल्याचे सोळाव्या शतकात ध्यानी आले. तिसऱ्या जॉर्जच्या काळात पोप तेरावा ग्रेगरी याने दर शंभराव्या वर्षी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीसच दिवस मानावेत आणि ज्या वर्षांला ४०० ने भाग जाईल, त्या वर्षी मात्र हे शतकवर्ष लीप इअर मानावे अशी क्लृप्ती काढली. तोपर्यंत वाढलेले १० दिवस त्याने एकदम कमी केले आणि नवीन कालगणना प्रचारात आणली, जी ग्रेगॅरिअन कॅलेंडर या नावाने जगभरात प्रचलित आहे. इंग्लंडमध्ये १७५१ सालापर्यंत २५ मार्चला नववर्षांचा प्रारंभ होत असे. युरोपातील अन्य देशांशी जुळवून घेण्याकरिता १७५२ साली तोपर्यंत झालेल्या/ करण्यात आलेल्या सर्व कमी-जास्त दिवसांचा विचार करून हे साल १ जानेवारी रोजी सुरू करण्यात आले. त्यानंतर १ जानेवारी रोजी या पद्धतीच्या नव्या वर्षांचा प्रारंभ होऊ लागला. भारत सरकारनेदेखील सौर मानाचा स्वीकार केला आहे. हे भारतीय सौर वर्ष मार्च महिन्यात सुरू होते.
हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या भारत देशात अनेक कालगणना आणि नववर्षांबद्दलचे मतप्रवाह रूढ होत गेल्याचे दिसते. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर, आपण दैनंदिन वापराकरिता इंग्रजी कालमापन पद्धती वापरतो, पण बहुतांश धार्मिक सण-समारंभ मात्र शालिवाहन शक आणि चत्रादी अमान्त महिन्यांची परंपरा डोळ्यासमोर ठेवूनच निश्चित केले जातात. व्यापारी वर्गात विक्रम संवत् आणि बलिप्रतिपदेला सुरू होणारे नवे वर्ष याचे महत्त्वही अजून टिकून आहे. अशा प्रकारे सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात प्रत्येकाचा वर्षांरंभ वेगळा असल्यास नवल ते काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा