दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी या दिवशी घरोघरी दीप उजळले जातात. दिवाळीचं असं प्रकाशमान स्वागत करून लक्ष्मीदेवतेकडे पुढचं वर्षही धनदौलतीचं, सुखसमाधानाचं जावो अशी मागणी केली जाते. दिवाळीत सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल असतो. सोन्याचं भारतीय मनाला इतकं आकर्षण आहे की त्यामुळेच सोन्याच्या खरेदीविक्रीमध्ये, उलाढालीमध्ये जागतिक पातळीवर भारताला एक वेगळंच स्थान आहे.

भारतात एक तर सोनं म्हणजे गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक तुम्हाला हवी तेव्हा, हवी तशी, हवी तिथे नेता येते. गेल्या दहा वर्षांत सोन्याच्या किमती ४०० पटींनी वाढल्या तरीही सोन्याची मागणी कमी झालेली नाही.

हिंदू धर्मियांमध्ये सोन्याला धार्मिक तसंच सांस्कृतिक महत्त्वही आहे. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने ते पवित्रही आहे. महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सोनं घालणं हेही म्हणूनच महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच देशभर सगळीकडेच स्थानिक पातळीवरच्या सगळ्या उत्सवांमध्ये सोनं परिधान केलं जातं. दक्षिणेकडे अक्षय्य तृतीया, पोंगल, ओणम तसंच उगाडी या सणांना पूर्वेकडच्या राज्यांमध्ये दुर्गापूजेला तर पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये गुढीपाडव्याला तर उत्तरेकडे बैसाखी आणि करवा चौथ या सणांना सोन्याचे दागिने आवर्जून घातले जातात, सोन्याची खरेदीही केली जाते.

याशिवाय भारतीय माणसाच्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवरही सोन्याला महत्त्वाचं स्थान आहे. लग्नात मुलीला भेटीदाखल सोनं देणं ही भारतीय समाजातली खूप महत्त्वाची प्रथा आहे. वर्षभरातली पन्नास टक्के सोन्याची खरेदी याच कारणासाठी होत असते. काही कुटुंबं तर मुलीच्या जन्मापासूनच सोन्याची खरेदी करायला सुरुवात करतात. लग्नात दिलेलं सोनं हे तिचं स्त्रीधन समजलं जातं.

आत्ता भारतात निम्मी लोकसंख्या २५ वर्षांच्यापेक्षा कमी वयाची आहे. त्यामुळे पुढच्या दशकात भारतात १५ दशलक्ष लग्नं होण्याची शक्यता आहे. त्यावरून या काळात किती सोन्याची उलाढाल होईल याचा अंदाज बांधता येतो. वाढत्या लोकसंख्येबरोबरच दारिद्रय़रेषेबाहेर येणाऱ्या लोकांचं प्रमाणही भारतात वाढतं आहे. पण त्याचबरोबर लोकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. १९९० पर्यंत शहरी भागात राहणाऱ्या स्त्रिया पारंपरिक दागिनेच रोज वापरत. तर आजच्या काळातल्या तरुण स्त्रियांची वेगळी अपेक्षा असते. त्यांना रोजच्या वापरासाठी सोन्याचे दागिने हवेच असतात. पण त्यांच्यात आधुनिकता आणि परंपरांची सांगडही घालून हवी असते. त्यामुळे आताचे दागिने त्या दृष्टीने तयार केले जातात.
response.lokprabha@expressindia.com

Story img Loader