मोहन गद्रे – response.lokprabha@expressindia.com
उत्सवप्रियता हा आपल्या भारतीय समाजाचा विशेष आहे याचे प्रत्यंतर चातुर्मासात येते. श्रावणापासून सुरू झालेला हा उत्साह दिवाळीपर्यंत ओसंडून वहात असतो. अलीकडच्या काळात मात्र पूर्वीच्या तुलनेत या उत्सवांच्या स्वरूपात बदल होऊ लागले आहेत.
त्या दिवशी बायको म्हणाली, कपाटात ठेवलेली जिवतीची फ्रेम तेवढी काढून द्या. मी कपाट उघडून, प्लास्टिकमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली जिवतीची फ्रेम काढून तिला दिली. यापूर्र्वी दरवर्षी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला, मी बाजारात जाऊन जिवतीचा रंगीबेरंगी कागद घेऊन यायचो. अगदी झिरझिरीत रंगीत कागदावर जिवतीचा छापील कागद मिळतो. पूर्वी वडील तसाच आणत असत. मग श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारपासून आई दर शुक्रवारी जिवतीची पूजा करी. त्या दिवशी भाजलेले चणे आणि साखर घातलेल्या दुधाचा नवद्य जिवतीला दाखवून आम्हाला गट्टम करण्यासाठी देत असे. एका शुक्रवारी जिवतीची सवाशीण जेवायला असे. त्या दिवशी वरणापुरणाचा स्वयंपाक घरात होत असे आणि सवाशीणीची ओटी भरून आई तिचा सन्मान करत असे. त्या जिवतीच्या व्रताचे आम्हाला आमच्या आईने सांगितलेले माहात्म्य म्हणजे, आपल्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य लाभू दे यासाठी स्त्रिया हे व्रत चातुर्मासाच्या दर शुक्रवारी करतात. पूर्वी घरोघरी होणारे हे व्रत आता काही कुटुंबांत होत असते.
जिवतीची फ्रेम काढायला सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं, थोडक्यात आता या वर्षीचा श्रावण सुरू झाला आहे. या वर्षीचा पावसाळा सुरू होऊन, दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबणे, गाडय़ा बंद पडणे वगरे पावसाळी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सुरू झालेले होतेच. या सगळ्या कटकटीत आता दरवर्षीप्रमाणे श्रावण बरोबर किती तरी सण, उत्सव घेऊन येणार आहे हे मात्र विसरूनच जायला झाले होते. त्या दिवशी जिवतीची फ्रेम काढली आणि लक्षात आलं, खरंच की, आता चातुर्मास सुरू झाला आणि आता चार महिने सर्वत्र या महिन्यात येणारे सण आणि उत्सव साजरे करण्याची महाराष्ट्रात लगबग सुरू होईल; पण हेसुद्धा लक्षात आलं, आता सण आणि उत्सव साजरे करण्याची रीत राहिली नसून एक पद्धत होऊन बसली आहे. त्यात रीतभात कमी आणि सण-उत्सवाच्या नावाने वाटेल ते करण्याची मुभा असे एकंदर चित्र होऊन बसले आहे. आता चातुर्मास सुरू झाला की, कोर्टकचेऱ्यात अडकलेले सण किंवा उत्सवच लक्षात येतात. त्याच्या बातम्या आता रोजच्या वर्तमानपत्रात येऊ लागतील आणि मग मला आठवले, आमच्या लहानपणी हेच सणवार कसे आनंदाने, खेळीमेळीने आणि उत्साहात साजरे व्हायचे.
श्रावणी सोमवारी, त्या काळी शाळांना अर्धा दिवस सुटी असायची. इतकेच काय, महापालिकेच्या कार्यालयांनाही अर्धा दिवस सुटी असायची. आदल्या दिवशी कामावरून घरी परतणाऱ्याकडे हातात, रोजच्या भाजीपाल्याच्या पिशवीबरोबरच एक केळीच्या पानाची सुरनळी असायची. कारण श्रावणी सोमवारी बऱ्याच घरी, ब्राह्मण जेवायला बोलावलेला असायचाच. त्यासाठी वाढायला केळीचे पान हवे; पण देवाला नवेद्य दाखवायचा म्हणजे त्यासाठी केळीचे पान हवेच. पक्वान्नं मोजकीच, तीसुद्धा बहुतेक ठरलेली- केळ्याचं शिकरण, रव्याची खीर, गोडाचा शिरा किंवा सुधारस म्हणजे साखरेच्या पाकात िलबू पिळून आंबटगोड असा पदार्थ, त्यात वेलचीची पूड टाकली की झाला सुधारस तयार. या दिवशी भात करताना, त्यात थोडी हळद टाकून केला जात असे. अशा त्या पिवळसर भाताला सोजी म्हणतात. पूर्वीपासून भटकी गुरे मुंबईला नवीन नाहीत. त्या दिवशी संध्याकाळी, जागोजागी गाईंच्या पुढय़ात केळीच्या पानावर वाढलेला नवेद्य दिसत असे. पूर्वी शाळांना आणि कार्यालयांना श्रावणी सोमवारची अर्धा दिवस सुट्टी असल्यामुळे श्रावण उजाडताच, येणारा त्या महिन्यातला प्रत्येक सोमवार लक्षात राहायचा. आता मात्र कुटुंबातील ज्येष्ठांशिवाय त्याची दखल घ्यावीशी कोणाला वाटत नसावं.
नंतर यायची नागपंचमी. त्या दिवशी बायका नागाची पूजा करत असतात. त्यासाठी बाजारात मातीचे पिवळे रंगवलेले, फणा काढलेले लहान लहान नाग, तसेच नागाची चित्रं मिळतात, ते आणून नागपंचमीच्या दिवशी पाटावर मांडून त्यांची पूजा करायची. काही गृहिणी पाटावर पांढऱ्या रंगाने नाग रंगवून त्याची पूजा करतात. पूर्वी नागपंचमीच्या आदल्या दिवशी सर्व भाज्या चिरून ठेवायच्या, इतकेच काय, भाजणे, तळणे हेसुद्धा करायचे नाही. नागासारखी लांबलचक, वेडीवाकडी दिसणारी भाजी- पडवळाची भाजी त्या दिवशी वज्र्य. चुकूनसुद्धा आपल्या हातून नागाची हत्या होऊ नये हा त्यामागचा उद्देश. नागपंचमीच्या दिवशी सकाळ झाली की, जिवंत नाग असलेल्या चपटय़ा टोपल्या घेऊन गारुडी वस्तीवस्तीतून ‘नागाला दूऽऽऽऽध ’ अशी हाळी देत फिरू लागायचे. सार्वजनिक जागा निवडून तेथे नाग असलेली टोपली जमिनीवर ठेवून बसायचे, अलगद टोपलीचे झाकण बाजूला करून, आत वेटोळे घालून बसलेल्या नागाला बोटांनी डिवचायचे, त्याबरोबर ते अंगावर चमचमणारे खवले असलेले नागराज आपला फणा उभारून बसायचे. त्याच्या त्या तोंडातून आतबाहेर करत वळवळणाऱ्या जिभा, गारुडय़ाने वाजवलेल्या पुंगीबरोबर डोलणं, आम्ही शाळकरी मुलं अचंबित होऊन पाहत राहायचो. आमच्यातल्या कोणाला तरी त्याच्या मस्तकावर असणारा नागमणीसुद्धा दिसायचा. त्यासाठी तो गळ्याची शपथसुद्धा घ्यायला तयार व्हायचा. त्याला सोडून बाकी कोणालाच त्या नागमणीचे दर्शन झालेले नसायचे. वस्तीतल्या स्त्रिया मग त्या गारुडय़ाच्या बाजूला गोळा होऊ लागायच्या. गारुडय़ाने एका वाटीत दूध नावाचे पांढरे द्रव ठेवून त्यात एक कापूस लावलेली काडी ठेवलेली असायची. वस्तीतल्या स्त्रिया नागाला भक्तिभावाने नमस्कार करायच्या. गारुडी त्याच्याकडील दुधात कापसाची काडी बुडवून नागाच्या फण्यावर दूध िशपडायचा, त्याबद्दल त्याला समोरच्या स्त्रीकडून दोनचार पसे मिळायचे.
त्या दिवशी देव पूजा करताना, प्रसादाच्या पानात चण्याच्या डाळीचे गूळ घालून केलेल्या पुरणाचे कडबू, िदड, नवेद्य म्हणून दाखवायचे आणि अर्थात तेच त्या दिवशीचे पक्वान्न म्हणून जेवणाच्या पानात वाढले जायचे.
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात, बत्तीस शिराळ्यातील नाग महोत्सवाचा फोटोसह आलेला वृत्तान्त वाचायला मिळायचा. त्या फोटोत बत्तीस शिराळ्यातील काही लोक हातात जिवंत नाग धरून उभे असलेले, नाग जमिनीला टेकून आपले फणे काढून उभे आहेत आणि त्या प्रत्येक नागासमोर कोणी तरी, एक मातीचे मडके जमिनीवर ठेवून बसला आहे; पण त्याचबरोबर छोटय़ाशा चौकटीत प्राणिमित्रांनी या प्रथेबद्दल घेतलेले आक्षेपही वाचायला मिळत असत. असे सापांना खेळवणे आता बंद झाले आहे. आता पूर्वीसारखे नागपंचमीला नाग घेऊन वस्तीत येणारे गारुडीसुद्धा दिसेनासे झाले आहेत. कारण या बाबतीत बऱ्यापकी जनजागृती झालेली आहे. तसे कायदेसुद्धा झाले आहेत. आपल्या फायद्यासाठी यापुढे कुठल्याही प्राण्याला त्याच्या नसíगक प्रवृत्ती आणि अधिवासाविरुद्ध वापरता येणार नाही.
त्यानंतर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. रक्षाबंधनाचं प्रस्थ गेल्या काही वर्षांपासून खूपच वाढले आहे. अन्यथा त्यातील नारळी पौर्णिमा हाच खरा परंपरा म्हणून साजरा होणारा मुंबईतील सण. या दिवशी कोळीवाडय़ात मोठे उत्साहाचे वातावरण अजूनही पाहायला मिळते. कारण नारळी पौर्णिमेपासून पावसाळ्यात खवळलेला दर्या शांत होतो. कोळीबांधव आपल्या होडीची यथासांग पूजा करून समुद्रात सोडतात आणि पावसाळ्यात बंद असलेला मासेमारीचा परंपरागत व्यवसाय पुन्हा वर्षभरासाठी सुरू होतो. पूर्वी मुंबईच्या काही भागांत या दिवशी नारळ फोडण्याची स्पर्धा लागत असे. एकाने दुसऱ्याच्या हातातील नारळ फोडायचा अशी ती स्पर्धा असायची. अशा आपटाआपटीत ज्याचा नारळ फुटेल त्यांनी तो नारळ ज्यांनी आपल्या हातातील नारळ अभंग ठेवला त्याला देऊन टाकायचा. दुकानदार खूश असायचा, यांची स्पर्धा आणि त्याचा फायदा. फुटलेले नारळ तेथल्या तेथेच स्वस्तात विकून टाकले जायचे. अर्थात त्यासाठी गिऱ्हाईक आजूबाजूच्या गर्दीत वाटच पाहत असायचे. संध्याकाळी मुंबईकर आपल्या मुलाबाळांसह समुद्रकिनारी जाऊन, भक्तिभावाने हात जोडून ‘आता शांत हो’ अशी समुद्राची प्रार्थना करायचा आणि त्याला नारळ किंवा सुपारी वाहायचा. समुद्रात टाकलेला नारळ झेलायला समुद्रात डुंबत असणारी मुले टपलेली असायची. आता हे समुद्रावरचे दृश्य दुर्मीळ होत चालले आहे. बहुतेक घरांतून त्या दिवशी पक्वान्न म्हणून ओला नारळ घालून केलेला गोड भात, गूळ घालून केलेले पुरण असे पदार्थ वाढले जायचे.
बहुतेक करून दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्याबद्दल वृत्तान्त असायचेच; पण एखाद्या तरी वर्तमानपत्रात एक व्यंगचित्रदेखील पाहायला मिळत असे. गरिबी, महागाई, टंचाई, रोगराई यांचा उफाळलेला समुद्र आणि त्याला नारळ अर्पण करून शांत हो म्हणून आर्जव करणारा किनाऱ्यावरील एक फाटका सामान्य माणूस. सध्याही परिस्थिती फार वेगळी नाही. आता त्यात भ्रष्टाचार, कुपोषण, बलात्कार, स्त्री भ्रूणहत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा कारणांची भर पडली आहे. किनाऱ्यावरील माणूसही अगतिक आहे.
त्यानंतर यायची गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला. रात्री बरोबर बारा वाजता बॅण्डच्या तालावर ढाकूमाकूम करत बालकृष्णाच्या जीवनावर आधारित चित्ररथ निघायचे. त्याबरोबर श्रीकृष्णाची सजवलेली पालखी असायची. पुढे लेझीम पथक आणि तरुणांची एकमेकांकडे तोंड करून दोन ओळींत, एकमेकांच्या कमरेत हात घालून ढाकूमाकूमच्या तालावर ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत जाणारे गोिवदा पथक. ही फेरी पूर्ण झाली की, दुसऱ्या दिवशी सकाळी ते गोिवदा पथक जवळपासच्या विभागांत जाऊन जागोजागी लावलेल्या हंडय़ा, मानवी मनोरा उभा करून फोडायचे; पण आपल्या सर्वच सण आणि उत्सवांचे हळूहळू बाजारीकरण होत गेले, पक्षीय राजकारण आले आणि त्यांनी अनेक सामाजिक समस्यांना आणि प्रश्नांना जन्म द्यायला सुरुवात केली. धार्मिक उत्सव आणि परंपरांच्या नावाखाली धुडगूस वाढला आणि दुर्दैवाची बाब म्हणजे आज बऱ्याच िहदू सण आणि उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवर न्यायालयीन बंधने आणावी लागली आहेत.
त्यानंतर येतो चांगला दहा दिवस चालणारा गणेशोत्सव. पण पूर्वी घरोघर येणारे दीड दिवसांचे, पाच दिवसांचे, गौरीबरोबर विसर्जन होणारे आणि फार क्वचित दहा दिवसांचे गणपती आजही चाळी, वाडय़ा, वस्त्यांबरोबरच गगनचुंबी इमारतीमधील राजेशाही फ्लॅटमधून दरवर्षी येत आहेतच. पूर्वी बाबा, अण्णा, तात्या, दादा यांच्या हातावरून, डोक्यावरून घरी येणारे गणपती थंडगार एसी गाडीतून येत असतील आणि अथांग अशा समुद्रात विसर्जति होण्याऐवजी बादलीत, टबमध्ये किंवा महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात विसर्जति होत असतील आणि एके काळी घरगुती खिरापत किंवा साखर-फुटाण्याच्या जागी आता मलई पेढे, काजू कतली, कंदी पेढे अशी एकसे एक भारी मेवा-मिठाई प्रसाद म्हणून वाटली जात असेल. गणपतीची मूर्ती खऱ्या सोन्याचांदीच्या अलंकारांनी नटलेली असेल. चाळीत आणि वाडीत होणाऱ्या आरत्या पूर्वीसारख्या दणक्यात होत नसतील; पण निदान त्यानिमित्ताने का होईना, लोक आवर्जून एकमेकांकडे जाण्याची एक उत्तम संधी म्हणून पाहात आहेत. कारण तंत्रज्ञानामुळे अगदी जग जवळ आले असले तरी माणसामाणसांतली प्रत्यक्ष भेट फार दुर्मीळ होऊ लागली आहे. एके काळी, नवोदितांना लोकांपुढे आपल्या कला सादर करण्याची संधी देणारे, सामाजिक चळवळीचे, जनजागृतीचे हक्काचे आणि प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांला काम करण्याची संधी देणारे असे सार्वजनिक गणेश उत्सवाचे व्यासपीठ मात्र आता नावालाच उरले असून विविध कारणांमुळे हा उत्सवसुद्धा आता न्यायालयीन गोष्टींमध्ये अडकला आहे.
गरिबी आणि टंचाईमुळे प्रसाद, पक्वान्न, नवीन कपडे, सौंदर्य प्रसाधने, रोषणाई याबाबतीत सर्वसामान्यपणे पूर्वी घरोघर दिसून येणारी काटकसर आणि हिशोबीपणा आता कुठे दिसत नाही. कारण आता त्या गोष्टी पूर्वीसारख्या केवळ आणि केवळ सणावारीच नव्हे तर रोजच सण असल्यासारख्या सर्वत्र दिसू लागल्या आहेत आणि त्याचा नित्य वापरसुद्धा होऊ लागला आहे. गोडाधोडाचे पदार्थ, नवीन कपडे, रोषणाई, खासगी गाडीचा प्रवास याचे आता कोणालाच अप्रूप राहिलेले नाही.