दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाविरुद्ध गांधीजींनी दिलेला लढा ही हिंदुस्थानातील पुढील महासंग्रामाची नांदीच ठरली. अहिंसा, सत्याग्रह ही स्वातंत्र्यप्राप्तीची शस्त्रे गांधीजींना मिळाली ती या लढय़ातूनच.

दीडशे वर्षांपूर्वी (१६ नोव्हें.१८६०) टुरो (TURO) ही बोट भारतीय मुदतबंद मजुरांची पहिली तुकडी घेऊन नाताळ येथे दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्याला लागली व दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील एक संघर्षमय अध्यायास सुरुवात झाली. ही घटना घडली तेव्हा कालांतराने या भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या नायकाचा जन्मही झालेला नव्हता. या पहिल्या तुकडीनंतर मुदतबंद मजुरांचे जथेच्या जथे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले. तसेच गुजरात, राजस्थानमधून काही व्यापारी कुटुंबेही दक्षिण आफ्रिका येथे स्थलांतरित झाली. अशा तऱ्हेने भारतीयांची संख्या लक्षणीयरीत्या वाढू लागली, त्यामुळेच तेथे गेलेल्या भारतीयांना अनेक अन्याय्य कायद्यांचा सामना करावा लागला.

खरे तर भारतीयांचे दक्षिण आफ्रिकेमधील पदार्पण हे ब्रिटिश मळेवाल्यांच्या गरजेतूनच झाले होते. ब्रिटिश मळेवाल्यांना दक्षिण आफ्रिकेमधील सुपीक परंतु पडीक अशा जमिनीचा ऊस, चहा, रबर यांच्या लागवडीसाठी उपयोग करावयाचा होता. ती अफाट भूमी त्यांना मोहवीत होती. परंतु दक्षिण आफ्रिकेमधील मूळचे निग्रो लोक मजुराची कामे करण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे युरोपियन मळेवाल्यांचे, खाणमालकांचे लक्ष हिंदुस्थानकडे वळले. त्यांनी विचार केला की स्वस्त, आज्ञाधारक मजुरांचा नियमित पुरवठा फक्त हिंदुस्थानातूनच होऊ शकतो. मळेवाल्यांनी आपले भाईबंद असलेल्या तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर वाटाघाटी केल्या व त्यांच्या सुपीक डोक्यातून साकारलेली योजना प्रत्यक्षात उतरली. आता मुदतबंद मजुरांची दक्षिण आफ्रिकेमध्ये जाण्यासाठी रीघ लागली. त्यांच्यापाठोपाठ व्यापारीही जाऊ लागले. परिणामस्वरूप हिंदुस्थानी मजूर, व्यापारी व त्यांचे नोकर यांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली. मूलत: हिंदुस्थानी मजूर पाच वर्षांच्या करारावर दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. करार संपल्यानंतर भारतात परतण्याचे बंधन त्यांच्यावर नव्हते. त्यामुळे पुष्कळशा मजुरांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक होणे पसंत केले, तसेच छोटे व्यापारीही ट्रान्सवाल, ऑरेंज स्टेट, केप कॉलनी येथे पसरले. हे लोक भारतीयांशिवाय निग्रो आणि बोअर यांच्याबरोबरही व्यापार करू लागले. परिणामत: त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारू लागली. युरोपीय मळेवाले व व्यापारी यांच्यात असूया निर्माण झाली. हिंदुस्थानी लोक त्यांच्याबरोबर स्पर्धा करत आहेत असे त्यांना वाटले. भारतीयांना असलेले मर्यादित स्वातंत्र्य त्यांना खुपू लागले. भारतीयांवर बंधने लादण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारतीयांवर कॅपिटेशन टॅक्स लावण्याच्या मागणीने जोर धरला. आपल्या मताप्रमाणे राज्यकारभार होण्यासाठी, नाताळमध्ये स्वायत्त सरकार आणण्यातही ब्रिटिश मळेवाले यशस्वी झाले. मजूर व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर माणशी तीन पौंड कर बसवण्यात आला. प्रत्येक मजुराला सरासरी १२ पौंड भरावे लागणार होते. मजुरांचे उत्पन्न पाहता हा कर खूपच जास्त होता. व्यापाऱ्यांवरही र्निबध लादण्यात आले. परवाना व शैक्षणिक परीक्षा पद्धत चालू केली.
नाताळप्रमाणेच ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल येथेही भारतीयांबद्दल असंतोष होता. १८८५ साली ट्रान्सवाल सरकारने अत्यंत जुलमी कायदा संमत केला. त्या कायद्यान्वये व्यापारासाठी राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाने २५ पौंड भरून आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक होते. तसेच भारतीयांना मालमत्ता करण्याचा अधिकार नव्हता व त्यांना ट्रान्सवालचे नागरिकत्वही मिळणार नव्हते. सरतेशेवटी ब्रिटिश पार्लमेंटकडून दबाव आणल्यामुळे रजिस्ट्रेशन फी तीन पौंड करण्यात आली आणि काही राखीव विभागात मालमत्ता करण्याचा अधिकार मिळाला. ऑरेंज स्टेटमध्येही अशीच परिस्थिती होती. नाममात्र नुकसानभरपाई देऊन भारतीय व्यापाऱ्यांना हाकलण्यात येत होते. विशेष परवाना घेऊन फक्त मजूर किंवा हॉटेल वेटर म्हणून काम करता येत असे. केप कॉलनीमध्येही साधारण हीच तऱ्हा होती. भारतीय मुले सरकारी शाळांत जाऊ शकत नव्हती किंवा त्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नव्हती. तरीही तेथे वर्णद्वेषाचे प्रमाण काहीसे सौम्य होते.

दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयांमध्ये उत्तर प्रदेश, मद्रास व गुजरातमधील लोक जास्त होते. काही सिंधी व्यापारीही होते तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतके पारसी होते. सुशिक्षित भारतीयांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे भारतीयांची व्यथा प्रभावीपणे मांडू शकणारे कोणीच नव्हते. अशा नैराश्याच्या वातावरणातच गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेमध्ये आगमन झाले. मुंबई व राजकोट येथे वकिली केल्यानंतर त्यांना दादा अब्दुल्ला आणि कंपनीकडून दक्षिण आफ्रिकेमध्ये येण्याचे निमंत्रण मिळाले. मे १८९३ मध्ये गांधीजी दरबानला पोहोचले. तेव्हा भारतीयांची अत्यंत दयनीय अवस्था होती. ‘सेमी बार्बर्स आशियाटिक्स ऑर पर्सन्स बिलॉन्गिंग टू अनसिव्हिलाईज्ड रेसेस ऑफ आशिया’ असे त्यांचे अधिकृत वर्णन होते. भारतीयांना गुलाम व हमालच समजले जाई. भारतीयांमध्ये सर्व धर्मीयांचा समावेश होता. व त्या सर्वाचा ‘कुली’ असा उल्लेख होत असे. व्यापाऱ्यांना कुली र्मचट म्हणत तर गांधीजी कुली बॅरिस्टर झाले.

आणखी वाचा – गांधींच्या लढ्यापासून प्रेरणा घ्या; लादेनने केले होते समर्थकांना आवाहन

दक्षिण आफ्रिकेत गेल्या गेल्याच गांधीजींना वर्णद्वेषाचा फटका बसला. दरबान ते प्रिटोरियाच्या प्रवासातच त्यांना फर्स्ट क्लासच्या डब्यातून हाकलून देण्याची ती कुप्रसिद्ध घटना घडली. गांधीजींनी संपूर्ण रात्र मॅरिट्झबर्ग स्टेशनच्या फलाटावर काढली. भारतात परतण्याचा विचारही त्यांच्या मनात डोकावून गेला. परंतु सरतेशेवटी त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचे ठरवले. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. गांधीजी म्हणतात ‘‘माय अ‍ॅक्टिव्ह नॉन व्हायोलन्स बिगेन फ्रॉम दॅट डेट’’. यानंतर प्रिटोरिया शहरातही खुद्द प्रे. क्रुगरे यांच्या घरासमोरच गांधीजींना पोलिसांच्या दडपशाहीचा सामना करावा लागला. या घटनांमुळे गांधीजी अस्वस्थ झाले. भारतीयांना त्रासदायक ठरलेल्या वर्णद्वेषाचा मुकाबला कसा करावयाचा याबद्दल ते विचार करू लागले. तशातच भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचे घाटते आहे अशा अर्थाच्या ‘नाताळ मक्र्युरी’ या वृत्तपत्रांतील बातमीने त्यांचे लक्ष वेधले.

हा कायदा संमत होणे धोकादायक असल्याचे गांधीजींनी भारतीयांच्या निदर्शनास आणले. आम्ही कायदेशीर बाबींत अनभिज्ञ आहोत असे सांगून भारतीयांनी गांधीजींना भारतात परत न जाता दक्षिण आफ्रिकेमध्ये राहूनच हिंदी जनतेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. गांधीजी सांगतील त्याप्रमाणे करण्याची तयारी दर्शवत, गांधीजींना त्यांची फी देण्यासही लोक तयार झाले. त्या वेळी गांधीजींनी काढलेले उद्गार आजही सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांनी मुद्दाम लक्षात ठेवून आचरणात आणले पाहिजेत. गांधीजी म्हणाले ‘‘फीज आर आऊट ऑफ क्वेशन. देअर कॅन बी नो फीज फॉर पब्लिक वर्क. आय कॅन स्टे इफ अ‍ॅट ऑल अ‍ॅज अ सर्व्हट.’’

अखेरीस भारतीयांच्या आर्जवानुसार गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहण्याचे ठरवले; अशा तऱ्हेने वकिली व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले गांधीजी भारतीयांच्या संघर्षांमध्ये सामील झाले. १८९३ पासून ते १९१५ मध्ये भारतात परत येईपर्यंत गांधीजींनी या लढय़ाचे नेतृत्व केले. अथक परिश्रमाने व अहिंसेच्या निर्भय मार्गाने त्यांनी दक्षिण आफ्रिका सरकारला नमवले. भारतीयांनी दिलेल्या या ‘आत्मसन्मानाच्या लढय़ात’ गांधीजींमधील अनेक सुप्त गुणांची प्रचीती जगाला प्रथमच आली. या लढय़ांतील अनेक घटनांमध्ये वेळोवेळी गांधीजींची सत्यप्रियता, क्षमाशीलता, निर्भयता, धीरोदात्तपणा, स्त्रियांच्या सन्मानाविषयीची आस्था, निस्पृहता आणि जनमानसावरील त्यांची निर्विवाद पकड यांचे प्रत्यंतर आले.

आणखी वाचा – गांधीजींवर दोषारोप करून मोकळे होण्यापूर्वी…

हा संपूर्ण लढा गांधीजींनी उच्च आध्यात्मिक पातळीवरून लढवला. त्यांच्या प्रत्येक कृतीस नैतिक अधिष्ठान होते. आपण ज्यासाठी संघर्ष करत आहोत ते संपूर्ण सत्य आहे याची त्यांना खात्री होती. उदा. दक्षिण आफ्रिकामधील भारतीयांच्या लढय़ाची माहिती देण्यासाठी ते जून १८९६ मध्ये भारतात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘द ग्रीव्हन्सेस ऑफ द ब्रिटिश इंडियन्स इन साऊथ आफ्रिका’ नावाचे पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकाच्या हिरव्या कव्हरमुळे ते ‘ग्रीन पॅम्प्लेट’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या पत्रकाबद्दल ते आत्मविश्वासाने म्हणतात, ‘एव्हरी वर्ड, एव्हरी स्टेटमेंट इन द पॅम्प्लेट कॅन बी एस्टॅब्लिश्ड बियॉण्ड द श्ॉडोज ऑफ अ डाऊट’.

वर्णद्वेषाचा मुकाबला करण्यासाठी गांधीजींनी अविश्रांतपणे दिलेल्या लढय़ांतील काही प्रमुख घटना अशा :

१) आपल्या कार्याच्या सुसूत्रीकरणासाठी त्यांनी १९०४ च्या मध्यास सुप्रसिद्ध ‘फिनिक्स कॉलनी’ची स्थापना केली.

२) १९०४ मध्येच ‘इंडियन ओपिनियन’ या वृत्तपत्राची सुरुवात केली.

३) १९०७ मध्ये ट्रान्सवाल सरकारने रजिस्ट्रेशनचा जुलमी कायदा अमलात आणला. या कायद्यांतील सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे व्यक्तीच्या अंगावरील खुणांची नोंद करून, बोटांचे ठसे घेण्यात येणार होते. स्त्रियांचीही यातून सुटका नव्हती. या अपमानास्पद कायद्याच्या विरुद्ध प्रखर लढा.

४) १९१० साली हर्मनकालेनबच यांच्या ११० एकर जमिनीवर ‘टॉलस्टॉय फार्म’ची स्थापना.

५) भारतीय लोक अन्याय्य कायद्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत असतानाही ब्रिटिशांचे दडपशाहीचे धोरण चालूच होते. १९१३ मध्ये सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत दक्षिण आफ्रिका सरकारने भारतीय स्त्रियांचा पत्नीपदाचा हक्क नाकारला. भारतीयांचे विवाह दक्षिण आफ्रिका कायद्याप्रमाणे झालेले नाहीत असे कारण देण्यात आले. ३० मार्च १९१३ रोजी जोहान्सबर्ग येथे भारतीयांची जंगी निषेध सभा झाली. सभेमध्ये सत्याग्रहाचे आवाहन करताना गांधीजी म्हणाले, ‘‘इट बिल बिकम द बाऊंडन डय़ुटी ऑफ द इंडियन कम्युनिटी फॉर द प्रोटेक्टिंग ऑफ इट्स विमेनहूड अ‍ॅण्ड इट्स ऑनर टू अ‍ॅडॉप्ट पॅसिव्ह रेझिस्टन्स’.

तुरुंगात जाण्यासाठी स्त्रियाही सज्ज झाल्या. कस्तुरबांसह अनेक स्त्रियांना अटक झाली. स्त्रियांना अटक झाल्यानंतर न्यू कॅसल येथील खाण कामगारानी संप पुकारला. गांधीजींच्या आवाहनासह अनुसरून संपकरी सत्याग्रहींनी घरादारावर पाणी सोडले. जनमानसावरील गांधीजींच्या जबरदस्त प्रभावाचे विलक्षण दर्शन सरकारला झाले.

आणखी वाचा – विश्लेषण : ‘गोडसे’ उदात्तीकरण की अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

६) २८ ऑक्टो. १९१३ रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली ट्रान्सवाल येथे जाण्यासाठी ऐतिहासिक लाँग मार्चची सुरुवात झाली. हजारो मजूर अर्धपोटी राहून शांततेने, संयमाने वाटचाल करत होते. कुठल्याही कारणाने ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. गांधीजींना व त्यांच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांना अटक झाली, परंतु मोर्चाच्या कार्यक्रमात खंड पडला नाही. गांधीजींच्या नेतृत्वाचे, त्यांच्यावरील विश्वासाचे हे फळ होते. या पदयात्रेसंबंधी ‘द टाइम्स’ या महत्त्वाच्या ब्रिटिश वृत्तपत्राने गौरवपूर्ण वृत्त दिले, ते येणेप्रमाणे, ‘द मार्च ऑफ द इंडियन लेबर्स मस्ट लिव्ह नि मेमरी अ‍ॅज वन ऑफ द मोस्ट रीमार्केबल मेनिफेस्टेशन्स इन हिस्टरी ऑफ द स्पिरिट ऑफ पॅसिव्ह रेझिस्टन्स’.

आपला लढा ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ या इंग्रजी नावाने ओळखला जाऊ नये तसेच या शब्दामुळे लढय़ाचा खरा अर्थ समजत नाही असे गांधीजींना वाटत होते. म्हणूनच ‘इंडियन ओपिनीयन’मध्ये त्यांनी चळवळीला अर्थपूर्ण नाव सुचवण्याची स्पर्धा जाहीर केली होती. मगनलाल गांधींनी प्रथम ‘सदाग्रह’ हा शब्द सुचवला; त्याचा अर्थ ‘फर्मनेस इन गुड कॉज’ असा होतो. गांधीजींना हे नाव आवडले परंतु या नावात लढय़ाची संपूर्ण कल्पना व्यक्त होत नाही. त्यांनी सदाग्रह शब्दात थोडा बदल करून ‘सत्याग्रह’ हा शब्द योजला. त्याची व्याख्या गांधीजीनी ‘द फोर्स विच इज बॉर्न ऑफ ट्रथ अ‍ॅण्ड लव्ह ऑर नॉन व्हायोलन्स’ अशी केली. दक्षिण आफ्रिकेमधील लढा लढवताना काय किंवा पुढे भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करताना काय गांधीजींनी सत्य, प्रेम (अगदी विरोधकांवरसुद्धा) आणि अहिंसा याच मार्गाने वाटचाल केली. सत्याग्रह शब्दाचे विश्लेषण करताना गांधीजींनी जणू काही आपल्या आयुष्याचे सूत्रच सांगितले आहे!

गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयांमध्ये स्वाभिमान जागृत केला व त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकाराच्या ज्वालेने ब्रिटिश सरकारला ग्रासले. सरकारचा दडपशाही, अमानुष छळ, तुरुंगवास, गोळीबार या कशामुळेही लोक विचलित झाले नाहीत. अखेरीस दक्षिण आफ्रिकेमध्ये संघ सरकारला नमते घ्यावे लागले व ‘इंडियन रीलिफ बिल’ प्रसिद्ध झाले. तीन पौंडांचा अन्याय कर रद्द झाला. भारतीय कायद्याप्रमाणे झालेल्या विवाहास मान्यता देण्यासह इतरही काही सुधारणा झाल्या.

आणखी वाचा – महात्मा गांधींनी दिलेली ‘ती’ भेटवस्तू राणी एलिझाबेथ यांनी आयुष्यभर सांभाळली, मोदी भेटीतही झाला होता उल्लेख

गांधीजींच्या या अभूतपूर्व लढय़ास दादाभाई नवरोजींचे सक्रिय आशीर्वाद होते, तर लोकमान्य टिळकांचा संपूर्ण पाठिंबा होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. सर्वसामान्य भारतीय जनतेने, संस्थानिकांनी टाटांसारख्या नवोदित उद्योगपतींनी लढय़ात आर्थिक साहाय्य केले. नामदार गोखले तर गांधीजींचे गुरूच होते. गांधीजी सतत त्यांच्या संपर्कात असत.
दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयांच्या स्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी नामदार गोखलेनी १९१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेस भेट दिली. तेथील हिंदी व युरोपियन जनतेने ‘टॉलस्टॉय ऑफ इंडिया’चे सन्मानपूर्वक स्वागत केले. जनरल बोथा व जनरल स्मट या राज्यकर्त्यांबरोबर त्यांनी वाटाघाटी केल्या. सर्व काळे कायदे रद्द करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. भारतात परतल्यानंतर गांधीजींवर स्तुतीसुमने उधळताना गोखले म्हणाले, ‘‘गांधी हे स्वत: तर नायक आहेतच, परंतु त्यांच्यात इतरांनाही नायक बनवण्याची अद्भुत, आध्यात्मिक शक्ती आहे.’’

हा लढा चालू असतानाच रेव्हरंड डोक यांनी गाधीजींचे चरित्र लिहिले. या पुस्तकाच्या शेवटी भारतीयांना संदेश देताना गांधीजीनी स्वत:च दक्षिण आफ्रिकेमधील आपल्या लढय़ाचे मर्म सांगितले. गांधीजी म्हणतात, ‘‘जगातील कोणत्याही भागात उत्तम ठरेल असा समाज निर्माण करण्याच्या कामात आम्ही गुंतलेलो आहोत. शरीरबळापेक्षा सत्याग्रहाचे बळ शतपटीने श्रेष्ठ होय अशी आमची श्रद्धा आहे. त्याने आमची ट्रान्सवालमधील दु:खे दूर होतील. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानातील आमच्या बांधवांना राजकीय व इतर बाबतीत जो छळ सोसावा लागत आहे तोही दूर होईल.’’

आणखी वाचा – चतु:सूत्र : गांधीजी समजून घेताना..

लढय़ाची यशस्वी गाथा सांगता झाल्यावर आफ्रिकेला निरोप देण्याची वेळ आली. आफ्रिकेचा किनारा सोडते वेळी गांधीजींनी हिंदी व युरोपियन जनतेला संदेश दिला. आफ्रिकेतील काराराची त्यांनी इंग्लंडमधील मॅग्नाकार्टाबरोबर तुलना केली. कायद्यामध्ये वर्णविषमतेला स्थान नाही हे ब्रिटिश राज्यघटनेचे तत्त्व आफ्रिकेतील कराराने मान्य केले याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला.

दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाविरुद्ध गांधीजींनी दिलेला लढा ही हिंदुस्थानातील पुढील महासंग्रामाची नांदीच ठरली. अहिंसेच्या मार्गाने सविनय सत्याग्रह केल्यास सामथ्र्यशाली राज्यकर्त्यांनाही नमते घ्यावे लागते हे त्यांनी निर्विवादपणे सिद्ध केले. या लढय़ांतील त्यांचे आचरण हा राजकीय पुढाऱ्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांनी स्वत:साठी काहीच केले नाही. गांधीजींना संपत्तीची हाव नव्हती की स्वसुखाची आस नव्हती. टीकेने ते विचलित होत नव्हते किंवा स्तुतीने हुरळून जात नव्हते. स्वत:च्या मनास जे पटते ते निर्धाराने, निर्भयतेने अमलात आणायचे हाच त्यांचा बाणा होता. दक्षिण आफ्रिकेमधील लढय़ाच्या महासंग्रामातून सत्याग्रहासारखे अमोघ अस्त्र हाती आले व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या महानायकाचा राजकीय क्षितिजावर उदय झाला, हीच या लढय़ाची फलश्रुती आहे.
विवेक आचार्य – response.lokprabha@expressindia.com