मालिका-सिनेमा करताना विशिष्ट व्यक्तिरेखांसाठी अभिनेत्री ठरावीक दागिन्यांचा साज चढवतात. खऱ्या आयुष्यात मात्र दागिन्यांविषयीच्या त्यांच्या व्याख्या काहीशा वेगळ्या आहेत. सोनं असो किंवा डायमंड प्रत्येक दागिन्याची खासियत वेगळीच असते, असं त्यांचं म्हणणं. या वैशिष्टय़ांसह या अभिनेत्री त्यांच्या आवडत्या दागिन्यांविषयी सांगताहेत त्यांच्याच शब्दांत..
ठुशी, चिंचपेटी प्रिय – ऋतुजा बागवे
मला पारंपरिक दागिन्यांची खूप हौस आहे आणि आवडही. नऊवारी साडी नेसणं म्हणजे माझं अगदी आवडतं काम. त्यामुळे आपसूकच पारंपरिक दागिन्यांचीही आवड निर्माण झाली. नऊवारीचं सौंदर्य खुलतं ते पारंपरिक दागिन्यांमुळेच. या दागिन्यांमध्येच विशिष्ट तेज आहे; जे कोणालाही भुलवतं. ठुशी, कुडय़ा, डुल, चिंचपेटी हे दागिने मला विशेष आवडतात. ठुशीत असलेला डाळिंबी रंगाचा खडा लक्ष वेधून घेतो. ठुशी हा दागिना तसा म्हटलं तर नाजूक म्हटलं तर ठसठशीत. पण या नाजूक, ठसठशीतपणात त्याचं सौंदर्य लपत नाही. काही ठुशींमध्ये असलेलं पेडंटही फार गोड वाटतं. ठुशीला शोभून दिसतील असे डुल किंवा कुडय़ा असं घातलं की चेहऱ्यातलं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. मोत्याची चिंचपेटी हाही माझ्या आवडत्या दागिन्यांमधला एक दागिना. चिंचपेटी गळ्याला वेगळा लुक देतो. एरवी गळ्यातले इतर दागिने थोडे सैल घातले जातात. पण चिंचपेटी हा घट्ट नाही, पण गळ्याला पक्का बसेल असा घातला जातो. त्यामुळे रिकामा गळा एकदम भरलेला वाटू लागतो. यातही मोत्याची चिंचपेटी मला अधिक आवडते. यालाही शोभून दिसतील असे डुल घातले की झालं, चेहरा एकदम खुललाच म्हणून समजा. पण आता या पारंपरिक दागिन्यांमध्येही विविध प्रयोग होताना दिसतात. आधुनिकतेचा आधार घेत यात थोडेफार बदल केले जातात. मला कोणतीही गोष्ट जशी असते तशीच स्वीकारायला आवडते. तसंच पारंपरिक दागिन्यांचंही आहे. पण काळानुरूप माणसाने बदलायला हवं हेही तितकंच खरं. जुनं धरून ठेवावंच, पण नवं काही चांगलं असेल तर त्याचा स्वीकारही करावा. त्यामुळे पारंपरिक दागिन्यांमध्ये नवीन चांगले बदल होत असतील आणि लोक ते स्वीकारत असतील तर ते निश्चितच वारंवार घडले पाहिजेत. मलाही जर एखादा प्रयोग आवडला तर मी तो स्वीकारतेच. याशिवाय मला बारीक डिझाइनच्या बांगडय़ा आवडतात. माझ्या शरीराची ठेवण नाजूक असल्यामुळे मला बारीक डिझाइन्सच्याच बांगडय़ा शोभून दिसतात. प्लॅटिनममध्ये मला डायमंड खूप आवडतं. माझा जेव्हा केव्हा साखरपुडा ठरेल तेव्हा माझ्या या आवडीविषयी मी जो कोणी असेल त्याला सांगणार आहे. बघू या, या सांगण्यामुळे त्याला काही कळतं का ते..!
झुमका गिरा रे.. – पूजा सावंत
पारंपरिक दागिने मला प्रचंड आवडतात. त्यातही झुमके हा माझा सगळ्यात आवडता दागिना आहे. वेगवेगळ्या डिझाइन्सच्या झुमक्यांचं माझ्याकडे मोठं कलेक्शन आहे. मी कुठे बाहेर गेले की खरेदी तर होतंच असते. त्यावेळी कपडय़ांच्या खरेदीसोबत मी झुमक्यांचीही खरेदी करत असते. जिथे जिथे मला वेगळे, आकर्षक झुमके दिसतील ते मी घेते. यामुळेच माझ्याकडचा झुमक्यांचा संग्रह वाढतोय. या संग्रहातले सगळेच झुमके मी कधी घालेन हे मला माहीत नाही. पण संग्रह करायला नक्की आवडतं. पुरस्कार सोहळ्यांना, समारंभांना किंवा अन्य कार्यक्रमांना साडी नेसून जायचं असेल तर मी आधी झुमके ठरवते आणि मग साडी. झुमक्यांनुसार कोणती साडी नेसायची हे ठरवलं जातं. त्यामुळे साडय़ांपेक्षा झुमक्यांना मी जास्त भाव देते असं मी नेहमी गमतीने म्हणते. झुमक्यांमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. फक्त मोत्यांचे आणि सोनं-मोतीमिश्रित असे झुमके. मोत्यांचे झुमके जास्त सुंदर दिसतात. पारंपरिक दागिन्यांमध्ये आता वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. दागिन्यांचा आकार, धातू, स्टाइल यात बदल केले जातात. पण मला वाटतं, की पारंपरिक दागिना जसा आहे तसाच घालावा. त्यातच खरं सौंदर्य आहे. प्रयोग केलेल्या झुमक्यांमध्ये तितकासा गोडवा वाटत नाही. पारंपरिक झुमके घातले की चेहऱ्यालाही एक वेगळाच गोडवा येतो. झुमक्यानंतर मला दागिन्यांमध्ये तोडे खूप आवडतात. त्यातसुद्धा मला सोन्याची झालर असलेले मोत्यांचे तोडे आवडतात. मला एकूणच पारंपरिक दागिन्यांमध्ये मोत्यांचं वेड आहे. त्यामुळे मोत्यांनाच मी अनेकदा प्राधान्य देत असते. मोती असतात फार गोड. टपोरे मोती तर आकर्षित करतात. पांढरे, पिवळसर, पाणीदार असे सगळ्याच रंगांचे मोती मला खूप आवडतात. आणि त्यातले दागिने तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
आकर्षक फुलांची अंगठी – जुही पटवर्धन
दागिन्यांच्या बाबतीत माझी आवड जरा वेगळी आहे. अंगठी आणि कानातले हे दागिने मला आवडतात. चेहरा खुलवण्यात कानातल्यांचं महत्त्व असतं. पण ते खुलवताना त्या व्यक्तीची चेहऱ्याची ठेवणंही महत्त्वाची असते. नेलपेंटमुळे बोटं सुंदर दिसत असली तरी त्यांचं सौंदर्य आणखी खुलवते ती अंगठी. म्हणूनच मला कानातले आणि अंगठी खूप आवडते. फुलांच्या आकाराची अंगठी मला जास्त आवडते. त्यात एखादा खडा असला की ती अंगठी अधिक सुंदर दिसते. आता खरं तर मोठय़ा आकाराच्या अंगठय़ांचा ट्रेंड आहे. पण मला बारीक आणि नाजूकच अंगठय़ा आवडतात. भरगच्च डिझाइन्स असलेल्या बटबटीत अंगठय़ा मला आवडत नाहीत. कानातल्यांमध्येही तसंच आहे. बारीक छोटय़ा चेनसारखं आणि मग एक खडा अशी रचना असलेले कानातले आवडतात. असे नसतील तर मी फक्त खडे घालण्याला प्राधान्य देते. सोन्याचे कानातले असतील तेही फुलांच्या आकाराचे आवडतात. पण सोन्याच्या कानातल्यांमध्ये मला खडा आवडत नाही. एकतर ते पूर्णत: सोन्याचं असावं किंवा ते पूर्ण खडय़ाचं असावं. दोन्ही एकत्र असलेले कानातले मला आवडत नाहीत. फक्त खडा आणि फक्त सोनं या दोन्हीचं सौंदर्य आपापल्या जागी वेगळं आहे. मी दागिने फार कमी घालते. पण जेव्हा घालते तेव्हा ते नाजूक असतील याची खात्री करते. गळ्यात घालायला फारसं आवडत नाही. पण काही वेळा समारंभांना जाताना गळ्यात एखादा दागिना घालावा लागतो. मग अशा वेळी बटबटीत असं काही न घालता मी बारीक चेन आणि त्याला एखादं पेंडंट असं घालते. भरगच्च नेकलेस घालणं सहसा टाळते. याशिवाय मला मांगटिका हा दागिनाही आवडतो. भरपूर बांगडय़ा घालण्यापेक्षा एक बांगडी किंवा दोन-तीन कडी एकत्र वापरणं मला जास्त आवडतं. मी जे दागिने घालेन त्यात एकच रंग आहे याची मी खात्री करते. मल्टीकलर दागिना मला फारसा आवडत नाही. मोत्यांपेक्षा खडे जास्त आकर्षक वाटतात.
पैंजण माझ्या आवडीचे – सुचित्रा बांदेकर
प्रत्येक दागिन्याचं एक वेगळंच सौंदर्य असतं. मला सोनं आणि डायमंड्स असे दोन्ही आवडतात. मला चोकर्सही आवडतात. मग ते सोन्याचे असो किंवा डायमंड्सचे. त्यातलं सौंदर्य आणखी वेगळं जाणवतं. पैंजण हा माझा सगळ्यात आवडता दागिना आहे. पण माझं एक स्वप्नं राहिलंय. माझे आत्तापर्यंत सगळे दागिने करून झालेत. पण सोन्याचे पैंजण मात्र करायचे राहून गेलेत. खरं तर पायात सोनं घालू नये असं म्हणतात. पण मला आवडतं ते. फार गोड दिसेल ते. इतर वेळी दागिने घालताना कोणती साडी नेसली आहे हे महत्त्वाचं ठरतं. भरपूर दागिने आहेत म्हणून ते घालणं हा विचार चुकीचाच आहे. त्या त्या साडीचं एक वैशिष्टय़ असतं. त्यामुळे त्यानुसार दागिने घातले की साडीचीही शोभा वाढते आणि आपणही छान दिसतो. डिझायनर किंवा टिशूची वगैरे साडी असेल तर डायमंड किंवा चोकर्सचे दागिने छान वाटतात. इमिटेशन ज्वेलरी मला अजिबात आवडत नाही. मी इमिटेशन ज्वेलरी कधीच घालत नाही. एकतर खरा दागिना घालते नाहीतर काहीच नाही हे माझं तत्त्व आहे. मला झुमकेही खूप आवडतात. त्यातही सिल्व्हर झुमके तर मस्तच वाटतात. झुमक्यांमुळे चेहऱ्याला एकदम वेगळाच लुक येतो. काठपदराची आणि प्लेन अशा दोन प्रकारच्या साडय़ांना मी प्राधान्य देते. प्लेन साडी नेसली तर त्यावर डिझायनर ब्लाऊज असतो. या पेहरावानुसार दागिन्यांचा साज ठरवते. मला वाटतं कोणताही दागिना आवडता असला तरी त्या त्या पेहरावानुसार दागिने ठरवावेत. त्यामुळे कपडे आणि व्यक्ती दोन्हींचं सौंदर्य उठून दिसतं. जाड डिझाइन्सचे कानातले घातले व गळ्यात नाजूक काहीतरी घातलं तरी ते चांगलंच दिसतं. बांगडय़ांमध्ये मला पिचोडी आवडते. ती एक जरी घातली तरी ते खूप छानच दिसतं. फार देखणं दिसतं ते.
शब्दांकन : चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11