सिनेमापासून बँकेपर्यंत सगळी दुनिया मुठ्ठीभर मोबाइलमध्ये सामावली जात असताना पुस्तकं तरी त्याला अपवाद कशी असतील? आता जमाना आहे ई-पुस्तकांचा. या जमान्यात मराठी ई-पुस्तकांच्या विश्वाचा मराठी भाषा दिनानिमित्ताने घेतलेला धांडोळा..
दरवर्षी मराठी भाषा दिन आला की चर्चा सुरू होते, मराठी जगणार का, हल्ली मराठी वाचतंय कोण, मराठी पुस्तकांचा खप किती कमी झालाय, मराठी प्रकाशन व्यवसायाला चांगले दिवस कधी येणार, वगैरे, वगैरे; पण त्याच वेळी मराठी पुस्तकांचा खप कमी झालाय, या मुद्दय़ाला छेद देणारा एक महत्त्वाचा घटक गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी वेगाने रुजताना दिसतोय. तो म्हणजे मराठी ई-बुक्सचा. हा घटक नुसता प्रायोगिक पातळीवर न राहता गेल्या एक-दोन वर्षांंत त्यात होत असणाऱ्या सुधारणा, त्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून उतरणारा वर्ग आणि वाचकांची वाढती संख्या पाहता एक उद्योग म्हणून या घटकाची वाढ हळूहळू का होईना पण जम बसवत आहे. तरीदेखील मराठी ई-पुस्तकांबाबत अनेक ठिकाणी अनभिज्ञता आहे. त्यामुळेच एक व्यवसाय म्हणून या क्षेत्रात काय सुरू आहे हे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पाहणे उचित ठरेल.
पुस्तकांच्या विनामूल्य मिळणाऱ्या पीडीएफ किंवा काही ठरावीक पानांच्या पीडीएफ, मग ई-पुस्तकांच्या रचनेत डेस्कटॉपवर वाचता येतील अशा फाइल्स, फक्त ई-पुस्तकांच्या वाचनासाठीची किंडलसारखी उपकरणे आणि आता तुमच्या मोबाइलवरच डाऊनलोड करता येणारी ई-पुस्तके असा प्रवास करीत आज ही ई-पुस्तके थेट तुमच्या तळहातावरील चार-पाच इंचांच्या स्क्रीनमध्ये सामावली आहेत. तरीदेखील ती अगदी थेट सर्वच वाचकांच्या आयुष्यात आली आहेत का? तर त्याचे उत्तर सध्या तरी थेट नाही असे देता येत नसले तरी पूर्णपणे हो असेदेखील नाही. साठ लाख लोकांनी डाऊनलोड केलेले डेली हंटचे मराठी अॅप, बुकहंगामाला सहा महिन्यांत मिळालेले दहा हजार सभासद ही मराठी ई-पुस्तकांच्या पोर्टलची वाचक आकडेवारी निश्चितच यामध्ये बदल होत असल्याचे दर्शविते. हा बदल काय आहे आणि हा व्यवसाय कोणत्या टप्प्यावर आहे, हे पाहणे गरजेचे ठरेल.
यामध्ये सुरुवातीचे कोण, सर्वाधिक वाचक संख्या कोण वगैरे विक्रमांच्या श्रेयनामावलीत अडकण्यापेक्षा आज हा व्यवसाय म्हणून कोणत्या टप्प्यावर आहे हे पाहावे लागेल. वाचक, लेखक आणि वाचनाचे माध्यम अशा तीन घटकांमध्ये हा व्यवसाय विभागला आहे. आज मराठीत सुमारे तीस-चाळीस अशी पोर्टल्स आहेत, की ज्यावरून ई-पुस्तके त्यांच्या विशिष्ट रचनेत उपलब्ध करून दिली जातात. या सर्व पोर्टलधारकांशी चर्चा केल्यावर लक्षात येणारा मुद्दा आहे तो म्हणजे येथे नवोदित लेखकांचा सहभाग फार मोठय़ा प्रमाणात आहे. तांत्रिकदृष्टय़ा बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वाचकवर्गापर्यंत मुद्रित पुस्तक सहजगत्या पोहोचणे शक्य नाही अशा ग्रामीण वर्गातील वाचकांचा सहभाग सुमारे पन्नास टक्के इतका आहे. ग्रामीण भागातील ही वाढती वाचक संख्या ही नक्कीच उत्साह वाढवणारी बाब म्हणावी लागेल.
सर्वच पोर्टलधारकांनी नवोदित लेखकांकडेच सुरुवातीचा आधार म्हणून पाहिले आहे. ई-साहित्य या पोर्टलची सुरुवातच नवोदित कवींची पुस्तके कोणी प्रकाशन करीत नाही म्हणून झाली आहे. तर बुक हंगामाने खास नवोदितांना कथा लेखनासाठी उद्युक्त केले आहे. अर्थात या तुलनेत प्रस्थापित तसेच लोकप्रिय लेखकांची पुस्तके सध्या तरी तुलनेने कमीच आहेत असे म्हणावे लागेल.
तांत्रिक बाबींचा विचार करताना, विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून निर्माण केलेली पुस्तके, विविध उपकरणांवर विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमाने वाचणे ही ई-पुस्तकाची प्रचलित संकल्पना मराठीत काहीशी उशिराच आली असे म्हणावे लागेल. त्याबाबत ई-साहित्याचे सुनील सामंत सांगतात, ‘‘नवोदितांना प्रस्थापित प्रकाशक थारा देत नाहीत यातून ब्लॉग ते पीडीएफ पुस्तके असा प्रवास सुरू झाला. जेव्हा ई-पुस्तकाचा विचार केला तेव्हा आम्ही जे करतो आहोत ती ई-पुस्तके नाहीत हे आम्हाला लक्षात आले. पण ई-पुस्तकांसाठी लागणारी गुंतवणूक आणि नियमित खर्चाची या पद्धतीत गरज नाही. एक व्यवसाय यापेक्षा चळवळ म्हणून याकडे पाहत आहोत. त्यामुळे हे सारे विनाशुल्क सुरू आहे.’’
पण गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात अनेकांनी व्यावसायिक दृष्टीने लक्ष घातले आहे. त्यामुळे बुक हंगामासारख्या पोर्टलने स्वंतत्र व्यवस्था तयार केली आहे. तर डेली हंटचा १२ भारतीय भाषांसाठी ५०० कर्मचाऱ्यांचा ताफा बेंगलोर येथून काम करतोय. दखल घेण्यासारखी बाब म्हणजे अनेक नवीन व्यावसायिक यात उतरत आहेत. थोडक्या गुंतवणुकीत त्यांचे प्रयोग जोरात सुरू आहेत.
तांत्रिक बाबतीत बऱ्याच सुधारणा झाल्या असल्या तरीदेखील तांत्रिक अडचणी आजदेखील आहेतच. सध्या तरी बहुतांश पोर्टल्स हे आयआयटीचा एकमुक्त हा फॉण्ट यासाठी वापरताना दिसतात. पण त्यातून एकसुरीपणा येण्याची शक्यता असते. याबाबत हलन्तचे एमएस श्रीधर सांगतात की, प्रत्येक उपकरणाची फॉण्ट दर्शविण्याची जी तांत्रिक क्षमता असेल त्यानुसारच त्या त्या उपकरणावर ते ई-पुस्तक दिसू शकते. बंगाली आणि गुजराती भाषेत या अडचणी येतात. मराठीसाठी देवनागरी लिपी असल्यामुळे फारसा त्रास होत नसल्याचे ते नमूद करतात. अर्थात त्यांनी त्यांच्या ई-पुस्तकांसाठी त्यांचा स्वत:चा आकृती फॉण्ट एबेंड केला असल्यामुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते. तर नव्यानेच या व्यवसायात उतरणारे ईबू डॉट को डॉट इनचे शैलेश सांगतात की, यात क्रिएटिव्हिटीला बराच वाव आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर ते अवलंबून आहे. तसे प्रयोग आम्ही आमच्या पोर्टलवर केले आहेत.
यातील तांत्रिक बाबी सर्वात कळीचा घटक ठरणाऱ्या आहेत. कारण ई-पुस्तक सोयीस्कर असणे आणि त्याबरोबरच ते सुरक्षित असणे महत्त्वाचे असल्याचे ई-साहित्यचे सुनील सामंत नमूद करतात. अनेकांना मोबाइलवरून बँकेचे व्यवहार करण्याची इच्छा नसते. तसेच प्रत्येक ई-पुस्तक घेताना हा व्यवहार करण्यात वेळदेखील घालवायचा नसतो. त्या अनुषंगाने डेली हंटने दिलेली सुविधा अनेकांना आकर्षित करणारी आहे. डेली हंटवरून ई-पुस्तक खरेदी करताना त्याची रक्कम तुमच्या मोबाइल बिलामध्येच टाकण्याची सुविधा देण्यात आली आहे. बीएसएनएल, एमटीएनएलसारख्या सरकारी मोबाइल सुविधा सोडल्या तर जवळपास सर्वच ऑपरेटर्स ही सुविधा देतात. अर्थात त्यामागे काही रक्कम त्यांना द्यावी लागते, त्यामुळे चार पैसे कमी उत्पन्न झाले तरी अधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरत असल्याचे डेली हंटचे महेंद्र मुंजाळ नमूद करतात.
ई-पुस्तकांच्या विश्वात हा वाढता वाचक वर्ग त्यामुळे सर्वाचे लक्ष्य आहे. त्यासाठीच नवनव्या क्लृप्त्या लढविल्या जाताना दिसतात. बुक हंगामाने स्वत:चा वेगळा नवा वाचकवर्ग तयार करण्यासाठी केलेल्या नुक्कड कथांच्या प्रयोगाचे महत्त्व त्यानिमित्ताने जाणवणारे आहे. त्याबद्दल विक्रम भागवत सांगतात, मुंबईतल्या लोकलमधून प्रवास केल्यावर लक्षात येते की, साठ टक्के लोक हे स्क्रीनला चिकटलेले असतात. मग या लोकांना त्यांच्या तास-दीड तासाच्या प्रवासात वाचून संपवता येईल असे काय करता येईल, या विचारातून नुक्कड कथा जन्माला आल्या. त्याला प्रतिसाददेखील तुफान मिळाला. त्यामुळेच येत्या वर्षभरात एक लाख वाचकवर्गाचे लक्ष्य ठेवले आहे. डेली हंटची सुरुवात न्यूज पोर्टल म्हणून झाली होती. त्यातून वाचकवर्गदेखील तयार होत गेला. या वाचकवर्गाचा थेट फायदा त्यांना ई-पुस्तकांसाठी मिळाला आहे. पण ही काही मोजकीच उदाहरणे म्हणावी लागतील.
मग एक व्यवसाय म्हणून हे सारं प्रकरण कितपत लाभदायी ठरेल, यावर विक्रम भागवतांचे उत्तर मार्मिक आहे, ते सांगतात ‘‘मी एक झाड लावले आहे. त्याची फळं मला माझ्या हयातीत मिळतीलच असे नाही. त्याचं उत्तर वीस वर्षांनी मिळेल. पण त्यावर गुंतवणूक ही आत्ताच करावी लागणार आहे. त्यातून नवा वाचकवर्ग तयार होईल.’’ यामुळे वाचकांचा जसा फायदा होईल तसाच तो लेखकांनादेखील होणार असल्याचे सर्वच पोर्टलधारक सांगतात. ई-पुस्तकांची किंमत खूपच कमी ठेवण्यामागेदेखील हीच भूमिका काही अंशी कारणीभूत असल्याचे दिसून येते. तांत्रिक बाबी सांभाळण्याची गुंतवणूक आणि रोजचा खर्च पाहता कमी किमतीत ही पुस्तकं कशी परवडतात असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण कमी किंमत आणि अधिक वाचकवर्ग हेच समीकरण आज सर्वाच्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे. हा वाचक वर्ग जसा वाढत जाईल तसा फायदादेखील आणखीनच वाढत जाईल असंच सर्वाच्या बोलण्यातून जाणवतं.
त्यामुळेच हा वाचकवर्ग वाढविण्यासाठी सध्या सर्वाचीच नजर आहे ती ग्रामीण भागातील वाचकांवर. स्मार्ट फोन ही आता काही फार नावीन्याची गोष्ट राहिलेली नाही. ग्रामीण भागातील वाचकवर्ग जो मुद्रित पुस्तक विकत घेण्यासाठी जिल्ह्य़ाच्या, तालुक्याच्या गावी जाऊ शकत नाही, त्याला जर थेट त्याच्या तळहातावर कमीत कमी किमतीत पुस्तक मिळत असेल तर तो नक्कीच ते विकत घेतो, असे सर्वच पोर्टलधारक सांगतात. डेली हंटचे महेंद्र मुंजाळ सांगतात की, त्यांच्याकडे सध्या तीस टक्के वाचक हा ग्रामीण भागातील आहे. पुढील दोन वर्षे हाच वर्ग कसा वाढेल याकडे आमचे लक्ष असेल. सुनील सामंत यालाच दुजोरा देताना अगदी गुरं चरायला सोडून मोबाइलवर पुस्तक वाचल्याचे उदाहरण सांगतात. अर्थात असा वर्ग वाढल्यावर आम्ही ई-पुस्तकांच्या व्यवसायात उतरू असे ते नमूद करतात.
मात्र त्याच वेळी एमएस श्रीधर सांगतात की, मराठी ई-पुस्तकांच्या मार्केटिंगमध्ये बऱ्यापैकी मागे आहोत. वाचक संख्या वाढली की मग मार्केटिंग करू यापेक्षा दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच वाढवाव्या लागतील. ई-पुस्तकांबाबतची जागरूकता वाढवणे आणि त्यासाठी ठोस मार्केटिंग करणं महत्त्वाचं असल्याचं ते नमूद करतात.
एकंदरीतच हे तांत्रिक प्रकरण मार्गी लावण्यासाठी बऱ्यापैकी खर्च करावा लागणार आहे. विक्रम भागवत सांगतात की, आम्ही आताच एक कोटी गुंतवले आहेत, वर्षभरात आणखी गुंतवावे लागतील. कारण मार्केटिंगदेखील डिजिटल पद्धतीनेचे आणि प्रभावी करण्याची गरज असल्याचे ते सांगतात. मग या खर्चीक प्रकरणामागे आज अनेक जण का धावत आहेत? आपणपण जगाबरोबर डिजिटल झालो पाहिजे असा हेतू आहे का? इतका साधा विषय हा नाही. भविष्यात ऑनलाइन खरेदीला महत्त्व येणार हे निश्तिच आहे. पण वेगवेगळी उत्पादनं विकणारी कोणतीही ऑनलाइन पोर्टल आज फायद्यात नाहीत. पण तरीदेखील ते यात पाय रोवून उभे आहेत. कारण त्यांना टिकून राहायचं आहे. बदलता समाज मोबाइलच्या माध्यमातून जितके अधिक व्यवहार करेल तितका त्यांचा व्यापारातील हिस्सा वाढणार आहे. त्यासाठी त्यांना आधार आहे तो बिग डेटाचा. तुमच्या प्रस्तावित/अपेक्षित ग्राहकाच्या आवडीनिवडी, त्याचा कल अशी सर्व माहिती असणारा हा बिग डेटा हाच मोठा उद्योग आहे. त्याआधारेच भविष्यातील योजना आखता येतात. आज मराठी ई-पुस्तकांची बाजारपेठदेखील याच बिग डेटाच्या मागे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातून त्वरित फायदा तर नाहीच, उलट गुंतवणूकच आहे. म्हणजेच ई-पुस्तकांचा भडिमार असला तरी सध्या तरी ही बाजारपेठ बाल्यावस्थेतच आहे असे म्हणावे लागेल. मुद्रित प्रकाशनाच्या तुलनेत त्याचा सहभाग दोन-पाच टक्क्य़ांइतकाच असणे हे त्याचेच लक्षण म्हणावे लागेल.
अर्थात इतके असले तरी आज तरी मराठी ई-पुस्तकांच्या साहित्यिक दर्जाबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे भविष्यात बाजारपेठेचं स्वरूप बदलेल अशी अपेक्षा असली, तरी शेवटी दर्जेदार साहित्य हा कळीचा मुद्दा राहणारच आहे. कारण आज मुद्रित प्रकाशन व्यवसायातदेखील लाखांनी पुस्तक प्रकाशित होत असतात. पण ती विकत कोण घेतो असा प्रश्न असतोच. तसेच जरी एक-दोन कोटी जरी वाचक झाले आणि भारंभार ई-पुस्तके प्रकाशित होत राहिली, कमीत कमी किंमत ठेवली तरी ती किंमत कसहीन साहित्याला कोण देणार, हा प्रश्न उरतोच.
ई-पुस्तक म्हणजे काय?
ई-पुस्तक हा शब्द मराठीत परिचयाचा झाला तो सुमारे दहा बारा वर्षांपूर्वी. पण नेमकं ई-पुस्तक काय असते याबाबत अगदी आजदेखील अनभिज्ञता दिसून येते. सुरुवातीला आपल्याकडे जी ई-पुस्तके म्हणून वापरली गेली त्या म्हणजे केवळ उपलब्ध पुस्तकांच्या स्कॅन केलेल्या अथवा सॉफ्टकॉपीच्या आधारे केलेल्या पीडीएफ असत. पण केवळ पीडीएफ म्हणजे ई-पुस्तक नव्हे हे कळायला बराच वेळ गेला. ई-पुस्तक ही पूर्णत: वेगळी रचना असते. अर्थात त्यासाठी पीडीएफ अथवा अन्य सॉफ्टकॉपी असणे गरजेचे आहे. ती पुस्तकांची पानं स्कॅन करून केलेली नसावी. ती फाइल ई-पुस्तकासाठी असणाऱ्या विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आवश्यक त्या फॉन्टमध्ये परिवर्तीत केली जाते. सध्या बहुतांश विक्रेते मराठीसाठी आयआयटी मुंबईने विकसित केलेला वनमुक्ता (एकमुक्त) हा फॉण्ट वापरतात. तर काही विक्रेते स्वत:चा फॉण्ट ई-पुस्तकांबरोबर एंबेड करतात. या विशिष्ट रचनेत विकसित झालेली फाइल संबधित विक्रेत्याच्या सव्र्हरवर स्टोअर केली जाते. जेव्हा तुम्ही कोणत्याही ई-पुस्तकाची विक्री करणाऱ्या पोर्टलवरून हवं ते ई-पुस्तक विकत घेता तेव्हा ही ‘इपब’ फॉर्मेट फाइल डाऊनलोड होते. ही फाइल वाचण्यासाठी तुम्हाला विशिष्ट असा रीडर आवश्यक असतो. मोबाइल अथवा टॅबवर वाचता यावे म्हणून पोर्टलला स्वतंत्र अॅप विकसित करावा लागतो. तर डेस्कटॉप अथवा लॅपटॉपसाठी अन्य काही पर्याय दिले जातात. काही पोर्टल्स केवळ मोबाइल, टॅब यावरच वाचता येतील अशी ई-पुस्तके तयार करतात, तर काही पोर्टल्स इतर उपकरणांचा विचार करतात. ई-पुस्तक आणि स्कॅन केलेली पीडीएफ फाइल या दोन्हीतला महत्त्वाचा फरक म्हणजे पीडीएफ या तुमच्या स्क्रीनच्या आकारानुसार जुळवून घेत नाही. तर ई-पुस्तक हे त्या त्या स्क्रीनच्या आकारानुसार तुम्हाला सोयीस्कर आकार धारण करते. अनेक वेळा हे ई-पुस्तक डाऊनलोड न होता, सव्र्हरवरदेखील ठेवले जाते. आणि तुम्ही एकदा ते विकत घेतल्यानंतर संबंधित अॅपद्वारे ऑफलाइनदेखील वाचू शकता.
जुन्या पुस्तकांना ई-झळाळी
ई-पुस्तकांच्या विश्वातील घडामोडींमध्ये हा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणावा लागेल. नवोदितांच्या लिखाणाला वाव देणे हे तर सर्वानीच केलंय, पण अनेक जुनी पुस्तकं आज दुर्मीळ आहेत, मोजक्याच ठरावीक लोकांकडे त्याच्या प्रती शिल्लक आहेत; अशा पुस्तकांना ई-झळाळी देण्याकडे अनेकांचा कल सध्या दिसून येत आहे. ही पुस्तकं संपूर्णपणे पुन्हा टंकलिखित करण्याऐवजी स्कॅन करून ओसीआर तंत्राच्या माध्यमातून ई-पुस्तकासाठी गरजेची सॉफ्ट कॉपी तयार करणे शक्य होत आहे. अर्थात हे १०० टक्के अचूक नसले तरी संपूर्ण पुस्तक टंकलिखित करण्यापेक्षा यातील चुका दुरुस्त करणे निश्चितच कमी त्रासाचे असल्याचे पोर्टलधारक नमूद करतात. अनेक पोर्टल्स ही सुविधा वापरताना दिसतात. नव्यानेच या व्यवसायात येणाऱ्या पुस्तकसागर डॉट कॉम या पोर्टलवरही सुविधा लवकरच सुरू करणार असल्याचे समजते. तसेच या पोर्टलवरून अशी पुस्तके गरजेनुसार छापूनदेखील मिळण्याची सुविधा त्यात असणार आहे. भविष्यात अशी पुस्तकं मोठय़ा प्रमाणात आणि योग्य किमतीत ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध झालीच तर त्यांना मोठी मागणी येऊ शकते. मात्र आपल्याकडे साधारण २००० साला नंतरच्या पुस्तकांच्या सॉफ्ट कॉपी मिळण्याची शक्यता असते, पण अनेक प्रकाशकांकडे त्यापूर्वीच्या जुन्या पुस्तकांच्या प्रतीदेखील नसल्याचे विदारक सत्य डेली हंटचे महेंद्र मुंजाळ मांडतात.
ई-पुस्तकांच्या विश्वातील ट्रेण्ड्स
साहित्य संमेलनातील अथवा कोणत्याही मोठय़ा पुस्तक प्रदर्शनानंतर एक बातमी हमखास असते, यावर्षी अमुकअमुक लाख पुस्तक विक्री झाली. सर्वाधिक मागणी सल्ला मार्गदर्शन, रेसिपीज, अध्यात्म, स्पर्धा परीक्षा, महिला जगत अशा पुस्तकांना होती. ई-पुस्तक विश्वातदेखील सध्या हाच ट्रेण्ड दिसून येतो. डेली हंटचे महेंद्र मुंजाळ सांगतात की, अशा पुस्तकांची मागणी ही तब्बल पन्नास टक्क्यांएवढी आहे. त्याखालोखाल आत्मचरित्रांना व कथा-कांदबरींना मागणी आहे. तर ई-साहित्यचे सुनील सामंत अध्यात्माला प्रचंड मागणी असल्याचे नमूद करतात. त्याचबरोबर महिलाविषयक पुस्तकांनाही मागणी आहे. त्याचवेळी लहान मुलांच्या पुस्तकांची मागणी मात्र आश्चर्यकारकरीत्या कमी असल्याचे ते सांगतात. विक्रम भागवतांच्या बुक हंगामावर नवोदित लेखकांच्या कथांना मोठय़ा प्रमाणात वाव दिलेला असल्यामुळे त्यांच्याकडे नवोदितांच्या साहित्याला बरीच मागणी असते. त्याचबरोबर कवितांची ऑडिओ बुक्स केलेली असल्यामुळे कवितांनादेखील चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे ते नमूद करतात.
प्रस्थापित तुलनेने उशिराच
ई-पुस्तकाच्या आगमनानंतर प्रस्थापित प्रकाशन संस्थांना धक्का लागेल वगैरे चर्चा अनेक वेळा झाल्या आहेत. पण एकंदरीतच सध्याच्या ई-पुस्तकाच्या बाजारव्यवस्थेकडे पाहिले तर प्रस्थापितांनी याकडे जरा उशिराच लक्ष दिल्याचं जाणवतंय. ई-पुस्तकांच्या विश्वातील अनेक प्रयोग झाल्यानंतर त्यातील फायदे-तोटे आणि भविष्यातील पुस्तक प्रकाशनाची ई-दिशा अटळ आहे हे लक्षात आल्यानंतर आत्ता कोठे काही प्रमाणात प्रस्थापित इकडे वळताना दिसत आहेत.
हल्ली अनेक पोर्टल्सवर बहुतांश प्रकाशकांची नवी, जुनी पुस्तकं ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहेत. मेहता प्रकाशनने असा प्रयत्न मध्यंतरी केला होता. पण आज अन्य पोर्टलवर मेहतांची अनेक पुस्तकं ई स्वरूपात उपलब्ध आहेत. तर ग्रंथालीने सव्वाशे ई-पुस्तके असणारा टॅब बाजारात आणला होता. पण त्यानंतर पुढे जाऊन ई-पुस्तके पुरवणारी सुविधा त्यांनी दिली नाही. राजहंस, पॉप्युलर, रोहन, ज्योत्स्ना आणि मौज या पाच प्रकाशन संस्थांच्या मराठी रीडर्स डॉट इन या संयुक्त वेबसाइटनेदेखील आता लवकरच ई-पुस्तकांच्या दालनात प्रवेश करण्याचे सूतोवाच केले आहे. रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर सांगतात की, ई-पुस्तकांचे अद्ययावत असे तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहोत. त्यांच्या या प्रयोगात त्यांना दोन फायदे मिळणार आहेत, ते म्हणजे पाचही प्रकाशनांची पुस्तकं एकाच अॅपवर वाचता येतील आणि हे पाच जण एकत्रित करणार असल्यामुळे यासाठी करावा लागणारा खर्चदेखील विभागला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचा स्वत:चा सध्याचा उपलब्ध लेखकवर्ग आणि वाचकवर्ग असण्याचा फायदादेखील मिळेल.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com