नवं वर्ष म्हटलं की त्यासाठी नवा संकल्प करणं ओघानेच आलं. अशा संकल्प करणाऱ्या आणि न करणाऱ्यांच्या ‘मन की बात’ समजून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की संकल्प करण्यात आणि तो पूर्ण न करण्यातच खरी मजा आहे..

नव्या वर्षांचे हसतमुखाने स्वागत करण्यासाठी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला मध्यरात्रीपर्यंत बसूनदेखील, रात्रीच्या घाईगडबडीत नवे वर्ष कधी सुरू झाले ते दुसऱ्या दिवशी नीटसे आठवतच नसल्याने, नव्या वर्षांचे संकल्प नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी सोडावेत असा संकल्प यंदा आम्ही सोडला आहे. पण पहिल्या दिवशी मनाचा गोंधळ उडू नये यासाठी संकल्पांची यादी करण्याच्या इराद्याने, इतरांचेही संकल्प समजावून घेण्याचा एक खटाटोप आम्ही हाती घेतला. मित्रांची, सहकाऱ्यांची, नातेवाईकांमधील समविचारी पुरुषांची मते जाणून घेण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या. गेल्या वर्षी नववर्षांच्या पूर्वसंध्येस संकल्प सोडताना आपल्यासोबत आणखी कोणकोण होते, ते आठवतच नसल्याने, गेल्या वर्षी सोडलेले संकल्प आठवण्याचा विचार सोडून दिला आहे. नव्या वर्षांच्या आदल्या रात्री फक्त, हसतमुखाने मावळत्या वर्षांला निरोप द्यायचा, एवढाच सध्याचा पक्का संकल्प आहे.
दर वर्षी, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, वर्ष सरल्याच्या हुरहुरत्या जाणिवेमुळे अनेकांची मने (हळवी झाल्याने) ताळ्यावर नसतात. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, मनाच्या याच अवस्थेमुळे नव्या वर्षांचा नवा संकल्प सोडायचे बहुधा अनेकांचे राहूनच गेले असावे. पुढे पूर्ण वर्षभर ती हुरहुर मनाला लागून राहिल्याने, यंदा ती चूक करायची नाही असा संकल्प अनेकांनी सोडल्याचे या भेटीगाठींनंतरच्या आढाव्यातून निदर्शनास येत आहे. पण असे काही करण्यात बाकीच्यांना मजा वाटत नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री संकल्प सोडण्यात जी मजा असते, ती दुसऱ्या दिवशी सकाळी नाही, यावर सर्वाचेच एकमत दिसते. त्यामुळे नव्या वर्षांचे सारे संकल्प बहुधा आदल्या रात्रीच सोडले जातील अशी शक्यता अधिक आहे!
आपल्यापुरता एक प्राथमिक संकल्प सोडून झाल्याने, आता इतरांच्याही संकल्पांचा कानोसा घ्यावा असा विचार करून कंपूतील काहींशी बोलण्याची संधी शोधली असता, नव्या वर्षांचे अनेक नवे संकल्प नियोजनात उभे असलेले दिसले. काहींनी तर, हे आमचे नवे वर्षच नव्हे, त्यामुळे संकल्प सोडण्याचा सवालच नाही, असे सांगत हातही झटकले. गेल्या वर्षीपासून एक जानेवारीच्या नववर्षांचा असा तिरस्कार करणारयांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याचेही याच आढाव्यातून उघड झाले आहे. आमचे संकल्प आम्ही थेट पाडव्याला- आमच्या नववर्षदिनीच- किंवा दिवाळीला सांगू असे सांगत काहींनी आमच्या संकल्पांनाच पाने पुसण्याचा प्रयत्न केला. तरीही आम्ही हा प्रयत्न नेटाने चालूच ठेवला होता. पु.लं.च्या काळात संकल्पांच्या चौकटी माफक होत्या. मुख्य म्हणजे, तेव्हा नववर्षांचे संकल्प सोडणे हा बहुधा फक्त पुरुषांचा सोहळा असायचा. त्यामुळे ‘नव्या वर्षांत एकही नवी साडी घेणार नाही’ असा ‘सुखद’ संकल्प एखाद्याच्या बायकोने सोडल्याचे खुद्द पुलंच्याही ऐकिवात नसल्याने, आपल्यापुरत्या वर्तुळात वावरणाऱ्या आमच्यासारख्यांना आतादेखील बायकांचे नववर्ष संकल्प समजूच शकणार नाहीत, याची पक्की खात्री असल्याने त्या फंदातच पडायचे नाही असा संकल्प आम्ही सोडला आहे.
मध्ये नियती असल्याने, संकल्प आणि सिद्धी यांच्यात खूप मोठे अंतर असले, तरी संकल्प आणि खंत यांचे मात्र खूप जवळचे नाते असते. ज्या चुका आपण आजवर टाळू शकलो नाही, त्या आता यंदाच्या वर्षांत तरी चुकूनही करायच्या नाहीत, असा सगळ्या संकल्पांचा साधारण सूर असतो. कुणाला दारू सोडायची असते, कुणाला तंबाखू-सिगरेटच्या विळख्यातून बाहेर पडायचं असतं.. गेल्या सहा महिन्यांत फक्त ३६ सिगरेट ओढल्याची तारीखवार नोंद ठेवणाऱ्या भाईला पुढच्या वर्षांत सिगरेट सोडायची आहे. तसा संकल्प तो ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या पार्टीत जाहीर करणार असून त्याची आठवण करून देण्याची जबाबदारीही त्याने एका सहकाऱ्यावर सोपविली आहे. अलीकडे कधी कधी जेव्हा जेव्हा त्याच्या या संकल्पाचे काय होणार यावर चिंतातुर चेहऱ्याने कंपूची चर्चा सुरू होते, तेव्हा तेव्हा तोही काहीसा डळमळतो. अगदीच पूर्णपणे सिगरेट बंद करता आली नाही, तर किमान सकाळी चहानंतरच्या विधीसाठी उत्साह वाटावा म्हणून, दुपारच्या जेवणानंतर अन्नपचन चांगले व्हावे म्हणून, संध्याकाळच्या वेळी खाऊगल्लीत गप्पा मारता मारता भटाचा वाफाळलेल्या चहासोबत टाइमपास म्हणून आणि रात्री जेवण झाल्यानंतर नाक्यावर मित्रांशी गप्पा मारताना कुणी आग्रह केलाच तर, म्हणून, अशा सहा सिगरेट ओढण्यापुरती या संकल्पातून सवलत मिळवावी, असा विचार भाईच्या मनात बळावू लागला आहे. ३१ डिसेंबरला सिगरेट सोडण्याचा संकल्प जाहीर करण्याची आठवण केलीच, तर तो तसा प्रस्ताव सहकाऱ्यांसमोर मांडणार आहे.
आपण आजवर अगदीच गबाळ्यासारखे वागलो. पशाचा ताळतंत्र ठेवला नाही, हाती आलेला पसा कसा उडवला, तेही कळले नाही. आपल्यासोबतच्या अनेकांनी पशाचे नीट नियोजन केल्याने त्यांच्या गाठीशी पसाही आहे, आणि सुट्टीत ‘सिंगापूर-पट्टाया-मलेशिया’सारख्या ‘दोन रात्री-तीन दिवसा’च्या ट्रिपाही ते मारू शकतात, हे जाणवल्यामुळे, यंदाच्या वर्षीपासून खर्चाचा हात आखडता घेण्याचा संकल्प अण्णाने सोडला आहे. काही मित्रांनी नव्या वर्षांपासून व्यायाम सुरू करण्याचे ठरविले आहे, तर काहींनी पहाटे उठून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी गुंफांपर्यंत रपेट मारायचा संकल्प सोडला आहे. नव्या वर्षांची डायरी भेटीदाखल मिळाली की लगेचच, पहिल्या तारखेपासून नेमाने डायरी लिहिणे, योगासने सुरू करणे, अशा बाबींचाही संकल्पांच्या यादीत समावेश असल्याने, नवे वर्ष ‘संकल्पवर्ष’ म्हणून साजरे करण्याचा संकल्पही मित्र मंडळाने सोडला आहे. हे सारे यथासांग पार पडले, तर पुढच्या वर्षी ३१ डिसेंबरला संकल्पसिद्धीनिमित्त जंगी पार्टी करण्याचा संकल्प सोडावा अशी सूचना यंदाच्या ३१ डिसेंबर आयोजनासाठी रात्री झालेल्या बठकीत पुढे आल्यावर, पुढच्या वर्षीच्या ३१ डिसेंबर पार्टीसाठी असे काही वेगळे निमित्त नको यावर एकमत झाले असून, पुढच्या वर्षीही ३१ डिसेंबरला त्यापुढील वर्षांच्या स्वागतासाठी एकत्र बसायचे असा संकल्प सोडण्यात आला आहे.
मावळत्या वर्षांसाठी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला आपण फारसे काही संकल्प केले नव्हते, ते बरेच झाले असाही सूर काहींच्या बोलण्यातून डोकावतो आहे. ‘अच्छे दिन’ येणार म्हणून खूप काही बेत आखण्याचा संकल्प करण्याचे ठरविले होते, पण ‘उगीच हुरळून जाऊ नका’, असा सल्ला बायकोने दिल्यावर मनाला वेळीच आवर घातला आणि कोणताही खर्चीक संकल्प करायचा नाही एवढाच संकल्प केल्याने बचावलो, असेही या मंडळींना वाटते आहे. पुढच्या वर्षांसाठी पुन्हा अच्छे दिनांच्या भरवशावर काही संकल्प करावेत, असा बेत मात्र काहींच्या मनात डोकावतो आहे. परवा मोदी भारताच्या दौऱ्यावर येता येता वाटेत पाकिस्तानलाही उतरले, नवाझ शरीफ यांची त्यांनी गळाभेट घेतली. पूर्वीच्या काळी असे काही झाले, की देवांचा राजा इंद्रदेव आकाशातून पुष्पक विमानातून पुष्पवृष्टी करायचा म्हणे.. तसे काही झाल्याचे ऐकिवात नसले, तरी नवोन्मेषांच्या आकांक्षांची पुष्पे मात्र या भेटीनंतर लगेचच फुलू लागल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अच्छे दिन सुरू होणार असे अनेकांना वाटत आहे. भारत-पाक-बांग्लादेशाचा अखंड भारत होणार आणि ‘परिवार’ गुण्यागोिवदाने नांदणार अशी स्वप्नेही नववर्षांच्या पूर्वसंध्येच्या मुहूर्तावरच बाजारात आल्याने, नव्या वर्षांतच तसे झाले तर किती बरे होईल असा विचार करून अखंड भारतभ्रमणाचा कार्यक्रम आखण्याचा संकल्पही काहींनी सोडला आहे. काही पर्यटन संस्थांनी नव्या वर्षांतील आपापल्या ‘टूर पॅकेज’ला तसा आकार देण्याचे काम हाती घेतले असून अखंड भारतभ्रमणाचा पहिला मानकरी ठरणाऱ्यास घसघशीत सवलती देण्याची स्पर्धाही आयोजित करण्याचा काहींचा मानस असल्याचे समजते. आपले जवान, गोठविणाऱ्या थंडीत, बर्फाळ प्रदेशात आणि विरळ हवामानात, जडशीळ गाठोडी पाठीशी घेऊन डोळ्यात तेल घालत सीमारक्षणासाठी सतत सज्ज असतात. अतिरेक्यांशी लढताना, घुसखोरांचे अड्डे िपजून काढताना अनेकांना प्राणांची आहुती द्यावी लागते. उद्या होऊ घातलेल्या त्या अखंड भारतामुळे सीमारक्षणाची कटकटच राहणार नाही, त्यांचे बरेचसे कष्ट कमी होतील, आणि आडवाटेने एकमेकांच्या हद्दीत प्रवेश करण्याचा किंवा परराज्यात जाऊन दहशतवादी कारवाया करण्याचा विचारदेखील शेजाऱ्यांच्या मनास शिवणार नाही, या कल्पनेने अनेकांच्या मनाला नववर्षांच्या सोनेरी दिवसांच्या स्वप्नांची भुरळ पडू लागली आहे. पण वाघा सीमेवरचा तो संध्याकाळचा कार्यक्रम एकदा तरी पाहावा असा कधीपासूनचा संकल्प यापुढे कधीच सिद्धीस जाणार नाही या जाणिवेनं अण्णा मात्र खंतावला आहे.
महागाई, भ्रष्टाचार, असुरक्षितता असल्या लहानसहान घटनांचा विसर पडावयास लावणाऱ्या अखंड भारत ऐक्याच्या या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य सोळाच्या वर्षांला मिळणार असल्याने, सोळावं वरीस मोक्याचं.. अशा गीताची धून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री गेटवेच्या प्रांगणात वाजविण्यासाठी विनोद तावडे यांच्या सांस्कृतिक खात्याने निविदा काढण्याचे ठरविले असल्याची चर्चा असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र, असे होणार असेल तर देशाच्या सामाजिक सौहार्दासाठी ते नक्कीच पोषक असेल असे मत सत्ताधारी गोटातून व्यक्त होत आहे. ‘सहन होत नाही, देश सोडून पाकिस्तानात जावे असे कधी कधी वाटते’, किंवा ‘जमत नसेल तर देश सोडून पाकिस्तानात निघून जा’, असे विचार मांडणाऱ्यांची किंवा आगंतुक सल्ले देणाऱ्यांची तोंडेही आपोआप बंद होण्याची शक्यताही आगामी वर्षांत बळावण्याची दाट चिन्हे या शुभसंकेतातून दिसू लागल्याने, सहिष्णुतेचे काय होणार या चिंतेने देशावर दाटलेले मळभ यंदा दूर होणार याचा आनंद काहींच्या मनात डोकावू लागला असून, आता देश सोडून जाण्याची पाळी कुणावरच येणार नाही हे अच्छे दिनच नव्हेत का, या विचाराने अनेकजण भारावून गेले आहेत.
गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला नव्या वर्षांचं स्वागत केवढय़ा जल्लोशात केलं गेलं होतं. नवे वर्ष आनंदाचे, उत्साहाचे जावो अशा शुभेच्छा संदेशांनी ३१ डिसेंबरच्या अख्ख्या रात्रभर मोबाइलची घंटा वाजत राहिली होती. तरीही डाळ महागलीच. कांद्यानेही ऐनवेळी वांदे केले आणि सोनं मात्र स्वस्त झालं. तरी डाळ परवडत नाही आणि स्वस्त होऊनही सोनंदेखील परवडत नाही म्हणून मध्यमवर्गाची परवडच झाली. त्यामुळे यंदा, नव्या वर्षांच्या संदेशात शुभेच्छा असल्या, तरी येणारा प्रत्येक दिवस झेलण्याचे सामथ्र्य मिळो असा संदेश ३१ च्या रात्री पाठविण्याचे काहींनी ठरविल्याचे समजते.
अरिवद केजरीवाल यांनी दिल्लीत प्रदूषणावर मात करण्यासाठी खाजगी गाडय़ांना ‘ऑड-इव्हन फॉम्र्यूला’ लागू केल्यानंतर त्याची खूप चर्चा झाल्याने, त्यावरही मात करण्याचा उपाय मुंबईत कसा लागू करता येईल यावर अलीकडेच सरकारी पातळीवर एक बठक झाल्याचे वृत्त आहे. वाहनांचे प्रदूषण ही मुंबईची समस्या असल्याचे मत सत्ताधारी पक्षातील विरोधक असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केल्याने, सहाजिकच त्याला विरोध करण्याचे धोरण या बठकीत निश्चित झाले असून प्रदूषणातून मुक्तता देण्यासाठी घरोघरी पाइपद्वारे ऑक्सिजनचे कनेक्शन देण्याची योजना अभ्यासण्याचे आदेशही या बठकीत देण्यात आल्याचे समजते. ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने, नव्या वर्षांत प्रायोगिक तत्त्वावर रेशिनग करून अतिप्रदूषित वस्त्यांमधील उच्चभ्रू सोसायटय़ांनाच महागडय़ा दराने पाइप ऑक्सिजन देण्याचा विचार असल्याची माहितीही मिळत आहे. चीनमध्ये बाटलीबंद ऑक्सिजनचा नवा प्रयोग सुरू होत असल्याचे वृत्त असून त्याची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ या योजनेच्या अभ्यासासाठी चीन दौऱ्यावर निघण्याची शक्यता असल्याने, नव्या वर्षी, ‘मागेल त्याला ऑक्सिजन’ नावाची नवी योजना अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. मात्र, सत्ताधारी विरोधक असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी यवतमाळ दौऱ्यातच या विरोधात आवाज उठविण्याचे ठरविले असून ‘ऑक्सिजन कसला देता, आधी पाणी द्या’ अशी घोषणा देत ते सरकारला धारेवर धरणार असल्याचे समजते.
असे असले, तरी ‘सरकारमधील सहकारी पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही एकदिलाने काम करणार आहोत’, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी सोडला आहे, तर ‘जोवर जमते तोवर राहू नाही तर सोडून जाऊ’ असा संकल्प सोडण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी दिल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये त्यामुळे काहीशी अस्वस्थता असली, तरी नव्या वर्षांत रडतखडत का होईना, जमवून घेण्याचाच संकल्प या मंत्र्यांनी सोडल्याची माहिती मिळत आहे.
एकंदरीत, नव्या सहस्रकाचे सोळावे वरीस फारसे धोक्याचे नसले, तर मोठय़ा मोक्याचे असेलच असे काही चित्र नसल्याने, संकल्प न सोडता जे घडेल त्याला सामोरे जावे असाच अनेकांचा मनसुबा असल्याचे चित्र आहे.

Story img Loader