अर्निबध विकासप्रक्रियेचं, शहरीकरणाचं अपरिहार्य बायप्रॉडक्ट म्हणजे प्रदूषण. त्याच्या विळख्यामुळे आज शहरांची घुसमट होते आहे. सगळं माहीत असूनही थोपवता न येणारी ही प्रक्रिया म्हणजे शहराचा आत्मघाताच्या दिशेने चाललेला प्रवास!

घशाचे-श्वसनाचे विकार, सर्दी, खोकला यासाठी अलीकडे दवाखान्यात गर्दी वाढताना दिसते आहे. दुचाकी चालवताना चेहऱ्यावर ओढणी, रुमाल बांधणारेही दिवसेंदिवस वाढताहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना चेहऱ्यावर मास्क लावावा लागतोय. वयोवृद्धांना घराबाहेर पडताना अनेकदा विचार करावा लागतोय. कधी वातावरणातील बदल, ऋतुबदल, धुळीची किंवा विशिष्ट गोष्टीची अ‍ॅलर्जी अशा विविध कारणांबरोबरच यामागचं एकमेव ठळक कारण म्हणजे वायुप्रदूषण. वायुप्रदूषण वाढण्यात मानवनिर्मित घटकांचाही प्रामुख्याने वाटा आहे. विकासाच्या प्रक्रियेत हे घटक अपरिहार्य असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे शहराचा, राज्याचा विकास करताना आपण स्वत:च्या पायावरच कुऱ्हाड मारून घेत नाही ना याचा विचार करणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Government initiatives like PMAY aim to address housing issues by offering financial aid for self-built homes or group housing.
IE THINC, आपली शहरे: ‘दिल्लीला कमी उंचीच्या, उच्च घनतेच्या घरांची गरज आहे’
shivaji nagar mumbai pollution
मुंबई : शिवाजी नगरमधील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ
mumbai High Court air pollution mumbai city
मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
health issues due to pollution in sangli news in marathi
सांगलीत ‘दत्त इंडिया’कडून जल, वायू प्रदूषण; आरोग्यास धोका निर्माण झाल्याची तक्रार
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती

दोन आठवडय़ांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणानुसार आपल्या देशातील ९४ शहरे प्रदूषित आहेत. देशातील एकूण साधारण ५०० शहरांपुढे ९४ हा शहरांचा आकडा तुलनेत लहान वाटत असला तरी त्या शहरांतील प्रदूषणाची तीव्रता अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, हे विसरून चालणार नाही. तसंच या शहरांपैकी काही शहरं ही स्मार्ट सिटी यादीतील आहेत. याहून गंभीर बाब पुढे आहे. या ९४ शहरांपैकी १७ शहरं ही महाराष्ट्रात आहेत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, बदलापूर, उल्हासनगर, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जालना, जळगांव, लातूर, कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे. २०११ ते २०१५ यादरम्यान केलेल्या चाचण्यांमधून राज्यातील प्रदूषित शहरांमध्ये पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) या प्रदूषित घटकाचं प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अधिक असल्याचं आढळून आलं आहे.

वायुप्रदूषण हे पार्टिक्युलेट मॅटरमध्ये मोजलं जातं. याला घनकण आणि द्रवकणांद्वारे होणारं प्रदूषण असंही म्हटलं जातं. काही घन व द्रवकण एवढे सूक्ष्म असतात की, त्यांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. हे मोजण्याचं एकक मायक्रोमीटर आहे. दहा मायक्रोमीटरपेक्षा कमी असलेल्या कणांना पीएम १० तर २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी असलेल्या कणांना पीएम २.५ असं म्हणतात. आपल्या केसांची जाडी ही साधारणपणे ७० मायक्रोमीटर इतकी असते. यावरून प्रदूषित कण किती अतिसूक्ष्म असतील याचा अंदाज येऊ शकतो. पीएम २.५ ची कमाल मर्यादा ६० मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर आहे तर पीएम १०ची कमाल मर्यादा १०० मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय-हवेची प्रतवारी मानक) या यंत्रणेनुसार महाराष्ट्रातील मुख्य शहरांमधील पीएम २.५ आणि पीएम १० या कणांची गेल्या एका आठवडय़ाची सरासरी आकडेवारी विचार करायला लावणारी आहे.

हवेतील या अतिसूक्ष्म कणांची मोजणी करणाऱ्या एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर सांगतात, ‘पूर्वी लोकांना प्रदूषणाबद्दल, त्यातल्या नेमक्या माहितीबद्दल अपुरं ज्ञान असायचं. विशिष्ट विषाणू किंवा धुलिकण किती आहे इतकीच माहिती समजायची पण, आता एक्यूआयमुळे लोकांसमोर ही पाहणी, मोजणी पारदर्शकतेने येईल. सर्वसामान्य माणसाला होत असलेला प्रदूषणाचा त्रास आणि या इंडेक्सवरील आकडेवारी हे दोन्ही त्यांना पडताळून पाहता येईल. यापूर्वी प्रदूषणाविरुद्ध कोणी तक्रार केली ते सिद्ध करण्याची जबाबदारीही त्या व्यक्तीवर असायची. त्यासाठी लागणारी साधनं चटकन उपलब्ध होत नसत. ती लगेच उपलब्ध झालीच तरी तोवर प्रदूषित हवा इतरत्र पसरली जायची, इतर हवेत मिसळली जायची. त्यामुळे कोणाला त्यासाठी गुन्हेगार ठरवता यायचं नाही. आता मात्र या इंडेक्समुळे दर मिनिटाच्या नोंदी होणार आहेत. या पारदर्शी यंत्रणेमुळे सर्वसामान्यांचा फायदा होणार आहे. मात्र तो त्यांनी स्वत:साठी करून घेणं हे त्यांच्यात हातात आहे. अन्यथा वायुप्रदूषणाचे परिणाम माणसालाच सर्वाधिक भोगावे लागणार आहेत.’ वायुप्रदूषण हे सायलेंट किलर आहे असं म्हटलं जातं. पण, आता त्याला सायलेंट सुसाइड म्हणण्याची वेळ आली आहे, असं मत वालावलकर व्यक्त करतात. विशिष्ट ठिकाणी प्रदूषण आहे, हे माहिती असूनही त्या ठिकाणी जाण्याची चूक करायची की नाही हे प्रत्येकाच्या हातात आहे, असंही ते सांगतात.

सध्या दिवसा ३३-३४ अंश सेल्सिअस तर रात्री १७-१८ अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तापमानातील ही विषमता गेल्या महिन्याभरात ठरावीक दिवसांच्या टप्प्यांनंतर सतत जाणवत राहिली आहे. या विषमतेची तीव्रता काहीवेळा ठळकपणे जाणवली. पण, या तापमानबदलाचा परिणाम काही प्रमाणात प्रदूषणावर होत होता. कमी तापमानात विषाणू जमिनीच्या लगत राहतात. हवेची हालचाल चालू होते. तेव्हा ते हवेत पसरू लागतात आणि वाऱ्याच्या प्रवाहात मिसळून जातात. म्हणूनच सध्या रात्री कमी तापमान असल्यामुळे रात्री हवेतील विषाणू जमिनीलगतच असतात. त्यामुळे संध्याकाळपासून पहाटेपर्यंत हवेत प्रदूषण असतं. बऱ्याच कंपन्या रात्री अनेक प्रकारचे दूषित वायू हवेत सोडतात, त्यामुळे प्रदूषण होतं. सकाळच्या वेळी कधी कधी आपल्याला जे धुकं वाटतं ते धुकं नसून धुरकं (प्रदूषित धुकं) असतं. त्यामुळे सकाळी हवा ताजी असते म्हणून मॉर्निग वॉकला जाणारे प्रत्यक्षात श्वसनावाटे प्रदूषित हवा शरीरात घेत असतात.

काही कण इतके सूक्ष्म म्हणजे नॅनो असतात की ते शरीरात पेशींमध्ये जाऊन बदल करतात हे लक्षातही येत नाही. यामुळे अनेकदा काहींना कर्करोगांसारख्या विकारांना सामोरं जावं लागतं, अशी गंभीर बाब गेल्या काही वर्षांमध्ये ठळकपणे दिसून आली आहे. तसंच यामुळे मृत्युदरही वाढल्याचे प्रामुख्याने आढळून आले आहे. हे कण इतके नॅनो असतात की ते शरीरात जाऊन मोठय़ा प्रमाणावर गंभीर परिणाम करतात म्हणूनच याला बर्निग नॅनो साइज असं म्हटलं जातं. या बर्निग नॅनो साइज पार्टिकल्सची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यांच्या गुणधर्माचा आणि त्यांचा सजीवांवर होणाऱ्या परिणामांचा अजून अभ्यासच झालेला नाही. मोठय़ा आकाराचे पार्टिकल्स शरीरात शिरुन पेशीरचनेतून शरीराच्या अंतर्गत भागात शिरु शकत नाहीत. पण नॅनो पार्टिकल्स अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ते कसेही आणि कुठूनही शरीराच्या आत शिरु शकतात. हे टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं वालावलकर सुचवतात. तसंच प्रदूषण असलेल्या भागात अधिक श्रमाची काम करणं हे टाळलं पाहिजे. कारण अधिक श्रमाची कामं केल्यानंतर माणूस थकतो आणि त्यावेळी नेहमीपेक्षा जास्त हवा श्वसनावाटे शरीरात घेतली जाते. अशावेळी प्रदूषण असलेल्या भागात ती व्यक्ती असली तर प्रदूषित हवा शरीरात घेतली जाते, हे अत्यंत धोकादायक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंडय़ावर हवेच्या गुणवत्तेचा उल्लेख होताना दिसत नाही. इतका हा विषय दुर्लक्षित झाला आहे. एक्यूआयमुळे कुठे, किती प्रदूषण आहे हे लोकांना समजेल. ब्रॉन्कायटिस, श्वसनाचे आजार, दम्याचे अ‍ॅटॅक ही प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांची प्राथमिक लक्षणं आहेत. फुप्फुसामध्ये गेलेला एकही प्रदूषित कण उलट मार्गे येऊ शकत नाही, हे जास्त धोकादायक आहे. प्रदूषणास हातभार लावणाऱ्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनाच आधी प्रदूषणाचा फटका बसणार आहे हे सरळसरळ दुर्लक्षित होतंय.

वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ)च्या अहवालानुसार दर वर्षी जगभरात साडेसहा कोटी लोक वायुप्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. दक्षिण पूर्व आशियामध्ये प्रदूषणामुळे दर वर्षी आठ लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ७५ टक्के लोक भारतीय आहेत. जगातील सर्वाधिक दहा प्रदूषित शहरांच्या यादीत तीन शहरं भारतातली आहेत.

दक्षिण पूर्व आशियामधील पीएम१०चे प्रमाण जास्त असलेल्या चार शहरांमध्ये दिल्ली हे पहिल्या क्रमाकांचे शहर आहे. तर जगातील १४ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येच्या  शहरांमध्ये पीएम १० चे प्रमाण २०११-२०१५ मध्ये ज्या शहरांमध्ये सर्वाधिक होतं त्यात दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्येच कलकत्ता चौथ्या तर मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे. प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पीएम१० चं प्रमाण सर्वाधिक असलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या पाचांमध्ये भारतातील तीन मुख्य शहरे आहेत, ही चिंताजनक बाब आहे.

वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बांधकाम क्षेत्र. तसंच ज्या भागात शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वेगानं होतंय तिथेही प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. बांधकाम, इंधनाचं ज्वलन हे दोन मानवनिर्मित घटक सर्वात जास्त प्रदूषणकारी आहेत. खड्डे असलेले रस्ते हेही शहरामध्ये सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या घटकांमध्ये येतात. मुंबईत बांधकामं सातत्याने सुरू असतात. प्रामुख्याने मेट्रो प्रकल्पांची कामं सध्या जोरदार सुरू आहेत. त्याशिवाय इमारतींचे बांधकाम, पूल यांची कामंही आहेतच. मुंबईत कोणत्याही भागात हे चित्र हमखास दिसतं. रस्ते, दळणवळण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहनांची संख्या अशा प्रकारचे मानवनिर्मित घटक प्रदूषणाला खतपाणी घालत आहेत. उल्हासनगर, बदलापूर, चंद्रपूर अशा काही शहरांचा वेगाने विस्तार होतोय. यामध्ये औद्योगिकीकरण आणि शहरीकरण या दोन्ही मुद्दय़ांमुळे तेथे प्रदूषणाचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

pollution-chart

एखाद्याला घरातला कचरा नष्ट करायचा असला तर तो कचरा जाळून टाकतो. तो कचरा त्याच्या नजरेसमोर अदृश्य होतो. पण, त्या घन कचऱ्याचं वायुरूपातील कचऱ्यात रूपांतर होतं आणि तो हवेत पसरतो. घन कचरा जमिनीवर एका ठिकाणी असू शकतो आणि त्याचा त्रास तुलनेने कमी होतो. पण, हवेत मिसळलेला वायुरूपी कचरा सगळीकडे पसरून अनेकांना त्रासदायक ठरू शकतो. ‘आमच्या इथे केवढं प्रदूषण आहे. तरी आम्ही त्यात जमवून घेतोय, जगतोय,’ असं कौतुकाने सांगितलं जातं. पण या प्रदूषणाचा तुमच्यावर आता परिणाम होत नसला तरी त्यातले घटक तुमच्या शरीरात शिरलेच नसतील असा अर्थ लावणं साफ चूक आहे. ते घटक आत शिरून शांतपणे हळूहळू परिणाम करतात म्हणूनच त्यांना सायलेंट किलर म्हटलं जातं.

प्रत्येकाला स्वत:चं घर अतिशय सुरक्षित वाटतं. प्रदूषणाची धोक्याची पातळी उलटून गेली की, सरकारकडून गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशी आवाहनं केली जातात. पण, घरामध्ये असलेले डास हाकलवायचे कॉईल, झुरळ मारायची औषधं, एअर फ्रेशनर या सगळ्यामुळेही प्रदूषण होतंच. या सगळ्याची माहिती लोकांना देणं, त्यांना जागरूक करणं हेही आवश्यक आहे. आपल्याकडे नेहमी धोक्याची पातळी उलटून गेल्यावरच आवाहनं केली जातात, माहिती दिली जाते, सर्वेक्षण केली जातात. पण, त्याची आवश्यकता पहिल्या पायरीपासून असते हे समजण्याची आता वेळ आली आहे.

वाहनांमधून सोडले जाणारे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजन ऑक्साइड हे घटक उच्च पातळीत असतात. तसंच खराब रस्ते व जीवाश्म इंधनाचं ज्वलन धूलिकणांच्या (पार्टिक्युलेट मॅटर-पीएम) प्रदूषणासाठी जबाबदार असतं. रेस्पिरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर (आरएसव्हीपी) हे माणसाच्या नाकाच्या माध्यमातून शरीराच्या आत शिरू शकणारे कण आहेत. याचं वाढतं प्रमाण अत्यंत धोकादायक आहे. याचा सामना करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावले तरी त्यातूनही आरपार जाऊन शरीरात प्रवेश करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. धुकं, धूर यामध्ये कार्बन मोनाक्सॉइड आणि पार्टिक्युलेट्सचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे अ‍ॅलर्जी, दमा, खोकला, श्वासोच्छवासाचे विकार असे तात्पुरते आजार बळावतात. विशेषत: ऋतू बदलताना हा परिणाम जाणवतो. हे तात्कालिक आजार असतात, पण सतत प्रदूषित हवेत काम करणाऱ्यांच्या फुप्फुसांवर परिणाम होतो. फुप्फुसांची ताकद कमी होते, फुप्फुसाचे गंभीर विकार होतात आणि क्षयरोग बळावण्याची शक्यता असते.

सध्याचा काळ हा ऋतुबदलाचा काळ आहे. म्हणूनच रात्री थंड आणि दिवसा गरम होत असतं. या ऋतुबदलाच्या काळात विषाणूंची संख्या वाढते. त्यामुळे खोकला, सर्दी, ताप असे आजार मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात. दिल्ली, चेन्नई, मुंबई, बंगळूरु अशा मेट्रो शहरांमध्ये प्रदूषण होत असतं. यामध्ये मुंबई आणि चेन्नई ही शहरं समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे तिथे वारा असतो. जमिनीकडून समुद्राकडे आणि समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या शहरांमधलं प्रदूषण वाहून नेलं जातं. हिवाळ्यात वाऱ्यांचा वेग कमी असल्यामुळे त्या वेळी प्रदूषण वाढलेलं असतं. पण आता ऋतु बदलताना वारे वेगात सुरू होतात. सध्याही वारे आहेत. पण तरी प्रदूषणाची तीव्रता जाणवतेय. याचाच अर्थ प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय. वातावरणबदल आणि प्रदूषण एकत्रितपणे परिणाम करतं. वातावरणबदल माणसाच्या हातात नसतो पण प्रदूषणावर नियंत्रण ठेवणं त्याच्या हातात आहे. या वर्षीचा जानेवारी महिना गेल्या ११६ वर्षांमधील आठव्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात कोकणात उष्णतेच्या लहरींचा प्रभाव जाणवला होता. खासकरून रत्नागिरी, वेंगुर्ला, मुंबई, सांताक्रूझ, कुलाबा या भागात हा बदल प्रकर्षांने जाणवला. मराठवाडा आणि विदर्भ या भागात उष्म लहरींचा प्रभाव अजूनतरी जाणवलेला नाही.

मुंबई हवमानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर तापमानबदल आणि प्रदूषण याबद्दल सविस्तर माहिती देतात, ‘एखादा ऋतू सुरू होताना वातावरणातील परिस्थिती जशी असते तशीच परिस्थिती ऋतू बदलतानाही दिसून येते. काही ठिकाणी फेब्रुवारीमध्ये अजून हिवाळा सुरू असतो; तर काही ठिकाणी याच काळात उन्हाळा सुरू होतो. हवामान विभागाने चार मुख्य भाग केले आहेत. त्यांपैकी महाराष्ट्र राज्य मध्य भारतात येतं. मध्य भारतात उन्हाळ्याची सुरुवात फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात होते. महाराष्ट्रातील आतला भाग आणि कोकण किनारपट्टीचा भाग यात असमतोल दिसून येतो. कोकण किनारपट्टीतल्या भागात तापमानवाढ एवढी होत नाही. तर आतला भाग उष्ण होत असतो. देशातील अन्य मुख्य शहरं बघितली तर त्यांपैकी मुंबईला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे मुंबईत त्या मानाने प्रदूषणाचा स्तर दिल्लीइतका गंभीर नसतो. मुंबईत समुद्राकडून जमिनीकडे आणि जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांची प्रक्रिया इतर शहरांमध्ये दिसून येत नाही, पण मुंबईत वाहनांची वाढती संख्या, बांधकाम हे अखंड सुरू असतं. शहराच्या विकासासाठी हे अपरिहार्य असलं तरी त्याच वेळी प्रदूषणासंदर्भात विचार होणं महत्त्वाचं आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये मार्च महिन्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरदेखील गेलेल्याची नोंद आहे. मार्च महिन्याची गणना तीव्र उष्णतेच्या तापमान असलेल्या महिन्यांमध्ये केली जाते. कारण या दिवसांमध्ये वाऱ्यांची दिशा बदलत असते. दिशा बदलण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. नवीन ऋतू स्थिर होईपर्यंत बरेचदा तापमानामध्ये अतिशय तीव्र बदल दिसू शकतात. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वारे स्थिर होतात त्या वेळी तापमानवाढ तुलनेने कमी असते, अशी महत्त्वपूर्ण माहिती होसाळीकर देतात.

air-pollution

प्रदूषणाचा हा व्हायरस आपल्या शरीरात कायमस्वरूपी नको असेल तर त्यासाठी फक्त सरकारला दोष न देता प्रत्येकाने हालचाल करायला हवी. मुळात प्रदूषणाची सुरुवात आपल्यापैकीच कोणी तरी कधी ना कधी तरी करत असतं. प्रदूषण नियंत्रणाकडे सरकार दुर्लक्ष करतं, पण ते वाढू नये यावर नियंत्रण ठेवणं सगळ्यांच्याच हातात आहे. स्मार्ट सिटीची स्वप्न बघताना देखणं शहर, आधुनिक बांधकाम, मेट्रोचं जाळं, प्रशस्त रस्ते या निकषांबरोबरच शहरातलं प्रदूषण हासुद्धा एक निकष असायला हवा. तसंच या स्मार्ट सिटीत राहताना आपण या प्रदूषणाला कारणीभूत ठरत नाही आहोत ना याचं भान ठेवलं तरच खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी झाली असं म्हणता येईल. अन्यथा या स्मार्ट सिटीत शिरलेलं प्रदूषण आपलाच बळी कधी देईल याचा थांगपत्ताही लागणार नाही!

हीट अ‍ॅक्शन प्लॅनची गरज
हवामानशास्त्र विभाग हवामानाबद्दल माहिती आणि हवामानाचे पूर्वानुमान नेहमीच देत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींकडेही या विभागाने लक्ष वळवले आहे. मध्य भारतात आणि उत्तर भारतातील काही ठिकाणी उष्ण लहरींमुळे अनेकांच्या आरोग्याला धोका पोहचलेला आढळून आला आहे. याचा विचार करुन हवमानशास्त्र विभागाने हिट अ‍ॅक्शन प्लॅन (एचएपी) ही योजना राबवायला सुरुवात केली. ही योजना सध्या नागपूर, अहमदाबाद आणि सुरत या शहरांमध्ये राबवली जातेय. उष्ण लहरींमध्ये प्राणहानी टाळावी म्हणून लोकांना हवामानाचे पुर्वानुमान देत त्यासाठी काय काळजी घ्यावी हे या योजनेअंतर्गत दिले जाते. ही योजना महाराष्ट्र शासनाशी जोडली गेली आहे. हवामानशास्त्र विभागाकडून तापमानाबद्दलची संपूर्ण माहिती शासनाला पुरवली जाते. त्यानुसार शासनाच्या आरोग्य विभागातून किंवा वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या दिवसांमध्ये काय काळजी घ्यायची याविषयी माहिती पुरवली जाते. दवाखाने, शाळा, कॉलेज, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायतीची कार्यालय अशा ठिकाणी भित्तीपत्रकं लावली जातात. तसंच उष्ण लहरी असतील तेव्हा काय करावं, काय टाळावं, कशी काळजी घ्यावी याबाबतची माहिती देणारी पत्रकं लोकांना दिली जातात, असं मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर सांगतात. गेल्या दोन वर्षांमध्ये या योजनेचा चांगला प्रभाव दिसून येतोय, असंही ते सांगतात. ओडिसा, रायपूर अशा उष्म लहरींच्या पट्टय़ांमधील शहरेही ही योजना त्यांच्याकडे राबवण्यास तयार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये मराठवाडय़ामधील काही भागांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. तसंच किनारपट्टीवरही उष्ण लहरी दिसून येत असल्यामुळे तिथेही ही योजना राबवण्याचा हवामानशास्त्र विभागाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र शासन आणि हवामानशास्त्र विभागाच्या या जनजागृतीच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही होसाळीकर सांगतात.

राज्यभरातील वायुप्रदूषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११-२०१५ या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, नागपूर, उल्हासनगर, बदलापूर, औरंगाबाद अशा काही शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. यामागे शहरीकरण हे एक महत्त्वाचे कारण म्हणता येईल. पुण्या-मुंबईत मोठय़ा प्रमाणात होणारी बांधकामं, तसंच वाहनांची वाढती संख्या हे घटक या शहरांच्या प्रदूषणात भर घालतात.

ठाणे जिल्ह्य़ातील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही शहरे गेल्या काही वर्षांमध्ये झपाटय़ाने वाढली आहेत. उल्हासनगरमध्ये असलेले उद्योगधंदे, विकासकामे, वाहनांची वाढती संख्या,  विविध ठिकाणी जाळला जाणारा कचरा यामुळे हवा दूषित होते. बदलापूर शहरातील विकासकामे, विविध गृहसंकुलाचे प्रकल्प, त्यासाठीचे खोदकाम, रस्त्यांची कामे यामुळे धुळीचे प्रमाण वाढते. जुनी अवजड वाहने, डिझेल वाहने यांमुळे हवा दूषित होते. उल्हासनगर आणि अंबरनाथ-बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या डम्पिंग ग्राऊण्डमुळेही शहराच्या प्रदूषणात वाढ होते. अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या डम्पिंग ग्राऊण्डला सातत्याने आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळेही पार्टिक्युलेट मॅटर आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण वाढलेले असते.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट व पोलाद उद्योग, कोळसा जाळणे, घनकचरा व्यवस्थापन व सिव्हरेज ट्रीटमेंट प्लान्ट आदींमुळे या शहरातील हवा विषारी झाली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या नवीन ५०० मेगाव्ॉटचे आठ व नऊ क्रमांकाचा संच तितकेच प्रदूषण करत आहे. प्रदूषणासंदर्भातच वेकोलिच्या हिंदुस्थान लालपेठ, दुर्गापूर व नायगांव कोळसा खाणीला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे. सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या धारिवाल व मल्टी ऑरगॅनिक या दोन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली. १५ कोल डेपोंना क्लोजरच्या नोटीस बजावण्यात आल्या. माणापुरे हॉट मिक्स प्लान्ट व चिद्रावार कन्स्ट्रक्शन यांनाही नोटिसेस दिल्या गेल्या आहेत.

सोलापूरमध्ये दर वर्षी जानेवारी महिन्यात एका मैदानात होणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेच्या वेळी त्या मैदानावर ३००-४०० स्टॉल्स असतात. हजारो जणांचा वावर असतो. त्यामुळे तिथे धुळीचं साम्राज्य असतं. गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत प्रस्ताव मांडला होता परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदा पाणी मारून धूळ खाली बसवण्याचा प्रयत्न केला गेला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. सोलापूरमध्ये रस्त्यांची कामंही सुरू आहेत. जुन्या बस, रिक्षा आणि ट्रक यांचं प्रमाणही शहरात जास्त आहे. जुन्या वाहनांमुळे प्रचंड धूर निर्माण होतो आणि प्रदूषण होते. सोलापूरमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. कोल्हापुरामध्ये सांडपाण्याचं प्रमाण वाढल्याने डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. वाहनांमुळे होणारं प्रदूषण गंभीर स्वरूपाचं आहे.

औद्योगिकीकरणात पर्यावरणाशी निगडित नियमांकडे झालेले दुर्लक्ष, एकलहरे औष्णिक वीज केंद्रातून होणारे घातक वायूंचे उत्सर्जन आणि या प्रकल्पामुळे उभा राहिलेला ‘फ्लाय अ‍ॅश’चा प्रश्न, वाहनांची वाढती संख्या अशा विविध कारणांमुळे नाशिकचे नाव प्रदूषित शहरांच्या यादीत अधोरेखित होत आहे. मध्यंतरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लेटिंग व पावडर कोटिंगशी निगडित सुमारे ५० उद्योग बंद करण्याची कारवाई केली होती. निकषांचे पालन करण्याची हमी दिल्यानंतर या उद्योगांवरील र्निबध मागे घेण्याचे मंडळाने सूचित केले आहे. शहरालगतच्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत ९५ मोठे, ४० ते ५० मध्यम आणि दोन हजार लहान कारखाने आहेत. त्यातील काही कारखान्यांकडून जलप्रदूषण आणि काही कारखान्यांकडून हवाप्रदूषण होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. काही कारखाने दूषित पाणी (रासायनिक पाणी) कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडतात. नंतर ते पाणी थेट गोदावरीत मिसळते. महापालिकादेखील गटारीचे पाणी याच पद्धतीने थेट गोदापात्रात सोडते. या प्रश्नावरून पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गोदावरीला प्रदूषणाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी न्यायालयाने महापालिका व जिल्हा प्रशासनाला वारंवार धारेवर धरले आहे. हवेतील प्रदूषणाला एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रही हातभार लावत आहे. वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळल्याने मोठय़ा प्रमाणात होणारे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन प्रदूषणकारी आहे. या प्रकल्पांमुळे ‘फ्लाय अ‍ॅश’ची विल्हेवाट लावण्याची दुसरी समस्या भेडसावत आहे. वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून सद्य:स्थितीत १४ लाख ४५ हजार ८७४ वाहने जिल्हय़ात असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली. या वाहनांमधून बाहेर पडणारा सल्फर डाय ऑक्साइड, ऑक्साइड ऑफ नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय ऑक्साइड आदी वायू शहरातील प्रदूषणाची पातळी वाढवीत आहे.

औरंगाबादमध्ये टायरचं उत्पादन करणारे दोन कारखाने आणि चॉकलेट बनवणाऱ्या एका एक कंपनीतून सोडले जाणारे विशिष्ट वायू मोठय़ा प्रमाणावर हवा प्रदूषित करत होते. त्यामुळे संबंधित कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. शिवाय रस्त्यांच्या कामांमुळे धूळ आणि त्यामुळे वायूप्रदूषणाचं प्रमाणही वाढलं होतं. पण आता रस्त्यांची कामं पूर्ण होत आली आहेत. आता तापमान अचानक वाढल्यामुळे उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. या काळात इथे साधारणपणे तापमान ३० अंश सेल्सिअस इतकं असतं. पण, सध्या ते ३५-३६ इतकं आहे. त्यामानाने कोकणात प्रदूषण नाही. पण, तेथे एप्रिलच्या दरम्यान जितका उन्हाळा असतो तितका फेब्रुवारी महिन्यात जाणवत होता. कोकणात गेल्या काही वर्षांपासून हवामानबदल अनुभवायला मिळत आहे. त्याचा फटका काही प्रमाणात आंबा उत्पादकांना बसतोय. पूर्वी फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान तापमान ३३-३५ अंश सेल्सिअस इतकं असायचं. या वर्षी ते ३७ ते ३८ अंश सेल्सिअस इतकं झालं आहे.
– एजाज हुसेन मुजावर, रवींद्र जुनारकर, सुहास सरदेशमुख, संपदा सोवनी, सागर नरेकर, अनिकेत साठे 

प्रदूषण- शहरी अपरिहार्यता
प्रदूषणाचे चार-पाच प्रकार सर्वाच्याच परिचयाचे असले तरीही हवेचे प्रदूषण सर्वात चटकन जाणवते; कारण श्वासाशिवाय कुणीही मनुष्य किंवा प्राणी जगूच शकत नाही. ऋ तुमानाप्रमाणे डोळ्यांचे किंवा श्वसनाचे आजार कमी-अधिक प्रमाणात आपणा सर्वानाच दर वर्षी होत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत वृद्धांनाच नव्हे तर बालकांनादेखील अस्थमा (दमा) व त्या वर्गातले फुफ्फुसाचे विकार जास्त जणांना व जास्त गंभीर प्रमाणात होताना दिसत आहेत. या आव्हानांची उकल करताना हवामान बदलापेक्षाही महत्त्वाचा घटक आहे ‘हवेचे प्रदूषण’. शहरी वातावरणात श्वास घेणारा कोणताही जीव या प्रश्नापासून पळून जाऊ शकत नाही. हवेचे प्रदूषण सगळ्या हवेत सर्वदूर पसरते व प्रदूषण करणाऱ्यापासून ते प्रदूषणाशी मुळीच संबंध नसलेल्या निष्पाप जिवांना सारख्याच प्रमाणात हानी पोहोचवते. आज आपण ज्या प्रकारचे प्रयत्न करतो आहोत त्यामध्ये मोठय़ा कारखान्यातून उत्सर्जित होणारे वायुप्रदूषण कमी होत आहे. मात्र मध्यम व लहान आकाराचे असंख्य कारखाने व देशभरातील करोडो चार चाकी व दुचाकी वाहनांमधून बाहेर पडणारा धूर अजूनही आपण नियंत्रणाखाली आणू शकलेलो नाही. या प्रकारात अतिप्रचंड कार्बन मोनॉक्साइड, सल्फर व नायट्रोजन ऑक्साइड तसेच अतिसूक्ष्म धूलिकण व तऱ्हेतऱ्हेचे वायुप्रदूषण (सॉल्व्हंट, विषारी रसायने) यांचा समावेश होतो. उघडय़ावरची विष्ठा व कुजणारा नागरी घनकचरा यांच्यामुळेसुद्धा रोगजन्य जिवाणूदेखील हवेने एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. पेटलेल्या घनकचऱ्याचे आगीमुळे होणारे हवेचे प्रदूषण व शहरात सर्वत्र पसरलेली दरुगधी हेदेखील नागरी हवा-प्रदूषणाचे प्रश्न अद्याप सोडवलेले नाहीत.
– डॉ. श्याम आसोलेकर, प्राध्यापक, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, आय.आय.टी. मुंबई 

असा असेल उन्हाळा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मार्च ते मे या कालावधीसाठी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजात यंदा बहुसंख्य राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवेल. त्यामुळे येणारा तीन महिन्यांचा काळ हा उष्णच असणार आहे. विदर्भ, मराठवाडा यांसारख्या राज्यातील आतील भागातील ठिकाणी तीव्र उष्ण लहरी असतील, असं पूर्वानुमान हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आले आहे. किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये मात्र तुलनेने उष्ण लहरी फारशा जाणवणार नाहीत. फेब्रुवारीमध्ये अशा प्रकारचं तापमान अनुभवायला मिळालं होतं. फेब्रुवारीमध्ये घडलेला तापमानातील हा बदल कधी तरीच होणारा असला तरी लक्षवेधी ठरला आहे. तसंच किनारपट्टीसुद्धा आता तापायला लागली आहे, हाही एक अभ्यासाचा विषय असल्याचं कृष्णानंद होसाळीकर सांगतात. ऋतुबदलाच्या वेळी वाऱ्यांची दिशा बदलते. वाऱ्यांच्या दिशा बदलल्यामुळे तापमानात चढउतार दिसून येतात. येत्या काही दिवसांमध्ये ईशान्य दिशेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणारे वारे उष्ण असतील. महाराष्ट्राचं सरासरी तापमान मार्च ते मे महिन्यात सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस जास्त असण्याची शक्यता आहे.
चैताली जोशी – @chaijoshi11
response.lokprabha@expressindia.com

Story img Loader