lp08सीईएस म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन. नववर्षांतील नावीन्यपूर्ण उत्पादने इथे पाहायला मिळतात.  साहजिकच जगाचे लक्ष या प्रदर्शनाकडे असल्याने इथे लोकप्रियता लाभलेली उत्पादने जगभरात लोकप्रिय होण्यास वेळ लागत नाही. यंदाच्या प्रदर्शनाचा हा फेरफटका.

थ्रीडी प्रिंटर्स, वेअरेबल्स (अंगावर वागवण्या किंवा वापरण्याजोगे) ड्रोन्स, हेडसेटस, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) च्या माध्यमातून तयार केलेले फ्रीज, टकलावर केस उगवण्यासाठीचा उपचार असलेले हेल्मेट अशा नानाविध गोष्टींचा समावेश हा यंदाच्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शोचा (सीईएस) विशेष होता. नवीन वर्षांची सुरुवात झाली की, त्याचबरोबर जगभरातील सर्व तंत्रप्रेमींना सीईएसचे वेध लागतात. सीईएस म्हणजे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ाअखेरीस प्रतिवर्षी अमेरिकेत लाग वेगास या ठिकाणी हे प्रदर्शन पार पडते. त्या त्या वर्षांतील नावीन्यपूर्ण उत्पादने इथे पाहायला मिळतात. साहजिकच जगाचे लक्ष या प्रदर्शनाकडे असल्याने इथे लोकप्रियता लाभलेली उत्पादने जगभरात लोकप्रिय होण्यास वेळ लागत नाही. यंदाचे हे प्रदर्शन गेल्याच आठवडय़ात पार पडले.

१९६७ साली न्यूयॉर्कमध्ये सर्वात पहिल्या सीईएसचे आयोजन करण्यात आले होते. खरे तर एक म्युझिक शो हे त्याचे निमित्त होते. पण नंतर त्या त्या वर्षांतील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवे उत्पादन सीईएसमध्ये सादर करण्याचा पायंडाच जगभरात पडला, तो आजतागायत सुरूच आहे. मध्यंतरी हा शो वर्षांतून दोनदा करण्यात आला. मात्र नंतर गेल्या काही वर्षांत तो पुन्हा एकदाच आणि तोही जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात लास वेगासलाच निश्चितपणे होतो. आता केवळ या शोसाठी जगभरातून लास वेगासला येणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे.

तळहातावर मावणाऱ्या आणि सेल्फी टिपणाऱ्या ड्रोनपासून ते तब्बल १०० किलोवजनाच्या माणसालाही त्यात बसवून सैर करायला लावणाऱ्या ड्रोनपर्यंत सारे काही.. पण एवढेच नव्हे, तर कदाचित नानाविध चमत्कृतींनी भरलेले प्रदर्शन असेच वर्णन यंदाच्या सीईएस अर्थात कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोचे करावे लागेल. कारण यात केवळ ड्रोनच नव्हेत तर अगदी तुमच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या, तुमच्या हृदयाचे ठोके  मोजणाऱ्या आणि त्याचवेळेस खाणे थोडे अधिक होते आहे, असे लक्षात आल्यानंतर तुम्हाला इशारा देणाऱ्या तुमच्या अंगावरील कपडय़ांपर्यंत सारे काही या शोमध्ये आकर्षणबिंदू ठरले होते.

या शोमध्ये यंदा सर्वाधिक पसंती मिळाली ती इहँग या चिनी कंपनीने तयार केलेल्या ड्रोनला. आजवर मानवरहित हेलिकॉप्टरप्रमाणे ड्रोनचा वापर केला जात होता. त्याची सुरुवात ही गोपनीय माहिती मिळविण्यासाठी संरक्षण क्षेत्रात झालेली असली तरी अमेझॉनसारख्या कंपन्यांनी ग्राहकांना वस्तू पोहोचवण्यासाठीही त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. आता इहँगने तयार केलेले ड्रोन हे चक्क १०० किलो वजनापर्यंतच्या lp09एका माणसाला सुमारे ३० किलोमीटर्सपर्यंतचा प्रवास घडवून आणण्याची क्षमता राखते. सुमारे दोन तास चार्जिग केल्यानंतर ते प्रतितास ६० किलोमीटर्स या वेगाने २३ मिनिटे प्रवास करू शकते.

ड्रोनमधील सर्वात मोठे मॉडेल जसे या सीईएसमध्ये सादर झाले तसे तळहातावर मावू शकेल एवढय़ा आकारातील पाच इंच बाय अडीच इंचाचे सेल्फी ड्रोनही इथे सादर झाले. हवेत उडवायचे की, ते उडू लागते आणि मग तळहातावर येऊन विसावते, असे हे ड्रोन स्मार्टफोनद्वारे नियंत्रित करता येते. त्यावर १५ मेगापिक्सेलचा कॅमेरा बसविण्यात आला आहे. १०८०पी एचडी व्हिडीओ चित्रण प्रतिसेकंद ३० फ्रेम्स या गतीने करण्याची सोयही यामध्ये आहे.

योगा टॅब्लेट कम लॅपटॉप्स बाजारात आणून गेल्या वर्षीचे आकर्षण ठरलेल्या लिनोवो या प्रसिद्ध कंपनीने यंदा रिमोट कंट्रोल कम माउस असे नवे उत्पादन सादर केले. हा माउस त्याच्या योगा या नावाप्रमाणे वेगवेगळे आकार धारण करतो. तो सरळ आकारात असताना सादरीकरणापासून ते तुमच्या घरातील उपकरणांपर्यंत अनेक गोष्टींसाठी त्याचा वापर रिमोट कंट्रोल म्हणून करता येतो; तर एरवी आकारामध्ये बदल करून माउस म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ  शकतो. यातील रिचार्जेबल सेल्स महिनाभर चालतात.

वेअरेबलच्या क्षेत्रात या वेळेस अनेक प्रयोग इथे पाहायला मिळाले. त्यात आरोग्यासंदर्भात काळजी घेणारे स्मार्ट शर्ट अनेकांचे आकर्षण होते. हृदयाच्या नोंदींपासून ते खाण्यापिण्यामधील कॅलरीजपर्यंत सारे काही या शर्टला समजते आणि तुम्ही शर्टच्या आदेशाचे पालन केले नाहीत तर इशाराही मिळतो शर्टकडून.

वेअरेबलमधील दुसरे आकर्षण ठरले ते स्पोर्टस शूज. डिजिटसोल या कंपनीने हे शूज बाजारात आणले असून त्याचे नियंत्रणही तुम्हाला स्मार्टफोनद्वारे करता येते. पाय आत सरकवल्यानंतर हे शूज तुमच्या पायाच्या रचनेनुसार आकार धारण करतात. शिवाय बराच काळ शूज पायात राहिल्याने पाय आंबल्यासारखे वाटत असेल तर शूजमधील तापमान कमी-अधिक करण्याची सोयही यात आहे. शिवाय कॅलरीमीटरपासून ते इतर अनेक गोष्टी यामध्ये आहेत.

कमरपट्टाही आता स्मार्ट झालाय. तो तुमच्या पोटाचा वाढत जाणारा घेरही मोजतो आणि त्याचवेळेस तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून कॅलरीज मोजण्याचेही काम करतो. व्यायाम करण्याची आठवणही वेळोवेळी करून देतो. आता तो आरोग्यरक्षक पट्टा ठरला आहे. त्यामध्ये बसविण्यात आलेल्या वेगवेगळ्या सेन्सर्सच्या मदतीने हे साध्य केले जाते.

स्काइप सादर झाले त्यावेळेस लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याचप्रमाणे यंदाच्या सीईएसमध्ये तुमचे बोलणे जगभरातील नऊ भाषांमध्ये अनुवादित करणारा तुमच्या गळ्यातील ताइताच्या आकाराचा अनुवादकही यंदाचे विशेष आकर्षण ठरला. याशिवाय आणखी दोन गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले, ते म्हणजे सादरीकरणाची क्षमता असलेले घडय़ाळ आणि मिनी कॉम्प्युटर. या घडय़ाळाच्या एका बाजूस असलेली कळ दाबली की, समोरच्या भिंतीवर सादरीकरण सुरू करता येते. घडय़ाळ्यामध्येच बसविलेल्या प्रोजेक्टरमधून प्रकाशझोत येतो, तर मिनी कॉम्प्युटरदेखील तळहातावर मावेल एवढय़ाच आकाराचा आणि गोलाकार आहे. त्यामध्येही अशाच प्रकारे प्रोजेक्टरची सोय आहे. शिवाय यूएसबी जोडणीची सोयही त्याला देण्यात आली आहे. त्याप्रमाणे त्याची जोडणी वायरलेस पद्धतीने इतर उपकरणांशीही करण्याची सोय आहे. सॅनडिस्कने बाजारात आणलेला यूएसबी यंदा सर्वाधिक लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. कारण हा कोणत्याही उपकरणाला थेट न जोडता, खिशात ठेवूनच वायरलेस पद्धतीने जोडला जाऊ शकतो. म्हणजे फाइल्स ट्रान्स्फर करताना जोडणी करत बसण्याचा खटाटोप टाळता येईल.

याशिवाय सोनीने बाजारात आणलेला फोरके एचडीआर अल्ट्रा एचडी टीव्ही, एलजीने बाजारात आणलेला घडी घालून ठेवता येईल किंवा गोलाकारात गुंडाळता येईल असा सादर केलेला स्क्रीन यांचीही चलती या शोमध्ये होती. पण त्याहीपेक्षा अनेकांचे लक्ष वेधून घेतले ते कोडॅकच्या सुपर ८ या कॅमेऱ्याने. डिजिटल कॅमेऱ्यामुळे फिल्म रोल असलेले कॅमेरे बाद झाले असे वाटत असतानाच आता डिजिटलचे गुणविशेष घेऊन तयार झालेला पहिला फिल्म कॅमेरा कोडॅकने बाजारात आणला आहे. डिजिटलची सद्दी सुरू झालेली असली तरी फिल्म कॅमेऱ्याच्याच दर्जाचे प्रतिमांकन आजही मिळत नाही, असे वाटणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा कॅमेरा चांगला ‘क्लिक’ होणे अपेक्षित आहे.

..पण या साऱ्या टेक्नो मांदियाळीमध्ये जगभरातील अनेकांचे कान टवकारले आहेत ते एका हेल्मेटच्या दिशेने. अर्थात आहेच ते आगळेवेगळे, टकलावरचे गेलेले केस परत आणणारे! टक्कल असणाऱ्याचीही संख्या वाढल्याने या हेल्मेटला उठाव असेल असे ते तयार करणाऱ्या कंपनीला वाटते. हे हेल्मेट घालून रोज २५ मिनिटे बसायचे. दरम्यान, त्याला जोडलेल्या इअरफोनमधून गाणीही ऐकू शकता. याच काळात त्यातील लहानशा पोकळ्यांच्या माध्यमातून तुमच्या डोक्यावर औषधोपचार केले जातील. आणि नऊ महिन्यांच्या उपचारानंतर केस परत येऊ  लागतील. २०१६ हे वेअरेबलचे वर्ष असणार असे म्हटले जाते, त्यात तथ्यही आहेच. पण इथे लास वेगासमध्ये चर्चा अशी होती की, टकलावरच्या वेअरेबलचीच या वर्षी सर्वाधिक चलती असणार!
वैदेही – response.lokprabha@expressindia.com