तांत्रिकदृष्टय़ा दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते.
मध्ययुगीन भारतामध्ये अनेक नव्या संप्रदायांचा उदय झाला. त्यापैकी नाथ संप्रदाय हा एक प्रमुख आणि महत्त्वाचा संप्रदाय होय. या संप्रदायाचा उद्गम नेमका कसा, कोठे आणि कधी झाला याविषयी अनेक संशोधकांनी विविध मते मांडली आहेत. त्याविषयी माहिती घेण्यापूर्वी नाथांच्या संप्रदायाची पाश्र्वभूमी पाहणे आवश्यक आहे.
इसवी सनाच्या प्रारंभापासून नवव्या-दहाव्या शतकापर्यंतच्या सुमारे हजार वर्षांच्या काळात शैव, वैष्णव, बौद्ध, जैन असे अनेक संप्रदाय भारतामध्ये नांदत होते. पाचव्या शतकानंतरचा इतिहास पाहता असे दिसते की, शैवांच्या श्रीकुल आणि कालीकुल या दोन्ही शाखांमध्ये आणि बौद्धांच्या महायान पंथातून पुढे आलेल्या वज्रयान अथवा तंत्रयान परंपरेमध्ये अनेक वाममार्गी साधना पद्धतींचा अंतर्भावही हळूहळू होऊ  लागला. श्रीशैल हे अशा तांत्रिक साधनांचे ख्यातकीर्त केंद्र असल्याचे रा. चिं. ढेरेंसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. या पंथांमधूनच स्वतंत्र होत होत सिद्ध परंपरेचा जन्म झाला, ज्यामध्ये अशा तांत्रिक आणि वामाचारी उपासना पद्धतींना फाटा देऊन, बाह्य़ाचारावर भर न देता तत्त्वानुभूती, भक्ती, योग इत्यादी साधनांवर भिस्त ठेवून मोक्षमार्गाची वाट चोखाळणारा सिद्ध संप्रदाय विकसित झाला.
सिद्धांच्या या संप्रदायामध्ये जे दीक्षित असत, त्यांना मुख्यत्वेकरून ‘नाथ’ या विशेषणाने संबोधले जात असल्याचे आढळते. महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र प्रदेश हा प्रांत जरी या संप्रदायाची उदयभूमी मानला, तरी नाथ संप्रदायाचे अनुयायी संपूर्ण भारतभरातच नव्हे, तर भारताच्या आधुनिक सीमांच्या बाहेर असणाऱ्या प्रदेशातही पसरले होते असे म्हणावे लागेल. नाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टय़ा जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. नाथांच्या परंपरेमध्ये अनेकदा हा संप्रदाय म्हणूनच नाथमत, अवधूतमत, अवधूत संप्रदाय, सिद्धमत इत्यादी नावांनी देखील ओळखला गेला आहे.
नाथांची परंपरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाथांच्या तीर्थक्षेत्रापैकी एक महत्त्वाचे स्थान – गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर

नवनाथांना परंपरेने नवनारायणांचे अवतारस्वरूप मानण्यात येते. पुराणांमध्ये उल्लेख केलेल्या कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविहरेत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन या नऊ  नारायणांनीच कलियुगामध्ये नवनाथांच्या रूपाने अवतार घेतला. नाथपरंपरेतील एका सांप्रदायिक श्लोकामध्ये नऊ  नाथांची नावे पुढीलप्रमाणे सापडतात-
गोरक्ष – जालंदर – चर्पटाश्च अडबंग – कानिफ – मच्छिन्दराद्य:।
चौरंगी – रेवाणक – भत्र्रीसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा:।।
मात्र या श्लोकामध्ये ग्रथित नसलेली अशी नागनाथ, गहिनीनाथ, शिवनाथ, मीननाथ, सत्यनाथ इत्यादी अनेक नावे नवनाथांपैकी असल्याचे नाथ परंपरेतील ग्रंथ सांगतात. नाथांच्या मूळ परंपरेत एकदा नऊ  ही संख्या महत्त्वाची म्हणून रूढ झाल्यानंतर मग वेगवेगळ्या ग्रंथकाराने त्याला महत्त्वाचे वाटले ते नऊ  नाथ नवनाथ म्हणून वर्णिले असावेत, एवढेच स्पष्टीकरण या नामभिन्नतेकरिता देणे शक्य आहे.
नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येन्द्रनाथ (मच्छिन्द्रनाथ) आणि गोरक्षनाथ या गुरुशिष्यांचे नाव घ्यावे लागेल. या दोहोंचा जन्म, त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयांशी संबंधित अनेक कथाही जनमानसात प्रचलित आहेत. मत्स्येन्द्रनाथांनी त्यांच्या मासळी- आईच्या पोटात असतानाच शिव-पार्वती संवाद दैवयोगाने कानी पडल्यावर प्राप्त  करून घेतलेले ज्ञान, गाईच्या शेणाच्या ढिगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म, मत्स्येन्द्रांना खाव्याशा वाटलेल्या वडय़ाकरिता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा काढून देऊन दाखविलेली पराकोटीची गुरुभक्ती, मंत्रजप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म अशा त्यांच्या असंख्य कथा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्या आहेत.
नवनाथांच्या परंपरेमध्येच आपल्याला चौऱ्याऐंशी सिद्धांचा उल्लेख सापडतो. ही ८४ सिद्धांची कल्पना मूलत: वज्रयान परंपरेतील आहे. संशोधकांचे असे मत आहे की, बौद्ध धर्माच्या ऱ्हासाच्या काळात गोरक्षनाथांच्या प्रभावाने अनेक बौद्धानुयायी ज्या वेळी नाथपंथात सामील झाले, त्या वेळी त्यांच्याकडील ८४ सिद्धांची ही संकल्पना नाथांकडे रूढ झाली असावी. या सिद्धांची देखील विस्तृत नामावली उपलब्ध असून त्यापैकी ८४ सिद्ध नेमके कोणते, याबद्दल मितभिन्नता आढळते. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, नवनाथांचा संप्रदाय अनेकांनी स्वीकारून सिद्धपद प्राप्त केले. या सिद्धांकडून आणि त्यांच्या शिष्यांकडून विविध लोकांना सांप्रदायिक उपदेश मिळाला आणि यातून पुढे नाथ संप्रदायातील अनेक गुरु-शिष्य परंपरांचा जन्म झाला. यातील काही परंपरांमध्ये प्रामुख्याने मंत्र-तंत्रविषयक ज्ञान आहे. काही परंपरा तत्त्वज्ञानप्रधान असून त्यामध्ये योग आणि ध्यान या उपासना पद्धतींचा अवलंब केला जातो. महाराष्ट्रातील भक्तीमार्गातही नाथ परंपरा रुजली असून अनेक भक्त मंडळी गुरूपदिष्ट मार्गाने नामसंकीर्तन, गुरुपूजन इत्यादीद्वारे मोक्षप्राप्ती करून घेण्याची मनीषा बाळगतात.
सांप्रदायिक सिद्धांत, आचार आणि महत्त्वाची स्थळे
  आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे सिद्धमत अथवा अवधूतमत या नावानेही प्रसिद्ध असलेल्या नाथ संप्रदायामध्ये आदिनाथ शिवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काश्मीर शैव परंपरेतून आलेल्या सिद्धांताशी मिळतीजुळती मांडणी आपल्याला नाथ संप्रदायामध्ये पाहावयास मिळते. योगमार्गाचा अवलंब प्रधान असल्याने योगशास्त्रातील अनेक संकल्पनाही या संप्रदायात रूढ झाल्या आहेत. नाथांच्या सांप्रदायिक सिद्धांतांची माहिती देणारा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे गुरू गोरक्षनाथ विरचित सिद्धसिद्धांत पद्धती. या संस्कृत भाषेतील ग्रंथाच्या प्रारंभीच ग्रंथकर्त्यांने शक्तीसह विद्यमान शिवास वंदन केले आहे-
आदिनाथं नमस्कृत्य
शक्तियुक्तं जगद्गुरुम्।
वक्ष्ये गोरक्षनाथोऽहं
सिद्धसिद्धान्तपद्धतिम्।।
या सिद्धांतामध्ये शक्ती जरी स्वतंत्र नसून शिवातच अंतर्भूत आहे. किंबहुना शिवातील इकार म्हणजेच शक्ती होय. असे असले तरी तिचे महत्त्व मात्र पुष्कळ आहे. कारण शिव या शक्तीमुळेच या ब्रह्माण्डाची उत्पत्ति-स्थिति-विलय नियन्त्रित करतो. शक्तिविना शिव म्हणजे शव होय.
चंद्रचंद्रिकान्यायाने शिव आणि शक्ती एकमेकांपासून अभिन्न असतात. शक्ती व्यक्त स्वरूपात असताना शिव सृष्टीच्या निर्मिती, स्थिती अथवा लयाचे कार्य करतो. ती जेव्हा अव्यक्त असते, तेव्हा त्या दोहोंमध्ये मात्र कोणताही भेद दिसून येत नाही. म्हणजेच त्याचे स्वरूप एकमेव, अद्वय असे असते. मराठी भाषेतील पिण्डी ते ब्रह्माण्डी या न्यायासारखाच जे जे ब्रह्माण्डात (जगतात) आहे, ते ते सर्व पिण्डात (देहात) देखील आहे, असा सिद्धांत गुरू गोरक्षनाथ सांगतात.
मानवी देहामध्ये कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध असणारी ही शक्ती साडेतीन वेटोळी घालून अधोमुखी होऊन बसलेल्या नागिणीच्या रूपाने मेरुदण्डाच्या मुळाशी सुप्तावस्थेत विद्यमान असते. तिचे मस्तकातील सहस्ररचक्रात निवास करणाऱ्या शिवाशी मीलन व्हावे याकरिता गुरुकृपेची आणि साधनेची आवश्यकता असते. शरीरात लहान-मोठय़ा अशा बहात्तर हजार नाडय़ा आहेत. त्यापैकी श्वासोच्छ्वास मार्गाशी आणि मेरुदण्डाशी संबंधित तीन महत्त्वाच्या नाडय़ा इडा, पिंगला आणि सुषुम्ना या होत. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर यांतील सुषुम्नेमधून वर धाव घेते. मुळात जन्मोजन्मीच्या कर्मबंधनांमुळे शरीर मलिन झालेले असते, आणि या नाडय़ा मलाने भरल्याने संचारास उपयुक्त नसतात. योगमार्गात वर्णन केलेल्या बस्ती, धौती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती या षट्क्रियांद्वारे ज्या वेळी मनुष्य शरीरातील नाडय़ांना मलापासून मुक्त करून घेतो, त्या वेळी कुंडलिनी जागी होते. मूलाधारचक्रापासून वर जात जात शेवटी आज्ञाचक्र पार करून ती सहस्ररचक्रात पोहोचते, त्या वेळी साधकास आत्मानुभूती प्राप्त होते आणि कैवल्याचा अनुभव येतो. या सर्व गोष्टी घडत असताना योग्य दिशेने प्रगती करण्याकरिता साधकास गुरूच्या देखरेखीची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे यामध्ये साहजिकच गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
नाथ संप्रदायातील गुरू-शिष्याला उपदेश करताना त्यास कर्णमुद्रा धारण करायला लावतो आणि त्याचा कान उघडतो-फाडतो, त्यावरून कानफाटा असे नांव या संप्रदायातील लोकांना पडले आहे. अनुयायांनी विशिष्ट प्रकारची वेशभूषा करणे अपेक्षित असते. कर्णमुद्रा, शैली, शृंगी, झोळी, कंथा, एकतारी, पुंगी इत्यादी वस्तू हे गुरू धारण करतात. नियमित स्नान करून अंगास विभूती फासणे आवश्यक असते. ‘अलख निरंजन’चा गजर करून भिक्षा मागणे आणि ‘आदेश’ शब्दाने इतरांशी अभिवादनादी क्रिया करणे असे प्रघात यांच्यामध्ये आढळतात.
असे असले, तरी केवळ बाहय़ वेश महत्त्वाचा नाही, असे नाथपंथातील ग्रंथांमधून अनेक वार सांगितलेले आढळते. या धारण करावयाच्या वस्तूंमागेसुद्धा काही विशिष्ट तत्त्वज्ञान असून, ते समजून त्याचे आचरण करणे हे सर्वात महत्त्वाचे होय.
यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे शिव आणि दत्तात्रेय ही नाथ संप्रदायातील महत्त्वाची दैवते होत. याशिवाय ज्या विविध संप्रदायांनी नाथांचा मार्ग अनुसरला त्यांनी प्राय: आपापली दैवतेही सोबत आणली असावीत. त्यामुळेच बहुधा, इतर अनेक देवतांच्या मंत्रांचा समावेश नाथपरंपरेत झाल्याचे आढळते. दुर्गा, भैरव, नरसिंह, राम, हनुमान अशा अभिजनांच्या दैवतांसोबतच लोकधर्मातील म्हसोबा, वेताळ यासारख्या दैवतांचा, तसेच मुस्लीम पीर आणि फकिरांचा उल्लेख असणारे अनेक मंत्र नाथपरंपरेत सापडतात. ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली अगर त्यांनी मठ स्थापिले ती ठिकाणे नाथांची तीर्थक्षेत्रे असून नाथपरंपरेतील जोगी अशा ठिकाणची यात्रा करतात. त्र्यंबकेश्वर, द्वारका, पुष्कर, रामेश्वर, हिंगळजा, गिरनार, गोरखपूर, पैठण अशी असंख्य ठिकाणे नाथांशी संबंधित असल्याचे प्रसिद्ध आहे. नाथ परंपरेमध्ये एकूण १२ पंथ विद्यमान असून त्यातील काही आदिनाथाने प्रवर्तित केले तर काही गोरक्षनाथांनी, अशी मान्यता आहे.
महत्त्वाचे सिद्ध
नाथांच्या परंपरेत असंख्य सिद्ध आणि साधक होऊन गेले आहेत. त्यातील काही सिद्धांचा परिचय या ठिकाणी आपण करून घेऊ. मत्स्येन्द्रनाथ अथवा मच्छिन्द्रनाथ हे परंपरेनुसार नाथसंप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. मासळीच्या पोटात असतानाच त्यांनी शिवाने पार्वतीला केलेला उपदेश ऐकल्याचे मानले जाते. शाक्तसंप्रदायातील एक महत्त्वाचा पंथ जो कौलमार्ग या नांवाने विख्यात होता, त्याचे अनुयायी मच्छिन्द्रनाथ होते, असे विद्वानांचे मत आहे. त्यांच्या नांवावर कौलनिर्णय नांवाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. या ग्रंथातून असे दिसते की, सिद्धांत म्हणून जरी शिव-शक्तीवर आधारित विचार मान्य असला तरी हठयोगावर आधारित आसन- प्राणायाम- चक्रध्यान इत्यादी मार्गाने जाऊन कुंडलिनी जागृती साधणे सर्वसामान्यांकरिता आवाक्याबाहेरचे ठरते. त्यामुळे आचरण्यास सोप्या अशा सहजयोगाची कास धरणे योग्य होय. नामस्मरण आणि ध्यानसाधना या दोहोंच्या साहाय्यानेही कुंडलिनीजागृती करून घेता येते, असे सहजयोग सूचित करतो.
चौरंगीनाथ हे असेच प्रसिद्ध नाथ होत. नवनाथभक्तिसार या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये त्यांचे चरित्र सांगितले आहे. विदर्भ देशाचा राजकुमार म्हणून जन्माला आला असूनही सावत्र आईच्या दुष्कृत्यामुळे त्यास वडिलांकडून हातपाय तोडून टाकण्याची शिक्षा मिळाली. गोरक्ष आणि मच्छिन्द्रनाथांनी त्यास उचलून आणले आणि त्याच्याकडून तपाचरण करवून घेऊन त्यास गुरुपदेश दिला. चौरंगीनाथांचा उल्लेख तिबेटी परंपरेतही केला जातो.
चर्पटीनाथ हे असेच एक प्रसिद्ध सिद्ध होत. त्यांच्या काही रचनांमध्ये त्यांनी स्वत:स गोपीचंदाचा बंधू म्हटले आहे. ‘नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथामध्ये मात्र चर्पटीनाथ ब्रह्मदेवाचे पुत्र असून त्यास प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी उपदेश केल्याची कथा सापडते. जालंदरनाथ हे मच्छिन्द्रनाथांचे गुरुबंधू आणि थोर सिद्ध होते. नवनाथांची कोणतीही नामावली पाहिली तरी त्यामध्ये यांचा उल्लेख निश्चित असतो. वज्रयान परंपरेतील ग्रंथ, शिवदिनमठसंग्रह, तत्त्वसार, हठयोगप्रदीपिका, योगवासिष्ठ अशा इतरही अनेक ग्रंथांमध्ये यांचे नाव आदराने घेतल्याचे दिसून येते. ते मूळचे जालंदरचे असण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावरून त्यांचा जन्म यज्ञातून झाल्याची कथा प्रसृत झाली, असेही काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. परंपरेप्रमाणे कानिफनाथांना जालिंदरनाथांनी अनुग्रह दिला होता.
नवनाथांमधील सर्वात प्रसिद्ध सत्पुरुष म्हणजे गोरक्षनाथ. गोरक्षनाथांशी संबंधित कथा आणि स्थाने भारतभरात, तसेच आसपासच्या नेपाळ आणि तिबेटसारख्या देशांतही आढळतात. त्यांनी नाथपंथाची धुरा वाहत भारतभर भ्रमण करून हा संप्रदाय सर्वदूर पोहोचविला. इतकेच नव्हे, तर त्यांचे गुरू मच्छिन्द्रनाथ ज्या वेळी वाममार्गीय साधनेकडे वळले, तेव्हा त्यांना सावध करून पुन्हा मूळ मार्गावर आणले. संस्कृत आणि हिन्दी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी रचना केल्या असून त्यांचे सिद्धसिद्धान्त पद्धति, योगमरतड, अमरौघप्रबोध इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रातील परंपरा आणि वाङ्मय
नवनाथ आणि सिद्ध नामावलीतील अनेक सिद्धांचा महाराष्ट्राशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. नागार्जुनाचा शिष्य कणेरीचे समाधिस्थान नेवाशाजवळ दाखविले जाते. हे रसेश्वर संप्रदायातील एक महत्त्वाचे आचार्य होते. नाथसिद्धांच्या परंपरेतील आनंदभैरव, मंथानभैरव, काकचंडी, सूरानंद हे शैव कापालिक होते असे दिसून येते. वीरशैवसंप्रदायाशी जवळून संबंध असलेले अल्लमप्रभू आणि रेवणसिद्ध हे नाथसिद्धांच्या परंपरेशीदेखील संबंधित होते.
महाराष्ट्रातील नाथपरंपरेत सर्वात महत्त्वाचा उल्लेख करावा लागतो, तो निवृत्तिनाथ आणि ज्ञानेश्वरांचा. मच्छिन्द्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ आणि त्यांच्याकडून ज्यांना उपदेश मिळाला ते (मातीच्या गोळ्यापासून अजाणतेपणी निर्माण झालेले) गहिनीनाथ होते. या गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना गुरुपदेश केला आणि पुढे ज्ञानेश्वरांना हाच नाथपरंपरेचा वारसा निवृत्तिनाथांकडून प्राप्त झाला. सहजयोगाचा वारसा पुढे चालू ठेवताना या परंपरेत प्रामुख्याने नामस्मरण, आणि भक्तिमार्गावर भर दिलेला आढळतो. ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थदीपिका’, ‘अमृतानुभव’ यांसारख्या ग्रंथांचे डोळसपणे वाचन केल्यास त्यांनी नाथसंप्रदायाचे गुहय़ तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत उकलून दाखविल्याचे दिसून येते. ज्ञानेश्वरांनी एक प्रकारे नाथ संप्रदायाला भागवत भक्तीशी एकरूप केले आणि सहजयोगास उज्ज्वल स्थान प्राप्त करून दिले. अगदी नजीकच्या भूतळातील पावसाचे स्वामी स्वरूपानंद हे देखील याच परंपरेतील असून त्यांनीही ‘स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय। अवघे हरिमय योगबळे।।’ इत्यादी उक्तींद्वारे आपली परंपरा स्पष्ट केली आहे.
गोरक्ष आणि इतर प्राचीन नाथांच्या संस्कृत आणि हिंदी रचना आणि ज्ञानेश्वरांनी निर्मिलेले विशाल ग्रंथभांडार यांसोबतच चिन्तामणिनाथांचा ज्ञानकैवल्य, आदिनाथभैरवाचा नाथलीलामृत, धुंडिसुत मालुकवीचा नवनाथभक्तिसार, गोपाळनाथ आणि त्यांच्या शिष्यपरंपरेतील ‘श्रीनाथलीलाविलास’, ‘गुरुगीता’, ‘समाधिबोध’, ‘निजरत्नकर’ इत्यादी ग्रंथ नवनाथ परंपरेचा अभ्यास करण्याकरिता विशेष महत्त्वाचे ठरतात.