श्री क्षेत्र कडगंची
lp29औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात, पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय..
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे सर्वाना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्त क्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इ. या ठिकाणी निवास आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयाग इ. विधीही करता येतात.  प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत अशा काही दत्त क्षेत्रांची माहिती खालीलप्रमाणे –
माहिती संकलन व सौजन्य – कर्दळीवन सेवा संघ, पुणे

lp17श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे चार पट्टशिष्य होते असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी चार शेवंतीची फुले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे चौघेजण म्हणजे श्रीसायंदेव, श्रीनंदिनामा, श्रीनरहरी आणि श्रीसिद्धमुनी हे होते. यातील श्रीसायंदेव हे कडगंची या गावचे. कडगंची हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कडगंची येथे लिहून झाला. श्री सायंदेवाची पुढील वंशावळी अशी आहे, श्रीसायंदेव – श्रीनागनाथ – श्रीदेवराव – श्रीगंगाधर – श्रीसरस्वती. श्रीगुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथाचे लिखाण कडगंची या ठिकाणी झाले. त्यामुळे याचे स्थानमाहात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीदत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे असे मानले जाते. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल. lp36श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीसायंदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनियमाने पूजा करीत असत. त्याच या करुणा पादुका. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे.
गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रूपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्रीगुरूंच्या चरित्रातील कथानामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यांसमोर ठेवून श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.
संपर्क : शिवशरणाप्पा श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान श्रीक्षेत्र कडगंची
ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक. दूरध्वनी – (०८४७७) २२६१०३
http://www.shrisayandevdattakadganchi.org

Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?

श्रीक्षेत्र बाळेकुंद्री
बेळगावपासून बागलकोट रस्त्यावर १५ कि. मी. अंतरावर बाळेकुंद्री या नावाचे एक गाव आहे. येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे. अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील ( इ. स. १८५५ ते १९०५) संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी श्रीबालमुकुंद तथा बालावधूत-पाश्र्ववाड, जिल्हा बेळगांव, यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपंतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला. पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला. श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरूंनी पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जात-पात, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, धर्म, पंथ वा अन्य कोणताही भेद न करता सर्वाना अवधूत संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे, तर त्यांनी अनुभव घडविला.
श्रीपंत म्हणतात, ‘अनुभव प्रथम, नंतर वेदांत शास्त्रे वगैरेंचे अवलोकन’. अवधूतमार्ग सर्व समावेशक कसा याबाबत श्रीपंत म्हणतात, अवधूतमार्गात पहिल्याने आलेल्यास आपला करून घेणे, तो पापी, दुराचारी, चांडाळ, दुष्ट, शिष्ट कसाही असो. शरण आला तर तो तसाच मुक्त होऊन पार पाडण्यासाठी आला आहे. अन्य आश्रमी गुरू असमर्थ असल्यामुळेच तो निराश्रमी-अतिआश्रमी अशा अवधूतास जो शरण आला तो तात्काळ मुक्त झालाच. अवधूतमार्ग म्हणजे अद्वैतानुभव. अवधूतांना मुक्तीची फिकीर नाही. भक्ती ही गुरुप्रेमासाठी. म्हणून श्रीपंत आपल्या शिष्यांना ‘गुरुपुत्र’ म्हणत. असा ‘जिव्हाळा-प्रेम’ हा या पंथाचा आत्मा आहे.  हा पंथ शुद्ध प्रेमावर व अंत:करण शुद्धीवर भर देणारा असल्याने ‘ओम नम: शिवाय’चा जप, एकतारीवर भजन एवढीच साधना अवधूत पंथामध्ये आहे. किंबहुना श्रीपंतांनी अध्यात्मातील ‘साधना’ या शब्दाचे भयच काढून टाकले.
‘जसा मन आहेस तसा मीळ’ (जसा आहेस तसाच मला येऊन मिळून जा, माझ्यात मिसळून जा असा अर्थ ) हाच त्याचा बोध. म्हणून श्रीक्षेत्री असलेल्या पादुकांची पूजा कोणालाही करण्याची पूर्ण मुभा आहे. ‘नीतीने उद्योग कर, धंदा कर, खुशाल राहा. भिक्षा मागू नये. लोकांना त्रास देऊ  नये. संन्यासी बनू नका. संसारात राहूनही परमार्थ करा. असा कर्म – मार्गाला प्राधान्य देणारा उपदेश केला असून अवडंबरापेक्षा सहजतेला महत्त्व देणारा हा पंथ आहे.
श्रीपंतमहाराजांनी निर्माण केलेले विपुल वाङ्मय आज उपलब्ध आहे.
१. श्रीदत्तप्रेमलहरी  २. श्रींची पत्रे  ३. भक्तालाप  ४. स्फुटलेख  ५. बोधवाणी ६.  बाळबोधामृतसार  ७.  भक्तोद्गार अथवा प्रेमभेट  ८. आत्मज्योती-अनुभववल्ली-ब्रह्मोपदेश  ९. प्रेमतरंग  याव्यतिरिक्त ‘परमानुभवप्रकाश‘, ‘श्रीपंत महाराजांचे चरित्र’, ‘श्रीपंत गुरुचरित्र पोथी’, श्रीपंत बंधू गोविंददादा यांनी श्रीपंथांच्या सन्निध आलेले उत्कट अनुभव लिहिलेले ‘गोविंदाची कहाणी’ इ. बोधपर वाङ्मय उपलब्ध आहे. श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. अतिशय रमणीय असा हा परिसर आहे.
संपर्क : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री, श्रीक्षेत्र बाळेकुंद्री बेळगाव
दूरध्वनी : (०८३१) २४१८२४७ / २४१८४८०/ ३२९५७४४
http://www.panthmaharaj.com

श्रीक्षेत्र माणगाव
lp37श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे. थोरल्या महाराजांनी श्रीदत्तात्रेयांचा प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पीठापूर (आंध्र प्रदेश) आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्रीनृसिंह सरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. त्यांची संकल्पशक्ती, त्याग, ज्ञान, ईश्वरनिष्ठा, श्रीदत्ताज्ञापालननिष्ठा हे सर्वच अलौकिक आहे. त्यांनी उभ्या जीवनात पायी व तेही अनवाणी, मोजक्या वस्त्र-वस्तूंसहित संपूर्ण भारतभर केवळ श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या आदेशानुसार प्रवास केला. त्यांच्या भ्रमणात देवदेवता, पवित्र तीर्थे यांचे सान्निध्य व परमानंदाचा अनुभव असे. सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन, प्रवचन असा त्यांचा नित्यक्रम असे.
श्रीस्वामींचे लिखित साहित्य हा अर्वाचीन काळातील चमत्कारच आहे. शंकराचार्यानंतर इतकी विपुल ग्रंथसंपदा थोरल्या महाराजांनीच निर्माण केली आहे. भारतीय तत्त्वज्ञान, चिंतन व ध्येयवादीची पताका त्यांच्या लिखित साहित्य रूपाने झळकत आहे. त्यावर अनेक प्रबंध तयार होतील. अशी त्यांची व्याप्ती व श्रेष्ठता आहे. ‘हे मी लिहिले’ असे त्यांनी कधीही म्हटले नाही. मला अक्षरे जशी समोर दिसतात, तशी मी कागदावर उतरवून घेतो असे ते सांगत.  वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी द्विसाहस्त्री गुरुचरित्र, सप्तशतीगुरुचरित्र, त्रिशती गुरुकाव्य, श्रीदत्तपुराण, श्रीदत्त माहात्म्य, श्रीदत्तचंपू, शिक्षात्रयम (कुमारशिक्षा, युवाशिक्षा, वृद्धाशिक्षा) तर पंचपाक्षिक हा ज्योतिषशास्त्रविषयक संस्कृत ग्रंथ तयार केला व पंचपाक्षिक जोतिषाची स्वत:ची अशी पद्धत तयार केली. तसेच स्त्री शिक्षा, लघुमननुसार (मराठी), माघमाहात्म्य (मराठी) हे ग्रंथ मराठीत तयार केले. याचबरोबर श्रीघोरात्कष्टोधरण स्तोत्र, पंचपदीसह करुणात्रिपदी, नित्य उपासनाक्रम, श्रीदत्तात्रेय षोड्शावतार चरित्र, श्रीसत्यदत्तपूजा व कथा लिहिल्या आहेत.
नृसिंहवाडीला गेले असता तेथे गोविंदस्वामी या ज्ञानी संन्यासाचा कृपानुग्रह होऊन श्रीदत्त संप्रदायाची दीक्षा आणि गुरुमंत्र वासुदेवशास्त्रींना लाभला.
‘उत्तरेस जा’ या आज्ञेवरून संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात त्यांनी २३ चातुर्मास पूर्ण केले. विविध ग्रंथांची, स्तोत्रांची, आरती व्रतवैकल्ये, पदे आदींची श्रीदत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धियुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत अध्यात्मिक साहित्य निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्त्वस्पर्शी सिद्धकवी, उत्कृष्ट वक्ता, सिद्ध हठयोगी व उत्कट दत्तभक्त होते.
अशा या थोर विभूतीचे जन्मगाव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली ३५ वर्षे याच माणगाव या क्षेत्री गेली. श्रीस्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे. माणगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामध्ये कुडाळ आणि सावंतवाडीजवळ आहे. येथे भव्य दत्तमंदिर असून मंदिरामागे गुहा आहे. येथे भक्त निवास असून भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.
संपर्क : श्रीदत्त मंदिर, माणगांव,
पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी,
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
दूरध्वनी : (०२३६२) २३६२४५ / २३६०४५
http://www.shreedattamandirmangaon.org

श्रीक्षेत्र कारंजा
lp38श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा हे क्षेत्र आहे. याचा शोध वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला. विदर्भामध्ये वाशीम जिल्ह्य़ामध्ये लाडाचे कारंजा या नावाचे हे स्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून २५ कि.मी. वर आहे. या ठिकाणी १९३४ साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी श्रीगुरुमंदिर बांधले. श्रींच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तेथे श्रीदत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे. वऱ्हाडात कारंजा नगरातील (हल्ली लाडाचे कारंजे) अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्याच्या पोटी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच ‘श्रीनृसिंह सरस्वतीस्वामी’ होत. जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मुखातून ‘ॐ’काराचा उच्चार बाहेर पडू लागला अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे श्रीदत्तात्रेयांच्या द्वितीय अवताराने जन्म घेतला, असे मानले जाते.
कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे. आदिमन्वंतरात विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मीळता होती. ऋषिमुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंजमुनी यानी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला. इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणुकादेवी करंजमुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंज क्षेत्राचे माहात्म्य वर्णन केले. वसिष्ठ-शक्ति-संवादातून यमुना-महात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना बिंदूमती कुंडात आहेत. (बेंबळपार नाव्याने सध्या हे कुंड प्रसिद्ध आहे.) गंगा व यमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती (बेंबळानदी) या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना-महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्यांने सर्व नद्या व तीर्थे यांचे आकर्षण केले. त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला. करंज ऋषींना आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या अशी श्रद्धा आहे.
करंजमुनींच्या कृपा प्रसादाने शेषराज आपल्या कुळासह आपले गरुडापासून संरक्षण व्हावे म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून करंज क्षेत्राला ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव पडले आहे, असे सांगितले जाते.
कारंजा येथील गुरूमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर आठ वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात, तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात. पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेविलेल्या चौरंगावर उघडय़ा डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी भक्तमंडळींना त्याचे दर्शन घेता येते. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करे तोपर्यंत त्या उघडय़ा ठेवतात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवून डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे, ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. संपर्क : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान, कारंजा, जि. वाशीम
दूरध्वनी : (०७२५६) २२२४५५ / २२४७५५ / २२४५०१ / २२३३५५  http://www.gurumandir.org

श्रीक्षेत्र कुरवपूर
lp32श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असे मानले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर या ठिकाणी आले. ही त्यांची कर्मभूमी. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला. येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका असून टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये श्रीधर स्वामींनीदेखील वास्तव्य केले होते. कुरवपूर याच ठिकाणी टेंबेस्वामींनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आहे.
कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यांतील एक खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागांत ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला आहे, तेथे एका बेटावर आहे. या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहांत आणखी काही बेटे आहेत. उदाहरणार्थ – जितामित्रबेट, नारगड्डि (नारबेट) आणि कुरुगड्डी या प्रत्येक बेटात एक एक देवता आहेत. कुरुगड्डीच्या जवळ एक अग्रहार नावाचे जे खेडे आहे तेथे श्रीपादस्वामी राहात असत. कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी एक महामूर्ख मुलगा जन्मला होता, त्याला कोणतीच विद्या प्राप्त झाली नाही. वडिलांचे निधन झाल्यावर त्याची आई त्याला घेऊन आत्महत्या करायला निघाली. तेव्हा असे सांगितले जाते की श्रीपादांनी त्याच्यावर कृपा केली आणि त्याला ज्ञानसंपन्न केले.
दुसरी कथा एका धोब्याची सांगितली जाते. तो रोज न चुकता श्रीपादांना नदीवर येताना साष्टांग नमस्कार घालीत असे. असे काही वर्षे झाल्यावर एकदा स्वामी त्याला बोलले- ‘तू दररोज न चुकता संधी साधून नमस्कार करतोस; यासाठी किती तरी कष्ट घेतोस. आता सुखाने राज्य करीत राहा.’ असे म्हणून स्वामी निघून गेले. काही काळानंतर जेव्हा वसंत ऋतू आला तेव्हा त्या भागाचा म्लेंछ राजा नौकाविहारासाठी मोठय़ा थाटामाटाने आला. त्याचा डामडौल देहभान विसरून पाहणाऱ्या रजकाला स्वामी महाराजांनी विचारले, ‘हे रजका, मनात काय विचार चालले आहेत?’ धोबी म्हणाला, ‘कोणाच्या गुरूच्या कृपेने हा राजा हे सुख भोगीत आहे? असले सुख मला का मिळत नाही म्हणून मन उद्दिग्न झाले आहे.’ तेव्हा श्रीपादस्वामीं म्हणाले, ‘जन्मल्यापासून तू गरीब. असले सुख तू कधीच अनुभवले नाहीस. यासाठी तू राज्यसुख अनुभवायास पाहिजे. ते तू आताच अनुभवू इच्छितोस अथवा पुढल्या जन्मी?’ रजक म्हणाला ‘स्वामी आता मला राज्य नको. मी म्हातारा झालो. मला पुढच्या जन्मी राजा करा.’ पुढील जन्मी तो बीदरचा राजा झाला आणि त्याची श्रीनृसिंहस्वामीरूपातील स्वामींबरोबर भेट झाली. त्याला मागील जन्म आठवला आणि त्याने महाराजांची सेवा केली, असे सांगितले जाते.
कृष्णेच्या पात्रामध्ये श्रीपादस्वामी एका खडकावर बसत असत आणि तिथे नित्य सूर्यनमस्कार घालीत असत. कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कुरवपूर हे ठिकाण असून रायचूर हैद्राबाद रस्त्यावर मक्तल गावाजवळून कुरवपूर फाटा लागतो. तेथून पंचपहाड या ठिकाणी यावे लागते. तेथून छोटी नाव म्हणजे बुट्टीने कुरवपूर याठिकाणी जावे लागते. कुरवपूरचे मंदिर एखाद्या बंदिस्त गढीसारखे असून तेथे आता राहण्यासाठी धर्मशाळा आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहेत. मंदिराच्या बाजूला काही अंतरावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. तेथे गुरुचरित्र पारायण करता येते. येथून जवळच मंथनगुडी हे एक दत्त क्षेत्र आहे.
कुरवपूर या ठिकाणी नित्य पूजा-अर्चा, अभिषेक आणि अनुष्ठाने इ विधी केले जातात. पालखी सेवा हे इथले एक वैशिष्टय़ आहे. हे स्थान अतिशय प्राचीन आहे.

श्रीक्षेत्र नारेश्वर
lp31बडोद्यापासून ६० कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्रीरंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्रीदत्त संप्रदायाचा फार मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे. नारेश्वराचे माहात्म्य फार प्राचीन आहे. फार वर्षांपूर्वी येथे कपर्दीश्वराचे मंदिर होते. नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेली. असे मानले जाते की नारोशंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकराने येऊन सांगितले की, मी जमिनीत गाडला गेलो आहे. मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर. त्याप्रमाणे नारो शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली. येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेथे भयाण अरण्य होते. हिंस्र श्वापदांची तेथे वस्ती होती. दहा गावची ती स्मशानभूमी होती. दिवसासुद्धा तेथे कोणी येण्यास धजत नव्हता. एकांतस्थान असल्याने व वर्दळ नसल्याने अवधूतांनी ही जागा उपासनेसाठी पसंत केली. रात्री त्यांना शंखाचे आवाज-भजनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. शिवाय तेथे मुंगूस व मोर एकत्र खेळताना आढळले. वरील कारणांमुळे अवधूतांनी उपासनेसाठी ही जागा पसंत केली असावी अशी श्रद्धा आहे.
नर्मदाकाठ, गणेशाचे उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे हे तीर्थक्षेत्र होतेच. त्यात पुन्हा अवधूतांच्या वास्तव्यामुळे ते तीर्थ जागृत असे तीर्थक्षेत्र झाले. नारेश्वर येथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली. तो कडुलिंब नम्र होऊन त्याच्या फांद्यांची वाढ वर (उध्र्व) न होता खाली जमिनीकडे झाली. त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत, असे मानले जाते.
इतकेच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चर्येमुळे त्या कडुलिंबाची पाने गोड झाली आहेत, असे संगितले जाते. रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते. त्यांचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये गोधरा या ठिकाणी राहात होते. महाराजांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा वाडी येथे मुक्काम होता.
थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता. बाळाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामी म्हणाले, ‘‘बाळ तू कुणाचा?’’ बाळ म्हणाला, ‘‘तुमचाच.’’ स्वामींनी त्याला एक खडीसाखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला. तो बाळाने खाल्ला. हीच गुरू-शिष्यांची पहिली व शेवटची भेट. पुढे लौकिकदृष्टय़ा पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही. ही भेट शेवटची ठरली. या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली. नारेश्वर जवळच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ गरुडेश्वर, त्यांनी चातुर्मास केलेले तिलकवाडा, श्रीक्षेत्र अनुसया आणि प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेले भालोद ही महत्त्वाची दत्तस्थाने आहेत.
रंगावधूत महाराज नारेश्वर येथे अखेपर्यंत आपल्या आईसोबत राहिले. त्यांनी गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर आधारित अशी रचलेली दत्तबावनी अतिशय प्रसिद्ध आहे. दत्तबावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे. रंगावधूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधीवृक्ष-निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.
संपर्क : श्री अवधूत निवास ट्रस्ट, मु. नारेश्वर, पो. सयार व्हाया अंकलेश्वर जि. बडोदा
दूरध्वनी  : (०२६६६) २५३२९३.

मुरगोड
lp34श्रीक्षेत्र मुरगोड कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्य़ातील सौंदत्ती तालुक्यामधील मुरगोड गावापासून उत्तरेला दोन फर्लाग अंतरावर आहे. बेळगावपासून ५० कि. मी. अंतरावर हे स्थान आहे. हे क्षेत्र चिदंबर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अत्यंत सुंदर अशा या क्षेत्राला अमरकल्याण असे आणखी एक नाव आहे. आजूबाजूला डोंगर आहेत. त्या डोंगरातील पाणी वाहून एकीकडे साठते. त्या साठलेल्या पाण्याचे एक तळे निर्माण झाले आहे. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थाच्या बखरीमध्ये त्यांनी मुरगोड येथे एका मोठय़ा यज्ञ समारंभामध्ये तूप वाढण्याची सेवा केली होती, असा उल्लेख आहे. या क्षेत्राच्या महाद्वारातून आत आल्यानंतर एक विलक्षण आनंद व समाधान मिळते.
समोर सभा मंडप दिसतो. त्याला लागूनच एक कट्टा आहे. चिदंबर महास्वामींचे पिता प्रकांडपंडित मरतडदीक्षित यांनी तपश्चर्या केलेली जागा ही आहे. येथे परम पवित्र असा औदुंबर वृक्ष आहे. या औदुंबर वृक्षाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालणाऱ्यांची मनोरथे पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. याच वृक्षातून श्रीचिदंबर महास्वामींनी सुवर्ण नाण्यांची वृष्टी केली होती. त्याच्या दक्षिण दिशेस मातोश्री लक्ष्मी माता मंदिर आहे. औदुंबर कट्टय़ाच्या उत्तरेस श्रीचिदंबर महास्वामींचे मंदिर आहे.
महास्वामींच्या समोर एक सुंदर नदी आहे. हे मंदिर तीन भागांमध्ये विभागले आहे. गाभारा, मध्यभाग (नदी मंडप) आणि पूर्वभाग. मंदिराच्या उत्तरभागात श्रीराम मंदिर आणि चिदंबर महास्वामींनी स्थापन केलेले मरतडेश्वर मंदिर आहे. याच मंदिरामध्ये महास्वामींनी स्थापन केलेला जागृत मारुती आहे.
चिदंबर महास्वामींच्या मंदिरासमोर एक मोठा अश्वथ वृक्ष आहे. येथे श्रीदत्त पादुका आहेत. श्रीचिदंबर महास्वामींचे पिता श्रीमरतड दीक्षित यांनी शके १६८५ साली आपल्या तपोनुष्ठानाकरिता या श्रीदत्त पादुका स्थापन केल्या. या मंदिराला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असे दोन दरवाजे आहेत. मुरगोड येथे श्रीचिदंबर महास्वामींना रोज वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा, रुद्राभिषेक, षोड्शोपचार पूजा, आरती, शेजारती इ. होते. दर सोमवारी संध्याकाळी शिबीकोत्सव (पालखी सेवा) असते. श्रीचिदंबर महास्वामींनी प्रारंभ केलेले अन्नसंतर्पण आजपर्यंत चालू आहे.

मुरगोड क्षेत्र परिचय :
महा अश्वत्थ वृक्ष : हे महा तपस्वी मरतड दीक्षित यांना श्रीचिदंबर महाक्षेत्र निर्माणाची दीक्षा दाखवणारे स्थान. परम पवित्र पावनभूमी म्हणून या वृक्षास ओळखले जाते.
श्रीचिदंबर मंदिर : मूळ अश्वत्थ वृक्षाच्या समोर असलेले महत्त्वाचे स्थान. श्रीचिदंबर महामंदिर. येथेच प्रत्यक्ष श्रीचिदंबर महास्वामी वास करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे.
श्रीचिंदंबर लिंग : ल्िंागरुपी श्रीचिदंबर.
औदुंबर कट्टा (वृक्ष) : पितृश्रेष्ठ ब्रह्मश्री मरतड दीक्षित यांचे पवित्र स्थान. येथे त्याकाळी सहा औदुंबर अंकुर फुटलेले होते. त्यापैकी आता दोन आहेत.
लक्ष्मी माता मंदिर : महामाता श्रीलक्ष्मीमाता स्मारक स्थान. (श्रीचिदंबर महास्वामींची आई)
श्रीबनशंकरी मंदिर : श्रीचिदंबर महास्वामींची कुलदेवता श्रीबनशंकरी (शाकंभरी) देवीने दर्शन दिलेले स्थान म्हणजे आता आहे ते मंदिर असे मानले जाते.
श्रीदत्त पादुका : केंगेरी क्षेत्रात प्रथम श्रीदत्त पादुका स्थापना करून श्रीमरतड दीक्षितांनी आपल्या तपश्चर्येला, अनुष्ठानाला प्रारंभ केला. हे मंदिर अष्टकोनात बांधलेले आहे.
येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.
संपर्क : मूळपीठ, मूळमहाक्षेत्र संस्थान, केंगेरी, मुरगोड, ता. सौदत्ती, जि. बेळगाव.
दूरध्वनी : (०८३३७) २६५६७४

बसवकल्याण
lp33बसवकल्याण हे क्षेत्र सोलापूरपासून ११० कि. मी. अंतरावर हैदराबाद मार्गावर सस्तापूर फाटय़ाजवळ आहे. हे एक अत्यंत पुरातन असे श्रीदत्त क्षेत्र आहे. या मंदिराला भुयारी समाधी मंदिर असेच म्हणावे लागेल. या दत्त संप्रदायाला आनंद संप्रदाय असे म्हणतात.
असे सांगितले जाते की द्वापारयुगाच्या समाप्तीनंतर जेव्हा कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पाच पांडव द्रौपदीसह बद्रीनाथकडे निघून गेले. अभिमन्यमूचा मुलगा परीक्षित आणि त्याचा मुलगा जनमेजय याने एक मोठा यज्ञ केला. तेव्हा त्या यज्ञातून एक बालक बाहेर पडले. ते अत्यंत हसतमुख आणि अतिशय आनंदी वृत्तीचे होते. त्यांच्या सतत आनंदी राहण्याच्या वृत्तीने त्यांना सदानंद असे म्हणू लागले. श्रीदत्तप्रभूंनीच कलियुगाच्या प्रारंभी श्रीसदानंद या रूपाने जन्म घेतला अशी श्रद्धा आहे. या सदानंदांनी बालपणीच अतिशय उग्र तपश्चार्या करून श्रीशंकराला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकरांनी त्याला आज्ञा केली तू पश्चिमेकडे जा. तुझी अवधूतांबरोबर भेट होईल. तेच तुझे गुरू आणि मार्गदर्शक होतील. तेव्हा सदानंदाने विचारले की, मी त्यांना कसे ओळखू शकेन? तेव्हा त्यांनी सांगितले की, तू प्रत्येक हजार पावले टाकल्यावर ‘अहो, श्रीदत्ता’ अशी गर्जना कर. ज्या ठिकाणी तुला प्रतिसाद मिळेल त्या ठिकाणी तू तपश्चर्येला बस. तिथेच तुला अवधूतांचे दर्शन होईल. शंकराच्या आज्ञेप्रमाणे श्रीसदानंद पश्चिमेकडे मजल दरमजल करीत चालू लागले. प्रत्येक हजार पावलांवर ते दत्तात्रेयांचा गजर करीत होते. असे फिरत फिरत ते बसवकल्याण नगरीत आले. या ठिकाणी श्रीदतात्रेयांचा त्यांना प्रतिसाद मिळाला. अशी कथा सांगितली जाते. त्यांनी तिथे तपश्चर्या सुरू केली. तिथेच त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि त्यांनी सदानंदांवर पूर्ण कृपा केली अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यांनी कल्याण येथे आनंद संप्रदायाची स्थापना केली. श्रीसदानंदांचे शिष्य श्रीरामानंद यांनी हा संप्रदाय पुढे वाढवला आहे. ती परंपरा अजूनही सुरू आहे. या संप्रदायाची गुरू परंपरा विष्णू विधी अत्री दत्त सदानंद रामानंद अशा प्रकारे पुढे सांगतात.
श्रीबसवकल्याण हे एक विलक्षण दत्तक्षेत्र असून तेथे ४८ समाधी आहेत आणि इतर ठिकाणी असलेल्या ३० अशा एकूण ७८ मठाधीशांच्या समाधी आहेत. एकूण नऊ भुयारे आहेत. एखाद्या गढीसारखे हे मंदिर असून प्रत्येक भुयारामध्ये अनेक मठाधीशांच्या समाधी आहेत. या भुयारांमध्ये आत उतरून गेल्यावर त्या समाध्या पाहून अक्षरश: थक्क व्हायला होते. अतिशय आनंद होतो आणि विलक्षण अनुभूती येतात. या क्षेत्राचे विशेष म्हणजे येथे सदानंद महाराजांची संजीवन समाधी आहे. तसेच येथे श्रीदत्त पीठ आणि श्रीसरस्वती पीठ एकाच ठिकाणी आहे. अतिशय जागृत असे हे सरस्वती पीठ असून सरस्वती माता पूर्वी बोलत असे. शंकराचार्य जेव्हा येथे आले आणि त्यांनी तिचे दर्शन घेतले तेव्हा तिने त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. त्यानंतर तिचे बोलणे थांबले आणि श्रीशंकराचार्यानी प्रचंड लिखाण केले, अशी अख्यायिका आहे.
या ठिकाणी श्रीगणपतीची एक ‘सुमुख गणेशमूर्ती’ आहे. श्रीगणेशाच्या जन्म कथेनुसार शंकराकडून त्याचा शिरच्छेद झाला आणि तेथे नंतर हत्तीचे मुख लावण्यात आले. शिरच्छेदापूर्वीची श्रीगणेशाची विलक्षण सुंदर मूर्ती येथे आहे. श्रीदत्तात्रेयांचे पीठ ही असून तेथे श्रीदत्तपादुका आहेत. मुख्य मंदिरामागे औदुंबराचा वृक्ष असून भुयारामध्ये अत्यंत विलक्षण अशा ‘श्रीशेषदत्त पादुका’ आहेत. शेषनागाच्या उदरामध्ये पादुका असे कदाचित हे एकमेव क्षेत्र आहे. या पादुका उत्तम अवस्थेमध्ये असून त्यांच्या दर्शनाने मन तृप्त होते. या क्षेत्रातील मठाधीश पूर्णत: प्रसिद्धिपराङ्मुख असून या क्षेत्राची फारसी माहिती दत्तभक्तांना नाही. प्रत्येक दत्तभक्ताने येथे जाऊन दर्शन घेतले पाहिजे. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनप्रसादाची नि:शुल्क व्यवस्था आहे.
संपर्क : श्रीसदानंद दत्त महाराज मठ, श्रीक्षेत्र बसवकल्याण, जि. बिदर. कर्नाटक.
दूरध्वनी : (०८४८१) २५०२५३

पीठापूर
lp35श्रीदत्तात्रेयांचे कलियुगातील पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान म्हणजे पीठापूर हे आहे. याला पीठिकापुरम असेही म्हणतात. या क्षेत्राचे ओळख पादगया अशीही आहे. आंध्र प्रदेश येथे पूर्व गोदावरी जिल्ह्य़ामध्ये काकीनाडाजवळ पीठापूर हे क्षेत्र आहे. या स्थानाचा शोध प्रथम वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी घेतला. त्यांनी हे ठिकाण शोधून काढले आणि ते श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मभूमी आहे हे सिद्ध केले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांचे चरित्र त्यांच्या ३३ व्या पिढीतील मातुल घराण्याच्या व्यक्तीकडून प्रसिद्धीस येईल, असे सांगितले होते. त्यानुसार गोविंद मल्लादी दीक्षितलु यांना साक्षात्कार झाला. त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ लिहून काढला अशी कथा सांगितली जाते. प्रथम तो तेलगु भाषेमध्ये प्रसिद्ध केला. यादरम्यान श्रीधर स्वामींचे शिष्य सज्जनगड रामस्वामी महाराजांनी पीठापूर या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना केली. त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थानी मंदिराची आणि भक्तनिवासाची उभारणी केली. त्याठिकाणी नित्य पूजा-अर्चा आणि अन्नदान सेवा सुरू झाल्या. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे मराठी भाषेमध्ये प्रकाशन झाले. त्याचा प्रचंड प्रचार आणि प्रसार झाला. श्रीगुरुचरित्रानंतर श्रीदत्त संप्रदायावरचा प्रासादिक आणि प्रचिती देणारा ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ ठरला. त्यामुळे पीठापूरची खूप प्रसिद्धी झाली.
पीठापूर हे आंध्र आणि ओरिसा या राज्यांच्या सीमेवर विशाखापट्टणम या शहराच्या अलीकडे सामलकोट या रेल्वे स्थानकाजवळ आहे. मुंबईहून किंवा हैद्राबादहून विशाखापट्टणम येथे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर हे स्थानक आहे. सामलकोटहून रिक्षाने पीठापूर या ठिकाणी जाता येते. हे अंतर १० कि.मी. आहे. तेथे महासंस्थानामध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आहे. तेथे आधी संपर्क केल्यास सर्व सोय होऊ शकते. श्रीपाद श्रीवल्लभ जन्म ठिकाणापासून जवळच पादगया हे क्षेत्र आहे. हे तीर्थ म्हणजे तलाव असून तेथेच कुक्कुटेश्वर मंदिर आहे. येथे शंकर-पार्वती यांनी कोंबडा-कोंबडी या रूपामध्ये काही काळ वास केला होता, अशी कथा आहे. याच परिसरामध्ये श्रीदत्तात्रेयांची मूर्ती आहे. ‘तीन शिरे आणि चार हात’ अशी ही दत्त मूर्ती अतिशय देखणी आहे. जेव्हा गयासूराचा वध झाला तेव्हा त्याचा पायाकडील भाग पीठापूर येथे पडला अशी श्रद्धा आहे, म्हणूनच या ठिकाणाला पादगया किंवा दक्षिणगया असे म्हटले जाते. येथे आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण हे विधी केले जातात. पीठापूर या ठिकाणी श्रीबापन्नाचार्यालु हे फार मोठे पंडित, विद्वान आणि अधिकारी पुरुष राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव राजमांबा असे होते. त्यांच्या मुलीचे नाव सुमती महाराणी असे होते. ही मोठी सात्त्विक, तपस्वी आणि शुभलक्ष्मी होती.
असे सांगितले जाते की, एकदा श्राद्धकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या आधी दारामध्ये आलेल्या तेजस्वी यतीला तिने भिक्षा वाढली. ते यती दुसरे तिसरे कुणी नसून भगवान दत्तात्रेयच होते. तेव्हा प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रेयांनी तिला तिच्या पोटी जन्म घेऊ असा आशीर्वाद दिला. अशी कथा सांगितली जाते. या कथेनुसार आपलराज शर्मा आणि सुमती महाराणी यांचे पोटी श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने जन्म घेतला असे सांगितले जाते. श्रीपादांच्या लीला अतक्र्य आणि विलक्षण आहेत. कलियुगातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. पीठापूर येथे सोळा वर्षे राहून ते गोकर्ण महाबळेश्वर येथे गेले. तेथून संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर येथे आले. त्यांचे जीवन आणि लीला यांचे वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथामध्ये आहे.
संपर्क : श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, वेणूगोपाल स्वामी मंदिरासमोर, पीठापूर, जि. गोदावरी, आंध्र प्रदेश.
फोन : (०८८६९) २५०३०० / २५२३०० / २५०९००
http://www.sripadasrivallabha.org

या व अशा अन्य सर्व अपरिचित दत्त क्षेत्रांची सर्वंकष माहिती कर्दळीवनडॉटकॉम या संकेतस्थळावर मराठीत उपलब्ध आहे.

response.lokprabha@expressindia.com

Story img Loader