परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक कृतज्ञतापूर्वक आविष्कार आहे. देवळात गेल्यावर देवाबद्दलची भक्ती, प्रीती, आदर, कृतज्ञता इ. भावनांचे प्रकटीकरण म्हणून त्या देवतेच्या भोवतीने चहूबाजूंनी प्रदक्षिणा करतो. तसेच ग्रामदेवतांना प्रदक्षिणा घातल्या जातात. पालखीमध्ये देव घालून प्रदक्षिणा घातल्या जातात. डोंगराला, पर्वताला प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा घालणे हे एक उपासनेचे आणि भक्तीचे अंग आहे. विनम्रता, कृतज्ञता, श्रद्धा, प्रार्थना यांचा मनोरम आविष्कार म्हणजे प्रदक्षिणा आहे. प्रदक्षिणा किमान तीन, पाच, सात, अकरा, एकवीस, एक्कावन्न, त्रेसष्ट किंवा एकशेआठ अशा घातल्या जातात. मनातील कुविचारांचा त्याग करून सन्मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरतात. अर्थात याचबरोबर ऐहिक आणि प्रापंचिक जीवनातील समस्या सोडविण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरतात, असे मानले जाते. जिथे मोठय़ा प्रमाणावर तीर्थस्थाने आहेत आणि ज्या स्थानांचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे अशा ठिकाणांभोवती केलेल्या प्रदक्षिणांना परिक्रमा असे म्हणतात. नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, व्रज परिक्रमा, अयोध्या परिक्रमा, त्र्यंबक परिक्रमा इ. परिक्रमा आपल्याला माहीत आहेत.
श्रीदत्त परिक्रमा ही एक अशीच परिक्रमा आहे. श्रीदत्तात्रेयांबरोबरच त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करतात, त्याला बळ देतात, त्याच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात, असे मानले जाते. श्रीदत्तात्रेयांनी २४ गुरू केले आहेत. या २४ गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे. जगद्गुरू होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या, साधना आणि तीर्थाटन केले आहे. श्रीदत्तात्रेय हे एक असे दैवत ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे. ते सर्वसमावेशक आहे आणि सर्वाना सामावून घेणारे आहे. त्यांचा समन्वयादी दृष्टिकोन सामाजिक, नैसर्गिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी साहाय्यकारी आहे. त्यांचे हे विभूतिमत्त्व अत्यंत प्रत्ययकारी आहे. दत्तात्रेयांचे चोवीस गुरू म्हणजे मानवी शरीरातील २४ शक्तिकेंद्राची प्रतीके आहेत.
प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृती आहे. ‘जे पिण्डी, ते ब्रह्मांडी’ असे म्हटले जाते. साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होत जातात. त्यामुळे माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते, त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते, सृष्टिचक्राशी त्याचा समन्वय होतो, त्याची कार्यक्षमता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. एकंदरीत त्या व्यक्तीचे जीवन प्रगल्भ होते. जाणिवा आणि नेणिवा यातील अंतर कमी होत जाऊन ती व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होते. श्रीदत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्तिकेंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे.
देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते. मात्र तसा योग जमून येणे अवघड असते. संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्तमंदिर असल्याचे आढळते. मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा २४ दत्त क्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते. या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्रीशंकरमहाराज समाधी मंदिरापासून केली आहे. त्याचा क्रम खालीलप्रमाणे:
१. श्रीशंकरमहाराज समाधी मंदिर, पुणे
२. औदुंबर ३. बसवकल्याण
४. नृसिंहवाडी ५. अमरापूर
६. पैजारवाडी ७. कुडुत्री
८. माणगाव ९. बाळेकुंद्री
१०. मुरगोड ११. कुरवपूर
१२. मंथनगुडी १३. लाडाची चिंचोळी
१४. कडगंजी
१५. माणिकनगर (हुमनाबाद)
१६. गाणगापूर १७. अक्कलकोट
१८. लातूर १९. माहूर
२०. कारंजा २१. भालोद
२२. नारेश्वर २३. तिलकवाडा
२४. गरुडेश्वर
दत्त परिक्रमेमध्ये १२ ठिकाणे महाराष्ट्रातील, दोन ठिकाणे आंध्र प्रदेशातील, सहा ठिकाणे कर्नाटकातील आणि चार ठिकाणे गुजरात या राज्यांतील आहेत. एकूण साधारण तीन हजार ६०० कि.मी.चा हा प्रवास असून तो बसने अथवा गाडीने करता येतो. श्रीदत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहेत. श्रीदत्त परिक्रमेतील विविध क्षेत्रे श्रीदत्तात्रेयांच्या आणि त्यांच्या अवतारांच्या बरोबर जोडली गेली आहेत. दत्त अवताराचे वेगळेपण हेच आहे की, दत्त अवतारांचे कार्य आणि वारसा विविध सत्पुरुषांच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित आहे. दत्त परिक्रमेदरम्यान दत्तावतार आणि दत्त कृपांकित संतांचे दर्शन घेता येते.
१. श्रीपाद श्रीवल्लभ
२. श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज
३. श्रीस्वामी समर्थ महाराज
४. श्रीमाणिकप्रभू महाराज
५. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
६. पंत महाराज बाळेकुंद्रीकर
७. चिदंबर दीक्षित स्वामी महाराज
८. दीक्षित स्वामी महाराज
९. गुळवणी महाराज
१०. चिले महाराज
११. श्रीधर स्वामी
१२. श्री सायंदेव
१३. श्री सदानंद दत्त महाराज
१४. रंगावधूत महाराज
१५. श्रीशंकर महाराज
दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यांत विविध प्रदेशांत आहे. मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे. येथील भाषा, चालीरीती, संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. तेथील भौगोलिक परिसर, जीवन पद्धती, समाजव्यवस्था भिन्न आहे. मात्र एका सूत्ररूपाने ही सर्व क्षेत्रे एकत्र गुंफली गेली आहेत असे लक्षात येते. समाजातील विविध स्तरांतील जनसमुदायांना एकत्र जोडणारी ही दत्त परिक्रमा आहे. ‘जे जे भेटिले भूत, ते ते मानिजे भगवंत’ अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त आहेत. प्रत्येक व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, ‘दत्तोहम!’ याचा अर्थ चांगुलपणाचा, देवत्वाचा, सात्त्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. तो फुलवण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे. दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळून निघते, साधक सुवर्णरूपी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनुभूती. प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वत:मधील शक्तिकेंद्र जागृत करीत असते. समाजाच्या साहाय्याने, विविध लोकांच्या सहकार्याने अनेक व्यक्तींना एकत्र घेऊन, समन्वय साधून एखादे कार्य घडवावे लागते. तीर्थस्थानांना भेटी देऊन मनाला शांतता लाभते आणि प्रसन्नता निर्माण होते.
श्रीदत्त परिक्रमेमध्ये आपण सर्वात जास्त काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यामध्ये घालवतो. श्रीदत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणेच नद्यांचेही फार आकर्षण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांचा अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सान्निध्यात गेला आहे. कृष्णेबरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठय़ा नद्यांचा आपल्याला दत्त परिक्रमेदरम्यान सहवास घडतो. गाणगापूर येथे भीमा- अमरजा यांचा संगम आहे. भीमा नदी शेवटी कृष्णेला मिळते. गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दर्शन घडते. याचबरोबर दत्त परिक्रमेदरम्यान गोदावरी नदीचे दर्शन होते. इतर अनेक लहानमोठय़ा नद्यांचे दर्शन होते. निसर्गाचे मनोहारी दर्शन आपल्याला घडते. नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमेबरोबरच श्रीदत्त परिक्रमा हे परिक्रमा विश्वाचे एक अनोखे दालन आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नर्मदा परिक्रमा आणि कर्दळीवन परिक्रमा यामध्ये कठोर परिश्रम याचबरोबर पायी चालणे हा एक मोठा भाग आहे. अर्थात त्यातही खूप मोठा आनंद आहे. श्रीदत्त परिक्रमा ही वाहनाने किंवा बसनेही करता येते. त्यामुळे ही तुलनेने सोपी आहे. शिवाय विविध दत्त क्षेत्रांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
प्रवीण कनुंजे – response.lokprabha@expressindia.com
श्री दत्त परिक्रमा
परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक कृतज्ञतापूर्वक आविष्कार आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 18-12-2015 at 01:33 IST
TOPICSदत्तात्रेयLord Dattatreyaदत्तात्रेय स्पेशलLord Dattatreya SpecialदेवGodहिंदू देवदेवताHindu God
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special issue on lord dattatreya article