‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’
हा श्रीदत्तगुरूंचा सगळ्यात प्रभावी मंत्र होय. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये हा मंत्र मोठय़ा प्रमाणावर जपला जात असूनही या मंत्रामध्ये उल्लेख असलेले ‘श्रीपाद वल्लभ’ म्हणजेच कलियुगामध्ये जन्मलेले साक्षात दत्तगुरूच अशी भक्तांची धारणा आहे. सत्ययुगामध्ये दत्तात्रेयांनी अनसूयेच्या पोटी जन्म घेतला तर कलियुगामध्ये इ. स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यत पिठापूर या क्षेत्री अप्पल राजू (अप्पलराज शर्मा) आणि सुमती (महाराणी सुमतीदेवी) या दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तगुरू प्रकट झाले, असे मानले जाते. त्यानंतर कारंजा क्षेत्रात जन्मलेले नृसिंह सरस्वती हे दुसरा तर कर्दळीवनातून प्रकटलेले स्वामी समर्थ हा तिसरा अवतार, असे मानले जाते. आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी मी अनेकदा जातो. श्रीपादांच्या निर्गुण पादुकांवर लेपन केलेले अष्टगंध, व महासंस्थानने प्रकाशित केलेले श्रीपादांचे (२९० पानी) चरित्रामृत आठवणीने घेऊन येतो. पिठापूर येथे जाऊ न शकलेल्या मात्र तरीही श्रीपादांच्या चरित्रामध्ये विशेष रस असणाऱ्या श्री दत्तभक्तांना ते चरित्रामृत भेट म्हणून देतो.
जन्मानंतर १६ वर्षे पिठापूर आणि पुढील १४ वर्षे कुरवपूर असे एकूण ३० वर्षे वास्तव्य करून त्यांनी तेथील स्थानमाहात्म्य वाढवले. कृष्णा नदीमध्ये श्रीपादांनी त्यांचे अवतारकार्य संपवले, असे मानले जाते. त्या संदर्भातील कथा असे सांगते की, तत्पूर्वी शंकर भट्ट नावाच्या सालस व पुण्यवान व्यक्तीकडून श्रीपादांनी हे चरित्रामृत संस्कृतमध्ये लिहून घेतले. महासंस्थानने प्रकाशित केलेली व निटूरकर यांनी मराठीत अनुवाद केलेली प्रत आज उपलब्ध आहे. याच कथेनुसार, अवतारकार्याच्या समाप्तीच्या समीप आल्यानंतर, श्रीपादांनी शंकरभट्टांना सांगितले की, त्यांनी लिहिलेल्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद होईल. मात्र तो बापनाचार्युलू म्हणजे श्रीपाद अवतारातील त्यांच्या आजोबांच्या (आई सुमती महाराणीच्या वडिलांच्या) तेहतिसाव्या पिढीतील वंशजाकडून होईल. त्यानंतरच्या काळात पिठापूर माहात्म्य व साक्षात त्यांचे चरित्रामृत याबाबतचे महत्त्व लुप्त झाले.
यानंतरचा थेट संदर्भ सापडतो तो समर्थ संप्रदायातील श्रीधरस्वामींचा. श्रीपादांचे लुप्त झालेले जन्मस्थान शोधण्याची जबाबदारी त्यांनी रामभक्त असलेल्या रामस्वामी यांच्यावर सोपवली व त्यानंतर अथक परिश्रमाने रामस्वामींनी हे ठिकाण शोधून काढले, अशा कथा दत्त संप्रदायामध्ये सांगितल्या जातात.
रामस्वामींनी हे ठिकाण शोधले तेव्हा त्याबद्दल अनभिज्ञता होती. श्री क्षेत्र पीठापूरचे व श्रीपादांचे माहात्म्य वर्णित करताना रामस्वामींनी भविष्योत्तर पुराणातील एक श्लोक उद्धृत केला आहे.
कृते जनार्दना,
देवस्तेत्रायाम
रघुनंदन: द्वापारे रामकृष्णौच,
कलौ श्रीपादवल्लभ:
अर्थात कृतयुगात ईश्वरांनी जनार्दन रूप, त्रेता युगात श्री राम रूप, द्वापार युगात श्रीकृष्ण रूप कलियुगात श्रीपादश्रीवल्लभ रूपात अवतार घेतला. भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांनी प्रकट रूप घेतल्याचा उल्लेख गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायात आहे.
श्री रामस्वामींच्या अथक प्रयत्नाने श्री क्षेत्र पिठापूरमध्ये दत्तभक्ती जागृत झाली व पिठापूर तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध झाले. १९८७ मध्ये आगाम शास्त्र सिद्धान्ताप्रमाणे मंदिर बांधकाम पूर्ण झाले. २२ फेब्रुवारी १९८८ला रामस्वामींच्या हातांनीच पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याच रामस्वामींच्या पायांशी बसून तासन्तास त्यांच्यासह अस्खलित मराठीमध्ये चर्चा करायची संधी केवळ दत्तभक्त म्हणूनच लाभली. छोटेखानी आत्मवृत्तावर स्वत:चे नाव लिहून त्यांनी मला दिले. ते आत्मवृत्त माझ्यासाठी मर्मबंधातल्या ठेवीप्रमाणे आहे.
६ फेब्रुवारी १९९२ ला माघ शुद्ध द्वितीया या मुहूर्तावर गाभाऱ्यातील तीनही मूर्तीची प्रतिष्ठापना शास्त्रोक्त पद्धतीने झाली. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान मंदिरात दत्तात्रेयांचे मूळ रूप मध्यभागी असून, त्यांच्या उजवीकडे त्यांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ व डावीकडे दुसरा अवतार श्री श्रीनृसिंहसरस्वती आणि समोर निर्गुण पादुका अशी रचना आहे.
इ.स. १३५० च्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या या चरित्रामृताची जीर्ण तेलगु अनुवादित प्रत भीमवरम येथे राहणाऱ्या श्री मल्लादी गोविंद दीक्षित या व्यक्तीकडे होती. ते चरित्रामृत प्रकाशित करावे की न करावे या संभ्रमात ते होते, मात्र नंतर आलेल्या एका अनुभवानंतर २००१ साली विजयादशमीपासून आश्विन कृष्ण ११ पर्यंत पिठापूर येथील ‘श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान’ येथे श्रीपादांच्या सान्निध्यात पारायण करून ती दिव्य प्रत त्यांनी संस्थानला अर्पण केली. महत्त्वाचे म्हणजे मल्लादी गोविंद दीक्षित हे गृहस्थ बापनाचार्युलुंच्या ३३ व्या पिढीतील वंशज होते.
या चरित्रामृतामध्ये सपात्री दानाचे; विशेषत: सपात्री अन्नदानाचे महत्त्व फार चांगल्या रीतीने विशद केले गेले आहे. श्रीपाद म्हणतात, मनोभावे भजणाऱ्या भक्तांना माझा अनुभव पिठापुरात नक्की होईल. मला वाटते एकदा तरी पिठापूर दर्शन दत्तभक्तांनी करायलाच हवे.
महेश यशराज – response.lokprabha@expressindia.com
दत्तभक्ताच्या नजरेतून..
कर्दळीवनातून प्रकटलेले स्वामी समर्थ हा तिसरा अवतार, असे मानले जाते.
Written by झियाऊद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 18-12-2015 at 01:29 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special issue on lord dattatreya article 8