मुंबईला खेटूनच असलेल्या ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह राज्यातील एक महत्त्वाचे कारागृह म्हणून ओळखले जाते. या कारागृहाकडे संवेदनशील म्हणून पाहिले जाते. त्याचे कारण म्हणजे कारागृहात बंदिस्त असलेले आरोपी. अगदी चोरटय़ांपासून ते बॉम्बस्फोटातील आणि नामचीन टोळ्यांतील गुंडांपासून ते बडय़ा गुन्ह्य़ातील आरोपींना या कारागृहात ठेवल जाते. एखाद्या कैद्याच्या जिवाला धोका असेल किंवा हायप्रोफाईल आणि बॉम्बस्फोटातील आरोपी असतील तर त्यांना कारागृहाध्ये अन्य कैद्यांपासून स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था आहे. कारागृहातील हायसिक्युरिटी कक्षामध्ये अशा कैद्यांना ठेवले जाते. ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये जेमतेम ११०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जात आहेत. सध्या कारागृहामध्ये ३२०० कैदी आहेत. त्यामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची संख्या केवळ दोनशे इतकी आहे. उर्वरित तीन हजार कच्चे कैदी आहेत. एकीकडे कैद्यांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असली तरी दुसरीकडे कारागृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वीइतकीच आहे. कारागृहातील कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी एकूण ३० अधिकारी आणि १९७ कर्मचारी आहेत. सहा कैद्यांमागे एक कर्मचारी असा कारागृहाचा नियम आहे. या नियमानुसार कारागृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. यामुळे कैद्यांवर देखरेख ठेवण्यासोबतच कारागृहाच्या सुरक्षेचे काम पाहाताना अधिकारी-कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कारागृहाच्या नियमानुसार तीन हजार कैद्यांसाठी पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या संदर्भात कारागृह प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव गृह खात्याकडे प्रलंबित आहे. त्यामुळे संपूर्ण कारागृहाचा भार ३० अधिकारी आणि १९७ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्याचा हा भार हलका करण्यासाठी कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे.
कारागृहाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी अधीक्षक वायचळ यांनी एक प्रस्ताव पाठविला होता. त्यामध्ये संपूर्ण कारागृहात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. या प्रस्तावाची दखल घेत महानिरीक्षक उपाध्याय यांनी कॅमेऱ्यांसाठी गृह विभागाकडून ३७ कोटींचा निधी मिळविला. या निधीतून ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारापासून ते कैद्यांच्या बॅरेकपर्यंत तब्बल ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कारागृहातील सीसीटीव्ही यंत्रणेचे आणि नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून संपूर्ण कारागृहावर तिसऱ्या डोळ्याची नजर आहे.
महिलांची संख्या चौपट…
ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये २५ महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. पण सध्या कारागृहामध्ये ९५ महिला कैद्यांना ठेवण्यात आले आहे. कारागृहाच्या क्षमतेपेक्षा महिला कैद्यांची संख्या चौपट आहे. महिलांचे बॅरेक वगळून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. असे असले तरी त्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा जागता पहारा असतो.
कोणीतरी पाहातेय…
कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारागृहातील बॅरेकच्या परिसरात गस्त घालावी लागते. त्यामुळे प्रत्येक कैद्याच्या हालचालींवर त्यांना बारीक लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्याचाच फायदा काही कैदी घेत असतात. परंतु संपूर्ण कारागृह सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आल्याने प्रशासनाला कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे. या कॅमेऱ्यांमुळे आपल्याला कुणीतरी पाहातंय अशी भावना कैद्यांच्या मनात निर्माण झाली असून यातूनच त्यांच्या गैरप्रकारांना आळा बसला आहे.
खोटय़ा आरोपांना आळा…
काही वेळेस कैद्यांकडून कारागृह प्रशासनावर खोटे आरोप केले जातात. या आरोपांसाठी कैद्यांकडून भिंतीवर डोके आपटून घेतले जाते. पंरतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कैद्यांच्या अशा प्रकारांना आळा बसला आहे. याशिवाय, न्यायालयातील तारखेच्या सुनावणीसाठी गेल्यानंतर तेथून पुन्हा कारागृहात परतत असताना काही कैदी लपूनछपून अमली पदार्थ तसेच मोबाइल आणतात. कॅमेऱ्यांमुळे आता या प्रकारांनाही काहीसा आळा बसला आहे.
आणखी ६० कॅमेऱ्यांचा प्रस्ताव…
ठाणे मध्यवर्ती कारागृहात बसविण्यात आलेल्या ५२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात दिवसा दोन आणि रात्री दोन असे चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चोखपणे सांभाळणे शक्य होत आहे. त्याचबरोबर कारागृहातील गैरप्रकारांना रोखणे शक्य होत आहे. कैद्यांबरोबरच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही लक्ष ठेवता येत आहे. कारागृहामध्ये आणखी ६० कॅमेऱ्यांची गरज असून त्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला आहे, असे कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले. तसेच कारागृहामध्ये कैद्यांसाठी योगा, आरोग्य तपासणी शिबीर अशा प्रकारचे कार्यक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून राबविले जातात, असे त्यांनी सांगितले.
नीलेश पानमंद – response.lokprabha@expressindia.com