धार्मिक पर्यटन म्हणजे प्लास्टिक आणि थर्माकोलचं आक्रमण अशीच आज आपली परिस्थिती आहे. देवस्थान जरा प्रसिद्ध होऊ लागलं की त्या परिसरातील निसर्गाची वाताहत होते. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे एकवीरा देवीचं स्थान.
देवस्थान, ते पण डोंगरातले असेल तर भक्तिभावाबरोबरच निसर्ग सान्निध्याचा निखळ आनंद देखील मिळतो. वातावरणात भरून राहिलेली नैसर्गिक प्रसन्नता मनाला सुखावते. पण या नैसर्गिकतेलाच थेट नख लावण्याचं काम एकवीरा देवीच्या डोंगरात दिसून येतं.
लोणावळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनच्या जवळ असणारे हे आगरी कोळी समाजाचे देवस्थान गेल्या काही वर्षांत चांगलेच प्रसिद्धीला आलं आहे. त्यातच ठाकरे कुटुंबीयांचे कुलदैवत असल्यामुळे वलयांकितदेखील आहे. जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील वाकसई गावापासून साधारण चारपाच किलोमीटरवरच्या कार्ला डोंगरात एकवीरेचं स्थान आहे. इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणींमध्येच देवीचं मंदिर आहे. वनखाते, पुरातत्त्व विभाग, ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती अशा चार व्यवस्था येथे कार्यरत आहेत. पण एकही व्यवस्था आपल्या विहित कामात चोख आहे याची जाणीवदेखील होत नाही अशी येथील व्यवस्था आहे.
या अव्यवस्थेची चुणूक दिसते तीच महामार्गावरून आत वळल्यावर. गुळगुळीत रस्त्यावरुन होणारा प्रवास एका क्षणात खडबडीत ओबडधोबड रस्त्यावर येतो. वाटेत जेथे कोठे विसावा असेल, पर्यटकांच्या गाडय़ा उभ्या करायची व्यवस्था असेल तेथे अस्ताव्यस्त पसरलेल्या थर्माकोलच्या प्लेट्समुळे देवस्थान जवळ आल्याची जाणीव होते. पुढे गावात प्रवेश करायच्या आधी झालेले ट्रॅफिक जॅम हे आपली व्यवस्था कशी अगदी पूर्ण क्षमतेने कार्यरत (?) असते याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. त्यातून बाहेर पडून देवस्थान समितीने डोंगरात केलेल्या रस्त्याला लागल्यावर अस्वच्छतेची आणि प्रदूषणाची पहिली चुणूक दिसते ती दोन्ही बाजूस अस्ताव्यस्त पसरलेल्या थर्माकोलच्या प्लेट्स, प्लास्टिकच्या बाटल्या आणि ५० मायक्रोन पेक्षादेखील कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे. डावीकडच्या डोंगरावर तर थर्माकोलच्या शेकडो प्लेट्स विखुरलेल्या असतात. चारपाच तीव्र खडी चढण असणारी वळणं पार केल्यावर आपण देवस्थानाच्या मालकीच्या वाहनतळावर पोहचतो. अतिशय अरुंद रस्ता, त्यातच वाटेवरच रस्त्याच्या कडेला लावलेली वाहनं, आडमुठेपणा करून मध्येच घुसू पाहणारे एखादे छोटे चारचाकी वाहन, आणि एकंदरीतच त्या उतारावर गाडीचे सर्व ब्रेक लावून देवीचं नाव घेत थांबलेली वाहनं असा काहीसा हा कठीण प्रसंग. आणि सोबतीला दोन्ही बाजूंना असणारा सर्व प्रकारच्या प्लास्टिकचा आणि थर्माकोलचा कचरा.
वाहनतळापासून देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी शे-दीडशे पायऱ्या चढाव्या लागतात. या संपूर्ण वाटेवर दोहोबाजूस असंख्य प्रकारच्या विक्रेत्यांची दाटी आहे. देवीची ओटी भरण्याच्या साहित्यापासून ते अगदी फॅन्सी दागिन्यांच्या दुकांनापर्यंत आणि ताक, सरबत विकणाऱ्यांपासून ते व्यवस्थित हॉटेलं अशी सारी रेलचेल येथे आहे. अगदी दाटीवाटीने सारं काही उभं आहे. जेथे डोंगरातील नैसर्गिक रचना पूरक नाही अशी काही ठिकाणं मोकळी ठेवण्यात आली आहेत. पण ती जागा म्हणजे जणू काही अधिकृत कचराकुंडीच समजण्यात आली आहे. दुकानांच्या दाटीवाटीतून थोडीशी मोकळी जागा पाहून दुकानांच्या मागे डोकावल्यास हीच परिस्थिती आहे. धक्कादायक म्हणजे या सर्वामध्ये कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचं प्रमाण मोठं आहे. काही पिशव्या नुकत्याच पडलेल्या, तर काही बराच काळ मातीत मिसळून मातीमय झालेल्या. एका वळणावरील झाड तर या कचऱ्याची परिसीमाच गाठणारं आहे. अनेक वर्षे त्यात अडकलेलं प्लास्टिक पाहिल्यावर एखाद्या लॉण्ड्रीत रंगवून ठेवलेले कपडय़ांचे पीळेच आठवावेत. प्लास्टिक बंदीचा फलक लावलेल्या ठिकाणी प्लास्टिक असलंच पाहिजे, तेदेखील वर्षांनुवर्षे अडकलेलं असा आपला नियम येथेदेखील सिद्ध होतो.
हे सारं नेमकं कोण करतंय, विक्रेते, की भाविक, असा एक प्रश्न पडतो, पण त्याकडे दुर्लक्ष करावं आणि पुढील वाटेला लागावं. वाटेत एके ठिकाणी तर मोकळ्या जागेत चक्क बीअरच्या बाटल्यादेखील मिळतात. ज्या ज्या दुकानांच्या मागे डोकावू तेथे हीच अवस्था. जसंजसं वर जाऊ तसं डोंगर उतारावरील झाडांमध्ये हे सारं प्लास्टिक अडकलेलं असतं.
उजवीकडे मंदिराच्या बाहेरील तटबंदीखाली हेच चित्र लांबून दिसत असतं. तुलनेनं मंदिर प्रवेशाच्या ठिकाणी बरीच स्वच्छता आहे. पुरातत्त्व खात्याचं अस्तित्व दाखवणाऱ्या चौकीत प्रवेश कर भरून आत जावं लागतं. मंदिराच्या एकूणच प्रभावामुळे येथील प्राचीन लेणी मात्र झाकाळून गेली आहेत. मंदिर आधी की लेणी आधी वगैरे प्रश्न इतिहास अभ्यासकांवर सोडावेत पुन्हा एकदा वर्तमानात यावं. कोणत्याही पुरातन वास्तूवर आपलं नाव कोरायलाच हवं ही भारतीय मानसिकता येथे पुन्हा एकदा दिसून येते. एकवीरेच्या आजूबाजूला हेच सुरू असते. तुलनेनं येथे अंतर्गत भागात बरीच स्वच्छता आहे. पण त्यातदेखील काही ठिकाणी हलगर्जीपणा अगदी हमखास दिसतो.
तटबंदीवरून खाली डोकावलं तर प्लास्टिकचंच साम्राज्य पसरलेलं असतं. लोकांना एक छोटीशी प्लास्टिकची बाटली किती जड होते त्याचंच हे द्योतक आहे की काय असं वाटतं. पायऱ्यांची वाट सोडल्यास खाली लांबवर जंगल आहे. त्यातून ओढय़ाचे कोरडे पडलेले प्रवाह आहेत. ते रिकामे राहू नयेत म्हणूनच की त्यात थर्माकोलच्या प्लेट्सचा ढीग साठला आहे. डावीकडे वाहनतळाला लागूनच वनक्षेत्र आहे. त्यातदखील हेच चित्र. थोडं लांब दूरवर गावातील काही हॉटेल्सच्या जवळदेखील हीच पांढरपट्टी दिसून येते.
खरं तर हे वनक्षेत्र आहे. येथे वनखातं आणि त्यांची स्थानिक वनव्यवस्थापन समिती देखील आहे. येथे येणाऱ्या वाहनांकडून कर गोळा करण्याचं काम ते करतात. महिन्याला जवळपास दोन लाख रुपये केवळ वाहनकरातून जमा होतात. पुरातत्त्व खातं माणशी पंधरा रुपये प्रवेश कर घेतं. भक्तगण देवीला भरभरून देणगी देतात. थोडक्यात, काही प्रमाणात तरी सधनताच म्हणावी लागेल. पण या सधनतेचा येथील पर्यावरणाच्या रक्षणाकामी कसलाही चांगला उपयोग होताना दिसत नाही. किंबहुना या सवार्र्नाच पर्यावरणाशी कसलंही देणघेणंच नाही की काय असे म्हणावे लागेल. कारण इतका कचरा असणाऱ्या ठिकाणी किमान कचराकुंडीची सोय तरी अपेक्षित आहे. पण देवीच्या मंदिराशेजारील तीन कचराकुंडय़ा सोडल्या तर या संपूर्ण परिसरात कचराकुंडीच नाही. सारा परिसरच कचराकुंडी झाला आहे. दुकानदारांना त्यांच्या व्यवसायाशिवाय दुसऱ्या कशातच स्वारस्य नसावं, अन्यथा स्वत:च्याच दुकानामागे अशी कचराकुंडी त्यांनी केली नसती.
स्थानिक वनव्यवस्थापन समितीतर्फे चार कर्मचारी कर गोळा करतात, तर चार कर्मचारी साफसफाईचे काम पाहतात. पण मजेशीर बाब म्हणजे या सर्व परिसरातील प्लास्टिक गोळा करुन त्यावर गुजराण करणारी किमान आठ-दहा कुटुंबे आहेत. त्यांनी जमा केलेलं प्लास्टिक पाहिल्यावर तर हबकायलाच होतं. दोन महिन्याच्या अंतराने प्रत्येक कुटुंब किमान ३०० ते ४०० किलो प्लास्टिकच्या बाटल्या जमा करतं आणि शे दोनशे बीअरच्या बाटल्या गोळा करते. या दोन्ही वस्तूंना शहरातील व्यापाऱ्यांकडून चांगली किंमत मिळते. पण थर्माकोलच्या प्लेट्स आणि प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांना कसलीच किंमत नसल्यामुळे त्या तशाच सोडून दिल्या जातात. हा सारा प्लास्टिकचा ढीग डोंगरातील झाडाझुडपांमध्ये तसाच वर्षांनुवर्षे अडकून राहिला आहे.
कचरा गोळा करण्याचं काम कोणाचं या प्रश्नापेक्षा इथे महत्त्वाची आहेत ती किमान सामाजिक मूल्ये. आणि ती पाळली जावीत म्हणून त्याला पूरक अशी यंत्रणा तयार करणं. कचरा टाकण्याच्या मनोवृत्तीत जशी सुधारणा अपेक्षित आहे, तशीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात कचऱ्याच्या विल्हेवाटीबद्दलची तांत्रिक यंत्रणा गरजेची आहे. साधी कचराकुंडीदेखील देता येत नसेल तर चार चार यंत्रणा असून तरी काय फायद्याच्या? प्रदूषण नियंत्रण महामंडळ नावाच्या यंत्रणेचं तर इथे अस्तित्वच दिसत नाही. कमी मायक्रोनच्या पिशव्यांवर बंदी असताना त्या इथे सरसकट वापरल्या तर जातातच, पण फेकूनदेखील दिल्या जातात.
एकाच वेळी तीन-चार यंत्रणा असूनदेखील ही परिस्थिती का उद्भवावी यामागे पुन्हा एकमेकांवर जबाबदारी ढकलणे हेच कारण दिसून येते. मंदिर समिती ही मंदिरापुरतेच पाहते. त्यातही त्यांचा आक्षेप असतो की पुरातत्त्व खाते आम्हाला काहीच करू देत नाही. लेणी परिसर हा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येतो. पण त्यांना लेण्यांनी बाहेरील स्वच्छतेशी काहीच देणंघेणं नाही. दरवर्षी प्रचंड मोठा निधी जमा होऊनदेखील ते काहीच करताना दिसत नाहीत. संयुक्त ग्राम व्यवस्थापन समिती ही या परिसरातील जंगलाची निगा राखण्याचे काम करते. पण त्यांच्या कामाचा प्रभावच दिसत नाही. त्यांच्या मते तिथे येणाऱ्या भाविकांनाच याची कसलीही चाड नाही. महिन्या दोन महिन्यात एखादी स्वयंसेवी संस्था या भागात येते आणि आठ-दहा टेंपो भरून कचरा साफ करते. हा भाग प्रादेशिक वनांमध्ये येतो. पण एक दोन फलकांखेरीज त्यांचे कसलेच अस्तित्व येथे जाणवत नाही. थोडक्यात काय तर आजतरी येथे कसलीही ठोस यंत्रणा दिसत नाही.
अर्थातच आपण सारेच आपल्या देवस्थानांकडे कसे पाहतो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. ‘‘हे देवस्थान म्हणजे काही देहू आळंदी नाही. पावसाळा सुरू होऊ दे, मग तर दिसला ओढा की लगेच दारूच्या बाटल्या घेऊन लोक पार्टीत रंगतील.’’ असं येथील ग्रामस्थचं अगदी सहजपणे बोलून जातात. विविध समितीतील पदाधिकारीदेखील भाविकांनाच दोष देतात. थोडक्यात काय येथे काही सुधारणा व्हाव्यात अशी कोणाचीच इच्छा नाही हेच यातून जाणवते.
सुहास जोशी
response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2