देवी विशेष
शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com
भारतीय धार्मिक संप्रदायांच्या इतिहासात एक मध्ययुगीन संप्रदाय ‘योगिनी संप्रदाय’ या नावाने ओळखला जातो. मातृशक्तीची उपासना हे या संप्रदायाचे उद्दिष्ट असले तरी त्यांचा उपासना मार्ग हा सर्वसामान्य नव्हता, त्यामुळेच त्यांच्याविषयी गूढता, भीती अशा संमिश्र भावना आढळतात.
ऊर्जा किंवा शक्ती कोणीही निर्माण करू शकत नाही. ती असते, ती राहते तसेच तिला कोणीही नष्ट करू शकत नाही; ती एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते. जगातील ऊर्जा अशा प्रकारे कमीही होत नाही आणि वाढतही नाही, ती अक्षय्य असते, हा भौतिकशास्त्रातील नियम सर्वश्रुत आहे. याच बदलणाऱ्या शक्तीची विविध रूपे रोजच्या आयुष्यात आपण अनुभवत असतो. मग कधी ती शक्ती, यंत्रातून वावरणाऱ्या ऊर्जेच्या स्वरूपात असते तर कधी ती सजीवातील श्वासाच्या स्वरूपात निराकार भ्रमण करत असते. तिच्या अस्तित्वाशिवाय सर्वच अर्थहीन आहे म्हणूनच तिच्या या शक्तीस्वरूपाची उपासना माणसाने आदिम काळापासून मांडली. तिच्यातच आदिशक्तीच्या, जगत्जननीच्या विश्वस्वरूपाचे दर्शन मानवाला घडले. म्हणूनच बहुधा सांख्य तत्त्वज्ञांना प्रकृती निर्गुण निर्धारी वाटली असावी. याच बदलणाऱ्या शक्तीला कालपरत्वे अनेक मूर्तिमंत रूपे लाभली. तिच्या उपासकांनी तिला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपचारांनी तिची साधना केली, किंबहुना करत आहेत. याच तिच्या अनेक रूपांपैकी एक रूप म्हणजे योगिनी!
मुळातच योगिनी हा शब्द कानावर पडला की आपल्या नजरेसमोर चित्र उभे राहते ते म्हणजे योग साधनेचे. योगी हा शब्द योग साधनेतील प्रवीण व्यक्तिमत्त्वासाठी वापरला जातो. याच शब्दाचे स्त्रीलिंगी रूप हे योगिनी म्हणजेच योग साधनेतील प्रवीण स्त्री असे होते. असे असले तरी भारतीय धार्मिक संप्रदायांच्या इतिहासातील एक मध्ययुगीन संप्रदाय हा ‘योगिनी संप्रदाय’ या नावानेही ओळखला जातो. संपूर्ण भारतीय उपखंडात तसेच आग्नेय आशियात या संप्रदायाचे अस्तित्व होते. ६४ योगिनी मंदिर स्थापत्याच्या अस्तित्वामुळे या संप्रदायाकडे जगाचे लक्ष आकर्षित झाले. या संप्रदायाचे स्वरूप इतिहासात काहीसे गूढरम्य आढळते. मातृशक्तीची उपासना हे या संप्रदायाचे उद्दिष्ट असले तरी त्यांचा उपासना मार्ग हा सर्वसामान्य नव्हता, त्यामुळेच त्यांच्याविषयी गूढता, भीती अशा संमिश्र भावना आढळतात.
भारतात अनेक ठिकाणी या ६४ योगिनींची मंदिरे सापडलेली आहेत. त्यात प्रामुख्याने ओदिशातील हिरापूर व राणीपूर अशी दोन व मध्य प्रदेशमधील खजुराहो व भेडाघाट येथील दोन अशी चार मंदिरे विशेष आकर्षणाची केंद्रे ठरली आहेत. वर्तुळाकार विन्यास व ६४ प्रकारच्या वेगवेगळ्या मातृदेवता व त्याची वर्तुळाकार स्थापना हे या मंदिर स्थापत्याचे मुख्य वैशिष्ट आहे. मूर्तीशास्त्राचा विचार करता हिरापूर येथील योगिनी या वाहनावर उभ्या आहेत तर राणीपूर येथील नृत्य करताना दर्शविल्या आहेत. तर भेडाघाट येथील योगिनी या ललितासनात विराजमान आहेत. तरीही आपल्या रोजच्या देवींच्या तुलनेत येथील प्रत्येक देवीचे रूप हे निराळे आहे. येथील काही देवी या पशुमुखी असून प्रत्येकीची लांच्छनेही भिन्न आहेत. म्हणूनच मूळ समाजप्रवाहापेक्षा या भिन्न संप्रदायाचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.
योगिनी संप्रदाय हा सातव्या ते १५ व्या शतकात कार्यरत असल्याचे साहित्यिक व पुरातत्त्वीय पुराव्यांवरून लक्षात येते. मध्ययुगाच्या प्रारंभिक इसवी सनाच्या जवळपास सातव्या शतकात योगिनी संप्रदायाची स्थापना झाली असे अभ्यासक मानतात. योगी व योगिनी या दोन्ही संज्ञा हिंदू, बौद्ध तसेच जैन या तीनही धर्मामध्ये अर्थभाव बदलून वापरल्या जातात. याआधीच नमूद केल्याप्रमाणे प्रामुख्याने योग साधनेतील स्त्री-पुरुषांकरिता या संज्ञांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. परंतु कालपरत्वे शैव, शाक्त व तांत्रिक संप्रदायांच्या प्रभावामुळे योगिनी या स्त्री दर्शक संज्ञेची व्याख्या बदलल्याचे जाणवते. तांत्रिक संप्रदायाच्या अनुषंगाने अभूतपूर्व शक्ती असलेल्या स्त्रीला योगिनी असे संबोधले जाते. तर योग साधनेच्या बळावर ज्या स्त्रियांनी ज्ञान व शक्ती प्राप्त केली आहे, अशा स्त्रियांची गणनाही या गटात होते. तर योगिनी संप्रदायात योगिनी ही संज्ञा दोन अर्थाने वापरली जाते. पार्वतीच्या म्हणजेच आदिशक्तीच्या अंशात्मक रूपांना योगिनी मानले जाते तर तिच्या याच संप्रदायातील योगावर प्रभुत्व मिळविलेल्या स्त्री उपासिकांना योगिनी याच नावाने ओळखले जाते.
मुळातच योगिनी हा शाक्त संप्रदाय असून तांत्रिक साधना या संप्रदायाचा मूळ पिंड आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकानंतर भारतीय समाजात शाक्त संप्रदायाचे प्रस्थ वाढले. तत्कालीन शैव, बौद्ध यांनाही शाक्त संप्रदायाच्या प्रभावापासून वेगळे राहणे शक्य झाले नाही. म्हणूनच पुढील काळात शाक्त उपासना ही शैव व बौद्ध या तत्त्वज्ञानाचा महत्त्वपूर्ण भाग झाली. शाक्त संप्रदाय हा भारतीय धार्मिक परंपरेचे महत्त्वपूर्ण अंग आहे. पुरुष व प्रकृतीच्या एकत्रित शक्तीला ते मानतात. असे असले तरी जगरहाटीच्या निर्मिती, पालन आणि लय या कार्यात देवीच अधिक कार्यशील असते अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे. शाक्त संप्रदाय हा मुळातच देवी उपासकांचा आहे. त्यांच्या मूळ तत्त्वज्ञानानुसार शक्ती म्हणजेच देवी हीच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच शाक्त संप्रदायात स्त्री ही उच्च मानली जाते तर पुरुषाला दुय्यम स्थान आहे. या संप्रदायाचा संबंध नेहमीच शैव संप्रदायाशी जोडला जातो. म्हणूनच शक्तीविना शिव हा शव ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे व शिव-शक्तीच्या मिलनातून विश्वनिर्मितीचे कार्य चालू होते, अशी धारणा आहे.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच दैवी साधना ही देखील याच दोन बाजूंच्या आखीवरेखीव समीकरणातून अस्तित्वात येते. भारतीय साधना प्रवाहातील कधी काळी समांतर गेलेल्या दोन बाजू म्हणजेच योग साधना आणि भोग साधना. योग साधनेत शरीरातील सुप्त अवस्थेतील कुंडलिनी शक्ती जागृत करून सहजानंदाची प्राप्ती केली जाते. नाथ संप्रदाय हा योगसाधनाप्रधान संप्रदाय आहे. तर तांत्रिक संप्रदाय हे भोग साधनेला प्राधान्य देतात. म्हणूनच योगिनी संप्रदायातही भोग साधनेतील पंचमकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.
योगिनी संप्रदायाच्या केंद्रस्थानी दैवी शक्ती असलेल्या योगिनी कोण हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. योगिनी या संकल्पनेचा सर्वात प्राचीन उल्लेख नवव्या शतकातील अग्निपुराणाच्या ५२ व्या अध्यायात सापडतो. नंतर मात्र योगिनींचे संदर्भ हे कालपरत्वे साहित्यानुसार बदलत जातात, असे लक्षात येते. ९ व्या ते १३ व्या शतकातील चतुर्वर्ग चिंतामणी, प्रतिष्ठा लक्षणसार, मायादीपिका या तत्कालीन ग्रंथांमध्ये योगिनी संप्रदायाचा व त्यांच्या साधनेचा उल्लेख येतो. शिव पौराणिक कथांमध्येही त्यांचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. तत्कालीन योगिनी तंत्र, माया तंत्र, कामाख्या तंत्र हे योगिनी पूजेचे महत्त्व विशद करतात. तर १० व्या शतकातील कालिका पुराणात अर्थ व काम यांच्या प्राप्तीसाठी ६४ योगिनींची पूजा सांगितलेली आहे. स्कंद पुराणातील उल्लेखाप्रमाणे तांत्रिक शक्तीवरील त्यांचे प्रभुत्व हे त्या वाममार्गी असल्याचे दर्शवते. भयंकरी, यमदुती, नरभोजीनी, प्रेतवाहिनी ही त्यांची तांत्रिक साहित्यातील नावे त्यांचे भयावह रूपही स्पष्ट करते. तर महाभागवत पुराणानुसार योगिनी या मूळशक्तीच्या (देवीच्या) सेविका आहेत असे नमूद केलेले आहे तर चंडीपुराणानुसार त्या देवीच्या शरीर अंशातून उत्पन्न झालेल्या आहेत. या सर्व संदर्भानुसार ६४ योगिनी या तंत्रमार्गी आहेत हे स्पष्टच आहे. प्राचीन साहित्यानुसार त्यांच्या संख्येत बदल होताना दिसतो. काही ठिकाणी ६४ तर काही ठिकाणी ८१ योगिनी नमूद केलेल्या असतात तसेच त्यांच्या नामाभिदानातही विविधता आढळते. असे असले तरी प्रामुख्याने बहुरूपा, तारा, नर्मदा, यमुना, शांती, वारुणी, क्षेमंकरी ऐंद्री, वाराही, रणवीरा, वानरमुखी, वैष्णवी, काळरात्री, वैद्यरूपा, चाचका, वेताळी, छिन्नमत्सा, वृषवाहना, ज्वाला, कामिनी, घटवारा, कारकाली, सरस्वती, विरूपा, कावेरी, भालुका, नारसिंही, वीरजा, विकटानना, महालक्ष्मी, कौमारी, महामाया, रती, करकरी, सर्पस्या, यक्षिणी, वैनायकी, विंध्यवासिनी, वीरकुमारी, माहेश्वरी, अंबिका, कामायिनी, घटवारी, स्तुती, काली, उमा, नारायणी, समुद्रा, ब्राह्मिणी, ज्वालामुखी, आग्नेयी, अदिती, चंद्रकांती, वायुवेगा, चामुंडा, मुरती, गंगा, धूम्रवती, गांधारी, सर्वमंगला, अजिता, सूर्यपुत्री, वायुवीणा, अघोरा, भद्रकाली यांचा समावेश होतो.
या योगिनींच्या उत्पत्तीविषयी अनेक संदर्भ हे पौराणिक तसेच संस्कृत साहित्यात सापडतात, त्यानुसार मूलत: त्यांचा संबध हा मातृकांशी जोडला जातो. भारतीय परंपरेत सप्तमातृका व अष्टमातृका या संकल्पना अस्तित्वात आहेत. प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर, शिल्पांमध्ये कडेवरती लहान मुलांना सोबत घेतलेल्या या मातृदेवता दिसून येतात. याच मातृकांना योगिनींच्या उत्पतीचे स्थान मानले जाते. या मातृका मुख्य शक्तीपासून निर्माण झाल्या असून त्यांच्यापासून ज्या प्रतिशक्ती निर्माण झाल्या त्यांनाच योगिनी मानले जाते. मार्कण्डेय पुराणानुसार मुख्य शक्तीच्या म्हणजेच आदिशक्तीच्या राग व कोपातून अष्टमातृका निर्माण झाल्या. याच अष्टमातृकांच्या प्रत्येकी आठ सेविका अशा मिळून ६४ योगिनी तयार होतात. त्या संदर्भात मरकण्डेय पुराणात एक कथा आहे. या कथेनुसार आदिशक्तीचे कुंभ, निकुंभ व रक्तबीज या असुरांविरुद्ध युद्ध सुरू असताना काही के ल्या रक्तबीजाचा मृत्यू होत नव्हता. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे रक्तबीजाचे रक्त जमिनीवर पडताच त्यातून अनेक रक्तबीज तयार होऊन त्याला अमरत्व प्राप्त होत होते. त्यामुळे युद्धाला बराच काळ लोटूनही युद्ध निकालात निघेना. यामुळेच ब्रह्मा, विष्णू, शिव, कार्तिकेय, नरसिंह, वराह, इंद्र या देवतांनी आपल्या स्वत:च्या शक्ती स्त्री रूपात देवीच्या मदतीसाठी पाठवल्या, याच शक्ती म्हणजे सप्तमातृका तर देवीने स्वत: चामुंडा नामक एक शक्ती निर्माण केली अशा मिळून अष्टमातृका निर्माण झाल्या. याशिवाय शिव पुराणात अंधकासुराची गोष्ट आहे. या कथेनुसार अंधकासुरालाही अशाच स्वरूपाचे वरदान होते व त्याच्या वधासाठी सप्तमातृकांची निर्मिती झाली. तर इतर साहित्यात योगिनी या आदिशक्तीच्या विविध अवयवांपासून निर्माण झाल्या असाही संदर्भ मिळतो. तर अभ्यासकांच्या मतानुसार योगिनी उपासना ही लोकसंस्कृती, शाक्त व तंत्र यांच्या समीकरणातून अस्तित्वात आली.
योगिनींची मंदिरे ही बहुधा गावाच्या वेशीवर, एकांतात लोकवस्तीपासून दूर असतात. या देवींच्या उपासनेत इतर देवतांप्रमाणे सात्त्विक साहित्यांचा वापर न होता, तांत्रिक विधींच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश होत होता. योगिनी साधनेत तंत्रोपासनेवर भर दिला जातो म्हणूनच पंचमकार हे महत्त्वाचे ठरतात. पंचमकारांमध्ये मद्य, मांस, मत्स्य, मैथुन, मुद्रा यांचा समावेश होतो. साधकाला या पंचमकारांच्या साधनेतून ज्ञान व शक्ती मिळते. याशिवाय काही भयावह विधीही केले जातात, त्यात शवच्छेदनासारख्या विधीचा समावेश आहे. यात मानवी मृतदेहाचे शीर शरीरापासून विलग केले जाते. या विधीमागील हेतू मर्त्य जगातील सर्व प्रकारच्या मोहाचा त्याग सूचित करावयाचा असतो असे असले तरी हे विधी समाजमान्य नव्हते, किंबहुना याच अघोरी विधींच्या प्रस्थामुळे १५ व्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेला योगिनी संप्रदाय हा समाजातून अचानक नाहीसा झाला.
हिरापूर येथील मुख्य योगिनी ही आजही ग्रामदेवता म्हणून पुजली जाते. म्हणूनच योगिनी ही संकल्पना बहुधा ग्राम देवतांवरून अस्तित्वात आली असावी असे मानले जाते. अशाच स्वरूपाची संकल्पना कोकणातही पाहायला मिळते. कोकणातील मुख्य ग्राम देवतांची संकल्पना सात बहिणींच्या नात्याने प्रसिद्ध आहेत. या ग्रामदेवतांचाही संबंध सप्तमातृकांशी जोडला जातो.
(छायाचित्रे सौजन्य : मध्य प्रदेश शासन, विकीमीडिया : डॉ. पृथ्वीराज धांग, शिवम जार, विकीपीडिया : पंकज सक्सेना, सौमेंद्र बारीख)