छत्रपतींची राजधानी राजगड म्हणजे मराठी माणसाचा मानबिंदू. आज याच राजगडाला एका शत्रूचा वेढा पडलाय. तो शत्रू म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिकच्या कचऱ्याने शहरंच नाही तर गडकिल्लेही गिळंकृत करायला सुरुवात केली आहे.
‘राजगड’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीचा किल्ला. समुद्र सपाटीपासून तब्बल चार हजार ३०० हजार फूट उंचीच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर वसलेला, बारा कोस घेर असलेला किल्ला. दुहेरी, तिहेरी तटबंदी, चिलखती बुरुज असे दुर्गबांधणीतले अनोखे प्रयोग शिवरायांनी येथे केले. सुवेळा, संजीवनी, पद्मावती अशा तीन माची आणि मधोमध या तिहींना सांधणारा हा मराठेशाहीचा बालेकिल्ला. इतिहास काळात याच्या पाडावाच्या घटना तशा मोजक्याच. शिवकाळात तर तो एकदाही शत्रूच्या ताब्यात गेला नाही. पण वर्तमानात मात्र काहीसा गलितगात्र म्हणावा अशी परिस्थिती. गडावर फिरताना तसं काहीच वेगळं जाणवणार नाही. किंबहुना सारं काही आलबेलच वाटेल. त्यातच शासनाने गेल्या वर्षभरात एक दीड कोटी रूपयांची कामं सुरू केली असल्यामुळे इतिहासप्रेमी-दुर्गप्रेमींना तर एकदम भरूनच यावं अशी परिस्थिती. असा हा राजगड गेल्या एक-दोन वर्षांत सर्व बाजूंनी घेरला जातोय. त्याला चक्क प्लास्टिकचा वेढाच पडलाय.
गुंजावणे, वाझेघर, पाली, भुतोंडे अशा पायथ्याच्या गावातून गडावर जायच्या वाटा तशा अनेक. पाली गावातून बऱ्यापैकी पायऱ्या असणारी वाट तशी सोपी, पण गुंजवाणेवरून चोरदरवाजाची वाट सर्वाधिक वापरातील. कधी मस्त सपाटी, तर कधी खडा चढ आणि शेवटी कातळात खोदलेल्या वाटेने चोरदरवाजा. गेल्या काही वर्षांत ही वाट इतकी मळली आहे, की चुकायचं म्हटलं तरी चुकणार नाही. दुर्गप्रेमी, ट्रेकर्सबरोबरच अनेक हौशा नवशांचा राबता आता वाढलाय. गुंजवाणे गावात बसवलेल्या चौकीत माणशी पाच रुपयेप्रमाणे तब्बल दीड लाख रुपये इतका कर गेल्या पाच महिन्यांतच जमा झालाय. अर्थात ही चौकी आठवडय़ाचे अखेरचे दिवस सोडले तर कार्यरत नसते ही बाब सोडून द्यायची. त्यामुळे चौकीत काहीही न भरताच गडाच्या वाटेला लागावे लागते. गावातून डोंगराच्या वाटेला लागलं की वाटेची खातरजमा करून घेण्याची डोंगरभटक्यांची एक पद्धत असते. बुटांचे ठसे, खुणेचे दगड, असलेच तर मार्गदर्शक बाण यांचा आधार घ्यायचा. राजगडाच्या वाटेवर सध्या तरी हे सारं शोधणं कठीणच आहे. पण येथे प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाची, बिस्किटांची वेष्टणं, झालंच तर दारूच्या रिकाम्या बाटल्या, (गुटखा बंद झाला म्हणून नाही तर त्याची वेष्टणं) या साऱ्या आधुनिक खुणा तुम्ही योग्य वाटेवर आहात हे सांगण्यास उपयोगी ठरतात. पहिला मध्यम चढ संपला की येणाऱ्या सपाटीवर तुलनेनं बरीच स्वच्छता आहे. त्यापुढचा चढ दोन्ही बाजूंच्या वृक्षराजीमुळे सुसह्य़ ठरणारा आहे आणि स्वच्छदेखील आहे. वन खात्याचे सर्जनशील फलक आहेत.
त्यानंतरच्या सपाटीवर डोंगरउतारावर मोठय़ा वृक्षांची संख्या तशी मर्यादितच. सारा डोंगरउतार हा आठ-दहा फूट उंचीच्या गच्च कारवीने व्यापलेला. उन्हाळ्यामुळे सारंच निष्पर्ण झालेलं. या सपाटीवर समोर गड आणि दोहो बाजूस डोंगरउतार आणि पुढे सोंडेवर असलेला सोपा चढ. येथे येणाऱ्या आल्हाददायक वाऱ्यामुळे दोन घटका टेकायचा मोह नक्कीच होतो. पण जरा जपून, कदाचित खाली एखाद्या काचेच्या बाटलीच्या काचांचा चुरा झाला असण्याची शक्यता आहे. समोरच्या कारवीत प्लास्टिकच्या बाटल्या अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात. यच्चयावत सर्वच कंपन्यांच्या प्लास्टिक बाटल्या येथे पसरलेल्या असतात. जोडीला विविध शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांची रंगसंगती त्या निष्पर्णतेत उठून दिसते. जसंजसं वर जात राहू तसतसं हे प्लास्टिकचं प्रमाण वाढत जातं. एखाद्या गर्द झाडाच्या सावलीत बसलात तर बाजूला थर्माकोलच्या प्लेट्स हमखास असतात. हे सारं पाहून एक प्रकारची विषण्णता येते. पुढे किल्ल्याच्या कातळाला भिडेपर्यंत हेच चित्र असते.
मधला मोठा चढ चढून गेल्यावर उजवीकडे डोंगराच्या पोटातून आडवं वळण लागतं. येथे अनेक उपवाटा दिसतात. पण पुन्हा तोच फंडा. येथे हा कचरा डोंगरउताराच्या बाजूस अधिक असतो. उजवीकडचा उतार हा संपूर्णत: प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरून गेलेला असतो. तर डावीकडे गडाच्या तटबंदीखाली कातळात दगडांच्या सांदी कोपऱ्यात, किंवा एखाद्या झुडपात प्लास्टिकच्या बाटल्या अडकलेल्या असतात. हे सारं पाहून विषण्णता आणखीनच वाढते. पण ही विषण्णता कमी म्हणावी अशी परिस्थिती पुढच्या टप्प्यावर चोरवाटेच्या सुरुवातीस असते. येथे चोरवाटेवर आधारासाठी लोखंडी गज बसवले आहेत. त्याच्या सुरुवातीसच अगदी शे-दोनशे बाटल्या उजवीकडच्या झाडीत अगदी सहजपणे पडलेल्या असतात. काही अगदी जवळ तर काही वाऱ्याने उडून दूरवर गेलेल्या.
जसजसं चोरवाटेने वर जाऊ तसं हे बाटल्यांचं प्रमाण जरा कमी होतं. चोरदरवाज्यातून आत जाताना मात्र पुन्हा खाद्यपदार्थाची वेष्टणं आपलं स्वागत करतात. दरवाज्यातून वर जाताच आपण पद्ममावती माचीवर पद्मावतीच्या तळ्याकाठी भणाणत्या वाऱ्यात दोन क्षण विसावतो. तटबंदीवरून आल्या वाटेकडे सहज डोकावल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांचं अस्तित्व उठून दिसू लागतं. हे सारं विसरून गड पाहण्यास जावं.
गडावर तुलनेनं हे कचऱ्याचं साम्राज्य कमी आहे. पण त्याचं कारण वेगळंच आहे. त्याकडे नंतर येऊ. तूर्तास गडावर सुरू असणाऱ्या अनेक संवर्धनाच्या शासकीय कामामुळे वाळू, माती, चुना, चिरे यांच्या पसाऱ्यातून गड पाहावा. सरकारनं आजवर दुर्लक्षित विषयाकडं लक्ष दिलं म्हणून आनंद मानून घ्यावा. आणि पाली दरवाज्याकडे जावं तर अनेक ठिगळं लावलेल्या वस्त्राचा भास व्हावा. पाली दरवाज्याकडे प्रचंड काम सुरू आहे. पण सारंच्या सारं सिमेंटमध्ये केलं जातंय. परिणामी जुन्या नव्या कामातील तफावत उठून दिसतेय, आणि सारचं बेंगरुळ झालंय. सिमेंटचा इतका अतिरेकी वापर आहे की काही ठिकाणी चक्क कोबाच करण्यात आला आहे. अगदी गुळगुळीत. हे असं काही होतं का त्या काळात वगैरे मनात येणारे विचार दूर सारावेत. पुरातत्त्व खातं अभ्यास करूनच हे सारं करतंय अशी स्वत:ची समजूत घालावी. कोणीतीही नियंत्रणा येथे कार्यरत नाही असेच वाटते. त्यातच शासनाचा भर हा आहे ते जतन करण्यापेक्षा सुशोभीकरणावरच अधिक आहे.
असो. तर पाली दरवाजाचे काम पाहताना पुन्हा एकदा प्लास्टिकचा वेढा जाणवू लागतो. पाली दरवाजाच्या तटबंदीच्या खाली पाहिले असता डोंगर उतारावर जागोजागी प्लास्टिकची ठिगळं दिसू लागतात. उन्हाळ्यात सारा डोंगरच बोडका झाला असल्यामुळे हा प्लास्टिकचा कचरा निदान दिसतो तरी. अन्यथा तो झाडांच्या तळातच विसावलेला असतो. हा पट्टा पार पद्मावती मंदिराच्या खालच्या बाजूपर्यंत पोहोचलेला आहे. गडावर येणाऱ्यांपैकी बहुसंख्यांचा वावर हा पद्मावतीवरच असतो. दुर्गप्रेमी-ट्रेकर्स मंडळी बालेकिल्ला, सुवेळा, संजीवनी माचीपर्यंत जातात. त्यासाठी मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसतो. पण एक दिवसाच्या भेटीवर गडावर आलेले सर्वजण पद्मावतीवरच भटकतात. त्यामुळेच प्लास्टिकचा हा सारा पट्टा सध्या तरी पद्मावती माचीच्या उतारापुरताच मर्यादित आहे इतकंच काय ते समाधान.
तुलनेनं सुवेळा आणि संजीवनी माची, बालेकिल्ला यापासून सध्या तरी दूर आहेत. पण भविष्यात त्यांच्यावरही हे संकट ओढवू शकतं. आजच बालेकिल्ल्याच्या उतारावर झुडपांमध्ये अनेक प्लास्टिकच्या बाटल्या दिसून येतात. ही भविष्यातील संकटाची चाहूल म्हणावे लागेल. पण राहुल बांदल सांगतात की गडाच्या संपूर्ण प्रदक्षिणेच्या वाटेवर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच साचत आहे.
किल्ल्यावर तुलनेत बरीच स्वच्छता आहे. पण अनेक ठिकाणी विशेषत: पर्यटक निवासाच्या मागील झाडी झाडोऱ्यामध्ये हमखास प्लास्टिकच्या बाटल्या अडकलेल्या दिसतात, तर पद्मावती माचीच्या तटाजवळ काचेच्या बाटल्यांचा चुरा दिसून येतो. काही ठिकाणी तर काचेचे मोठाले तुकडे जमिनीत रुतून बसले आहेत. गडावर दारू नेण्यास, पिण्यास मनाई करण्याचे अनेक प्रयत्न होत असतात. तरीदेखील अगदी बिनधास्तपणे अनेक जण येऊन दारू पाटर्य़ा करत असल्याचे गडावरील कामगार सांगतात. त्याचेच प्रत्यंतर वेळोवेळी साफसफाई करणाऱ्यांनी जमा केलेल्या कचऱ्यात दिसून येते.
प्लास्टिकच्या बाटल्या वापराव्यात की न वापराव्यात हा तसा वैयक्तिक प्रश्न. फिरकीचा पितळी तांब्या वापरा असंदेखील म्हणणं नाही. पण आपण येथे कचरा करू नये इतकं सामाजिक भान तरी बाळगायलाचं हवं. तीनचार हजार फूट उंचावर जायचे, तेथील मुक्त निसर्गाचा भन्नाट अनुभव घ्यायचा, इतिहासाची साद ऐकायची आणि त्या बदल्यात निसर्गाची पुरती नासाडी करायची ही कसली प्रवृत्ती. किमान सामाजिक मूल्येदेखील पाळण्याची आपली वृत्ती नसेल तर शिवाजी महाराजांच्या नावाने बेंबीच्या देठापासून घोषणा देण्याला तरी काय अर्थ उरतो?
आज गडाच्या डोंगर उतारावर प्लास्टिकचं साम्राज्य वाढलं आहे, पण किल्ला तुलनेनं स्वच्छ आहे. त्याचं श्रेय येथे वेळोवेळी साफसफाई करणाऱ्या विविध संस्थांना जाते. अगदी दर महिन्याला कोणती ना कोणती तरी संस्था येथे साफसफाईसाठी येत असते. किमान आठ-दहा पोती कचरा (प्लास्टिक, थर्माकोल, दारूच्या बाटल्या) जमा होतो. आणि मग सारा कचरा गुंजवण्यात नेला जातो. हे म्हणजे गडासंदर्भातील शासकीय व्यवस्थेचं अपयश म्हणावे लागेल. कोणीतरी कचरा करतंय आणि कोणीतरी उचलतंय. हे चक्र थांबणं महत्त्वाचं आहे. पण ते थांबवणार कोण, कधी आणि कसं हाच खरा प्रश्न आहे.
पर्यटन हे आजच्या काळातील चलनी नाणं झालं आहे. त्यातही धार्मिक पर्यटन म्हणजे कधीही खंड न पडणारा विषय. वाढत्या धार्मिक पर्यटनामुळे गेल्या काही वर्षांत अनेक देवस्थानांचा चेहरा मोहराच बदलला. त्यातून एक मोठं अर्थकारण निर्माण झालंय. पण या सगळ्या निसर्गाची अतोनात हानी होताना दिसतेय. बेसुमार बेलगाम धार्मिक पर्यटकांमुळे भीमाशंकरसारखे अभयारण्यच धोक्यात आलं आहे. फक्त भीमाशंकरच नव्हे तर अनेक गड-किल्ले, तीर्थक्षेत्रं येथे हीच अवस्था आहे. आता ‘लोकप्रभा कॅम्पेन’मध्ये वाढत्या धार्मिक पर्यटनाबरोबरच, गडकिल्ल्यांवरील वाढत्या गैरप्रकारांवर आणि प्लास्टिकच्या प्रदूषणावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत.
वाचकांना आवाहन
आपण देखील या ‘लोकप्रभा कॅम्पेन’मध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या परिसरात जर अशा प्रकारचं ठिकाण असेल तर त्याची माहिती छायाचित्रांसहीत आम्हाला पाठवावी. त्याला योग्य ती प्रसिद्धी दिली जाईल.
आमचा पत्ता : संपादकीय विभाग पत्रव्यवहार : लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.फॅक्स : २७६३३००८ ई-मेल : response.lokprabha@expressindia.com, lokprabha@expressindia.com
लोकसहभागातून स्वच्छता
राजगडावरील हा सर्वात मोठा तलाव. पण गेल्या पंचवीस वर्षांत यातील पाण्याचा उपसाच झालेला नाही. प्रचंड गाळाने हा तलाव भरून गेला आहे. म्हणूनच मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात शासनाच्या दुर्गसंवर्धक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ गिर्यारोहक हृषीकेश यादव यांनी अनेक दुर्गप्रेमीं संस्थाच्या साहाय्याने समितीच्या माध्यमातून तलावातील पाणी उपसून गाळ काढायला सुरुवात केली. पंप लावून सारं घाण पाणी बाहेर काढण्यात आलं. मजुरांच्या जोडीला कार्यकर्त्यांच्या मदतीने गाळ उपसणे सुरू केलं. एकूण एक सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या अशा कैक गोष्टी यामध्ये सापडल्या. जवळपास पुरुषभर गाळ येथे साचला आहे. पण केवळ मनुष्यबळाच्या आधारे हे शक्य नव्हतं. म्हणून छोटी क्रेन वापरून हे सारं पावसाळ्याआधी पूर्ण करायचे ठरले. त्यानुसार आर्थिक तरतूददेखील झाली. पण कंत्राटदारांचे सामान वाहून नेण्यासाठी असलेल्या रोपवे चालकाने ही क्रेन वर नेण्यासाठी अव्वाच्या सव्वा मागणी केली आणि नंतर आडमुठेपणा करत सामानच वर नेण्याचे नाकारले. परिणामी गाळ काढण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. पुरातत्त्व खात्याला रोपवे कंत्राटदारास हे सामान वर पोहोचवण्यास भाग पाडणे सहजशक्य होते. एकापरीने सरकारचेच काम ही दुर्गप्रेमी मंडळी करत होती. तेदेखील लोकवर्गणीतून, लोकसहभागातून. पण व्यवस्थेला असं काही चांगलं झालेलं बघवतच नाही की काय असेच म्हणावे लागेल.
प्लास्टिकचा भस्मासुर वाढला कसा? आणि नष्ट कसा करणार?
साधारण पाच दहा वर्षांपूर्वी गडावर येणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. मुख्यत: पावसाळा, हिवाळा हे गर्दीचे दिवस. त्यातही दुर्गप्रेमी-ट्रेकर्स मंडळींचा भरणा अधिक असायचा. पण गेल्या काही दिवसात एकंदरीतच वेगवेगळ्या स्तरांवरील प्रचारामुळे म्हणा किंवा एक क्रेझ म्हणा, किल्ल्यावरील वावर प्रचंड वाढला आहे. विशेषत: सुट्टय़ांमध्ये आणि त्यातही शनिवार रविवारी चोवीस तास येथे वर्दळ असते. धावतपळत येऊन किल्ल्यावर तासभर घालवून लगेच खाली उतरणारेदेखील बरेच असतात. पूर्वी किल्ल्यावर पाण्याची सोय भरपूर होती. पद्मावती माचीवरील दोन मोठे तलाव, बालेकिल्ल्यावरील चंद्रतळं अशी चार तळी आणि सुमारे पन्नास कातळ कोरीव टाकी आहेत. वाढत्या गर्दीने आणि दुर्लक्षामुळे हे पाण्याचे स्रोत खराब होत गेले. इतके की पद्मावती तळ्याच्या पाण्याचा रंग जर्द हिरवा झाला आहे. टाक्यांमध्ये अनेक प्रकारचा कचरा साचला आहे. परिणामी आज गडावर पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. अर्थात गडावर बाटलीबंद पाणी विकायला आलेल्या पायथ्याच्या गावातील विक्रेत्यांवरच अवलंबून राहावे लागते. हे बाटलीबंद पाणी ट्रेकर्स आणि एक दिवसाचे पर्यटक सारेच वापरतात.
गडाच्या वाटेवर डोंगर उतारावरील प्लास्टिकच्या बाटल्यांचे साम्राज्य वाढण्याची काही खास कारणं जाणवतात. एकदिवसीय पर्यटकांकडे ट्रेकर्सप्रमाणे सॅक नसतात. किरकोळ बॅग अथवा कधी कधी काहीच नसते. हातातच पाण्याची बाटली घेऊन ते डोंगर चढतात. वाटेत पाणी संपले की मग रिकामी बाटली वागवण्याची गरज भासत नाही. साधारण दुसऱ्या चढानंतर पाणी संपू लागते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांचे प्रमाण येथूनच वाढत जाते, तर चोरदरवाजाच्या वाटेवर रेलिंग पकडण्यासाठी तुमचे दोन्ही हात रिकामेच असावे लागतात. अर्थातच चोरदरवाजाच्या उतारावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच स्वागत करतो. वर गेल्यावर पाणी विकत घेऊन प्यायल्यावर पुन्हा ती बाटली हातात घेऊन उतरणे शक्य नाही म्हणून तटबंदीवरून भिरकावणे सुरू होते.
आज गडावर साफसफाई करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. पण त्यांच्या कामालादेखील मर्यादा आहेत. त्यांनी गड साफ ठेवला आहे. पण दरीत, डोंगर उतारावर पडलेल्या या बाटल्या काढण्यासाठी काही ठिकाणी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत करावे लागणार आहे. कमरेला दोर बांधून उतरावे लागेल. तर उतारावरील कारवीच्या जंगलातील प्लास्टिक काढताना कारवीची झाडं तुटण्याची शक्यता आहे.
अर्थात हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. त्यासाठी कचरा सर्वाधिक होणाऱ्या संभाव्य ठिकाणी कचराकुंडय़ांची व्यवस्था हवी.आज गडाच्या वाटेवर आणि गडावरदेखील एकही कचराकुंडी नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावरील सर्व पाण्याची टाकी सुरक्षित करावी लागतील. आज गडावर चार वेगवेगळ्या कंत्राटदारांची कामं सुरू आहेत. किमान वीस पंचवीस कामगार गडावर मुक्कामी असतात. दिवसाही संख्या अधिक असते. पण या सर्वासाठी सध्या पिण्याच्या पाण्याची कसलीच योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे संवर्धनाच्या कामाला शासनाने हात घालतानाच पाण्याची मूलभूत गरज पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. इतकेच नाही तर वर्षांतून लाखभर लोक ज्या गडावर येतात तेथे साधं स्वच्छतागृहदेखील नाही. पुरातत्त्व खातं वारसास्थळांवरील बांधकामाबाबत आडमुठय़ा भूमिका घेत असते. आणि सदर बांधण्यासारखे बेंगरुळ कामदेखील करत असते. पण तीन चार हजार फूट उंचीवर स्वच्छतागृहाची मूलभूत व्यवस्थादेखील करू शकत नसल्यामुळे संपूर्ण गडाचीच हागणदारी झाली आहे. शासनाला इतक्या मूलभूत गोष्टीदेखील करता येत नसतील, तर उगाच शिवरायांचे नाव घेत संवर्धनाचे डिंडिम वाजवण्यात काय हंशील?
सुहास जोशी
response.lokprabha@expressindia.com
@joshisuhas2