लग्न ठरतं, सगळ्यांना ही आनंदाची बातमी कळवली जाते. तिच्या मनात मात्र वेगळंच चक्र सुरू असतं. लग्न ठरल्याचा तिला आनंद असतोच, पण त्याच वेळी सगळ्या भावनांनी एकत्र एकाच वेळी तिच्या मनात गर्दीही केलेली असते. बोहल्यावर चढलेल्या मुलीच्या मनात डोकावल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट दिसतात.
बाबा घरातल्या लँडलाइनवरून कोणाशी तरी बोलत होते, ‘तारीख ठरली हा..’
तिकडे आईचं स्वयंपाकघरात भाजीला फोडणी देता देता, ‘हो गं, आता असे दिवस जातील पटापट. कामाला लागायला हवं’ असं संभाषण सुरू होतं.
आतल्या खोलीत कॉम्प्युटरसमोर बसून मोबाइलवर भाऊ ‘अरे म्हणजे काय, अर्थात.. मनसोक्त शॉपिंग करण्याचं हक्काचं कारण आहे आता,’ असं चुलत भावाशी बोलत होता.
सगळ्यांचं सगळं बोलणं ऐकत घरातली मुलगी म्हणजे जिचं लग्न ठरलंय ती बाहेरच्या खोलीत गप्प बसली होती.
हे चित्र एका मध्यमवर्गी कुटुंबातलं..
सगळ्यांचं बोलणं संपत येईस्तोवर त्या मुलीचा फोन वाजू लागतो. मेसेजेस येतात. ‘ओह.. मॅडम, काँग्रॅट्स’, ‘फायनली..’, ‘सो, काऊंटडाऊन सुरू’, ‘कसं वाटतंय?’, ‘खूश ना एकदम’ असे धडाधड मेसेज येतात. नातेवाईकांचं नेटवर्क सॉलिड असतं. एकाला मेसेज किंवा कॉल केला की अत्यंत महत्त्वाची बातमी सगळीकडे पसरली म्हणून समजायचं. लग्नाची तारीख ठरली हे सांगितल्यावर असंच होतं. लग्न ठरलेल्या मुलीला अभिनंदनाचे फोन, मेसेज येतात. मग तीही ‘थँक्यू’, ‘येस, फायनली’, ‘हो आता काऊंटडाऊन सुरू’, ‘छान वाटतंय’, ‘मिक्स फिलिंग आहे’ असे रिप्लाय देते. तिच्या उत्तरांमध्ये जमेल तेवढं वैविध्य आणण्याचा ती प्रयत्न करते. मग शेवटी शेवटी ‘थँक्यू सो मच’ असं एका स्माइलीसकट कॉपी-पेस्ट करत सुटते. त्यांना उत्तर देण्यापेक्षा तिच्या मनात भसकन् आलेल्या सगळ्या भावना गोंधळ करत असतात याकडे तिचं लक्ष जास्त असतं. आनंद, दु:खं, उत्सुकता, काळजी, अस्वस्थता, हुरहुर असं सगळं सगळं त्यात आलं.
लग्न ठरल्याची बातमी सांगण्याचा दिवस संपतो. दुसऱ्या दिवसापासून कामांची यादी केली जाते. यादीला सुरुवात होते ती खर्चाच्या अंदाजापासून. साधारण किती खर्च होईल, किती पैसे हाताशी असायला हवेत याची चर्चा होते. मग मोर्चा वळतो तो आमंत्रणाच्या यादीचा. मोजक्याच लोकांना बोलवायचं, असं म्हणता म्हणता ही यादी मोठी कधी होते कळत नाही. ‘हिला बोलवलं, मग तो राहिला’, ‘त्याला सांगणार आणि त्याला नाही, हे बरोबर दिसत नाही’ अशा अनेक इमोशनल अत्याचारांना बळी पडत यादी मोठी केली जाते. पुढची यादी खरेदीची, त्यापुढची कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम याची. अशी एकेक यादी होत वह्य़ांची पानं भरत जातात. शेवटची यादी असते कामाच्या विभागणीची. कोणी काय काम करायचं याची. या सगळ्या चर्चेत नवरी मुलगी सहभागी असते. पण, तिच्या डोक्यात आणखी काही वेगळे विचार सुरू असतात. एरवी इतरांच्या लग्नाच्या तयारीत उत्साहाने बागडणारी, बडबड करणारी ती तिच्या लग्नाच्या नियोजनात मात्र काहीशी शांत असते. असंच असतं. लग्नासारखी महत्त्वाची गोष्ट जेव्हा स्वत:च्या आयुष्यात घडते तेव्हा असंच वाटतं. ‘माझं लग्न आहे’ ही भावना पचवायचा तिला थोडं जडच जातं. अर्थात आनंद असतो पण, काहीसं दडपणही असतंच. दडपण लग्नाचं, लग्नानंतरच्या आयुष्याचं, नवीन नाती जोडण्याचं, प्रत्येक पाऊल जबाबदारीने उचलायचं. हे दडपण असायलाच हवं. त्याशिवाय मिळणाऱ्या गोष्टीचा आनंद घेता येणार नाही.
सगळे तिला सांगत असतात, ‘एन्जॉइंग धिस बीफोर मॅरेज फेज’. खरंय ते. लग्नाची सगळी लगबग, केळवणं, स्प्निस्टर पार्टी, गेट टुगेदर, छोटी-मोठी खरेदी, हनिमूनला कुठे जायचं यावरचं तासन्तास बोलणं, रुखवातातल्या वस्तू करणं, पार्लरमधील ठरलेली ट्रीटमेंट, ट्रेनच्या ग्रुपमध्ये रोज ‘तयारी कुठवर आली’ हे मैत्रिणींचं विचारणं, मग त्यावर ‘चालूये जोरात’ असं उत्तर देणं हे आणि बरंच काही अनुभवताना लग्नाळू मुलगी आनंद घेतच असते. अर्थात, हे सगळं अनुभवताना तिच्या पुढय़ात असलेल्या कामांची तिला जाणीवही होत असते म्हणा. पण, ‘होईल सगळं ओके’ असं स्वत:लाच समजवत एकेक दिवस पुढे नेते. घरातल्यांच्या तयारीचंही तिला कौतुक वाटत राहतं. लग्नात त्यांना काय घालायचंय हे त्यांनी त्यांचं-त्यांचं ठरवलेलं असतं. लग्नाच्या आधी असं, लग्न लागल्यानंतर तसं, मग रिसेप्शनला ते असं सारं काही पक्कं ठरलेलं. हे दृश्य बघून ती फ्लॅशबॅकमध्ये जाते. अशीच तयारी ती तिच्या मैत्रीण, मित्र, ताई, दादाच्या लग्नात करायची. कधी कसं तयार व्हायचं याचं परफेक्ट नियोजन असायचं. ठरल्याप्रमाणे सगळं तसं करायचीसुद्धा. आता हेच सगळं तिला तिच्या लग्नात इतरांनी केलेलं दिसणार आहे. केळवणं वगैरे खरं तर तिला फार नको असतं. ते पटतं, पटत नाही हा मुद्दा इथे नाही. पण, त्यात बराच वेळ जातो आणि आग्रहाचं जेवायचं म्हणजे पोटाचे हाल होतात. तरी ती काही मोजकी केळवणं घेते. कोणाला दुखवायचं नाही हे त्यामागचं कारण असतं. कमी दिवसांमध्ये केळवणांसाठीच्या वेळेचं चोख नियोजन करते.
लग्नात करायच्या एकेक गोष्टींची ट्रायल घेतली जाते. म्हणजे साडी नेसून बघणं, मेकअप-हेअरस्टाइल करुन बघणं, दागिने घालून बघणं अशी ती बरीच कामं. या ट्रायल्स घेताना तिला जे वाटतं ते फक्त तिच्या डोळ्यात दिसतं. आणि ते दुसऱ्यांना कळू नये म्हणून उत्तम अभिनयही करते. मंगळसूत्राच्या खरेदीसाठी ती दुकानात जाते. एखादी महागडी वस्तू आपण खरेदी करणार असू तेव्हा ती नीट पारखूनच घेतो. तसंच तीही करते. मंगळसूत्र खरेदी करताना त्यातले दोनेक प्रकार ती घालून बघते. कसं दिसतंय, किती लांब हवं, बटबटीत हवं की सोबरच हे सगळं ठरवण्यासाठी तिला ते घालून बघावंच लागतं. पण, सगळ्यात पहिल्यांदा मंगळसूत्र घालून ती स्वत:ला आरशात बघते तेव्हा तिच्या भावना खूप वेगळ्या असतात. एरवी आई, ताई, आजीच्या गळ्यात बघितलेला हा दागिना; हो, तेव्हा तो तिच्यासाठी फक्त एक दागिनाच असतो; तो आज तिच्या गळ्यात आहे. एका वेगळ्या कारणासाठी..! आता तिचा मंगळसूत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ऑफिसला येता-जाता, कामानिमित्त बाहेर असताना, ट्रेन-बसमध्ये प्रवास करताना आता तिची नजर नकळत आजूबाजूच्या बायकांच्या मंगळसूत्राकडेच असते.
असंच काहीसं पत्रिकेचं. घरात आलेल्या इतरांच्या पत्रिका ती आवडीने वाचत-बघत असते. पण आता तशाच एका पत्रिकेवर तिचं नाव तिला दिसतंय. तिच्या नावापुढे ‘चि.सौ.कां.’ असं लिहिलेलं वाचून तिला गंमत वाटते. लग्न होण्याआधी एकमेकांना ग्रिटिंग कार्डस दिली असतील तर ‘नेम्स फ्रॉम ग्रिटिंग कार्ड्स टू वेडिंग कार्डस’ अशा प्रवासाकडे बघून तिला समाधान मिळतं. स्वत:ची लग्नपत्रिका देत आमंत्रण करतानाचा आनंद ती घेते. ‘प्रेमविवाह आहे ना; मग काय, नो टेन्शन’ असं म्हणणारे अनेक जण तिला भेटतात. पण प्रेमविवाह होत असला तरी तो विवाहच ना. गोष्टी बदलणारच. फरक इतकाच की, मुलाकडच्या मंडळींना ती थोडंफार का होईना आधीपासून ओळखत असते. लग्न ठरल्यानंतर त्यांच्या स्वभावाचा शून्यापासून अभ्यास करावा लागत नाही. हेच उलटंही असतं. तिच्या सासरकडच्यांनाही मुलीबद्दल जाणून घ्यायला आधी पुरेसा वेळ मिळालेला असतो. तिच्या स्वभावाचे पैलू त्यांनाही थोडेफार समजले असतात. परकेपणाची भावना तिथे काही प्रमाणात नाहीशी होते. हा प्रेमविवाहाचा फायदा.
‘बिफोर मॅरेज फेज’ ती एन्जॉय करत असली तरी तिला येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्यांची जाणीवही असते. आई-बाबांसोबत ज्याप्रकारे ती वागायची, बोलायची तसंच्या तसं तिला सासरी वागता येईलच याची खात्री नाही. सासर असेल तिचं चांगलं, पण असं वागण्याची मुभा असेल-नसेल माहीत नाही. मुभा असलीच तर तिला हे असं जमेल की नाही माहीत नाही. त्यामुळे या गोष्टी गृहीत धरून ती एकेक पाऊल उचलते. गोष्टी बदलायला तिचं एकटीचं लग्न थोडीच होतंय, मग आयुष्य त्याचंही बदलणार असा विचार तिच्या मनात डोकावून जातो. त्याच्याही बदलतातच. पण मुलीच्या आयुष्यात होणारा बदल एक पैसा जास्त असतो. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येतो तसंतसं तिचा विचार करण्याचा वेग वाढतो. ‘थोडेच दिवस आपण आता या घरात’ हे फिलिंग तिला स्वस्थ बसू देत नाही. हा अस्वस्थपणा नकारात्मक नक्कीच नसतो. मिक्स फिलिंग असतं ते.. थोडय़ाच दिवसांत नवी सुरुवात होणार असते. नवं घर, नवी नाती, नवी माणसं, नवे शेजारी, नवी जागा, नवं रुटीन आणि नवे विचार.. नावीन्यपूर्ण आयुष्य जगायला ती तयार असते. या नव्या आयुष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांसह ती सज्ज असते.
अखेर तो दिवस उजाडतो. पहाटे लवकर उठून तयार होऊन ती विधींना बसते. नातेवाईकांची, पाहुण्यांची लगबग सुरू होते. मित्रमैत्रिणी भेटत असतात. छान दिसतेस, उखाणे तयार आहेत ना, वरात आहे की नाही, आमच्याकडेही लक्ष असू दे असे खोडकर निरोप देत असतात. एकेक विधी होत असतो आणि ती नव्या आयुष्याच्या दिशेने एकेक पाऊल पुढे सरकत असते. मुहूर्ताची वेळ होते. तिच्या हातात वरमाला दिली जाते. मंगलाष्टकांचा श्रीगणेशा होतो. तिच्या दोन्ही बाजूंना मैत्रिणी, मावशी, आत्या, आजी, काकू अशा सगळ्यांनी घेराव घातलेला असतो. ‘शुभमंगल सावधान’ म्हणताना सगळ्यांची मजा-मस्तीही सुरू असते. पण ती मनाने हरवलेली असते. डोळे बंद करते. तिच्यासमोर तिला तीच दिसते. बालपणीची.. शाळेत जाणारी.. मग कॉलेजात स्टाइल मारत मैत्रिणींसोबत फिरणारी. नंतर नोकरीसाठी मुलाखती देताना आत्मविश्वास बाळगणारी.. आणि आता बोहल्यावर चढलेली..! तिची तिलाच अनेक रूपं दिसतात. फ्लॅशबॅकमध्येच जाते ती. आई-बाबा, ताई, भाऊ, काका-काकू, आजी-आजोबा असे सगळेच या फ्लॅशबॅकमध्ये काहीना काही आठवणींमध्ये गुंतलेले असतात. ते तिला स्पष्ट आठवतात, दिसतातही..! त्या-त्या क्षणीच्या सगळ्यांना ती मनसोक्त भेटून घेते. डोळे उघडते तेव्हा, ‘तदेव लग्नम्..’ सुरू असतं.. मंगलाष्टके शेवटाकडे आलेली असतात. आंतरपाट बाजूला सारला जातो आणि तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होते!
चैताली जोशी