लग्नपत्रिका.. श्रींच्या आशीर्वादासह तारीख, वेळ, ठिकाण, भावी वधू-वरांची नावं आणि लग्नाला यायचा आग्रह. लग्न ठरलं, अभिनंदन.. अशा शब्दांना छापील रूप प्राप्त होतं ते पत्रिकेच्या स्वरूपात. हे तिचं रुपडं दिवसेंदिवस बदलत चाललंय. त्या बदलत्या स्वरूपात दिसतोय, काळाचा महिमा आणि आधुनिकतेची धरलेली कास.
घरातल्या टीपॉयवर किंवा ऑफिसच्या डेस्कवर, ई-मेलवर किंवा थेट व्हॉट्स अॅप किंवा फेसबुकवर या मोसमातल्या लग्नाची किमान एकतरी पत्रिका दिसतेय. खरं तर अमुक आणि तमुक यांचं लग्न ठरलंय, ते या तारखेला, इतके वाजता, या या ठिकाणी होणार. तरी या लग्नाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देणारी असते तिला म्हणतात पत्रिका. हे एवढंच तिचं असतं काम आणि तिची भूमिका. पण आजकाल या पत्रिकांचं जग केवढं तरी बदलंलंय. पत्रिकेला तिचं अपेक्षित काम तर करावं लागतंच आणि त्याखेरीज कितीतरी गोष्टींची जबाबदारीही पेलावी लागते. कसं आहे हे पत्रिकांचं जग?
लगीनघाईतली पहिली पायरी
आजकाल भावी वधू-वरांचे पालक आम्ही आमंत्रण करायला येतोय, अशी इन अॅडव्हान्स सूचना देऊनच येतात. एकदा लग्न ठरलं की लग्नाला किती अवकाश आहे, वगैरे गोष्टी बाजूला पडतात नि सुरू होते लगीनघाई. साखरपुडय़ापाठोपाठ लग्नाच्या तयारीला सुरुवात होते ती त्यात पहिल्यांदा छापायला दिल्या जातात त्या पत्रिकाच. आतापर्यंत आपल्या घरात नातलग, मित्रमंडळी, ऑफिसमधल्या लोकांच्या पत्रिका येत होत्या. त्यांचं कौतुक केलं जात होतं किंवा प्रसंगी त्यातल्या बारीकशा चुकाही काढल्या जात होत्या. आता स्वत:वर वेळ आल्यावर तेवढय़ाच हिरिरीनं पत्रिका केल्या जातात. आधी आलेल्या पत्रिकांमधल्या आवडलेल्या पत्रिका निगुतीनं बाजुला काढून ठेवलेल्या असतात. एखादीतला गणपतीच आवडलेला असतो. एक डिझाइनच भारी असतं किंवा मग कुठला मजकूरच एकदम ए वन लिहिलेला असतो. एखाद्या पत्रिकेच्या लिफाफ्याचा प्रकारच लक्षवेधी असतो, तर कधी एखादीचा फॉण्टच परफेक्ट असतो. या सगळ्या गोष्टी डोक्यात असतानाच सुरू होते मनातल्या मनात आपल्या पत्रिकेची आखणी. मग कागदावर पटापटा सगळ्या गोष्टी नोंदवल्या जातात. चित्रकला बरी असो वा वाईट, समोरच्या कागदावर पटकन काहीतरी रेखाटलं जातं. मजकुराची बेसिक जुळवणी केली जाते नि त्यावर घरच्यांच्या चर्चेची पहिली फेरी होतेदेखील.
पत्रिकावाले
पत्रिकेबद्दलचा बाळबोध आराखडा आखल्यावर शोधले जातात ते पत्रिकावाले. यात येतात साधारण काही प्रकार. एक म्हणजे कोरी पत्रिका घ्यायची, तिथंच ती करायला टाकायची. दुसरा प्रकार म्हणजे कोरी पत्रिका एकीकडून घेऊन ती दुसरीकडे छापायला टाकायची आणि तिसरा प्रकार म्हणजे एखाद्या डिझाइन स्टुडिओकडे किंवा आर्टिस्टकडे ती सोपवायची. यातला कोणता पर्याय निवडायचा, ते लग्नघरातल्या माणसांवर अवलंबून असतं. मुंबईत गिरगावात खाडिलकर रोडवर पत्रिकांची दुकानंच दुकानं आहेत. शिवाय दादरसारखं मध्यवर्ती ठिकाण असो किंवा मग स्थानिक दुकानदार असोत, पत्रिका कुठून करायची हा वैयक्तिक निर्णय असतो. काही वेळा ओळखीतल्यांची पत्रिका आवडली म्हणून त्यांच्या पत्रिकावाल्याकडेच ते काम सोपवलं जातं. घरातलेच कलादृष्टी असणारे नातलग बाकी मजकूर-डिझाइनचं काम करतात, फक्त छापून घ्यायचं काम बाहेरून करून घ्यावं लागतं.
पत्रिकेची कल्पना
आपली पत्रिका इतरांपेक्षा वेगळी झाली पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटतं. त्यानुसार आपापलं बजेट ठरवून आपल्या आवडीनिवडीनुसार पत्रिका निवडली जाते. पत्रिका उघडल्यावर दोन पानांमध्ये चिटकवलेलं एक पान या टिपिकल प्रकाराला लोक आताशा कंटाळलेली दिसताहेत. त्यांना नवीन आणि लक्षात राहील, असं काहीतरी तयार करून हवं असतं. आर्टिस्ट स्वप्नेश शिंदे सांगतो, ‘‘नवनवीन गोष्टी लोकांना हव्याच असतात. आजकाल लोकांचा कल नवीन आणि कल्पक गोष्टी असलेल्या पत्रिका करून घेण्याकडे दिसतोय. मग आम्हीही कल्पनाशक्तीला चालना देत वेगळं काही शोधायचा प्रयत्न करतो. मी लखोटय़ाचा फिल येणारी आणि पिंपळाच्या जाळीदार पानाचा फिल देणारी पत्रिका तयार केली. ऑफ व्हाइट, गोल्ड, डार्क ब्राऊनसारख्या थोडय़ा मळकट फिल असणाऱ्या रंगांना सध्या पसंती दिली जातेय. आजकाल मजकुरात कविता वगैरे फारशा लिहिल्या जात नाहीत, त्यामुळे लोकांना ऑकवर्ड फिल होतं. त्यामुळे मजकूर साधाच असतो.’’
पत्रिकेचं रंगरूप
मार्केटमध्ये साध्या, भपकेबाज आणि मध्यम अशा तीन प्रकारच्या पत्रिकांचे प्रकार ठळकपणे जाणवताहेत. लग्नघरातल्यांचं बजेट, आवड आणि निवडीवर पत्रिकेचं रंगरूप ठरतंय. लोकांच्या राहणीमानावरून एकेकाळी पत्रिकेचा अंदाज बांधला जायचा. आता मात्र ते तितकंसं सोपं राहिलेलं नाही. बडय़ा घरची पत्रिका साधी असू शकते आणि साध्या घरातली पत्रिका बडी असू शकते. या दोन्हींतला सुवर्णमध्य गाठणाऱ्या पत्रिकाही छापल्या जाताहेत. कोणत्या गोष्टींवर किती खर्च करायचा हेही लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये ठरवलं जातं आणि त्यातला पत्रिका हा महत्त्वाचा घटक मानावा लागेल. त्यामुळे साध्या एक पानी पत्रिकेपासून सगळ्या बाजूंनी हेवी म्हणाव्या अशा पाच-सहा फोल्डच्या पत्रिकांचे अनेक प्रकार दिसून येताहेत. शुभ म्हणून नेहमीचे लाल-मरून रंग निवडले जाताहेत, तशीच गडद रंगांपेक्षा थोडय़ा फिक्या रंगांना पसंती दिली जातेय. प्रिंटिंगचे जाणकार अशोक पवार मुलाच्या पत्रिकेबद्दल सांगतात, ‘‘संकेतची पत्रिका आकर्षक तर असावीच, पण छपाईच्या दृष्टीनेही ती उत्तमच असावी, असा विचार आम्ही केला. पत्रिका छापताना काही वेळा रंगांची सरमिसळ होते; ते आम्ही कटाक्षाने टाळलं. पत्रिकेत हवे तसे स्पेशल अॅडिशन्स करून घेतले.’’
मजकुराची भाषा
पत्रिकेच्या सुरुवातीच्या देवांच्या नावापासून ते शेवटच्या कृपया आहेर किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत, या तळटिपेपर्यंतचा मजकूर वाचणारे अनेकजण असतात. किंवा फक्त लग्नाची तारीख, वेळ, ठिकाण लक्षात घेऊन पत्रिका एका बाजूला ठेवून देणारे शहाणेही असतात. ते काहीही असलं तरी या मजकुराची भाषा बहुतेक वेळा साचेबद्धच असते. बहुतांशी वेळा पत्रिकेच्या सुरुवातीला गणपतीचं नाव असतंच किंवा मग कुलदैवतांची नावं लिहिली जातात. कधी त्यात अतिअलंकारिकपणा येतो. कधी त्यात कोरडेपणा असतो. आहेर नाकारणाऱ्या पत्रिकांसारखीच कृपया भांडय़ांचा आहेर आणू नये, अशीही एखादी वेगळी सूचना केली जाते. या मजकुरांतर्गतच मध्यंतरी बोकाळलेलं कवितांच्या कडव्यांचं फॅड आता लोपलेलं दिसतंय. सध्या दिसतेय ती साधी-सोपी सुटसुटीत भाषा. काही अपवादात्मक पत्रिकांमध्ये वेगळी भाषा आढळते. उदा. लखोटय़ासारख्या आकाराच्या पत्रिकांमध्ये थोडाशी ऐतिहासिक लहेजाची भाषा असते. मराठी किंवा प्रादेशिक भाषेतली पत्रिका नातलगांसाठी आणि इंग्रजीतली पत्रिका ऑफिस-बिझनेसमधल्यांसाठी असं बहुतांशी वेळा केलं जातं. सध्या लोकांवर पडणारा सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेऊन काही पत्रिका तयार केल्या जाताहेत आणि त्यातल्या मजकुरात सोशल मीडियातील भाषा प्रभावी ठरतेय. उदा. व्हॉट्स अॅपच्या आयकॉनसारखा आयकॉन क्रिएट करून त्यात ॐ लिहिलंय. लाइफ प्लॅटफॉर्म, स्टेट्स, ऑफिशिअल व्हर्जन, शेअर, लाइक, कमेंटस् आदी शब्दांचा चपखलपणे वापर केला गेलाय.
नावात काय आहे?
नावात काय आहे, असं पुष्कळदा म्हटलं जातं. पण पत्रिकेतल्या नावांना म्हटलं तर खूप महत्त्व दिलं जातं. काही पत्रिकांत अगदी घरातल्यांचीच नावं असतात आणि तो विषय तिथेच संपतो. काही ठिकाणी मात्र नावांवरून मानापमान नाटकाचा खेळ रंगतो आणि मग वेगळंच महाभारत घडतं. मग ते टाळण्यासाठी ही भलीमोठी नावांची यादी तयार केली जाते. मग बारीक प्रिंटमधली ५०, १००, १५०, २५० आणि हो, एका पत्रिकेत ३६५ नावं मोजल्याच्या सुरस कथा एकमेकांना ऐकवल्या जातात. त्यांचा क्रमही ठरलेला असतो की अमुक नावं इकडे नि तमुक नावं तिकडे वगैरे. ही मंडळी एरवी आपल्या भवतालात फारशी नसतात, तर मग त्यांची नावं का म्हणून छापायची, असे प्रश्न पुढच्या पिढीला पडू लागलेत.
एका पत्रिकेत नावांपुढं वधू-वरांचं शिक्षण लिहिलं होतं. काही ग्रामीण भागात ही पद्धत आजही दिसतेय. गावातल्या आणि मानापानाच्या पत्रिका अशा छापल्या जातात आणि शहरातल्या लोकांसाठी वेगळ्या तऱ्हेच्या पत्रिका छापल्या जातात. गेली काही र्वष काही ठिकाणी घरातल्या मुलींची नावं पत्रिकांमध्ये छापली जात नव्हती, ती आता छापली जाताहेत. हा एक चांगला आणि सकारात्मक बदल दिसतोय. वधू-वरांना कोणाचं नाव लिहायचंय, याचं स्वातंत्र्य हवं असतं. बऱ्याचदा त्यांना त्यांच्या आई-वडिलांचं नाव लिहायचं असतं. वडील गेले असतील तर आईचं नाव लिहायचं असतं, पण त्यांचं मोठय़ांपुढं चालतंच असं नाही. अजूनही एकल पालकानं कितीही कष्ट करून मुलांना वाढवलेलं असलं तरीही मुलांना ते ऋण अंशत: पत्रिकेत नाव छापून मानायची संधी सहजासहजी मिळत नाही. त्याऐवजी काही वेळा इतर नातलगांची नावं लिहावी लागतात.
काळ-काम-वेगाचं गणित
आजकाल वेळेचं समीकण सोडवणं ही मोठी कठीण गोष्ट होऊन बसलीय. त्यातही वर किंवा वधू परदेशी किंवा बाहेरगावी असले तर त्यांच्याशी संवाद साधायला उपयोगी ठरताहेत ती अत्याधुनिक साधनं. ई-मेल किंवा व्हॉट्स अॅपच्या साहाय्याने मुलांशी कनेक्ट होऊन त्यांचीही पसंती पत्रिकेच्या निवडीत घेतली जाते. सध्या लगीनघाईत असलेल्या माधवी पाटील म्हणतात, ‘‘पत्रिकांचे काही नमुने मी परदेशी असलेल्या सुजयला व्हॉट्स अॅप केले. त्यातून आम्ही एक पत्रिका निवडली. ती मूळ पांढऱ्या आणि लाल रंगात होती. त्यात पांढऱ्याऐवजी मोती रंग निवडला. एका पानावर मजकूर आणि दुसऱ्यावर नकाशा काढून घेतला. रिसेप्शनच्या बोलावण्यासाठी दुसरं कार्ड छापून घेतलं. सुजयचा आजी-आजोबांवर खूप जीव असल्याने त्याने आठवणीने मजकुरात आवर्जून त्यांचं नाव लिहिलं. ही सगळी ठरवाठरवी करण्यासाठी व्हॉट्स अॅपची सुविधा खूपच सोईची पडली.’’ पत्रिका तयार करतानाही आधुनिक सोईसुविधा खूप उपयुक्त ठरताहेत. त्याबद्दल
‘कॉप्यु आर्ट्स’चे नितीन कासले सांगतात, ‘‘बाहेरगावी किंवा परदेशी राहणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांकडून पत्रिकेची जेपीजी फाईल पाठवण्याची मागणी केली जाते. म्हणजे मग त्यांचंही मत लक्षात घेणं सोईचं होतं. ई पत्रिकांमुळं प्रिंट ऑर्डरमध्ये फारसा काही फरक पडलेला नाही. हे ई पत्रिकांचं प्रमाण अद्याप फार वाढलेलं नाही. त्यामुळे पत्रिका छापूनच घेतल्या जातात.’’ याला दुजोरा देत आशीष प्रिंट्सचे शशी मोहिते सांगतात, ‘‘मुलांना पाठवण्यासाठी पत्रिकेची जेपीजी फाइल मागवली जाते. पण ज्येष्ठ मंडळींना आमंत्रण देण्यासाठी पत्रिका लागतेच. ज्यांच्याकडे लग्न आहे, त्यांनी इतर कुणाच्या हाती किंवा कुरिअरनं पत्रिका पाठवण्यापेक्षा त्यांनी स्वत: येऊन दिलेलं आमंत्रण स्वीकारण्यात ज्येष्ठांना अधिक समाधान लाभतं. त्यानिमित्ताने एकमेकांची प्रत्यक्ष ख्यालीखुशाली कळते. गप्पा होतात. मात्र मजकुराच्या बदलासाठी ई-मेल किंवा व्हॉट्स अॅपसारख्या साधनांचा वापर आम्ही आणि क्लाएंटच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो.’’ ई-मेल किंवा व्हॉट्स अॅपखेरीज कार्ड मेकरसारखे काही मोबाइल अॅप्स वापरून त्याच्या साहाय्याने पत्रिका तयार करून ती शेअर करता येऊ शकते.
पत्रिकेतले ट्रेण्ड्स
कोणत्या पत्रिकांना सर्वाधिक पसंती दिली जातेय, हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. प्रकाश कार्ड्सचे शांती संगोई सांगतात, ‘‘सध्या काहीशा जड असलेल्या पत्रिकांना पसंती दिली जातेय. पाच-तीन फोल्डच्या पत्रिकांना अधिक मागणी आहे. पत्रिकांची रेंज अंदाजे ३५-५०० रुपयांपर्यंत आहे. ऑफ व्हाइट, गोल्ड, रेड, मरून रंग हे सध्याच्या ट्रेंड्समध्ये इन आहेत. प्रादेशिक भाषा आणि इंग्रजीत पत्रिका छापून घेतल्या जातात. आता पत्रिका ई-मेलने किंवा व्हॉट्सअॅपने पाठवल्या जात असल्याने पत्रिकांची संख्या थोडी कमी झाली आहे.’’ काहीजण चॉकलेट किंवा मिठाईच्या बॉक्ससकट पत्रिका देतात. कस्टममेड डिझाइन्स करतात. हॅण्डमेड पेपर वापरला जातो. काही खाशा पत्रिका बारा हजारांच्या रेंजमधल्याही असतात. पत्रिका छापून घेतली तरी ती सगळ्यांना न देता मित्र-मैत्रिणींसाठी थेट सोशल मीडियावर अपलोड केली जाते. काहीजण फक्त पत्रिकांचा फोटो शेअर करतात, तर कुणी छानशी एका लग्नाची गोष्ट क्रिएट करतात. त्या फोटोकोलाजमध्ये दोघांचे फोटोही असतात. साजेशा अर्थवाही ओळी..; ‘आम्ही भेटलो, प्रेम ही जणू परीकथा वाटायला लागली, मग त्यानं प्रपोज केलं, तेव्हा आमच्या लग्नासाठी तुमची तारीख नि वेळ आमच्यासाठी राखून ठेवा,’’ असं हे कपल आग्रहाने सांगतं. त्याखालीच वधू-वरांचे ई-मेल्स आणि मोबाइल नंबर देऊन शक्य तेवढय़ा त्वरित आपली उपस्थिती नोंदवण्याची सूचनाही असते. कुणी वेबसाइट्स तयार करतात तर व्हिडीओज अपलोड करतात. दोन अनिमेटर्सनी लग्नपत्रिकेऐवजी काही सेकंदांची मिनी मूव्हीच तयार केली होती. यात नवीन ट्रेंड म्हणजे आता म्युझिकल पत्रिकाही आल्या आहेत.
आपण करू तो ट्रेण्ड असतो, एवढं लक्षात ठेवलं तर काम सोपं होऊन जातं. मग कधी एखादी पत्रिका काळ्या रंगात केली जाऊन त्यात सोनेरी रंग आणि साधीसोपी भाषा वापरली जाते. काही ई-पत्रिकांमध्ये गुगल मॅपची लिंकच दिली जाते. प्रिंटेट पत्रिकांत नकाशा छापून दिला जातो. काही पत्रिकांवर आम्ही पार्किंगची सोय करू, अशीही नोंद असते. कॅलिग्राफी करून घेतात खास पत्रिकासाठी. प्रार्टइंक डिझाइन स्टुडिओची प्रज्ञा मिरगळ सांगते की, ‘‘परदेशी पत्रिकांचा ट्रेण्ड लोक इथे फॉलो करायला लागलेत. कटिंग, फोल्डस, आकारांतले बदल जाणवताहेत. सरळसोट उघडण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारे पत्रिका उघडून वाचता येतेय. आता लोकांना तेच ते बघून कंटाळा आलाय. नावीन्याच्या शोधात लोक असतात. त्यासाठी ते खास डिझाइनर्सकडे जातात, पैसे खर्च करतात आणि आपलं कार्ड चारचौघांपेक्षा वेगळं व्हावं, यासाठी कष्ट घेतात. यातही लोकांना परंपरा आणि नवतेचा तोल सांभाळायचा असतो.’’
हल्ली आमंत्रण करतानाच पत्रिकेसोबत एका छानशा बॉक्समधून आहेरही दिला जातो. हा बॉक्स अनेकदा लाल-सोनेरी रंगाचा असतो. त्याला छानसं रेशमी कापड, गोंडा वगैरेंनी सजवलेलं असतं. पत्रिकेवर छापल्या जाणाऱ्या गणपतींच्या चित्रांतही बरेच प्रयोग होताहेत. मजकूर छापताना खास ऑर्डर देऊन केल्या गेलेल्या लेटरिंगची जादू पत्रिका छापून आल्यावर होणाऱ्या कौतुकातून दिसते. हॅण्डमेड पेपरवर ही स्टाइल सुरेख दिसते. गणपतीखेरीज स्वस्तिक, कलश, ॐ अशा शुभचिन्हांचा वापर सर्रास केला जातो. आर्टिस्ट अनिल नाईक सांगतात, ‘‘वाचायला सोपं जावं, अशा टाइपची निवड नीट करावी लागते. गोल्डन पेपर, क्राफ्ट पेपर आणि मॅट-ग्लास फिनिश वापरलं जातं. बऱ्याचदा पत्रिकांवरचा पत्ता कापून सोबत नेला जातो. ते टाळण्यासाठी मी सुटसुटीत पत्ता असणारी जेपीजी फाईलची ई पत्रिका तयार करून देतो. बरेचदा निवडक पत्रिका छापल्या जातात आणि इतरांना ई इन्व्हिटेशन दिलं जातं.’’
जरा हटके
एका बुकलेटटाइप ऑलिव्ह ग्रीन आणि गोल्ड कॉम्बिनेशनमधल्या पत्रिकेवर उघडल्यावर गणपतीसह उजवीकडे नेहमीचा मजकूर आणि डावीकडे सप्तपदी लिहून तिचा इंग्रजीत अर्थ दिला होता. एका पत्रिकेत तीन फोल्डस्मध्ये मेंदी-संगीतासाठी, लग्न मुहूर्तासाठी आणि रिसेप्शनसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. या तिन्ही मजकुरांच्या लिखाणाचा फॉरमॅट वेगवेगळा होता. तिन्ही इव्हेंटच्या अनुषंगाने वरच्या बाजूला कॅची वनलाईनर्स लिहिलेले होते. आंब्याच्या पानांवर स्वस्तिक, हळदी-कुंकू आणि कलशाच्या चित्रांसह मजकूर लिहिलेला होता. ही पत्रिका ई-मेलवर फोटो फॉरमॅटमध्ये होती. मोबाइलचं कव्हर, डेबिट कार्ड, आधारकार्ड, हातपंख्याच्या फिलची, पत्त्यांच्या कॅटमधले राजा-राणीचे पत्ते, कॅरिकेचर्स, कॅडबरीच्या रॅपरचा फिल येणारी पत्रिका, फेसबुक पेजच्या फिलची पत्रिका अशा कितीतरी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. पत्रिकेचा फोटोफ्रेम म्हणून वापर होईल, अशाही पत्रिका दिल्या जातात. क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या लग्नाची डिझाइनर पत्रिका व्हायरल झाली होती. पाठोपाठ विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाची पत्रिकाही व्हायरल झाली, पण तिच्या खरेपणाबद्दलच शंका निर्माण झाली आणि त्याचीही चर्चा नेटकरांमध्ये रंगली होती.
एका पत्रिकेची गोष्ट
तीस वर्षांपूर्वी झालेल्या एका लग्नाची गोष्ट. त्या काळात व्हिजिटिंग कार्डच्या आकाराच्या कॉस्टफ्रेण्डली पत्रिका छापल्या गेल्या होत्या. लोकांना वधू-वराचं नाव आणि लग्नस्थळाचा पत्ता कळणं महत्त्वाचं, एवढाच विचार त्यामागे होता. त्यासाठी फार अवडंबर, भपका करण्याची काय गरज, असं वाटणारे लोकही होते, आजही आहेत. आजही काही ठिकाणी छापील पत्रिका अपुऱ्या पडल्या तर अगदी जवळच्या माणसांना त्याची झेरॉक्स काढून वाटली जाते. काहींना केवळ तंत्रांच्या आधारापेक्षा वेळ नसला तरी किमान पत्रिका कुरिअर केली, तरी ती पाठवल्याचं समाधान मिळतं. किंवा मग अगदी इन्फॉर्मल होऊन फक्त लग्नाचे डिटेल्स मेसेज केले जातात आणि तितक्याच जिव्हाळ्यानं माणसं ते लग्न अटेंड करतात. एकुणात काय तर पत्रिका साधी असो, भपकेबाज असो, ट्रेण्डी असो किंवा हटके असो, काहीही झालं तरी एक मुद्दा कायम राहातो की, लग्नाला यायचं हं.. शुभं भवतु..!
राधिका कुंटे