ऑस्ट्रेलियाने विश्वचषक पाचव्यांदा जिंकला आणि आपण खरेखुरे जगज्जेते असल्याचं जगाला दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेला आपल्यावरचा चोकर हा शिक्का पुसून टाकता आला नाही. आपलीही कामगिरी अपेक्षेप्रमाणेच होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विश्वचषक क्रिकेट हे आपली हुकमत गाजवायचे मैदान आहे हे ऑस्ट्रेलियाने यंदा पुन्हा सिद्ध केले आहे. पाचव्यांदा ही स्पर्धाजिंकताना त्यांनी क्रिकेटच्या सर्वच आघाडय़ांवरील आपली दादागिरी दाखविली. अनेक नवोदित खेळाडू असूनही मायकेल क्लार्क याच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांनी हे यश मिळविले. त्यांच्याइतकी अव्वल दर्जाची कामगिरी अन्य कोणताही संघ करू शकला नाही हेही या वेळी स्पष्ट झाले.
विजेतेपद सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी उत्तम नेतृत्व, खेळाडूंच्या व्यूहरचनेसाठी योग्य नियोजन, अव्वल दर्जाची संघबांधणी, संघातील खेळाडूंचा ताजेतवाना टिकविणे आदी गोष्टींची आवश्यकता असते. त्याचबरोबर भविष्यासाठी संघ तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले व्यासपीठ तयार करणेही महत्त्वाचे असते. क्रिकेटमधील अव्वल यश मिळविण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व खेळाडूंमधील समन्वय या आघाडय़ांवरही सर्वोत्तम व सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज असते. ऑस्ट्रेलियन संघाने या सर्वच कसोटींमध्ये चपखल कामगिरी केली. त्यांच्या तुलनेत उपविजेता न्यूझीलंडचा संघ अनेक आघाडय़ांवर कमी पडला. दक्षिण आफ्रिकेला आपल्या नावावर असलेला ‘चोकर’चा शिक्का पुसता आला नाही. भारतीय संघाने उपांत्य फेरीत सपशेल निराशा केली.
संघातील ताजेपणा टिकविण्यासाठी एक-दोन खेळाडूंूना विश्रांती देणे आवश्यक असते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मिचेल मार्श याला कांगारूंनी संधी देताना जोश हॅझेलवूड, जेम्स फॉकनर आदी खेळाडूंना विश्रांती दिली. बाद फेरीत मात्र त्यांना संधी देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली. जॉर्ज बेली याने वनडेत आपल्याविरुद्ध नेतृत्व केले होते. त्यालाही वगळण्यात आले होते. स्टीव्हन स्मिथ याच्याकडे कसोटी सामन्यांच्या वेळी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्या वेळी ऑस्ट्रेलियन निवड समितीवर टीका झाली होती मात्र त्याच्या नेतृत्वाखाली ऑसी संघाने आपल्याला धूळ चारली. विश्वचषक स्पर्धेत स्मिथ हा जरी संघाचे नेतृत्व करीत नव्हता तरीही क्लार्क याने वेळोवेळी त्याचा सल्ला घेतला व भविष्यात स्मिथ हाच कर्णधार असेल या दृष्टीने आता पाया रचला गेला आहे. मिचेल स्टार्क, हॅझेलवूड, फॉकनर यांना विश्वचषकाचा अनुभव नव्हता तरीही त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. यंदाच्या विश्वचषकात त्यांचा मोठा वाटा आहे पण पुढच्या विश्वचषकासाठीही ते दावेदार आहेत याची झलक पाहावयास मिळाली.
खोलवर फलंदाजी, भेदक द्रुतगती गोलंदाजी, अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण याच्या जोरावर कांगारूंनी उपांत्य फेरीत भारताचे आव्हान फुसके ठरविले. मिचेल जॉन्सनपर्यंत त्यांच्याकडे फलंदाजी आहे हे पुन्हा सिद्ध झाले. शिखर धवन व विराट कोहली यांनी बेजबाबदारपणे फटके मारत विकेट्स फेकल्या. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये शिस्तबद्ध शैलीची आवश्यकता असते हे त्यांनी शिकले पाहिजे. पहिल्या दहा षटकांमध्ये थोडीशी जोखीम घेत फटके मारता येतात. मात्र धवन व कोहली यांनी त्या वेळी जोखीम घेण्याऐवजी क्षेत्ररक्षक पांगले गेल्यानंतर उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला व आपली विकेट गमावून बसले. तेथेच सामन्यास कलाटणी मिळाली. रोहित शर्मा हा बलाढय़ संघाविरुद्ध ढेपाळतो हे पुन्हा दिसून आले. रोहित, धवन, अजिंक्य रहाणे हे पुढच्या विश्वचषकातही दिसणार आहेत हे लक्षात घेऊन संघबांधणी करताना रोहितऐवजी रहाणे याला सलामीस पाठविणे व रोहितला मधल्या फळीत खेळविणे योग्य होईल. उमेश यादव, मोहित शर्मा, महंमद शमी या द्रुतगती गोलंदाजांच्या कामगिरीबाबत मला खूप समाधान वाटले. उपांत्य फेरीत ते अपयशी ठरले असले तरी या स्पर्धेतील त्यांची कामगिरी खूपच प्रभावी होती. त्यांनी उपांत्य फेरीत यॉर्कर व रिव्हर्स स्विंग गोलंदाजीवर भर द्यायला पाहिजे होता. एक मात्र नक्की या स्पर्धेतील त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे आपल्या देशात वेगवान गोलंदाजीसाठी संजीवनी मिळाली आहे. द्रुतगती गोलंदाजीस पुन्हा महत्त्व येणार आहे. ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली पाहिजे अशी प्रेरणा युवा खेळाडूंना मिळणार आहे. रवीचंद्रन अश्विन यानेही समाधानकारक कामगिरी केली. रवींद्र जडेजा याच्याबाबत विचारायचे झाल्यास अष्टपैलू खेळाडूची नेमकी व्याख्या काय असाच मला प्रश्न पडतो. या स्पर्धेत त्याने सपशेल निराशा केली. सर डॉन ब्रॅडमन यांना त्याला आपल्या पंक्तीत का बसविले जाते याचेच दु:ख वाटत असेल.
आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुन्हा आपला चोकरपणा दाखविला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तीन-चार झेल सोडताना, तीन-चार वेळा धावबादची संधी सोडताना त्यांनी आपण शाळकरीच खेळाडू आहोत हे दाखवून दिले आहे. दडपणाखाली खेळताना त्यांनी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या. तारतम्य व कल्पकता त्यांच्याकडे नाही. एखादा खेळाडू झेल घेत असेल तर त्याने दुसऱ्याला सावध केले पाहिजे. त्यांचा कर्णधार अब्राहम डीव्हिलीयर्स याने आपला संघ एकखांबी तंबू असल्याचे व आपल्यावरच संघाची संपूर्ण ताकद आहे हे सिद्ध केले. काही अंशी इम्रान ताहीर या फिरकी गोलंदाजाने आपला ठसा उमटविला. अन्य खेळाडूंनी सपशेल निराशा केली.
न्यूझीलंडचा संघ चांगल्या दर्जाचा होता. त्यांची संघबांधणी चांगली झाली होती. द्रुतगती व फिरकी गोलंदाजीबाबत त्यांचा संघ समतोल होता. मात्र त्यांनी या स्पर्धेतील ९५ टक्के सामने घरच्या मैदानावर खेळले. घरचे मैदान, अनुकूल वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा, लहान मैदानांचा फायदा ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र अंतिम फेरीत त्यांना मेलबर्नवरील सीमारेषा, खेळपट्टी याचा अंदाज आला नाही. अंतिम फेरीत ते प्रथमच पोहोचले होते. त्यांची ही पहिलीच परीक्षा होती. कांगारूंना अंतिम फेरीची सवय होती. न्यूझीलंड संघातील आक्रमक फलंदाजांना यॉर्कर टाकला तर ते अपयशी होतील याचे नियोजन कांगारूंच्या गोलंदाजांनी केले होते. ब्रॅण्डन मॅकलम, कोरी अँडरसन, ल्युक रोंची हे यॉर्करवरच बाद झाले. उपविजेतेपद ही न्यूझीलंडसाठी खूप मोठी कामगिरी आहे. अंतिम लढतीत कसे खेळावयाचे असते याचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. त्याचा उपयोग त्यांना भविष्यात होईल.
या स्पर्धेतील खेळपट्टी, क्षेत्ररक्षणाचे नियम आदींमुळे फलंदाजांचे वर्चस्व होते. असे असले तरी अंतिम सामन्याचा मानकरी जेम्स फॉकनर व मालिकेचा मानकरी मिचेल स्टार्क या गोलंदाजांना दिल्यामुळे गोलंदाजीस महत्त्व देण्यात आले. क्षेत्ररक्षणाच्या बंधनांबाबत मायकेल क्लार्क, महेंद्रसिंह धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुन्हा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे मत व्यक्त करताना गोलंदाजांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे.
विश्वचषक स्पर्धा अनेक ज्येष्ठ खेळाडूंसाठी निवृत्त होण्याचे व्यासपीठ असते. सर्वोत्तम कामगिरी करीत कीर्तीच्या शिखरावर असताना घेतलेली निवृत्ती नेहमीच समाधानकारक असते. क्लार्क याने अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक केले, तसेच पुन्हा आपल्या देशास विश्वचषक जिंकून दिला. तो अतिशय आनंदाने निवृत्त होत आहे. डॅनियल व्हिटोरी, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, ब्रॅण्डन टेलर, मिसबाह उल हक यांच्यासाठी निवृत्त होण्यापूर्वीची ही स्पर्धा अतिशय संस्मरणीय ठरली आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेटची सेवा त्यांनी केली आहे. व्हिटोरी याने उपविजेतेपद मिळविणाऱ्या संघात आपला वाटा होता हे सिद्ध केले. संगकाराने लागोपाठ चार शतके टोलवीत निवृत्ती सुखकारक केली.
आपल्यासाठी ही स्पर्धा भविष्यासाठी उत्तम संघबांधणीकरिता खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण या स्पर्धेत खेळलेल्या पंधरा खेळाडूंपैकी केवळ चारच खेळाडूंना विश्वचषकाचा अनुभव होता. अन्य खेळाडूंना ही स्पर्धा नवीनच होती. या पाश्र्वभूमीवर आपल्या संघासाठी ही स्पर्धा सकारात्मक होती. विराट कोहलीकडे भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. मात्र त्याने खेळाप्रमाणेच संयमावरही नियंत्रण ठेवले पाहिजे. नेतृत्व करणे ही काही सोपी गोष्ट नाही. वेगवेगळ्या सामन्यांमधून शिकून त्यानुसार आपला अनुभव समृद्ध करण्यावर त्याने भर दिला पाहिजे. येथील अनुभवाची शिदोरी घेत आपल्या युवा खेळाडूंनी आपण कोठे कमी पडलो, विजेतेपद मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे.
सुलक्षण कुलकर्णी