सायकलवर टांग मारून भटकंती करणारे ग्रुप असतात किंवा त्यासाठी एकटेदुकटे घराबाहेर पडणारेही बहाद्दर असतात. पण सायकलवरून नक्षलग्रस्त प्रदेश पालथा घालणारे हे साहसवीर विरळाच!

कधी कधी पुस्तकंच आपल्या जगण्याला दिशा देतात. ऐन गद्धेपंचविशीत काही चौकटीबाहेरची पुस्तके वाचली. जगदीश गोडबोले या अवलियाच्या ‘मोहीम इंद्रावतीची’ या पुस्तकाने मनात घर केले.
इंद्रावती नदी, तिचे दुर्गमत्व, तेथील गोंड व माडीया जमातीचे आदिवासी या साऱ्याविषयी जिज्ञासा निर्माण केली.
पुढे ‘साधना’ साप्ताहिकामधील देवेंद्र गावंडे यांचे ‘गडचिरोलीतील नक्षलवाद’ या विषयावरील अभ्यासपूर्ण लेख वाचून गडचिरोली व नक्षलवादविषयीही जाणून घ्यायचं औत्सुक्य वाढलं.
बस्तर, छत्तीसगडमधील जंगल, तेथील जीवनमान यांच्याविषयी बातम्याही वारंवार वाचनात येत होत्या. या साऱ्याचा परिणाम असा झाला की, त्या भागात ‘फिरस्ता’ म्हणून जावं असं वाटू लागलं.
खूप र्वष पदभ्रमण व गिर्यारोहण या छंदात रमलो. नंतर पुढच्या वळणावर सायकलिंगच्या वेडानं पछाडलं. गडचिरोलीसारख्या आपल्याच राज्याच्या भागात ‘सायकल’ या अतिसाध्या वाहनानेच फिरायचा विचार मनात चमकला. आशीष आगाशेसारख्या जाणत्या मित्राला ही कल्पना सांगितली. त्यातील धग व धैर्य त्याला जाणवले. जायचंच असं ठरवलं. मग सुमित पारिंगे, भूषण कानिटकर व राहुल सारखे नवखे तरुणही सोबतीला आले.
सुनील गोवरदीपे हा तरुण गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात लहान मुलांचं शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करतो. त्याच्या मुंबईतील काही कामासाठी तो घरी राहून गेला होता. तो तेथील सामान्य व साधी, गरीब जनता, बेरोजगारी, जनसुविधांचा अभाव यांविषयी पोटतिडकीने बोलायचा. त्यानेही त्या भागात यायचं आमंत्रण दिलंच होतं.
२०११च्या डिसेंबर महिन्यात आम्ही पाच जण मुंबई ते चंद्रपूर या रेल्वे मार्गावरील वणी या स्टेशनवर सायकल्ससह उतरलो. गडचिरोली या जिल्ह्य़ातील मुख्य ठाण्यापासून चामोर्शी-घोट-मुलचेरा-गट्टा- एटापल्ली- सूरजगड- हेमलकसा- भामरागड- अलापल्ली- रेपनपल्ली- सिरोचा- सोमनुर असा साधारणत: ६०० किमीचा प्रवास आम्ही सायकलने करणार होतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल असलेला हा जिल्हा. या जिल्ह्य़ात ६० टक्क्यापेक्षा अधिक जंगल आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस असणाऱ्या या जिल्ह्य़ाच्या सीमा तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांना मिळतात. तेलंगणा व छत्तीसगडमध्येदेखील नक्षलवाद फोफावलेला.
वणीहून चंद्रपूर व चंद्रपूरहून गडचिरोली असा पहिला टप्पा होता. आम्ही चंद्रपूरच्या जवळ जाऊ लागलो आणि वातावरणातला भकासपणा जाणवायला लागला. डिसेंबरचे दिवस असूनही हवेत खूप धूळ, काजळी होती व कोळशाच्या सूक्ष्म कणांनी वातावरण भरून गेलं होतं. साऱ्या आसमंताला एक धुरकट करडय़ा रंगाची शेड होती. सगळीच हवा खूप प्रदूषित वाटली. या वाटेवर एक प्रचंड मोठी कोळसा खाण पाहण्यासाठी उतरलो. पण खाणीत उतरण्याची लिफ्ट दुपारी तीन वाजता बंद झाली होती म्हणून प्रशासनाने नकार दिला. पण जवळचीच उघडी खाण (ओपन माइन) दाखविली. चंद्रपुरात व परिसरात खाणींचे दोन प्रकार आहेत. बंद (Closed mine) खाण व उघडी (Open mine)खाण. बंद खाणीत एका खोल बोळीतून लिफ्टने आपण खाणीच्या अंतर्गात प्रवेश करतो. वर जमिनीचे कवच अभेद्य असले तरी भूगर्भातील आतला भाग पोखरून काढलेला असतो.
दुसरी उघडी खाण म्हणजे जमिनीच्या वरच्या थरापासूनच खोदकाम सुरू करून प्रचंड प्रमाणात माती उपसून काढतात. एक महाकाय खड्डा त्यामुळे तयार होतो. आम्ही पाहिलेली खाण याच प्रकारातील होती.
जागोजागी खाण कामगार, डम्पर, पोक्लेन, पाइप्स असे काय काय दिसत होते. जिथे कोळसा होता तिथे धग, विस्तव व धूर दिसायचा. त्यावर पाइपने पाणी मारण्याचे काम अव्याहत चालू होते. अशा उघडय़ा खाणींमुळे वातावरणात धूळ, कोळशाच्या काजळीचे कण असं सारं प्रसारित केलं जातं.
शहरांना प्रचंड ऊर्जा लागते. ती कोळसा वापरून तयार केली जाते. आपण शहरवासीय रोषणाई करतो पण इथे वणी-चंद्रपूरवासीय त्यासाठी श्वसनाचे राग सहन करताहेत. अतिशय प्रदूषित हवेत राहताहेत.
खाणीच्या आसपास तर प्रत्येक घरांच्या पत्र्यांवर, गाडय़ांवर, छपरांवर सगळीकडेच ही काळी धूळ साचून राहिलेली दिसली.
कोळशाच्या खाणींमुळे भूगर्भाची झालेली प्रचंड उलथापालथ, उपसलेल्या मातीचे डोंगराएवढे ढिगारे, हवेतील उष्मा आणि धूळ पाहिली. वाटले या कोळशाद्वारे निर्माण होणाऱ्या औष्णिक ऊर्जेऐवजी सौर ऊर्जा तर खूपच पर्यावरणस्नेही. अगदी आण्विक ऊर्जाही परवडली.
वाटेत वणी व चंद्रपूरच्या स्थानिकांशी बोलणे झाले. बऱ्याच जणांचे म्हणणे एकच की, आम्ही आतून पोखरलेल्या एका तरंगत्या शहरावरच राहतोय. पृथ्वीच्या पोटातील मोठी हालचाल वा एखाद्या मोठय़ा भूकंपामुळे हे सारेच शहर जमिनीखालच्या खाणींच्या पोकळीत कायमचा विसावा घेईल, अशी भीती त्या साऱ्यांनाच नेहमी वाटत राहते. एक अख्खे शहर या भीतीच्या सावटाखाली कित्येक दशकं जगते आहे.
गडचिरोलीच्या दिशेने सायकलिंग सुरू झालं आणि आसमंतातला फरक जाणवू लागला. हवा स्वच्छ वाटू लागली. भकासपणा नाहीसा होऊन जंगलाचा हिरवागार भूभाग वारंवार दृष्टीस पडू लागला.
आता रस्त्यावरील वाहतूक तुरळक होऊ लागली होती. आमच्या सायकलिंगच्या हेल्मेट घातलेल्या अवताराकडे परग्रहावरील प्राणी पहावा अशा नजरेने लोक पाहात होते. थांबलो की आसपास पन्नासएक लोकांचा गराडा पडायचा.
‘मुंबईहून गडचिरोली जिल्ह्य़ात सायकलवरून येऊन पाहण्यासारखं आहे तरी काय,’ हाच सगळ्या स्थानिकांना प्रश्न पडायचा. आम्ही आमच्या परीने त्यांचं शंकानिरसन करायचा प्रयत्न करायचो. जंगल पाहाणं, स्थानिकांना भेटणं, त्यांचं जगणं अनुभवणं अशी आमची उत्तरं त्यांना पटवताना आमचं शहरीपण तोडकं पडायचं.
चौकाचौकात, नाक्यावर वा एखाद्या टपरीजवळ रिकाम्या माणसांचे जथेच्या जथे घोळका करून असायचे. कोणतीही कार्यालयं नाहीत, उद्योगधंदे नाहीत आणि शेतीही नाही त्यामुळे बेकारी, रिकामपण व कंगाल अवस्था त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसायची. आम्ही आमच्याच पैशातून हा उपद्व्याप करतोय हे त्यांच्या पचनी पडत नसे. ‘सरकारी बाबू आहात का?’ किंवा ‘किसने फंडिंग किया?’ असे त्यांचे प्रश्न ऐकून इथे एक तर सरकारीच अधिकारी येतात किंवा फिरकले तर फंडिंगवर चालणाऱ्या एनजीओंचे कार्यकर्तेच येत असतील, असा आम्ही समज करून घेतला.
रस्त्याच्या दुतर्फा आता हिरवंगार जंगल होतं. दिवसातून एखाद-दोनदा कधी तरी एखादी एसटी वा एखादा ट्रक आणि एखाद-दुसरी मोटारबाइक जाताना दिसायची. पुणे-मुंबई-पनवेलच्या वाहतूक गदारोळाला सरावलेल्या आपल्यासारख्याला ही रस्त्यावरची नीरव शांतताही भयाण वाटेल, पण निसर्गप्रेमामुळे व पदभ्रमणाच्या संस्कारामुळे अशा शांततेतला आनंद, त्यातील निरवता मनाला स्पर्शून जाई.
आता आम्ही ऐन नक्षलग्रस्त प्रदेशात प्रवेश केला होता. सुरुवातीला लोक बिचकत पण विश्वास वाटला की मोकळेपणाने बोलत.
आलापल्लीच्या वाटेवर लाहिरी जवळच होतं. लाहिरी गाव लक्षात राहिलं होते ते पोलिसांच्या इथे झालेल्या हत्याकांडामुळे. नक्षलवाद्यांनी १७ पोलिसांना इथे यमसदनास पाठविले होते. या पोलीस ठाण्याला भेट देण्यासाठी आम्ही सायकलनेच गेलो.
एखाद्या किल्ल्याभोवती कडक पहारा असावा तसा सारा बंदोबस्त पोलीस ठाण्यासभोवती होता. आमची ओळखपत्रे पाहून व आत निरोप पाठवून आम्हाला तारेच्या कुंपणात जाऊ दिले. तिथेही मुख्य द्वारावर थांबवून अध्र्या तासाने तेथल्या इन्स्पेक्टरने आम्हाला भेट दिली. आम्ही तेथे पोहचणं हे त्या अधिकाऱ्याला वेडं व आत्मघातकी साहस वाटलं. सुरुवातीलाच त्यांनी आम्हाला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांच्या शाब्दिक फैरी संपल्यावर मग आमचे शब्द व उद्देश त्यांच्या कानापर्यंत पोहचले. इथल्या बंदोबस्ताच्या कामाने व सतत सतर्क राहण्याच्या दक्षतेमुळे ते बोलले, पण परत इथे असे येऊ नका हे बजावूनच.
इथल्या कार्यालयात शहीद झालेल्या साऱ्या पोलिसांचे फोटो लावले होते.
जागोजागी बंकर व आडोशाआडून मशीन गन घेऊन जागता पहारा देणाऱ्या जवानांचा हात हालवत आम्ही निरोप घेतला, तेव्हा इथे शस्त्र व अधिकार असूनही पोलीस किती भेदरून आहेत ते कळले.
आमचा सिरोंच्याचा मुक्काम कार्यकर्ता सुनील गोवरदिपे यांच्या स्नेह्यकडे असणार होता. सिरोंचाला पोहचता पाहेचता सूर्य मावळला. आम्ही पाच जण सायकलने गावात शिरायला आणि कमांडोच्या वेषातील अनेक माणसांनी गावात प्रवेश करायला एकच गाठ पडली. ते सारे बंदुका, स्टेनगन्स, मशिनगन्स बरोबर वागवत होते, पण त्या साऱ्यांची पार दैन्यावस्था झाली होती. दाढीचे खूट वाढलेले, युनिफॉर्म अस्ताव्यस्त झालेले आणि पाणी व भुकेने जीव खायला उठलेला. त्यातील वीस-पंचविसांनी आमच्यातल्या एकेकाला घेरले. काय आहे खायला, काही तरी द्या, निदान पाणी तरी द्या असं ते सीआरपीएफचे जवान आमच्याकडे मागत होते. आमच्यासोबत या वेळी सुनीलभाऊ होते. त्यांना वाटले हे सारे नक्षलवादीच आहेत. जंगलातून थेट ते गावातच शिरले आहेत. सुनील भाऊंनी आम्हाला पाहिले. त्यांच्यापासून दूर नेले. सुरक्षित ठिकाणी उभे केले. मग दहा मिनिटांतच ते बातमी काढून आले की हे सारे सीआरपीएफचे जवान आहेत आणि गेले दोन-तीन दिवस त्यांचा रेडिओ संपर्क तुटल्यामुळे ते जंगलात चुकले होते, अन्न-पाण्यावाचून भरकटत होते. विशेष म्हणजे गावातील लोक त्यांना मदत करायला फारसे उत्सुक नव्हते असं चित्र दिसलं.
त्यानंतर मुलचेराहून हेमलकसाला. गट्टा मार्गे गेलो. हा पूर्ण दगड-मातीचा रस्ता होता. सभोवती घनदाट जंगल होतं. वाटेत काही ओढे होते. अनेकांनी आम्हाला हा रस्ता टाळण्याचा सल्ला दिला होता, कारण इथल्या दाट जंगलाच्या आधाराने नक्षलवादी वावरताना दिसत.
आम्ही हाच रस्ता निवडला, कारण आम्हाला असंच काहीसं वेगळं पाहायचं होतं, अनुभवायचं होतं. पूर्ण दिवस आम्ही सायकलिंग करीत होतो, पण रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. हे अक्षरश: शब्दश: खरं. कारण जंगलातील बहुतेक प्राणी-पक्षी जंगलात वावरणाऱ्या नक्षलवाद्यांनी मारून खाल्ले आहेत.
कधी काळी बनवलेला हा मातीचा रस्ता खाच-खळगे, दगड-गोटे यांनी खूप दैन्यावस्थेला पोहचलेला आहे. किर्र्र जंगलातून जाणाऱ्या या रस्त्याला चढ-उतार आहेत व वळणावळणांची वाट आहे. पुढच्या वळणावर काय असेल अशी धाकधूक आम्हाला नेहमीच असायची.
एका उतारावरून धडधडत उतरलो तर समोर ओढा व पूल दिसला. वेगाने खाली पुलाजवळ आलो आणि करकचून ब्रेक्स दाबले. पुलाच्या आधीच मोठा खंदक खणून ठेवला होता. दिवस होता म्हणून आम्ही खंदकात वेडेवाकडे पडण्यापासून वाचलो. रात्रीची वेळ असती तर? असा प्रश्न स्वत:ला करीत आम्ही पुलाला चालत वळसा घातला व ओढा ओलांडला. पुलाच्या पलीकडील बाजूलाही तीच गत- तसाच खंदक. आमच्या हालचाली व प्रतिक्रिया पाहात नक्षलवादी जंगलात आसपासच कोठे तरी असतील हा विचार मनात आला आणि त्यामागचं गांभीर्य चटकन कळालं. आम्ही पाचही जण एकदम शांत झालो. एकदम सन्नाटा पसरला. तो चढ चढून वरती जातोय तर त्या आडवाटेवर एका कॉम्रेडचे लाल तपकिरी रंगाचे स्मारक दिसले. आम्ही नक्षलवाद्यांच्या ऐन बालेकिल्ल्यात होतो.
पुढे तर एका ओढय़ावरचा एक अख्खा पूलच उडवून दिलेला दिसला. मग सतत एका धास्तीखाली सायकलिंग करीत राहिलो. हेमलकसाला पोहचलो तेव्हा रात्र झाली होती. प्रकाश आमटय़ांच्या प्रकल्पात राहिलो आणि माणसात आल्यासारखं वाटलं.
जिथे जिथे चांगले रस्ते लागत तिथे रस्त्यावरच स्थानिक भाषेत पण लाल रंगात काही काही लिहिलेले दिसे. अनेक ठिकाणी रस्त्यावर टाकलेली लाल पत्रके दिसत. सरकारने चालवलेल्या अत्याचारांची त्यात उजळणी असे. आम्ही भीत भीत त्यातील एक पत्रक उचललेच. पुढे ते एका जाणत्या व्यक्तीकडून वाचून घेतले. नक्षलवादाने येथे गावागावातून हात-पाय पसरले आहेत. निदान लोक त्या दडपणाखाली दिसतात व आपल्याशी बोलतानाही सावध असतात.
जंगल व नक्षलवाद यासाठी गडचिरोली जेवढं प्रसिद्ध आहे, तेवढंच ते देवाजी तोहफा या वयोवृद्ध पण नेक कार्यकर्त्यांमुळे देश पातळीवर पोहचले आहे. गडचिरोलीमधील लेखा मेंढा हे गाव प्रसिद्ध आहे ते देवाजी तोहफांच्या कार्यामुळे. ‘दिल्लीत देशाचे सरकार, मुंबईत राज्याचे सरकार आणि आमच्या गावात आमचे सरकार’ असं ब्रीदवाक्य घेऊन ते गेली कित्येक दशकं झपाटल्यागत काम करत आहेत. सरकारी बाबूंच्या लालफितीच्या कारभाराला कंटाळून व तेथल्या बेरोजगारीवर उपाय म्हणून गडचिरोलीतील बांबूकटाईची पद्धतशीर योजना त्यांनी बनविली. त्या वेळापत्रकाप्रमाणे जंगलाचे भाग करून गावकरीच आता गरजेनुसार बांबूकटाई करतात व गावकीच्या माध्यमातून पेपर मिलला बांबू विकतात. एकदम भसाभसा, अनियंत्रितपणे बांबूकटाई न होता एका एका पट्टय़ातील बांबूकटाई केल्याने व लगेचच त्या पट्टय़ात बांबूची रोपे लावल्याने उपज व तोड यांची एक साखळी तयार होऊन जंगल पूर्ण ओसाड होत नाही.
देवाजी तोहफांचा हा ‘आमच्या गावात आमचे सरकार’ असा उपक्रम इतका नावाजला गेला, की देशाचे तत्कालीन वन व पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी लेखा मेंढाला २०१२ ला भेट दिली होती. गावकऱ्यांना त्यामुळे नियमित काम व उत्पन्न मिळते. तरुणांची बरोजगारी कमी होते. लेखा मेंढामध्ये एक दिवस आम्ही देवाजी तोहफांचा पाहुणचार घेऊन राहिलो होतो. गाव छान आखीवरेखीव व तेवढेच स्वच्छ आहे.
बदलत्या गडचिरोलीचा असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आम्ही शेवटी सिरोंचा हे गडचिरोलीचे दक्षिण टोक गाठले. इथे महेंदर सदनपु व त्याची आई (अम्मा) यांच्या घरी राहिलो. ते कुटुंब म्हणजे सुनील भाऊंचे दुसरे घरच. आमचा गडचिरोलीतील हा सायकल प्रवास अखेरच्या टप्प्यात आला होता. येथून जवळच असलेल्या सोमनुर गावात गेलो. इथे त्रिवेणी संगम आहे. गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा. एक अनाघ्रात, शांत, स्वच्छ व निर्मळ निसर्गस्थळ होते ते. इथले काही गोटे मी आठवण म्हणून सोबत घेतले. गडचिरोलीच्या प्रवासाची आठवण म्हणून आणि आम्ही फेरीने नदी ओलांडून पुढे हैदराबादमध्ये प्रवेश केला. गडचिरोलीचा अध्याय येथे संपला होता, पण ते नवीन उद्योगाचं बीज रोवूनच.
२०११च्या डिसेंबर महिन्यात केलेल्या या आगळय़ा वेगळय़ा सायकल प्रवासाच्या आठवणी आम्ही अगदी युरोप सायकल यात्रा करेपर्यंत आठवत होतो. त्या आठवणींचं व वेडगळपणाचं गारुड एवढं की तेव्हा आमच्या सोबत असलेल्या सुमित पारिंगेने ते वेड मनावर घेतलं. आणि २०१४च्या नाताळच्या सुट्टीत काय करावं असा प्रश्न या समवयस्क मित्रांना पडला तेव्हा त्यांनी पनवेल ते ओरिसा हा प्रवास नक्षलग्रस्त प्रदेशातून करायचं असं ठरवलं. प्रसाद कर्वेने हेमलकसानंतर हायवे सोडून असा काही आतला मार्ग काढला, की त्या मार्गावरून सायकलने जाणे म्हणजे एक दिव्यच होते.
२४ डिसेंबर २०१४ रोजी तेजस मराठे, सुमित पारींगे, प्रसाद कर्वे, सर्वेश अभ्यंकर, प्रिसिलिया मदन आणि मी असे आम्ही सहा जणांनी सायकलने पनवेल सोडलं ते ओरिसातील (ओदिशा) कोणार्कच्या दिशेने ‘पश्चिमसे पूरब की ओर..’ असं काहीसं मनात योजून.
माळशेज घाट, नगर, परभणी, नांदेड, आदिलाबाद व बल्लारशहा असं एक एक मागे टाकत ११०० किमीचा प्रवास करून बाराव्या दिवशी हेमलकसाला पोहोचलो.
हेमलकसाला पोहोचण्यापूर्वी नांदेडनंतर आम्ही भोकरमार्गे भैसा या तेलंगणामधील गावात पोहोचलो. आता रस्ता उत्तम होता, पण वाहतूक तुरळक होती. मधेमधे जंगलाचा प्रदेश लागे. रस्ते एकदम सामसूम होते. आता भाषाही बदलली होती. ‘निर्मल’ अशा सुंदर नावाचं गाव मागे टाकलं. आता आम्ही परत महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हय़ात प्रवेश करणार होतो. बल्लारशहाला पोहोचता पोहोचता पावसाची सुरुवात झाली. इथे वनखात्याच्या क्वार्टर्समध्ये राहिलो आणि अर्धी रात्र गळक्या छपराखाली जागून काढली. सकाळी इथल्या वनखात्याचा डेपो पाहिला. लाकडाचे लाखो ओंडके आकारमान, घनता व जातीप्रमाणे ब्लॉक क्र. टाकून रचून ठेवले होते. इथल्या म्युझियममध्ये सागाच्या झाडाची दोन महाकाय खोडं निगुतीने राखून ठेवली आहेत, ते पाहाण्यासारखं आहे.
हेमलकसाला आमटे कुटुंबीयांनी आम्हाला चांगला वेळ दिला. स्वत: जगनभाऊही आमच्यासोबत होते. गंमत म्हणजे त्या दिवशी प्रकल्पावर ८०-९० पर्यटक राहायला होते. आम्ही पनवेलहून १२०० किमी सायकल चालवत आलोय हे तेथे सगळय़ांना एव्हाना समजले होते. सकाळी निघताना त्या साऱ्यांनी आम्हाला शुभेच्छा तर दिल्याच, पण आमचे पत्ते व सहय़ादेखील घेतल्या. काही वेळ कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा लखलखाट झाला. आमच्यात जणू नवीन ऊर्जा भरली गेली.
आदल्या रात्री प्रसादने योजलेल्या रस्त्याविषयी खोलवर चौकशी करून घेतली. हेमलकसा सोडताना आश्रमशाळेतील मुलं स्वत:हून प्रवेशद्वारापाशी आली होती. त्यांचा निरोप घेऊन आम्ही हेमलकसा सोडलं. भामरागडनंतर दोन-चार किमीवर मुख्य रस्ता सोडून आम्ही जंगलात मातीचा रस्ता धरला. आता रस्त्याचा व आसमंताचा नूर एकदमच पालटला. आम्ही वेगळय़ाच श्रांत व हिरव्याकंच जगात प्रवेश केला होता. हा मातीचा रस्ता अजब होता, एखाद्या अभयारण्यात शोभावा असा. रस्त्यावर हिरवेगार गवत होते. वाटसरू चालण्यापुरता या मार्गाचा वापर करीत असावेत, कारण तेवढी एकच पाऊलवाट त्या गवताळ मार्गावरून पुढे सरकत होती. रस्ता सरळसोट असल्याने एखाद्या हिरव्याजर्द बोगद्यात आपण शिरतो आहोत असे वाटत होते.
खूप पुढे एक भलं थोरलं झाड वाटेत आडवं पडलं होतं. वाट त्या झाडाला वळसा मारून पुढे गेली होती. आम्हीही सायकल चालवतच त्या झाडाला वळसा मारून पलीकडे जाऊन थांबलो, कारण एक सवंगडी मागे राहिला होता. मागे राहिलेल्या भिडूची आम्ही गंमत करायचं ठरवलं. आम्ही मुद्दाम मागून येणाऱ्याकडे दुर्लक्ष करत गप्पा मारत राहिलो. आम्ही पडलेल्या झाडाच्या पलीकडे पोहोचून थांबलोय म्हटल्यावर त्याने इथेतिथे न पाहता सायकल उचलून खांद्यावर घेतली व मोठय़ा मेहनतीने ते आडवे झालेले झाड ओलांडून तो आमच्याजवळ पोहोचला. तेव्हा आम्ही सारेच मोठमोठय़ाने हसलो. तो गोंधळून गेला. हसणं ओसरल्यावर त्याला बाजूने वळसा मारून येणारी वाट दाखवली. मग तोही हसू लागला.
दूरवर एका छोटेखानी गावाची चिन्हे दिसू लागली. हेमलकसामधील लोकांनी आम्हाला या वाटेची चांगलीच कल्पना देऊन ठेवली होती. अनिकेत आमटे व त्यांच्या पत्नी काही महिन्यांपूर्वीच या वाटेने छत्तीसगडपर्यंत जाऊन आले होते.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोडराज या गावात आम्ही प्रवेश केला. डावीकडे महाराष्ट्र पोलिसांचा मोठा कँप होता. सभोवती तारेचे कुंपण व जागता पहारा. आम्ही स्वत:हूनच आत गेलो. आमची माहिती दिली. इथे आमची ओळखपत्रं पाहून त्याच्या झेरॉक्स प्रती काढून घेतल्या. पोलीस अधिकारी मैत्रिपूर्ण वागले. बाकीच्या जवानांना आमचे खूप कौतुक वाटले. विशेषत: एक मुलगी एवढय़ा दूरच्या प्रवासाला येते हे त्यांच्यासाठी विस्मयकारकच होतं. त्यांच्या शुभेच्छा घेत आम्ही दोडराज गावातून उजवीकडे जाणारा रस्ता धरला.
थोडय़ाच वेळात वाट एका ओढय़ात उतरली. रुंद असला तरी ओढय़ात गुडघ्याइतकंच पाणी होतं. आमच्यातील दोघांनी सायकल चालवीत, तर इतरांनी सायकल ढकलत तो ओढा पार केला. या ओढय़ाचं नाव जुवी नाला.
पुढे मेडदापल्ली नावाची वस्ती लागली. आमच्या चारही दिशांना जंगल होतं आणि जंगलाला अंत नव्हता. जंगलातून जाणारा हा एकमेव वाटसदृश रस्ता, आडवे येणारे ओढे व मधेच दिसणारी तुरळक घरांची एखादी वस्ती असं दृश्य वारंवार दिसत होतं.
वस्ती जवळ आली की, त्याआधी रस्त्याच्या बाजूला काही दगडी व काही लाकडी शिल्पं दिसायची. या परिसरात मृत पावलेल्या व्यक्तीला पुरतात, त्यावर त्याच्या आवडीच्या वस्तूंचे वा इच्छेचे शिल्प बनवतात. काही चौथऱ्यांवर एखादा मोठय़ा पक्ष्याचा आकार, एखाद्या प्राण्याचा आकार असे, तर कधी एखाद्या दगडी खांबावर चक्क विमानाची आकृती असे. सरपंच वा गावातील आदरणीय व्यक्ती असेल, तर त्याच्या दफनभूमीवर चक्क खुर्ची ठेवलेली दिसे. आम्ही या शिल्पांना स्मशानशिल्प असं नाव ठेवलं. एका मोठय़ा स्मशानशिल्पावर तर असंख्य पक्षी, प्राणी, कीटक व फुले छान रंगवून ठेवली होती. हे शिल्प लक्ष वेधून घेईल इतकं स्वच्छ व सुंदर होतं. मृत्यूची इतकी सुंदर आठवण ज्या जमातीत जपतात त्या जमाती मला आपल्या समाजापेक्षा अधिक सिव्हिलाइज वाटल्या.
निलगुंडा ही आदिवासी वस्ती मागे टाकली. वाटेत कॉम्रेडचे उभारलेले सिमेंटचे, तपकिरी लाल रंगाचे मोठे स्मारक दिसले. स्मारकावर काही लिहिलेय का, कोणाचे स्मारक आहे, हे पाहण्यासाठी आम्ही रेंगाळलो. मागून काही आदिवासी खांद्यावर कावडी घेऊन येताना दिसले. जवळ आल्यावर पाहिले तर त्यांच्या खांद्यावर मोठमोठय़ा व मजबूत दोरखंडाच्या जाळय़ा होत्या. जंगलात प्राणी पकडण्यासाठी ते चालले होते.
पुढे अप्पर कवंडे ही महाराष्ट्रातील शेवटची वस्ती लागली. इथे दोन वर्गाची एक शाळा होती. शिक्षकांनी हाक मारून बोलविले. आमच्या या उपद्व्यापावर ते दोन्ही शिक्षक (त्यातील एक मुख्याध्यापक) जाम खूश झाले. चहा बनवायची काही सोय नव्हती, पण त्यांनी आम्हाला त्यांच्याकडील साखर देऊ केली. आम्हीही ती मोठय़ा प्रेमाने घेतली. प्रवासात भेटणारी काही माणसं साखरेसारखी असतात, तर काही साखरेसारख्या गोड आठवणीही सोबत देतात. दोन्ही शिक्षकांचे आभार मानले आणि पुढे निघालो.
आम्हा साऱ्यांनाच आता उत्साहाचं एक भरतं आलं होतं. कारण काही किमी अंतरानंतर आम्ही इंद्रावती नदी ओलांडणार होतो.
इंद्रावती नदीच्या अल्याड महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा तर पल्याड छत्तीसगड. इंद्रावती नदी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांच्या बरोबर सीमेवरून वाहते. भारतात हे असं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळतं, म्हणजे नदीचा वापर सीमारेषा म्हणून केल्याचं.
इंद्रावती नदी ओलांडल्यावर आम्ही छत्तीसगड राज्यात प्रवेश करणार होतो. त्याच ओढीने जंगलातील या निर्जन वाटेने आमचं सायकलिंग चालू होतं.
मोठी नदी जवळ येत असल्याचं जाणवू लागलं. चाकाखालील वाट दमट-ओलसर वाटू लागली. एक तीव्र उतार लागला आणि वाटेवर चिखलही. चाकं चिखलात रुतू लागली. नाइलाजास्तव खाली उतरलो, समोर पाहत चालू लागलो. एक मोठी नदी समोर होती.
नदीच्या दोन्ही तिरांवर हिरवीगार झाडं, नितळ पाणी आणि वर निरभ्र निळंभोर आभाळ. इतका रम्य देखावा या प्रवासात प्रथमच पाहत होतो. नदीचं पाणी कुठे कुठे साठून राहिलं होतं तर काही वेळा दगडगोटय़ांतून फेसाळत झुळुझुळु वाहत होतं. अद्भुत नीरव शांततेचा भंग होत होता तोही या झुळुझुळु अशा नाजूक मुलायम जलस्वरांनी.
आम्ही सारेच इथे रमलो. स्वच्छ नितळ पाण्यात आंघोळी केल्या. सायकली धुतल्या. काही बाही खाल्लंही. आम्हाला हे रुंद पात्र पाहून हीच इंद्रावती वाटली. नदी रुंद असली तरी मधे मधे वाळू, दगड-गोटे असं काही काही होतं. पाणी उथळ होतं. नदीवर पूल नव्हताच. चालतच पलीकडे जाऊन पुन्हा रस्त्याला लागलो. इंद्रावती पार केली या भ्रमातच.
आता पुन्हा वाट अरुंद झाली. नुंगूर नावाची वस्ती लागली. सारे आदिवासी विस्मयाने आमच्याकडे पाहत. आम्ही त्यांना हात करायचो. त्यातील काही कचरत, बिचकत पण लहान मुलं गलका करायची, धावत भेटायला यायची, सायकलींकडे उत्साहाने पाहत राहायची मुलं. आम्हालाही छान वाटायचं. त्यांच्या स्मृतिपटलावर एक वेगळाच ठसा आम्ही उमटवत असू का असा गुदगुल्या करणारा गोड प्रश्न आम्हाला पडायचा.
नुंगूर गावातून दोन वाटा फुटतात. इथेच कळलं की, इंद्रावती नदी पुढे आहे. मागे ओलांडलेली नदी एवढी रुंद तर इंद्रावती काय असेल याच विचारात शेता-बांधावरून जाणाऱ्या वाटेने सायकल चालवीत राहिलो. सोबत एक आदिवासी चालत होता. त्याला जेमतेम आमचे संभाषण समजले. याचं नाव ‘गोवा’ तोही नदी पल्याड चालला होता. आम्हाला धीर आला.
वाट उताराला लागली. वाटेवर वाळूचं प्रमाण वाढीस लागलं. शेवटी एकदम वाळूच्या विस्तृत किनाऱ्यालाच लागलो. समोर पाहिलं तर १००-१५० मीटर रुंदीचं अजस्र पात्र होतं. पण नदीला पाणी कमी होतं. होतं तेही इथून तिथून अनेक ओहळांच्या रूपात वाहत होतं.
सोबत चालणारा ‘गोवा’ पाण्यात शिरलाही. स्थानिकच तो, त्याला नदीला उतार कोठे आहे हे चांगलंच ठाऊक. आम्ही त्याला आम्हाला पलीकडे घेऊन जायची विनंती केली. काही काळ तो घुटमळलाही. पण आमच्या सायकल्सची पॅनियर्स काढणे. ती नीट खांद्यावर अडकवणं वगैरे आवरा-आवरीत वेळ जाऊ लागला. बहुतेक गोवाला पलीकडे जायची घाई असावी. अखेर त्याने सुरुवात केलीच. तेजसही तसाच सायकल घेऊन त्याच्या मागे निघाला. आम्ही ते दोघं कोठून कसे पात्र पार करताहेत हे पाहत राहिलो. पाण्याची खोली गुडघ्यापासून कमरेपर्यंत वाढीस गेली. तेजसची पॅनियर्स पाण्यात भिजली. कमरेएवढय़ा पाण्यात गेल्यावर पाण्याचा वेगही वाढला. त्याला आता सायकल पेलणं अवघड जाऊ लागलं. त्याचा तोल जाऊ लागला. गोवाने चार-पाच वेळा त्याला हात दिला. सायकल कधी मागून उचलली तर कधी पुढून खेचायला मदत केली. त्या दोघांची ती जिवावरची कसरत १५-२० मिनिटं चालू होती. कसा तरी एकदाचा तो गोवासह पलीकडच्या वाळवंटात पोहचला. हे एवढं मोठं पात्र, जाणकाराशिवाय ओलांडणं धोक्याचं होतं. गोवा लागलीच निघून गेला होता.
आम्ही पलीकडच्या तीरावर एक नावाडी पाहिला होता. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊन तो अदृश्य झाला होता. मी व सुमितने धावाधाव करून त्याला शोधून काढला. हातवारे करून, आरडाओरडा करून त्याचं लक्ष वेधलं व या किनाऱ्यावर बोलावलं. दहा मिनिटांनी मोठा वळसा घालून तो आमच्याजवळ आला. त्याचं नाव जोरू. त्यानं आम्हाला पाहिलं आणि होडी वल्हवत तो परत दिसेनासा झाला. आम्ही सर्दच झालो. तेजस एकटा पलीकडे, आम्ही इकडच्या तीरावर, होडीवाला निघून गेलेला. हतबल होऊन उभे होतो तर जोरू परत दिसला, मोठा वळसा घेत तो ऐन पात्रात होता. जवळ आला तर एकटय़ा जोरूने दोन होडय़ा (डोंगी, होडी नव्हे) आणलेल्या.
डोंगी म्हणजे एकाच ओंडक्यातून कोरून काढलेली अरुंद होडी. जोरू अगदी लहान चणीचा मध्यमवयीन गृहस्थ, तोही बुटका. त्याला ना धड आमची भाषा समजे, ना त्याची आम्हाला.
आमच्या खाणाखुणांवरून, सायकली पाहून त्याला एकच कळलं की, आम्हाला पलीकडे जायचं आहे. त्यानेच मग त्याच्या पद्धतीने तीन सायकल्स दोन डोंग्यांवर आडव्या ठेवल्या व एका हाताने होडी वल्हवत तो प्रसादसह पलीकडे पोहचला, तसाच दूरचा वळसा घेत, प्रवाहाला तिरका छेद देत. असे करत त्याने पाच फेऱ्यांमध्ये आमचे सामान, सायकल्स व आम्ही पाच जण यांना इंद्रावती पार नेलं. आम्हाला वाटलं आमच्याकडून जोरू निदान एक हजार रुपये तरी मागेल. आमची तशी तयारीही होती. कारण त्याने एकहाती खूप मेहनत घेतली होती. १५० मीटर रुंदीचं पात्र मोठा वळसा घेऊन पार केलं होतं. विचारल्यावर जोरूनं फक्त रुपये १२० मागितले. त्याचा सरळपणा व निव्र्याजपणा पाहून त्या तशा अवस्थेतही माणूसकी अजून टिकून आहे हे पटलं. आम्ही त्याला रु. २०० दिलेय तर त्यातलेही तो परत देत होता. तेव्हा त्याचा हात हातात घेऊन मी कपाळाला लावला. तेव्हा तो सारं समजला. दोघांच्याही डोळ्यांत पाणी तराळत होतं. आता जेव्हा जेव्हा इंद्रावती नदी आठवेल तेव्हा तेव्हा गोवा व जोरू या सद्गृहस्थांची आठवण येईल.
पलीकडे बेदरे गावात पोहचलो. हे छत्तीसगडमधील मोठं गाव. या गावात सीआरपीएफचा मोठा कँप होता. आमच्या अंधारातल्या हालचाली पाहून दरडावणं, ओरडणं झालं. समजावून पुढे निघालो. गावात सरपंचाच्या मांडवात राहिलो. जंगलग्रस्त प्रदेशात आम्ही पुन्हा प्रवेश केला होता.
आता आमचं पुढचं ध्येय चित्र ट होतं. वाटेत नेलसनारला राहिलो. इथल्या सुभाषचंद्रदास या ख्रिश्चन गृहस्थ व त्यांच्या पत्नीने आम्हाला गरम जेवण दिलं. शाळेत राहायची सोय केली. इथेही सीआरपीएफचा मोठा कँप होता. पण कोणी अंगावर खेकसलं नाही. आता रस्त्यावरून पहारे देताना सीआरपीएफचे कमांडो दिसतात. निरखून पाहिलं तर डावी-उजवीकडील जंगलातून कॅमोफ्लाज कपडे घालून सीआरपीएफचे कमांडो शस्त्रसज्ज दिसत. एकंदरच वातावरण थंड असलं तरी तंग होतं. सीआरपीएफ व छत्तीसगड पोलिसांचे जथ्थे रस्त्याने पेट्रोलिंग करताना दिसत. त्यांच्याकडे चिलखती वाहनं होती.
रस्त्यावर क्वचितच वाहनं व माणसं दिसत. इथले अनेक आदिवासी सायकलवरच जा-ये करताना दिसत. सीआरपीएफ व पोलिसांच्या जवानांसाठी मोठमोठे कँप उभारलेले जागोजाग दिसत. त्यांच्या गाडय़ाही फिरताना दिसत. पण शेकडो र्वष राहणाऱ्या स्थानिकांसाठी ना वाहतुकीची सोय, ना एसटी बस. स्थानिकांसाठी बांधलेले उभारलेले बस स्टॉप नव्हती, नव्हती समाज मंदिरं. हा विरोधाभास सतत जाचत राहिला मनाला.
चित्रकूटला जाताना बंजारन घाट लागला. खूप उंचावरून पूर्वेच्या दिशेने निरखून निरखून पाहिलं तर समुद्राच्या लाटा दिसाव्यात तशा डोंगरांच्या रांगा एका मागोमाग एक डोकावत होत्या. इतक्या डोंगररांगा ओलांडाव्या लागतील हे मनात आलं आणि शंकेची पाल चुकचुकली.
चित्रकूटचा अप्रतिम धबधबा पाहिला. तिथल्या शंकराच्या देवळात उघडय़ावर झोपलो. सोबत धबधब्याचा अविश्रांत धबाबा असा आवाज घुमत होता.
चित्रकूट सोडून निघालो तो एकदम उतारच लागला. एकदम जगदलपूरमध्ये आलो. कोणीही राहायला देईना. शाळेच्या ओवरीत रात्र काढली. इथेही येताना पोलिसांचं पेट्रोलिंग पाहिलं. अनेक जवानांशी बोलणं होई. पण कोणीही नक्षलवाद या विषयाला हात घालीत नसे.
रस्त्याच्या कडेला एखादी शाळा असे. आम्हाला सायकलवर पाहून त्यांना खूप आनंद होई. मग एकमेकांना हात हलवून आम्ही प्रेमाची देव-घेव करायचो.
छत्तीसगडमध्ये एक दृश्य मात्र आशावादी दिसलं. वाहतुकीची साधनं नसली तरी शाळेतील मुलं-मुली रस्त्याने चालत शाळेत जाताना दिसत. नक्षलवाद्यांची भीती त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत नसे. तो बालसुलभ निष्पापपणा आम्हाला मोठी उमेद व ऊर्जा देत असे. शाळकरी मुलीही जेव्हा आनंदाने हात हलवयाच्या तेव्हा भविष्याचं चित्र आशावादी वाटे.
असंच काही दिवस मजल-दरमजल करीत आम्ही धनपुंजी या गावात आलो. ही छत्तीसगड व ओरिसामधील सीमारेषा. इथे आम्ही ओरिसा या पूर्वेकडील राज्यात प्रवेश केला. कोणार्कपर्यंत पोहचायचं होतं. पूर्ण पूर्वघाट पार करायचा होता. पण गडचिरोलीतील हेमलकसा-भामरागड ते ओरिसातील धनपुंजी हा साधारणत: ८०० किमीचा प्रवास आम्ही नक्षलग्रस्त भागातून डोंगर, दऱ्या, नदी-नाले, जंगल-वाडय़ा यांतून केला होता. सोबत स्वत:ची कॉलेजात शिकणारी मुलगी होती. रात्री-अपरात्री आम्ही रस्त्यावर असायचो. कधी एखादा मागे पडायचा. पण नक्षलवाद्यांपैकी कोणीही किंवा तसं सोंग घेऊन कोणीही आम्हाला त्रास दिला नाही.
हिरवागार निसर्ग, प्राणहिता-गोदावरी-इंद्रावती अशा नद्यांतील निर्मळ पाणी, माडिया गोंड जमातींबरोबर राहणं, त्यांच्या सोबत जेवणं, वाटसरूंशी संवाद साधणं असं सारं काही अनुभवत आम्ही एक विश्वास मिळवला. जाणवलं की, मनाची कवाडं उघडी पाहिजेत व हृदयात तेवढं धैर्य पाहिजे.
धनंजय मदन response.lokprabha@expressindia.com

Story img Loader