दकाऊ.. ज्यू लोकांसाठी हिटलरनं उभारलेल्या छळछावण्यांपैकी एक. तिथे आता एक स्मृतिस्थळ उभारलं गेलं आहे. माणुसकीला कलंकित करणाऱ्या या इतिहासाची कधीही पुनरावृत्ती होऊ नये हेच हे स्मृतिस्थळ पुढच्या पिढय़ांना सांगत असतं..

डब्लीनहून पाच तासांचा प्रवास उरकून आम्ही म्युनिचला पोचलो. कोणत्याही मोठय़ा शहरात असते तशीच रस्त्यावर बेसुमार गर्दी होती. ख्रिसमसच्या स्वागताला सज्ज होऊ लागलेलं ते शहर पाहिलं नि वाटलं, दोन महायुद्धं खेळलेल्या या गावानं बरंच काही पचवलेलं दिसतंय. हे गाव इतिहासाला पाठी टाकून शांत जगतंय! इथल्या विद्यापीठांमधून जगभरातले विद्यार्थी नवं काही शिकण्यासाठी इथे येतायत. हे शहर एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कला, संस्कृती आणि विज्ञानाचं माहेरघर म्हणून होतंच प्रसिद्ध. पुन्हा तेच सुरू झालंय इथे. तरीही हट्टी मन क्षणात डोकावलंच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. म्हणू लागलं, कसं करीत असतील इथली माणसं बॉम्ब पडताना आणि अन्न संपल्यानंतर. आणि विशेषकरून दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी युद्ध जिंकल्यानंतर युद्धज्वर उतरलेलं हे गाव! किती घरांमधून लहान लेकरंबाळं आई-बापाविना राहिली असतील? एकेक विचार मन अस्वस्थ करणारा. मन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात क्षणभर डोकावून परत येईपर्यंत टॅक्सी हॉटेलच्या पोर्चमध्ये पोचलीसुद्धा.
आम्ही बऱ्यापकी दमलो होतो. खोलीत शिरल्यावर सरळ गादीला पाठ लावताच डोळे गपकन् मिटलेच. मिटल्या डोळ्यांपुढे किती गोष्टी येत राहिल्या. १९७२ सालातले समर ऑलिम्पिकसाठी सज्ज झालेले म्युनिच आणि त्या सजलेल्या ऑलिम्पिक नगरात पाडलेले ९ इस्रायली खेळाडूंचे मुडदे! झोपेतच अंगावर एकदम शहारे आले नि डबडबून घाम फुटला. मी टक्क जागी झाले आणि त्या क्षणीसुद्धा मला स्पष्ट आठवलं, त्या काळी सगळ्या वर्तमानपत्रांतून ‘ब्लॅक सप्टेंबर’ असा ठळक मथळा, त्याखाली लिहिलेली ती बातमी, हे कृत्य पॅलेस्टिनीयन ग्रुपचं आहे.. आणि मग ज्यांनी हे खून पाडले त्यांना मोसादच्या लोकांनी कसं वेचून मारलं त्यावर आधारित असलेला मी पाहिलेला चित्रपट! मन अती बेचन झालं. मग एकदम ठरवून टाकलं, दकाऊला असलेलं ‘स्मृतिस्थळ’ बघायला जायचंच.
दकाऊकडे जाणाऱ्या ग्रुपला गाठण्यासाठी स्टेशनवर गेलो, तिथेच आमचा टूर गाइड भेटला. इकडे-तिकडे फिरत असलेली पण दकाऊच्या टूरसाठी म्हणून स्टेशनवर जमलेली इतर मंडळीसुद्धा त्याच्या भोवती जमा झाली. टूर सुरू होण्यापूर्वी ओळखपाळख कार्यक्रम झाला. नावं ऐकल्यावर लक्षात आलं या टूरमध्ये अमेरिका, पोलंड, ऑस्ट्रिया आणि भारतातले आम्ही, एवढय़ा देशांची माणसं सामील झाली होती. टूर लीडर पॉल जर्मन नागरिक, पण मूळचा बेलफास्टचा. त्याचं वय असेल चाळिशीच्या आसपास.
टय़ूब रेलच्या अंडर-ग्राऊंड स्टेशनात पोचलो.. जरा दूरवर हात करत टूर गाइड म्हणाला, ‘‘हा नवा प्लॅटफॉर्म बांधताना दोन जिवंत बाँब सापडले बरं का! म्युनिचमध्ये कुठेही खोदकाम करायला घेतलं की दुसरं महायुद्ध खेळलेल्या या शहरात अजूनही बाँब सापडतात, तेसुद्धा जिवंत! दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणी आजही तशा पूर्ण गाडल्या गेलेल्याच नाहीत.’’ बोलता-बोलता तो चढला त्या डब्यात त्याच्या पाठोपाठ आम्ही सगळे चढलो आणि दुसऱ्या मिनिटाला गाडीनं स्टेशन सोडलं. दकाऊला घेऊन जाणारी ती स्पेशल ट्रेन होती. गप्पांच्या ओघात गाइडनं सांगितलं, दकाऊ मेमोरियलमधलं काम अजून चालूच आहे. जे ज्यू या कॅम्पमधून जिवंतपणी बाहेर आले त्यांच्या आठवणी आणि काही सापडलेली कागदपत्रं यांच्या आधारे इथे पुन्हा काही इमारती बांधण्यात आल्या आहेत त्यामागचा उद्देश इथे भेट देणाऱ्यांना १९३३ मध्ये अस्तित्वात आलेल्या या कॅम्पची नीट कल्पना यावी हा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ज्या इमारतीत कैद्यांना सगळ्यात प्रथम घेऊन जात असत ती इमारत २००३ मध्ये बांधण्यात आली. त्यानंतर खूप कष्ट घेऊन इथे ठेवलेल्या कैद्यांचे फोटो, रेखाटनं आणि इतर माहिती मिळवण्यात आली आणि मग इमारतीतल्या भिंतींवर लावण्यात आलेली आहे. कैद्यांना ठेवत असत त्या ओरिजनल बरॅक्स आता नाहीत, पण इथे भेट देणाऱ्यांना कल्पना यावी म्हणून त्या जागी थोडय़ा नवीन बरॅक्स उभ्या केलेल्या आहेत.
ओरिजिनल बरॅक्सचे चौथरेदेखील तुम्हाला दिसतील. इथे एक शॉर्ट फिल्मदेखील दाखवली जाते. जर कुणाला स्पेशल इंटरेस्ट असेल तर त्यांनी ती पाहावी. बाकीची माहिती मी देईनच. मुख्य म्हणजे मी एक अभ्यासक आहे ही गोष्ट मुद्दाम सांगतोय, जर तुमच्यापकी कुणाला काही शंका असतील तर जरूर विचारा, त्यामुळे माझ्याही विचारांना वेगळी दिशा मिळू शकेल.
गाडी एव्हाना दकाऊ स्टेशनात शिरली होती. आम्ही सगळेजण गाइड-बरोबर बसनं स्मृतिस्थळाकडे रवाना झालो. हा जेमतेम दहा मिनिटांचा प्रवास होता, पण एकाएकी सगळेजण एकदम गंभीर झालो होतो.
भल्या मोठय़ा लोखंडी गेटसमोर आम्ही उभे होतो. पॉल गंभीर आवाजात म्हणत होता, ‘‘१९६५ पासून हे स्मृतिस्थळ सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. इथे मानव जातीला काळिमा फासणारा इतिहास आहे. हे ठिकाण आज एक संशोधन केंद्र तसंच अभ्यास केंद्र म्हणून जतन केलेलं आहे, तेव्हा त्याच भावनेने आपण आत पाऊल टाकायचं आहे. भावनाविवश होऊन कुणीही काहीही बोलणार नाहीये. तसंच कुणाच्याही भावना दुखावतील असं कोणतंही कृत्य आपल्यापकी कुणी करणार नाहीये. आज आपण इथे आलो आहोत ते फक्त एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायला की, जे इथे घडलं ते कल्पांतीही पुन्हा कधीही कुठेही घडता कामा नये याची जाणीव ठेवण्यासाठी.
देशोदेशीचे लोक इथे येतात ते कर्तव्य भावनेनं. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला वाटत असतं, ‘माझ्या देशाचा नागरिक इथे मृत्यू पावलेला आहे, त्याला श्रद्धांजली वाहणं माझं परम कर्तव्य आहे.’ इथे येणाऱ्या असंख्य प्रवाशांच्या भावना या अशा असल्यामुळे अनेकांच्या दृष्टीने हे एक पवित्र स्थळ आहे. आपण प्रत्येकाच्या भावनांचा आदर राखणार आहोत.’’
लोखंडी फाटकाच्या एका बाजूला कॅम्पचा संपूर्ण नकाशा चितारलेला होता. त्यावरून इथल्या इमारतींची एकूण रचना समजायला मदत होते. फाटकाच्या दुसऱ्या बाजूला माहितीचा फलक होता, त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, २२ मार्च १९३३ ला दकाऊ कॅम्प सुरू करण्यात आला.. लोखंडी फाटकावर कास्टिंग केलेली अक्षरं होती, जर्मन भाषेत कोरलेली, त्याचा अर्थ होता, ‘श्रमातून मुक्तीकडे जाल!’ (वर्क विल मेक यू फ्री).
गाइड सांगू लागला, ‘‘अजून दुसरं महायुद्ध छेडलं गेलं नव्हतं. बवेरियाच्या राजधानीचा म्हणजे म्युनिचचा पोलीस प्रमुख असलेल्या हेर हिटलर यानं दकाऊ शहराजवळच्या १६ किलोमीटर जागेत २२ मार्चला राजकीय कैद्यांसाठी एक कॅम्प उभा केला तोच हा कॅम्प!’’
आम्ही लोखंडी फाटकातून आत शिरलो. गाइड कास्टिंग केलेल्या त्या अक्षरांकडे पाहत तुच्छतेनं म्हणाला, ‘‘वर्क विल मेक यू फ्री? वॉव! नाझी मंडळींचा किती हा खोटेपणा! असे शब्द वापरणं हा महादांभिक नाझी प्रशासनाचा फक्त प्रपोगंडा होता. ते बेधडक या कॅम्पला म्हणायचे, ‘लेबर अ‍ॅण्ड रि-एज्युकेशन कॅम्प!’ प्रत्यक्षात या ठिकाणी कैद्यांना वेठबिगार म्हणून वापरलं गेलं हा इथला खरा इतिहास.’’
या कॅम्पबद्दलची खरी माहिती १९३५ पर्यंत लोकांपर्यंत पोहोचू लागली होती. त्यामुळे त्या काळात एक जिंगल फार लोकप्रिय झाली होती ती अशी होती, ‘देवा मला बाँब बनव, म्हणजे कोणी मला दकाऊला पाठवणार नाही!’ पॉलचं ते बोलणं ऐकलं नि आम्ही सगळे अधिकच गप्प झालो. समोर काळाभोर गुळगुळीत डांबरी रस्ता पसरलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा पानगळीनंतर उरलेल्या रिकाम्या फांद्या सांभाळत चीड आणि पाइनचे उंचच उंच वृक्ष ताठ उभे होते. त्या उंचच उंच वृक्षांच्या पायातळी वाळलेल्या पानांचे पिवळ्या काळपट लाल निर्जीव ढीग साचले होते. त्या पाचोळ्यावरून चालताना मनाच्या एका कोपऱ्यात उमटलं, इतिहासात गडप झालेल्या अशाच काही आठवणींकडे आम्ही चाललोय का?
त्या गुळगुळीत रस्त्यावरून चालताना कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. एकप्रकारचा सन्नाटा होता वातावरणात. कदाचित प्रत्येकाच्या मनात येत असणार आज आपण केवळ एक प्रवासी म्हणून या रस्त्यावरून चाललो आहोत, पण याच रस्त्यावरून असंख्य ज्यू या छळ छावणीकडे नेले गेले होते. उच्चार न करताही प्रत्येकाच्या हालचालीत या विचाराचं प्रतििबब उमटलं असावं, कारण आम्ही सगळे फार बेचन झालो होतो.
हळूहळू चालत आम्ही आता एका इमारतीपाशी पोहोचलो होतो. ‘‘ही इमारत म्हणजे गेस्टापोचं इथलं ऑफिस होतं. या ठिकाणी सगळी नोंद ठेवली जाई. अक्षरश: ३२ हजार कैद्यांचा इथे मृत्यू झाला ही नोंदही या इमारतीत ठेवली गेलीय.’’ गाइडनं महिती पुरवली नि तो इमारतीत शिरला. त्याच्या पाठी आम्हीही आत गेलो. तिथे आतल्या भिंतींवर कितीतरी छायाचित्रं आणि माहिती लिहिलेले कागद चिकटवलेले दिसत होते. २००५ पासून इथे अनेक नव्या गोष्टींची भर घातली गेलीय असं गाइडनं सांगितलं.
दालनात फिरताना आम्ही भिंतींवरच्या त्या फोटोंकडे पाहत होतो, माहिती वाचत होतो. इथे एक चांगली गोष्ट आढळून आली; माहिती जर्मन भाषेत आणि इंग्रजीतही लिहिलेली होती. आमचा गाइड सांगू लागला, ही इमारत अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाठी होती. आपण उभे आहोत त्या दालनात एसएस गार्डस् इथे आणण्यात आलेल्या कैद्यांना ताब्यात घेत असत. एकदा का व्यक्ती त्यांच्या ताब्यात आली की तिच्या अंगावरचे सर्व कपडे उतरवले जात. सगळ्या चीजवस्तू काढून घेतल्या जात. त्यांच्याजवळचे पसे, हातातल्या अंगठय़ा, घडय़ाळं सगळं पार लंपास केलं जाई. पासपोर्ट आणि इतर ओळखपत्रंसुद्धा ताब्यात घेतल्यानंतर त्या व्यक्तीला फक्त एक नंबर दिला जाई. आपली संपूर्ण ओळखच काढून घेतलेल्या पूर्ण नग्न अवस्थेत असलेल्या त्या माणसाला व्यक्ती म्हणून आता अस्तित्वच उरलेलं नसे. त्यानंतर त्या माणसाच्या अंगावरचे सर्व केस काढले जात. डोक्याचा पार तुळतुळीत गोटा केला जाई. त्याची डय़ूटी कैद्यांमधल्याच कोणाची तरी असे. तो हे काम नीट करतोय की नाही हे पाहण्याचं काम एसएसचे गार्ड डोळ्यात तेल घालून पाहत असत. जरा कुठे छोटय़ात छोटी चूक झाली तर लगेच कडक शिक्षा फर्मावली जाई. इथल्या प्रत्येक कैद्याला एक प्लेट, स्पून आणि मग दिला जाई. भिंतीवर एका छायाचित्रात कोणाचं तरी नाव असलेली प्लेट, स्पून आणि मग या वस्तूंचं छायाचित्र मुद्दाम लावलेलं दिसत होतं. त्या चित्राकडे निर्देश करीत गाइडनं सांगितलं, ‘‘कैद्याच्या छावणीतल्या अस्तित्वासाठी या तीन वस्तू अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात; त्यामुळे प्रत्येक कैदी आपल्या वस्तूंना आपली ओळख देत असे. अशाच एका कैद्याच्या मालकीच्या, पण मग इथेच आयुष्य संपलेल्या कुण्या व्यक्तीची कॅम्पमधल्या अस्तित्वाची छायाचित्रात दिसणाऱ्या या वस्तू ही निशाणी आहे. इथे कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बॅजेस दिले जात. ज्यूंना यलो कलरच्या जोडीनं आणखी एखादा कलर असलेला बॅज दिला जाई.’’याच इमारतीत मेंटेनन्स विभाग होता. तसेच किचन आणि कपडेपटही होता. आत्ता तिथे तसं खास काही नव्हतं, म्हणून मग आम्ही तिथून बाहेर पडलो. समोरच्या भल्या मोठय़ा पटांगणाकडे पाहत गाइडनं सांगितलं, ‘‘इथल्या कैद्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची ‘कोल-कॉल’ने! त्याच वेळी इथे अनेकांना शिक्षादेखील सुनावल्या जात असत.’’
समोर मोकळ्या जागेत एक टांगलेली म्हणजे अक्षरश: हँगिंग अशी कास्ट आयर्नची कलाकृती दिसली. अंगावर शहारे आणण्याचं सामथ्र्य असलेली ती अद्वितीय कलाकृती म्हणजे कास्ट आयर्नमधले काळ्याभोर रंगाचे फक्त हाडांचे वेडेवाकडे एकमेकांत गुंतलेले सांगाडे होते. इथे कैद्यांचा झालेला छळ, त्यांच्या यातना शब्दाविना या कलाकृतीकडे बघणाऱ्याच्या काळजात उतरत होत्या. आम्ही सगळेच अगदी मूकपणे ती कलाकृती बघत राहिलो. १९९७ मध्ये ही कलाकृती इथे ठेवण्यात आल्याचं गाइडनं सांगितलं.
आम्ही पुढे जायला निघालो असताना गाइड सांगू लागला, ‘‘सुरुवातीला इथे फक्त पुरुषांना आणलं गेलं. या पुरुषांची मुलंबाळं.. बायको घरी राहिलेली. कुणाची प्रेयसी तर कुणाची जिवाभावाची मत्रीण मागे शहरात त्याची वाट पाहणारी. मागे राहिलेल्या आपल्या जिवाभावाच्या माणसांना आपल्यामुळे म्हणजे आपल्या वागणुकीमुळे कुठलाही त्रास होता कामा नये म्हणून चूपचाप अन्याय सहन करणारा हा कैदी इथे जिवंत राहायचा तो फक्त एका आशेवर, ‘माझी माणसं माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत आणि मी त्यांना नक्की भेटणार आहे. प्रत्यक्षात मात्र फार थोडय़ांच्या नशिबी हे सुख आलं.
इथे डांबून ठेवलेल्या कैद्यांच्या तुलनेत एसएसचे सनिक संख्येनं खूप कमी होते, पण ते होते सशस्त्र. त्यामुळे संख्येनं किती तरी जास्त असलेल्या कैद्यांपकी कुणा एखाद्याने अन्यायाचा प्रतिकार करायचा प्रयत्न करणं म्हणजे फक्त मृत्यूला आमंत्रण देणं किंवा आपल्या माघारी घरी राहिलेल्या प्रियजनांचा या कारणांमुळे छळ झालेला ऐकावा लागणं. या दोन्ही गोष्टी यातनामयच होत्या. त्यामुळे कैदी संख्येनं एसएस गार्डस्पेक्षा किती तरी जास्त असूनही त्यांनी कधी बंड केलं नाही की कुठल्या एसएसच्या माणसावर हल्ला वगरे चढवला नाही.
सुरुवातीच्या काळात इथली परिस्थिती अती वाईट नव्हती. शासनाला आव्हान देण्याची चूक केलेले म्हणजेच राजकीय कैदी मुख्यत: इथे आणण्यात आले होते. त्यांना मुद्दाम उपाशी ठेवणं, अत्यंत अपुरं तेदेखील केवळ कदान्न देणं असे प्रकार फारसे होत नसत. शिवाय एक अशीही सवलत देण्यात आली होती, जे कैदी आपणहून हिटलरच्या पब्लिक प्रॉपर्टीला आपली सगळी संपत्ती देऊन टाकतील त्यांना इथून बाहेर पडून परदेशी जाण्याचा पर्याय त्यांच्यापुढे ठेवला जाई. सुरुवातीच्या काळात कैद्यांना पॅरॉलवरदेखील सोडलं जाई. अर्थात त्यांना इथे परत येईपर्यंतच्या काळात ते जिथे राहात असत तिथल्या पोलीस स्टेशनला हजेरी देण्यासाठी रोज जावं लागे. आम्ही राजकैद्यांना किती व्यवस्थित सांभाळत आहोत हे जगाला दाखवण्याची नाझी सरकारला कोण हौस! या ठिकाणी अमेरिका आणि इतर ठिकाणच्या वार्ताहरांना तेवढय़ासाठी मुद्दाम बोलावण्यात आलं होतं. स्वच्छतागृहात सहा-सहाच्या ओळीत मांडलेली कमोड्स आणि अंघोळीसाठी लावलेले शॉवर्स, इथलं स्वयंपाकघर, लाँड्रीची खास सोय, मेंटेनन्स विभाग हे सगळं त्यांना आवर्जून दाखवण्यात आलं होतं. हिटलरच्या प्रशासनानं तयार केलेला हा एक आदर्श तुरुंग होता. तो बघितल्यानंतर युरोपमधला एक चांगला तुरुंग अशी या स्थळाची इमेज अनेक पत्रकारांच्या लेखनात त्या काळात उमटली.
एक सप्टेंबर १९३९ ला दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली नि इथली परिस्थिती वेगाने बिघडत गेली. सुरुवातीला इथल्याच कैद्यांच्या मदतीनं इथे सहा हजार कैदी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बरॅकस् बांधण्यात आल्या होत्या. पण आता जर्मनीनं जे देश जिंकले होते तिथून पकडले गेलेले कैदी आणि पोलंड, ऑस्ट्रियासारख्या देशांतून ज्या ज्यूंना पकडलं होतं त्यांना इथे आणण्यात आलं. बघता बघता इथल्या कैद्यांची संख्या कित्येक हजारांवर गेली. पॉल आता माहिती सांगायचा थांबला होता. कारण आम्ही सगळीच भिंतींवरची छायाचित्रं आणि माहिती वाचण्यात-बघण्यात मग्न झालो होतो.
कैद्यांची इथली संख्या जसजशी वाढत गेली तसतसा कैद्यांचा छळ प्रमाणाबाहेर सुरू झाला. त्यांना तासन् तास अटेन्शनमध्ये उभं करून ठेवलं जाऊ लागलं, शिक्षा म्हणून आधीच अर्धपोटी असलेल्यांना मुद्दाम उपाशी ठेवण्याच्या शिक्षा फर्मावल्या जाऊ लागल्या. जबर मारहाण तीदेखील क्षुल्लक कारणाने होऊ लागली.
या सगळ्या हकिगती आम्ही ज्या इमारतींमधून फिरत होतो त्या इमारतींच्या आतल्या दालनांमधल्या भिंतींवर चिकटवलेली रेखाटनं, टांगलेली छायाचित्रं या स्वरूपात आमच्यासमोर येत होत्या. इथे वर्कशॉप्स होती आणि या ठिकाणी कैद्यांकडून जबरदस्तीने कष्टाची कामं करून घेतली जात असत. सोळा ते अठरा तास काम करूनही कैद्यांना उपासमारीला सामोरं जावं लागे. अशा वेळी पोट भरल्याची भावना व्हावी म्हणून अनेक कैदी खूप पाणी पीत आणि मग आजारी पडत. अनेकांना रिकाम्यापोटी पोटात वात फिरल्यासारख्या कळा येत आणि भयंकर यातना होत असत. कधी कधी सतत फक्त पाण्यासारखे जुलाब होत. त्यातच ते मरून जात.
दिवसभर वेठबिगारी करून भयंकर थकून अर्धपोटी अवस्थेत कैदी जेव्हा आपल्या बराकीत परतत तेव्हादेखील त्यांना विश्रांती घेऊ दिली जात नसे. या फावल्या वेळात त्यांना त्यांचा बिछाना साफ करून नीटनेटका करावा लागे. प्लेट, स्पून, मग, सगळं एकदम चकाचक स्वच्छ ठेवावं लागे. या वस्तूंपकी कुठल्याही वस्तूवर वाळलेला पाण्याचा थेंब दिसला तरी कडक शिक्षा ठोठावली जाई. कैदी खिशात हात खुपसून उभा होता हे कारणदेखील जबर शिक्षा देण्यासाठी पुरेसं असे. बराकीमधला फ्लोअर एकदम चकाचक असावा लागे. तो तसा नसेल तर लगेच शिक्षा फर्मावली जाई. या सगळ्याची रेखाटनं आणि छायाचित्रं तिथे होती.
कैद्यांची एकावर एक अशी तीन बंब बेड्स ओळीनं कशी होती त्याच्या प्रतिकृती आम्ही पाहत होतो.
आतापर्यंत आम्ही इतिहासात घडलेल्या एका कालखंडाचा साक्षीदार असलेल्या कॅम्पमध्ये वावरत होतो. इथे बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या त्याबद्दल आम्ही ऐकत होतो, पण अजूनपर्यंत कुणाच्या डोळ्यात पाणी आलंय.. कुणी एकदम फार भावनावश झालंय असं झालं नव्हतं. कदाचित याआधी आम्ही ‘लाइफ इज ब्यूटिफुल’ किंवा ‘शिंडलर्स लिस्ट’ असे सिनेमे पाहिले होते. त्यातल्या चित्रित केलेल्या ज्यूंच्या छळाच्या कहाण्यांनी तेव्हा डोळे ओलावले होते. आत्ता जणू त्या सगळ्याचा रिपीट शो पाहत होतो. त्यामुळे त्या सगळ्या पाहिलेल्या चित्रपटांची आठवण गडद झाली होती एवढं खरं.
आम्ही आता पुढच्या ठिकाणी पोहोचलो होतो. गाइड म्हणाला, ‘‘१९४१ सालात जर्मनीनं रशियावर हल्ला केला नि युद्धाचं पारडं फिरलं. त्यानंतर ‘मास किलिंग’ मोठय़ा प्रमाणात सुरू झालं. हे शॉवर्स बघितलेत? ‘शॉवर घ्यायला चला!’ असं नुसतं म्हटलं तरी अनेक जण ढसढसा रडायला लागत, ती ही जागा.’’
आम्ही पाहत होतो शॉवर्सच्या खोलीआधी भिंतीला अनेक खुंटय़ा कोट अडकवण्यासाठी ठेवलेल्या होत्या. आणि मग पुढे शॉवर्स ओळीनं लावलेले.
गाइड सांगू लागला, ‘‘इथले गार्डस् विवस्त्र अवस्थेतल्या कैद्यांना म्हणत, ‘कीप युवर ओव्हर कोटस् हीयर, देन टेक शॉवर, अ‍ॅण्ड कम! हॉट सूप अ‍ॅण्ड ब्रेड इज वेटिंग फॉर यू.’ अन्नान्नदशा झालेल्या, मृत्यूकडे ज्यांना ढकललं जातंय अशा माणसांना हे असं सांगणं ही फार भयंकर, क्रूर चेष्टा होती. माणूस म्हणून जगताना याहून जास्त अपमान तो कोणता?
शॉवरचं नाव जरी काढलं तरी कैदी रडायला लागायचे. कारण शॉवर म्हणजे विषारी वायू सोडून मारणं हे सगळ्यांना माहीत झालं होतं. माणसं विषारी वायू सोडल्यानंतर नक्की मेली आहेत हे बघण्याचं काम पुन्हा एका अधिकाऱ्याला करावं लागे. त्यासाठी वरच्या बाजूला एक झरोका ठेवलेला होता.
हाडांचे सापळे झालेल्या मेलेल्या माणसांचे ढीग लागत. तिथे त्या सगळ्याची विल्हेवाट मग मास क्रिमेशनने लावली जाई.’’
गाइड पुढे झाला. त्यानं दोन मोठय़ा भट्टय़ा दाखवल्या. यात मेलेली माणसं जाळत. त्यानं न सांगतासुद्धा ते आम्हाला स्पष्ट दिसलं. भिंतीवर एक रेखाटन होतं; अक्षरश: फक्त हाडं शिल्लक राहिलेला एक कैदी हातगाडीवरून हाडांचा फक्त सापळाच उरलेल्या मृतदेहाला वाहून नेतो आहे. ते दृश्य.. ते शॉवर्स आणि विषारी वायू पसरवल्यापासून सगळी माणसं किती वेळात मेली? नीट मेली की नाही हे बघण्यासाठीचा तो झरोका पाहिला तेव्हा माझ्या पोटात अक्षरश: ढवळून आलं. मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. एकसारखा घशात आवंढाच दाटून येत होता. इतका वेळ आपण फक्त एखाद्या चित्रपटाचा रिपीट शो पाहत आहोत अशी भावना बाळगणाऱ्या आम्हा सगळ्यांचे डोळे आता गळायला लागले होते. श्वास वेगानं होत होते. मुठी वळल्या होत्या.
माझ्याकडे वळून गाइड म्हणाला, ‘‘इंडियातून ब्रिटिश फौजांमध्ये ऑक्झिलरी विभागात विशेषत: काही स्त्रिया जॉइन झालेल्या होत्या. त्यांपकी अनेक जणींना इथे कैद करून आणलं होतं. त्यांना इथेच मृत्यू आला.’’ याचा अर्थ माझ्या देशाच्या नागरिकांची आहुती पडली या नरसंहारात. मनोमन आम्ही श्रद्धांजली वाहिली इथे आहुती पडलेल्या त्या आमच्या देशवासी शूर स्त्रियांना. तिथून थोडय़ाच अंतरावर जे कैदी इथे मेले, पण त्यांची नोंद कुठेही नाही अशांसाठी एक जागा ठेवण्यात आली होती, तीदेखील आम्ही नतमस्तक होऊन पाहिली. वातावरण इतकं गंभीर बनलं होतं की कुणाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.
नि:शब्द शांततेतली भीषणता अनुभवत आम्ही तिथून मोकळ्या जागेत आलो. आणि मला आठवलं ‘शिंडलर्स लिस्ट’ या सिनेमातलं अगदी सुरुवातीचं दृश्य, मेणबत्तीचा प्रकाश आणि त्या प्रकाशात प्रार्थना करणारं ज्यू कुटुंब! मी त्याबद्दल काही बोलताच एकदम सुरू झालं दुसऱ्या महायुद्धाआधीचं ज्यू लोकांच्या जगण्याविषयी बोलणं. संपूर्ण युरोपभर पसरलेले ज्यू तसे प्रत्येक देशात एकप्रकारे उपरेच राहिले. कारण या लोकांनी कधीही स्थानिक लोकांत मिसळून त्यांच्या संस्कृतीत मुरून जाण्याचा प्रयत्न केला नाही. ते कोंडाळं करून राहात त्यालाच पुढे घेट्टो म्हणण्याची पद्धत सुरू झाली. ज्यू लोक आपले रीतीरिवाज फार कसोशीने पाळत. व्यापार करीत, विशेषत: ते सावकारी करत, जबर व्याजाने कर्जे देत व ती वसूलही करीत. हे लोक समृद्ध होते. स्वत:ची सगळी वैशिष्टय़ं टिकवून राहात होते. त्याचमुळे फक्त जर्मनीतच नव्हे तर अनेक ठिकाणी बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या या लोकांनी स्थानिक लोकांना कर्जे देऊन समृद्धी मिळवली ही गोष्ट आम जनतेला खटकत होती. जर्मनीतसुद्धा एकटय़ा हिटलरलाच नव्हे तर सुरुवातीला सर्वसामान्य जर्मन लोकांनासुद्धा ज्यू लोक फारसे आवडत नव्हते. पुढे अत्याचार वाढले तेव्हा सगळ्या जर्मन लोकांनाच ही गोष्ट खटकायला लागली, पण अगदी सुरुवातीला अशी परिस्थिती नव्हती. ज्यूंची व्यापारावरची पकड, पशाच्या व्यवस्थापनावर असलेलं त्यांचं प्रभुत्व ही या लोकांची बलस्थानं होती, तर स्थानिक लोकांच्या त्यांच्याबद्दलच्या द्वेषाचं तेच एक मुख्य कारण होतं. बोलत बोलत आम्ही आता कॅम्पच्या आवाराच्या अगदी टोकाला पोहोचलो होतो.
गाइड सांगू लागला तिथल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेविषयी. कोपऱ्यात दूरवर टॉवर दिसत होता. तिकडे बोट करीत तो म्हणाला, ‘‘या स्वरूपाचे सात टॉवर्स ठरावीक अंतरावर उभे करण्यात आले होते. त्या ठिकाणी बंदूकधारी गार्डस् डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवत असत. कुणी नो मॅन लँडमध्ये दिसला तर त्याला गोळ्या घालून ठार केलं जाई. शिवाय नो मॅन लँडच्या पुढे वीस फूट लांब पाण्यानं भरलेला खंदक होता. एवढं सगळं पार करून जर कुणी पलीकडे पोहोचलंच तर.. तर तिथे वीज खेळवलेलं तारेचं कुंपण होतं. त्या कुंपणाला नुसता स्पर्श जरी झाला तरी माणूस दुसऱ्या क्षणी मरत असे.’’
आत्यंतिक अपमान, उपासमार, सतत फक्त कष्ट आणि कष्टच करणं या सगळ्यांमुळे काही कैदी आत्महत्या करीत. स्वत: सनिकांच्या हातातल्या संगिनीनं भोसकून घेत, तर कधी मुद्दाम वीज खेळवलेल्या तारेच्या कुंपणाला जाऊन धडकत. कधी कधी गार्डस् त्यांच्या करमणुकीसाठी कैद्यांच्या डोक्यावरच्या टोप्यांची फेकाफेकी करीत, पण मग आपली टोपी परत मिळवण्यासाठी कैदी जेव्हा नो-मॅन्स लँडमध्ये पाऊल टाकत तेव्हा बिनदिक्कतपणे गार्डस् त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांच्या देहाची चाळण करून टाकत असत.
अनेक वेळा असंही घडे, इथले क्रूरकर्मा गार्डस् अगदी क्षुल्लक कारणावरून एखाद्या कैद्याला ठार करीत, पण देखावा मात्र असा उभा करीत की त्या कैद्यानं जणू आत्महत्याच केलीय. खरं तर त्यांनी कुणालाही विनाकारण मारून टाकलं तरी त्यांना जाब विचारणारं कुणीही नव्हतं आणि तरीही मारून टाकलेल्या कैद्यानं आत्महत्या केली असा खोटा देखावा ते तयार करीत ते केवळ जिवंत असलेल्या कैद्यांचा आत्मविश्वास आणखी खच्ची व्हावा म्हणून. कैद्यांचं मनोधर्य टिकण्यासाठीदेखील मग जरा जास्त शांतपणे विचार करणाऱ्या कैद्यांना काम करावं लागे. हे कैदी मग एकत्रितपणे बसत तेव्हा एकमेकांना धीर येईल अशा गोष्टी सांगत. काही ठिकाणी ते गाणीसुद्धा म्हणत असत. आपल्या बराकीत रोज दिसणारा आपला मित्र एक दिवस अचानक नाहीसा होतो तेव्हा तो या क्रूरकर्मा एसएस गार्डस्नी संपवलाय ही गोष्ट पचवणं तिथल्या इतर कैद्यांना अतिक्लेशकारक वाटे. कैद्यांना जरी एसएस गार्डस्ना उघड विरोध करणं शक्य नव्हतं तरी त्यांनी आपसात एकमेकांना गुप्तपणे मदत केली. धीर दिला. आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं. पण इथला अतोनात छळ, अन्नान्न दशा आणि घाण यावर त्यांच्यापाशी उपाय नव्हता. आजारपणात त्यांना फक्त मरायला मदत केली जाई. एखाद्या डॉक्टरला जरी कैद्याला मदत करण्याची इच्छा असली तरी त्याचे हात बांधलेले होते. तो कुणालाही औषधोपचार देऊ शकत नसे. त्यामुळे क्षय आणि इतर आजारांना अनेक जण बळी पडले. गाइड तर सांगत होताच, पण ग्रुपमधले इतर जणसुद्धा बोलत होते. बरंच काही सांगत होते. कधी वाचलेलं, कधी जवळच्या लोकांनी इथून सुटून आलेल्यांच्या तोंडून ऐकलेलं यांना सांगितलेलं. विशेषत: पोलिश आणि ऑस्ट्रियन यात आघाडीवर होते.
जर्मनी हे युद्ध नक्की हरणार हे लक्षात आल्यावर एसएस गार्डस् आपण केलेल्या पापाचे पुरावे नष्ट करण्याच्या मागे लागले. अन्नपाण्याविना मरणपंथाला लागलेल्या हजारो कैद्यांना सक्तीनं कॅम्पमधून बाहेर काढण्यात आलं. त्यातले अनेक जण चालता चालता वाटेतच मरण पावले.
२८ एप्रिल १९४५ ला कैद्यांच्या एका गटानं हा कॅम्प ताब्यात घेतला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल या दिवशी ब्रिगेडियर जनरल हेिनग लिंडेन रेनबो डिव्हिजनच्या सनिकांसह इथे आला. त्यानं वार्ताहरांच्या एका गटालादेखील इथे आणलं होतं. त्याच्यासमोर कॅम्प सरेंडर झाला आणि मग इथून तीस हजार ज्यूंची मुक्तता करण्यात आली. गाइड अव्याहत माहिती पुरवत होता. शिवाय अनेक ठिकाणी माहिती देणारे फलकदेखील होते.
आता आम्ही एका पुतळ्यासमोर येऊन उभे राहिलो होतो. १९४५ मध्ये अमेरिकन फौजांनी हा कॅम्प मुक्त केल्यानंतर मुक्त केलेल्यांपकी एकाचा हा पुतळा आहे असं गाइड म्हणाला. पुतळ्याखाली ज्याचा पुतळा आहे त्याचं नावही लिहिलेलं आहे.
मुक्त झालेल्या ज्यूंचं मनोगतच हा पुतळा न बोलता व्यक्त करीत असतो. साधारण चाळिशी उलटलेला हा माणूस याचं एक पाऊल पुढे आहे. नजर समोर आहे. त्याला जणू हे सुचवायचं आहे की आता फक्त भविष्याचा विचार करायचा. इतिहासात अडकलेला पायही पुढेच पडेल. आता हवी आहे फक्त अपरंपार शांती! खूप सोसलं. आता नाही. कदापि नाही.
खूप मोठी किंमत दिली म्हणूनच जणू निर्माण झालं ज्यूंचं स्वत:चं राष्ट्र इस्राइल!
आमच्यापकी एकानं गाइडला विचारलं, ‘‘१९४५ ला जर हा कॅम्प मुक्त करण्यात आला होता, तर मग प्रत्यक्ष स्मृतिस्थळ निर्माण करेपर्यंत इथे काय चालत असे?’’
आमचा गाइड एकदम थांबला. आमच्या जवळ आला नि म्हणाला, ‘‘सर्वात जास्त काळ प्रत्यक्ष वापरात राहिलेला हा कॅम्प होता. त्यामुळे क्रूरकर्मा एसएस गार्डस्वर खटले भरले जाईपर्यंत म्हणजे १९४८ पर्यंत जे जे एसएस गार्डस् पकडले गेले होते त्यांना या जागी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर काही काळ अमेरिकन सनिकांचा कॅम्प इथे होता, पण १९६० नंतर मात्र हे ठिकाण मुळीच वापरात नव्हतं. जर्मनीतल्या अनेकांनी महद् प्रयत्नांनी मग या भूमीवर स्मृतिस्थळ साकारायची कल्पना मांडली. त्यानंतर अविरत कष्ट करून १९६५ पासून हे स्थान सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे.’’
आम्ही कॅम्पच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो. तिथे एका कोपऱ्यात दिसत होतं रशियन चर्च. या चर्चच्या आयकॉनवर कॅम्पच्या गेटमधून बाहेर पडणाऱ्या कैद्यांना खुद्द येशू ख्रिस्त मार्ग दाखवतोय असं चितारलेलं आहे. धर्म काय देतो? खूप भोगलेल्या माणसांना या प्रश्नाचं उत्तर नक्की देता येईल. म्हणूनच आजही चर्चमध्ये जाणारी माणसं आहेत. आणि म्हणूनच इथे चच्रेस उभी केली गेली आहेत.
आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो होतो. समोर एका ठिकाणी लिहिलेलं वाक्य वाचलं, ‘नेव्हर अगेन!’ आणि मन भरून आलं. खरोखर इतिहास साक्ष असलेली खूप खोल जखम, तिचा तो त्रासदायक व्रण जसाच्या तसा जर्मन लोकांनी शिल्लक ठेवला. नुसता शिल्लक ठेवला नाही तर ते एक अभ्यास केंद्र बनवलं. देशोदेशीचे तरुण अभ्यासक इथे येऊन संशोधन करतात.
जगात किती प्रकारची गुलामगिरी आहे? जातिव्यवस्थेमुळे मुडदे पडतात का? वंशभेदामुळे हजारोंच्या संख्येने शिरकाण होतंय का? मग हे सगळं थांबण्यासाठी काय करता येईल? अशासारख्या अनेक प्रश्नांवर इथे संशोधन आणि अभ्यास चालतो. या ठिकाणी काम करणारी माणसं पगार घेत नाहीत, फक्त मानधन घेऊन कामं करीत असतात. इथे आत जाण्यासाठी फी नाही. फक्त एकच मागणं आहे, मानव इतिहासात हे असं पुन्हा कदापि घडता कामा नये. ही गोष्ट सगळे जण ध्यानात ठेवू या, बस!

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
Story img Loader