मला एक सांगा; चुरमुरे, फरसाण, कांदा, बटाटा, कैरी, चिंच हे सगळे पदार्थ नुसते खायला चांगले लागतातच, त्यांना स्वत:ची अशी खास चव असतेच; पण या सगळ्या गोष्टी एकत्र करून जेव्हा त्याची ‘भेळ’ बनते तेव्हा त्याची मजा काही औरच!! तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना. खरं तर ‘चाट’मध्ये येणारे सगळेच प्रकार अशी भन्नाट कॉम्बिनेशन करून बनवलेले असतात; ज्यांच्या नुसत्या विचारानेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं! अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण असे विविध घटक एकत्र केलेले बघतो, अनुभवतो. जेवण हा तर त्यातील मुख्य प्रकार; विविध पाककृतींमध्ये विविध जिन्नस एकत्र करूनच एखादी छानशी डिश बनवली जाते. दूरदर्शनवरील विविध पाककृतींच्या कार्यक्रमांतूनसुद्धा आपण हे बघतच असतो. त्यासाठी शेफसुद्धा सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात. वेशभूषेच्या बाबतीतसुद्धा आपण असे वेगवेगळे प्रयोग करून बघतो. इंडो-वेस्टर्न वेशभूषा करण्यासाठी जीन्सवर एकदम पारंपरिक भारतीय कुर्ता किंवा वेस्टर्न टॉप खाली भारतीय पद्धतीचा लांब स्कर्ट आपण घातलेला पाहिला असेल. जीन्स आणि लेगिंग्जचे मिश्रण ‘जोिगग्ज’ म्हणून प्रसिद्ध झालं! भाषांच्या बाबतीतही अशी सरमिसळ झालेली आपण अनुभवतोच. हिंदी आणि इंग्लिशचं समीकरण ‘हिंग्लिश’, तर मराठी आणि इंग्लिशची ‘मिंग्लिश’ भाषा आपण रोजच्या व्यवहारात अगदी सहजपणे वापरत असतो. संगीत आणि इतर कलाही याला अपवाद नाहीत. विविध प्रकारची वाद्ये वापरून, भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा उत्तम मिलाप विविध कार्यक्रमांत बघायला मिळतो. हाच प्रकार ‘फ्युजन’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. नृत्यकलेमध्येसुद्धा असे अनेक प्रयोग केले जात आहेत आणि ‘फ्युजन नृत्य’ म्हणून ते ओळखले जात आहे व लोकप्रिय ठरत आहे.
‘फ्युजन’ हा शब्द इंग्लिशमधील ‘फ्युज’ या शब्दावरून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘सांधणे किंवा एकत्र करणे.’ अशा प्रकारे दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र करून जेव्हा एखादी गोष्ट बनते, त्याला ‘फ्युजन’ म्हटले जाते. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण साध्य करतो, तेव्हा माणसाचा त्या गोष्टीमध्ये नावीन्य, कल्पकता आणण्यासाठी शोध चालू होतो! या शोधातूनच विविध गोष्टींची निर्मिती होते, नवनिर्मितीचा मार्ग सापडतो. असेच काहीसे, फ्युजन नृत्याच्या बाबतीत झाले असावे. विविध नृत्यशैलींची त्यांची अशी विशेषता आहेच; परंतु विविध नृत्यशैलींचा शोध, शिक्षण, विकास व प्रसार झाल्यानंतर काहीतरी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या हेतूने विविध नृत्यशैलींचा मिलाप करून सादरीकरण केले गेले; ज्याला आज आपण ‘फ्युजन नृत्य’ म्हणून ओळखतो. ठरावीक चौकटीबाहेर जाऊन काहीतरी वेगळे करणाऱ्या नृत्यप्रेमींनी ‘फ्युजन नृत्य’ प्रकाराला समृद्ध बनवले आहे व अखंड विविध प्रयोग ह्य क्षेत्रात चालू आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींचा सुंदर संगम करून ‘भारतीय शास्त्रीय फ्युजन नृत्य’ अनेक नर्तक करत आहेत. भरतनाटय़म, कथक, ओडिसी, मणिपुरी अशा शास्त्रीय नृत्यशैलीमधील साम्य असलेल्या मुद्रा, स्टेप्स यांचा फ्युजनमध्ये समर्पक वापर केला जातो. ‘फ्युजन नृत्य’ ही काही वेगळी नृत्यशैली नाही, पण विविध नृत्यशैलींच्या एकत्रीकरणातून हे नृत्य बनते. फ्युजन नृत्यासाठी प्रयोगशीलता आणि सृजनता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण कुठल्याही दोन शैली एकत्र सदर केल्या की ‘फ्युजन नृत्य’ बनते, असे नाही. इतकं सहज ते घडत नाही, तर विविध शैलींचा मिलाप अशा रीतीने करावा लागतो की त्या एकमेकांमध्ये मिसळल्या गेल्या पाहिजेत. विविध शैलींमधील विविधतेचा उपयोग केला पाहिजेच, पण त्याचबरोबर त्यातील समान धाग्यांना अधोरेखित करणे गरजेचे ठरते. या एकत्रीकरणामधून विविध शैलींची निर्मिती सुद्धा झाली आहे. आजकाल बॉलीवूड आणि एरोबिक्सला एकत्र करून ‘बॉलीरोबिक्स’ म्हटले जाते.
फ्युजन नृत्यात अनेकविध प्रकार केले जातात. विविध नृत्यशैलींचे एकत्रित सादरीकरण तर करतातच, शिवाय संगीताबरोबरसुद्धा विविध प्रकारे फ्युजन सादर केले जाते. जसे की पाश्चिमात्य ड्रम्सच्या तालावर भारतीय नृत्यशैली आणि भारतीय तालवाद्यांच्या बोलांवर पाश्चिमात्य नृत्य असेही प्रयोग केले आहेत. अमेरिकेत तर विविध ठिकाणी वर्षांतील ठरावीक तीन दिवस केवळ ‘फ्युजन फेस्टिव्हल’ आयोजित केले जातात. काही ठिकाणी कोणत्या नृत्यशैली वापरायच्या हेदेखील ठरवलेले असते. उदा. टँगो, बॉलरूम, हिप हॉप, इ. नृत्यशैली निश्चित केलेल्या असतात, तर बाकी ठिकाणी नृत्यशैलीच्या वापराचे बंधन नसते. कंटेपररी आणि कथक किंवा कथक आणि बेली डान्स, लावणी आणि बेली डान्स, भरतनाटय़म आणि ओडिसी, जिमनॅस्टिक्स आणि सालसा असे अनेक फ्युजन लोकप्रिय आहेत. फ्युजन नृत्यात विविध नृत्यशैली किंवा संगीत वा अन्य कलाप्रकारांमध्ये जुगलबंदीसुद्धा केली जाते. फ्युजनमध्ये एका गोष्टीची काळजी घेणे मात्र फार महत्त्वाचे आहे. विविध नृत्यशैलींमधील स्पर्धा किंवा चढाओढ यामध्ये अभिप्रेत नाही, कुठली शैली श्रेष्ठ किंवा कमजोर नसते. किंबहुना फ्युजन डान्समधील विविध नृत्यशैलींना समान दर्जा देणे आवश्यक आहे. आजकाल रिअॅलिटी शोमध्येसुद्धा बरेचदा फ्युजनचा वापर केला जातो आणि परीक्षक, प्रेक्षकांची वाहवा मिळवली जाते. फ्युजनचा सध्या ट्रेंड चालू आहे, त्यामुळे प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रयोग यानिमित्ताने करताना दिसत आहे. चित्रपटांमध्येसुद्धा याच प्रकारची अधिक चलती आहे.
काही दिग्गजांना फ्युजन हा प्रकार पटत नाही. कारण त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने नृत्याविष्कार केला जात नाही. उलटपक्षी मोठय़ा संख्येत लोक या प्रकाराला दाद देत आहेत. कारण एकाच मंचावर विविध कलाप्रकार आणि नृत्यशैलींचा अनोखा मेळ या माध्यमातून पाहायला मिळतो. विविध संस्कृतींचादेखील आगळावेगळा संगम या नृत्याविष्कारातून घडतो असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही! थोडक्यात काय तर; प्रयोगशीलता, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन, सृजनता यांमुळे उदयाला आलेल्या ‘फ्युजन’ पद्धतीने स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला आहे. परंतु फ्युजन करताना फक्त ‘कन्फ्युजन’ होणार नाही, याची खबरदारी घ्या! कीप डान्सिंग!!
तेजाली कुंटे