गौरव मुठे – response.lokprabha@expressindia.com
पिढय़ान्पिढय़ा ऋणानुबंध असणाऱ्या ओळखीतील सराफाकडून होणारी सोने खरेदी आता ‘डिजिटल’ स्वरूपात होऊ लागली आहे. सोन्याच्या गुंतवणुकीत अशी स्थित्यंतरे येऊनही भारतीयांचे सोन्यावरील प्रेम आजही कायम आहे. भारतात सोन्याला वेगवेगळ्या जाती, धर्म आणि संस्कृतींमध्ये वेगवेगळे स्थान आहे. लहान बाळ जन्माला आल्यापासून त्याला गुटीच्या माध्यमातून ‘सुवर्ण भस्म’ दिले जाते. त्यांनतर मंगलप्रसंगी देवाणघेवाणीची वस्तू आणि अगदी शेवटी मृत्यू झाल्यानंतर अग्नी देताना गेलेल्या व्यक्तीच्या तोंडात सोन्याचा तुकडा ठेवला जातो. त्यामुळे भारतीयांची सोन्यामध्ये नुसती गुंतवणूक नसते तर भावनिक गुंतवणूक अधिक असते.
सुवर्ण विनिमयमान (गोल्ड स्टँडर्ड) म्हणून होणारा सोन्याचा उपयोग आता मागे पडला असला तरी आर्थिक व्यवहारांतील सोन्याचे महत्त्व आजही टिकून आहे. कारण सोन्याने फक्त भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. सोन्याच्या अंगी असणाऱ्या वैशिष्टय़ांमुळे सोने गुंतवणुकीच्या सर्व साधनांमध्ये अद्वितीय आहे. सोन्याची स्थिरता आणि त्याचे मूल्य या दोन्ही गुणांमुळे ते अक्षरश: अक्षय्य होते. शिवाय सोन्याची मालकी एकाकडून दुसऱ्याकडे फिरत राहत असल्याने आर्थिकदृष्टय़ा सोन्याचा वापर होऊ नही त्याच्या साठय़ात घट होत नाही.
भारतात अगदी पारंपरिक पद्धतीने सोने खरेदी केली जाते. बहुतांश लोक सराफाकडून सोने खरेदी करतात. हे सोने मुख्यत: दागिन्यांचा स्वरूपात असते. त्यामुळे आर्थिक उपयोग न करता ते दररोजच्या वापरासाठी किंवा अडचणीच्या काळात गुंतवणूक म्हणून घेतले जाते. मात्र अनेकदा अडचणीत असताना देखील लोक सोने विक्रीकडे अखेरचा पर्याय म्हणून पाहतात.
अगदी सुरुवातीला सोन्याची खरेदी करण्यासाठी सराफ हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्याच्याकडून पारंपरिक स्वरूपात सोने खरेदी केले जात असे. तासन्तास बसून सोन्याचे दागिने खरेदी केले जात. शिवाय विक्रीच्या वेळी त्यामध्ये पुन्हा घट होत जाते. आता मात्र अगदी घरबसल्या आपण ‘डिजिटल’ माध्यमातून काही मिनिटांत सोने खरेदी करू शकतो. शिवाय त्यावर कोणतीही घट न लागता ते तेवढय़ाच वेळात विकूदेखील शकतो.
दृष्टिकोनात बदल आवश्यक
सोन्याच्या व्यवसायातील स्थित्यंतरांनुसार आपल्याला सोने गुंतवणुकीच्या बाबतीतील दृष्टिकोनही बदलणे आवश्यक आहे. बऱ्याचदा दागिने स्वरूपात घेतलेले सोने वर्षांनुवर्षे कपाटात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये पडून असते. त्यावर काहीच परतावा मिळत नाही. शिवाय ते सोने सांभाळण्यासाठी बँकेला पैसे द्यावे लागतात. अडचणीच्या काळात देखील सोने विक्रीकडे सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जाते. मात्र आता गरज आहे सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहण्याची. सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक आणि त्यावर परतावा मिळविणे देखील शक्य आहे. चला तर मग, सोन्याच्या व्यवसायातील स्थित्यंतरे आणि पर्याय याविषयी थोडक्यात जाणून घेऊ या..
सोन्याची नाणी/वळी/बिस्किट्स
यात दोन प्रकार आहेत. कोणतेही ‘सर्टिफिकेशन’ नसणारी नाणी/वळी आणि ‘सर्टिफिकेशन’ सह विकली जाणारी नाणी/ बिस्किट्स. दागिन्यांमध्ये घडणावळ/ मजुरीचा खर्च वाचवण्याचा हा एक पर्याय आहे. बऱ्याचदा मुला/ मुलीच्या लग्नासाठी सोने जमवताना अशी नाणी किंवा वळी वर्षांनुवर्षे गोळा केली जातात आणि लग्नाच्या वेळी ती विकू न त्या बदल्यात दागिने केले जातात. सोन्यासमोर सोने असा हिशोब करून वरचे मजुरीचे पैसे दिले जातात. यांनाही अनेक वर्षे सांभाळताना लॉकरचा खर्च अधिक होतो. शिवाय जर गुंतवणूक कालावधी १० वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्याचा परतावा हा म्युच्युअल फंडामध्ये मिळणाऱ्या परताव्यापेक्षा कमी भरतो.
सुवर्ण संचय योजना
सराफांकडे या प्रकारची गुंतवणूक करता येते. गुंतवणूक कालावधी सर्वसाधारणपणे एक वर्षांचा असतो. काही ठिकाणी प्रत्येक महिन्यात सोने खरेदी करून गिऱ्हाईकाच्या नावावर जमा करून शेवटच्या महिन्यात एका हप्त्याइतकी रक्कम त्यात भर घालून, सराफ तेवढय़ा किमतीचे सोने विकतो. अशा योजनेमध्ये पैसे गुंतवताना तुम्हाला नेमके काय मिळणार आहे, हे जाणून घ्या. सोन्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता कमी काळासाठी अशा प्रकारे गुंतवणूक होऊ शकते. मात्र सराफ विश्वासातील असल्यास ठीक. नाही तर कधी कधी अशा ठिकाणी गुंतवणूक धोक्याची सुद्धा ठरू शकते.
सोने चलनीकरण योजना
या योजनेत आपल्याकडे असलेले सोने (नवीन योजनेमध्ये किमान मर्यादा ३० ग्रॅमवरून १० ग्रॅमवर आणली आहे. आपण बँकेत जमा करतो. त्याची शुद्धता तपासून मग त्याच्या वजनानुसार मुदत ठेव (एफडी) करण्यात येते. एफडी एक ते तीन वर्षे, पाच ते सात वर्षे आणि १२ ते १५ वर्षे अशा कालावधीसाठी करता येते. व्याजदर साधारण १.८ टक्के ते २.२५ टक्कय़ांदरम्यान असतो. मुदत संपल्यावर तुम्हाला त्या वेळी जो सोन्याचा भाव असेल त्यानुसार पैसे किंवा सोने परत केले जाते. तुमचे दागिने परत मिळत नाहीत. वापरात नसलेल्या जुन्या सोन्याचा अशा प्रकारे चांगला उपयोग होऊ शकतो.
गोल्ड म्युच्युअल फन्ड
सध्या ११ म्युच्युअल फन्ड असा गुंतवणूक पर्याय देत आहेत. ‘रेग्युलर’ आणि ‘डायरेक्ट’ या दोन्ही प्रकारे इथे पैसे गुंतवता येतात. इतर म्युच्युअल फन्डांच्या तुलनेत हे खूप छोटे आहेत. यांची ‘मॅनेजमेंट फी’ ०.२ ते १.४ टक्का इतकी असून गेल्या एक वर्षांचे परतावे पाच ते नऊ टक्क्यांदरम्यान आहेत. शिवाय एक वर्षांच्या आत ‘युनिट्स’ विकताना (रिडीम) करताना ‘एक्झिट लोड’सुद्धा लागतो. ‘गोल्ड ईटीएफ’प्रमाणे ही गुंतवणूकसुद्धा आर्थिक पद्धतीची असून प्रत्यक्ष सोने हातात येत नाही. मात्र ‘गोल्ड म्युच्युअल फन्डा’तील गेल्या सात वर्षांवरील ‘एसआयपी’चे परतावे खूपच कमी आहेत.
पारंपरिक विरुद्ध ‘मॉडर्न’ सोने खरेदी (डिजिटल गोल्ड)
सध्या बाजारात ‘ऑनलाइन’ माध्यमातून देखील ‘डिजिटल’ सोने खरेदी करता येते. ‘डिजिटल पेमेंट’ पर्यायांद्वारे किंवा ‘इंटरनेट बँकिंग’च्या माध्यमातून शुद्ध सोने खरेदी करता येते. अगदी २० रुपयांपासून सोने खरेदी करता येते. ‘एमएमटीसी पॅम्प’ या देशातील एकमेव जागतिक दर्जाच्या रिफायनरीमध्ये तयार झालेले हे सोने शुद्धतेची १०० टक्के खात्री देते. हे सोने इलेक्ट्रॉनिक रूपात आपल्या खात्यात जमा होते. सोने प्रत्यक्षात हवे असल्यास ते देखील मागविता येते.
कमॉडिटी बाजारात सोने खरेदी
वायदे बाजार हे प्रामुख्याने ‘पेपर मार्केट’ आहे, मात्र विशिष्ट परिस्थितीत प्रत्यक्ष कमॉडिटीची ‘डिलिव्हरी’ देता आणि घेता येते. वायदे बाजारात व्यवहार करण्यासाठी प्रथम शेअर बाजाराप्रमाणेच ‘कमॉडिटी एक्स्चेंज’मध्ये आपले खाते असावे लागते. आता कमॉडिटी आणि स्टॉक एक्स्चेंज असा फरक राहिला नसून ‘सेबी’च्या नियंत्रणाखाली सर्वच स्टॉक एक्स्चेंजमध्ये ‘कमॉडिटी’चे देखील व्यवहार करता येतात. सराफाकडून बाजारामध्ये आपण कितीही सोने घेऊ शकत असलो तरी वायदे बाजारात मात्र ठरावीक वायदे किंवा ‘कॉन्ट्रॅक्ट’ म्हणजे १ ग्रॅम, ८ ग्रॅम, १०० ग्रॅम किंवा १ किलोग्रॅम अशा चारच मात्रांमध्ये किंवा त्याच्या पटीमध्ये सोने खरेदी-विक्री करावी लागते. खरेदी-विक्री करताना दर महिन्याचे वायदे उपलब्ध असतात.
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फण्ड (गोल्ड ईटीएफ):
‘गोल्ड ईटीएफ’ हा सोने खरेदीचा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे सोन्याची युनिट रूपाने विक्री करणे. साधारणपणे एक ग्रॅम सोन्याच्या समतुल्य एक युनिट असते. हा पर्याय म्हणजे ‘पेपरगोल्ड’ म्हणजे युनिटच्या रूपामध्ये सोने खरेदी करणे. प्रत्यक्ष सोन्याऐवजी ‘डिमॅट’ खात्यात सोने नावावर जमा होते. प्रत्यक्ष सोने घरात बाळगण्याची जोखीम राहात नाही. आणखी एक फायदा म्हणजे या युनिट्सचे शेअर बाजारात समभागाप्रमाणेच व्यवहार होतात. त्यामुळे या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये बऱ्यापैकी ‘लिक्विडिटी’ अर्थात रोखसुलभता असते.
‘गोल्ड ईटीएफ ’वर म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजार नियामकाचे बारीक लक्ष असल्यामुळे या गुंतवणुकीमध्ये गैरव्यवहार होण्याची जोखीम जवळपास शून्य असणे हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी मोठा फायदा असतो. परंतु दर वर्षांला निदान एक टक्का एवढे शुल्क हे ‘म्युच्युअल फंड युनिट’च्या मालमत्ता मूल्यामधून वजा करीत असल्यामुळे तेवढा तोटा होतोच. भारतापेक्षा पाश्चिमात्य देशांमध्ये ‘ईटीएफ’ अत्यंत लोकप्रिय आहेत. भारतात १०हून अधिक कंपन्यांचे ‘गोल्ड ईटीएफ’ उपलब्ध आहेत.
गोल्ड सॉव्हरिन बॉण्ड (सार्वभौम सुवर्ण रोखे)
सध्या सुवर्ण खरेदीसाठी सर्वात आकर्षक आणि लोकप्रिय पर्याय म्हणजे ‘गोल्ड सॉव्हरिन बॉण्ड’ अर्थात सार्वभौम सुवर्ण रोखे आहे. सरकारने प्रत्यक्ष सोन्यातील गुंतवणूक कमी करून ती सरकारी रोख्यांमार्फत अर्थव्यवस्थेमध्ये येण्यासाठी सार्वभौम सुवर्ण रोखे बाजारात आणले आहेत. या सुवर्ण रोख्यांना केंद्र सरकारची हमी असते. एका आर्थिक वर्षांत प्रत्येक व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंबाला किमान एक ग्रॅम ते कमाल चार हजार ग्रॅम; तर ट्रस्ट व तत्सम संस्थांना २० हजार ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे खरेदी करता येतात.
सुवर्ण रोख्यांनी किती परतावा दिला?
सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेने गुंतवणूकदारांना सहा वर्षांत जवळपास ८४ टक्के लाभ दिला आहे. २०१५-१६ आर्थिक वर्षांत प्रति ग्रॅम दोन हजार ६०० रुपये किमतीने जारी केले गेलेल्या सुवर्ण रोख्यांची किंमत सध्या दुप्पट झाली आहे. २०१५-१६ आर्थिक वर्षांतील दुसऱ्या मालिकेत प्रति ग्रॅम दोन हजार ६०० रुपये किमतीवर रोखे विक्रीला आले होते. चालू आर्थिक वर्षांतील पाचव्या मालिकेत प्रति ग्रॅम चार हजार ७९० रुपयांना त्यांची विक्री करण्यात आली.
सुवर्ण रोख्यांचे फायदे :
- आठ वर्षे कालावधीच्या आणि एक ग्रॅम समतुल्य अशा या रोख्यांवर वर्षांला २.५ टक्के दसादशे व्याज मिळते. रोखे पाच वर्षांनंतर विकण्याची मुभा आहे. शिवाय ऑनलाइन माध्यमातून खरेदी केल्यास निर्धारित विक्री किमतीवर प्रतिग्रॅम ५० रुपये सवलत देखील मिळते. खरेदी केलेले सुवर्ण रोखे आपल्या डिमॅट खात्यामध्ये येत असल्यामुळे साठवणूक खर्च नाही.
- आठ वर्षांनी हे रोखे त्या वेळच्या सोन्याच्या किमतीत सरकारकडून विकत घेतले जातात. मुख्य म्हणजे ही वस्तू आणि सेवा करमुक्त सोने गुंतवणूक असते आणि गुंतवणूक सरकारी असल्यामुळे पुरेशी सुरक्षित आहे. सुवर्ण रोख्यांची मुदत आठ वर्षे असली तरी योग्य बाजारमूल्याचा फायदा घेण्यासाठी रोखीकरण करण्याचा पर्याय पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्षांनंतर उपलब्ध करण्यात आला आहे.
- सुवर्ण रोख्यांचे व्यवहार शेअर बाजारात होत असल्यामुळे रोकडसुलभता देखील आहे. एवढे फायदे असल्यामुळे मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी याहून दुसरा चांगला पर्याय नाही.
- सर्वसामान्य व्यक्तीच्या गुंतवणुकीमध्ये सोन्याचा समावेश असतोच. सोने फक्त मिरविण्यासाठी नाही, तर घरातील अडीअडचणीच्या वेळी तारण ठेवून कर्ज मिळवण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे गरज भासेल त्या वेळी हे सुवर्ण रोखे घेतलेल्या कर्जासाठी तारण म्हणून देखील ठेवता येतील.