भारतीय दंडसंहितेतील आत्महत्येच्या प्रयत्नांसाठी शिक्षा असणारे कलम ३०९ रद्द करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय लोकसभेमध्ये नुकताच घेण्यात आलेला आहे. स्वेच्छामरणाच्या परवानगीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. इच्छामरण ही ‘विवादग्रस्त’ बाब असली तरी बदलत्या काळात, विशेषत: कुटुंबसंस्थेच्या विघटनावस्थेत त्याचा मानवतेच्या दयाद्र्र दृष्टिकोनातून पुनर्विचार करणे गरजेचे आहे. इच्छामरणाच्या तरतुदीचा गैरवापर करता येऊ नये यासाठी अगदी काटेकोरपणे सूक्ष्म विचार करूनच कायदेशीर परवानगी देण्याची तरतूद असावी.
वृद्धत्वाच्या अंतिम अवस्थेला गेलेल्या व्यक्तीला नैसर्गिक म्हणजे दिव्यातील तेल संपत आल्यामुळे ज्योत हळूहळू मंद होत जाऊन विझून जावी असे मानवी आयुर्मर्यादा संपल्यामुळे येणारे मरण आता दुष्प्राप्य (दुर्लभ) झाले आहे. बहुतांश लोकांना आयुष्याच्या अंतिम समयी कोणत्या ना कोणत्या तरी जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागते. शारीरिक क्लिष्ट, जटिल परिस्थिती निर्माण झाल्याने त्रासदायक तपासण्या, चाचण्या त्यानंतर इंजेक्शन्स, औषधांचा मारा सुरू होतो. वेळप्रसंगी शस्त्रक्रिया केली जाते. आजार लक्षात आला नाही तर वेगवेगळे प्रयोग सुरू होतात. अशा वेळी वृद्ध, नाजूक व प्रतिकार शक्तिहीन शरीराचा विचार केला जात नाही की कडक औषधांच्या साइड इफेक्टस्चाही विचार केला जात नाही. बऱ्याच डॉक्टरांचा, ‘बिलाचे मीटर चालू ठेवण्यासाठी’- ‘हृदयाचे मीटर चालू ठेवण्याचा’ खेळ सुरू असतो. भोवतालच्या लोकांना व्यक्ती जिवंत असल्याचे समाधान असते, पण तिकडे पेशंटची वेदनामय तडफड होत त्याचे सक्तीचे जगणे सुरू असते. लवकरात लवकर माझी सुटका कर रे बाबा! अशी त्याची मनोमन देवाकडे विनवणी सुरू असते. गावोगावच्या इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये मरणासाठी व्याकुळ झालेले जीव डॉक्टरांच्या (अव) कृपेने तडफडत असलेले आढळतील. ‘पेशन्टचा जीव वाचवणे’ एवढे एकमेव ध्येय डोळ्यांसमोर ठेवून डॉक्टर आधुनिक काळात उपलब्ध असणारे सर्व प्रकारचे उपचार करीत असतो. ‘काहीही करून पेशन्टला वाचवाच’ असा नातेवाईकांचा प्रेमापोटी आटापिटा सुरू असतो आणि तिकडे पेशन्ट मरण कळा भोगत मरणाचा धावा करीत असतो. शेवटी व्हेन्टिलेटर लावला जातो. काही अपवादात्मक पेशन्टस् सोडले तर व्हेन्टिलेटर लावणे म्हणजे पेशन्टला बळजबरीने जिवंत ठेवण्याचा डॉक्टरांचा व नातेवाईकांचा अट्टहास! यापलीकडे याचे वर्णन करता येत नाही.
असाध्य रोगाने ग्रस्त रुग्णाची अवस्था तर अत्यंत दयनीय असते. पेशन्ट वाचणार नाही हे डॉक्टरांनी अगोदरच सांगितलेले असते. सर्व जण दिवस मोजत असतात. आधुनिक काळातील प्रचंड विस्तारलेली शहरे आणि लहान कुटुंबे यामुळे आलटूनपालटून प्रत्येकाने पेशन्टजवळ थांबणे, घर ते दवाखाना हेलपाटे मारणे, रात्रीची जागरणे अशी धावपळ सुरू असते. पेशन्टची शुश्रूषा करताना त्यांची होणारी ओढाताण, त्रास लपून राहात नाही. सेवा करणाऱ्या घरातील लोकांची दगदग, कष्ट, वैताग पाहून आजारी माणूस शरमेने अर्धमेला झालेला असतो. शारीरिक वेदना, त्रास यामुळे व्याकुळ झालेला पेशन्ट मानसिक क्लेशामुळे अधिकच खचून जातो. त्याची जगण्याची इच्छाशक्ती संपुष्टात येते. अशा अक्षरश: मरणाचा धावा करणाऱ्या व्यक्तीने जर मरण्याची इच्छा मनापासून व्यक्त केली आणि डॉक्टर, नातेवाईक, मित्र, शेजारी यांनी कुठलीही हरकत न घेता जर परवानगी दिली तर मग एखादे इंजेक्शन देऊन गाढ झोपेत हळूहळू प्राणज्योत मालवत शांतपणे येणारा मृत्यू कोणाला नको वाटेल? नाहीतर शेवटची वेदनामय तडफड करीत, हातपाय झाडत, किंचाळत अवतीभोवती जमलेल्या लोकांसक्षम प्राण सोडण्यापेक्षा असा शांत मृत्यू निश्चितच सर्वाच्या दृष्टीने सुसह्य़ आहे यात शंका नाही.
जन्म आणि मृत्यू या दोन्हीही घटना नैसर्गिक असल्या तरी फरक एवढाच की व्यक्तीच्या जन्माची पूर्वसूचना अगोदर मिळते. जन्मानंतर मृत्यू मात्र कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकतो. तो अनैसर्गिकही असू शकतो. आधुनिक वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे मृत्यू होऊ शकणाऱ्या व्याधीची पूर्वकल्पना अगोदर मिळूे शकते. पण मृत्यू हा केवळ शारीरिक व्याधीमुळेच नव्हे, तर अपघात, हत्या या कारणांमुळेही होऊ शकतो आणि तो अचानक कधीही होऊ शकतो. एकूण मृत्यू हा अटळ आहे तो कधीही होऊ शकतो हे बुद्धीला पटत असले तरी त्याचा स्वीकार करण्याची मानसिक तयारी नसते, त्यामुळे बरेच लोक आपल्याला दोन-चारशे वर्षांचे आयुष्य दिले आहे या आविर्भावात जीवन जगत असतात. जीवन किती क्षणभंगुर आहे याचा लवलेशही त्यांच्या मनीध्यानी नसतो. तर काही जण सदैव मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर व मनात मृत्यूची भीती, धास्ती घेऊन जगत असतात. दोन्हीही टोकाच्या भूमिका न घेता मृत्यूची अपरिहार्यता आणि अवचितता मनी बाळगून जीवनाला आनंदाने सामोरे जावे अधिक सुखद आहे.
आपल्या समाजात ‘मृत्यू’ या शब्दाभोवती भीतीचे इतके भयावह वलय निर्माण केले आहे की, कुटुंबात नुसते मृत्यूचे नाव जरी काढले तरी तोंडावर बोट ठेवले जाते. लगेच मुलामुलींचे चेहरे बारीक होतात. बायकोच्या डोळ्यांत पाणी तरारते. मृत्यूचे नाव घेणे म्हणजे अपशकुन, अशुभ समजले जाते, पण प्रत्येकाच्या जीवनातील तेवढीच घटना खात्रीलायक आहे हे वास्तव स्वीकारले जात नाही. त्यामुळे मृत्यूचा विचारदेखील मनाला अस्पर्श ठरतो. त्यामुळेच बहुसंख्य लोक मृत्यू गृहीत धरून आर्थिक नियोजन करीत नाहीत. त्यामुळे घरातील कर्त्यां व्यक्तीचा जेव्हा अकस्मात मृत्यू होतो तेव्हा संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत येते. केवळ आर्थिकच नव्हे तर आपल्या पाठीमागच्या लोकांना येणाऱ्या कायदेशीर अडचणींचाही विचार केला जात नाही. बँकेतील साध्या सेव्हिंग्ज खात्यापासून प्रत्येक ठिकाणी वारस नोंदण्याची सोय आहे. सर्वात सोपा मार्ग हा तर ‘मृत्युपत्र’ करणे हा आहे. कायद्याने केवळ नोंदणीकृत नव्हे तर साधे हस्तलिखित स्वाक्षरी व साक्षांकित केलेले इच्छापत्रही ‘मृत्युपत्र’ म्हणून अधिकृत समजले जाते. आता तर मृत्युपत्राची ऑनलाइन सोय झाली आहे. मृत्यूची अपरिहार्यता व अकस्मितता लक्षात घेऊन वारस नोंद किंवा वेळेवर मृत्युपत्र न केल्याने मृत व्यक्तीच्या स्थावर-जंगम मालमत्तेसाठी भारतीय न्यायालयात लाखो दिवाणी दावे चालत आहेत.
माणूस बाहेरगावी कोठे जायचे म्हटले की चार दिवस आधी तयारीला लागतो, पण बिनपरतीच्या अंतिम प्रवासाला कधीही जावे लागेल हे माहीत असतानादेखील त्याची तयारी करीत नाही. कारण अशा प्रवासाची कल्पनाही मनाला असह्य़ ठरते. त्या दृष्टीने केवळ वारस नोंदच नव्हे तर आपले आर्थिक व्यवहार, अंत्यविधीचा विकल्प, देहदान, अवयवदान, इच्छा-आकांक्षा इत्यादीसंबंधी कुटुंबीयांना सजग करणे हे जबाबदार व्यक्तीचे कर्तव्य आहे. या सर्व गोष्टी मृत्युपूर्व नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहेत.
यासाठी ‘मृत्यू’ या प्रत्येकाच्या आयुष्यातील अटळ घटनेला प्रतिष्ठा प्राप्त होण्याची गरज आहे. मृत्यूची घटना मनापासून स्वीकारली तरच दैनंदिन जीवन अधिक सुखकर होऊन माणसामाणसांमधील संबंध अधिक सौहार्दपूर्ण होऊ शकतील. एकदा मृत्यू ही घटना मनापासून स्वीकारली की मगच ‘इच्छामरणाचे’ आणि ‘मृत्युपूर्व नियोजनाचे’ महत्त्व लोकांच्या लक्षात येईल.
‘इच्छामरणा’मुळे स्वत:ची मृत्यूपूर्वीच्या जीवघेण्या वेदनापासून मुक्ती मिळू शकते आणि ‘मृत्युपूर्व नियोजनामुळे’ कायदेशीर व इतर अडचणींमुळे होणाऱ्या यातना कमी होतात. एवढेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान लाभते. यासाठीच भारतीय समाजाचा ‘मृत्यू’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची खरी गरज आहे.
शेखर गजभार response.lokprabha@expressindia.com
चिंतन : मृत्यूच्या वेदना आणि मृत्यूनंतरच्या यातना
भारतीय दंडसंहितेतील आत्महत्येच्या प्रयत्नांसाठी शिक्षा असणारे कलम ३०९ रद्द करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय लोकसभेमध्ये नुकताच घेण्यात आलेला आहे. स्वेच्छामरणाच्या परवानगीच्या दिशेने टाकलेले हे एक...
First published on: 10-07-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death by wish