कॉ. शरद पाटील यांच्या निधनानंतर ‘असंतोषाचे घरा’ हा गणेश निकुंभ यांचा लेख ‘लोकप्रभा’ने प्रसिद्ध केला होता. त्या लेखावरची प्रतिक्रिया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘असंतोषा’चे घरा.. व नाकारलेले व ‘स्वीकारलेले’ पुरस्कार हे गणेश निकुंभ यांचे दोन लेख
दि. ९ मेच्या लोकप्रभा अंकात प्रसिद्ध झालेले आहेत. जवळपास दहा वर्षांनंतर गेल्या वर्षी झालेल्या तासाभराच्या भेटीचा वृत्तान्त त्यांनी विपर्यस्त व रंजकपणे मांडला आहे. कॉ. पाटील कधीही विकलांग नव्हते, मात्र ते गेल्या वर्षभरापासूनच विकलांग व विपन्नावस्थेत होते अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. कॉ. पाटलांचे शरीर जरी थकलेले होते तरी त्यांचा मेंदू मात्र शेवटपर्यंत शाबूत होता, म्हणूनच ते वयाच्या ८९ मध्येही लेखन व प्रबोधन करू शकले. मागील वर्षीच त्यांनी १७ मार्च रोजी मुंबईच्या बहुजन पत्रकार संघाच्या कार्यशाळेला दिवसभर मार्गदर्शन केले होते, तर २६ ऑक्टोबर रोजीची कोल्हापूर इतिहास परिषद असो वा या वर्षी १९ जानेवारी रोजीची अहमदनगर येथील सत्यशोधक शिक्षक सभेची परिषद व कणकवली येथील २३ फेब्रुवारी रोजीचा प्रा. गोपाल दुखंडे गौरव समारंभ. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले होते ते निकुंभ विसरतात.
कॉ. पाटलांच्या देहभान विसरण्यावर निकुंभ यांना चिंता वाटते. ते लिहितात- इतका वेळ झाला, तुम्ही अजून परिचय नाही दिला, असा सवाल कॉम्रेडनी आम्हा दोघांकडे पाहून केला. या प्रश्नावर मन गलबलून गेले. हे पटण्यासारखे नाही. त्यांच्या बाबतीत असे काही घडल्याचे तरी आठवत नाही. ‘असंतोषवरून असे किती तरी जण अपमानित होऊन बाहेर पडलेले होते’, ‘असंतोषवर जाणे अनेकांना वाघाच्या गुहेत जाण्यासारखे वाटायचे’, अशा प्रकारचे विधान करून निकुंभ कॉ. पाटलांबद्दल गैरसमज पसरवीत आहेत. कॉ. पाटलांचे ‘असंतोष’ हे कार्यकर्त्यांसाठी खुले घर होते. महाराष्ट्रभरातील अनेक संसदबा गट त्यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेत होते, प्रसंगी त्यांच्या रागावण्याने अनेक जण दुखावलेही गेले असतील, मात्र त्यांचा रागावण्यापाठीमागचा हेतू हा कार्यकर्ता घडविण्याचा होता. जातिअंताच्या क्रांतीसाठी कॉ. पाटलांनी आपले सबंध आयुष्य वेचले होते. त्यांना क्रांतिकारी फौज निर्माण करावयाची होती, त्यामुळे कार्यकर्त्यांचा बेशिस्तपणा त्यांना कधीच खपणारा नव्हता. त्यांच्या या लष्करी शिस्तीला ज्यांनी ज्यांनी त्यांच्या स्वभावाशी जोडले ते मात्र दुखावले व दुरावले गेले.
पुढे जाऊन निकुंभ लिहितात, ‘पुढच्या काळात सर्व बाद ठरतील, फुले-आंबेडकरही बाद ठरतील, फक्त बुद्ध आणि मार्क्‍स राहतील. मी फोटोही काढून टाकले बाकीच्यांचे. समोर भिंतीकडे त्यांनी निर्देश केला. भिंतीवर फक्त बुद्ध आणि मार्क्‍सच्याच तसबिरी होत्या. याचा अर्थ कॉ. पाटलांनी फुले-आंबेडकरांचे फोटो काढून टाकले होते असे निकुंभ यांना म्हणावयाचे आहे. यात तथ्य नाही. कॉ. पाटलांच्या अभ्यासिकेत आजही बुद्ध, मार्क्‍स, फुले, आंबेडकर यांच्या तसबिरी जशाच्या तशा लावलेल्या आहेत. कॉ. पाटलांना फुले-आंबेडकरविरोधी ठरविण्याचा तर हा प्रयत्न नाही ना?
दुसऱ्या लेखात विकलांगतेचा गैरफायदा घेऊन कॉम्रेड पाटलांना पुरस्कार देण्यात आले अशी शंका निकुंभ व्यक्त करतात. आयुष्यभर कोणताही पुरस्कार न स्वीकारणाऱ्या पाटलांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दि. २३ मार्चचा बा. सी. बेंद्रे महान इतिहासकार पुरस्कार व वाईचा महर्षी शिंदे पुरस्कार स्वीकारण्यास तयारी दर्शविली होती, मात्र ते प्रकृतिअस्वास्थ्यामुळे या समारंभांना उपस्थित राहू शकले नाहीत. वास्तविक पहिला पुरस्कार हा दि. २९ व ३० नोव्हेंबर २०१३ रोजीच नांदेड येथील अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या २२ व्या अधिवेशनात प्रदान करण्यात येणार होता, मात्र या समारंभाला प्रमुख उपस्थिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची असल्याने त्यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी संयोजकांना पत्र पाठवून पुरस्कार नाकारत असल्याने कळविले, तेव्हा ‘धुळय़ाला येऊन हा पुरस्कार आम्ही प्रदान करू’ असे संयोजकांकडून त्यांना सांगण्यात आल्याने कॉ. पाटलांनी संमती दर्शविली. तर दुसरा पुरस्कार डॉ. बाबा आढाव व डॉ. सदानंद मोरे विश्वस्त असलेल्या वाईच्या रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा. या पुरस्काराचे स्वरूप फक्त सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह होते. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते दि. १० एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. याही पुरस्काराला कॉ. पाटलांची लेखी संमती होती, मात्र कॉ. पाटलांना विकलांग अवस्थेत पाहावयाचेच नव्हते असे ठरविणाऱ्या निकुंभ यांना कॉ. पाटलांच्या उत्तर आयुष्यातली विशेष माहिती नव्हतीच असे यावरून समजते.
कॉ. पाटलांनी आयुष्यभर कुठल्याही शासकीय वा ब्राह्मणी-भांडवली पुरस्काराचा स्वीकार केला नाही. नव्या कालखंडात प्रतिगामी शक्ती वाढलेल्या असताना व आगामी निवडणुकांनंतर त्या बलशाली बनत असताना अशा परिस्थितीत आपला अब्राह्मणी दृष्टिकोन विविध प्रागतिक मंचांवरून मांडला जावा व व्यापक प्रबोधन घडवून आणावे ही भूमिका कॉ. पाटलांची राहिलेली होती आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी या प्रागतिक संस्थांचे पुरस्कार स्वीकारायला संमती दर्शविली होती, हे निकुंभ यांनी लक्षात घ्यावे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of comrade sharad patil
Show comments