आक्षेप का असावा – चिन्मय मांडलेकर
व्हिडीओ बनवणारी माणसं त्यांना जे म्हणायचं ते त्यांनी मांडलंय. प्रत्येकाने त्याचं आयुष्य कसं जगावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे त्रिकालवादी सत्य आहे. ‘माय चॉइस’ असंच तो व्हिडीओही सांगतो. त्यामुळे त्यात नावीन्य नाही. तो व्हिडीओ यूटय़ूबसाठी बनवलाय. ते बघणं-न बघणं प्रत्येकाच्या हातात आहे. त्यातली मतं तुम्हाला पटतील- नाही पटतील. मुळात दीपिकाचा व्हिडीओ यूटय़ूबसाठी बनवलाय. यूटय़ूब बघणं-न बघणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. तिने मांडलेली मतं का स्वीकारली जाऊ शकत नाहीत? त्यात नवीन काय आहे? याआधी स्त्रियांचे विवाहबाहय़ संबंध, समलैंगिक संबंध, स्त्रियांचे लग्नाआधीचे शारीरिक संबंध या सगळ्या गोष्टी आधीही होत्याच. त्यामुळे दीपिकाने असं काय नवीन मांडलंय, की याआधी जगात घडत नव्हतं. म्हणून या व्हिडीओवर आक्षेप का असावा हेच कळत नाही. आपलं मत मांडण्याचा आपल्याला अधिकारच नसेल, तर लोकशाही आहे, असं का म्हणावं? तसंच स्त्रीशक्ती, स्त्रीवाद यावरही खूप आधीपासून बोललं जातंय. साधारण १९६० सालापासून याबाबत मतमतांतरे, चर्चा होताहेत. फरक एवढाच, त्या वेळी माध्यमांचं स्वरूप वेगळं होतं. साहित्य, वर्तमानपत्रं अशी त्या वेळची माध्यमं होती. आज माध्यम बदललं आणि त्यांची संख्याही वाढली. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याची सहजता आली आहे. कुठल्याही मुद्दय़ावर चर्चा व्हायलाच हवी; पण दुसरी बाजूही ऐकली, बघितली पाहिजे. असा व्हिडीओ पुरुषांच्या बाजूचाही आलाय. स्त्रियांवर लादल्या जाणाऱ्या बंधनांवर जाहीरपणे बोललं जातं, त्याबद्दलची माहिती असते म्हणून ते दिसून येतं; पण पुरुषांवरही अनेक प्रकारची बंधनं असतात; पण ती अस्पष्ट असल्यामुळे दिसून येत नाहीत.
स्वातंत्र्यासह जबाबदारीही येते – नेहा पेंडसे
दीपिका पदुकोणचा ‘माय लाइफ माय चॉइस’ महिला सबलीकरणाचा व्हिडीओ आहे असं म्हटलं जातंय. मुळात मला त्यात कुठेही सबलीकरणाला प्रोत्साहन दिलं गेलंय असं वाटत नाही. त्यात जे काही बोललं गेलंय ते केवळ ‘मी असं करेन. मी तसं करेन’ अशा प्रकारचं आहे, जे मला चुकीचं वाटतं. जेव्हा आपण स्वातंत्र्य अनुभवतो तेव्हा त्यासोबत जबाबदारीही येते. या जबाबदाऱ्या सांभाळूनच स्वातंत्र्य उपभोगलं तर त्याचा इतरांना त्रास होत नाही. जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून नुसता स्वातंत्र्याचा उपभोग घेतला, तर आपल्यात आणि जनावरांमध्ये फरक तो काय? त्यासाठी सदसद्विवेकबुद्धी लागते. या बुद्धीची जोड असायला हवी. याच बुद्धीचा या व्हिडीओमध्ये अभाव जाणवला. अनेक बेजबाबदार वाक्यं या व्हिडीओमध्ये दिसून आली. आणखी काही दोनेक वर्षांनीही व्हिडीओमध्ये मांडलेले विचार स्वीकारले जातील की नाहीत, याबाबत खात्री देता येत नाही. त्यात मांडलेले विचार समाजाकडून स्वीकारले जाणार नाहीत म्हणून मी त्यांना पाठिंबा देत नाही असं नाही. तर, मुळात ते मला स्वत:लाच पटलेले नाहीत. प्रत्येकालाच काय चूक-काय बरोबर हे कळायला हवं. दीपिकानं पब्लिसिटी स्टंट म्हणून असं केलं असेल अशीही चर्चा झाली; पण मला असं वाटत नाही. मुळात दीपिका एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिला अशा स्टंटची गरज नाही. स्त्रीवाद, स्त्रीशक्ती याबाबत अनेक वर्षांपासून बोलणं सुरूच आहे. ती जाणीव, चळवळ आधीपासून होती; पण आता माध्यमांमध्ये झालेल्या वाढीमुळे ते इतक्या वेगाने पसरत आहे.
ते विचार काळाच्या पुढचे – पुष्कर श्रोत्री
दीपिका पदुकोणचा व्हिडीओ मला फार ग्रेट वाटला नाही. त्यातून काही घ्यावंसं असंही वाटलं नाही. मी जेव्हा नवरा, मुलगा, मित्र, बाप, भाचा, पुतण्या अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून विविध वयोगटाच्या महिलांच्या सान्निध्यात येतो तेव्हा त्यांच्या इच्छा-आकांक्षांचा आदर करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. दीपिका अनेक रिलेशन्समधून बाहेर आलेली आहे. त्यात तिला फारसं यश मिळालं नसल्यामुळे त्याचा निचरा म्हणून तिने हा व्हिडीओ केला असावा, असा अंदाज. खरं तर दीपिका एक अभिनेत्री म्हणून मला आवडते. आताच्या नायिकांमध्ये आश्वासक म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. ती जे करते ते विचार करूनच करते. त्यामुळे हेही तिने विचार करूनच केलं असावं; पण त्या व्हिडीओवर ऊहापोह करण्यासारखं मला काही वाटलं नाही. सिनेमाच्या आधी मिळालेली कोणतीही प्रसिद्धी ही चांगली प्रसिद्धी आहे, असं म्हटलं जातं; पण प्रेक्षक हुशार आहे. अशा प्रसिद्धीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यांच्यासाठी त्या कलाकारांचा सिनेमा महत्त्वाचा असतो. तो चांगला असेल तर ते उचलून धरतात अन्यथा नाही. यात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे, उद्या जर एका पुरुषाने असे विचार मांडले तर त्यावर बऱ्या-वाईट प्रतिक्रिया येतील; पण केवळ ती स्त्री आहे आणि ती दीपिका आहे म्हणून त्यावर अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होताना दिसताहेत. मूल जन्माला होऊ देणं-न देणं, शारीरिक संबंध ठेवणं, विवाहबाहय़ संबंध ठेवणं हे विचार प्रापंचिक आयुष्यात पडल्यानंतर बदलतात. हे विचार आजच्या काळात स्वीकारले जाऊ शकत नाही. ते काळाच्या पुढचे विचार आहेत. सध्या स्त्रीवादाचे अनेक संदेश सोशल साइट्सवर पसरत असतात. याला जगात अनेक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांच्या घटना कारणीभूत आहेत. त्यापैकी फक्त पाच टक्के घटना आपल्यासमोर येत असतात. जगात स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणूनच बघितलं जातं. याचाच निचरा म्हणून स्त्रीवादी विचारांचे संदेश पसरण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. सोशल मीडियाचा अत्यंत चुकीचा वापर केला जातोय.
दृष्टिकोन बदलणं आवश्यक – सई ताम्हणकर</strong>
सगळ्यात आधी आपण आपले विचार, दृष्टिकोन, मतं तपासून घ्यायला हवीत. ‘आपण स्त्री आहोत’ असं सारखं सांगण्याची गरज का भासते हाच मुळात मला पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबत विचार केला की, मला असं लक्षात येतं की, आजही ठिकठिकाणी अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. त्याची चीड, राग म्हणून धडाडीने समोर येणं, व्यक्त होणं, बिनधास्त आपली मतं मांडणं असे परिणाम दिसून येताहेत. त्यामुळे स्त्रीवाद, स्त्रीशक्ती यासंबंधीचे संदेश सोशल साइट्सवर झपाटय़ाने पसरताना दिसताहेत. दीपिकाच्या व्हिडीओबद्दल मी तटस्थ आहे. त्यात मला चूक-बरोबर किंवा चांगलं-वाईट असं काहीच वाटत नाही. तुम्हाला जसं हवं तसं वागण्याची मुभा प्रत्येक व्यक्तीला असलीच पाहिजे. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. मी स्वत:ला सगळ्यात आधी एक माणूस म्हणून वागणूक देते, मग एक मुलगी म्हणून स्वत:कडे बघते. प्रत्येकाने असंच वागलं पाहिजे. मुलगा-मुलगी असं करून ही गोष्ट गुंतागुंतीची का करायची? माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतात. आपल्याकडे एक अडचण अशी आहे की, आपण प्रत्येक कृतीमागे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीला अर्थ असायलाच हवा, हा अट्टहास कशासाठी? एखादी मुलगी रात्री एकटी कुठे बाहेर जात असेल किंवा येत असेल तर त्यामागे नेहमी चुकीचाच अर्थ का काढला जातो. एखाद्या मुलीला चांगलं दिसावंसं वाटतं, स्वत:ची काळजी घ्यावीशी वाटते, स्वत:वर प्रेम करावंसं वाटतं यात गुन्हा काहीच नाही. शारीरिक संबंधांशी निगडित असलेल्या दृष्टिकोनांसह एकूणच इतर गोष्टींबाबतही दृष्टिकोन बदलायला हवेत.
स्वातंत्र्य असायलाच हवं -हृषीकेश जोशी
काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोणच्या बाबतीत अशीच आणखी एक घटना घडली होती. तिच्या एका फोटोविषयी एका वृत्तपत्राने एक बातमी केली होती आणि तो चर्चेचा विषय बनला होता. अलीकडे आलेल्या तिच्या आणखी एका व्हिडीओची चर्चा होण्याला या घटनेची पाश्र्वभूमी आहे. मीडियाचं कलाकारांच्या खाजगी आयुष्यात गरजेपेक्षा जास्त डोकावणं, खोलात जाणं वाढलं आहे. ‘माय लाईफ माय चॉइस’ या तिच्या व्हिडीओमध्ये मांडलेल्या मतांशी मी पूर्णत: सहमत आहे. स्त्रियांनी काय करावं, काय करू नये हे ठरवण्याचा हक्क सर्वस्वी त्यांनाच आहे. तसंच लग्न करायचं की नाही, लग्नाआधी संबंध ठेवावे की नाही, विवाहबाह्य संबंध ठेवावे की नाही हाही सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे. यावर एखाद्याने बंधन घालावं असं अजिबात नाही. याबाबतचे सगळे निर्णय घेण्यास स्त्री स्वतंत्र आहे. तिने स्वतंत्र असायलाच हवे. तसंच मूल हवं की नको हा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात स्त्रिया सक्षम आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या खूप आहे. नोकरी करताना मूल म्हणून त्याची जबाबदारी घेता येणार आहे का, करिअर म्हणून ते करता येणार आहे का याबाबतची मतंही आता बदलत चालली आहेत.
शारीरिक संबंधांकडे आपल्याकडे फार दांभिकपणे बघितलं जातं. त्या-त्या वयाचा आणि त्या-त्या मानसिकतेचा तो प्रश्न असतो. या प्रश्नाला विशिष्ट चौकटीत बांधता येत नाही. व्यक्तिसापेक्ष गोष्टी बदलत जातात. नटांना प्रसिद्धी जास्त मिळत असल्यामुळे त्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांनाही प्रसिद्धी मिळते. व्हिडीओमध्ये मांडलेले अनेक मुद्दे शारीरिक संबंधांकडे झुकणारे आहेत. पण, शारीरिक संबंधावरचा मुद्दा केवळ नटांशी निगडित असतो असं नाही, तर इतरही क्षेत्रातल्या लोकांच्या आयुष्यातला तो प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या आयुष्यातही असे अनेक विषय असतात. पण, त्यात न्यूज व्हॅल्यू नाही. सेलिब्रेटींच्या बाबतीत मात्र लगेच त्याची बातमी होते. अनेक कॉलेजेसमध्ये जीन्स न घालण्याचा नियम आहे. अशी बंधनं दुसऱ्यांनी घालून काय होणार आहे? हा विचार मला सनातनी वाटतो. सभोवतालचं भान ठेवून काय घालावं या विषयीचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही स्त्रीला असायलाच हवं. आणि या निर्णयाची जबाबदारीही तिने घ्यायला हवी.
आदर करायला हवा – प्रिया बापट</strong>
‘माय लाइफ माय चॉइस’ या व्हिडीओमध्ये मांडलेले प्रश्न हे फार थोडे आहेत. स्त्रियांविषयक इतर अनेक प्रश्न आहेत जे व्हिडीओमध्ये मांडले गेले नाहीयेत. त्यावरही बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी एकमेकांचा आदर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्त्रीने स्त्रीचा, पुरुषाने स्त्रीचा आणि पुरुषाने पुरुषाचा अणि स्त्रीने पुरुषाचा असा सगळ्यांनीच एकमेकांचा आदर करायला हवा. याची सुरुवात आपल्या घरातूनच व्हायला हवी. मुलीला स्वयंपाक शिकवला जातो, तर तो मुलालाही शिकवला गेला पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीचा आणि स्त्रीमुक्ती चळवळीचाही अतिरेक होऊ नये. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असावी. विशिष्ट गोष्टीचा बाऊ करताना त्याची खरंच किती गरज आहे हे ओळखावं. एक कलाकार म्हणून मला जर अशा प्रकारचा व्हिडीओ करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच तिचा विचार करेन. मला तो मुद्दा पटत असेल, माझा स्वत:वर विश्वास असेल, माझ्या म्हणण्याने चार गोष्टी बदलणार असतील आणि प्रभाव पडणार असेल तर मी नक्कीच ते प्रोजेक्ट करेन; पण अर्धवट ज्ञानाने पुढे पाऊल टाकणार नाही. पूर्ण अभ्यासाने ते स्वीकारेन. दीपिकाने केलेली ही पीआर अॅक्टिव्हिटी नाही असं मी म्हणणार नाही; पण ती खरंच तशी अॅक्टिव्हिटी आहे की नाही ही शक्यता आधी पडताळून बघितली पाहिजे. जर मी एखाद्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवते तर मी ते शेवटपर्यंत तसंच ठेवेन, या मतावर कलाकाराने ठाम असायला हवं. त्यामुळे दीपिकाच्या बाबतीत जर तो पीआर स्टंट नसेल तर ती पुढेही तिच्या या मतांवर ठाम राहील आणि जर स्टंट असेल तर ती ते सोडून देईल. हे तपासण्यासाठी काही काळ थांबावं लागेल. ‘माय लाइफ माय चॉइस’ हे फक्त मुलीच्या बाबतीत नसावेत, तर मुलाच्या बाबतीतही असावेत.